"भाऊ..तुले एक विचारू का?"
"विचार ना बे."
"तू फेसबुक वर हायस नं?"
"हो मंग..माया पोस्टा नं फोटो दिसत नाय का तुले?"
"अन टिवटर वर?"
"टिवटर नाय बे ट्विटर."
"हा तेच ते"
"बरं मंग?'
"ते फेसबुक नं टिवटरवर, दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काय असतेत?"
"काय?"
"अरं ते असते ना..दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काढून त्याच्यासमोर लिहितेत सारे?"
"काय बोलून ऱ्हायला बे?"
हातावर आकृती काढून…..#
"हे पाय असं असते ते?"
"हा...ह्याला हॅशटॅग म्हन्तेत?"
"काय म्हन्तेत?"
"हॅशटॅग..हॅशटॅग."
"म्हंजे काय पन?"
"मले काय मालूम बे?"
"अबे मंग त्वां कायले लिहितं? #दादाचं लग्न #वावरात पंगत #जिलबी नं बुंदी?"
"ते तसंच लिहा लागते ना बे ट्विटरवर."
"पन काऊन? दादाच्या लग्नात पंगतीत संन्न जिलब्या हानल्या असं काऊन लिहत नाही."
"अबे पद्धत ऱ्हायते ना लिहिण्याची एकेका ठिकाणची."
"मले नाही समजू ऱ्हायलं बा?"
"हे पाय..आपल्याले एखांदी गोष्ट ठासून सांगायची असंन तं हॅशटॅग द्या लागते ट्विटरवर."
"म्हंजे मास्तरनं शाळेत ते उद्गारवाचक चिन्न शिकवलं होतं तसं?"
"हा तस्संच!"
"पन समोरच्याले कसं कळनं?"
"काऊन नाय कळणार?"
"म्हंजे पाय त्वां लिहिलं #दादाचं लग्न #वावरात पंगत #जिलबी नं बुंदी...बराबर?
"हा मंग?"
"ह्याचा काय अर्थ होते?"
"दादाच्या लग्नात बम्म जिलब्या सुतल्या..अन बुंदी पन!"
"नाही ना?"
"काऊन..दुसरा काय अर्थ होते?"
"दादाच्या लग्नात, पंगतीत बम्म जिलब्या वाढल्या असा पन अर्थ निंगते ना?"
"तू जाय बे...मजाक उडवतं का मायी?"
"तसं नाय भाऊ..उदाहरण देल्लं फक्त."
"लय शायना हायस तू?"
"नाय भाऊ..हे तर मराठी झालं..इंग्लिशमदे बी कायच्या काय लिहितेत ना सारे."
"काय लिहितेत?"
"आता हे पाय...#dayoff #leginjury #sitting@home #relaxed"
"मंग बराबर तं हाय. तेच्यात काय चुकलं आता? पाय मोडला म्हणून घरी बशेल हाय तो."
"अबे त्याचं तंगडं मोडलं म्हणून काय इंग्लिशचं बी मोडायचं का? पार आय माय करून टाकतेत इंग्लिशची!!"
"तू काऊन चीडतं पन?"
"तसं नाय भाऊ..पन आपले खेड्यापाड्यातले पोट्टे पुन्यामुमैले जाते तवा त्यायच्या इंग्लिशची कशी मजा उडवतेत तिथले पोट्टे!! अन आता हे कसं चालते?"
"ते वेगळी गोष्ट हाय ना बे."
"वेगळी कस्काय? आपले पोट्टे तरी चारचौघात चुकीचं बोलतेत बिचारे..हे तर साऱ्या दुनियेले बोंबलून सांगू ऱ्हायले."
"बराबर हाय तुय..पन ते कसंय..बा एखांदी महत्त्वाची घटनागिटना एखाद्याले सांगायची असंनं तं हॅशटॅग लावला की साऱ्याइचं लक्ष जाते."
"अबे तं ह्याच तंगडं कोणतं युद्धात जाऊन मोडलं होतं बे?मोरीत पाय घसरून पडला असंनं थो. कायले हॅशटॅग लावा लागते?"
"पन तुयी काऊन जळू राहिली येवढी? त्यांले काय लिहाच ते लिहीतीन."
"अजून एक विचारू का तुले?"
"हा विचार"
"ते LOL अन ROFL म्हंजे काय?"
"ते हासायाचं असलं की LOL किंवा ROFL लिहा लागते."
"ते मले बी माहिती हाय."
"मंग कायले विचारतं?"
"त्यादिवशी एका पोट्टीनं लिहिलं #feelingsleepy. मले ते वाचून हसू आलं. मंग म्या बी लिहिलं lol..तं ते पोट्टी मायावरचं डाफरली."
" काऊन?"
"म्या मराठीत लिहिलं ना बे... लोळ !!!!"
"मंग डाफरणारच ते..तिले झोप आली तं तू लोळ म्हणतं!!"
"माय चुकलं ना भाऊ मराठीत लिहिलं ते...मानतो ना मी..पन झोप आली तं लोळ नाही तं काय पळ म्हनाचं का?"
"अबे पन तुले लिहाची गरजच काय होती?"
"मंग तिले तरी लिहाची काय गरज होती बे? झोप आली तं ओरडून कायले सांगा लागते?"
"हे पाय तू फालतू होबासक्या करू नको फेसबुकवर. आनशीन घरावर गोटे."
"मायबीन लोकं होबासक्या करतेत एवढ्या ते चालते. अजून एक विचारायचं होतं मले."
"आता काय ऱ्हायलं अजून?"
"आता समजा मले एखांदी फ्रेंड रिक्वेष्ट आली. तं तिले इग्नोर मारताना समोरच्याले दोन-चार शिव्या पाठवायची व्यवस्था हाय का? किंवा मायी फ्रेंड रिक्वेष्ट एखाद्यानं इग्नोर मारली तं त्याले तरी शिव्या द्यायची व्यवस्था पाह्यजे की नाही?"
"शिव्या काऊन द्यायच्या हायेत पन तुले?"
"अबे काही लोकांचे फोटो पाहूनच थोबाडीत द्यावीशी वाटते ना बे...वरतून ते फेसबुक दहावेळा विचारते..व्हॉट'स ऑन युअर माईंड?"
"मंग त्याच्यासाठी हॅशटॅग वापर ना बे?"
"त्यानं काय होईन?"
"शिवी देल्ली हे बाकी कोणाला कळणारच नाय ना."
"म्हंजे?"
"हे पाय #tuyananachitang #bhaitadbongya #chalningithun !!!"
"हे जमलं ना भाऊ...बरं येतो मंग मी"
"कुठं चालला आता?"
"#मीकुठंबीजाईन #तुलेकायकरायच !!!"
प्रतिक्रिया
28 Feb 2017 - 5:01 pm | वेल्लाभट
क्या बात है ! सुरेख लिहिलंय ! वा :)
उत्तम. उत्तम.
मिपा यूट्यूब चॅनल च्या साठी बढिया राहतंय हे, तुले जमलं तर बोलून टाक बापा.
28 Feb 2017 - 5:31 pm | चिनार
देऊ ना आपण च्यानेलसाठी..कोणासंग बोलाच ते सांगशीन का नाही बाप्पा ??
28 Feb 2017 - 5:59 pm | वेल्लाभट
तसं नाही नं बे...
ऑडियो करून दे नं संपादकान्ले!
28 Feb 2017 - 9:55 pm | पिलीयन रायडर
मी नाही तर स्रुजाशी बोला! :)
तुम्ही ऑडिओ करुन द्या. misalpav.channel@gmail.com इथे पाठवा. आम्हाला कळवा फक्त. म्हणजे आम्ही अपलोड करु.
28 Feb 2017 - 5:06 pm | सस्नेह
=))
28 Feb 2017 - 5:10 pm | विशुमित
"अबे मंग त्वां कायले लिहितं? #दादाचं लग्न #वावरात पंगत #जिलबी नं बुंदी?"
"लोळ"
=== वाह क्या बात है..!!
वेल्लाभटांना अनुमोदन...
28 Feb 2017 - 5:23 pm | पैसा
#लैबेक्कार, #हसूनलोळालोळी =)) =)) =)) =))
28 Feb 2017 - 6:47 pm | उगा काहितरीच
भन्नाट !
28 Feb 2017 - 7:00 pm | एस
#LOL ;-)
28 Feb 2017 - 7:44 pm | चिनार
धन्यवाद!!
28 Feb 2017 - 9:12 pm | संदीप डांगे
हे पण भारी.... इस्को भी बुक कर्रेले रे बावा....!
28 Feb 2017 - 9:39 pm | आषाढ_दर्द_गाणे
हसून हसून पुरेवाट झाली!
हि कुठली बोलीभाषा आहे ते कृपया सांगू शकाल का? अहिरणी कि खानदेशी?
फार वर्षांपूर्वी लोकसत्तेत 'टुरिंगांचं मायंदाळ पीक' असा एक लेख आला होता, त्याची आठवण झाली अगदी!
कुणाला तो लेख साडपल्यास इथे द्यावा अशी विनंती.
28 Feb 2017 - 10:46 pm | तुषार काळभोर
टुरिंगांचं मायंदाळ पीक
1 Mar 2017 - 12:39 am | आषाढ_दर्द_गाणे
पैलवान, आपणांस शेरभर बदामाचे दूध मिळो!
पण दुर्दैवाने माझ्याकडे तो लेख नीट दिसत नाही आहे :(
अगम्य गिचमिड दिसतेय, काय करावे?
1 Mar 2017 - 9:39 am | चिनार
ही वैदर्भी/वर्हाडी भाषा आहे. पण नेमकं गावाचं नाव सांगता येणार नाही. वऱ्हाडी भाषेतही अनेक बोलीभाषा आहेत.
2 Mar 2017 - 1:42 am | संदीप डांगे
मला वाटतं, त्यांना बम्म, आणि सुतल्या ह्या शब्दांविषयी जाणून घ्यायचे असावे. बम्म म्हणजे खूप, पुष्कळ, भरपूर. सुतल्या म्हणजे झोडल्या, अधाशा सारख्या खाल्ल्या. अर्थात वाक्यरचनेवरून लक्षात आलेच असेल म्हणा.
तर वऱ्हाडीची एक गंमत आहे, ही तशी तरुणांची भाषा आहे. दर एक दोन वर्षाने दोन चार शब्द नवीन मिळतात वऱ्हाडीला, आणि बाज मात्र मूळ वऱ्हाडीच असतो. 15 ते 25 च्या दरम्यान ची प्रत्येक नवी पिढी काही न काही शब्द प्रसवतेच. तसेच विदर्भाचा प्रांत मोठा असल्याने एकाच अर्थाचे अनेक शब्द -उच्चार सापडतात.
एकाच गावात, घरात वयानुसार वेगवेगळी छटा असलेली बोली ऐकू येऊ शकते. एकाच घरातले तीन जण 'काहाले कल्ला करतं, काऊन बोंबलतं, कायले माजोन करतं' असे 'कशाला ओरडत आहेस' या वाक्याची तीन रूपे वापरतील..
=))
2 Mar 2017 - 9:51 am | चिनार
सहमत
2 Mar 2017 - 10:40 pm | आषाढ_दर्द_गाणे
पूर्ण सहमत...
28 Feb 2017 - 9:57 pm | पिलीयन रायडर
मस्त लेख आहे अगदी!!!
बाकी # चा वापर त्याच विषयाच्या सर्व ट्विट्स आणि पोस्ट्स एकत्र पहायला होतो. पण लोकांनी पार वाट लावली त्याची!
28 Feb 2017 - 10:11 pm | पद्मावति
काय मस्त लिहिलेय.
आपले पोट्टे तरी चारचौघात चुकीचं बोलतेत बिचारे..हे तर साऱ्या दुनियेले बोंबलून सांगू ऱ्हायले."
=))...मस्तच.28 Feb 2017 - 10:14 pm | नीलमोहर
#bhaitadbongya
खी खी खी !!
28 Feb 2017 - 10:22 pm | वरुण मोहिते
भाऊ # एक नंबर #बघता काय लाईक करा
ह्यातलं कुठलं उदाहरण चांगलंय .
उद्या शेयर करावं म्हणतो :)))
1 Mar 2017 - 3:25 am | स्रुजा
#महालोळ #शेअरकरुकाय
1 Mar 2017 - 9:35 am | चिनार
जरूर शेयर करा...
माझ्या ब्लॉगची लिंक खाली द्यावी
http://chinarsjoshi.blogspot.in/
1 Mar 2017 - 7:13 pm | स्रुजा
#धन्यवाद ;)
1 Mar 2017 - 7:17 am | यशोधरा
=))
1 Mar 2017 - 7:52 am | पर्णिका
जबरी लिहिलंय. :D
1 Mar 2017 - 9:23 am | सुबोध खरे
फारच छान
1 Mar 2017 - 10:52 am | संजय पाटिल
#जबरदस्त# लोल#
1 Mar 2017 - 11:07 am | जव्हेरगंज
हाहाहा!!
मस्त!!
1 Mar 2017 - 4:16 pm | प्राची अश्विनी
एकदम #झक्कास!
1 Mar 2017 - 4:37 pm | aanandinee
मस्त # झकास #
1 Mar 2017 - 4:37 pm | aanandinee
मस्त # झकास #
1 Mar 2017 - 4:37 pm | aanandinee
मस्त # झकास #
1 Mar 2017 - 4:40 pm | aanandinee
एकदम मस्त# झकास
2 Mar 2017 - 1:06 am | रेवती
छान लिहिलय. ते हॅशटॅग मलाही नाही समजत.
2 Mar 2017 - 10:19 am | निरु
झक्कास लेख :)
7 Mar 2017 - 7:53 pm | चिनार
धन्यवाद!!
7 Mar 2017 - 7:53 pm | चिनार
धन्यवाद!!
8 Mar 2017 - 9:33 am | अजया
#एकदम ब्येस्ट #आवडलंच भाऊ!
22 Mar 2017 - 4:09 pm | एमी
#चिनारभाऊ_रॉक्स@मिपा
22 Mar 2017 - 4:29 pm | मितान
ब्येष्य की वो !