.

शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -१

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
6 Sep 2017 - 2:58 pm

हि धागा मालिका शुद्धलेखनवादी ट्रोलांसाठी नाही. शुद्धलेखन समर्थक चर्चा या धाग्यात टाळून सहकार्य करावे, हि विनंती वाचूनही मनमोकळे करण्याची इच्छा झाल्यास शुद्द्धलेखनप्रियकर मिपाकरांच्या या धाग्यावर जावे. ज्यांना शुद्धलेखन नियमात विधायक सुधारणा व्हाव्यात असे वाटते त्यांनी बिरुटे सरांच्या या धाग्यावर आपली मते नोंदवावीत. ट्रोलींग शिवाय ज्यांना शुद्धलेखन संदर्भात रचनात्मक काम करावयाचे आहे त्यांनी विकिवरील येथे अथवा येथे रचनात्मक सहभाग घ्यावा. मात्र कृपया या धागा मालिकेत प्रतिसाद, खरडी अथवा व्यनिने सल्ले देऊ नयेत ही नम्र विनंती. अनुषंगिक अवांतरा व्यतरीक्त इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद.

शशी

....“काय रे ए शश्या, निमूटपणे जागेवर चाललास का रे ? जसा अगदी साळसूद ! इकडे ये जरा. इकडे ये म्हणतो ना ? का ऐकायला येत नाही ? आणा रे, त्याला धरून आणा. ये म्हणतो तरी येत नाही. चालला बसायला !” -मास्तरांचे तोंड सुरू झाले.

शशीचे कान धरून मुलांनी त्याला मास्तरांसमोर नेले. मास्तरांचे पोट जरा मोठे होते. ते खुर्चीवर बसले म्हणजे त्यांचे पोट टेबल व खुर्ची यांच्यामध्ये नीट चपखल बसे. टेबल पुढे सरकविल्याशिवाय त्यांना उठता येत नसे. म्हणून पुष्कळ वेळा ज्या मुलावर क्रोध होई त्याचा कान धरून त्यांच्यासमोर आणून उभे करण्यात येत असे. कान पकडून कोकरींना आणतात व देवीसमोर त्यांचा बळी देतात, तोच प्रकार त्या विद्यामंदिरात होत असे ! गुरुदेवतेसमोर शशीसारख्या मुलांचे बळी देण्यात येत असत.

“हात कर पुढे, नीट कर.” मास्तर ओरडले. शशीचा तो फुलासारखा हात पुढे झाला, झणझणीत छडी त्या हातावर बसली एक-दोन-तीन छड्या बसल्या.

“जा, आपल्या जागेवर जाऊन एक तास उभा राहा.” मास्तरांनी बजावले.
फुलांवर निखारे ओतावे, तशा त्या छड्या लागल्या. रडत-रडत शशी जागेवर जाऊन उभा राहिला.
वर्गात वाचन चालले होते. आज खारीचा धडा चालला होता.

“खार कशी खेळकर असते, कशी टुणटुण उड्या मारते ! तिची शेपटी कशी सारखी नाचत असते ! ती कशी वाकुल्या दाखवते, पुढच्या दोन पायांत फळ धरून कशी खाते, मध्येच चकचक् करते ! तिचे अंग किती स्वच्छ, तजेलदार व गुबगुबीत !”
असे वाचन चालले होते. मास्तरांची दृष्टी कोठे आहे ? राहूची दृष्टी चंद्राकडे असावयाची, ससाण्याची कबुतराकडे. मास्तरांची दृष्टी पुनः शशीकडे वळली.

“शश्या, तुझे लक्ष कोठे आहे ? कोठे पाहत होतास ?” मास्तरांनी विचारले.

“बाहेर खार उड्या मारीत आहे. तिच्याकडे माझे लक्ष होते.” शशी म्हणाला.

“वर्गात खारीचा धडा चालू आहे. तरी बाहेर बघतोस का ? अरे. पुस्तकात नाही का खारीचे चित्र ? शाळेत येतोस तरी कशाला गाढवा ? शिकण्याकडे लक्ष नाही, बाहेरची पाखरेच बघत राहा. तू अगदीच निर्लज्ज कसा ? खुशाल सांगतो की मी बाहेर बघत होतो,” मास्तरांचे प्रवचन सुरू झाले.

शशी विनयाने म्हणाला, “ मास्तर, मला खरेच पाखरे आवडतात. आणि बाहेर एक खार दुस-या खारीच्या पाठीमागे लागली होती. कशी पण त्यांची धावपळ ! जणू त्यांची शर्यतच होती. मी जाऊ का बाहेर ?”

“बाहेर जातोस का ? इकडे ये रे, फाजीलपणे विचारतोस आणखी ! काही अदबी आहे की नाही ? मास्तर म्हणजे का कचरा ? इकडे ये.”

मास्तरांनी नरसिंहाचा अवतार धारण केला.

थरथरत शशी मास्तरांजवळ येऊन उभा राहिला. त्यांनी त्याचे डोके धरले;ते डोके एकदा भिंतीवर आपटीत व मग पुढे टेबलावर आपटीत.

शशी मोठ्याने रडू लागला. तिकडे अमीनच्या डोळ्यांत पाणी आले. लखू व गोविंदा मात्र हसत होते.

शिक्षा झाली. शशी जागेवर गेला. देवासमोर नारळ फुटला ! पुढे वाचन सुरू झाले. वाचनात वनराजी शब्द आला. मास्तरांनी विचारले, “वनराजी म्हणजे काय ?” कोणी काही सांगेना.

“ढ आहेत सारी कारटी ! अरे वन म्हणजे काय ?” त्यांनी विचारले “राम वनात गेला होता, ते वन,” शशीने उत्तर दिले.
“राम वनात गेला होता ! तू का नाही जात गाढवा ?” हसत मास्तरांनी विचारले.

शशी म्हणाला , “हो मीसुद्धा जातो. तेथे मोर असतात. त्यांचा पिसारा किती छान दिसतो ! मी सुट्टीच्या दिवशी जातो तेथे.”
मास्तर शब्दार्थ सांगू लागले, “वन म्हणजे झाडांचा समुदाय. लिहून घ्या सारे. ए सोम्या. फळांवर लिही रे. तो फळा पुसुन टाक आधी नीट. लागला तसेच लिहावयास. अरे झ- ‘ज’ नव्हे; डांचा... ‘डा’ वर अनुस्वार दे, समुदाय ‘मु’-हस्व काढ. थोबाडीत पाहिजे वाटते ? हं जाग्यावर. आता राजी म्हणजे काय ? तू रे बद्री?”

“राजी म्हणजे राजी. आजा-आजी, राजा राणी. राजाची बायको ती राजी-” बद्री म्हणाला.

“बरोबर. हुशार आहेस तू. मारवाड्याची मुले हुशार असतात. वनराजी म्हणजे नवाची राणी. समजले ना... !” मास्तर विचारू लागले.

एक मुलगा एकदम म्हणाला, “मास्तर वाचनाचा तास आता संपला. पुढचा शुद्धलेखनाचा आहे. शुद्धलेखन घाला.”

“घ्या शुद्धलेखन. तोंडे फिरवा, पाट्या घ्या. एकमेकांचे पाहिलेत तर याद राखा. थोबाडच रंगवीन. पाठ मऊ करीन. शश्या, बस आता खाली. घे लवकर पाटी!”- गुरुदेवांनी आज्ञा केली.

गुरुदेव मोठ्या कष्टाने खुर्चीवरून उठले. तोंडाने शुद्धलेखन सांगत ते मुलांमधून हिंडू लागले. मध्येच एखाद्या पाठीवर छडी वाजे.

शशीजवळ पेन्सिल नव्हती. तो कशाने लिहिणार ? पायांजवळची जमीन नखांनी खरडून त्याने एक लहानसा दगड काढला व त्यानेच तो लिहू लागला. मास्तर शशीजवळ आले व पाहू लागले.

“शश्या ! अरे कशाने लिहीतो आहेस ?” तुला वेड लागले की काय? अरे, पाटी सारी चरबरीत झाली. हे कायमचे शुद्धलेखन झाले-” ते म्हणाले.

“मग आता पुनः लिहायला नको मला? हे कायमचे राहील, मास्तर?” शशीने विचारले.

“काय मूर्ख आहे! तुझ्याजवळ पेन्सिल नाही का? शाळेत तरी कशाला येतोस? भीक माग. द्या रे याला कोणी पेन्सिल द्या. लहानसा तुक़डा-” मास्तर म्हणाले.

अमीन पेन्सिल पुढे घेऊन आला. त्याने पेन्सिलचे दोन तुकडे केले व एक शशीला दिला. शशी घेत नव्हता. अमीन प्रेमाने म्हणाला, “घेरे शशी, ही तुझीच पेन्सिल. घे रे.”

“घे तो तुकडा. भिकारी तो भिकारी आणि पुनः अभिमानी! लाग लिहावयास-” असे बजावून मास्तर शुद्धलेखन सांगू लागले.
“त्या आंब्याच्या झाडावर किती तरी आंबे आले होते- आंबे आले होते.”

आंबे काय झाले-आंबे, पुढे काय!” मुले विचारू लागली.
“अरे, आले होते-” गुरुजी रागाने ओरडले.

एक मुलगा ‘अरे’ शब्द लिहू लागला.

“अरे, ‘अरे’ काय लिहितोस? आले होते; ‘आले होते’ लिही,” मास्तरांनी सांगितले.

“आले होते हे दोनदा लिहावयाचे? मी एकदाच लिहिले आहे, ” शशीने गोड आवाजात विचारले.

“डोंबल तुझं! काय शिंची कारटी आहेत! सांगत नाही. पुढे घ्या-”असे म्हणून मास्तर पुढे आणखी सांगू लागले.

“त्या आंब्यातील काही शेंदरी, काही पिवळे, काही राते, काही लाल असे दिसत होते! उद्गारचिन्ह.”
मास्तरांनी एकदम गाडी सोडली.

“हळू सांगा जरा. शेंदरीच्या पुढे काय?” एकाने विचारले.

“पुढे लाल रे-” दुसरा म्हणाला.

“हा लाल! त्याच्यापुढे लाल का? तुझे गालच लाल करतो!” असे म्हणून आपल्या वरदहस्ताचा स्पर्श करून मास्तरांनी मुलाच्या मुखपुष्पास लाल केले.

श्रीविष्णूंनी ध्रुवबाळाच्या गालाला स्पर्श केला व त्याला वेद म्हणावयाला लाविले, गुरुदेवांनी हस्तस्पर्श करून मुलाला रडायला लाविले!

“उद्गारचिन्ह कसे! ते कोठे शिकविले आहे?” एकाने विचारले.
“आजळी गेला असशील केळी खायला शिकविले तेव्हा! गैरहजर रहायला हवे. उद्गारचिन्ह काठीखाली टिंब. काठीच्या खाली टिंब. समजले आता?” असे म्हणून विचारणा-याच्या पाठीत त्यांनी एक काठी मारली. मुलाच्या डोळ्यांतील अश्रूंची टिंबे पाटीवर पडू लागली व शुद्धलेखन वाहून जाऊ लागले.

“डोळे पूस आधी. पूस डोळे- ते पुसून चालले सारे.” असे बजावून मास्तरांनी आणखी छड्या गप्प बसण्यासाठी म्हणून लगावल्या! मुलगा पहिले अश्रू पुशी, तो दुस-या काठीचे पुनः नव्याने येत.

शुद्धलेखनाच्या तासाला मुले कंटाळली. मास्तरही मारून कंटाळले. ते आता हिशेब घालू लागले.....

संदर्भः शशी : लेखकः साने गुरुजी

वाङ्मय