दवणीय अंडी - अंडे २रे - नात्यांची श्रीमंती

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
3 Nov 2017 - 12:06 pm

एसीने थंडगार झालेल्या आपल्या रूममधल्या गुबगुबीत गादीवर ब्लँकेट ओढून झोपलेल्या बंड्याने अजून एकदा कूस बदलली. त्याला काही तरी टोचल्याची भावना झाली. अर्धवट झोपेत असल्याने 'सुख टोचत असेल' असा विचार मनात येऊन त्याने ब्लँकेटखाली हात घातल्यावर टोचणारी वस्तू सुख नसून चार्जरची पीन आहे हे त्याच्या लक्षात आले.

आजकाल बंड्या जरा अस्वस्थच असे. ह्याच्याशी त्याला पडलेल्या केट्यांचा काही संबंध नव्हता. इन जनरच आयुष्य वैराण आहे अशी भावना त्याच्या मनात दाटून येत असेल. सद्ध्या फेबु आणि वॉअॅ वर वाजवीपेक्षा जास्तच पडीक असल्याने ही भावना वरचेवर त्याला छळत असे. भरीस भर म्हणून वयाच्या १२-१५ व्या वर्षी कंपनी काढून अब्जोपती होणार्या मुलांच्या गोष्टी वाचल्यापासून तर आपले आयुष्य अगदीच फुकट आहे अशी त्याची खात्री होत चालली होती. कारण अजूनही त्याला विडी काडीचा खर्च सोडवायला मधून मधून बाईक पंक्चर करावी लागत असे.

सगळं काही असूनही नसल्यासारखं होतं. बेडवर लोळत त्याने वॉअॅ उघडून एक एक गॄप चाळायला सुरुवात केली. एका गॄपवरचा एक मेसेज वाचून बंड्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो क्षण त्याची युरेका मोमेंट होती. मेसेजमधे अत्यंत गहन मेसेज होता - पैसा कुणीही कमावतो, खरा श्रीमंत तोच ज्याने माणसं कमावली. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा नात्यांची श्रीमंती महत्वाची.

बंड्या उठून बसला. ब्लँकेट खाली घरंगळल्यावर त्याची उब जाऊन आता त्याला एसीची थंडी बोचू लागली. मगासचा मेसेज डोक्यात होताच. ह्यावरून त्याला कल्पना सुचली... अरे आपल्या आयुष्याचंही असंच आहे... पैशाची ऊब गेली की सत्याची थंडी बोचू लागते*...
* कुठल्याही गोष्टीचा जीवन विषयक तत्वज्ञानाशी बादरायण संबंध जोडण्याची ग्यानबाजी करण्यासाठी हा फॉर्मॅट हमखास उपयोगी पडतो. हे वाचून ते जाणवलं... कशामुळे कशाची आठवण व्हावी ह्याला बंधन नाही. उदा.: पेपर वाचताना जाणवलं आयुष्य वाचायचं राहून गेलं, जात्यातले गहू पाहून जाणवलं आपल्या आयुष्याचंही असंच पीठ होतंय, बँक स्टेटमेंट वाचून जाणवलं आयुष्य टॅली झालंच नाही, ठेवणीतले कपडे घडीवर खराब झालेले पाहून जाणवलं मधून मधून मनाच्या घड्याही उलगडायला हव्यात, कुत्रा आणि खांबाला बघून जाणवलं नियतीने आपल्यावरही असाच पाय वर केलाय...

तर, हा साक्षात्कार झाल्यामुळे आता बंड्या स्वस्थ बसणे शक्य नव्ह्ते. त्याला आयुष्याची गोळाबेरीज नव्याने करायची होती. नात्यांची श्रीमंती वाढवायची होती. त्याने लगेच घर सोडून जायचा निर्णय घेतला. आई वडिलांनी दिलेली प्रत्येक गोष्ट त्याने घरी ठेवली. फक्त मोबाईल आणि पॉवरबँक आठवणीने खिशात टाकली. जाताना बाबांच्या स्टडी टेबलवर एक चिठ्ठी लिहून ठेवली "स्वतःचा शोध घ्यायला घर सोडून जातोय. माझा शोध घेऊ नका." घराबाहेर पडल्यावर त्याला आठवले की आपण चिठ्ठीखाली सही न केल्याने, मी/ताई/आई/सखू बाई ह्या पैकी नक्की कोण घर सोडून गेलंय, हे वडिलांना कळणार नाही. पण तरीही तो मोठ्या निर्धाराने निवडलेली वाट चालू लागला.

घराजवळच्या बसस्टॉपवर त्याला एक बाई बसची वाट बघत असलेली दिसली. बायका पुरुषांच्या मानाने जास्त मायाळू असल्याच्या समजुतीतून त्याने इथूनच नवी नाती जोडायला सुरुवात करायचे ठरवले. त्या पाठमोर्‍या बाईंच्या मागे उभे राहत छप्पन सशांची व्याकूळता चेहर्‍यावर आणून बंड्याने सुरुवात केली ‘नमस्कार...' हे ऐकल्यावर ती बाई चटदिशी वळली आणि आपले खरखरीत हात त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली... 'क्या रे चिकने...'
बंड्या तीन ताड उडाला. इथे धोका आहे आहे जाणवून लगेच तिथून सटकला.

थोडं पुढे गेल्यावर त्याला एक मासेवाली दिसली. तिच्यासमोर उभा राहून तो प्रेमाने म्हणाला... 'आजपासून तुम्हीच माझ्या आई...' उत्तराच्या अपेक्षेत असताना अगदीच अनपेक्षीत ते घडलं. मासेवालीने कोयता काढून त्याला शिव्याच घालायला सुरुवात केली... 'साले सकाळी सकाळी नवटाक मारून येतात नी धंद्याची खोटी करतात... पुन्हा आलास तर उभा चिरेन...'
बंड्या भलताच गडबडला. पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. जीव वाचवून तो पळाला. अजून एक प्रयत्न फसला होता. पण… 'तुम्ही अपयशी तेव्हाच होता जेव्हा तुम्ही प्रयत्न करायचे थांबता' ही ओळ आठवून त्याने दुसरा रस्ता धरला.

थोड्या वेळाने त्याला एक भाजीवाल्या आज्जी दिसल्या. म्हातारी प्रेमळ वाटत होती. त्यामुळे इथे रिस्क कमी आहे असं वाटून तो त्यांच्या समोर बसला आणि मगासचाच डायलॉग टाकला... 'आजपासून तुम्हीच माझ्या आई...' म्हातारीने एक क्षण त्याच्याकडे बघितलं आणि मायेने म्हणाली 'असं म्हणतोस??? बरं...' मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा आणि एकमेकांच्या चौकशा झाल्यावर बंड्याला कळले की म्हातारीला स्वतःची आणि सवतीपासून अशी एकंदरीत ४ मुलं आणि ३ मुली आहेत. त्यातल्या दोघा मुलांचं लग्न होऊन त्यांनाही प्रत्येकी २-२ मुलं आहेत. त्यामुळे म्हातारी भलतीच श्रीमंत असल्याचा साक्षात्कार झाल्यावर बंड्या तिला म्हणाला 'चला आई, मी आजपासून तुमच्यासोबत राहणार...' हे ऐकून म्हातारी म्हणाली 'अरे माझ्या घरात आधीच डझनभर माणसं आहेत. उलट मीच तुझ्याकडे रहायला यायचा विचार करत होते.' आता बंड्या गडबडला. म्हणाला 'मीच स्वतः घर सोडून आल्याने तुम्हालाच मला तुमच्या घरी न्यावं लागेल...' ह्यावर म्हातारीने 'लैच शाना हैस...' असं म्हणून त्याला एक काकडी फेकून मारली.

बंड्याचा आता फार म्हणजे फारच भ्रमनिरास झाला होता. सकाळपासून नात्यांची श्रीमंती सोडाच चव्वनीही त्याच्या नजरेस पडली नव्हती. रेडिमेड इतका मोठा मुलगा मिळूनही कुणी आई व्हायला तयार नाही ह्याचं त्याला फारच वैषम्य वाटलं. तितक्यात त्याला जाणवलं की त्याला भूक लागली आहे आणि अशक्य घाम आला आहे. फिरता फिरता तो एका हॉटेलसमोर आला. हॉटेल बर्यापैकी महाग वाटत होतं. इतर वेळी तो विचार न करता आत गेलाही असता, पण आज खिशात पैसे नसल्याने आता ह्या हॉटेलवाल्याला मामा बनवून काही मिळते का बघावे असा विचार त्याने केला.

तितक्यात 'अरे बंड्या!' अशी हाक ऐकू आली. ती त्याची शैला मावशी होती 'कॉलेजच्या वेळेत इथे काय करतोयस रे?' त्यावर भूक लागली होती म्हणून हॉटेल शोधत होतो असं उत्तर देऊन त्याने वेळ मारून नेली. मग मावशी त्याला हॉटेलात घेऊन गेली, यथेच्छ जेऊ घातलं, बील भरलं, गाडीने घरी सोडलं, वगैरे वगैरे सगळं झालं.
आई बाबा अजून घरी आले नव्हते. गुपचूप बंड्या त्यांच्या रूममधे गेला आणि सकाळी लिहिलेली चिठ्ठी फाडून टाकली. आपलं हस्ताक्षर इतकं गचाळ असल्याची त्याला आज पहिल्यांदाच लाज वाटली.

चिठ्ठी फाडून बंड्या त्याच्या रूममधे गेला. एसी लाऊन, दुलई ओढून, गुबगुबीत गादीवर लोळत त्याने वॉअॅ उघडले आणि सकाळच्या मेसेजाला रिप्लाय केला 'नात्यांची श्रीमंती शोधण्यापेक्षा श्रीमंत नातेवाईक शोधा...'

आज बंड्या बर्‍याच दिवसानी शांतपणे झोपला. झोपण्यापूर्वी ती टोचणारी चार्जरची पीन बाजूला करायला तो विसरला नाही. आता बंड्या आतून-बाहेरून सुखी आहे.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

वकील साहेब's picture

3 Nov 2017 - 12:33 pm | वकील साहेब

सुबक अंडे!! आवडले !!!

पुंबा's picture

3 Nov 2017 - 12:53 pm | पुंबा

हाहाहा!!!
खुसखुशीत! जबरदस्त!

पर वाचताना जाणवलं आयुष्य वाचायचं राहून गेलं, जात्यातले गहू पाहून जाणवलं आपल्या आयुष्याचंही असंच पीठ होतंय, बँक स्टेटमेंट वाचून जाणवलं आयुष्य टॅली झालंच नाही, ठेवणीतले कपडे घडीवर खराब झालेले पाहून जाणवलं मधून मधून मनाच्या घड्याही उलगडायला हव्यात, कुत्रा आणि खांबाला बघून जाणवलं नियतीने आपल्यावरही असाच पाय वर केलाय...

लोल्झ

सस्नेह's picture

3 Nov 2017 - 1:45 pm | सस्नेह

=)) =)) =))

पद्मावति's picture

3 Nov 2017 - 1:46 pm | पद्मावति

मस्तच =))
'नात्यांची श्रीमंती शोधण्यापेक्षा श्रीमंत नातेवाईक शोधा...' ..खि खि खि.हे अल्टीमेट आहे.

सिरुसेरि's picture

3 Nov 2017 - 1:54 pm | सिरुसेरि

मजेदार .

बोबो's picture

3 Nov 2017 - 1:54 pm | बोबो

जब्रा आहे

बोबो's picture

3 Nov 2017 - 1:55 pm | बोबो

जब्रा आहे

साष्टांग नमस्कार तुम्हाला आदीभाऊ..
जरा प्रेरणा पण सांगा की हो

हे अगदी आदिजोशी ढंगाचं झालं

अभिजीत अवलिया's picture

3 Nov 2017 - 3:28 pm | अभिजीत अवलिया

चांंगल अंंड आहे.

विशुमित's picture

3 Nov 2017 - 4:08 pm | विशुमित

मज्जा आली वाचून.

ट्चकन डोळ्यात पाणि काढलंत ना, राव !!!

तेजस आठवले's picture

3 Nov 2017 - 5:24 pm | तेजस आठवले

कुठल्याही गोष्टीचा जीवन विषयक तत्वज्ञानाशी बादरायण संबंध जोडण्याची ग्यानबाजी करण्यासाठी हा फॉर्मॅट हमखास उपयोगी पडतो. हे वाचून ते जाणवलं... कशामुळे कशाची आठवण व्हावी ह्याला बंधन नाही. उदा.: पेपर वाचताना जाणवलं आयुष्य वाचायचं राहून गेलं, जात्यातले गहू पाहून जाणवलं आपल्या आयुष्याचंही असंच पीठ होतंय, बँक स्टेटमेंट वाचून जाणवलं आयुष्य टॅली झालंच नाही, ठेवणीतले कपडे घडीवर खराब झालेले पाहून जाणवलं मधून मधून मनाच्या घड्याही उलगडायला हव्यात, कुत्रा आणि खांबाला बघून जाणवलं नियतीने आपल्यावरही असाच पाय वर केलाय...

इथेच जिंकलात तुम्ही. ह्या गोग्गोड दवणीय अंड्यांची खास तुमच्या स्टाईलने मस्तपैकी चमचमीत भुर्जी करा पाहू.

सचिन काळे's picture

3 Nov 2017 - 6:34 pm | सचिन काळे

मस्तं लिहिलंय, आवडलं!

नाखु's picture

3 Nov 2017 - 7:02 pm | नाखु

काही प्रती दस्तुरखुद्द दवणे यांनी वाचल्या तर त्यांचा पांडुरंग सांगवीकर होईल

आवडलं

पुभाप्र

रामपुरी's picture

3 Nov 2017 - 7:41 pm | रामपुरी

"पेपर वाचताना जाणवलं आयुष्य वाचायचं राहून गेलं, जात्यातले गहू पाहून जाणवलं आपल्या आयुष्याचंही असंच पीठ होतंय, बँक स्टेटमेंट वाचून जाणवलं आयुष्य टॅली झालंच नाही, ठेवणीतले कपडे घडीवर खराब झालेले पाहून जाणवलं मधून मधून मनाच्या घड्याही उलगडायला हव्यात, कुत्रा आणि खांबाला बघून जाणवलं नियतीने आपल्यावरही असाच पाय वर केलाय..."

ह ह पु वा

अभिदेश's picture

3 Nov 2017 - 9:56 pm | अभिदेश

लेख वाचनीय पण दवणीय बाबतीत पहिल्या अंड्यापेक्षा कमी असे माझे वैयक्तिक मत.

जव्हेरगंज's picture

4 Nov 2017 - 12:42 am | जव्हेरगंज

=)))))
तुफान...!! एक नंबर!!!

उपयोजक's picture

4 Nov 2017 - 9:45 am | उपयोजक

जबरा!

बाजीप्रभू's picture

4 Nov 2017 - 10:23 am | बाजीप्रभू

खास प्रतिकिया द्यावी म्हणून लॉगिन केलं...तुफान लिहिलंयत.. ह ह पु वा झाली.
लिहीत रहा...

प्राची अश्विनी's picture

4 Nov 2017 - 10:47 am | प्राची अश्विनी

जबरी! :)
दवणीय- मला वाटलं एका लेखकावरून हा शब्द आला. नाही का?

होय, शब्द सारखेच्या दोनतारी पाकात बुडवून लिहीणारे कविवर्य.

सूड's picture

6 Nov 2017 - 9:09 pm | सूड

साखरेच्या*

खेडूत's picture

4 Nov 2017 - 11:10 am | खेडूत

हे हे..! मस्तच. :))

सुबोध खरे's picture

4 Nov 2017 - 1:19 pm | सुबोध खरे

यात "दवणीय" काहीच न सापडल्याने आदी भाऊंचा णिशेध.
लेख फारच छान आहे हेवेसांनल.

बबन ताम्बे's picture

4 Nov 2017 - 6:51 pm | बबन ताम्बे

खुसखुशीत लेख !

स्वाती दिनेश's picture

5 Nov 2017 - 1:09 pm | स्वाती दिनेश

हे अंडेही आवडले.
आता मात्र कॉलिंग नंदन... अरे इथे दवणीय अंडी महोत्सव सुरू केलाय अ‍ॅड्याने आणि नंदन अजून कसा नाही आला? :)
स्वाती

चौथा कोनाडा's picture

5 Nov 2017 - 1:27 pm | चौथा कोनाडा

हा....हा ..... हा... ! :-)

ह्ये बी अंडं लै भारी !

गोंधळी's picture

6 Nov 2017 - 9:58 pm | गोंधळी

मस्त

जात्यातले गहू पाहून जाणवलं आपल्या आयुष्याचंही असंच पीठ होतंय, बँक स्टेटमेंट वाचून जाणवलं आयुष्य टॅली झालंच नाही, ठेवणीतले कपडे घडीवर खराब झालेले पाहून जाणवलं मधून मधून मनाच्या घड्याही उलगडायला हव्यात, कुत्रा आणि खांबाला बघून जाणवलं नियतीने आपल्यावरही असाच पाय वर केलाय... लोल लोल लोल!!!

माझी आजी मला सकाळ मधली "शिदोरी" नावाचं "ते" सदर वाचायला लावायची. जाम वैताग यायचा. मी एकटीच वैतागलेली नाही हे बघून फारच बरं वाटलं :P

आजी नाहीये आता, नाहीतर तुमची ही "दवणीय अंडी" वाचायला देऊन सूड काढला असता :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Nov 2017 - 10:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डोळ्यात टच्चकन पाणी आलं.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Nov 2017 - 12:39 am | अमरेंद्र बाहुबली

लय भारी

जागु's picture

8 Nov 2017 - 12:15 pm | जागु

वाचताना मजा आली.

माहितगार's picture

8 Nov 2017 - 12:20 pm | माहितगार

छान खुसखुशीत

माहितगार's picture

8 Nov 2017 - 12:22 pm | माहितगार

सॉरी मी हे अद्याप वाचलेले नाही स्वडीने वाचेन. खुसखुशीतचा शेरा आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या शालेय स्नेहसंमेलन या तिसर्‍या लेखास होता/आहे.

सानझरी's picture

8 Nov 2017 - 1:36 pm | सानझरी

जबरा!

पैसा's picture

8 Nov 2017 - 7:14 pm | पैसा

=)) =))

अर्धवटराव's picture

8 Nov 2017 - 10:32 pm | अर्धवटराव

=)) =)) =))
कुठुन सुचतं रे हे सगळं तुला =)) =))