थोडासा विरंगुळा हो जाये .. एकमेकांचे अनुभव वाटुया

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
21 Feb 2018 - 4:09 pm
गाभा: 

नमस्कार मित्रमंडळी

आपण या धकाधकीच्या जीवनातून फक्त थोडावेळ बाहेर पडूया. गत आठवणींना उजाळा देऊया .. तर मग चला ... मी माझ्या काही आठवणींना उजाळा द्यायचा प्रयत्न करत आहे आणि एव्हढीच माफक अपेक्षा करतो कि आपल्याकडून पण काही गमतीशीर आठवणी आपल्या पोतडीतून बाहेर पडतील ..

लहान मुलं, खरंच किती निरागस असतात नाही .. सुदैवाने मलापण दोन मुलं आहेत .. मोठ्याचं नाव " सोहंम " आणि धाकटा " अंशुमान ". तुम्हाला सांगतो , कितीही मोठं दुःख कोसळलं ना तरी यांची निरागसता हळूहळू आपल्या दुखी मनाला त्यातून सुखरूप बाहेर काढते ... एक किस्सा सांगतो

आई गेल्यावर मी जवळजवळ २० दिवस कंपनीत गेलोच नाही ... इच्छाच नव्हती ... मी घरी गप्प बसून असायचो ... छोटा सकाळी शाळेत जायचा आणि त्याची यायची वेळ झाली कि मोठा शाळेला निघायचा .. आमची सौ ... गपगुमान हे सारे नित्यनेमाने करते ..मी असलो तरी नसलो तरी ..

शनिवारी हे दोघेही घरीच होते ... घरी मित्रमंडळी हाक मारायला आलेली .. त्यांनी काही विचार न करता माझ्या मुलांसाठी खाऊ आणला .. भरपूर सारे चॉकलेट्स , बिस्किट्स ... ते सर्व निघून गेल्यावर दोघेही त्यावरून भांडू लागले .. मी खेकसल्यावर एकदम शांत ... छोटा जरा द्वाड आहे .. त्याने हे बरोबर ताडलं कि बापाचं डोकं गेले कित्येक दिवस जागेवर नाहीय ... त्याने हळूच दादाला सांगितलं कि आपण कि नाही वाटणी करूया ... मी पेपर वाचत वाचत हे सारं गप्प बघत होतो ... छोटा हळूच माझ्याकडे बघायचा ,, माझं लक्ष नाही हे पाहून हळूच खाऊची बॅग बाहेर आणली ... वाटणी सुरु झाली
वाटणीची पद्धत बघा .... छोट्याने एकेक करून पोतडीतून सर्व बाहेर काढले .. जे जे एकसारखे होते ते एक केले .. म्हणजे चार कॅडबऱ्या एका साईडला , दोन पर्क वेगळ्या इति .. इति .. जे एकदमच वेगळं होत ते त्याने स्वतःच्या मालकीचं बनवून टाकलं .. तिकडे दादा वगैरे कुणी नाही .. सर्व नाती पाण्यात .. दादा बिचारा मूग गिळून गप्प बसला होता .. जे पण घडतंय ते हताशपणे पाहत होता .. मध्येच माझ्याकडे बघायचा आणि माझं लक्ष आहे म्हटल्यावर उचंबळून येणाऱ्या भावना सरळ घशात ..
पंधरा वीस मिनिटे विभाजनाचा कार्यक्रम आटोपल्यावर ..छोटा एकदम खुश .. तरीही कुठेतरी त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकूत होती .. सालं आपल्या पदरी जास्त आलंय कि कमी ? दादा काहीच बोलत नाही म्हणजे नक्कीच काहीतरी काळंबेरं असणार .. दादाला जास्तच मिळालं असणार .. परत त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली .. आतामात्र दादा पुरता भांभावून गेला .. त्याला काहीच सुचेना .. पप्पा बघतायत आणि परत रट्टे पडू शकतात म्हणून त्याने मिळालेल्या वस्तू मुकाट्याने पुढे केल्या .. छोटी स्वारी एकदम खुश झाली .. यावेळेस त्याने वेगळ्या वस्तू आधीच साईडला काढून ठेवल्या .. उगाच शंकेला वाव नको म्हणून .. जे जे एकसारखं होत त्याची त्याने लांबी रुंदी बघायला चालू केली .. दादाला जास्त मोठी तर मिळाली नाही ना .. हे सारं तो एकदम काटेकोरपणे चेक करत होता बरं का .. मग मात्र मला हसू आवरले नाही .. मी खो खो करून हसत सुटलो .. मी त्याला पटकन जवळ घेतले आणि त्याचे भरपूर मुके घेतले ..
मोठ्याला आणि बायकोला काय झाले ते काहीच कळले नाही .. पण एक मात्र कळले कि आमचे हे हळूहळू भानावर येत आहेत आणि जे या घरासाठी खरंच चांगले आहे ..
मंडळी .. अशी असतात हि लहान निरागस मुलं .. त्यांच्या निरागसतेला सलाम .. त्यांना कशाचंही काहीही पडलेले नसते .. फक्त येणारी वेळ मजेत कशी घालावयाची हेच त्यांना ठाऊक असते .. वेळेबरोबरच मिळणारा आनंद आपल्याला सर्वात जास्त कसा मिळेल याची मात्र ते काटेकोरपणे दक्षता घेतात ..

मला आपलेहि अनुभव वाचायला आवडतील .. कुणाची नातवंडे असतील त्यांनी त्यांच्या आठवणी सांगाव्यात .. कुणी आपल्या मुलांच्या .. कुणी अजून काही .. पण एकदा हि उजळणी करा म्हणजे झालं .. अहो आठवणी स्वतःकडे ठेवण्यापेक्षा त्या जरा उगाळल्या ना तर मन फार हलकं होत बघा .. करून बघा .. मी वाट पाहतोय ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

21 Feb 2018 - 5:15 pm | चांदणे संदीप

छान धागा होईल हा. :)

मीही वेळ मिळाला की सविस्तर एखादा किस्सा टाकेनच.

Sandy

खिलजि's picture

22 Feb 2018 - 12:11 pm | खिलजि

सँडी भाई ... खरंच इथे भरपूर आठवणी साठू शकतात ...आणि कायमच्या अजरामर होऊ शकतात .. पण सध्या जी चर्चा चालू आहे त्यावरून एकंदरीत असे दिसते कि हा धागा लवकरच पडद्या आड होईल .. बघू काय होतंय ते .. तुम्ही मात्र नक्की टाका तुमची आठवण या धाग्यावर .. मला वाचायला आवडेल ... धन्यवाद