चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
29 Dec 2017 - 7:44 pm

भोपळ्यात बसून आपल्या लेकीकडे जाणाऱ्या हुशार म्हातारीची गोष्ट आपण सर्वांनीच  लहानपणी ऐकलेली आहे. तिला अडवणाऱ्या कोल्ह्याल आणि वाघाला ती सांगत असते,"लेकीकडे जाईन तुप-रोटी खाईन जाडी-जुडी होईन मग तू मला खा." 

गम्मत सांगू का? आमच्या लाहानपणी माझे आजी-आजोबा अगदी क्वचित राहायला यायचे आमच्याकडे. त्यावेळी माझी आई खरच आजीला आवडणारे पदार्थ मुद्दाम करायची. आजीसुद्धा,'अग कशाला इतकं करतेस?' अस म्हणत पण कौतुकाने खायची ते पदार्थ. त्यावेळी कधी कळल नाही पण आता जाणवत; लेकीने आपल्यासाठी आपल्या आवडी-निवडीचा विचार करून खास काहीतरी केलं आहे याचं समाधान तिच्या चेहेऱ्यावर तेव्हा दिसायचं. 

काळ पुढे सरकला आणि माझं लग्न झालं. आता अधून मधून माझी आई माझ्याकडे येते.  मी मात्र तिला पिझ्झा-पास्ता असले आंग्ल पदार्थ करून देते. कारण मला माहित आहे की तिला आवडणारे पदार्थ तर ती स्वतः करून खाते. पण हे असे पास्ता आणि पिझ्झ्यासारखे पदार्थ तिची इच्छा असली तरी ती एकटी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणार नाही. आणि बाहेरचे पदार्थ तिला पचणार देखील नाहीत. म्हणून मग आमचा घरातच एकूण घाट असतो. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर देखील मला एक समाधान दिसतं;. तिच्यासाठी कौतुकाने वेगळं काहीतरी मी करते याच. अर्थात मला स्वयंपाकात लागणारा गोडा मसाला, थालीपिठाची भाजणी, लिंबाचं-कैरीचं लोणच असे खास पदार्थ मी हट्टाने तिच्याकडून करून घेते. संक्रांतीची गुळ-पोळी तर तिची अगदी खास. माझ्या लेकी देखील विकतची खायला तयार नसतात. आजीची golden रंगाची पोळीच हवी. ही विकतची brown पोळी नको असं त्याचं सांगण असत. आणि आजी देखील लाडक्या नातींचा हट्ट हौसेने पुरवते. 

आता काळ अजून पुढे सरकला आहे. आता माझी लेक देखील मोठी झाली आहे. नोकरीच्या निमित्ताने ती दुसऱ्या शहरात राहाते. मी जेव्हा तिला भेटायला जाते तेव्हा तिला आवडणारे पदार्थ मुद्दाम करून घेऊन जाते. स्वतंत्र राहाणारी माझी लेक मी गेले की खुश असते. कारण जोपर्यंत मी असते तोपर्यंत तिला स्वयंपाकघरातून सुट्टी मिळते. रोज आपणच करायचं आणि आपणच खायचं याचा आलेला कंटाळा तिच्या चेहेऱ्यावर मला स्पष्ट दिसतो.  मग माझ्या दोन-तीन दिवसांच्या वास्तव्यात मी तिला आवडणारे पदार्थ करत असते. ते खाताना ती जाम खुश असते. मात्र तिला गोडा मसाला आणि लोणची पापड नको असतात. तिचं म्हणणं असतं,'आई, हे सगळं मिळतं बाजारात. तू नको इतकी दगदग करुस. थोडा वेळ स्वतःसाठी काढ.' मग मी निघायच्या अगोदर ती मला  आग्रहाने एखाद्या छानशा नवीन रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाते. मला देखील कौतुक वाटतं की सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बिझी असणारी माझी लेक मी गेले की मुद्दाम माझ्यासाठी वेळ काढते आणि मला बाहेर घेऊन जाते.

मात्र परवा तिच्याकडून निघाले तेव्हा त्या भोपळ्यातल्या म्हातारीची गोष्ट आठवली आणि हसू आलं.. ती लेकीकडे जाड-जुड व्हायला जाणारी ती आई आणि आजची लेकीला खायला घालून जाड-जुड करण्यासाठी जाणारी आई.... क्या जमाना बदल गया हे! आणि तरीही आईच्या मनात असणारी लेकीच्या कौतुकाची भावना मात्र तीच आहे.

विचार

प्रतिक्रिया

:-) एक वेगळाच पर्सपेक्टिव्ह!

प्राची अश्विनी's picture

1 Jan 2018 - 5:15 pm | प्राची अश्विनी

+११

सिरुसेरि's picture

30 Dec 2017 - 12:26 pm | सिरुसेरि

+१ . छान .

मार्मिक गोडसे's picture

30 Dec 2017 - 12:49 pm | मार्मिक गोडसे

बदल छान मांडलाय.

नाखु's picture

31 Dec 2017 - 4:17 pm | नाखु

लेक ते लेकीची आई हा बदल छान मांडला आहे

लेकीचा पालक लेकायनी नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2017 - 6:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनोगत आवडले !

हृद्य मनोगत.

बहिणाबाईंनी लिहून ठेवलय ....

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.

पगला गजोधर's picture

3 Jan 2018 - 11:28 am | पगला गजोधर

बसलो मी देवध्यानी
काय मधी हे संकट
बाई बंद कर तुझ्या
तोंडातली वटवट

माझं माहेर माहेर
सदा गाणं तुझ्या ओठी
मंग माहेरून आली
सासरले कशासाठी ?

सासुरवाशीन -
आरे लागले डोहाये सांगे
शेतातली माटी
गाते माहेराचं गानं
लेक येईल रे पोटी

देरे देरे योग्या ध्यान
एक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते

देव कुठे देव कुठे
भरीसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या
माहेरात सामावला

--कवयत्री : बहिणाबाई चौधरी

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jan 2018 - 5:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त सुरेख आवडले.
आजची लेक जेव्हा आई होईल तेव्हा तिची मानसिकता कशी असेल?
पैजारबुवा,

ज्योति अळवणी's picture

1 Jan 2018 - 6:10 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

अमितदादा's picture

2 Jan 2018 - 11:37 pm | अमितदादा

मस्त आवडले.

पद्मावति's picture

3 Jan 2018 - 2:10 am | पद्मावति

खुप आवडले.

शेखरमोघे's picture

3 Jan 2018 - 9:14 am | शेखरमोघे

आपला लेख, खास करून त्यातला बदललेला approach, आवडला.

जरी आपण लिहिले आहे ... ती लेकीकडे जाड-जुड व्हायला जाणारी ती आई आणि आजची लेकीला खायला घालून जाड-जुड करण्यासाठी जाणारी आई.... क्या जमाना बदल गया हे! .......तरी "ही आईच्या मनात असणारी लेकीच्या कौतुकाची भावना" (लेकीला खायला घालून जाड-जुड करण्याची) लेकीला कळल्यास पन्चाईतच!! :०))

ज्योति अळवणी's picture

4 Jan 2018 - 3:44 pm | ज्योति अळवणी

अगदी खरं शेखरजी. पण माझी लेक अजून तरी फारच बारीक आहे. त्यामुळे तिला चालतं मी हौसेने खायला घालते ते.

राघव's picture

3 Jan 2018 - 8:35 pm | राघव

आवडले. :-)