पुन्हा श्रावण आला

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
29 Jan 2017 - 3:30 am

चुलीत निखारा जळत राहतो. जवारीच्या ताटाचं शेंडं जळावं तसं. उलथलेला तवा हसत राहतो. तो खूप मजेदार हसतो. घराच्या सांधीवाश्यात दडलेलं दारिद्र्य तो शोधून काढतो. हा अपशकून आहे.

बिऱ्हाडं येतात, जातात, जगतात, भुईला टेकतात. नव्या पायवाटांची गणितं मात्र मागे सोडतात. हे जंगल नाही. हे माजलेलं कुसळ आहे. हिरवा वारा इथेही वाहतो. वैशाखात इथं मृगजळांची भरमार असते. रौद्र भीषण उन्हाळ्यात जीव करपून जातो.

कुण्या डोंगराच्या गावात गेलेला नवरदेव, नवरी घेऊन परत आला. चार दिवस नवरी नांदली आणि यानं हाकलून लावली.
रत्नाबाईनं आयुष्यभर जीवाला जाच लावून घेतला. मग ती मरुन गेली बिचारी.

वावटळींसारख्या वावटळी उठतात. धूळ, माती, फुफाटा आकाशात घेऊन उडतात. वावटळींसारखीच आलेली रोहिणी मात्र डोळ्यात गारवा घेऊन आली. उभ्या आयुष्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच शब्द बोलली. पण तीही जळून गेली. ही तर एक आत्महत्याच होती.

आपला सोपान घ्या. त्याचं जळणं मात्र योग्यंच होतं. कितीही अनैतिक असलं तरी हे सत्य आहे.

ताटाताटातून पसरत गेलेल्या सऱ्यात कसला खेळ रंगला आहे? ही दुपारची काहिली निष्फळ आहे. सुर्यास्ताचं तपकिरी उनपण गुलाबी छटांनी न्हाऊन निघालं आहे. मात्र त्यांना निलावतीची सर नाही

निलावती म्हणते, आई तुळजाभवानीच्या कृपेनं पोरगी झाली. पण ते खरं नाही हे तर गावातल्या लेढ्यापेंढ्यांनाही ठाऊक आहे.
तिला तर दत्तू बामनानं शोधून दिली होती. दत्तू बामन वारकरी. पूजा म्हणून त्यानं किती केली त्यालाच माहीत. आळंदीला इंद्रायणीत म्हणे तो डुबकी मारायला गेला. तिथे त्याचे कपडे चोरीला गेले. हा तर एक चेष्टेचाच विषय झाला.
निलावती त्याला तिथेच दिसली होती म्हणे. कुण्या पाणीव गावची. पांडूनं त्याला तसं सांगितलंच होतं. सहा महीन्यात बार उडाला.

दुध, केळी, अंडी, मटन खाण्याचा सपाटा सुरु झाला. पण साध्य काही झालं नाही. मूठभर आकाराचा गणपती शेवटी त्याने दुकानातातून भिरकावलाच.

पांडू. एक येडझवा. वाड्या वस्त्यांवर फिरुन त्याने घागरी गोळा केल्या. मग स्टो गोळा केले. शेवटी फोटो फ्रेमच्या दुकानावर त्याचे समाधान झाले. पुरुषभर उंचीच्या काचा त्याच्या दुकानात नेहमी असत. एके दिवशी सगळ्या पडून फुटल्या.

मग त्यानं सोन्याचं दुकान काढलं. कसं कोण जाणे जोरात चाललं. पांडू निवांत झाला. स्थिरस्थावर झाला. सोनार झाला. दत्तू बामणाला एके दिवशी गाठून पोरगी बघून लगीन करुन द्यायचं वचन घेतलं.

पुन्हा श्रावण आला. नवरी शोधायला नवरदेव डोंगरात गेला. झुंजूमुंजू पहाट. पहाटेचा सडा. किणकिण बांगड्या आणि हिरवागार चुडा. रानोमाळ विखुरलेला चिखल, रामा, धो धो पाऊस.
अशाच पावसात रोहिणी आली. तिच्या बोलक्या डोळ्यातला गारवा बरंच काही सांगून गेला. तिला शब्दांची गरजच पडली नाही.

म्हैस चरायला घेऊन गेल्यावर ओकंबोकं झालेलं रत्नाबाईचं घर चढ्या माळावरुन थेट दिसतं. त्याच्याच पाठीमागे आहे एक बंदिस्त वाडा. तिथेच राहते रोहिणी. मंदामावशींनी तो वाडा आजपर्यंत जपलाय. बाहेरच्या जगासाठी या वाड्याचे दरवाजे कायम बंद असतात. पांढऱ्या फुफाट्याचं अंगण या वाड्याला लाभलंय. पण ते मधोमध आहे. पबाकाकांना मात्र तिथे बसता येत नाही.
मंदाबाई त्यांना हाकलून लावते. त्यांची सावलीसुद्धा आता त्यांना खपत नाही. गजानन त्यांना हाकलून लावत नाही. पण अडखळत का होईना शिवी घालतो. स्कूटरवर बसून दारोदारी भांडी विकतो. हा वाडा किती पोकळ आहे याची बहुतेक त्याला जाणीव असावी.

रोहिणीचं अस्तित्व या वाड्यात जाणवनं तसं मुश्किलंच. ना तिनं कधी दाखवलं. ना त्याची कुणी दखल घेतली.

सोपाननं आधी रांगोळी काढली मग सडा टाकला. शिक्षिका असलेल्या त्याच्या आईनं सगळ्या वर्गात हा किस्सा सुनावला. लेकाचं कौतुक ती करते. सोपान हुशार आहे. पण तो माऱ्यामाऱ्या करतो. पेंडसेबाई याकडे कानाडोळा करतात. कुठल्यातरी कारखान्यात त्याचा बाप मजुरी करतो. केळीसारख्या मांड्या असलेली कल्पना त्यांच्या घराजवळंच राहते. ती गोरीपान आहे. पण ती विधवा आहे.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

29 Jan 2017 - 8:59 am | ज्योति अळवणी

तुमचं लिखाण छान असत पण थोडं अवघड वाटत. दोन वेळा वाचलं तेव्हा समजलं थोडं

मराठी कथालेखक's picture

30 Jan 2017 - 1:40 pm | मराठी कथालेखक

कळली नाही म्हणजे Art असं आपलं साधं गणित :)
बाकी का कुणास ठावूक 'थोडा सा रुमानी हो जाये' (फार पुर्वी कधीतरी पाहिला होता) त्यातली नाना पाटेकरची बडबड आठवली, जी एं च्या कथा (त्यापण फार पुर्वी वाचल्या होत्या) त्यांची पण आठवणं झाली..त्यांची कथानकं तर अजिबात आठवत नाहीत (आठवायला कळालीच नव्हती) फक्त पुस्तकांची चित्रविचित्र नावं आठवतात (पिंगळावेळ , काजळमाया ई) ..
आता थोडं विषयांतर झालंच आहे तर, मिपावर कुणी जी एं च्या कथांचं रसग्रहण केलंय का ? किंवा करु शकेल काय ? मला त्या कथा कळायच्या नाही तरी वाचायला आवडायच्या, अगदी नेटाने वाचायचो

पैसा's picture

30 Jan 2017 - 4:05 pm | पैसा

काय कळलं नाय! एक व्हॉट्स अ‍ॅपवर तयार झालेली नव्वदोत्तरी कविता आठवली या लिखाणामुळे.