#मिपाफिटनेस - सप्टेंबर २०१७ - ज्युदो

Primary tabs

ज्याक ऑफ ऑल's picture
ज्याक ऑफ ऑल in जनातलं, मनातलं
1 Sep 2017 - 5:38 pm

नमस्कार मंडळी,

दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "जॅक ऑफ ऑल"

जॅक ऑफ ऑल उर्फ "जॅक" पूर्वी ज्युदो खेळत होते, त्यामध्ये ब्लॅक बेल्टसारखी मैलाच्या दगडाची कमाईही केली आहे आणि अनेकदा चर्चांमध्ये काँटॅक्ट स्पोर्टमुळे स्वभाव कसा शांत होतो हे हिरीरीने पटवूनही देतात.

आपल्याला ज्युदो / कराटे म्हणजे हाणामारीला उत्तेजन देणारे प्रकार वाटले तरी त्याची दुसरी बाजू शोधण्यासाठी या लेखाचा नक्की उपयोग होईल.

टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास.

****************************

एकदा सकाळी सकाळी फोन खणाणला .. मोदक कॉलिंग . “काय असेल की ?” म्हणून मी फोन उचलला. थोडं इकडचं तिकडचं बोलणं झालं अन अचानक मोदक म्हणाला की “अरे तू तुझ्या एकंदरीत क्रिडा क्षेत्रातील प्रवासाबद्दल लेख का लिहीत नाहीस एखादा ..?”

त्या दिवशी पासून खरं तर हे डोक्यात घोळत होतं. मन सतत लहानपणीपासून त्या ज्युदोच्या दिवसांकडे धाव घ्यायला लागलं. खरंच काही गोष्टी इतक्या अनाहूतपणे तुमच्या आयुष्यात घडतात की त्या नंतर तुमच्या जीवनात किती महत्वाच्या ठरतील याची तेव्हा पुसटशी सुद्धा कल्पना नसते.

मी साधारण पाचवी सहावीत असेन. मला व्यायाम खेळ मारामारी या उपद्व्यापात फार रस होता. टिपीकल प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये येणारा एक मराठी मिडीयम मधला वांड मुलगा होतो मी असं म्हंटल तरी चालेल. खोलीत कधीही पाहिलं तर ब्रूस-ली , द रॉक यांची पोस्टर्स लागलेली , नन-चक भिंतीला टांगलेला (कराटे वगैरे चा गंध नव्हता पण वस्तू गोळा करायचा शौक), ग्यालरीत पंचिंग कीट असं सगळं असलेला दिशाहीन काळ तो होता. त्या वेळेस माझ्या बाबांची नुकतीच बदली होऊन नवीन गावात आम्ही आलेलो असल्याने शाळा, मित्र सगळंच नवं अन ऑकवर्ड होतं.

त्यामुळे रोज शाळेतून घरी आलं की अर्ध्या तासात परत सायकल काढून मी बाहेर लंपास होत असे. अन घरी आलो अन टीवी वर कुठे कराटे वगैरे चा सिनेमा आहे कळलं की त्याची पारायण ठरलेली. मग अगदी ड्रंकन मंक पासून फिस्ट ऑफ फ्युरी असो किंवा ब्लड स्पोर्ट पासून ऑपरेशन कोन्डोर असो, रात्री उशीरा पर्यंत जागून पारायण हे ठरलेलं. अन मग नंतर त्यातील किक्स पंचेस याच्या नकला.

हे सगळं नातेवाईकांत माहित होतंच. अन तीच आवड पाहून एकदा माझी काकू माझ्या आईला एका कराटे क्लास बद्दल बोलली. झालं.. माझा उत्साह दुपटीने वाढला. मग एक दिवस बाबा मी अन आई असे आम्ही त्या क्लास ला गेलो. तिथे टिपीकल एखाद्या शावलीन सिनेमा सारखं बरीच मुलं पांढरा ड्रेस घालून सराव करताना दिसली. काही सिनियर मुलं अवघड व्यायाम करताना दिसली अन कॉरीडोर च्या एका भागात एक व्यक्ती (बहुदा मेन सर) तसाच पांढरा ड्रेस पण कमरेला Black Belt असलेले दुसऱ्या मुलांना काही डाव शिकवताना दिसले. त्यांच्या कडे पाहून “आपण पण असंच व्हायचं” ही एक दिशा मला खरं तर त्या दिवशी मिळाली. मी वर म्हणल्या प्रमाणे एक छोटी गोष्ट जीवनात पुढे किती महत्वाची ठरू शकते याची कल्पना मला त्या दिवशी अन त्या वयात असण्याचं काही कारण नव्हत. माझ्या डोळ्यासमोर मला फक्त मी त्या शुभ्र पांढऱ्या ड्रेस मध्ये Black Belt घालून रुबाबात उभा असलेला दिसत होतो.

बहुदा १९९३ पासून माझा हा प्रवास सुरु झाला. हा क्लास आमच्या घरापासून साधारण ४ किमी होता. त्यामुळे रोज सायकल वर जाणे हा एकच पर्याय होता. क्लास सुद्धा ६ ते ८ असायचा. पण त्या खेळाचं ग्लामर आणि माझं स्वप्न , मला नंतर १५-१८ वर्षं स्वस्थ बसू देणारं नव्हत. मी ते आव्हान कधीच स्वीकारलं होतं. आता स्वप्न एकच होतं ... Black Belt.

एक गंम्मत अशी झाली होती की ५-१० दिवस क्लासला गेल्या नंतर मला कळलं की हा कराटे चा नसून ज्युदो चा क्लास होता. पण "कांही का असेना काहीतरी मार्शल आर्ट आहे ना.." म्हणून मी पण त्याकडे कानाडोळा केला. थोडक्यात माझ्या गणपती चा हनुमान झाला होता. पण असो.. मला ते चालणारं होतं.

तसा क्लास घरापासून दूर होता. रस्त्यात २ वेळा हायवे क्रॉस करावा लागे , त्यात उशीर झाला तर क्लास मध्ये शिक्षा व्हायची. पण मी ते सगळं एन्जॉय करत होतो. शाळेतून आलं की लगेच आवरून कधी एकदा दोजो ला जातो असं मला झालेलं असायचं. तेव्हा माझ्याकडे हिरोची सायकल होती. जड च्या जड २४ इंची. पण त्या रोजच्या सायकल चालवण्याचा कंटाळा आला नाही. सगळा व्यायाम करून घरी येताना हात पाय खूप दुखत असायचे. सायकल चालवत घरी येणं जीवावर आलेलं असायचं पण तरी कधी रस्त्यावरील एखाद्या रिक्षाशी किंवा एखाद्या गाडीवाल्याशी मनातल्या मनातच रेस लावून सायकल दामटवायला खूप भारी वाटायचं. अंग घामाने भिजलेलं अन त्यावर लागणारा गार वारा. या सगळ्या गोष्टींचा मनावर अन शरीरावर परिणाम होत होता. थकलं असलं तरी “एक लास्ट एक्स्ट्रा” पुश, हे संस्कार तेव्हा मनावर होत होते. याचा उपयोग कित्येक वेळा स्पर्धा, व्यायाम, अटीतटी सामने अगदी जिम मध्ये सुद्धा खुपदा झाला.

अश्या रीतीने क्लास सुरु झाला तर खरा, पण नव्याचं कुतूहल गेल्यावर बऱ्याच गोष्टी कळल्या. मला एव्हाना सुरु होऊन एक महिना झाला होता पण न किक्स ना पंचेस काहीच शिकवलं गेलं नव्हत. रोज फक्त मरेस्तोवर व्यायाम. म्हणून मी माझ्या एका सिनियर ला विचारलं की मला पुढचं कधी शिकवणार ? यावर तो म्हणाला “सेन्से न योग्य वाटेल तेव्हा ते शिकवतील , सध्या तू दिलेला व्यायामच नीट कर !!” (सेन्से – जपानी भाषेत गुरु किंवा सिनियर शिक्षक). मी बापडा मनाविरुद्धच २ महिने तसेच काढले.
अन एक दिवस “पटवर्धन” सेन्से नी मला बोलावलं , किती दिवस झाले वगैरे विचारलं. अन नंतर एका सिनियर ला मला “फॉल शिकवायला” सांगितलं. “फॉल्स” म्हणजे पडणे. ज्युदो मधील सगळ्यात जबर गोष्ट. तुम्ही इतर कोणतीही मार्शल आर्ट घ्या, त्यात हल्ला कसा करावा हेच आधी शिकवलं जातं. पण ज्युदो एकमेव अशी शिस्त आहे कि ज्यात “पडायला व मार खायला” आधी शिकवलं जातं.

मला हे आधी खूप विचित्र वाटलं कारण माझ्या डोळ्यासमोर “एन्टर ड ड्रगन” अन “ड्रंकन मंक” मधलं सगळं डोळ्यासमोर होतं . पण का कोण जाणे थांबायचं कधी माझ्या मनात आलं नाही. मला माझ्या सिनियर ने सांगितलं , की "हे बघ तू एखाद्याला मारशील तर खरं.. पण तू स्वत: मार खाल्यावर परत उठणं.. उठून उभं राहणं व परत हल्ला करणं हेच तुला माहित नसेल तर तू कितीही भारी युद्ध कला शिकलास तरी उपयोग शून्य असेल” तर अशा पद्धतीने सुरक्षित रीतीने कसं पडायचं अन परत उभं कसं राहायचं हे १-२ महिने चाललं. गंम्मत म्हणजे आमचा उपयोग आमच्या पुढील मुलांना गिनिपिग सारखा करू दिला जायचा. त्यांना डाव शिकवलेले असल्याने ते आम्हाला धोपट धोपट धोपटायचे.

आता पडायचं, मार खायचं ट्रेनिंग पूर्ण झालं होतं . या ट्रेनिंग चा मेन भाग हा की “आपल्याला ही मार खावा लागू शकतो व तो खायची वेळ आल्यास कमीतकमी नुकसान होऊन कसा खावा” याची शारीरिक अन मानसिक तयारी हा होता. खरं तर आजकाल आपण हेच विसरत चाललोय. आपल्या रोजच्या जीवनात पण हरणे हे आपल्याला मान्यच नाहीये. पण ज्युदोने मला दिलेला हा सगळ्यात मोठा धडा होता. जो नंतर आजतागायत कोणत्याही अपयश पचवण्याच्या वेळेस किती तरी वेळा माझ्या कामाला आला.

शेवटी एके दिवशी आता मला ड्रेस (ज्युदोचा) घेणे गरजेचे आहे असं सेन्से म्हणाले. कारण आता खरं उठा-पटक चालू होणार होतं. यथावकाश माप देणे वगैरे सोपस्कार पार पडून माझा “गी” एक दिवस मला मिळाला. (ज्युदो-गी – ज्युदोचा पोशाख). तो हातात येताच Black-Belt च्या दिशेने माझा प्रवास सुरु झाल्याची एक्साईटमेंट वगैरे मला झाली. पण नंतर काय काय ठेवलंय पुढ्यात याची जसजशी जाणीव होत गेली तसतशी ती कमी होत गेली हा भाग निराळा. पण ही फेज तात्पुरती होती. कारण नंतर सतत जिंकणे, पडून उठणे, न हारणे , विश्वास तुटू न देणे अश्या काय अन किती शिकवणी ज्युदो मला देत गेलं.

तर आता माझं विविध डावपेच , Strangles , Bone-locks , Chokes इत्यादीच ट्रेनिंग सुरु झालं. हे ट्रेनिंग म्हणजे रोजचा नरक वाटायचा. एकेका डावाची ५००-५०० १०००-१००० वेळा प्रक्टिस करायची, मग समोर अपोनंट आहे असं “समजून” शाडो प्रक्टिस करायची, सायकलची ट्यूब एका ग्रील ला बांधून एका हाताने पुलिंग ची प्रक्टिस असे एक न अनेक प्रकार पुढचे ३६५ दिवस ५-१० वर्ष अविरत चालू होते.

दरम्यान मला माझं कोचिंग एव्हाना “खिची” सेन्से द्यायला लागले होते. पटवर्धन सेन्से जर संतापी म्हणलं तर “खिची” हे लिटरली टेरर होते. एकदा पुण्याला ओपन स्टेट स्पर्धात मी खेळता खेळता रेफ्री च्या खुर्ची वर पाठीकडून वेडावाकडा पडलो. पाठीला ईजा झाली. बाऊट सोडावी लागली. नंतर डॉक्टर ने १-२ महिने काही करू नको सांगितलं. अन एक दोन महिन्याच्या सुटीनंतर मी क्लास परत जॉईन केला. पण तोवर मनाने कच खाल्लेली होती. जनरल स्वभाव आहे माणसाचा. मी पाठीचं दुखणं Excuse म्हणून वापरायला लागलो. अन क्लास मधेच सराव करत असताना एकदा एका मुलीकडून पटकी खाल्ली. अर्थात ही मुलगी राष्ट्रीय स्पर्धा स्वर्णपदक विजेती होती. पण “मुलीकडून” पडलो याची लाज वाटून मी पाठीवर हात ठेवून , “पाठीमुळे” खेळता येत नाही अश्या अभिर्भावात दोजो एरिया बाहेर आलो.(दोजो – सरावाची जागा) . बाहेर आल्या आल्या खिचीनी मला बोलावलं. मी जवळ जाताच कस्सून खाडकन कानफटात मारली.. अन भयंकर आवाजात “XXड मे दम नही है तो खेलना बंद कर मादरxx. पर लडकी से हारने का झुठ का सबब मत दे. हारा है तो साला हारा है - ये मान. और अगर xड मे गुदा है तो ईस साल मेडल लाके मेरे मुह पे मार. !!” असं सगळ्यांसमोर झापडलं. मी ब्लू बेल्ट होतो. जुनियर मुलांसमोर असं होणं मनाला फार लागलं. या नंतर खिचीनी माझ्याकडून भरपूर सराव करून घेऊन मला माझ्या वेट क्लास मध्ये चांगलं खेळायला फार छान मार्गदर्शन केलं. नंतर याच खिचीनी मला मुलाप्रमाणे प्रेम लावून जे घडवलं त्याची कल्पना “डॉ श्रीहास” अन “योगीबाबा” ला चांगलीच आहे. त्यानी मला या सगळ्यांतून जाताना जवळून पाहिलंय .

======

मी जसजसा वरच्या वयोगटात जात होतो तसतसा मला सरावासाठी अपोनंट म्हणून १-२ च लोक अवेलेबल होते. मी जरी वयाने लहान होतो तरी कायम वरच्या वजनगटातच खेळायचो. कारण शरीराची भारदस्त ठेवण. (तेव्हा भारदस्तच होतो. आता जाड आहे हे वेगळं ). या अपोनंट च्या अभावामुळे मुळे सरावात अडचण यायला लागली. तेव्हा आमच्याच क्लास मध्ये एक सिनियर – राहुल जोगळेकर सुद्धा यायचे. ते त्या वेळेस कॉलेजात होते. अन अंतर राष्ट्रीय कुमार ज्युदो स्पर्धांमध्ये मेडलीस्ट होते. जबर गेम अन फिजीक होतं त्याचं. वजन साधारण ११० वगैरे अन मी होतो ७० च्या आसपास. खिची सेन्सेनी सांगितलं की आजपासून राहुल तुझा ट्रेनिंग पार्टनर . हे ऐकून मला जितका आनंद झाला तितकाच अंगावर काटा पण आला. इतक्या छान खेळाडू सोबत सराव करायला मिळणं हे खूप भारी होणार होतं पण वजनातला फरक खूप होता.

असो, आम्ही दोघं एकत्र सराव करायला लागलो. मला राहुल सेन्सेना उचलणं सोडा हलवण पण दुरापास्त व्हायचं . पण स्वत: राहुल सेन्से चा माझ्यावर ईतका विश्वास होता की त्यानी हळू हळू करत मला वेगवेगळी टेक्निक शिकवली अन ५-६ महिन्यात मी त्यांना सहज उचलू शकायला लागलो.

मग एकदा ते मला म्हणाले की आता सराव पुरे आपण रान्दोरी (सरावासाठी केलेली फाईट) खेळू. मला वाटलं की आता इतके दिवस सोबत सराव केल्याने मी त्यांना फार नाही तरी १-२ point मारू शकेन. पण झालं असं की १५ मिनिट झटून सुद्धा point दूर, त्यांना मी त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना मूव्ह सुद्धा करू शकत नव्हतो. हे खूपच धक्कादायक होतं. आमची रान्दोरी संपल्यावर दोजो बाहेर आलो. तर सेन्से मला म्हणाले... “काय केडी सेन्से ? जमतं का मला खेळायला ?” टोमणा मला बरोब्बर लागला होता.

इतके दिवस नुसती बैल मेहनत झाली होती. आता पाळी टेक्निक पॉलिश करायची होती. पुढील वर्षभर साधारण टेक्निक परफेक्ट करण्यात गेलं. त्याचा परिणाम गेम वर सुद्धा दिसू लागला.पण तो आनंद पण फार दिवस टिकला नाही.

एका ओपन स्टेट स्पर्धेत माझी फ़ाईट एका कुस्ती कम ज्युदो पटूशी लागली. मी उजव्या बाजूने खेळणारा तर तो डावखोरया ग्रीप चा. माझा सगळा सराव उजव्या बाजूचाच झाला होता. अन तो उलट ग्रीप ने खेळत असल्याने फ़ाईट संपायला १ मिन. असूनही एकही गुण मी घेऊ शकलो नव्हतो. शेवटी कसं तरी करून एक निसटता गुण मी चोरला अन जिंकलो. पण मनातून हललेलो होतो. माझी ताकद अन टेक्निक दोन्हीनी मार खाल्ला होता.

यासाठी परत “येरे माझ्या मागल्या” नियमाने सरावास सुरुवात झाली. आता सगळा गेम चेंज करून दोन्ही बाजूचं एक एक टेक्निक फाईन करणं गरजेचं होत. ईतकच नाही तर कुस्ती च्या व्यायामाची पद्धत शिकणं पण गरज होती. पण ते कसं करणार ? उत्तर एकच होतं .. आखाडा मारणे. म्हणून आता आमच्याच येथला डोंगरे वस्तादचा आखाडा मारायला सुरवात केली. तिथे परत पहिल्यापासून टेक्निक , ताकद यांची बाराखडी गीरवावी लागली. तिकडे माती पलटी मारणे , माती धम्मास करणे असे किती अन काय प्रकार नवनवे शिकायला मिळाले.

========

खरं पाहता ज्युदो हा वैयक्तिक क्रीडा प्रकार आहे पण टीम चं महत्व कसं असतं अन कुठे असतं हे बऱ्याच छोट्या छोट्या अनुभवातून शिकायला मिळालं. या टीम च्या भावनेतून जी जवळीक आमच्यात झाली .. ती कित्तेक वेळेस पूर्ण एनर्जी ड्रेन होऊन सुद्धा टीम ने चीयर केल्यातून रिचार्ज झाल्याचे कितीतरी किस्से सांगता येतील. Camaraderie या शब्दाचा खरा अर्थ मला या अन अश्या अनुभवांतून कळला होता.

एकदा एक किस्सा घडला. आमची “टीम ट्रेनिंग” चालू होती . त्यात सर्किट एक्सरसाईज नावाचा एक प्रकार होता. त्यात वेगवेगळ्या मूव , व्यायाम यांची खूप सारी रीपिटेशन जितकी शक्य तितक्या कमी वेळात करणं अपेक्षित होतं. हा सराव कडक थंडीत सकाळी ५-५:३० ला ओपन ग्राउंड वर व्हायचा. थंडीमुळे श्वास लागायचा अन Cardio – strong व्हायचं. तर करता करता मी खूप थकलो. कारण मी एकटा हेवी वेट वाला होतो अन बाकी हलक्या गटातल्या लोकांना match करणं मला अवघड जात होतं. म्हणून मी थांबलो , तर माझे कोच मला म्हणाले की थकलास ? मी म्हंटल हो सेन्से. अन अचानक अनपेक्षित गोष्ट कानावर आदळली ... कोच ने माझ्या बाकीच्या टीममेटना “आहे त्याच्या दुप्पट सर्किट करा” असं थंड आवाजात सांगितलं. जो पर्यंत हा हीच सर्किट तुमच्याच ईतक्या वेळात करून दाखवत नाही तोवर तुम्ही रोज ही सर्किट २ वेळा करायची. हे ऐकायला वाचायला खूप सोपं वाटत असेल पण त्या थंडीत सुद्धा मला हे ऐकून कान गरम झाल्याची जाणीव आजही आठवते. माझ्यामुळे माझ्या टीमला रोज त्रास सहन करावा लागणार होता. इतकंच नाही तर मी जसजशी पुढील टेक्निक शिकत होतो तसतसा माझा तापट स्वभाव कमी होऊन एखाद्या गोष्टीवर वेगळ्या बाजूने विचार करण्याची वृती वाढत चालली होती. शाळा-कॉलेज मधेही मारमारी चा प्रसंग आल्यास ते टाळण्याचा विचारच आधी मनात असायचा. खरं तर हे कोणी शिकवत नव्हत. पण खेळ शिकण्याची पद्धत, त्याची मांडणी, तो आत्मसात करण्यासाठी शिकवण्यात येणारी मानसिक बैठक याच सगळ्यांचा तो साईड एफेकट होता हे नंतर मी स्वत: कोच म्हणून शिकवायला लागल्यावर मला कळलं.

अश्या अनेक छोट्या छोट्या अनुभवांतून फक्त खेळच नाही तर जीवनोपयोगी कितीतरी गोष्टी मी माझ्या अजाणतेपणी शिकत होतो.

“Never Give Up” हे सूत्र खिचीनी त्यांच्या शिकवणीतून अंगी बाणवायला इतकी मदत केली की ज्याचं नाव ते. अशी मजल दरमजल करता करता एव्हाना मी ३०-३५ स्टेट championships , ५ राष्ट्रीय स्पर्धा , कितीतरी अन्तरशालेय स्पर्धा खेळलो होतो. मात्र या सगळ्यात अनेक जखमा , Fractures अन Sprained Ligament ची सुद्धा भर पडत होती. एव्हाना माझा डावा गुडघा मला फार त्रास देत होता. कारण एका सामन्यात पायाच्या विरुद्ध बाजूने अपोनंट पायावर पडल्याने गुडघ्याची वाटी त्रासली होती अन लिगामेंट “Beyond Repair” आहेत असं फ़िजीओ ने सांगितलं. बरेच दिवस पायात सतत Hinged Knee Cap वापरावी लागली होती. हे सगळं खिचीनी पहिलं अन मला एकच वाक्य बोलले. तुला मी जास्त ओळखतो का फिजीओ ? या एका प्रश्नात मला सगळं म्हणणं कळलं होत.

नंतर २ वर्षं मी नेट लाऊन वेगवेगळे व्यायाम करून परत बिना Knee Cap चा वावरू लागलो.

इतकच काय “डॉ श्रीहास” सोबत सायकलिंग चा नाद सुद्धा केला काहीकाळ. अन मला वाटलं नव्हतं पण गुडघा दुखरा असूनही ७५ किमी नेटाने पूर्ण केले होते १ महिन्यापेक्षा कमी सरावात. ईथेच, मला ज्युदो ने खरंच काय दिलंय याची प्रकर्षाने जाणीव झाली.

पुढे, २००२-०३ च्या दरम्यान मला खिचीनी Black Belt च्या परीक्षेला बसायला सांगितलं. ईतकच नाही तर ते स्वत: माझ्या सोबत त्यांच्या पुढील परीक्षे साठी बसले. याला म्हणतात जीव लावणं. आम्ही दोघेही परीक्षा पास झालो. माझं उराशी बाळगलेल एक स्वप्न ... खरंतर दिवा-स्वप्न पूर्ण झालं होतं. मला दान-१ Black Belt मिळाला होता. १९९३-२००२... एक मोठा प्रवास घडलेला होता. अजूनही चालूच होता.

======

या दरम्यान खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. अन आता त्या पुढील मुलांना शिकवायच्या होत्या. त्यामुळे मग नंतर मी माझं उच्च शिक्षण होईपर्यंत जुदो कोचिंग पण केलं. पटवर्धन-खिची-जोगळेकर या त्रिमुर्ती सेन्से लोकांनी मला घडवलं तसं ईतरांना घडवायचा एक प्रयत्न होता. तो शक्य तितका यशस्वी पण केला.

खेळ खेळण हे सोप्प वाटावं ईतक कोचिंग करणं अवघड आहे हे मला त्या दरम्यान लक्षात आलं. आपण खेळत असतो तेव्हा आपल्याला फक्त आपल्यापुरता , आपल्या गेम पुरता विचार करायचा असतो. पण कोचिंग मध्ये आपल्या विद्यार्थ्याचं फिजीक , फ्लेक्सीबिलीटी , ताकद ,सायकोलोजी सगळ्याचाच विचार करून शिकवावं लागतं. ईतकच नाही तर त्यांना झालेल्या ईजा त्याचं management सगळ्याचाच विचार करावा लागतो. बरं हे एकासाठी नाही , सगळ्या मुलांसाठी. पण मला लाभलेले सेन्से लोक यांनी दिलेले अनुभव इथे सुद्धा खूप कामाला येत होते.

पुढे मला एका राष्टीय स्पर्धा चाचणी दरम्यान त्याच गुडघ्याला ईजा झाली. अन सरते शेवटी थांबायचा अवघड असा निर्णय ... नाईलाजाने घेतला. घ्यावा लागला.

पण .. येथे “फक्त मी” थांबलो होतो. ज्युदो थांबलं नव्हत. कारण ज्युदो हा फक्त खेळ नाहीये. ज्युदो हा जीवन जगण्याचा मार्ग आहे माझ्यासाठी. आजही बऱ्याच वेळेस जेव्हा काही गोष्टी घडतात तेव्हा “माझ्या आयुष्यात जुदो आलं नसतं तर ?” असा प्रश्न पडतो .. अन तिथेच ज्युदो बद्दलचा आदर द्विगुणीत होतो.

गम्मत म्हणजे कठीण व्यायामप्रकार अन सराव सोडूनही आता मला १० वर्ष होत आलीयेत मात्र जेव्हा कधी “मानसिक किंवा शारीरिक” चिवटपणाचा कस लागायची पाळी येते तेव्हा “ज्युदो” कायम माझ्या मदतीला आलंय अन येत राहील हा विश्वास मला आहे.

या खेळाने मला आत्मविश्वास , प्लानिंग , आशावाद , चिवटपणा , मनाची शांत राहण्याची क्षमता अन आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळी नजर दिली. ती वेगळी का आहे? हे जरी मी सांगू शकत नसलो तरी तिचं अस्तित्व माझ्या लेखी नक्की आहे.

आपल्यातल्या प्रत्येकाने आपापल्या मुलांना किवा घरातील छोट्या-लहानांना एखादा तरी खेळ शिकायला प्रेरित करायलाच हवं असं मला वाटत ...

कारण खेळासारखा दुसरा मित्र, गुरु, मेंटर लाभणं यासारखी छान गोष्ट विरळाच असू शकते... अन खेळ खेळणं जरी थांबलं तरी हा मित्र शेवटा पर्यंत आपला हात सोडत नाही हा दुर्दम्य आत्मविश्वास अनुभवाने नक्कीच खरा आहे हे मी ठामपणे सांगू शकतो.

तर ... लोकहो ...

ओनेगाय्शीमास्सू ...
-ज्युदोका - ज्याक ऑफ ऑल .

ओनेगाय्शीमास्सू – खेळ किंवा एखादी गोष्ट सुरु करण्या पूर्वीचं जपानी अभिवादन.
ज्युदोका – ज्युदो खेळणारा/री

क्रीडाअनुभवआरोग्य

प्रतिक्रिया

नितीन पाठक's picture

1 Sep 2017 - 5:53 pm | नितीन पाठक

बरेच कष्ट घेतले आहे ब्लैक बेल्ट घेण्यासाठी.
मस्त आनी सुरेख लिखाण ........

पिलीयन रायडर's picture

1 Sep 2017 - 6:18 pm | पिलीयन रायडर

लेख अत्यंत आवडला. आयुष्यात एक तरी मैदानी खेळ यायलाच हवा. तो शिकताना माणूस कसा घडत जातो हे तुमच्या लेखात फार छान मांडले आहे.

माझा मुलगा जरा बारीक चणीचा आहे. त्याला अशा एखाद्या खेळात टाकावे असं मला फार वाटतं पण पोराचा निभाव लागेल का ही भीती सुद्धा आहे.

माझा मुलगा जरा बारीक चणीचा आहे. त्याला अशा एखाद्या खेळात टाकावे असं मला फार वाटतं पण पोराचा निभाव लागेल का ही भीती सुद्धा आहे.

माझ्यामते आत्ता लगेच नाही.. पण पुढे (वय वर्षे १५ ते १७ नंतर) अशा खेळात नक्की भाग घेऊदे. मात्र १५ व्या वर्षापर्यंत काटक होण्यासाठी कांही ना कांही खेळ / व्यायाम सुरू ठेवणे आवश्यक आहे. त्याची गोडी एकदा लागली की नंतर असे अवजड खेळ खेळताना एक प्रकारची सहजता येईल.

आता इथे स्वानुभव सांगतो - माझा शाळकरी वयात लैच व्यायाम झाला. कोकणातली टेकडीवरची शाळा. रोज चार किमी चालत जायचे आणि टेकडी चढून शाळेत प्रवेश. नंतर घरी परतताना चार किमी चालणे. याचा फायदा असा झाला की सायकल पहिल्यांदा हातात घेतली तेंव्हा न दमता सलग २५ किमी मारले. तसेच गेल्या सहा सात महिन्यांपासून अत्यंत अनियमीत सायकलिंग असले तरी कोणताही त्रास न होता एकदा ६० किमी आणि मागच्या आठवड्यात पुणे-महाबळेश्वर १०० किमी केले. हे सगळे क्रेडीट त्या कोकणातल्या शाळेला. :)

बाकी तज्ञ लोक सांगतीलच..!!

नाकतोडा's picture

1 Sep 2017 - 8:25 pm | नाकतोडा

चणीचा फारसा संबंध नाही.
उलट खेळ खेळायला लागल्यावर चण आपोआपच सुधारेल. मी स्वतः १०वी पर्यंत ज्याक च्या निम्मा होतो .. सर्व बाजुंनी. तसा आजही आहे पण उंची(भौतिक) वगळुन.

Nitin Palkar's picture

1 Sep 2017 - 6:19 pm | Nitin Palkar

जॅक ऑफ ऑल यू आर मास्टर ऑफ लाईफ आहात....

एस's picture

1 Sep 2017 - 7:19 pm | एस

लेख खूप आवडला.

नाकतोडा's picture

1 Sep 2017 - 8:16 pm | नाकतोडा

मस्तं झालाय लेख. भरपुर खेळ खेळलो तरी खेळाचं असं अभ्यासपूर्ण विष्लेशण डोक्यातही झालं नव्हतं, मांडणीतर लांबच राहिली. इतक्या दिवसाची ओळख असली तरी हा अँगल आजच कळाला म्हणुन शेवटी मिपा सभासद होउन प्रतिसाद दिला (दात काढणारा इमोजी).

mayu4u's picture

1 Sep 2017 - 8:17 pm | mayu4u

... आणि तेवढेच सुंदर लेखन!

अरिंजय's picture

1 Sep 2017 - 8:53 pm | अरिंजय

ज्याकभाऊ, मस्त लेख लिहिलाय. तुम्ही भरपुर मेहनत घेतलेली आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचं ध्येय मिळवलंत. हे खरंच शिकण्यासारखं आहे. अंगी बाणवणार.

झेन's picture

2 Sep 2017 - 4:32 pm | झेन

खेळण्यातली जिद्द, शिस्त लिखाणातपण रिफ्लेक्ट झाली आहे. सुरेख ओघवत्या शैलीत मस्त लिवलय राव तूम्ही.

शैलेन्द्र's picture

1 Sep 2017 - 8:57 pm | शैलेन्द्र

जबराट लेख

नंतर सविस्तर लिहितोय

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Sep 2017 - 11:13 pm | माम्लेदारचा पन्खा

अफाट मेहनत घेतली आहे हे जाणवलं . . . . . . बेल्ट सोपा नसतोच . . . . सलाम !

भ ट क्या खे ड वा ला's picture

2 Sep 2017 - 8:50 am | भ ट क्या खे ड वा ला

खूपच आवडला लेख.
तुमच्या मेहनतीला , चिवटपणाला दंडवत ..

जेम्स वांड's picture

2 Sep 2017 - 9:04 am | जेम्स वांड

लहानपणी घराजवळ एका मोठ्या हॉल मधून 'क्या के क्या के' असे आवाज ऐकायला यायचे, पण आत काही जाता आले नाही, ज्यूदो मध्ये पण असे तोंडाने आवाज काढतात का? काय प्रयोजन असतं ते आवाज काढायचं?

व्यायाम गाथा लिहायला काय करावं लागेल? (व्यायाम करतोय/केलाय, ते अनुभव प्रकाशित करायला काय करावं लागेल असे विचारतो आहे)

व्यायाम गाथा लिहायला काय करावं लागेल?

व्यायाम गाथा लिहून प्रशांत, डॉ श्रीहास किंवा मला व्यनी करा.

स्पा's picture

2 Sep 2017 - 9:13 am | स्पा

जबरदस्त

धन्यवाद. मागील काही दिवस आळशी झालो होतो. या शुक्र-शनी-रवी ११५ किमी सायकलिंग आणि २ तास इंटर्वल ट्रेनिंग/कार्डिओ ट्रेनिंग एकूण.

देशपांडेमामा's picture

4 Sep 2017 - 12:06 pm | देशपांडेमामा

अतिशय खडतर आणि जिद्दीचा प्रवास तुम्ही सहज सोप्या भाषेत सांगीतलाय. ज्युडो बद्द्लची तुमची मनापासुनची आवड वाक्यावाक्यातुन अधोरेखित होतेय

देश

छान.. तुमचा सगळा प्रवास आणि लेखनही मस्तच!
आमच्या वर्गात एक आणि एकंदरीत शाळेत बरेच ज्युदोपटू होते - त्यातले काही राष्ट्रीय स्तरावरही खेळत होते. मी स्वतः कधी खेळले नसले तरी ज्युदोबद्दल बर्‍यापैकी कुतूहल असल्याने बरीच माहिती मिळवली होती. त्यामुळे हा लेख जास्तच आवडला.

इरसाल's picture

8 Sep 2017 - 3:52 pm | इरसाल

जवळचं असं काही वाचायला मिळाल्याबद्दल आनंद झाला.

(तीन वर्ष शोतो-कान शिकुन ब्राऊन-३ पर्यंत जावुन थांबलेला- इरसाल)

अरे व्वा... हे माहिती नव्हते.

तेजस आठवले's picture

22 Sep 2017 - 6:04 pm | तेजस आठवले

छान लेख. तुमच्या कष्टाचे कौतुक आहे. मानसिक कणखरता कशी वाढीस लागली त्यासंबंधी उदाहरणे दिलीत तर वाचायला आवडतील.
मला आळश्याला सगळे वाचूनच दम लागला :)

अनिल मोरे's picture

24 Sep 2017 - 5:57 pm | अनिल मोरे

नुकतीच सातारा हाफ मँराथाँन पूर्ण केली.
Congratulations ANIL MORE (BIB : 20116), You have successfully completed PNB Metlife Satara Hill Half Marathon 2017 with a net time of '1:54:13 for Half Marathon - Results by rpsports.co.in.

मोदक's picture

25 Sep 2017 - 9:48 am | मोदक

अभिनंदन..!!!

अनिल मोरे's picture

25 Sep 2017 - 9:18 pm | अनिल मोरे

धन्यवाद!!!

कसला भारी टायमिंग आहे. अभिनंदन.
तुम्हीच लिहा आता ऑक्टोबर चा लेख..

विंजिनेर's picture

4 Oct 2017 - 8:06 am | विंजिनेर

ऑक्टोबरचा भाग कधी येणार?