"संस्कृति" म्हणजे काय रे भाऊ ? ( भाग2)

शरद's picture
शरद in काथ्याकूट
1 Jan 2018 - 11:56 am
गाभा: 

"संस्कृति" म्हणजे काय रे भाऊ ? ( भाग2)

"संस्कृती" हा शब्द तुम्हाला शब्दकोशात सापडला नाही तर चकित होऊ नका. ह्याचा अर्थ देण्यास एखादे पानही पुरेसे होत नाही. आज मी वाचलेली थोडीशी माहिती देत आहे. येथील विद्वत्जन येथे न आलेल्या पैलूंवर प्रकाश टाकणार आहेतच. तर सुरवात करू.
"कृ"-करणे या धातूपासून बनलेल्या "कृति" या शब्दाला "प्र", "वि", "सम्" हे उपसर्ग लागून प्रकृति, विकृति आणि संस्कृति असे शब्द बनतात. (संस्कृति हा संस्कृतमधील शब्द मराठीत संस्कृती असा होतो.) प्रकृति म्हणजे निसर्ग. विकृति म्हणजे त्यात होणारा बिघाड.
संस्कृती म्हणजे प्रकृतीत बिघाड होऊ नये म्हणून तिच्यावर करावयाचे संस्कार होत. या तीन गोष्टी समोर ठेवून स्पष्टीकरण करू या.
माणुस कसा जगतो ? तो सभोवतीच्या निसर्गात किंवा निसर्गातल्या पदार्थात उपयुक्त असे बदल करून किंवा इष्ट असे संस्कार करून आपली जीवनयात्रा चालवतो. मानव बाह्य विश्वावर आणि
आपल्या मनावर-बुद्धीवर विजय मिळवून आपले जीवनसाफल्य मिळवितो. या करिता बाह्यविश्वातील पदार्थ उपयुक्त व सुखकारक करण्याकरिता बदल घडवून आणावे लागतात. त्याचबरोबर स्वत:चे मन, बुद्धी, देह यांवरही संस्कार घडवावे लागतात. या दोनही गोष्टी कळत न कळत एकाच वेळी चालू असतात. डॉ.इरावती कर्वे म्हणतात " मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप व डोळ्यांना व दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टि म्हणजे संस्कृती. " थोडे समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. माणसाला निवारा पाहिजे. तो गुहेत रहात होता. त्याने ब्दल करून झोपडे, घर, महाल पिरॅमिड सारख्या उत्तुंग इमारती बांधल्या. वस्त्र म्हणून कातडे, झाडांची साले वापरावण्या ऐवजी कापूस, लोकर, रेशिम यांची वस्त्रे वापरावयास सुरवात केली. कच्चे मांस, कंदमुळे, फळे खाण्याऐवजी शेती, गोपालन मेण्ढ्या पाळावयास सुरवात करून आपले भोजन बदलले.ही झाली बौतिक वस्तुरूप निर्मिती. संस्कृतीचा एक भाग.
एवढ्याने संस्कृतीचे पूर्ण रूप मिळत नाही. त्या करिता मानसिक, वैचारिक बदलांचीही गरज असते. रानातून गावात येतांना त्याने सामाजिक, बदल घडविले.
आता विवाहसंस्था, राज्यतंत्र, खरेदी विक्रीचे नियम अशा वैचारिक बदलांची गरज होती. धर्म हा त्यातील एक भाग. अश्या बदलांबरोबर कलाही आल्या. संगीत, नृत्य, चित्रकला याही त्याच्या जीवनाचा भाग बनला .हे एकदम घडले कां ? नाही. व्यक्तीचे आयुष्य अल्प असते. पण समाज
दीर्घायुषी असतो. माणुस आपल्याला मिळालेले भौतिक व वैचारिक ज्ञान पुढच्या पिढीला सुपुर्द
करतो. नवीन पिढी त्यात भर घालते. ही झाली डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन हॊणारी मनोमय सृष्टि
समाजात ह्या दोनही सृष्टीत नवीन पिढी भर घालत असेल तर समाजाची प्रगति होते. ती त्या समाजाची संस्कृती बनते या गोष्टी घडावयास शतके किंवा हजरो वर्षेही लागू शकतात. भारत्रीय संस्कृतीचे उदाहरण घेतले तर इसपूर्व 3000 वर्षांपूर्वीच आमच्याकडे मोहिंजोदारो सारखी मलनि:सरणाची सोय असलेली शहरे होती व वेदांसारखे साहित्य होते. ही झाली संस्कृतीची सुरवात. पुढील कित्येक पिढ्यांनी भर घातली, इस300-400 पर्यंत ही प्रगती चालू होती. हा संस्कृतीच्या उत्कर्षाचा .सुवर्णकाळ. नंतर तिच्या उतरणीस, नव्हे, घसरणीस सुरवात झाली. का बरे ? ती कारणे बघू या.
संस्कृतीची आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक अशी तीन अंगे कल्पिता येतात.
आधिभौतिक विभाग बाह्य विश्वावर संस्कार करून त्याला मानवाच्या उन्नती करिता उपकारक बनवितो. शेती, पशुपालन, स्थापत्य, धातुकाम, इत्यादी गोष्टी यात अंतर्भूत होतात. मानवाचे ऐहिक जीवन सुखकारक व स्थीर व्हावयाचे असेल तर या अंशाची प्रगती होणे अत्यावष्यक आहे.
भाग्य उजळावे, संकटे नाहिशी व्हावी.याकरिता मानव देवाची पूजा आणि प्रार्थना करतो. जपतप, मंत्रतंत्र, आराधना, जादूटोणा, या योगे जगातील अदृश्य दैवी शक्ती वश करता येते अशी भावना या मागे असते. माणुस भावनाशील असतो. तो विचारपेक्षा भावनेला जास्त महत्व देतो. हे झाले आधिदैविक अंग.
आपल्या मनावर आणि बुद्धीवर संस्कार करून आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त करून घेणे हे आध्यात्मिक अंग झाले.
बारताच्या दुर्दैवाने आपण पहिल्या अंगाकडे पूर्ण दुर्लक्ष करून दुसर्‍या दोन अंगांवर मोठा भर दिला. याने आपला तोटा असा झाला की परकीय आक्रमकांनी आपल्याला पराभूत करून पारतंत्र्यात लोटले व आपण दुसर्‍या दोन अंगांचाही विचका केला. निसर्गनियमाने आपण वेगाने घसरगुंडीला लागलो.
माणसाला सर्वांगीण विकास करून घ्यावयाचा असेल तर धर्म, संस्कृती व जीवन या सर्वाचा विस्तार व्हावयास हवा. धर्म म्हणजे कर्मकांड हा चुकीचा विचार सोडून देऊन "सर्वांना धारण करणारा तो धर्म" याची कांस धरली पाहिजे याने आम जनतेचे भले होईल.
संस्कृती म्हणजे गंगौघ. महानद, लहान-मोठ्या नद्या ओढे-नाले मिळून जशी गंगा होते तसेच तिच्यात गटारे व दुषित रसायनेही येऊन मिळत असतात. जर आपणास स्वच्छ गंगाजल पाहिजे असेल तर या दुषित प्रवाहांना रोखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.समाजातील अयोग्य बाबीना प्रथम नष्ट केले पाहिजे.
संस्कृती म्हनजे एक अशी गोष्ट नव्हे की जिची व्याख्या एका शब्दात देता येईल. तिची अनेक अंगे आहेत. त्यातले एक म्हणजे संस्कृती नव्हे पण ते गाळले तर संस्कृती अपुरी होते..
शेवटी "संस्कृती ’ची अंगे कोणती याचे उत्तर बघू. " भारतीय संस्कृतिकोश " या दशखंडात्मक कोशात याचे उत्तर मिळते. पं महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या सहकार्‍यांनी अठ्ठावन्न, हो अठ्ठावन्न, विषय निवडले. ही यादी सकल समावेशक आहे कां ? सांगणे अवघड आहे. पण एवढ्याला दहा खंड लागत असतील तर आपल्याला ते पुरेसे म्हणावयास हरकत नसावी.
सर्व द्यावयास आवडले असते पण....
काही निवडक बघा. (हे च कां ? विचारू नका. टंकलेखनाचा आळस एवढे एकच कारण पुरेसे आहे. !).
यज्ञसंस्था व तिची अंगोपांगे,
वैदिक,स्मार्त, पौराणिक व समाजिक संस्कार,
प्रांतीय व अखिल भारत्रीय सण व उत्सव,
पुण्य तीर्थे, क्षेत्रे व सरोवरे,
अखिल भारतातील सुप्रसिद्ध देवस्थाने,
देव-देवतांच्या पूजा आणि बलिदाने
पौराणिक व लौकिक व्रते व उद्यापने,
वर्णाश्रमादि कर्तव्ये व अधिकार,
भारतातील सर्व जातीजमाती, त्यांची वैशिष्टये,, कार्ये व समाजातील त्यांचे स्थान,
भारतातील आदिवासी जमाती,त्यांची रहणी, क्षेत्र, देव-धर्म,भाषा, इ.,
पूर्वास्पृश्य जाती, अस्पृष्यतेचा उगम,
अवतार, संत व राष्ट्रपुरूष यांचे जन्मोत्सव आनि पूण्यतिथी,
आस्तिक-नास्तिक सर्व दर्शने,
पंथोपंथांचे तत्वज्ञान,
विविध विद्या व कला,
वेद, उपवेद, वेदांगे,सुत्रे, उपनिषदे, स्मृति, पुराणे महाकाव्ये यांचा परिचय,
विदिक, पौरानिक व ऐतिहासिक राजवंश,
प्रादेशिक भाषा, त्यांचा विकास, साहित्य व लोकसाहित्य,
बौद्ध, जैन, लिंगायत,शैव, शाक्त, वैष्णव इ. धार्मिक व सांप्रदायिक वाङ्मय,
शास्त्रीय नृत्ये व लोकनृत्ये,
मूर्त्रिकला, चित्रकला, लोककथा, खेळणी, उपकरणे,
प्रांतोप्रांतींची वेषभुषा,
विविध स्थापत्यशैली,
विविध भारतीय खेळ,
संगीत शास्त्रीय व जानपद,
वैदिक, पौराणिक, तांत्रिक, ग्रामिण व क्षुद्र देव-दैवते,
ऋषि-मुनी,, महाकवी आचार्य, राजे-महाराजे, संत, भक्त,
राष्ट्रीय महापुरुष,

या यादीचा विचार केला तरी "संस्कृती" म्हणजे काय याची आपणास कल्पना येईल.

शरद

प्रतिक्रिया

संस्कृती शब्दाची केतकर- महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील नोंद रोचक आहे खालील प्रमाणे.

संस्कृति- सिव्हिलिझेशन व कल्चर या दोन इंग्रजी शब्दांचा कांहीं डिक्शन-यांत एकच अर्थ दिला आहे, तर कांहीं डिक्शन-यांत 'कल्चर' म्हणजे बौध्दिक सुधारणा असा अर्थ देऊन 'सिव्हिलिझेशन' याचा धार्मिक, नैतिक, सामाजिक वगैरे सुधारणा असा अर्थ दिला आहे. संस्कृति या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले केलेलें' असा व्यापकच आहे. संस्कृतीचें (सिव्हिलिझेशन) अखिल मानवजातीची प्रगति अशा दृष्टीनें परीक्षण करून शिवाय निरनिराळया मानवसमाजांची प्रगति या मर्यादित अर्थानेंहि या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थानें संस्कृतीचें लक्षण 'जातिराष्ट्रादि संघानां साकल्यं चरितस्य यत् व्यक्तं संस्कृति शब्देन भाषाशास्त्रत्मकं ननु,'' येणेंप्रमाणें देतां येईल. या मर्यादित अर्थानें प्राचीन काळच्या मूलग्रहकालीन, पर्शुभारतीय कालीन व भारतीय आर्य संस्कृति आणि असुरोबाबीलोनियन, मिसरी, प्राचीन ग्रीकरोमन, प्राचीन चिनी वगैरे संस्कृती यांची माहिती प्रस्तावनाखंडांत व त्या त्या देशविषयक लेखांत दिली आहे. थोडक्यांत असें सांगतां येईल कीं, मूलगृहकालीन आर्यसंस्कृति, असुरोबाबीलोनियन संस्कृति व मिसरी संस्कृति आज मृत असून, पर्शुभारतीय संस्कृति, पारशी समाजामार्फत, प्राचीन ग्रीकरोमन संस्कृति सांप्रतच्या पाश्चात्य संस्कृतिरूपानें, प्राचीन चिनी संस्कृति सांप्रतच्या चिनी समाजामार्फत आणि भारतीय आर्यसंस्कृति आजच्या हिंदु समाजामार्फत हयात असून ख्रिस्तोत्तर काळांत महंमद पैगंबरनिर्मित इस्लामी संस्कृतीचा उदय होऊन सांप्रत हिंदु, इस्लामी, पाश्चात्य आणि पारशी इतक्या संस्कृतींचा संग्राम चालू आहे. पण १९ व्या २० व्या शतकांत दळणवळणाची साधनें कल्पनांतील वाढल्यामुळें यापुढें वरील अनेक संस्कृतीचें वैशिष्टय फारसें शिल्लक न राहतां शेंदोनशें वर्षांत अखिल मानवजात समानसंस्कृतिक बनेल असा बराच संभव आहे.

संदर्भ दुवा

माहितगार's picture

1 Jan 2018 - 3:54 pm | माहितगार

संस्कृति : मनुष्य व्यक्तिश: व समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वत:वर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो, ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय. संस्कृती आणि संस्कार हे दोनही शब्द सम् अधिक कृ या एकाच धातूपासून बनलेले आहेत. त्यांचा वाच्यार्थ व्याकरण दृष्टया एकच आहे; पण संस्कार हा शब्द धार्मिक क्षेत्रापुरता मर्यादित राहिला. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती ही संज्ञा वापरली जाते. ...

संदर्भ दुवा
सध्या उघडणे मला अवघड जाते आहे. ज्यांना हा दुवा उघडता येईल त्यांनी नोंद अधिक सविस्तर दिल्यास बरे पडेल.
.

माहितगार's picture

1 Jan 2018 - 4:01 pm | माहितगार

गूगलवर आलेल्या इंग्रजी व्याख्या

* the ideas, customs, and social behaviour of a particular people or society.
* the arts and other manifestations of human intellectual achievement regarded collectively.

ईंग्रजी विकिपीडियावरील सध्याची व्याख्या

Culture is the social behavior and norms found in human societies. Culture is considered a central concept in anthropology, encompassing the range of phenomena that are transmitted through social learning in human societies. ...

संदर्भ दुवा