एक अजब प्रश्न घेऊन आलोय. काय करणार, बायकोने एकास एक दाखले देऊन कात्रीत नै तर चक्क अडकित्यात पकडलाय. तर प्रश्नामागची पार्श्वभूमी अशी कि, मला ट्रेकिंगची आवड. लग्नानंतर हेच खूळ बायकोच्याही डोक्यात घातलं त्याचे परिणाम आत्ता दिसायला लागलेत. म्हणजे लोकं लग्नानंतर जसे बायकोला घेऊन कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी किंवा कोल्हापूर/ जेजुरला जातात तसे मी तिला नेले कुठे, तर रायगडाला तेही बाईकवर. itar वेळीही फिरायला
म्हटलं कि ट्रेकिंगच अशी आमच्या सहजीवनाची सुरुवात. दरवर्षी हरिश्चंद्रगड वारी हा माझा मागील चार पाच वर्षांचा क्रम, मागल्या वर्षी जेव्हा ग्रुपला घेऊन गेलो तेव्हापासून सगळे पावसाळा संपायची वाट पाहात होते. आता पावसाळा संपल्याबरोबर ग्रुपात चुळबुळ सुरु झाली आणि इकडे आमच्या सौ च्या मनात खळबळ माजलीय. खरंतर तिला पोहणं,
कारण ती गरोदर आहे. आणि डोहाळे लागलेत ट्रेकिंगचे.
तसं सारं काही आलबेल असलं तरीही डॉक्टरांनी सावधानता म्हणून बाईकवर फिरणे, जास्त धावपळ करणे, बाहेरचं खाणं असल्या गोष्टी बंद करायला सांगितल्यात त्यामुळे साहजिकच आम्ही या वर्षी तरी तिला ट्रेकला नेणार नाही आहोत. आणि हेच त्या खळबळीचं कारण. आता तिला डॉक्टरांनी काय सांगितलंय माहितेय ना असा प्रश्न केला कि तिच्याकडे हजार उत्तरे तयार असतात.
हरिश्चंद्रगड काही कठीण नाहीय चढायला,
पूर्वी नाही का बायका रानात जाऊन लाकडं वगैरे आणायच्या गरोदर असतानाही,
तसाही मी रोज कुठे व्यायाम करते? थोडी हालचाल नको का?
मी एवढी लेचीपेची वाटली काहो तुम्हाला?
मला जरा मोकळा श्वस घ्यायचंय....
एक ना अनेक निमित्त हजर आहेत ट्रेकसाठी. आता याला पर्याय म्हणून मी एखाद्या समुद्र किनाऱ्यावर निवांत दिवस घालवण्याचं गाजर दाखवून पाहिलं पण काही उपयोग नाही. त्यामुळे आता उत्तरासाठी मिपाकडे वळण्याशिवाय पर्याय उरला नाही. माझे प्रश्न पुढीलप्रमाणे.
१) बायकोला चार महिन्याची गरोदर असताना ट्रेकला नेणे सुरक्षित आहे का?
(तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि कुठलाही त्रास सध्या तरी होत नाहीये तसेच आम्ही राजूर कडल्या मार्गाने जाणार आहोत जो तुलनेने सोपाय.)
२) तुलनेने हरिश्चंद्रगड पेक्षा सोपा गड जिथे वस्ती करता येईल असा कोणता?
(तिथपर्यंत गाडी जात असल्यास उत्तम.)
प्रतिक्रिया
26 Oct 2017 - 6:54 pm | संजय पाटिल
पन्हाळ्याला जा.... सगळीकडे गाडीने फिरता येतं.... आणि सध्या मस्त वातावरण आहे!
26 Oct 2017 - 7:13 pm | इरसाल कार्टं
चला, लवकरच इथे यादी तयार होईलही वाटते.
26 Oct 2017 - 6:55 pm | मोदक
अभिनंदन रे..!!
२) तुलनेने हरिश्चंद्रगड पेक्षा सोपा गड जिथे वस्ती करता येईल असा कोणता?
मला लगेच आठवणारा, आवडणारा आणि फार फिरायला न लावणारा किल्ला म्हणजे विजयदुर्ग - जरा लांब आहे पण सोपा किल्ला आहे.
आणखी लिस्ट सवडीने देतो.
26 Oct 2017 - 7:12 pm | इरसाल कार्टं
धन्यवाद
26 Oct 2017 - 7:21 pm | सुबोध खरे
हरिश्चंद्रगड काही कठीण नाहीय चढायला,
पूर्वी नाही का बायका रानात जाऊन लाकडं वगैरे आणायच्या गरोदर असतानाही,
तसाही मी रोज कुठे व्यायाम करते? थोडी हालचाल नको का?
त्यांना सांगा तुम्ही चार दिवसांचं जेवण एकाच दिवशी जेवता का?
मग इतके दिवस हालचाल केली नाही म्हणून लगेच पूर्ण ट्रेक साठी जाणे बरोबर आहे का?
अतिसर्वञ वर्जयेत
व्यायाम हा रोजच्या रोज करणे आवश्यक आहे गरोदरपणात तर अजूनच
ट्रेक ला जाताना रस्ता वेडा वाकडा असतो कुठे ठेच लागली किंवा पडायला झालं तर काय?
तेथे मिळणारे अन्न /पाणी हे खात्रीचे असेल का?
आयत्या वेळेस पोटात दुखायला लागले तर ( काय झालं असेल? बाळ कसं असेल? अशा हजार शंकांनी) पुढचा ट्रेक ( स्वतःचा आणि इतरांचा) आनंदात करता येईल का?
आजही आदिवासी बायका गरोदर असताना अपार कष्ट करतात पण ती परिस्थिती नाइलाजाची असते.
त्यांच्या होणाऱ्या गर्भपाताचे, अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण आणि कमी वजनाचा गर्भ यांचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. ( याचे कारण केवळ अतिकष्ट असेच आहे असे नाही तर अपुरे/ लहान वय, कुपोषण पौष्टिक अन्न आणि स्वच्छ पाण्याची वानवा इ अनेक कारणेही आहेत)
26 Oct 2017 - 7:27 pm | इरसाल कार्टं
हा प्रतिसाद आसाच्या असा वाचून दाखवतो.
:p
28 Oct 2017 - 1:03 pm | स न वि वि
अगदी उत्तम प्रतिसाद . ट्रेकिंग आणि मजा मस्ती करायला अक्ख आयुष्य पडलाय . आणि खरेतर सध्या कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचे हे स्वतःच ठरवले पाहिजे.
26 Oct 2017 - 7:25 pm | मार्मिक गोडसे
योग्य सल्ला.
26 Oct 2017 - 7:29 pm | कविता१९७८
लोहगडलि नेउ शकता , १५ मि मधे गडावर साध्या पायर्याने ठेच लागण्याचीही भीती नाही
26 Oct 2017 - 8:22 pm | सुखीमाणूस
आतापर्यंत जसे ट्रेकिंग एकत्र केले तसे निर्बन्ध पण एकत्र अनुभवा.
27 Oct 2017 - 9:48 am | हर्मायनी
हे पटलं!
27 Oct 2017 - 10:54 am | अजया
दोघांची प्रेग्नंसी आहे. एकावरच निर्बंध . हे म्हणजे डायबेटिक माणसासमोर चाॅकलेट खाणे आहे!
31 Oct 2017 - 2:03 am | वीणा३
अतिशयच सहमत!!!
26 Oct 2017 - 11:25 pm | रामदास२९
अभिनंदन ..
पुण्यात रहात असाल तर.. सिन्हगडावर जा ..
27 Oct 2017 - 12:44 am | रेवती
अभिनंदन!
डॉक्टरांनी सांगितलेले व्यायम करा व गड किल्ल्यांचे शिनेमे बघा.
दरवेळी काही होतेच असे नाही, तब्येत मस्त आहे मग घरी का बसायचे?, मी काही पहिलटकरीण नाही म्हणत माझी मैत्रिण तिसर्याच देशात माऊंटन बाईकिंगला गेली होती तेंव्हा चार महिन्यांची गरोदर होती. तिला माऊंटन बाईकिंगचे डोहाळे लागले होते.
जाऊ नका असे तिच्याकडे बघून सांगू शकीन.
27 Oct 2017 - 11:59 am | सुबोध खरे
रेवती ताई
माउंटन बाइकिंग गरोदर असताना करणे म्हणजे डोळे मिटून रेल्वे लाईन पार करण्यासारखे आहे. १०० पैकी ९५ च का ९९ वेळेस तुम्ही पार व्हाल म्हणून ते सुरक्षित आहे हे म्हणणे चूक आहे एवढेच नम्रपणे नमूद करू इच्छितो. सायकल वरून पडून खाली गडगडला तर ते आपल्याला किती महाग पडेल हा विचार करून ठेवावा.
घरात पाय घसरून पडल्यानंतर, नवऱ्याने लाथ मारली म्हणून किंवा वाहनाने धडक दिली म्हणून सोनोग्राफी साठी माझ्याकडे वर्षानुवर्षे आलेल्या स्त्रिया मी पाहत आलो आहे. सोनोग्राफी होईपर्यंत त्या मुली(होणाऱ्या आईला) ला झोप लागत नाही. एवढा मानसिक तणाव न होणाऱ्या मुली १०० मध्ये १-२ असतील.
जाऊ नका असे तिच्याकडे बघून सांगू शकीन.
हा सल्ला योग्य आहे
27 Oct 2017 - 3:43 pm | रेवती
होय, तेच सांगण्याचा प्रयत्न आहे. ती गडगडलीच व पुढील दहा वर्षे सगळेजण गडगडले. पुन्हा मार्गावर येणे सोपे नाही. त्यापेक्षा एकदा बाळंतपण सुखरूप होऊन जाऊ द्या मग काय करायचे ते परिस्थितीप्रमाणे ठरवा असे म्हणतिये. प्रतिसाद लिहिताना माझ्याकडून काहीतरी घोळ झालेला दिसतोय.
27 Oct 2017 - 4:04 pm | प्रसाद_१९८२
मग त्यात काय ऐवढे ?
खुद्द जिजाऊ मॉंसाहेंब सात महिन्याच्या गरोदर असताना, वेरुळ ते जुन्नर हा खडतर प्रवास त्यांनी घोड्याच्या पाठीवर बसून केला होता तो हि रात्रंदिवस. व इतका त्रास होउनही पूढे त्यांच्या पोटी शिवाजीसारखा एक महापुरुष जन्माला आला. तुमची मैत्रीण तर फक्त माऊंटन बाईकिंग करण्याचे म्हणतेय! करु द्या बिधास्त. काय माहित पुढील शिवाजी कदाचीत त्यांच्याच घरी जन्म येईल. :)
27 Oct 2017 - 3:27 am | अनन्त अवधुत
माझ्या सौ.ने ४थ्या महिन्यात ट्रेकिंग केले होते. आणि नंतर पण अधून मधून ट्रेकिंग / फिरायला जाणे हे सगळे सुरूच होते. शिवाय डॉक्टर ने पोहणे पण सुरु करायला हरकत नाही असे सांगितले होते.
त्या अनुभवाकडे पाहून म्हणेन कि भीती वाटते मला तरी होती.
काय करायचे ते काळजी पूर्वक करा. छोटे ट्रेक्स करा, अंदाज घेऊन मोठे ट्रेक्स करा.
27 Oct 2017 - 10:17 am | इरसाल कार्टं
हे सगळे प्रतिसाद वाचून तिचं ट्रेकिंग सध्यातरी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. समस्त मिपाकरांच्या नावाने बोटं मोडीत तिनेही तो मान्य केलाय ;)
सध्या तरी ती शांत आहे. पण हि "वादळापूर्वीची शांतता" आहे असे गृहीत धरून मोर्चेबांधणी सुरु करतोय...
27 Oct 2017 - 2:38 pm | सूड
एवढं लिहीताय तर त्यांचाही आयडी नाही याची खात्री करुन घ्या. धागा उघडून वाचायला दिला असलात तर आयडी असला नसला तसाही फरक पडत नाही म्हणा.
27 Oct 2017 - 8:03 pm | आनन्दा
इथे रिझल्ट कळवल्याबद्दल धन्यवाद
27 Oct 2017 - 10:57 am | असंका
योग्य निर्णय!
अभिनंदन!
27 Oct 2017 - 12:26 pm | सिंथेटिक जिनियस
तुमच्या पोटी शिवाजीच जन्मायचा हो!!
31 Oct 2017 - 3:13 pm | इरसाल कार्टं
एवढी मोठी जबाबदारी...
30 Oct 2017 - 7:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन...!
बाकी चालू द्या..!
-दिलीप बिरुटे
30 Oct 2017 - 11:35 am | नूतन सावंत
अभिनंदन.
त्यांना मुळातून असे डोहाळे लागलेत की तुम्ही ट्रेकला निघालात म्हणून त्यांना उत्साह आलाय याची आधी खात्री करन घ्या. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे.पण मुळातून त्यांना आधी डोहाळे लागले असतील तर मुंबईत असाल तर सायन,वरळी,माहीम हे किल्ले(?) चढायला हरकत नसावी.पुण्यात असाल तर पर्वती.
30 Oct 2017 - 11:37 am | नूतन सावंत
तुम्हाला वसईचा किल्लाही जवळच आहे
30 Oct 2017 - 1:34 pm | गामा पैलवान
इका,
म्हणतात ना गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. आई जरी गिरीभ्रमणप्रेमी असली तरी प्रस्तुत डोहाळे गर्भाच्या आवडीचे आहेत. त्यामुळे तूनळीवरची चलचित्र वगैरे पाहून शमवता येतील. प्रत्यक्षात डोंगरात जायची गरज नाही असं माझं मत आहे. पण तरीही शमले नाहीत तर डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहनाने न्यायला हरकत नसावी. अर्थात रस्ता पाहून निर्णय घेणे इष्टं.
आ.न.,
-गा.पै.
30 Oct 2017 - 9:01 pm | इरसाल कार्टं
हे व्हिडिओ पाहून इच्छा बळावली तर काय करू तेही कळवा.
ह घ्या.
30 Oct 2017 - 11:05 pm | गामा पैलवान
डोंगराचा पायथा आहेच मग! तिथपर्यंत घेऊन जा. :-)
-गा.पै.