प्रिय सुपरहीरोस (कथा)

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
15 Jan 2017 - 7:22 pm

प्रिय सुपरहीरोस,
सर्वप्रथम तुझ्या शत्रुंचे आभार मानायला पाहिजे. कारण त्यांनी तुला पकडलं म्हणून तुला माझी आठवण झाली. तू माझी मदत मागितलीस म्हणजे नक्कीच माझी प्रसिद्धी तुझ्या कानांवर गेलेली असणार.

पण आधी काही गोष्टींची तुला आठवण करून द्यावीशी वाटते. तुला आठवत असेल ती रात्र जेव्हा तू मला तुझ्या शत्रुंच्या हातांतून वाचवलस.आपण माझ्या अपार्टमेंटच्या छतावर उभे होतो. आजुबाजुला आणि आपल्या दोघांच्याही मनांमधे मुसळधार पाऊस सुरू होता. माझे दोन्ही हात हातांत घेऊन तू म्हणालास, “ सॉरी डियर पण यापुढे मी तुला भेटू शकणार नाही.हे खूप रिस्की आहे, मी नेहमीच तुला वाचवायला नाही येऊ शकत.” एवढ्या पावसातही माझ्या डोळ्यातून बाहेर पडलेला अश्रू तू टिपलास, “ तू माझी कमजोरी बनू नयेस असं मला वाटतं.शिवाय मी जगाला वाचवत असतांना तुझ्या विचारांमुळे मी विचलित होऊ शकतो.म्हणून यापुढे आपण…” तुझा आवाज घशातच अडकला आणि तू मला घट्ट मिठी मारली. नंतर एकदाही वळून न बघता तू निघून गेलास. कसं सांगू तुला त्या शब्दांनी माझी काय स्थिती झाली ते. मी तुला विचलित करते! मी तुझी कमजोरी आहे!! त्यानंतर कित्येक दिवस मी रडत होते. माझी वेडी आशा होती की तुला तुझी चूक कळेल. पण तू परत आलाच नाहीस.

उत्तर द्यायला तू इथे नाहीस पण तरीसुद्धा विचारते…जर तुझे शत्रू मला तुझ्याविरुद्ध वापरू शकतात तर तुझ्या वडिलांना,भावाला, जिवलग मित्रांना नाही वापरू शकत? ते जाऊदे, जर तुझ्या शत्रूने रस्त्यावरून जाणाऱ्या कुणालाही पकडलं तर तू त्याला वाचवणार नाहीस? एवढ्या मोठ्या शहरातलं कुणीच तुझी कमजोरी नाही, फक्त मीच कशी??
आज तुझ्या शत्रूने तुला पकडलं म्हणून तुला माझी आठवण झाली. तेसुद्धा माझ्याबद्दल तुला कळालं म्हणून.पण एक सामान्य मुलगी म्हणून तू माझ्यावर प्रेम करू शकला नाहीस हे मी कसं विसरू रे? सॉरी मी तुला मदत करू शकत नाही कारण तुला मदत केल्यामुळे मी माझ्या कामापासून विचलित होऊ शकते. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, तू नसलास तरी या शहराला काहीच फरक पडणार नाही. जर यदाकदाचीत तू तुझ्या शक्तींचा वापर करून सुटलास तरी परत येऊ नकोस कारण हे आता माझं शहर आहे.
ऐकेकाळची तुझी,

तिने कागदाच्या शेवटी तिची सही खरडली आणि एक हळुवार फुंकर मारली. पांढऱ्या कागदाचा तो तुकडा तिच्या फ्लॅटच्या दरवाज्यातून अलगदपणे उडत गेला.
कागद दूरवर निघून गेल्यावर ती उठली आणि दमदार पावले टाकत बाहेर आली. सगळं शहर शांतपणे झोपल्यासारख वाटंत होतं.तिने डोळे मिटले आणि मन एकाग्र केलं. दूरवर शहरातल्या एका बदनाम वस्तीत एक मुलगी मदतीसाठी हाका मारत होती.
तिने डोळे उघडले आणि स्वताःला त्या २७ व्या मजल्यावरुन बिनधास्तपणे झोकून दिलं.
-------------------------------------

कथाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अॅस्ट्रोनाट विनय's picture

15 Jan 2017 - 7:49 pm | अॅस्ट्रोनाट विनय

ही एकच कथा चुकीने दोनदा पोस्ट झाली आहे. पोस्ट काढून टाकणे सभासदाच्या हाती दिसत नाही

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 12:48 pm | अॅस्ट्रोनाट विनय

दूसरी पोस्ट काढण्यात आलेली आहे

पद्मावति's picture

16 Jan 2017 - 2:24 pm | पद्मावति

छान आहे कथा.

कथा थोडी उलगडून सांगाल का? मला समजली नाही.

कथा थोडी उलगडून सांगाल का? मला समजली नाही.

कथा थोडी उलगडून सांगाल का? समजली नाही नीटशी.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 9:43 pm | अॅस्ट्रोनाट विनय

जसं सगळ्या सुपरहिरो चित्रपटामध्ये असतं तशीच एका सुपरहिरोची एक गफ्रे असते. तिला शत्रू kidnap करतात जेणेकरून हिरो तिला वाचवायला येईल आणि आयताच त्यांच्या तावडीत सापडेल. पण तो तिला वाचवतो आणि स्वतःपण सुटतो. तो मात्र तिच्यासोबत ब्रेकअप करतो कारण ती आपली कमजोरी आहे असं त्याला वाटतं. ती खूप वाट पाहते पण तो येतं नाही.
शेवटी तीसुद्धा जिद्दिला पेटून स्वतः काही superpowers गोळा करते, खूप मेहनत घेते आणि स्वतः superhero बनते. काही दिवसानी हिरो शत्रूच्या तावडीत सापडतो आपली जुनी गफ्रेकडे मदत मागतो. या पार्श्वभूमीवर वरील कथा घडते.
मुळात कुठलाही superhero चित्रपट पाहिला की मला काही प्रश्न पडायचे- एकतर शत्रू फक्त हिरोच्या मैत्रिणीलाच kidnap का करतात? त्याचे इतर नातेवाईकपण आहेत किंवा सामान्य नागरिकाला पकडल तरीपण तो त्यांना वाचवायला जाईलच. मग त्याच्या प्रेयसीला बिचारिलाच का कमजोरी दाखवल जात? दुसरा प्रश्न हा की नेहमी हिरोच हिरोइनला का वाचवतो? उलटपण होऊ शकतं न.
वरील विचारांमधुन सुचलेली ही कथा

शब्दबम्बाळ's picture

16 Jan 2017 - 10:52 pm | शब्दबम्बाळ

ठीक आहे प्रयत्न म्हणून पण अनेक मेजर लूप होल्स आहेत कथेत!
१, शत्रूने पकडले आहे तर सुपरहिरो हिला पत्र लिहून कॉन्टॅक्ट करतो का?
२. हिने लिहिलेले पत्र शत्रूचे लोक सुपरहीरोला वाचून दाखवणारेत का?
३. सुपरगर्ल म्हणून एका व्यक्तीला वाचवणे (भलेही तो तिचा एक्स का असेना!) तिचेही कर्तव्य नाही का?
इत्यादी....
तुम्ही DC कि मार्व्हल? ;)

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 11:53 pm | अॅस्ट्रोनाट विनय

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही फ्लॅश फिक्शन कथा आहे त्यामुळे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं न देता वाचकांना विचार करायला काही गोष्टी ठेवल्या आहेत. या प्रकाराची अपेक्षापण हीच असते. या कथांमध्तुये सांगितलेल कमी असतं अन दडलेलं जास्त. शब्दांमागे लपलेल्या कथा वाचकांना आपापल्या कल्पनेप्रमाणे शोधायच्या असतात. वरवर पाहता ते loopholes वाटू शकतात पण तसं नसतं. Sometimes it is a part of some bigger story.

१. तो तिला पत्र लिहून contact करतो असं कुठे म्हटलंय? संपर्क साधण्याचे इतरही मार्ग आहेत. शत्रूंना कळू न देता तिच्याशी संपर्क साधण्याचा काहीतरी मार्ग असणार त्याच्याकडे.

२. हा तर अगदी विनोदी प्रश्न झाला राजे. शत्रूच्या हाती पत्र द्यायच असतं तर तिने पोस्टाने नसतं का पाठवलं. तिने ते फक्त त्यालाच मिळेल अशी व्यवस्था नक्कीच केलेली असणार.

३. बरोबर पण पहिला मुद्दा हा की तो सामान्य मनुष्य नाही, superhero आहे. तो स्वतःला वाचवू शकतो याची तिला खात्री असणार. अन तसंही तीने त्याला वाचवलं नाही असं कुठे म्हटलंय मी? कदाचित ती भविष्यात त्याला वाचवेलपण :))

DC आणि Marvel असा भेद मी करत नाही.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

17 Jan 2017 - 12:11 am | अॅस्ट्रोनाट विनय

लेखकाने आपल्याला सगळंच सांगावं अशी सवय आपल्याला जडलेली आहे. Rather than descriptions, flash fiction is more about a moment. (तिच्या दृष्टीकोनातून) ज्याने तिला झिड कारलं त्यामुळे हताश न होता ती जिद्दिला पेटली अन याचं जिद्दीने एका सामान्य मुलीला असामान्य बनवलं. एकदिवस त्यालाच तिची गरज पडली अन ती त्याला ठणकावून नकार देते (तिच असं वागणं बरोबर की चुक हा मुद्दाच नाही )फक्त तिच्या जिद्दीच द्योतक असलेला हा एक क्षण मला पकडायचा होता म्हणून हे कथामाध्यम निवडलं अन्यथा लघुकथा लिहली असती ( त्यावेळी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहजपणे मिळाली असती)