पुणे-मुंबई-पुणे - एक पुनर्नवानुभव
फारा वर्षांपूर्वी आम्ही मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. ३ तासांच्या डेक्कन क्वीन प्रवासासाठी, दोन तास रिझर्व्हेशनच्या रांगेत उभे रहाण्याचाही आम्ही विक्रम नोंदवला आहे. त्या रिझर्व्हेशन केलेल्या डब्यांत तीन्-दोन अशी बसण्याची व्यवस्था असल्याने , आम्ही सेकंड क्लासमधेही , अगदी मांडी घालून प्रवास केलेला आहे. पुढे, रेल्वेला भिकेचे डोहाळे लागल्याने, त्यांनी आमचा विश्वासघात करुन तीन्-तीन अशी बसण्याची व्यवस्था आणली. त्याचा आम्ही भरपूर निषेध केला. कारण तोपर्यंत आमची बुडे भरपूर रुंदावल्यामुळे, आमची, अंगाला अंग लागू न देण्याची ब्रिटिश सभ्यता धोक्यांत आली. पण तरीही, वरच्या वर्गाचे तिकीट काढण्याला आमचे मध्यमवर्गीय मन साथ देत नव्हते. त्यामुळे, आमचा अंग चोरुन प्रवास काही दिवस चालूच राहिला. पण एके दिवशी तो घोर प्रसंग उदभवला. पुण्याहून मुंबईला जाताना, आमचे तिकीट मध्यभागी आले. दोन्ही बाजूल दोन पुणेरी ललना आल्या. दोघींनाही, मला स्वतःला कडेला बसू द्या, अशी विनंती करुन पाहिली. पण दोघींनीही ती साफ धुडकावून लावली. खिडकीवालीला खिडकी सोडायची नव्हती आणि कडेचीला आपले स्वातंत्र्य गमावायचे नसावे. त्यामुळे, अगदी दादर येईपर्यंत, अंगाची घडी घालून बसावे लागले. चुकून डुलकी लागून जरासा स्पर्श झाल्यावर नजरेचे अंगार झेलावे लागले. घरी आल्यावर दोन दिवस अंग दुखत होते. त्या अनुभवावरुन आम्ही रेल्वे सोडली आणि एशियाडची कास धरली. पुढे, एशियाडच्याही सर्व खिडक्या वाजू लागल्यावर, नवीन आलेल्या वोल्वो कडे मोर्चा वळवला. दोन्ही बाजूला, स्टॉप, घराच्या अगदी जवळ असल्याने, तो फार सुखकर प्रवास झाला. फक्त एक, ठणठणाटी सिनेमाचा त्रास होता. पण तोही, आम्ही कानांत 'इअर प्लग्स' घालून सोडवला. असा अनेक वर्षे हा सुखाचा प्रवास चालू राहिला असता. पण, वोल्वोचे भाव डोक्यावरुन जायची वेळ आली आणि पुण्याहून निघणारी वोल्वो, हिजवडीपर्यंतच एक तास घ्यायला लागली तेंव्हा रेल्वेचा पुनर्विचार करायची वेळ आली. रिटायर झाल्यामुळे आता हीपण प्रवासांत बरोबर येणार असल्याने, व्यस्त बुडांच्या मेजॉरिटीवर तिसर्याला चिणता येईल, असा धूर्त विचार केला. दोन्ही वेळेची तिकीटे नेटवर काढून ठेवली.
प्रवासाच्या दिवशी, रिक्शाची मक्तेदारी मोडण्यासाठी 'ओला' मागवली. अनेक वर्षांनंतर पुणे स्टेशनवर पाय ठेवायची वेळ आल्याने, गाडी कुठल्या फलाटावर लागते, हे सुद्धा विसरुन गेलो होतो. रेल्वे किती बदलली आहे, याचा अनुभव घ्यायचा होता. पण, सुटायच्या वेळेला पंचवीस मिनिटे राहिली असतानाही, गाडी फलाटावर नव्हती. गाडी लागल्यावर अपेक्षित डबा चांगला एक फर्लांग पुढे गेलेला बघून पुनर्प्रत्ययाचा प्रथमानंद झाला. त्यानंतर प्रवास सुरु झाल्यावर, गाडीच्या लोखंडी खिडक्या, अजूनही आपला 'शाहिस्तेखान' करतात, हे पाहून रेल्वे बदलली नसल्याचा द्वितीयानंद जाहला. त्यापाठोपाठ, आतली काचेची खिडकी बंद केल्यावर, अजूनही ती कडीला न जुमानता, बायकांच्या पोटिमा पोलक्यासारखी, वरवर जातच रहाते, हाही साक्षात्कार झाला. अशा तर्हेने आपली रेल्वे, अजूनही आपल्या जुन्या संवयी सोडत नाही याचा आनंद झाला. (पोटिमा शब्द विआ बुवा नामक लेखकांनी शोधला असून त्याचा पूर्ण उच्चार, 'पोटावर टिचकी मारा", असा आवाजच्या दिवाळी अंकात वाचल्याचे स्मरते.) शेवटी जुन्या परंपरेनुसार गाडी पंधरा मिनिटे उशीरा पोचली. दादर स्टेशन बाहेर, टॅक्सीज उभ्या होत्या पन त्यातले कोणीच अंधेरीला यायला तयार नव्हते. (पूर्वी तर, उडी मारुन यायचे). शेवटी स्टेशन परिसराच्या बाहेर एक नॉर्मल टॅक्सीवाला भेटला. परतीच्या प्रवासातही हेच सगळे अनुभव, उलट्या क्रमाने आले त्यामुळे त्याची द्विरुक्ती टाळतो.
दोन्ही वेळेला, रेल्वेच्या सुपीक डोक्याच्या संगणकामुळे, आमची तिकीटे वेगवेगळ्या बाकांवर आली. अर्थातच व्यस्त बुडे मायनॉरिटीत गेल्याने आम्हीच 'वाटीत पुरण" झालो. पुन्हा एकदा वोल्वोचे पाय धरणे आले!!!
वाचने
7263
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
प्रतिक्रिया
हाहाहा...
अगागागा! काय त्या
मस्त !!!
रेल्वे प्रवासात
पुणे रेल्वे स्टेशन, एक अतिशय
खी खी खी!
तिमा,
In reply to तिमा, by संजय क्षीरसागर
अगदि
हाहाहा
हा हा! खिडक्यांनी केलेला
लेखन आवडले.
ललित म्हणून उत्तम आहे. परंतू
वा वा
In reply to वा वा by तिमा
प्रत्येक लांब पल्ल्याच्या
खुसखुशीत!
१६३८१चे तिकिट दोनचार दिवस
In reply to १६३८१चे तिकिट दोनचार दिवस by कंजूस
साडेचारला कल्याणला आहे आणि
In reply to साडेचारला कल्याणला आहे आणि by सुबोध खरे
ती गाडी पुण्यासाठी रटाळ नाही
मस्त!
हहपुवा
:)
दुपारी ठाण्याहुन जायचे
छान लेख
मस्त!
धन्यवाद
वा!