गैरसमज

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
10 Jan 2017 - 10:11 am

गैरसमज होतात. कधीकधी खूप बोललो की आणि कधी खूप कमी बोललो म्हणून. आजकाल माझ्या स्वप्नातपण गैरसमज येतात. म्हणजे मी कुणाला काहीतरी बोलतो. मग समोरचा माणूस स्त्री असेल तर ढसाढसा रडायला लागते आणि पुरुष असेल तर करकचून भांडायला. मग काही वेळानी मी दिसतो. समजूत काढताना. मला तसं म्हणायचं नव्हतं, तुझी ऐकण्यात चूक झालीये, असं काही माझ्या मनात नव्हतं इत्यादी इत्यादी. कधी कधी उलटही होतं, म्हणजे स्त्री भांडायला लागते आणि पुरुष रडायला. पण प्रत्येक वेळेला समजूत मात्र मीच काढतो. कधी चुकूनही असं होत नाही की मी भांडतोय, रडतोय आणि समोरची पार्टी समजूत काढतेय. च्यायला आता पडू दे परत स्वप्न. नाहीच काढणार समजूत. भांडतो की नाही बघाच.

शेजारचा बर्व्या आला होता. वेंधळट माणूस एक नंबर. मला म्हणाला तुम्ही फार कचकच करता. जरा शांत रहात जा. मन कसं शांत समाधानी असलं पाहिजे. च्यायला, काल केलेलं भरलं वांग ह्याचा डबा कधीचा घरी पडून होता म्हणून देऊन आलो, म्हणलं बरं होईल डबा गेला एकदाचा घरातून की. सतत आपल्या डोक्यावर तलवार, डबा हरवला तर, खराब झाला तर, बाईनी घासताना आपटला तर. नकोच ब्याद त्यापेक्षा. घातली चार वांगी डब्यात आणि धडकलो जाऊन त्याच्या घरी. नेमका बर्व्या गेला होता सोसायटीच्या मिटींगला. बर्वे बाईंनी डबा घेता घेता हाताला चांगला स्पर्श करून बघितला की. स्पर्श कसला दाबलाच हात जवळ जवळ. तरी बरं संध्याकाळी गेलो होतो. चुकून रात्रीबित्री गेलो असतो तर खेचून नेलच असत बेडवर. सांगतोच आता बर्व्याला. जरा घरी लक्ष दे म्हणतो. नसते उद्योग करत फिरतो लेकाचा. खूप काय काय सांगणार होतो. नेमकं त्यावेळी समोरच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला. म्हणलं कशाला चार लोकांत काढायची बिचाऱ्याची. नुसतं "बरं बघतो" म्हणून आपटला दरवाजा तोंडावर. आलाच नाय पायजे परत.

तर एवढ्यावरून गैरसमज व्हायचं काय कारण आहे का? सगळ्या सोसायटीला सांगत बसला हरामखोर. तो फ्लॅट नंबर १०२ एक नंबर सायको आहे, शिष्ट आहे, तोंड उघडून चार शब्द बॊलायला काय पैसे पडतात का? मला तसं कुणी काही येऊन म्हणाल नाही. पण सगळ्यांच्या नजरा बोलतात. एवढी एवढी बारकी पोरं पण क्रिकेट खेळताना मुद्दाम माझ्या समोर बॉल मारतात. पण तोंड उघडून कुणी मागेल तर खरं. मी पण मग हलत नाही. येतो कोणतरी पळत मग. पळा म्हणावं. नाहीतरी खेळायलाच आलेले असतात. आता ह्यांची फिल्डिंगपण मीच केली तर हे काय माशा मारणार? "अंकल, बॉल द्या" म्हणाल एखादं कार्ट तर हातात नेऊन देईन की पण म्हणतील कसे? ह्यांचे आईबाप बोलत असणार माझ्याविषयी घरी. त्याशिवाय का पोरं एवढी टरकलेली असतात? काय कारण ए का, लहान मुलांच्या मनात माझ्याविषयी काय भरायचं. पण एवढी अक्कल असती आईबापांना तर काय.

पण बरं झालं काय बोललो नाही बर्व्याला. परवा ऑफिसात डबा उघडला तर घरातला नेहमीचा वाटला नाही. टिशूपेपरनी पुसला जरा. बाई आजकाल भाजीत जरा जास्तच तेल टाकायला लागली आहे. मला खपवून दुसरं काम धरायचं असेल तिला. पुसल्यावर नाव बघितलं तर "सौ. वैदेही बर्वे हीस सप्रेम भेट". काय खत्रूड लोक असतील साले डबा काय भेट देतात. च्यायला म्हणजे आपण बर्व्याचा डबा दिलाच नाही का काय? मग त्यादिवशी वैदेहीनं, नाही नाही बर्वे बाईन हात धरला ते स्वप्न होतं का? असं कसं काय, चांगला हात धरला होता ना तिनी. हे काय अजून आठवलं की काटा येतोय. च्यामारी आपलाच डबा नेऊन दिला का काय मग? अजून काय केलं होतं आपण त्यादिवशी? ऑफीसातून आलो तेव्हा खाली बोर्ड लावला होता सोसायटीच्या मिटींगचा. सर्व सभासदांना सस्नेह निमंत्रण होतं म्हणे. दर दोन महिन्याला ह्यांना कसले इव्हन्ट सुचत असतात राव. डोक्याला ताप. आपण तर कधीच जात नाय असल्या मिटींगला. ऑफिसमधून येताना ठरवूनच आलो होतो. काही झालं तरी आज त्या बर्व्याचा डबा द्यायचाच. येतानाच वांगी आणली, चांगली नव्हती पण म्हणलं असू दे कुठं मला खायची आहेत. एक किलो घेणार होतो पण वैदेहीला सॉरी मला वांग अजिबात आवडत नाही. घरी येऊन मस्तपैकी मसालाबिसाला वाटला. वांगी चिरून त्यात भरला आणि मग उगीच जरा शिजवल्यासारखी केली. बर्व्याचा डबा शोधला. तसं बाईला सांगूनच गेलो होतो. डबा धुऊन ओट्यावरच ठेवा म्हणून. पण कुणाचा? च्यायला बाईनी पण डोकं लावायला नको. एवढं मी बर्व्याचा डबा, बर्व्याचा डबा जप करत असतो ते. माझाच डबा धुऊन ओट्यावर ठेऊन गेली वाटतं. तरीच असा घोळ झाला काय? म्हणजे मी सोसायटीचे सगळे लोक मीटिंगला गेले असताना बर्व्याकडं धडकलो काय? वैदेहीला सॉरी बर्वे बाईला वाटलं असणार मी तिलाच भेटायला गेलो. म्हणून तो शिरशिरी आणणारा ओघवता स्पर्श केला काय? म्हणजे मलाच सांगायला "मला कळलं तू का आलायस." काय नालायक बाई आहे. काहीही डोक्यात घालून घेते. तेपण आता लग्नाला चांगली चार वर्ष झाली असताना. ती आमच्याच सोसायटीत रहायला आली ना तेव्हाच मला वाटलेलं हे लक्षण काही खरं दिसत नाही. खरं तर मीच जाणार होतो घर बदलून. पण म्हणलं असू दे, जरा माझ्यासमोर राहिली तर कळेल तरी काय रंग उधळतीये. उगीच मी जायचो आणि ही भलत्याच लफड्यात अडकायची. त्यापेक्षा जे होईल ते होईल पण इथंच राहायचं. तर ही माझ्याशीच लफडं करायला लागली की. आणि वर बर्व्याला ओळख करून देताना म्हणते कशी "तू आणि इथे कसा काय? हा माझा फार चांगला मित्र होता." मित्र माय फूट. आणि तो पण होता. लाजच ठेवली नाही तिनी बर्व्यासमोर माझी. पण म्हणलं जाऊ दे आता संसारी गृहिणी वगैरे झालीये. कशाला जास्त काही बोला. तर बर्व्याला काय वाटलं कुणास ठाऊक. त्याला वाटलं असणार माझं तिच्यावर प्रेम आहे. त्यादिवशी जरा जास्तच आदळआपट झाली बर्व्याच्या घरी. नवीन घरात सामान लावताना काय एवढा आवाज होतो का?

तेव्हापासून मी जातच नाही वैदेहीसमोर. नकोच ती भानगड. उगीच माझ्यामुळं कुणाच्या संसारात विष कशाला कालवा. तरी तो बर्व्या साला बिनकामाची लगट करायला बघतो. बिनकामाचीबिमाची काही नाही. मला जळवायलाच. अक्खी चार वर्ष तू जिला बघून बघून उसासे सोडले, तुझ्याच नोट्स घेऊन पास झाली, कॉपी पण केली असणार, माझ्या मागचं बसायची. ती वैदेही झाली की नाही शेवटी सौ.वैदेही विश्वजीत बर्वे. एनिवर्सरी झाली म्हणे. त्याचा केक आणला होता. घेऊन आला होता डब्यात घालून. अरे एवढाच आनंद झालाय तर काप ना मोठा केक काप, पण सोसायटीला वाट. मला एकट्यालाच काय आणून देतो? आणि वर म्हणतो कसा, वैदेहीनं स्वतः बनवलाय. आता ती शिकतेय. हळू हळू करू सुरुवात बिजनेसची. भले समजूतदारपणाचा आव आणतो रे. अरे हिला जॉब करून दिलास तर चांगला तीस पस्तीस हजार पगार घेईलच की. पण तुला लेका बायकोनी घराबाहेरपण पडायला नको. तिच्यावर मरतात ना सगळे. मग तुला लोकांनी नावं ठेऊ नये म्हणून तिचं कौतुक करत तू फिरतो गावभर. या महिन्यात काय बेकिंगचा बिजनेस, दुसऱ्या महिन्यात काय शिवणकाम नंतर काय घरच्या घरी काहीतरी आर्ट करून विकायचं. अरे काय जोक आहे का? तिला विचार ना तू बाई तुला नक्की काय करायचं आहे. बघ सांगते की नाही मला बाहेर जाऊन जॉब करायचा आहे. पण तू लेका तुला जगाच्या चांभार चौकशा करताना बायकोच्या मनात काय चाललं आहे कसं कळणार. त्या केकनी सगळा घोळ केलाय. गप पडून होतो घरात. काय गरज होती का एवढी चार वेळा बेल वाजवून उठवायची. आता परत जाऊन त्याचा डबा द्यायला लागणार. माझा डबा पण घेऊन यायला लागणार. उद्या संध्याकाळी जातो. बर्व्या ऑफिसातून घरी जाताना दिसला की लगोलग जातो. उगीच गैरसमज नको कुणाचा.

श्या, बर्व्या पण कधी वेळेवर घरी येत नाही. आता एवढी सुंदर बायको असून काय करायची? ह्या माणसाला त्याची जाणीव नको? ह्याच्या घरी जायची पण चोरी. चोरी कसली पण? आपल्या मनात आता तसलं काही नाही. वैदेहीच्या मनात असलं तर असलं. काही झालं तरी मी चांगला मित्र होतो तिचा. होतो? हो हो होतोच. आता परत तशी मैत्री आमच्यात होणं शक्य नाही. काय धमाल केली होती. कॅन्टीनमध्ये पडीक असायचो. एकाच कपातून चहा पिलाय साल्या बर्व्या. तू नवरा होऊन पण तुला मिळाला नसणार तो चान्स. तसला चान्स मिळायला रोमँटिक असावं लागतं. एकदा घेऊन गेलो होतो ना पर्वतीवर. हाफहूफ हाफहूफ करत चढली होती. तिची नवीन चप्पल चावली होती तिला. एक हात तिनं माझ्या कमरेभोवती घातला होता, मी तिच्या खांद्यावर हात ठेवला होता. मित्र म्हणते मला. अख्ख्या पर्वतीने त्यादिवशी बघितलं होतं, एवढी काळजी तर नवरा पण घेत नाही बायकोची. खाली बसलेल्या भिकारी बायका म्हणत होत्या ए पोरी जोडी लाखात एक आहे, हिचे काय कान बधीर झाले होते का? लंगडत लंगडत का होईना पण तिला घेऊन गेलो होतो पर्वतीवर. आणि हा बर्व्या? काय पाहिलं ह्याच्यात. साला ऑफिसातून येत पण नाही लवकर. मी कधीचा आवरून बसलोय. हा आला की लगेच जाईन म्हणून. ह्याच्यामुळं माझं सगळं रुटीन ढेपाळलं. जाऊनच यावं. काय करायचं आहे? एक डबा फक्त घ्यायचा आहे ना. असा किती वेळ लागणार आहे? थांबेन दारातच. नाहीतर आज नुसता सांगून येतो डबा हवाय म्हणून आणि उद्या जाईन परत. नको नको दोन दोन वेळा कोण जाईल वैदेहीसमोर. जे काय असेल ते आजच सोक्षमोक्ष लावून येतो. आणि सांगून पण येतो, इथून पुढे अजिबात असले डबे वगैरे देणे प्रकार करू नका. मला सारखं सारखं घरी काहीतरी करून डब्यात देणं जमत नाही. नको असलं काही नको सांगायला. ती विचारायची लग्न का नाही करत मग? मग काय सांगणार केलं होतं, एका वर्षात निघून गेली माहेरी. पटलं नाही माझ्याशी. च्यायला माझ्याशी पटत नाही म्हणजे काय? माझ्यासारखा प्रेम करणारा नवरा असेल का कुठे जगात. पण नकोच लग्नाविषयी काही बोलायलाच नको. आपला आपण डबा घ्यावा आणि परत यावं.

ही काय वेळ आहे का झोपायची? कधीचा बेल वाजवतोय. वैदेही दार उघड ना. दाराजवळ पावलं वाजतायत. आली वाटत. दार उघडलं की. उघडू नये असंच वाटत होतं पण उघडलं. ठोका चुकला का काय काळजाचा. ही काय आता अशी न्हाऊन बिऊन आलीये दार उघडायला? ओले केस, पाठीवर. कुर्ता पण ओला झालेला. हातात टॉवेल तसाच. अजून अत्तर लावते वाटतं. अर्रर्र मी आत कधी आलो? ही मला आत ये म्हणाली काय? कसं काय असं अंघोळ झाल्या झाल्या आत घेते कुणालाही. कुणालाही काय मित्रच आहे मी तिचा. हो हो आहेच. बोलायचं आहे मला तिच्याशी. खूप काही विचारायचं आहे. कुठे हरवली होती एवढे दिवस? मला जे ती न बोलता कळलं ते खरं आहे का विचारायचय एकदाच. फक्त एकदाच. पण काय होणार आहे विचारून? आता ती दुसऱ्या कुणाची तरी झालीये. आपला आपण डबा घ्यावा आणि निघावं बर्व्या यायच्या आत हेच बरं. चहा पण करून आणला. पुन्हा तोच स्पर्श. ए बाई, एकदा सांग ना तुझ्या मनात काय आहे. आपली नजर ढळत नाहीये का हिच्या केसावरुन? इकडंतिकडं बघितलंच पाहिजे. काहीतरी बोललंच पाहिजे.

"छान दिसतियेस." भले शाबास. हेच हेच बोलायला सुचलं. दुसरं काही सुचलं नाही? छान आहे घर, छान आहे टीवी, छान आहे चहा सगळं सगळं सोडून सरळ छान दिसतेस. गैरसमज होईल तिचा नाहीतर काय? आणि वर जरा तिचा स्पर्श झाला की शहारे. थांबायला हवं इथंच. पण ही तर एकदम रिलॅक्सच आहे. हिला सवयच दिसतेय स्वतःला छान म्हणून घ्यायची. आता आहेच छान तर त्यात तिचा दोष तरी काय म्हणा? का ही अजून गुंतलेली आहे आपल्यात?

"विशूला खूप आवडतं....मी संध्याकाळी अंघोळ करून फ्रेश दिसले की त्याचा सगळा थकवा जातो असं म्हणतो.." विशू विशू? त्या बर्व्याला ही लाडानं विशू म्हणते? लायकी ए का त्या माणसाची. आणि काय लहान मुलांसारख्या हाका मारायच्या? नवर्यात आणि मुलात काही फरक असतो की नाही. हे असले फाजील लाड नाही झेपत आपल्याला. किती वर्षांचा आहे विशू? विचारावं का? अशी उखडेल ना. करूया का हिची गंमत. आधी करायचो तशीच. आधी आणि आता मध्ये फरक आहे. सौ.वैदेही विशू सॉरी विश्वजीत बर्वे बाई आहेत आता ह्या. मागचं सगळं विसरून गेलोय ना मी? मग आता इथे हिच्यासमोर बसून भूतकाळ उगाळून काय उपयोग?

"तू, तू ठीक आहेस ना? तू कुणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतास बरीच वर्ष. तुला शोधत होते मी." मला कशाला शोधत होती आणि? माझ्या नोट्स परत करायला का? पण सगळ्या तर घेतल्या होत्या मी चेक करून. मग काय विसरल असेल हिच्याकडे?

"मजेत आहे. का शोधत होतीस?" हे बरंय. मुद्द्याचं बोललं पाहिजे. ना कमी ना जास्त.

"कसं सांगू तुला..." वा सगळं करून भागून शेवटी हीच मला विचारणार कसं सांगू? हिचं स्पष्टीकरण पण मीच देऊ का आता?

"...."

"त्यादिवशी कॉलेजमध्ये मी पत्रिका दिलेली आपल्या ग्रुपला ती माझ्या बहिणीच्या लग्नाची होती. सगळ्यांनी तुला उचकवायला ती माझ्या लग्नाची आहे म्हणून सांगितलं." ओह शिट! ओह शिट ! शिट ! शिट! तू बोलू नको इथून पुढे एक अक्षर बोलू नको. हे सगळं तेव्हा सांगायला काय झालेलं? आता सांगू नको. काही सांगू नको. माझ्या कानात कुणी भुंगा सोडला आहे का? मला नुसतंच गुणगुणगुण आवाज का येतोय? गुणगुण नाही घर्रर्रर्र घर्रर्रर्रर्र. कुणीतरी मिक्सर लावलाय का? मीच लावला होता का. भरली वांगी करायची होती. मसाला वाटायचा होता. मिक्सर चालूच राहिलाय का? प्लीज वैदेही बोलू नकोस. काही बोलू नकोस.

"आणि तू उघडून सुद्धा पाहिली नाहीस. तुला खरंच वाटलं ते. मी तुला तेव्हा किती समजवायचा प्रयत्न केला पण तू काही ऐकूनच घेत नव्हतास... कॉलेजनंतरही मी तुला कायम शोधत राहिले. पण तू कुठे गायब झालास कुणालाच कळलं नाही. शेवटी मागच्या वर्षी घरच्यांनी अजिबात ऐकलं नाही आणि मग लग्न केलं. ह्या सगळ्या गोंधळात पहिल्या जॉबला जॉईन व्हायच होतं ते जॉइनिंग मी मिस केलं. मग ह्या ना त्या कारणाने नाहीच मिळाला परत जॉब. कधी खूप गॅप झाली म्हणून तर कधी रिलोकेट व्हावं लागत होतं म्हणून. मला वाटायचं तू इथेच असशील जवळ कुठेतरी. मी लांब गेले तर उगीच अजून गैरसमज होईल. मग हळू हळू माझीच इच्छा गेली. मला माझं स्वतःच काहीतरी करायचं होतं. आणि बघ ना नशीब. तू परत भेटलास ते बरोबर आमच्या एनिव्हर्सरी आधी."

समजूत.. माझी कुणीतरी समजूत काढतंय का? की माझा गैरसमज आहे हा सुद्धा? माझी, माझी कोण का समजूत काढेल? मी मी मुलांनी केलेल्या एका गंमतीला मनाला लावून घेतलं. लहान मुलांसारखं. नुसतं लावून घेतलं नाही तर जिच्यावर मरलो, जिच्यासाठी रात्रं रात्रं जागून काढल्या त्या वैदेहीला एक शब्द न बोलता दूर केलं. काढून टाकलं आयुष्यातून. टाकलं ते टाकलं ईर्ष्येपोटी मी लग्न केलं. माझ्याशी लग्न न करता ती कशी सुखी होईल? तिच्याआधी मीच सुखी होईन. पण ज्या ईर्ष्येन लग्न केलं, त्या इर्षेने प्रेम नाही केलं. नाही करू शकलो. मी बायकोला समजून नाही घेतलं. तिनं मला. मग आता का माझी समजूत काढतेय ही. मला जायलाच हवं. आता नाही गेलो तर बहुतेक स्फोट होईल मिक्सरचा. झाकण उडेल सगळं वाटण घरभर होईल. मग मलाच स्वच्छ करावं लागेल. बाईला सांगून काही उपयोग नाही. डब्याचा घोळ घातलाच ना त्या दिवशी. घर्रर्रर्रर्र घर्रर्रर्रर्र घर्रर्रर्रर्र

"पण तुला खरं सांगू, मी खूप आनंदात आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. विशू इज सिम्पली टू गुड. खूप जपतो मला. माझं मन कधीच रमलं नसतं ९ ते ५ च्या नोकरीत. त्यानं मला खूप सपोर्ट केलंय. आई तर म्हणते लाडावून ठेवली आहे नुसती. पण बघच तू मी नक्की काहीतरी करणार आहे ,वेगळं अगदी माझं स्वतःच! "

"मी येतो आता."

"सॉरी रे, मला कळतच नव्हतं तुझ्याशी कसं बोलू? पण विशूच म्हणाला त्याच्याशी एकदा मोकळेपणाने बोल. बरं वाटेल तुलाही आणि त्यालाही."

"बरं, निघतो."

धाड! आपटल ना! तिनी दार आपटलं ना. पण कशाला आपटेलं ती दार? एवढा वेळ चांगलं बोलत होती की. काही मनात नाही तिच्या. उगीच माझ्या मनाचे खेळ आहेत. एका शुल्लक गैरसमजामुळं केवढी मोठी गोष्ट गमावली. केवढा मोठा आनंद. ही वैदेही, ती मला शोधत होती. तिला माझी समजूत काढायची होती. तिनं नाईलाजानं लग्न केलं. तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. माझ्याशी लग्न... वैदेही घर्रर्रर्र घर्रर्रर्र घर्रर्रर्र

हे माझंच घर आहे ना? मग सगळं जिथल्या तिथे का आहे? केवढा वेळ मिक्सर चालू होता. कुणी बंद केला? हे काय वैदेही माझ्या बाजूला का बसलीये पण? हिला काय घरी जायचं नाही का? आणि विशू.. नाही.. नाही बर्व्या कशाला आलाय इथे? मी नक्की कुठे आहे?

"आता कसं वाटतंय?"

"ठीक आहे, पण तू इथे?"

"अरे तू आला होतास ना घरी. परत यायला निघालास आणि चक्कर येऊन पडलास जिन्यात. थँक गॉड, विशू वरती येतच होता. त्यानं तुझ्या हातातल्या चावीन दार उघडून तुला इथे सोफ्यावर झोपवलं. डॉकटर येतीलच इतक्यात. "

काय थापा मारते. मी कधी गेलो होतो हिच्याकडे? आणि हा बर्व्या काय ऐकून घेतो. त्याला चीड नाही येत का हिच्या खोटं बोलण्याची. पण ही खोटं कशाला बोलेल. तीच तर वाट पहात होती माझी. थांबली होती माझ्यासाठी. छान न्हायली होती. तिचे केस ओलसर होते, कुर्ता ओलसर होऊन चिकटला होता पाठीला. अत्तर लावलं होतं. बोलत होती, खूप बोलत होती. मनापासून बोलत होती. खूप आनंदात होती. वैदेही आणि विशू डॉकटर आल्यावर गेले. त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला होता. तिन त्याच्या कमरेभोवती हाताचा विळखा घातला होता. खूप सुखी दिसतेय वैदेही! खरंच सुखी आहे वैदेही? की माझा गैरसमज झालाय?

कथा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

10 Jan 2017 - 12:37 pm | ज्योति अळवणी

छान जमली आहे कथा

एस's picture

10 Jan 2017 - 12:49 pm | एस

राराटच कथा.

खेडूत's picture

10 Jan 2017 - 1:02 pm | खेडूत

एकदमच झकास कथा, आवडली! :)

प्रचेतस's picture

10 Jan 2017 - 1:20 pm | प्रचेतस

मिपावर एकाहून एक सरस गूढकथा येताहेत.

ग्रेंजर's picture

10 Jan 2017 - 1:30 pm | ग्रेंजर

क्या बात!!!!!! मस्त जमलीये.

तुषार काळभोर's picture

10 Jan 2017 - 2:47 pm | तुषार काळभोर

ऑस्सम!!

पद्मावति's picture

10 Jan 2017 - 3:07 pm | पद्मावति

वाह! मस्तच.

मराठी कथालेखक's picture

10 Jan 2017 - 3:37 pm | मराठी कथालेखक

मिपाच्या पहिल्या पानावर सध्या रामदास , गवि आणि रातराणी यांच्या कथा दिसत आहेत.
नव्या थीमची नवलाई कायम असतानाच पहिल्या पानावर तीन दिग्गज ...क्या बात है...

रातराणी's picture

10 Jan 2017 - 9:59 pm | रातराणी

नाही ओ, मी रामदासकाका आणि गविंची बरोबरी स्वप्नातसुद्धा करू शकणार नाही.

मराठी कथालेखक's picture

11 Jan 2017 - 10:49 am | मराठी कथालेखक

तुम्ही नाही हो.. तुमच्या कथा करतात...

- ('कळते रे' चा फॅन )

पाटीलभाऊ's picture

10 Jan 2017 - 3:51 pm | पाटीलभाऊ

मस्त आहे कथा...!

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jan 2017 - 4:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली
भारीच लिहिली आहे.
पैजारबुवा,

विनिता००२'s picture

10 Jan 2017 - 4:30 pm | विनिता००२

छान कथा!

सस्नेह's picture

10 Jan 2017 - 4:30 pm | सस्नेह

भारी कथा.
कथानायकाच्या मनातील द्वंद्व शब्दात उतरवणे चांगले जमलेय.

मस्त कथा. शेवटपर्यंत उत्सुकता कायम राहिली.

जव्हेरगंज's picture

10 Jan 2017 - 6:28 pm | जव्हेरगंज

मनाचा खेळ जबरदस्त रंगवलाय. शेवटी काहीतरी ट्विस्ट असेल वाटलं होतं. तो सापडला नाही.

पण कथा भारीच आहे!

संजय क्षीरसागर's picture

10 Jan 2017 - 10:17 pm | संजय क्षीरसागर

शेवटी काहीतरी ट्वीस्ट असेल वाटलं होतं. तो सापडला नाही.

हेच लिहीणार होतो.

संजय क्षीरसागर's picture

11 Jan 2017 - 10:36 am | संजय क्षीरसागर

लेखिकेनं पुरुषाच्या भूमिकेतून लिहीणं जालीम जमवलंय ! त्याबद्दल खास कौतुक. वाचतांना दोन वेळा आयडी पुन्हा पाहावा लागला. लिहीत राहा.

तुषार काळभोर's picture

11 Jan 2017 - 4:11 pm | तुषार काळभोर

मी पण दोनतीन वेळा वरती जाऊन आयडी पाहिला होता.

Ram ram's picture

10 Jan 2017 - 7:05 pm | Ram ram

उत्कृष्ट लेखन.

सर्व वाचक आणि प्रतिसादकांना अनेक धन्यवाद :)

Rahul D's picture

10 Jan 2017 - 11:28 pm | Rahul D

जबरदस्त.

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2017 - 11:47 pm | टवाळ कार्टा

लय म्हंजे लयच भारी

गवि's picture

11 Jan 2017 - 2:22 am | गवि

उत्तम..

भारीच! कथा आवडली आणि शेली तर फारच उत्तम आहे!

नावातकायआहे's picture

11 Jan 2017 - 6:04 am | नावातकायआहे

आवडली!! जबरदस्त!!!

साहेब..'s picture

11 Jan 2017 - 10:25 am | साहेब..

आवडली

वाचताना सुरूवातीला थोडा गोंधळ उडाला खरा, पण शेवटाकडे जाता जाता व्यवस्थित समजत गेली कथा.

नीलमोहर's picture

11 Jan 2017 - 10:41 pm | नीलमोहर

असा गुंता होता तर,

रातराणी's picture

12 Jan 2017 - 10:29 am | रातराणी

सर्वांचे पुन्हा एकदा आभार :)

पैसा's picture

12 Jan 2017 - 5:08 pm | पैसा

आवडली कथा!

लालगरूड's picture

14 Jan 2017 - 10:27 pm | लालगरूड

मला समजली नाही.कोणी सांगेल ?