मराठी दिन २०१८: समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता.... (उखाणे)

Primary tabs

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
28 Feb 2018 - 10:24 am

समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता....

कथा, कादंबऱ्या, काव्य, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, लघुनिबंध, नाटकं, लोकसाहित्य, समीक्षा इत्यादी विविध प्रकारांचा साजशृंगार चढवून आपली मराठी भाषा सजली आहे, नटली आहे. पण बहुधा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीतच आढळणाऱ्या एका प्रथेत सादर होणारा साहित्य प्रकार म्हणजे - शुभप्रसंगी उखाण्यात नाव घेणं. साहित्य प्रकार म्हणून जरी याची विशेष गणना होत नसली, तरीही मराठी भाषेच्या साजशॄंगारातील हा एक छोटासा पण सुबक दागिना.

उखाण्यात पतीचं नाव घेण्याची सुरुवात सहसा मुलीच्या लग्नापासून होते. (अर्थात नाव घेण्यात पुरुषांचाही समावेश असतोच). त्यानंतर गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, कंकण सोडणं, डोहाळे जेवण, बारसं अशा अनेक प्रसंगी ही परंपरा चालूच राहते. पूर्वी मुलींची लग्नं लहान वयात होत असत आणि नवऱ्याचं नाव उघडपणे घेण्याची वा नवऱ्याला नावाने हाक मारायची पद्धत नव्हती. शिवाय अनेकदा वधु-वरांनी एकमेकाला लग्नाआधी पाहिलेलंसुद्धा नसायचं. त्यामुळेच अशा प्रकारे आपल्या पतीचं नाव घेण्याची प्रथा पडली असावी. अनेकदा वधुवरांना एकमेकाचं नावही माहीत नसे आणि मग पुलंनी लिहिल्याप्रमाणे एखादी नववधू बिनदिक्कतपणे ’बेंबटेरावांचं नाव घेते....’ असा उखाणा घेऊन मोकळी व्हायची. पण काहीही म्हणा, आपल्या जीवनात नव्याने प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची इतकी चांगली ओळख करून देण्याची रीत फक्त मराठीतच असावी. आजच्या काळात एक गंमत या पलीकडे उखाण्याचं महत्त्व उरलं नसलं, तरीही उखाणे हे स्त्रीचं भावविश्व व्यक्त करतात. काळ बदलला तरी आजही मुलीच्या, स्त्रीच्या भावना त्याच आहेत, कदाचित आविष्कार बदलला असेल.

असेच काही उखाणे आपण पाहू या. काही उखाणे दोन घरांच्या वा कुटुंबांच्या मिलनाची ग्वाही देतात -
- एका मातीतली तुळस दुसऱ्या मातीत रुजवली, ---- रावांची माणसं मी आपली मानली.
- माहेरचं निरांजन सासरची वात, ---- रावांचं नाव घेऊन करते संसाराची सुरुवात.
- ---- रावांच्या बरोबर जाताना मन गेलं गांगरून, आई-बाबांच्या आशीर्वादाची शाल घेते पांघरून.

तिच्या नवीन विश्वात तिच्या जोडीला असतो तो तिचा जीवनसाथी. त्याच्याकडून ती आनंदी व सुखी जीवनची स्वप्नं रंगवते. त्याबरोबरच त्याच्यावरचा विश्वासही व्यक्त करते आणि त्याच्या क्षेमकुशलाची प्रार्थना करते.
- शुभ मंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी, ---- राव आता माझे जीवनसाथी.
- कळी हसेल, फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध, ---- च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
- स्वाती नक्षत्रातील थेंबाने शिंपल्यात होतो मोती, ---- च्या संगतीत उजळेल जीवन ज्योती
- मंगल देवी, मंगल माते वंदन करते तुजला, ---- रावांना आयुरारोग्य लाभो हीच प्रार्थना तुला.
- बकुळीचा बकुल गंध, मातीचा मृद्गंध, ---- ची साथ हा रेशमी ऋणानुबंध.

लग्नानंतर ती फक्त पतीशीच नाही, तर सासरशी संबंधित सर्वांशी आपलं नातं जोडते. त्यांचा मान राखते, सासरचं घर आपलं मानून स्वत:चं घर कसं असावं हेही सांगते.
- लग्नासारख्या मंगल दिनी नका कुणी रागवू नी रुसू, ---- ना घास भरवताना मला येते गोड हसू
- नाव घे नाव घे आग्रह पडला सर्वांचा, ---- चं नांव घेते मान राखून प्रेमाचा
- श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य, ---- आणि माझ्या संसारात होईल सर्वांचे आदरातिथ्य
- सुख, समाधान तिथे लक्ष्मीचा वास, अशा घराची माझ्या मनी आस, ---- ला/ना भरवते जिलबीचा घास
- अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा, ---- आणि माझ्या पाठीशी सदैव राहोत हीच माझी इच्छा

सुखी संसाराची पुढची पायरी म्हणजे बाळाची चाहूल. ही गोड बातमी सांगताना ती म्हणते,
- सूर्य मावळतो चंद्र उगवतो रजनी टाकते हळूच पाऊल, ----- आणि ---- च्या संसारात लागली बाळाची चाहूल

ही गोड बातमी कळल्यावर पहिलटकरणीचा थाट मांडला जातो. तेव्हा आपल्या कौतुकाचं वर्णन कराताना ती म्हणते,
- सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सं आहेत हौशी ---- चं नाव घेते डोहाळ जेवणाच्या दिवशी.
- चांदीच्या भांड्यांना नाशिक घाट, ---- चं नाव घेते आज डोहाळ जेवणाचा थाट.

उखाण्यांशी जरी स्त्रीचं भावविश्व जोडलेलं असलं, तरी या उखाण्यांच्या रचनेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यमक जुळवणं. मग आगदी भावनांची मांडणी असायलाच हवी असं नाही आणि पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी अर्थाअर्थी काही संबंध असायला हवा असंही नाही. यामुळेच यमक जुळणीचे असे असंख्य नमुने पाहायला मिळतात, उदा.,
- हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, ---- चं नाव घेते ---- च्या दिवशी
- महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, ---- च नाव घेते सर्वांचा मान राखून

असेच काही उखाणे पुरुष वर्गाच्या मदतीला हमखास धावून येणारे -
- भाजीत भाजी मेथीची, ---- माझ्या प्रीतीची
- देवाची करणी नारळात पाणी, ---- च आहे माझी राणी
- वन टू थ्री वन टू थ्री, ---- चं नाव घेतो मला करा फ्री
- डेलचा पीसी, सीगेटची डिस्क, ---- शी लग्न केलं घेतली मोठी रिस्क
- नाशिकची द्राक्षं नागपूरची संत्री, ---- झाली माझी गृहमंत्री

ग्रामीण उखाण्यांचा बाज थोडा वेगळा असतो, त्याचे काही नमुने -
- हंड्यावर हंडे सात, त्यावर साखरेची परात, ---- भर्ताराचं नाव घेते येऊ द्या मला घरात
- दारात होती तुळशी घालत होते पाणी, आधी होते आईबापाची तानी, आता झाले ---- रावांची राणी
- काळी साडी काळं झंपर, निऱ्या घालते ठासून, ---- चं नाव घेते त्यांच्या मांडीवर बसून
- झाड झुमक्याचं, पान उमक्याचं, कढी ताकाची, लेक बापाची, नाजूक नार ---- भर्ताराची

काही ठिकाणी हौशी बायका जनपद - म्हणजे मोठे उखाणे घेतात. उदा.,
- घरापुढे अंगण, अंगणापुढे ओसरी, ओसरीपुढे माजघर, माजघरात फडताळ, फडताळात चांदीचं भगुलं, भगुल्यात होती रवी, ---- रावांची साथ मला हवी

सध्याच्या काळात जरी हे कालबाह्य वाटलं, तरीही 'एफ़बी'वर आणि 'व्हॉट्स अ‍ॅप'वर ’अपलोड’ करण्यासाठी तरी ’उखाण्यात नाव घेणं’आपलं अस्तित्व टिकवून आहे, हेही नसे थोडके. उखाण्यासाठी यमक जुळवणं त्याहीपेक्षा परस्परांशी जुळवून घेणं अधिक महत्त्वाचं आहे, नाही का?
.
.
1

संस्कृतीवाङ्मयभाषाउखाणेआस्वादमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Feb 2018 - 11:15 am | पैसा

खास जुन्या बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय. हे उखाणे खूप मनोरंजक असतात. एक जानपद उखाण्याचा नमुना इथे देते.

पलंगाला दिला पलंग, लावला घरां, आपण गेलं शहरां, कळवंतीणी घालतात वारां, शहराच्या पेठं, तिथ घेतला चंद्र्हार, चंद्र्हाराचं सोनं मोठं नाजूक फार, चंद्रहाराची घडण मोठी नक्षीदार, गांठवायला लागले तीनचार, तिथं घेतली बोरमाळ, तिथ होत्या सराफाच्या माडया उघडया , तिथ घेतल्या हजाराच्या बुगडया, टाकल्या खिशांत , गेले कानडी देशांत, तिथं मागविली पैठणी , पैठणीचा रंग उदी फीका, कागदावर लिहून धाडते फिक्क्या रंगाची घेऊं नका, वाकडी नथ , दुहेरी फासा , गेले बंगाली देशां , तिथ घेतले तोडे, तिथं घेतल्या विरोदी कोयर्‍या, जोडण्याची घडण मोठी नक्षीदार, तिथं घेतल्या गोठ पाटल्या,हाती मनगटी दाडल्या, तिथुन परत लेणं झालं, हैदराबादला, तिथ घेतल जडीताचं मंगळसूत्र , तिथ घेतली टीका पानाडी , तिथ घेतले हजाराचे मोती, नथीला बसीवली टीक, कुडकाला बसवले मोती, अशी लेणारीन कोणे होती, जाधवाची सून नेणती. सासु सासर्‍याच नांव घेतलं पुसून, सराफानं घेतली खूण, तिथून परत येणं झालं, वसलशाच्या पोटीं उतरलं समुद्राच्या काठीं , मोत्या पोळ्याला केली शालुची ओटी, तिथून परत येणं झालं , पहिला मुक्काम कुठं ? कानगांवच्या पठं,

दुकानामधीं ऊभे कुडयाला बसवले झुबे, तिथून परत येणे झालं, दुसरा मुक्काम कुठं तर तासगांवच्या पेठं. तिथ घेतली मोहनमुदी , तिथून परत येण झालं . तिसरा मुक्काम कुठं? सातार्‍याच्या पेठं तिथ घेतली मोहनमाळ , तिथून परत येणं झालं. चौथा मुक्काम कुठं ? पंढरपूरच्या पेठं तिथं घेतला खळणीचा शालू, तिथं घेतला मलमलीचा सदरा,तिथ घेतला जरीचा मंदील, तिथ आली सर्व शृंगाराला शोभा. तिथून येणं झालं, पांचवा मुक्काम कुठं माढ्याच्या पेठं, तिथ घेतली तांदळ्याची लिंबोळी, तांदळ्याची लिंबोळी, पांचपदरी शेजारी, मोत्याची गजरी,तिथून परत येणं झालं, सहावा मुक्काम कुठं ! पुण्याच्या पेठं तिथं घेतला कुलपाचा कारदोरा, तिथून परत येणं झालं,सातवा मुक्काम कुठं ! बारशीच्या पेठं , तिथं घेतली कुडलं,तिथून परत येणं झालं, आठवा मुक्काम कुठं ? मुबईच्या पेठं तिथ घेतली सरपळी, तिथून येणं झालं. नववा मुक्काम कुठं ? सांगलीच्या पेठं तिथं घेतली घोसाची, वजरटीक, तिथून परत येणं झालं. दहावा मुक्काम कुठं ? दहाव्या मुक्कामाला काढंलं आगीनगाडीचं तिकीट. आगिनगाडी सुटली वार्‍याच्या पळीं उतरले मोहळ्च्या स्टेशनावरी. तिथं घेतली घुंगराची गरसोळी, स्वामी आले, आनंद झाला. आकरावा मुक्काम कुठं ? सोलापूरच्या पेठं. तिथं केला सर्व बाजार, रुपये झाले हजार, त्याची गणती कोणी केली ? सोलपूरच्या सराफानें, तिथून परत येणं झालं. बाराव्या मुक्कामाला आले आपल्या घरीं, जडीताचं मंगळसूत्र गाठविलं तुळजापुरीं. स्वामी आलें आपल्या घरीं. श्रृंगार ठेवला, मंदीरीं जाऊनी बसलें, मैदानीं ऊन ऊन पाणी विसणलं घंगाळांत, जलदी अंगोळ करा, ताट काढून तयारी गेलें मंदीरीं सर्व शृंगार घातला अंगावरी, शंभर गांवच्या सोनाराची पारख केली. आपल्या जीवाची कसोशी केली पण

x x x राव माझ्या जडीताच्या मंगळसूत्राची घडण नाहीं बरोबर झाली.

सस्नेह's picture

28 Feb 2018 - 11:36 am | सस्नेह

बाबौ ! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2018 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

मॅराथॉन उखाणा... गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड्समध्ये नोंदवण्यासाठी पाठवायला हवा ! =))

पैसा's picture

28 Feb 2018 - 12:44 pm | पैसा

http://www.transliteral.org/pages/i070925221347/view इथे असले अजून नमुने आहेत. =))

प्राची अश्विनी's picture

28 Feb 2018 - 2:47 pm | प्राची अश्विनी

धन्य आहे.

हा ऐकलाय आधी थोड्याफार फरकाने. मोहोळ, बार्शी, पंढरपूर, तुंलजापूर, सोलापूर, माढा, जवळपास सर्व गावे आमच्याइथलीच म्हणून आपला वाटला.
भारीय.
उखाण्यांची स्पर्धा ठेवली पाहिजे. ;)

तुमचा आता त्यावर भरपूर अभ्यास झाला असेल ना

अभ्या..'s picture

28 Feb 2018 - 4:35 pm | अभ्या..

प्रचंड,
टूसन लूं?

मी नै ऐकलं ब्वॉ तुला उखाणा घेताना.

अनिंद्य's picture

28 Feb 2018 - 4:00 pm | अनिंद्य

दागिन्यांची आवड आणि स्मरणशक्ती दोन्ही जबरदस्त :-)

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2018 - 12:42 am | पिवळा डांबिस

हा इतका लांबलचक उखाणा म्हणजे पंगतीतल्या इतरेजनांचा छळ आहे!
आपण तर बुवा वधू हैदराबादेत गेलेली असतानांच समोरच्या पानातल्या जिलबीचा (वधूसकट) तुकडा मोडला असता!!
बाकी स्वतःच्या लग्नातल्या उखाण्यातच इतकं बोलणारी बायको हा त्या नव-नवर्‍यासाठी धोक्याचा इशारा नव्हे काय? ;)
केला इशारा येता-येताच!! :)

अनिंद्य's picture

1 Mar 2018 - 10:47 am | अनिंद्य

धोक्याचा इशारा :-) :-)

महेश हतोळकर's picture

1 Mar 2018 - 2:25 pm | महेश हतोळकर

बाकी स्वतःच्या लग्नातल्या उखाण्यातच इतकं बोलणारी बायको हा त्या नव-नवर्‍यासाठी धोक्याचा इशारा नव्हे काय? ;)

एवढे खंडीभर दागिने घेऊन वर मंगळसुत्राची कंप्लेंट आहेच.

सविता००१'s picture

2 Mar 2018 - 7:55 pm | सविता००१

हे फार भारी आहे ....

वाह. काही उखाणे उपयोगी आहेत.

पद्मावति's picture

28 Feb 2018 - 2:44 pm | पद्मावति

वाह, मस्त लेख.

प्राची अश्विनी's picture

28 Feb 2018 - 2:47 pm | प्राची अश्विनी

मस्तच!

मार्मिक गोडसे's picture

28 Feb 2018 - 3:10 pm | मार्मिक गोडसे

छान लेख.
उखाण्यामुळे सर्वांसमोर आपल्या जोडीदाराचे नाव घ्यायची संधी मिळते, एरव्ही वडीलधाऱ्यां समोर पतीला नावाने हाक मारली की डोळे वटारले जातात.
एक नॉनव्हेज उखाणा- मटणात मटण बोकडाचे मटण ***रावांच्या कोटाला हाडकाचे बटण.

अनिंद्य's picture

28 Feb 2018 - 3:58 pm | अनिंद्य

उखाणे जोरात आहेत :-)
उखाणा महाराष्ट्राची खास ओळख आहे. पिताश्री एक किस्सा सांगतात त्यात गावातील एक 'सलमा बी'

पुने कु आई बारीस नदी कु आया लोंढा
सय्यद भाई मेरे पीछे घोळता है गोंडा

असा उखाणा घेते :-)

कपिलमुनी's picture

5 Mar 2018 - 2:18 pm | कपिलमुनी

भाई ??

असाच ऐकलाय. मामाची मुलगी असेल :-)

भीडस्त's picture

28 Feb 2018 - 4:22 pm | भीडस्त

मस्त आहे उखाण्यांची सफर

किसन शिंदे's picture

28 Feb 2018 - 4:27 pm | किसन शिंदे

ग्रामीण उखाण्यांचा बाज थोडा वेगळा असतो, त्याचे काही नमुने -
- हंड्यावर हंडे सात, त्यावर साखरेची परात, ---- भर्ताराचं नाव घेते येऊ द्या मला घरात

हा उखाणा कधी ऐकला नव्हता, पण एकदा एका पंगतीला उखाणा घ्यायला सांगितल्यावर आयत्यावेळी मलाही असंच काहीसं सुचलं.

हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली कळशी,_______चं नाव घेतो मी जाम आळशी. =))

प्रीत-मोहर's picture

28 Feb 2018 - 4:37 pm | प्रीत-मोहर

मस्त उखाणे

सर्वसाक्षी's picture

28 Feb 2018 - 4:56 pm | सर्वसाक्षी

चांदीच्या ताटलीत जिलबीचे तुकडे,
घास देते बोकडा थोबाड कर इकडे

पैसा's picture

28 Feb 2018 - 5:00 pm | पैसा

=))

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2018 - 5:15 pm | चौथा कोनाडा

ऑल टाईम सुपरहिट उखाणा !

ऑर्केस्ट्रा मिमिक्री मधला फेवरेट !

स्मिता.'s picture

1 Mar 2018 - 2:16 am | स्मिता.

@पैसाताई, उखाणा आहे की निबंध!! ;)

माझ्याकडून थोडीशी भर:
चांदिच्या पेल्यात गुलाबाचे सरबत,
---रावांशिवाय मला नाही करमत

नूतन's picture

1 Mar 2018 - 11:09 am | नूतन

सर्वांच्या अभिप्रायांबद्दल आणि ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2018 - 8:20 pm | सुधीर कांदळकर

आवडले. हॅट्स ऑफ्फ

@पैसाताई: हॅट्स ऑफ्फ

आर्या१२३'s picture

7 Mar 2018 - 11:32 am | आर्या१२३

मस्त उखाणा पैसाताई!! पण याला जानपद उखाणा म्हणतात हे माहीत नव्हत.
एवढा उखाणा घेइस्तोवर समोरच्याचे पेशन्स काय रहात असतील. :)

अहिराणीमधे एक आहे असाच

खण खण कुदयी
मण मण माती
उभारल्या भिंती
चितारले खांब
अडकीत्याला लावले बदाम
साती भाऊ
मालेगावले जाउ
मालेगावनं धोतर
सोलापुरनी चादर
सोलापुरहुन आणले तीन खण
मी म्हणते मला, सासू म्हणते मला
नणंद म्हणते मला, जाऊ म्हणते मला
...... राव म्हणतात फार जुलूम केला

अनिंद्य's picture

7 Mar 2018 - 12:02 pm | अनिंद्य

@ आर्या१२३,
मजेदार आहे हा अहिराणी पण.
रावांनी तीन ऐवजी ४ खण घेतले असते तर :-)

फक्त माझ्या नवऱ्या्च्या नावाप्रमाणे त्यात बदल केला होता.
खण खण कुदळी
मण मण माती
उभारल्या भिंती
चितारले खांब
सासूबाईंच्या पोटी जन्मले राम
राम मी म्हटलं नाव नाही घेतलं
नावाकरीता उभारला मंडप
मंडपाबाहेर उभा गोवर्धन
माझ्या धन्याचं नाव आहे हर्षवर्धन!

आर्या१२३'s picture

7 Mar 2018 - 1:11 pm | आर्या१२३

वाह, खूपच छान गुंफलत यजमानांचे नाव उखाण्यात!