अनवट किल्ले २८: अंमळनेर, बहादुरपुर ( Amalner, Bahadurpur )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
3 Mar 2018 - 7:02 pm

लक्ष्मीबाईच्या माहेरचा वारसा सांगणारा पारोळ्याचा अनोखा भुईकोट पाहून आम्हाला जायचे होते, ते बहादुरपुर आणि अमळनेरचे केवळ अवशेष रुपात राहिलेले भुईकोट बघायला. लगेच बस नव्ह्ती, सहाजिकच खाजगी जीपकडे मोर्चा वळवला आणि पुढच्या सिटवर स्वतःला कसेबसे कोंबून घेत जीप केव्हा सुटते याची वाट पाहु लागलो. पण जीपवाल्याला जीपमधे जास्तीतजास्त कितीजण बसु शकतात याचे गिनेस रेकॉर्ड तोडायचे असावे. बहुतेक बस भरू शकेल ईतके लोक ठोकून जीपमधे बसवल्यानंतर समाधान झाले असावे आणि जीप बोरी नदीच्या काठाने बहादुरपुरकडे निघालो. पारोळ्यापासून बहादूरपूर ८ किमी अंतरावर आहे. पारोळा अंमळनेर रस्त्यावर बहादरपूर फाटा आहे. याशिवाय धुळे - जळगाव रस्त्यावर मोंढाणे गावाजवळ बहादरपूरला जाणारा फाटा आहे. तेथून बहादरपूर १० किमी अंतरावर आहे.
जळगाव जिल्ह्य़ात गडकोट तसे कमीच आहेत व जे आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आणि भुईकोट. अशाच भुईकोटापैकी एक कोट म्हणजे बहादरपूर किल्ला. १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे या दोन जिल्ह्याचा मिळून एकच खानदेश जिल्हा होता.या खानदेशात पारोळा व अंमळनेर या शहरांच्या मध्यवर्ती बोरी नदीच्या काठावर बहादरपूर किल्ला उभा आहे. पारोळा व अंमळनेर या दोनही ठिकाणी असणाऱ्या भुईकोटाना रसद पुरविण्याचे काम बहादरपूर किल्ला करत होता.
Bahadurpur1
मला हा बहादुरपुरचा कोट बघायची उत्सुकता होती. बोरी नदीवरचा पुल ओलांडला आणि समोर उंच असा बुरुज दिसु लागला. सप्टेंबर महिना असल्याने नदी दुथडी भरुन वहात होती. गावातील स्त्रिवर्ग धुणी धुण्यात मग्न होता, तर रविवारची सुट्टी कारणी लावायला गावातील समस्त मुले पुलावरच्या एका दगडाला दोर बांधून त्याला लटकून पोहण्याचा आनंद घेत होती.
पुल ओलांडुन गावात उतरलो आणि एका एतिहासिक गावात आल्याचे समाधान लगेचच दुर झाले. अत्यंत घाणेरडे गाव असा याचा उल्लेख करता येईल. ट्रेकिंगनिमीत्त अनेक खेडी फिरलो होतो, अनेक अंगणात झोपलो होतो, पण ईतके गचाळ गाव त्यानंतर मला सुतोंडा किल्ल्याचे पायथ्याचे नायगाव सोडले तर दुसरे पाहिले नाही. स्वच्छ भारत अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे श्ब्दही गावकर्‍यांच्या कानावरुन गेले नसावे. भुईकोटाचे आणि ईतर अवशेष जागोजागी विखुरले आहेत. एक रस्ता पकडून आम्ही भुईकोटाच्या तटबंदीकडे निघालो.
बहादरपूर किल्ला नगरकोट व बालेकिल्ला अशा दोन भागात विभागलेला असुन कोटात असणाऱ्या ५० फुट उंचीच्या टेकडावर बालेकिल्ला उभा आहे. चौकोनी आकाराच्या या बालेकिल्ल्याची लांबीरुंदी २५० x १५० फूट असुन बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण एक एकर आहे. तटबंदीत चार बाजूला चार गोलाकार बुरुज असुन एका ४० फूटी भल्या मोठया बुरुजाचा आतील भाग झाडामुळे ढासळून आहे व बाहेरील भाग शिल्लक आहे. गडाचा गावाच्या बाजूला असलेला भाग अतिक्रमणामुळे झाकला गेला आहे. किल्ल्याची देखरेख नसल्याने स्थानिक आजही या किल्ल्याचा शौचालय म्हणुन वापर करतात. बोरी नदीच्या पात्रातुन उजव्या बाजुस बालेकिल्ल्याची २५० फुट लांब तटबंदी व त्यातील दोन बुरुज दिसतात.
Bahadurpur2
प्रत्येक गडकोटाचे काहीतरी वैशिष्ट्य असतेच. उंच बांधलेले बुरुज या कोटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागतील. इतके बुलंद व सुंदर बुरुज फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतात. पण स्थानिक लोकांच्या अनास्थेमुळे किल्ल्याची अवस्था दिवसेंदिवस फारच वाइट होत आहे.
Bahadurpur3

Bahadurpur4

Bahadurpur5

Bahadurpur6

Bahadurpur7
वास्तविक नीट शोध घेतल्यास गावात अजून एतिहासिक अवशेष पहायला मिळु शकतात, पण ईतक्या गलिच्छ गावात आणखी फिरण्याचा धीर झाला नाही.
Bahadurpur8

नदीच्या पात्रापासून तटबंदीची उंची २० फुट असुन यातील एक बुरुज अंदाजे ४० फूट उंच आहे. दुसऱ्या बुरुजाचा तटबंदी पर्यंतचा भाग शिल्लक असुन या बुरुजावर एक कबर आहे. किल्ल्यावरील पर्शियन भाषेतील शिलालेख ग्रामपंचायतीत ठेवलेला आहे. स्थानिक लोकांच्या अनास्थेमुळे किल्ल्याची अवस्था फारच वाईट झाली आहे. गावाच्या एका बाजूस बोरी नदीपात्राचे असलेले नैसर्गिक संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते ते आजही दिसून येतात. शहराच्या उरलेल्या बाजूला दरवाजे, तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केले होते. गावात फेरी मारली असता अनेक ठिकाणी तटाबुरुजाचे व वाड्याचे अवशेष दिसून येतात.
Bahadurpur9
पुर्वी गावाला चारही बाजूंनी तटबंदी असुन तटबंदीत दरवाजे असल्याचे गावकरी सांगतात. ही ढासळलेली तटबंदी आजही अनेक ठिकाणी दिसून येते. गावात बऱ्याच घराबाहेर दगडी तोफगोळे पडलेले दिसतात. गावाबाहेर अजुन एक लांबीरुंदीने ७०० x ३०० फुट आकाराची चारही बाजुस तटबंदीने बंदिस्त केलेली वास्तू आहे. या वास्तूत एक दगडी बांधकामाची मशीद असुन तीन सुरेख दगडी बांधकाम असणाऱ्या वास्तू आहेत. यातील एका वास्तूत पाच कबरी असुन दुसऱ्या वास्तूत दोन कबरी आहेत. या तीनही वास्तूंच्या खाली तळघरे आहेत. एकंदरीत बांधणीवरून या राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्तींच्या कबरी असाव्यात असे दिसते.
Bahadurpur10
हे ठिकाण आपल्याला अलिबागच्या आंग्रे घराण्याच्या छत्रीबागेची आठवण करून देते. बहादरपूर किल्ला पाहताना हे ठिकाण अवश्य पहायला हवे. किल्ल्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध असुन इ.स. १५९६ मध्ये बहादुरखान सूरी याने हा किल्ला बांधला. १७५१साली नानासाहेब पेशवे व गायकवाड यांच्यात बहादरपूर येथे बोरी नदीच्या तीरावर लढाइ झाली. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन याने अंमळनेर कोटावर हल्ला करण्यापुर्वी त्या गडाची रसद बंद करून नाकेबंदी करण्यासाठी प्रथम हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला
आता आम्हाला जायचे होते आजच्या दिवसातील शेवटचा भुईकोट पहायला, "अमळनेर". बहादुरपुरगावात एका बाजुला अमळनेरकडे जाणार्‍या खाजगी सहा आसनी रिक्षा उभ्या होत्या. इथेही चालकाने आमच्या सहनशक्तीची पुरेशी परिक्षा पाहिल्यानंतर अखेर डुगडुगत रिक्षा सुरु केली. वाटेत बर्‍याच पुलावर ओढ्याचे पाणी आले होते,डायव्हर साहेब मात्र चक्क रोलरकोस्टर सारखी त्यातून रिक्षा उधळत होते. वॉटरपार्कच्या राईडचा अनुभव घेउन आम्ही एकदाचे अमळनेर एस.टी. स्टँडजवळ पोहचलो.
अमळनेर हे शहर तापी नदीच्या खो-यात बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे या दोन जिल्ह्याचे मिळून एकच खानदेश जिल्हा होता त्या खानदेशातील अमळनेर व पारोळा ही मध्यवर्ती ठिकाणे होती. साने गुरुजी यांची ही कर्मभूमी असुन इथल्या प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी अध्यापन केले आहे. सुमारे दीडशे-पावणेदोनशे वर्षापुर्वी अमळनेर येथे सखाराम महाराज संत होऊन गेले.
Amalner1

बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी आहे. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे अमळनेरला क्षेत्र म्हणून मिळालेली प्रसिद्धी आजही कायम असुन ते खानदेशचे पंढरपुर समजले जाते. याशिवाय अंमळनेरात मंगळ ग्रहाचे मंदिर आहे. कधीकाळी अंमळनेर हा नगरकोट होता पण शहर वाढल्याने किल्ल्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.
या शहराच्या एका बाजूस बोरी नदीपात्राचे असलेले नैसर्गिक संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते.
Amalner2
शहराच्या उरलेल्या तीन बाजूला ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केले होते.
Amalner3

Amalner4

आजही अंमळनेर शहरात किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्याच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज पहायला मिळतात.
Amalner5
बोरी नदीच्या पात्रातील रस्त्याने संत सखाराम महाराज समाधी मंदीराकडे जाताना उजव्या बाजुस किल्ल्याची चाळीस फुट लांब तटबंदी व त्यातील दोन बुरुज दिसतात.
Amalner6
या तटबंदीत नदीपात्राच्या दिशेने कोटाचा एक लहानसा दरवाजा असुन त्यांवर मशीदीसारखे छोटे मिनार आहेत. तटबंदीवर स्थानिकांनी घरे बांधली आहेत.
Amalner7
नदीवरील वाडी संस्थानकडून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना वाटेत पाच-सहा जुने वाडे पहायला मिळतात. या सर्व वाड्यावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेले आहे. याशिवाय वाडी संस्थानाच्या धर्मशाळेच्या शेजारी एक प्राचीन मुर्ती झाडाखाली उघडयावर ठेवलेली आहे.
अमळनेरच्या भुईकोटाच्या इतिहासात डोकावल्यास, अंमळनेर नगरकोट केव्हा व कुणी बांधला याचा इतिहास उपलब्ध नाही. पेशवाईत या किल्याची व्यवस्था मालेगांव येथील राजेबहाद्दरांकडे होती. इ.स १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचे प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. ब्रिटीशांनी खानदेशावर आपला ताबा बसविला त्यावेळी पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी ब्रिटीशांच्या ताब्यात किल्ला देण्याचे नाकारले. तेव्हा मालेगाव येथून ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन याच्या अधिपत्याखाली ब्रिटीशांची सुमारे एक हजार भिल्ल बटालीयन तोफखाना व घोडदळ यांसह किल्ल्यावर चालून आली. त्यांनी नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. जमादार अली व त्याच्या सैन्याने प्रयत्नाची शर्थ केली पण एवढ्या मोठ्या फौजेशी सामना देणे त्यांना नव्हते. ब्रिटीशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ला ब्रिटीशांनी ताब्यात घेतल्यामुळे त्या किल्ल्यावरुन येणारा दारुगोळा व रसद बंद झाली त्यामुळे त्यांना किल्ला खाली करावा लागला. अली जमादार व त्याच्या सैन्याने आपली शस्त्रे किल्ल्याबाहेर आणून ठेवली व नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले व अमळनेर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
बाजारपेठेतील अवशिष्ट असणारे महाद्वार बघून आम्ही स्टँडजवळच्या एका कोल्ड्रींगच्या दुकानाकडे मोर्चा वळवला, मस्तपैकी गार लस्सीचे दोन ग्लास पोटात रिचवून या भुईकोटांच्या सहलीचा थंडगार शेवट केला.

अमळनेरचा भुईकोट

बहादुरपुरचा भुईकोट

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१ ) खानदेश गॅझेटियर
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) www.dirgbharari.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Mar 2018 - 8:54 am | प्रचेतस

एकदम अनोखी भटकंती.
किल्ल्यांची खरोखरच दुरवस्था झालेली दिसते आहे.

माहितीपूर्ण. बुरुज भारी आहेत.

आर्या१२३'s picture

6 Mar 2018 - 3:33 pm | आर्या१२३

अशी खळखळ वहात असलेली बोरी नदी पाहुन मन भरुन आले. या वेळी धुळ्याला गेले तेव्हा पान्झरेतही वाहते पाणी बघुन खुप बरे वाटले. असो.

खान्देश आणि त्यातल्या त्यात धुळे जिल्हा म्हणजे सावत्र अपत्य.. शासनाचा दुर्लक्षित परगणा. त्यात स्थानिक राजकारणी ही उदासिन . (सध्या अनिल गोटे धुळे विभागात चांगले काम करत आहेत ही माहिती मिळाली) तर त्यामुळे ही अवस्था! किती मोठा ऐतिहासिक वारसा आपल्या भागात आहे, हे रहिवाश्यानाही माहित नसेल.

तुमच्या लेखनातुन, फोटोमधुन ही माहिती जगाच्या कानाकोपर्यात पोहोचते आहे, त्यावरुन तरी पुरातत्व खाते जागे होईल आणि या भागातील गडकिल्यांचे संवर्धन/जतन करेल हि अपेक्षा.

सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार. वल्लीदा, कंजुस काका आणि आर्या ताई आपल्या विस्तृत प्रतिसादाबध्दल मनापासून आभार. याच मालिकेत पुढचा धागा असेल चाळीसगावजवळचा राजधेर उर्फ ढेरी.

ह्यामाइलिकेचे एक पुस्तक बनवा. निदान एक पीडीएफ तरी बनवा.

त्रिवेणी's picture

20 Apr 2018 - 4:44 pm | त्रिवेणी

अरे माहेरी जाऊन आलात की माझ्या. अमलनेरचे फोटो बघून मस्त वाटल. आता पौर्णिमेपासून यात्रा सुरु होईल सखाराम महाराज मंदिराजवळच्या नदी पात्रत.

बहादूरपूरचे फोटो पाहून असं वाटतंय की हा किल्ला खानदेशच्या फारुकी सुलतानाशी संबंधित आहे. तिथल्या फारसी शिलालेखाचा फोटो आहे का?

तिथे आणि अमळनेर मध्ये फारुकी, मग मोगल (दरवाज्यांच्या नक्षीदार कमानी) आणि शेवटी मराठा प्रभाव (दरवाज्यावरचा नगारखाना आणि वाडे) दिसतो आहे.

पैसा's picture

20 Apr 2018 - 11:17 pm | पैसा

इतिहासाबद्दल अनास्था ओतप्रोत दिसते आहे. :(