ओल्या नारळाच्या करंज्या

चकली's picture
चकली in पाककृती
17 Oct 2008 - 10:48 pm

दिवाळीच्या सर्व मि. पा. करांना शुभेच्छा!

ह्या करंज्या लगेच फ़न्ना कराव्यात. त्यातच गम्मत आहे !

वाढणी: साधारण १०-११ करंज्या


साहित्य:
::::सारण::::
सव्वा कप खोवलेला ओला नारळ
पाउण कप किसलेला गूळ
१/२ टिस्पून वेलची पूड
::::करंजी पिठ::::
पाउण कप मैदा
पाव कप रवा
१ टिस्पून साजूक तूप, पातळ केलेले
१/२ ते पाउण कप दूध
तळण्यासाठी तेल

कृती:
१) गूळ व नारळ एकत्र करून पातेल्यात, मध्यम आचेवर शिजवावे. वेलचीपूड घालावी आणि घट्टसर मिश्रण करावे. मिश्रण ओलसर असू नयेत नाहीतर करंज्या नरम पडतात.
२) करंजीच्या आवरणासाठी एका भांड्यात रवा आणि मैदा एकत्र करावा. तूप कडकडीत गरम करून मोहन घालावे. थोडे थंड झाले कि मोहन घातलेले तूप सर्व मैद्याला लागेल असे मिक्स करावे. अंदाजे घेत घेत गार दूध घालावे आणि घट्ट मळून घ्यावे. थोडा वेळ झाकून ठेवून द्यावे.
३) १५-२० मिनीटांनी थोडे दूधाचा हबका मारून पिठ जरा कुटून घ्यावे. पिठाचे एकेक इंचाचे गोळे करून घ्यावेत.
४) करंज्या वाळू नयेत म्हणून एक ताटली आणि एक ओला, पिळून घेतलेला कपडा तयार ठेवावा.
५) करंज्या करण्यासाठी पिठाची एक गोळी निट मळून घ्यावी. गोल आणि पातळसर पुरी लाटून घ्यावी. मध्यभागी एक चमचाभर नारळाचे सारण ठेवावे. पुरीच्या अर्ध्या कडेला किंचीत दूध लावावे म्हणजे दोन्ही कडा निट चिकटतील आणि तळताना करंजी फुटणार नाही. उरलेली रिकामी अर्धी बाजू दूध लावलेल्या बाजूवर आणून चिकटवावी. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. कातणाने अधिकचे पिठ कापून घ्यावे. [माझ्याकडे कातण नव्हते म्हणून काट्याने (Fork) कडेवरती थोडे डिझाईन केले.]
६) करंजी करून झाली कि ती ताटलीत ठेवून वरून ओला कपडा टाकून झाकावी म्हणजे करंजी सुकणार नाही. अशाप्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्यात.
७) तळणीसाठी तेल गरम करावे. मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

माझ्या blog वर पूर्वप्रकाशित http://chakali.blogspot.com/2008/10/karanji-olya-naralachi-diwali.html

प्रतिक्रिया

शितल's picture

17 Oct 2008 - 10:56 pm | शितल

अरे वा!
फोटो पाहुन तर अगदी खाव्याशा वाटतात.
आणि पाककृती ही खुपच छान आहे.
मी कधी गुळ कधी साखर घालुन करते. पण ओल्या नारळाच्या करंज्या घरी अगदी आवडीने खाल्या जातात.

यशोधरा's picture

17 Oct 2008 - 11:09 pm | यशोधरा

सही दिसताहेत करंज्या!! :)

रेवती's picture

17 Oct 2008 - 11:49 pm | रेवती

चकलीताई,
दिवाळीत मी करणारच होते गं.
फोटो मस्तच!:)

रेवती

प्राजु's picture

17 Oct 2008 - 11:51 pm | प्राजु

फोटो क्लासच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संपूर्ण माहीती .उत्तम फोटो.बारीक सारीक पण महत्वाच्या सूचना.नेहेमीप्रमाणे छान लेख.
अवांतर : सारणात थोडा गुलकंद घालावा का?

वर्षा's picture

18 Oct 2008 - 9:43 pm | वर्षा

तुझी ही पाकृ मस्तच आहे.
रवा बारीक घ्यायचा की जाड?
आणि पीठ कुटायचं म्हणजे चक्क बत्त्याने कुटायचं का? मळण्यापेक्षा कुटण्याने काही चांगला इफेक्ट पडतो का? (कारण माझा बत्ता म्हणजे अगदी चिंटू आहे. त्याने असं काय कुटलं जाणारे अशी शंका आहे मला)
अवांतरः तू गोड शंकरपाळ्यांची रेसिपी देशील का? की आधीच दिली आहेस?

धन्यवाद!
-वर्षा

रेवती's picture

18 Oct 2008 - 11:51 pm | रेवती

माझ्याकडे जो बत्ता आहे त्यानं वेलदोड्याशिवाय काही कुटलंच जात नाही. मला वाटतं तो मैद्याचा गोळा फुडप्रोसेसरमधून फिरवून काढावा. तू काय म्हणतेस चकलीताई?

रेवती

चकली's picture

20 Oct 2008 - 5:57 am | चकली

वर्षाताई आणि रेवतीताई,
हो, फुड प्रोसेसरमध्ये मैद्याच्या गोळ्याचे मध्यम तुकडे करून फिरवून काढ आणि चांगले मळून घे!! फक्त गोळा फुडप्रोसेसरवर फिरवताना, अंदाज घेतघेत एकेक चमचा दूध घाल..

चकली
http://chakali.blogspot.com

चकली's picture

20 Oct 2008 - 6:16 am | चकली

वर्षाताई,
शक्यतो बारीक रवा घे.
कुटल्याने पिठ लवचिक बनते.
जर चालणार असेल तर किचनच्या ओट्यावर जाड प्लास्टिकचा कागद घेऊन त्यावर पिठाचा मध्यम गोळा घे, थोड्या दूधाचा हबका मारून फक्त बत्त्याने कुट. पिठाचा गोळा छोटा असल्याने खुप जोरातही कुटावे लागणार नाही. जर फुडप्रोसेसर असेल तर त्यात पिठाचे मध्यमसर तुकडे करून फिरवून काढ..

चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

19 Oct 2008 - 1:02 am | विसोबा खेचर

आम्ही ह्या करंज्यात खवादेखील वापरतो.. !

एनीवेज,

चकली, इतकी जीवघेणी पाकृ देऊन मिपाकरांचे हाल केल्याबद्दल तुला एक महिनाभर मिपावर न येण्याची शिक्षा मी फर्मावत आहे! :)

आपला,
(करंज्यांचा फोटू पाहून पाघळलेला न्यायमूर्ती) तात्या.

चकली's picture

20 Oct 2008 - 6:33 am | चकली

तात्या,

शिक्षा १ तासाखाली आणता येइल का? १ तासावर मिपा शिवाय लांब नसते..

चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

20 Oct 2008 - 8:11 am | विसोबा खेचर

:)

मदनबाण's picture

19 Oct 2008 - 12:03 pm | मदनबाण

व्वा. चकलीताई .. करंज्या पाकृ दिल्याबद्दल अभार.. :)

(खादाड)
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

स्वाती दिनेश's picture

19 Oct 2008 - 7:12 pm | स्वाती दिनेश

करंज्या मस्तच दिसताहेत ग.. पण मी कधी गूळ नाही घातला सारणात.. (उकडीच्या मोदकांच्या सारणातच घालते फक्त.ते ही निम्मा गूळ निम्मी साखर :))
करंज्यांच्या सारणात साखर घातली की काही व्हेरिएशन करता येतात. उदा- खोबर्‍यात खवा, गुलकंद, आंबा रस, अननस, स्ट्रॉबेरी इ. घालून वेगवेगळे स्वाद ट्राय करुन पहा.. मस्त लागते.
स्वाती