गूढ अंधारातील जग -६
पाणबुडीचा शोध
जर पाणबुडी लपून छपून हल्ला करण्यासाठी इतकी प्रसिद्ध आहे आणी पाणबुडी एवढे महत्त्वाचे शस्त्र आहे तर ते आपल्या शत्रूकडे पण असणारच. मग ते शोधणे पण तितकेच आवश्यक आहे. यासाठी कोण कोणते उपाय केले जातात ते आपण पाहू. मुख्यतः चार साधने वापरली जातात.
१) पाणबुडीविरोधी जहाज
२) विमान/ हेलिकॉप्टर
३) पाणबुडीविरोधी पाणबुडी
४) उपग्रह
पाणबुडीच्या शोधासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले जाते त्याचे मुख्य दोन प्रकार असे आहेत ते असे.
A)ध्वनीच्या साहाय्याने ACOUSTIC.
B ) ध्वनीशिवाय (इतर) NON ACOUSTIC.
प्रथम आपण ध्वनिरहित तंत्रज्ञान पाहू.
यात तांत्रीक माहिती जास्त आहे याबद्दल क्षमस्व.
B ) ध्वनीशिवाय (इतर) NON ACOUSTIC.
१) MAD (MAGNETIC ANOMALY DETECTOR) -- https://en.wikipedia.org/wiki/Magnetic_anomaly_detector
चौथ्या भागात म्हटल्याप्रमाणे रशियाची अल्फा क्लास पाणबुडी (जी टायटॅनियमची बनली असते) सॊडली तर इतर सर्व पाणबुड्या या अतिशय मजबूत अशा पोलादाच्या बनलेल्या असतात. लोखंडात चुंबकीय गुणधर्म असल्याने ते आपल्या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात ढवळाढवळ करते.
जहाज हेलिकॉप्टर, विमान किंवा पाणबुडी यांच्यावर वर लिहिलेले MAD (MAGNETIC ANOMALY DETECTOR) म्हणजेच चुंबकीय बदल संशोधक बसवलेले असतात आणि यांची चुंबकीय बदल शोधण्याची क्षमता पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या एक दश सहस्त्रांश इतकी सूक्ष्म असते. पृथ्वीचे चुंबकीय बळ हे ०. १ गॉस इतके असते.
अशाच उपकरणाचा वापर झाडीत लपलेल्या ट्रक, क्षेपणास्त्र प्रक्षेपक, रणगाडे इ. वाहनांना शोधून काढण्यासाठी वापरले जात असे. आता हे काम ( ट्रक, क्षेपणास्त्र प्रक्षेपक, रणगाडे इ. वाहनांचा शोध) बहुतांशी उपग्रहाने केले जाते.
तंत्रज्ञान विषयाची आवड असणाऱ्यांनी खालील दुवा वाचावा. यात वापरले जाणारे उपकरण म्हणजे फ्लक्सगेट मॅग्नेटोमीटर.
http://www.sensorland.com/HowPage071.html
२) रडार -- पाणबुडी जर पृष्ठभागावर आली असेल तर ती किन्वा पाणबुडीचा पेरिस्कोप जहाजांच्या किंवा विमानाच्या रडारवर स्पष्टपणे दिसू शकतो. तसेच पाणबुडीविरोधी विमानात/ हेलिकॉप्टर मध्ये forward looking infrared (FLIR) हे इन्फ्रा रेड कॅमेरे असतात. यात अणुपाणबुडी पृष्ठभागाच्या जवळ येते तेंव्हा त्यातून अणुभट्टी थंड करणाऱ्या पम्पातुन सोडल्या जाणाऱ्या गरम पाण्यातून निघणारी ऊर्जा दिसू शकते. तसेच रात्रीच्या वेळेस डिझेल पाणबुड्या पेरिस्कोपच्या खोलीला येऊन आपल्या बॅटऱ्या चार्ज करत असतील तर त्यांच्या पेरिस्कोपमधून बाहेर येणाऱ्या गरम धुराचा "तुरा" या कॅमेऱ्यांनी टिपता येतो.
३) पाणबुडीविरोधी विमाने -- यातवर उल्लेखलेल्या अनंत उपाया व्यतिरिक्त अधिक उपायहि वापरले जातात. गॅस क्रोमॅटोग्राफी हे तंत्रज्ञान वापरून महासागरात पेरिस्कोपच्या खोलीवर चालणाऱ्या पाणबुडीच्या डिझेलच्या धुरातील गंधकाचे विश्लेषण करून पाणबुडी कुठेतरी जवळपास आहे हे पाहता येते. पाणबुडी( किंवा कोणतेही जहाज) जेंव्हा पाण्यातून जाते तेंव्हा तिच्यामागे तिच्या पंख्यामुळे पाणी जोरात ढवळले जाते त्यामुळे पाण्याच्या लाटांचा एक मार्ग (WAKE) तयार होतो. शांत महासागरात हा मार्ग कित्येक किलोमीटर पर्यंत दिसू शकतो आणि हा मार्ग कित्येक तासापर्यंत पाहता येतो. पाणबुडीविरोधी विमाने या ढवळा ढवळीचा(DISTURBANCE) माग पाणबुडी शोधण्यासाठी वापरू शकतात.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने चीनच्या वाढत्या सागरी सामर्थ्याला आळा घालण्यासाठी कोणतेही चर्चेचे गुऱ्हाळ किंवा वाद न होता अमेरिकेने त्यांचे सर्वात अद्ययावत असे पोसायडॉन पि ८ आय हे पाणबुडी विरोधी विमान भारताला दिले आहे. अमेरिकेनंतर भारत हा या विमानाचा "पहिला परदेशी ग्राहक" आहे. २०१३ पर्यंत पहिली ८ विमाने भारतात अली असून भारताने अजून ४ विमानांची मागणी दिली आहे जी २०१९ पर्यंत भारतात येतील. https://thediplomat.com/2016/07/india-clears-purchase-of-4-more-sub-kill...
४) पाणबुडीविरोधी पाणबुडी -- पाणबुडीला (किंवा जहाजाला) गंज चढू नये म्हणून अनोडायझेशन हे तंत्र वापरतात. यात पाणबुडीवर एक जस्ताचा ऍनोड बसवला जातो ज्यामुळे लोखंड ऐवजी जस्त गंजते. पाण्याचे विश्लेषण करून या जस्ताची अतिसूक्ष्म मात्रा तपासली जाते ज्याद्वारे तेथून पाणबुडी "गेली" आहे का हे समजू शकते. अणुभट्टी थंड करणाऱ्या पम्पातुन सोडल्या जाणाऱ्या गरम पाण्यामुळे पाण्याच्या तापमानात झालेला बदल आणि त्याच्या क्षारतेमध्ये झालेला बदल सुद्धा मापनारे संवेदक पाणबुडीवर बसवलेले असतात.
अणुपाणबुडीतून होणारा अतिसूक्ष्म प्रमाणावरील किरणोत्सार तपासण्यासाठी "gamma ray spectrometer" (गामा किरण पंक्तिमापक) हे उपकरण वापरले जाते. तसेच अणुपाणबुडी पाण्याचे विघटन करून त्यातील ऑक्सिजन आपल्या सैनिकांच्या श्वसनासाठी वापरते आणि हैड्रोजन वायू बाहेर सोडून दिला जातो. बाहेरील पाण्याचे विश्लेषण करून या हायड्रोजनची अतिसूक्ष्म मात्रा तपासली जाते.अशा तर्हेचे अन्वेषक/संवेदक वापरून आपल्या पाणबुड्या शत्रूच्या पाणबुड्यांच्या वासावर/मागावर राहतात.
हे असे विश्लेषण करणारे संवेदक अनेक रशियन पाणबुड्यांवर ( आणि आपण रशियाकडून लीजवर घेतलेल्या चक्र या अणुपाणबुडीतही आहेत). याचा प्रत्यक्ष किती उपयोग होतो हे एक लष्करी गुपित आहे. त्याबद्दल मला माहित नाही.
५) उपग्रह -- अणुपाणबुड्या आपलॆ अणुभट्टी थंड ठेवण्यासाठी समुद्राचे पाणी आत घेऊन ते भट्टीभोवती फिरवतात. या प्रक्रियेत गरम झालेले पाणी बाहेर टाकले जाते. या गरम पाण्यामुळे पाण्यात गरम आणि थंड पाण्याचे थर तयार होतात. हे काही वेळेस उपग्रहातून दिसू शकतात.
पाण्याला हिरवट निळा रंग येण्याचे कारण त्यात असणारे नीलहरीत शैवाल(blue green algae) याला आता सायनो बॅक्टरीया म्हणतात. समुद्राच्या पाण्यातून पाणबुडी गेली तर हे सायनो बॅक्टरीयाचे थर ढवळले जातात आणि त्यात फरक दिसू शकतो तसेच अणुपाणबुडीच्या गरम पाण्यामुळे यांच्या वसाहतीत बदल घडून येतो हे उपग्रहाद्वारे टिपता येते.
वर म्हटल्याप्रमाणे पाण्याच्या लाटांचा एक मार्ग (WAKE) विमानासारखाच उपग्रहाला सुद्धा दिसू शकतो.
असे सर्व मार्ग रशियाने वापरले होते कारण त्यांचे सोनार तंत्रज्ञान अमेरिकेइतके अद्ययावत नव्हते. पण अमेरिकेला आपल्या सोनार तंत्राबद्दल फाजील गर्व होता आणि असे ध्वनीविरहित तंत्रज्ञान निकामी आहे असे त्यांच्या तज्ज्ञांचे मत होते.परंतु नंतर केलेल्या हेरगिरीमध्ये रशिया अशा तंत्रज्ञानाचा बऱ्यापैकी वापर करून अमेरिकी पाणबुड्यांच्या वासावर असत असे लक्षात आले.
ध्वनीच्या साहाय्याने पाणबुडीचा शोध आणि पाणबुडी पाण्याखाली असताना तिच्याशी संपर्क कसा केला जातो हे आपण पुढच्या भागात पाहू.
प्रतिक्रिया
12 Jan 2018 - 2:59 pm | शलभ
सुंदर माहिती डॉक..
12 Jan 2018 - 3:13 pm | अनन्त अवधुत
लेखमाला सुंदर आहे. पण या लेखातले चित्र दिसत नाहीत :(
12 Jan 2018 - 4:03 pm | मोहन
चित्रे दिसण्याची सोय करा प्लीज. लेख छानच हे.वे.सा.न.
12 Jan 2018 - 6:22 pm | सुबोध खरे
मला चित्रं दिसत आहेत.
काय समस्या आहे समजत नाही.
12 Jan 2018 - 6:25 pm | सुबोध खरे
https://www.google.co.in/search?q=p8i+poseidon&rlz=1C1CHNY_en-ININ376IN3...
https://www.google.co.in/search?q=p8i+poseidon&rlz=1C1CHNY_en-ININ376IN3...
http://www.popularmechanics.com/military/navy-ships/a28724/submarine-son...
या दुव्यांवर ती चित्रे पाहू शकता
12 Jan 2018 - 9:34 pm | शलभ
मी मगाशी लेख वाचला तेव्हा चित्रे दिसत होती पण आता दिसत नाहीत.
12 Jan 2018 - 4:58 pm | माधुरी विनायक
खूप दिवसानंतर आज आले मि पा वर. किती अभ्यासपूर्ण मालिका आहे ही. सगळे भाग चवीने वाचले.. खूप आवडले..
12 Jan 2018 - 5:33 pm | मराठी कथालेखक
रंजक...
इथली माहिती वाचून रशिया सध्या या पाणबुडी जगताचे सम्राट आहे असे दिसते...
12 Jan 2018 - 6:07 pm | संग्राम
_/\_
12 Jan 2018 - 6:29 pm | खटपट्या
नेहमीप्रमाणे छान लेख. चित्रे दिसण्याची सोय करा.
12 Jan 2018 - 6:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
मागचे सगळे भाग परत वाचले, मस्त मालिका
12 Jan 2018 - 10:55 pm | नाखु
पु हा शुभेच्छा
असं वाचण्यासाठी वाचलेला वाचक नाखु
13 Jan 2018 - 2:23 am | चामुंडराय
हि लेख मालिका एका अज्ञात जगाची ओळख करून देते.
परंतु पहिल्या भागापासून वाचताना एक विचार मनात येतो, या पाणबुड्यांमुळे गेले कोट्यवधी वर्षे इतर कुठल्याही हस्तक्षेपापासून दूर राहिलेले समुद्र तळाचे जग ढवळून निघत असेल काय? एकमेकांवर मात करण्याच्या मानवाच्या हव्यासापायी समुद्र तळाची इको सिस्टम, तेथल्या वनस्पती, समुद्री जीव, मासे इत्यादी धोक्यात येत असणार हे नक्की. या व्यतिरिक्त पाणबुड्यांनी होणारे प्रदूषण, विशेषतः अणू -पाणबुड्यांमुळे, ते वेगळेच.
एकंदरीत मानवाने अंतरिक्षात केलेल्या कचऱ्या प्रमाणे समुद्रतळालाही वेठीस धरले आहे.
13 Jan 2018 - 11:53 am | सुबोध खरे
मारियाना दरी हि महासागरात सर्वात खोल जागा आहे त्याची खोली ११ किमी आहे. सर्वात खोल जाणारी अल्फा क्लास पाणबुडी जास्तीत जास्त १ किमी खोल जाऊ शकते. बाकी १० किमी खोल समुद्रात काहि पाणबुडी जात नाही.
अमेरिकेकडे ६६ पाणबुड्या आहेत.भारताकडे १५ आहेत. बाकी सर्व देश मिळून फार तर एकंदर २०० पाणबुड्या असतील. त्यातील एका वेळेस अर्ध्या बंदरात असतात.
याचाच अर्थ एवढ्या विराट महासागरात एकावेळेस फारतर १०० पाणबुड्या फिरत असतील.
14 Jan 2018 - 3:18 am | चामुंडराय
माहिती बद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब.
एक किलोमीटर खोलीची मर्यादा पाणबुडीच्या स्ट्रक्चरल इंटिग्रिटी मुळे असते का? त्या खोलीवर १०० ऍटमॉस्फेरिक प्रेशर असावे ते जर सहन झाले नाही तर पाणबुडी इम्प्लोड व्हायची.
जर यदाकदाचित नौसैनिकांना इमर्जन्सी मुळे पाणबुडी सोडायची वेळ आली तर पाणबुडी किती वरती आणावी लागते? या निमित्ताने इमर्जन्सी प्रोसिजर बद्दल हि लिहा.
आणखी एक, १० / ११ किलोमीटर खोलीवर समुद्री जीव असतात का? असतील तर एव्हढे प्रचंड प्रेशर कसे सहन करतात?
8 Feb 2018 - 11:36 am | सुबोध खरे
आणखी एक, १० / ११ किलोमीटर खोलीवर समुद्री जीव असतात का? असतील तर एव्हढे प्रचंड प्रेशर कसे सहन करतात?
विस्तृतपणे वेगळ्या पुढच्या लेखात लिहीत आहे.
13 Jan 2018 - 12:10 pm | एस
खूपच रोचक तांत्रिक माहिती.
13 Jan 2018 - 2:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
सोप्या शब्दात एका वेगळ्या जगाची ओळख होत आहे... अत्यंत माहितीपूर्ण !
पुभाप्र.
13 Jan 2018 - 4:19 pm | प्रमोद देर्देकर
खूप छान माहिती. येवू द्या अजुन.
14 Jan 2018 - 12:07 pm | मोहन
चित्रे दिसत आहेत ! धन्यवाद _/\_
14 Jan 2018 - 8:08 pm | Nitin Palkar
'यात तांत्रीक तांत्रिक माहिती जास्त आहे याबद्दल क्षमस्व' असे अजिबात म्हणू नका. अनेकांना ती समजत नसेल परंतु ज्यांना त्यात रस आहे त्यांच्यासाठी ती मेजवानीच आहे. मिपावरील अनेक दर्जेदार लेखकांपैकी आपण एक आहात, लिहित रहा आणि वाचकांना मेजवान्या देत रहा.
14 Jan 2018 - 11:07 pm | टर्मीनेटर
हा भाग पण मस्तच.
7 Feb 2018 - 11:30 am | समीर स. पावडे
पेरिस्कोपच्या खोलीला (म्हणजे पाणी पातळी पासून किती खोली ?) येऊन आपल्या बॅटऱ्या चार्ज करत असतील तर (पाणबुडीतील बॅटऱ्या चार्ज करण्यासाठीची यंत्रणा कशी असते ? त्यासाठी त्यांना एखाद्या जहाजा जवळ यावे लागते का ?)
7 Feb 2018 - 11:44 am | सुबोध खरे
पेरिस्कोपची उंची ६० फुटापर्यंत असू शकते. या वर येणाऱ्या नळकांड्यात हवा आत घेण्यासाठी आणि डिझेलचा धूर बाहेर सोडण्यासाठी पाईप असतात. तेंव्हा पाणबुडी रात्रीच्या वेळेस पाण्याच्या पृष्ठभागाखाली ४० - ४५ फूट पर्यंत येऊन हवा आत घेऊन आपली डिझेल इंजिने चालवतात आणि त्याला संलग्न असलेल्या जनरेटर ने वीज निर्माण करून आपल्या बॅटऱ्या चार्ज करून घेतात
8 Feb 2018 - 10:25 am | पैसा
प्रचंड माहितीपूर्ण लिहीत आहात.