रत्न, खडे, गंडे हे प्लासिबो आहेत काय ?

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
11 Oct 2008 - 10:30 am
गाभा: 

लिखाळ या ठिकाणी म्हणतात"
ज्योतिषाकडे गेले असता तोडगे ऐकण्याची अनेकांची ईच्छा असते. त्याशिवाय लोकांना चैन नसते. चार महिन्याने दिवस बदलतील असे म्हटले तर समाधान होत नाही. सोळा सोमवार करा, दिवस बदलतील, भाग्य उजळेल हा उपाय मात्र भारी वाटतो. रत्न, खडे, गंडे हे सुद्धा असेच प्लासिबो आहेत की काय असे मला वाटते. "
लिखाळ साहेबांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आणि उत्तर ही दिले आहे. त्याची दखल आम्ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वीत घेतली आहेच. पुस्तकातील खालिल "उतारा" आपल्या गंडा (धागा) दो-याशी निगडीत आहे. "गंडा घालणे" हा शब्दप्रयोग त्यावरुनच आला असावा.

ग्रहांचे खडे वापरल्याने अनिष्ट प्रभाव कमी करता येतात का?
ग्रहांच्या खड्यांना रत्ने असा गोंडस शब्द वापरतात. एखाद्याच्या पत्रिकेत एखादा ग्रह बलहीन असेल तर त्याचे रत्न वापरून त्याचे बल वाढवणे हा एक प्रकार किंवा सर्वात बलवान ग्रहाचे रत्न वापरून त्याच्या गुणात अधिक भर घालणे हा दुसरा प्रकार. अशा प्रकारचे तर्क लढवून या रत्नांची शिफारस केली जाते. चुकीच्या शिफारसीमुळे फायदा होण्याऐवजी तोटा पण होतो ही अजून एक भीती निर्माण केली जाते. कॉस्मिक रेडिएशन, ग्रहांपासून निर्माण होणारी व्हायब्रेशन्स,कलर स्त्रोत असे वैज्ञानिक मुलामा असणारे शब्द वापरून त्याला एक प्रतिष्ठा दिली जाते. त्यामुळे रत्नातून जणु काही रेडिओ ऎक्टीव्ह किरणे बाहेर पडत असतात असं काहीतरी चित्र सामान्य माणसाच्या मनात तयार होतं.
खरं तर तो मानसोपचाराचा एक प्रकार आहे. खडे वापरल्यामुळे अनिष्ट प्रभाव कमी झाले की नाही हे ठरवायचे कसे ? खडा वापरला नसता तर काय झाले असते असा प्रयोग करून पहाणे अशक्य आहे. खड्यांच्या परिणामांना विज्ञानाचा दिखाऊ मुलामा जो दिला जातो तो गैर आहे. कसे ते पहा. ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे की राहू हा एक मानीव बिंदू आहे. त्याच्यापासून कसलेही किरण निघणे अशक्य आहे. मग राहूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी लसण्या खडा वापरण्याने त्यातून कोणते किरण तुमच्यावर पडणार किंवा कोणते किरण त्यात अडवून धरले जाणार ? अमुक रंगाच्या खड्यातून अमुक किरण परावर्तित होतात हे म्हणणे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण ते अनिष्ट किरण त्या खड्यात अडवून कसे धरले जातात हे समजत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खडयावर ग्रहांचे जे काही किरण पडतात ते फक्त ग्रह डोक्यावरच्या आकाशात असतांनाच पडतात, ग्रह मावळून पृथ्वीच्या खाली गेल्यावर त्याचे किरण इथे कसे पोचणार ? मग तशा वेळी खड्याचा काय उपयोग ? बरे, ग्रह डोक्यावरच्या आकाशात असतांना त्याचे किरण थेट आपल्यावर पडत असतातच ना? मग त्या वेळी त्या चिमुकल्या खड्यावर पडणारे किरण आणखी काय जास्त परिणाम करणार ? एकूण काय तर वैज्ञानिक कारणे दाखवून खडे वापरणे हे वेडगळपणचे आहे. हौस म्हणून खुशाल वापरावेत. खडे प्रकाश-किरण आकर्षित करतात ही कल्पना साफ खोटी आहे. खडे एवढेच काम करतात की पडलेले प्रकाश-किरण परावर्तित करतात. त्यांना पाडलेल्या पैलूमुळे प्रकाशाचे परावर्तन खूप चांगले होते, त्यामुळे ते चमकतात. पूर्ण अंधारात हिरासुद्धा चमकणार नाही हे लक्षात घ्यावे. रत्ने हा पूर्णपणे दागदागिने, सौंदर्यप्रसाधने या प्रांताचा भाग आहे. आणखी एक अशीच वैज्ञानिक मुलामा असलेली पण लुच्चेगिरीची मांडणी म्हणजे ''ग्रहांपासून निर्माण होणारी रेडिएशन्स ही नेहमीच ऋण भाराची असतात व रत्नांची जी शक्ती असते ती नेहमीच धन भाराची असते त्यामुळे ग्रहांपासून निघणारी व्हायब्रेशन्स रत्नांपर्यंत पोहोचताच 'न्यूट्रलाईज` होतात.`` सगळया थापा!
तुम्हाला बडोद्याच्या पटवर्धनांचा बोलका पत्थरविषयी माहिती असेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याविरूद्ध जोरदार मोहीम उघडली होती. वीस पैशाचा अॅगेटचा खडा ते 'बोलका पत्थर` म्हणून वीस रूपयांना विकत. त्यांचा दावे असे असतात :-
" बोलका पत्थर हे अॅस्टॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिटयूटचे अनमोल संशोधन आहे. खडयातून दैवी किरण बाहेर पडतात त्यामुळे माणूस तणावमुक्त होतो. हे एक संरक्षण कवच असून अनिष्ट ग्रहांपासून तुमचे रक्षण करते. हा जन्मराशीवर आधारित असल्याने आयुष्यभर वापरता येतो. खड्याचे गुण न आल्यास पैसे परत. " त्यामुळे येथे फसवणूक होत नाही असे लोकांना वाटते. आता यात गोम अशी आहे की, गुण न आल्यास पैसे परत मागायचे ते खडा घेतल्यापासून ३० ते ४५ दिवसाच्या आत. पण हे कसे शक्य आहे ? कोर्टकचेरीतले काम, जुनाट रोग, परिक्षेचा निकाल, संतती-प्राप्ती या गोष्टीं काही ४०-४५ दिवसाच्या आत होत नाहीत. बरे, पैसे परत मागायचेच झाल्यास बडोद्याच्या ऑफीसला व्हीपी पाठवून पैसे परत घेण्याचा खर्च व्हायचा सात रुपये. " आता खडा घेतलाच आहे वापरून बघू काही दिवस " असे माणसाला वाटते. ( मी स्वतः वापरला आहे पण तो किस्सा नंतर) अशा अनेक कारणामुळे सहसा कुणी पैसे परत मागत नाहीत. पण हा काही खडा लाभल्याचा पुरावा नव्हे. खडयांच्या वापराला काही ज्योतिषांचाही विरोध होता. त्यांच्या मते असंख्य माणसे एकाच राशीची असतात सगळयांच्या अडचणीवर एकच उतारा कसा असेल? त्यामुळे राशीवरून खडा कोणचा वापरावा ते ठरवणे ही चुकीची व अत्यंत ढोबळ पद्धत आहे असे ते म्हणत. या खडे व्यापाऱ्यांची महत्वाची अट अशी की रत्ने वापरणाऱ्याची त्यावर श्रद्धा असायला पाहिजे नाही तर रत्नांचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला रत्नामुळे फायदा झाला नाही तर तुमची श्रद्धा कमी पडली असे समजून स्वस्थ बसावे ! रत्नांचा खरा फायदा कुणाला होत असेल तर तो रत्ने विकणाऱ्यांना होतो !
कुणी तरी तिकड कुजबुजतय " लोकांना बर वाटतं तर यांच काय जात ? उगाच आपल काही तरी काडी टाकायची ! कशाला बाबा आमच्या पोटावर पाय देतो. गप्प बसायचं काय घेशील? अरे बाबा लोकांना फसुन घेण्यात आनंद मिळतो तर तुझ काय जातं? तु बी ये आमच्यात तुला पुन्याचा वाटा देतो. आत्ता तुला काय भेटत? फुकाट केलं कि त्याच मोल नसतय लोकान्ला! लोक काय तुझे पुतळे उभे करनार हायेत का? अरे आमच्यात ये खोर्‍याने पैशे वढशील ! प्रबोधन गेलं गाढवाच्या ***"

प्रतिक्रिया

छोटुली's picture

11 Oct 2008 - 12:04 pm | छोटुली

रत्नांचा खरा फायदा कुणाला होत असेल तर तो रत्ने विकणाऱ्यांना होतो ! :?

हे लक्षात घेणे आवश्यक आहे.हल्ली आंतरजालावर देखिल अशा रत्नांचे "BID"चालू असते.
विशेष म्हणजे सुशिक्षित लोक ह्या फॅडचे चाहते बनले आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Oct 2008 - 12:41 pm | प्रकाश घाटपांडे


विशेष म्हणजे सुशिक्षित लोक ह्या फॅडचे चाहते बनले आहेत.


कारण ही चैन त्यांनाच परवडते. :))
प्रकाश घाटपांडे

अवलिया's picture

11 Oct 2008 - 3:41 pm | अवलिया

खरं तर तो मानसोपचाराचा एक प्रकार आहे.

मन करा रे प्रसन्न ...

(प्रसन्न) नाना

लिखाळ's picture

11 Oct 2008 - 5:03 pm | लिखाळ

रत्ने-दोरे यावर लक्ष वेधण्यासाठी ही चर्चा चालू केलीत हे बरे झाले.
आपल्या खिशात देवाचा अंगारा ठेवणे, फोटो ठेवणे हे सगळे आपल्या सोबत देवाचे आशिर्वाद आहेत हे स्वतःला पटवून देण्यासाठीच असते असे वाटते. देव असेल आणि आपण त्याचे लाडके असू तर तो 'जिथे जातो तेथे माझ्या सांगाती' असणारच. या स्थूल वस्तूंवर उर्जा-रेडिएशन असे आरोप करणे हा जोडलेला (ऍडिशनल) प्लासिबो :)
--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 8:40 am | विसोबा खेचर

च्यामारी कुठली रत्न वापरा, वा वापरू नका, ग्रहाच्या आंगठ्या घाला वा घालू नका, पत्रिका पहा वा पाहू नका, जे भोग वाट्याला यायचे असतात ते येतातच आणि ते भोगल्याशिवाय या जगातून जाता येत नाही....

आम्ही फक्त नियतीला मानतो.. तिला साला कुणीच हरवू शकत नाही, तिचा घाला कुणीच चुकवू शकत नाही..!

आपला,
(नियतीच्या पुढे सगळे खडे अन् सगळी रत्न निष्प्रभ आहेत यावर ठाम विश्वास असणारा) तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Oct 2008 - 9:04 am | प्रकाश घाटपांडे

आम्ही फक्त नियतीला मानतो.. तिला साला कुणीच हरवू शकत नाही, तिचा घाला कुणीच चुकवू शकत नाही..!

आमचे गुरु व मित्र कठोर फलज्योतिष चिकित्सक कै माधव रिसबुड हेच वेगळ्या भाषेत म्हणत. ते म्हणत," मानवी जीवनातील घटनांचे प्रेरकत्व कुणाचे - नियतीचे? पुर्वसंचिताचे ? ग्रहांचे? की माणसाचे स्वतःचे? माझे ठाम उत्तर आहे- 'नियतीचे'"
प्रकाश घाटपांडे

अभिजीत's picture

12 Oct 2008 - 9:08 am | अभिजीत

मानवी मनात असलेली असुरक्षितता अशा प्रकारांना खतपाणी घालते असे मला वाटते. जगाचे चलनवलन हा एक 'एन्-पी प्रोब्लेम' आहे (संगण़क/गणित विषयाचे जाणकारांसाठी), ज्यात मानवी तर्काच्या (जो भावना, संबंध, आजुबाजुची परिस्थिती आणि व्यक्तिमत्व यावर अवलंबून असते) कक्षेबाहेरील व्हेरिएबल्सच कार्यरत असतात. पण मानवी मन यावर ताबा मिळवण्यासाठी अशाच अतार्किक शस्रांचा वापर करण्यास उद्द्युक्त होते.
अर्थात, यावर एक संपूर्ण अर्थव्यवस्था मात्र पूर्ण तार्किकतेवर उभी आहे हे सांगणे न लगे. ;) (घरून जोडे पडणार हे नक्की :) )

असो.
आपल्या एकूण मतांशी सहमत.

- अभिजीत

प्रकाश घाटपांडे's picture

12 Oct 2008 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे

अर्थात, यावर एक संपूर्ण अर्थव्यवस्था मात्र पूर्ण तार्किकतेवर उभी आहे हे सांगणे न लगे.

म्हणुन तर आम्हाला कुजबुज ऐकू येते. तुम्हाला पण आली असेल
प्रकाश घाटपांडे

यशोधरा's picture

12 Oct 2008 - 11:05 am | यशोधरा

आवडला लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2008 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाटपांडे साहेब, काथ्याकुटाचा विषय आवडला.
खड्या-बिड्याचं लोकांचे वेड कमी व्हावे, असे प्रामाणिकपणे वाटते.

विजुभाऊ's picture

13 Oct 2008 - 10:20 am | विजुभाऊ

खडे / ताईत दोर एहे प्लासीबो आहेत.
प्लासीबो एफेक्ट मुळे एखाद्याची प्रगती होत असेल एखाद्याचा आत्मविष्वास वाढत असेल तर हरक्त का घ्यावी.
श्रद्धा हीच एक मोठे प्लासीबो आहे.
म्हणुन कोणी स्वतःवर सुद्धा श्रद्धा ठेवु नये का?
खडे ताईत दोरे हे सगळे फालतु आहेत . आणखी एक अशीच वैज्ञानिक मुलामा असलेली पण लुच्चेगिरीची मांडणी म्हणजे ''ग्रहांपासून निर्माण होणारी रेडिएशन्स ही नेहमीच ऋण भाराची असतात व रत्नांची जी शक्ती असते ती नेहमीच धन भाराची असते त्यामुळे ग्रहांपासून निघणारी व्हायब्रेशन्स रत्नांपर्यंत पोहोचताच 'न्यूट्रलाईज` होतात.`` सगळया थापा!

मंदीरे ही कॉस्मीक किरणे शोषुन घेतात म्हणून ती उर्जेची केंद्रे आहेत. ही देखील भोळ्या लोकाना फसविण्याची नवी शास्त्रीय युक्ती.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Oct 2008 - 2:41 pm | प्रकाश घाटपांडे

श्रद्धा हीच एक मोठे प्लासीबो आहे.
म्हणुन कोणी स्वतःवर सुद्धा श्रद्धा ठेवु नये का?

ही सकारात्मक श्रद्धा आहे. ती माणसाला बळ देते. फक्त तारतम्य बाळगावे. ते सापेक्ष आहे.
प्रकाश घाटपांडे

भडकमकर मास्तर's picture

14 Oct 2008 - 1:50 am | भडकमकर मास्तर

मी स्वतः कोणताही दागिना / अंगठ्या . गळ्यात चेन वगैरे वापरत नाही...
चमकदार रंगीबेरंगी खडे अंमळ मजेशीर दिसतात. ...... विविध अंगठ्या / दोरे / साखळ्या वापरणारी हौशी मंडळी मोठी गंमतशीर वाटतात...
बाकी आपल्याला त्यातलं काही कळत नाही...
पण घाटपांडे काका मात्र खूप जणांचा धंदा बुडवताहेत , इतकं खरं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

काही दिवसांपूर्वी आमच्या होम मिनिस्टर, ऑफिस मध्ये असेच एका खडा विक्रेत्याचा चमत्कार पाहून आल्या आहेत, त्या माणसाने खालील चमत्कार करून दाखवले.
१) त्याच्याकडे बरेचसे खडे होते. त्यातला प्रत्येक खडा तो एका भांड्यात घेऊन ते भांडे तो ज्या व्यक्तीला खडा घ्याचा आहे त्याच्या हातात द्यायचा. मग एका काठीने माही मंत्र म्हणून ती काठी त्या भांड्याभोवती फिरवायचा. हि टेस्ट प्रत्येक खाद्यासोबत करयाची.
एक खडा टेस्ट करताना काठी फिरवल्यानंतर लगेचच तो खडा त्या भांड्यात उड्या मारायला लागला. हा खडा आपल्याला उपयुक्त आहे. आसे सांगून मग त्याने तो खडा भांडे हातात धरणाऱ्या माणसाला विकला
२) एक खडा त्याने आपल्या हातात घेतला. एक मुलीचा केस त्याने त्या खाड्याभोवती गुंडाळला. आणि लायटर ने तो केस पेटवला. केस जळला.
हीच प्रोसेस त्याने दुसरा खडा वापरून केली. पण त्यावेळी तो केस जळला नाही.
"बघा हा खडा तुमच्या केसाला इतके संरक्षण देतो. तर विचार करा तुम्हाला किती संरक्षण देईल " असा डायलॉग मारून त्याने तो खडा विकला.

असे दोन चमत्कार (??? ) पाहिल्यानंतर मिसेस आता मागे लागलीये.. कि मला पण त्या व्यक्तीकडून खडा विकत घ्यायचाय. व्यक्तीशः मी असल्या थिल्लर गोष्टींना मानत नाही. त्यामुळे अनेक वेळा समजावून पण हा हट्ट थांबत नाहीये, मी एवढे देखील म्हणालो. कि खरच त्या माणसाला एवढे ज्ञान असते तर तो असा खडे विकत फिरत कशाला बसला असता?. पैसा मिळवण्याचा एखादा खडा स्वतः घालून गर्भश्रीमंत झाला नसत का ? आणि असे खडे जर आपले संरक्षण करत असते तर रोज हजारो अपघात झाले नसते. .
पण आजूनही त्या चमत्काराच्या हंगओवर मधून ती बाहेर येत नाहीये, तिच्या ऑफिस मधल्या अनेक लोकांनी त्या खडा विक्रेत्याकडून खडे विकत घेतलेत. त्यामुळे आपण पण घेऊन पाहू. असे तिला वाटतेय.

अश्या ट्रिक वापरून त्या व्यक्तीने एका दिवसात हजारो रुपयांचा गल्ला जमवला.
अश्या घटना थांबणे गरजेचे आहे.,या असल्या फालतू ट्रिक मागचे विज्ञान कोणी सांगेल का.? जालावर शोधण्याचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही.