नमस्कार मंडळी,
मतमोजणीपूर्व या दुसर्या धाग्यात पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांविषयी भाष्य करणार आहे. याबरोबरच मणीपूर या पूर्वोत्तर भारतातील राज्यातही विधानसभा निवडणुक होत आहे. पण या राज्याच्या राजकारणाविषयी भाष्य करण्याइतकी माहिती मला नाही. त्या राज्याचे मुख्यमंत्री कोण, कोणत्या पक्षाचे हे पण मला माहित नाही. कधीकधी आपण पूर्वोत्तर भारतात फार रस घेत नाही आणि त्यातूनच त्या भागातील लोक दुरावले जातात. कळत नकळत माझ्यासारख्याकडूनही तेच होते आणि त्याचे वाईटही वाटते. प्रत्येक वेळी ठरवितो की यापुढे असे करायचे नाही-- इतर सगळ्या राज्यांप्रमाणे उत्तरपूर्वेतील या राज्यांचीही माहिती घ्यायची. पण अजून तरी ते करणे शक्य झालेले नाही. ती माझी मर्यादा आहेच. असो.
पंजाब
गेल्या काही निवडणुकांमध्ये पंजाबमधील परिस्थिती बघू.

वरील तक्त्यावरून समजते की अकाली दल-भाजप युतीने गेल्या काही निवडणुकांमध्ये काहीही झाले तरी ३५% मते राखली आहेत. याचे कारण आतापर्यंत अकाली-भाजप युतीचे मतदार एकमेकांना पुरक होते. ग्रामीण भागातील शीख अकाली दलाचे तर शहरी भागातील हिंदू भाजपचे पारंपारीक मतदार राहिले आहेत. आणि या दोन 'व्होटबँक' एकमेकांना पुरक होत्या. त्यामानाने भाजपची व्होटबँक तितक्या प्रमाणावर बळकट नाही. अकाली दलाचा पराभव होईल असे चित्र उभे राहिले तर शहरी भागातील हिंदू मतदार काँग्रेसकडे वळतात असे आतापर्यंतचे चित्र आहे. १९९९ च्या लोकसभा आणि २००२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे चित्र बघायला मिळाले आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजपचा मोठा पराभव होऊ शकतो पण अकाली दलाचे मतदार मात्र अकाली दलाच्या पाठिशी त्यामानाने भक्कमपणे उभे राहिले आहेत.
२०१४ मध्ये आआपच्या प्रवेशामुळे पंजाबमधील चित्र तिरंगी झाले. या तिरंगी लढतीत आआपला सगळ्यात कमी (२४.५%) मते मिळाली. खरे तर तिरंगी लढतीत क्रिटिकल मास यायला आणि बर्यापैकी जागा मिळवायला २४.५% हा आकडा थोडासा कमी आहे. तो ३-४% जास्त असला तर त्या पक्षाला बर्यापैकी जागा मिळू शकतात. पण तरीही आआपला बर्यापैकी जागा मिळाल्या. याचे कारण आआपची मते माळवा भागात एकवटली होती. हे पुढील नकाशावरून स्पष्ट होऊ शकेलः

(आंतरजालावरून साभार)
पंजाब राज्याचे तीन भौगोलिक विभाग आहेत--- माळवा, माझा आणि दोआब. आआपने जिंकलेल्या सर्व जागा पतियाळा, संगरूर, फतेहगड साहिब आणि संगरूर या जागा माळवा भागात आहेत. तसेच माळव्यातील सर्वात मोठे आणि महत्वाचे शहर लुधियाना आहे. लुधियाना लोकसभा मतदारसंघातून आआपच्या हरविंदरसिंग फुलकांचा २% पेक्षा कमी मतांनी पराभव झाला होता. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की माळवा भागात आआप भक्कम आहे. पंजाब राज्यातील ११७ पैकी ६९ विधानसभा जागा या भागात आहेत. त्याचा आआपला नक्कीच फायदा होईल. तसेच लुधियाना, फतेहगड साहिब या भागातून आआपला मोठे समर्थन मिळाले आहे अशाही बातम्या आहेत.
या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असे वाटत नाही. पहिल्या क्रमांकासाठी आआप आणि काँग्रेसमध्ये चुरस असेल. आआपचे पारडे थोडे जड असेल. अकाली दलाचे हक्काचे मतदार अजूनपर्यंत पक्षाचा पूर्ण धुव्वा उडणार ही काळजी घेत आले आहेत. त्यामुळे अकाली दल २५ च्या खाली जाईल असे वाटत नाही. भाजपचा मात्र मोठा पराभव व्हायची शक्यता आहे. कारण अकाली दलाचा पराभव व्हायची शक्यता म्हणून भाजपचे मतदार काँग्रेस किंवा आआपकडे वळायची शक्यता आहे. तेव्हा पंजाबविषयी माझा अंदाज--- आआपः ५०, काँग्रेसः ४०, अकाली: २५. आआपची पंजाबमधील ताकद नक्की किती हे अजून तितक्या प्रमाणावर स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आआपला मिळणार्या समर्थनाला 'अंडरएस्टिमेट' करत असायची शक्यता आहेच. तसे असेल तर आआपला बहुमत मिळाले तरी आश्चर्य वाटू नये.
त्रिशंकू विधानसभा आल्यास सरकार स्थापनेसाठी आआप आणि काँग्रेस यांना एकत्र यावे लागेल. पण तसे करणे केजरीवालांना २०१९ लक्षात घेता करणे परवडेल असे वाटत नाही. त्यामुळे केजरीवाल सरकार स्थापन करायच्या भानगडीत न पडता २०१७ मध्येच दुसर्या निवडणुकीला सामोरे जाऊन स्वीप करणे पसंत करतील ही पण शक्यता आहेच.
उत्तराखंड
सुरवातीला उत्तराखंड राज्यात गेल्या काही निवडणुकांमध्ये काय परिस्थिती होती हे बघू

२००२, २००७ आणि २०१२ च्या निवडणुकांमध्ये तिरंगी लढत होती. बसपला राज्याच्या मैदानी भागात (हरिद्वार, उधमसिंग नगर, रूडकी, देहरादून जिल्ह्याचा काही भाग) बर्यापैकी मते मिळाली होती. पण तिरंगी लढतीत होते त्याप्रमाणे बर्यापैकी जागा मिळवायला लागणारे क्रिटिकल मास बसपकडे मिळाले नाही. त्यामुळे फार जागा मिळविण्यात बसपला यश मिळाले नाही.
२०१२ च्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणांचे पुत्र विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्री केले. खरे तर हे विजय बहुगुणा फार जनाधार असलेले नेते नव्हतेच. तरीही राज्यात डोईजड होऊ नये म्हणून फार जनाधार असलेल्याला मुख्यमंत्री करायचे नाही असा शक्य तिथे हायकमांडचा प्रयत्न असे. त्यातून हरीश रावत यांच्याऐवजी विजय बहुगुणांना मुख्यमंत्री केले गेले. या बहुगुणांना कारभार विशेष जमला नव्हता. २०१३ मधील उत्तराखंडातील पुरात त्यांच्या सरकारची मर्यादा अजून उघड झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दोन महिने आधी बहुगुणांना हटवून हरीश रावत यांना मुख्यमंत्री केले गेले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. काँग्रेस पक्षाचा सगळ्या देशात धुव्वा उडला तसा उत्तराखंडमध्येही तो उडलाच. पण त्यानंतर दोनच महिन्यात देहरादून जिल्ह्यातील दोईवाला (२०१२ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल निवडून गेले होते. ते २०१४ मध्ये लोकसभेवर निवडून गेले) आणि अलमोडा जिल्ह्यातील सोमेश्वर (२०१२ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे अजय तामता निवडून गेले होते. ते २०१४ मध्ये लोकसभेवर निवडून गेले) या मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपचा आरामात विजय होईल असे चित्र असताना काँग्रेसने या जागा जिंकल्या.
तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट आणायचा प्रयत्न फसला त्याचा हरीश रावत यांना नक्कीच फायदा होईल. भाजपने ज्यांना ज्यांना भ्रष्टाचार/ अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता त्या सगळ्यांना पक्षात घेतले आहे. यात माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणांचाही समावेश आहे. असे करायची खरोखरच काय गरज होती हे समजले नाही. इतकेच नाही तर हैद्राबादमध्ये राजभवनात वयाच्या ८५ व्या वर्षी रासलीला करताना रंगेहात पकडल्या गेलेल्या माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारींनाही पक्षात घेतले. त्यातून भाजपमध्ये मुळात असलेली गटबाजी आणखी लोक आल्यामुळे अजून वाढली असायची शक्यता आहे. त्याचे परिणाम निवडणुकांमध्ये होतीलच. २०१२ मध्ये माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खंडुरी यांचा धक्कादायक पराभव झाला त्याचे कारण पक्षातील गटबाजी हेच होते. आता एक हरीश रावत सोडले तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले सगळे भाजपमध्ये आहेत. नित्यानंद स्वामी, भगतसिंग कोशियारी, भुवनचंद्र खंडुरी आणि रमेश पोखरीयाल हे भाजपचे स्वत:चे तर विजय बहुगुणा आणि नारायणदत्त तिवारी हे आयात केलेले. तसेच काँग्रेसचे अनेक आमदारही भाजपमध्ये आले आहेत. त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांचे किती सहकार्य मिळेल याची कल्पना नाही.
या सगळ्या कारणांमुळे राज्यात भाजपचा पराभव व्हावा असे मला वाटते. अर्थात हा धागा मला काय व्हावे असे वाटते यापेक्षा काय होईल असे वाटते यावर आहे. मला वाटते की काँग्रेसची अवस्था देशात जरा बरी असती तर हरीश रावत या लोकप्रिय नेत्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला विजयही मिळाला असता. पण काँग्रेसची अवस्था सध्या इतकी बिकट आहे की तसे होईल याची शक्यता वाटत नाही. तरीही भाजपचा थोडक्यात विजय होईल असे वाटते.
गोवा
गोव्यात गेल्या काही निवडणुकांमधील परिस्थिती बघू

२०१२ मध्ये मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली भाजपला बहुमत मिळाले. त्यावेळी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष भाजपबरोबर होता. २००७-१२ या काळात हा पक्ष दिगंबर कामत यांच्या काँग्रेस सरकारमध्ये सामील होता. पण २०१२ मध्ये या पक्षाने काँग्रेसची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी केली. एकेकाळी म.गो.पक्ष राज्यात सत्ताधारी होता. पण आता तो पक्ष सुदिन आणि दिपक ढवळीकर यांच्यावर अवलंबून आहे. हे दोघे प्रियोळ आणि मडकई या मतदारसंघांमधून स्वतःच्या लोकप्रियतेच्या आधारावर निवडून येतात. पक्षाला राज्यात मिळत असलेल्या ७.५% मतांमध्ये पक्षाला प्रियोळ आणि मडकई मतदारसंघात मिळालेल्या मतांचा वाटा मोठा आहे. तरीही इतर मतदारसंघांमध्ये पक्षाचा थोडा आधार आहेच. अटीतटीच्या लढतीत एवढी मते फिरणेही निकालावर परिणाम घडवू शकतील. म.गो.पक्षाने भाजपची साथ सोडली आहे त्याचा नक्कीच परिणाम भाजपवर होणार आहे. तसेच मराठी शाळांच्या मुद्दावरून रा.स्व.संघाचे सुभाष वेलिंगकर यांनी वेगळी चूल मांडली आहे. त्याचा फटकाही भाजपला बसेलच.
२०१२ मध्ये भाजने बर्याच प्रमाणावर ख्रिश्चन मतदारांनाही आपल्या बाजूला वळवले होते. पण आता हा समाज भाजपपासून दूर गेला आहे असे चित्र आहे.यावेळी आम आदमी पक्ष या तिसर्या पक्षाचा गोव्यात प्रवेश झाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाला ३.४% मते होती. स्थानिक पक्षांना लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुकांमध्ये जास्त मते मिळतात हा कल देशात सर्वत्र बघायला मिळाला आहे. त्यामुळे आआपला त्यापेक्षा जास्त मते तशीही मिळाली असती.तसेच पक्षाने गोव्यात बराच जास्त जोर लावला आहे त्याचा फायदाही पक्षाला मिळेलच. पक्षाने एल्विन गोम्स या माजी सनदी अधिकार्याला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहिर केले आहे. ते दक्षिण गोव्यातील कु़ंकोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. आआपचा गोव्यात झालेला प्रवेश आणि एल्विन गोम्स या ख्रिश्चन चेहर्याला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहिर केले जाणे यामुळे भाजपविरोधी ख्रिश्चन मतांमध्ये फूट पडेल ही शक्यता आहेच. आआपला काही जागा मिळू शकतीलही. पण अर्थातच तिरंगी लढतीत बर्याच जागा मिळवायला लागणारे क्रिटिकल मास पक्षाकडे असेल असे वाटत नाही.
मुख्यत्वे आआप भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडायची शक्यता आहे म्हणून भाजपचे पारडे जड असेल असे मला वाटते. भाजप सर्वात मोठा पक्ष बनेल (किंवा निसटते बहुमत) मिळवेल असे मला वाटते. काँग्रेस दुसर्या क्रमांकावर असेल तर मगोप-आआपमध्ये तिसर्या क्रमांकासाठी चुरस असेल असे वाटते.
या निवडणुकांचे राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम
या लेखात पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या त्या मानाने लहान राज्यांचा परामर्श घेतला आहे. यात निकाल काहीही लागले तरी राष्ट्रीय राजकारणावर फार परिणाम होणार नाही.
तरीही आआपला पंजाबमध्ये यश मिळाल्यास आणि गोव्यात बर्यापैकी जागा जिंकण्यात यश आल्यास आआप आणि केजरीवालांना जोर चढेल हे नक्कीच. पण पंजाबमध्ये आआपला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर तो मात्र पक्षासाठी मोठा धक्का असेल. अशा परिस्थितीत केजरीवालांना पक्ष एक ठेवणे हे मोठे आव्हान असेल हे नक्कीच. तसेच समजा आआपचा पंजाबमध्ये विजय झाला तर पंजाबचा मुख्यमंत्री केजरीवालांपेक्षा मोठा बनेल (कारण पंजाब हे दिल्लीपेक्षा मोठे राज्य आहे. तसेच पंजाब हे पूर्ण राज्य आहे तर दिल्ली हे अर्धेच राज्य आहे) ही शक्यता आहेच. तसे असेल तर केजरीवाल या एकाधिकारशाहीवर विश्वास ठेवणार्या नेत्याला ते कितपत मानवेल हे पण कोडेच आहे.
असो. सर्व चित्र ११ मार्चला स्पष्ट होईलच.
प्रतिक्रिया
6 Mar 2017 - 3:57 am | भास्कर केन्डे
तुमचा उ. प्र. निवडणूक तसेच हा लेख आवडला. छान विश्लेषन केलेत. पंजाब मध्ये खूपच जास्त अनिश्चितता आहे. त्यामुळे तिथला निकाल उत्सुकतेचा विषय आहे. उत्तराखंडातला भाजपाचा कडबोळ्याचा प्रयत्न किती यशस्वी होतो हे पाहने सुद्धा मजेशीर असणार आहे.
उत्तराखंड आणि गोव्यातील भाजपाने फडणवीसांनी पुण्या नाशकात जे केले त्याची पुनरावृत्ती केल्यास तिथे त्यांना विजय मिळू शकतो. उदा. पुण्यात आयारामांची भरती केल्याने मूळ भाजपच्या नाराजांना चुचकारण्यात आलेले यश, नाराज संघींना मनवन्यात आलेले यश.
बघू यात ११ ला काय निकाल लागतो ते.
6 Mar 2017 - 9:50 am | प्रीत-मोहर
११ तारीख ची आतुरतेने वाट बघत आहे. खांग्रेस जिंकायला न्कोय पण भाजपालाही पुर्ण बहुमत मिळायला नकोय. देव करो असेच होवो
6 Mar 2017 - 10:21 am | गॅरी ट्रुमन
या लेखात एक सुधारणा हवी आहे:
पंजाबमध्ये नकाशानंतर दुसर्या परिच्छेदात दुसरे वाक्य "अकाली दलाचे हक्काचे मतदार अजूनपर्यंत पक्षाचा पूर्ण धुव्वा उडणार ही काळजी घेत आले आहेत. त्यामुळे अकाली दल २५ च्या खाली जाईल असे वाटत नाही." असे आहे. त्यात 'नाही' लिहायचे राहिले आहे. ते वाक्य "अकाली दलाचे हक्काचे मतदार अजूनपर्यंत पक्षाचा पूर्ण धुव्वा उडणार नाही ही काळजी घेत आले आहेत. त्यामुळे अकाली दल २५ च्या खाली जाईल असे वाटत नाही." असे पाहिजे.
6 Mar 2017 - 10:29 am | गॅरी ट्रुमन
उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे १२ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले. . २००१ मध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांचे नाव बातम्यांमध्ये कधीच आले नाही. तसेच डिसेंबर २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले त्यावेळी माझे पूर्ण लक्ष गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये होते. त्यामुळे या बातमीकडे पूर्णच दुर्लक्ष झाले होते. लेख लिहिताना नित्यानंद स्वामी अजूनही हयात आहेत अशीच माझी कल्पना होती आणि त्याचप्रकारे लेखात लिहिले आहे. याची नोंद घ्यावी ही विनंती.
6 Mar 2017 - 4:06 pm | आकाश कंदील
पंजाब आणि गोव्याच्या इलेकशन्स होऊन इतके दिवस होऊन सुद्धा दिल्लीचे सुपुत्र मा. केजरीवाल बरेच दिवस शांत बसलेत त्या मुळे काहीतरी त्यांचे काहीतरी बिनसल्याचा सौंशय येतोय. माझा आपला एक अंदाज. बाकी गॅरी भाऊ तुमचे विश्लेषण एकदम मस्त.
6 Mar 2017 - 4:30 pm | गॅरी ट्रुमन
तसे झाले असेल तर फारच चांगले. पण मधल्या काळात काही दिवसांसाठी दिल्लीचे सुपुत्र बंगलोरमध्ये उपचारांसाठी रवाना झाले होते. यांच्या मोहल्ला क्लिनिकचे कौतुक कोफी अन्नानपासून वॉशिंग्टन पोस्टपर्यंत सगळ्यांनी कसे केले आहे याचे ढोल बडवणारे दिल्लीचे सुपुत्र मात्र स्वतःवरील उपचारांसाठी दुसरीकडे जातात. बहुदा या मोहल्ला क्लिनिकमध्ये हृदय, यकृत, किडनी इत्यादी ट्रान्सप्लॅन्टपेक्षा कमी गुंतागुंतीचे उपचार होतच नसावेत त्यामुळे स्वतःवरील लहानसहान उपचारांसाठी हे युगपुरूष दुसरीकडे जातात. असो.
११ तारखेला काय होते ते बघायचे.
6 Mar 2017 - 4:47 pm | पैसा
लेख आवडला
7 Mar 2017 - 6:50 am | रमेश आठवले
मी ट्रुमन यांनी केलेले विश्लेषण आणि निकालांचे निदान यांच्याशी सहमत आहे. फक्त एक दुरुस्ती सुचवतो . नारायण दत्त तिवारी यांनी नाही तर त्यांच्या मुलाने भाजपा मध्ये प्रवेश घेतला.
http://www.hindustantimes.com/assembly-elections/congress-veteran-nd-tiw...
केजरीवाल यांनी दिल्लीत मांडलेला उच्छाद पाहता त्यांना गोवा अथवा पंजाब मध्ये सत्ता मिळाली नाही तर बरे होईल असे वाटते.
7 Mar 2017 - 8:14 pm | कपिलमुनी
दिल्लीमधे काय उच्छाद मांडला आहे ??
भ्रष्टाचार झालाय ? की लोकांना अहितकारक असे निर्णय घेतले आहेत ?
भूखंड गिळंकृत केलेत का ?
जरा डिट्टेलमधे लिहा मग आपण सगळेजण मिळून सडकून टीका करू.
7 Mar 2017 - 8:44 pm | रमेश आठवले
या विषयावर लिहिण्या सारखे खूप आहे. सध्या फक्त हे काही दुवे वाचा,
http://www.dnaindia.com/india/report-Investigation-by-the-Vigilance-dept...
http://www.news18.com/news/politics/aap-led-delhi-govt-launched-witch-hu...
http://www.dnaindia.com/india/report-ahead-of-polls-it-dept-tells-ec-to-...२३१०२६८
http://www.catchnews.com/politics-news/office-of-profit-17-more-aap-mlas...
7 Mar 2017 - 12:37 pm | श्रीगुरुजी
१) पंजाबमध्ये कोणालाही बहुमत मिळणार नाही आणि काँग्रेस प्रथम क्रमांकावर व अकाली-भाजप युती दुसर्या क्रमांकावर असेल असा माझा अंदाज आहे.
२) उत्तराखंडमध्ये भाजप स्पष्ट बहुमत मिळवेल असा माझा अंदाज आहे.
३) उ. प्र. मध्ये कोणालाही बहुमत मिळणार नाही आणि सप-काँग्रेस युती प्रथम क्रमांकावर व फार थोड्या फरकाने भाजप त्यांच्या मागे असेल व बसप खूप मोठ्या अंतराने तिसर्या क्रमांकावर असेल असा माझा अंदाज आहे.
४) गोव्यात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल व कदाचित निसटते बहुमत मिळवेल असा माझा अंदाज आहे.
५) मणिपूरची फारशी माहिती नाही. परंतु माध्यमातील बातम्यानुसार भाजपची तिथे बर्यापैकी वाढ झालेली आहे. त्यानुसार २०१२ च्या तुलनेत भाजप चांगले यश मिळवेल असे वाटते.
9 Mar 2017 - 7:40 pm | गॅरी ट्रुमन
पंजाबचे एक्झिट पोलचे आकडे पुढीलप्रमाणे:
२०१४ नंतर अॅक्सिसने सर्वात विश्वासार्ह अंदाज व्यक्त केले होते (दिल्लीमध्ये आआपला ६० तर बिहारमध्ये महागठबंधनला १७८ जागा मिळतील असा अॅक्सिसचा अंदाज होता). त्यानुसार पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल. तर सी-व्होटरने आआपला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. इतर दोन अंदाजांप्रमाणे पंजाबमध्ये अगदीच काट्याची टक्कर होईल.
9 Mar 2017 - 7:42 pm | गॅरी ट्रुमन
अकाली-भाजप युतीचा धुव्वा उडणार यावर सगळ्या पोलचे एकमत आहे.
9 Mar 2017 - 7:49 pm | गॅरी ट्रुमन
उत्तराखंडमधील एक्झिट पोलचे अंदाज पुढीलप्रमाणे:
सी-व्होटरच्या अंदाजाप्रमाणे राज्यात चुरशीची लढत होईल. पण इतर सर्व अंदाजांप्रमाणे राज्यात भाजपचा विजय होईल असा अंदाज आहे.
9 Mar 2017 - 7:58 pm | गॅरी ट्रुमन
गोव्यातील एक्झिट पोलचे अंदाज पुढीलप्रमाणे:
सी-व्होटर आणि एम.आर.सी च्या अंदाजांप्रमाणे गोव्यात त्रिशंकू विधानसभा येईल आणि आआपला बर्यापैकी यश मिळेल. तर अॅक्सिसच्या अंदाजाप्रमाणे भाजपला यश मिळायची शक्यता आहे.
9 Mar 2017 - 8:33 pm | गॅरी ट्रुमन
इतर काही एक्झिट पोलचे आकडे/ अंदाज पुढीलप्रमाणे:
सुरजीत भल्ला
डॉ. प्रवीण पाटील यांचा पंजाबविषयीचा अंदाज
डॉ. प्रवीण पाटील यांच्या अंदाजाप्रमाणे पंजाबमध्ये त्रिशंकू विधानसभा येणार असून तिथे काँग्रेसचे पारडे जड असेल.
10 Mar 2017 - 10:13 am | गॅरी ट्रुमन
उत्तराखंडमध्ये बरेच एक्झिट पोल भाजप जिंकेल असे म्हणत आहेत. जरी त्रिशंकू विधानसभा आली तरी भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल असे इतर एक्झिट पोलही म्हणत आहेत.
मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे भाजपमध्ये विजय बहुगुणांसकट सगळ्यांची भरताड करून ठेवली आहे म्हणून भाजपचा पराभव व्हावा असे मला वाटते. तसे करण्यात भाजपचा नक्की काय उद्देश असावा? विजय बहुगुणा भाजपला मते नक्कीच मिळवून देणार नाहीत हे त्यांना समजले नसेल असे नाही. पण अशा अनेकांना पक्षात घेऊन काँग्रेस म्हणजे एक बुडते जहाज आहे आणि काँग्रेसमध्ये काही दम राहिलेला नाही असे त्या पक्षाच्या नेत्यांनाच वाटते असा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश नक्कीच असू शकेल. म्हणजे उत्तराखंडमध्ये भाजपसोडून दुसरा पर्याय नाही असे चित्र उभे करायचा प्रयत्न असावा. असे करणे अयोग्य आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. पण तसे करण्यामागे हे कारण असू शकते.
10 Mar 2017 - 10:46 am | गॅरी ट्रुमन
या निवडणुका केजरीवाल आणि आम आदमी पक्षासाठी खूपच महत्वाच्या आहेत. पंजाब या एकाच राज्यात २०१४ मध्ये पक्षाने लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे दिल्लीमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर पंजाबवर लक्ष केंद्रित केले जाणे अगदीच स्वाभाविक होते. त्याचबरोबर केजरीवालांनी गोव्यातही उडी घेतली. पंजाब आणि गोवा निवडणुकांवर केजरीवालांनी बरेच लक्ष केंद्रित केले होते. त्यातच हफिंग्टन पोस्टमध्ये एप्रिल २०१६ मध्ये लेख आला की पंजाबमध्ये आआपला ९४ ते १०० जागा मिळू शकतील. तेव्हापासून केजरीवालांचे विमान उंचच उंच उडू लागले.
आता पंजाबमध्ये विजय मिळाला तर ठिक. अन्यथा केजरीवालांसाठी तो एक मोठा धक्का असेल. २०१४ मध्ये दिल्लीत लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर केजरीवालांचे अण्णांच्या आंदोलनापासूनचे साथीदार (शाझिया इल्मी इत्यादी) पक्ष सोडून गेले. जर आआपला सत्ता मिळाली नाही तर पंजाबमधील स्थानिक नेतेही पक्षात कितपत राहतील ही शंकाच आहे. डॉ. धरमवीर गांधी या चांगल्या माणसाची केजरीवालांनी हकालपट्टी केली. हरविंदरसिंग फुलका हा एक चांगला माणूस पंजाबमध्ये आआपमध्ये आहे पण बाकी भगवंत मानसारखे फालतू लोकही आहेत.पंजाबमध्ये सगळे लोक काही भ्रष्टाचारविरोध वगैरे तत्वांमुळे पक्षात आलेले नाहीत तर जिंकून येऊन सत्तेत यायची शक्यता आहे म्हणूनही अनेक लोक पक्षात सामील झाले आहेत हे तर नक्कीच.जर विजय मिळाला नाही तर हे हौशेगवशे पक्षात किती दिवस राहतील हा पण प्रश्नच आहे. तसेच पुढच्या महिन्यातच दिल्ली महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका आआपसाठी 'लिटमस टेस्ट' आहेत. पंजाबमध्ये विजय मिळवता आला नाही तर या निवडणुकांना सामोरे जातानाही पक्षाचे मनोधैर्य खचलेलेच असेल.
पंजाबमध्ये विजय मिळाला तरी एकदम मोठमोठ्या उड्या मारायच्या सवयी थांबतील याची शक्यता नाहीच. २०१३ मध्ये दिल्लीमध्ये पहिल्या निवडणुकीत २८ जागा मिळाल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन दस्तुरखुद्द नरेंद्र मोदींविरूध्द वाराणसीत निवडणुक लढवायला जाणे, पूर्ण देशात ४०० पेक्षा जास्त लोकसभेच्या जागांवर उमेदवार उभे करणे हे प्रकार केजरीवालांनी केले होतेच. तितक्या ठिकाणी आपल्या पक्षाची संघटना नाही हे माहित असूनही अतीआत्मविश्वास नडला आणि त्या जोरावर मोठ्या मोठ्या उड्या मारायला गेले. दिल्लीत लोकांनी झालेगेले विसरून जाऊन आआपला भरभरून मते दिली तर त्यानंतर केवळ पंजाबवर लक्ष केंद्रित करून पंजाब जिंकायचे, तिथली सत्ता प्रस्थापित आणि बळकट करायची आणि त्यानंतर अजून मोठ्या उड्या मारायच्या सोडून हे गोव्यातही तितक्याच जोराने उतरले. दोने-चार वेळा गुजरातमध्ये जाऊन तिथेही डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये उतरायच्या दृष्टीने तयारी केली आहे. मध्य प्रदेशातही शिवराजसिंग चौहान यांच्याविरूध्द शड्डू ठोकून हे उतरणार आहेत अशा बातम्या आहेत.
एकूणच जी सत्ता हातात मिळाली आहे तिथे काम करून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करून मग अजून पुढच्या उड्या मारायला लागणारा संयम केजरीवालांकडे नक्कीच नाही. भाजप आज इतका मोठा पक्ष आहे पण त्यामागे ५०-६० वर्षे सामान्य कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत. १९८४ ते १९९३ या काळात मायावती आणि काशीराम उत्तर प्रदेशातील जवळपास प्रत्येक गावात जाऊन तिथे त्यांनी आपली व्होटबँक तयार केली होती. हा संयम केजरीवालांना नक्कीच दाखवता आलेला नाही. नुसती फेसबुक आणि ट्विटरवर बडबड करून पक्ष मोठा करता येत नाही.
मोदींनीही मोठी उडी घ्यायची महत्वाकांक्षा असली तरी २०१२ च्या निवडणुका जिंकेपर्यंत गुजरातच्या बाहेर फार लक्ष दिले नव्हते. मला वाटते २०१० च्या दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळी तसेच मुंबईतील २००६ आणि २००८ च्या हल्ल्यांच्या वेळी त्यांनी गुजरातबाहेरील गोष्टींवर स्टेटमेन्ट दिली होती. त्याचप्रमाणे २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या वेळी आय.पी.एल भारताबाहेर भरविण्याचा निर्णय झाल्यावर पाहिजे तर गुजरातमध्ये आय.पी.एल भरवा आम्ही संरक्षण देऊ अशा स्वरूपाचे ते म्हणाले होते. ही ३-४ उदाहरणे सोडली तर मोदींनी पूर्ण लक्ष गुजरातमध्येच केंद्रित केले होते. थोडा काळ नाही तर १०-११ वर्षे. आणि त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात उडी मारली. जर केजरीवालांनी दिल्लीत लोकाभिमुख प्रशासन देऊन चांगले काम केले असते तर इतर कोणत्याही विरोधी नेत्यापेक्षा मोदींच्या विरोधात लोकांनी त्यांना मते दिली असती. पण कुठचे काय. तेवढा दमच नव्हता आपल्या युगपुरूषांमध्ये. हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून जे काही काम आहे ते सोडून पूर्ण देशातल्या सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायला जातात. मग ते दादरी प्रकरण असो की रोहित वेमुला असो.
हातचे सोडून पळत्याच्या पाठी धावायची ही सवय आआपला कधीतरी जोरदार नडणार आहे. पंजाबमध्ये विजय मिळाला आणि गोव्यात बर्यापैकी यश मिळाले तर ही प्रक्रीया थोडी उशीराने होईल. अन्यथा त्याचे परिणाम लवकरच दिसायला लागतील.
10 Mar 2017 - 6:19 pm | गामा पैलवान
लोकहो,
पंजाब आणि गोवा या दोन ठिकाणी केजरीवालने लक्ष केंद्रित केलं आहे. दोन्ही ठिकाणी अंमली पदार्थांचा मुक्तहस्ते वापर चालतो. हा योगायोग नाही.
आ.न.,
-गा.पै.