छोट्यांचे पुस्तकविश्व

रुपी's picture
रुपी in जनातलं, मनातलं
24 Nov 2016 - 6:23 am

.inwrap
{
background-color: #DFEDF8
}

1

why_read

टी.व्ही. पाहण्याऐवजी वाचन का करावे यासाठी हे वरचे चित्र पुरेसे बोलके आहे.

मुलांना वाचता यायला लागल्यावर वाचण्यासारखी पुस्तके आपल्याकडे मिळतात, पण अगदी लहान वयापासून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण मोठ्यांनीच त्यांना पुस्तके वाचून दाखवण्यास सुरुवात केली तर ते पुस्तकांनाही खेळण्यांइतकंच महत्त्व देतात. सुंदर, रंगीबेरंगी, सोपी, सहज वाक्ये असलेली; हाताळायला सोपी आणि सहज आवरून ठेवता येतील अशी पुस्तके अगदी चार-पाच महिन्यांच्या बाळांनासुद्धा आकर्षित करतात. माझा अनुभव सध्या तरी अक्षरओळख असलेल्या, पण अजून शब्द, वाक्ये वाचू न शकणार्‍या माझ्या मुलाच्या पुस्तकसंग्रहाइतकाच मर्यादित आहे. पण हा अनुभव इतका सुखद आहे की असाच अनुभव सगळ्या पिल्लांना आणि त्यांच्या कुटुंबातल्या मोठ्यांनाही मिळावा असे नेहमी वाटते.

kidsbooks

मूल झाल्यावर आमच्याकडच्या पुस्तकांच्या संग्रहात आगळीवेगळी भर पडू लागली. मुलांसाठीची पुस्तके हळूहळू वाढत जाऊन आता त्याचाच वेगळा असा संग्रह झाला आहे. अगदी मूल बसू लागले की त्याच्याजवळ बसून वाचून दाखवता येण्याजोगी पुस्तकेसुद्धा यात आहेत. अगदी तान्ह्या बाळांसाठी कापडी पुस्तके. मुले ती तोंडात घालो नाहीतर कुठेही लोळवोत, धुतली की साफ! यातही वेगवेगळ्या जाडीचे, वेगवेगळे पोत असलेले, असे अनेक प्रकारचे कापडाचे तुकडे वापरलेले - जेणे करून मुलांना वेगवेगळ्या "टेक्श्चर्स"ची सवय होईल. काही कापडी पुस्तकांत इलेक्ट्रॉनिक सर्किट बसवून वेगवेगळ्या पानांवरची बटणे दाबली की वेगवेगळे आवाज ऐकू येतील अशी सोय असते. मग त्यात भूभूचा, हम्माचा, खेळणी खाली पडल्याचा असे विविध आवाज असू शकतात आणि मुलांना बोटाने थोडा जोर लावून आवाज निघेल हे शिकता येईल हा हेतू.

clothbooks

मी इंजिनिअरिंगला असताना एका मैत्रिणीने मला तिच्या मामाने त्यांच्या बाळासाठी परदेशातून आणलेल्या पुस्तकाबद्दल फार कौतुकाने सांगितले होते. Ball चा B असलेल्या पानावर बॉलच्या चित्राऐवजी बॉलसारखे रबरी मटेरियल लावलेले आहे असे काय काय तिने सांगितले तेव्हा एखाद्या "पुस्तका"त हे कसे साध्य होऊ शकत असेल असा मी कित्येक दिवस विचार करत होते. कारण तोपर्यंत मी पातळ कागदाची पाने असलेलीच पुस्तके पाहिली होती. इथे आल्यावर लहान मुलांसाठीची पुठ्ठ्यासारखी जाड पाने वापरून बनवलेली पुस्तके पाहून मग ते लक्ष्यात आले! आणि बरे वाटले की निदान मुले ती फाडू शकत नाहीत. शिवाय त्यामुळे पुस्तकांना एका बॉक्ससारखा आकार मिळतो, त्यामुळे आणखी कितीतरी वेगवेगळ्या युक्ती/ कल्पकता वापरून आकर्षक पुस्तके बनवता येतात. अर्थात या सर्वांमुळे पुस्तके बरीच महाग असतात, पण वापरलेली वस्तू बरेच जण वापरत असल्यामुळे पुस्तकेही इथे सर्रास एकाकडून दुसर्‍याकडे दिली जातात. शिवाय ठराविक महिन्यांनी लायब्ररीत बुक-सेलमध्येही नगण्य किमतीत विकत घेता येतात.

माझ्या लेकाचे डॉक्टर त्याच्या दर वेळच्या तपासणीच्या वेळी त्या-त्या वयाला अनुकूल अशी पुस्तके भेट म्हणून द्यायचे. त्यांत वेगवेगळ्या रंगांची ओळख व्हावी असे एक पुस्तक होते. एकात मूल बसतानाचे, रांगतानाचे, उभे राहतानाचे असे फोटो असलेले. मग आम्ही मुलाला ते ते चित्र दाखवले की तो ते ते करून दाखवायचा.

जवळजवळ तीन वर्षे वय होईपर्यंत या पुस्तकांत कमीत कमी शब्द आणि जास्तीत जास्त प्रमाणात चित्रे असा भर असतो. त्यातही सुरुवातीला अगदी सोपे आकार, उगीच रंगांची, आकारांची खिचडी नाही - जेणे करून मुलांना पुस्तकावर "फोकस" करणे सोपे जावे. मग हळूहळू त्याला वेगवेगळे प्राणी, बोट, गाड्या असलेली पुस्तके आणली. नंतर अंघोळ करणे, पावसात भिजणे, पोहणे अशी पाण्यातल्या मजेशी निगडीत, घरापासून शाळेत जाईपर्यंत रस्त्यात काय काय दिसते अशी पुस्तके दिली. यात अगदी सिग्नलला कोणता रंग असल्यावर जायचे, थांबायचे; पादचारी, अ‍ॅम्ब्युलन्स असेल तर गाडी हळू चालवायची, बाजूला घ्यायची; फ्री-वे आला, बाग, शाळा आली अश्या अगदी रोजच्या प्रवासातल्या गोष्टी समजावून सांगता यायच्या. त्यातही मग गाडी चालवताना नियम पाळायचे, खाणाखुणा बघायच्या हे मनावर बिंबवण्यासाठी २-३ पाने असणार! शिवाय, स्वतःची गाडी स्वच्छ ठेवायची, तिला अधूनमधून ऑईल आणि गॅसोलिन (पेट्रोल) ची गरज असते हेही नमूद केलेले. कशात आकड्यांची चढत्या-उतरत्या क्रमाने ओळख, तर कशात अक्षरांची. कुठे वेगवेगळ्या कीटकांची दुनिया, कुठे समुद्रातली किमया.

cars

"गोइंग टू बेड बुक" मध्ये सूर्यास्त झाल्यावर व्यायाम, ब्रश, अंघोळ करायची, मग हळू हळू कशी झोपण्याची तयारी करायची हेच वाचता वाचता आम्ही त्याला झोपवायचो. "बोट्स" आणि "ट्रेन्स" च्या पुस्तकांतून त्याला दोन्हीच्या वेगवेगळ्या प्रकारांची ओळख तर झालीच, पण कुठे बोटींमधली माणसेच मोज, आम्ही वाचत असताना हातवारे कर, रस्त्यांत आम्हाला ट्रेन दिसते तेव्हा "इथे रेल-रोड क्रॉसिंग का नाही?" अशा बर्‍याच प्रकारे चौकसपणा यायला लागला. पावसात रूळ तुटल्यावर भर पावसातही कामगार ते जोडून पूर्ववत करतात, आणि एका बससमोर बेडूक आल्याने कशी ती पुढे जाऊ नाही शकत असे काय काय प्रसंग! ट्रक्सचे एक पुस्तक आमच्या एका शेजारणीने दिले. ते तर तिच्या नवर्‍याचे ७० च्या दशकात घेतलेले आहे! आता थोडे मोडकळीस आले आहे, पण विशेष म्हणजे बरेच संदर्भ अजूनही लागू होतात. फोन, वीजप्रवाह दुरुस्तीसाठी आलेले ट्रक, कचर्‍याचा ट्रक, फायर-ट्रक, सामानाची वाहतून करणारा ट्रक असे सगळेच प्रकार. रस्ते झाडण्यासाठी इथे सध्या तर ट्रक असतातच, पण ४०-५० वर्षांपूर्वीसुद्धा होते हे पाहून खरंच थक्क व्हायला होते. रस्त्यात क्लिनिंगचा ट्रक दिसला की तो पाहत राहायला तर त्याला आवडतंच, पण घरीही हातात झाडू घेऊन घरभर "मी क्लिनिंगचा ट्रक आहे" म्हणत तो पळत राहतो. तेवढीच जरा साफसफाई!

t1

t2

इथल्या कितीतरी प्रथांची ओळख या पुस्तकांतून होते. हॅलोविनच्या वेळी एखाद्या पम्पकिन पॅचमध्ये जाऊन तिथे करण्याजोग्या गोष्टी तर तंतोतंत जुळतातच, पण हे मोठ्ठे भोपळे ठेवण्यासाठीच्या कार्ट सुध्दा तश्याच! तीच गोष्ट "पूह" आणि त्याच्या मित्रांना एका सकाळी सापडलेल्या पम्पकीनची - तो सर्वांमध्ये वाटायचा म्हणून ते त्याचा "पाय" बनवून एकत्र जेवतात याची! एका कोंबडीला कसे एकदा गहू सापडून ती तो पेरून पुन्हा गहू आल्यावर, झोडपणी करून, दाणे काढून, ते दळून पीठ घेऊन त्याचा ब्रेड बनवते. प्रत्येक कामाच्या वेळी तिच्या तीन मित्रांना मदतीसाठी बोलावते, दर वेळी ते कधी पतंग उडव, कधी झोका खेळ असे काय काय करत राहतात, पण मदतीला येत नाहीत. शेवटी ब्रेड खायला यायला मात्र एका पायावर तयार असतात, पण मग ती त्यांना देत नाही आणि फक्त स्वतः आणि तिची पिल्ले तो खातात. शाळेत शिकलेली "भाकरीची गोष्ट" या चित्रांशिवाय तीन वर्षाच्या मुलाला समजावणं यामुळे नक्कीच सोपं गेलं! मॅनर्सच्या पुस्तकातून बारीक-सारीक गोष्टींत "सॉरी", "थँक्यू" म्हणणं समजावता आलं, तर प्री-स्कूलच्या पुस्तकातून दाखवून एक नवीन टप्पा सहज पार पाडता आला. अगदी शाळेत आल्यावर जॅकेट कुठे टांगायचे, स्नॅक्स केव्हा खायचे, आर्ट, म्युझिक, अभ्यासाची वेळ हे सगळे चित्रांतून दाखवलेले आणि साधारण सगळ्या प्री-स्कूल्समध्ये ते तसेच असते. आणि पुस्तकातल्या त्या शाळेचे विद्यार्थी म्हणजे मोर, गाढव असे सगळे मित्र!

pumpkin

आमच्यासाठी त्याच्याबाबत आत्तापर्यंत सर्वांत आव्हानात्मक टप्पे म्हणजे त्याचे "पॉटी-ट्रेनिंग" आणि त्याच्या खेळण्यांवर, आणि आई-बाबांवर हक्क सांगायला आलेले लहान बाळ! यावेळीसुद्धा ही पुस्तकेच मदतीला धावून आली! खरे तर त्याच्या आयुष्यात हे दोन्ही टप्पे एकदमच आले. त्याच्या पॉटी ट्रेनिंगसाठी आम्ही आधी हवा तितका वेळ देऊ शकलो नाही आणि प्रकरण जरा हाताबाहेर जायला लागलं! एक शेजीबाईने दिलेले आणि एक लायब्ररी सेलमधून अशी छान पुस्तके मिळाली. त्यातल्या एकात फ्लशचा, टिश्यु रोल फिरवतानाचा आणि अगदी "अ‍ॅक्सीडेंट" झाल्यानंतरचासुद्धा आवाज काढणारे बटन्स आहेत! मग "तू पॉटीवर बसलास तर ते पुस्तक वाचू" असे आमिष दाखवून त्याला प्रोत्साहित करायचो.
त्याला न घेता घरात आलेल्या नवीन बाळालाच आई सारखी का घेते हे न समजणारा माझा लाडका पुस्तकातही तसे पाहिल्यावर कुठे शांत झाला! त्याच्या डे-केअरमधल्या बाईंनीसुद्धा मुद्दाम अशी लहान भावंड झाल्यावर वाचून दाखवण्याची पुस्तके दिली. बाळ सारखे का रडते, फक्त दूधच का पिते अश्या प्रश्नांच्या उत्तरांपासून त्याला बरोबर घेऊन संध्याकाळी फिरायला जायचे असे सगळेच त्यात दाखवलेले.

baby

खूप उत्साह असलेला डायनो जेव्हा लहान भावाला मारतो, तेव्हा "तुझे हात मदतीसाठी वापर, मारण्यासाठी नाही" असे पानोपानी भावंडे, आजी, आई यांना कशी मदत करायची ते दाखवणारे पुस्तक तर एका वाक्यात किती काय शिकवून गेले. त्यालाच कधी फटका द्यायचा विचार केला की ते वाक्यच मलाही थोपवून धरते. लहान भावाला घेऊन "डिगर" मधून फिरणारा डिगरमॅन त्याचे काम किती रोचक आहे हे खडकाळ जागी बाग बनवून दाखवून देतो. "ऑटर द पॉटर - अ टेल अबाउट वॉटर" मधला ऑटर वाटेत भेटणार्‍या मित्रांना ज्युस-सोडा पिण्यापासून परावृत्त करत पाणीच कसे आरोग्यासाठी उत्तम आहे हे सांगत असतो.

d1

d2

रेनबोच्या एक पुस्तकात प्रत्येक पानावर त्या त्या रंगाची ओळख आहे. शिवाय पान उलगडले की एकेका रंगाची रिबिन ताणली जाऊन एक पट्टा बनत जातो. दुसरी, तिसरी अश्या सगळ्या रिबिन्स उघडून शेवटी इंद्रधनुष्य बनते. "टेन लिटल लेडीबग्स" हे पुस्तक माझे फारच आवडते आहे. हे लेडीबग्स कधी वेलीवर, कधी कुंपणावर, कधी समुद्रकिनारी, तर कधी पोळ्याजवळ बसलेले असतात, उडत असतात. दर वेळी तिथे फुलपाखरू, नाकतोडा, मासा, मधमाशी असे कुणी कुणी येतात आणि एक-एक लेडीबग कमी होत जातो. यातले प्रत्येक पान म्हणजे रंगांची उधळण आहे, आणि तरीही बटबटीतपणा नाही. अगदी रोज फक्त पाने उलटून बघत राहिले तरी उदासपणा कुठल्या कुठे पळून जाईल इतके सुंदर!

rb_lb

फक्त काही ना काही शिकवण देणारीच पुस्तकेच यात नाहीत बरं. काही अगदी मजेशीर पुस्तके तर आमची फार आवडती आहेत! त्यातले सध्या पारायणं करत असलेले "सिली सॅली"चे सर्वांत वर. यात ही सॅली, खाली डोकं वर पाय करत हातांवर आणि पाठमोरी एका गावाहून दुसरीकडे चाललेली असते. वाटेत भेटणार्‍या कुणाबरोबर नाचत, कुणाबरोबर गात आणि त्यांनाही असेच "walking backwards upside down" करत नेते. सर्वांत शेवटी 'नेडी बटरकप' येतो, तो सर्वांना गुदगुल्या करत असतो, मग सॅलीही त्याला करते आणि तोही upside down होतो. मग हे सगळे नदीपल्याडच्या "town" मध्ये पोहचतात आणि यांना पाहून तिथलेही सर्वजण असेच खाली डोके वर पाय करतात. त्यामुळे सध्या आमच्या घरी रोज असा हातांवर चालण्याचा किंवा कोलांट्या उड्या मारण्याचा कार्यक्रम होतो!

"ऑरेंज पेअर, अ‍ॅप्पल बेअर" मध्ये फक्त हे चार शब्द वेगवेगळ्या क्रमाने म्हणायचे आणि म्हणताना मजेशीर असा लय येतो.

"झू"वर आधारित एका पुस्तकात शाळकरी "सिल्व्ही"ला एकदा तिच्या खोलीतून झू कडे जाण्याचा रस्ता सापडतो आणि मग ती वेगवेगळ्या प्राण्यांना रोज रात्री आपल्याबरोबर आणते. आणि आठवणीने सकाळी परत सोडून येते. पण एकदा ती शाळेत जाताना दरवाजा बंद करायचे विसरून सगळे प्राणी तिच्या घरी येऊन धुमाकूळ घालतात. मग बिच्चारीला आई येण्याच्या आत साफसफाई करावी लागते! "मिक्स्ड-अप कॅमेलिऑन" मध्ये एका कॅमेलिअनला आपलं आयुष्य किती कंटाळवाणं आहे असं वाटत असतं. एकदा झू मध्ये वेगवेगळे प्राणी पाहिल्यावर त्याला आपणही कोल्ह्यासारखं धूर्त, जिराफसारखं उंच, हत्तीसारखं शक्तिशाली असं काय काय व्हावं वाटतं आणि त्याची इच्छा पूर्णही होत जाते. त्यामुळे तो थोड्या थोड्या प्रमाणात हे सर्वच असतो, पण कॅमेलिऑन आपली जीभ बाहेर काढून जसे खात असतो ते काही त्याला जमत नाही आणि मग "ठेविले अनंते तैसेचि राहावे..." हे मान्य करून तो पुन्हा तशी इच्छा दाखवतो आणि पूर्ववत होतो!

mixedup

अक्षरांच्या एका पुस्तकात तर एका नारळाच्या झाडावर कसं सगळ्या अक्षरांना चढून बसायचं आहे. ए, बी, सी, डी अशी सगळी अक्षरे कशी नारळाच्या झाडावर वर जाऊन बसायला लगबगीत जातात, मग प्रत्येक अक्षराला तिथे वर इतकी जागा असेल की नाही ही धास्ती! दर वेळी ही अक्षरे "चिका चिका बूम बूम, विल देअर बी इनफ रूम?" असे म्हणत जातात. शेवटी सगळी अक्षरे वर जाऊन पोहचल्यावर त्यांच्या वजनाने झाड वाकते आणि सगळे धप्पकन खाली पडतात. कुणाचा दात तुटतो, कुणाचा गुढघा फुटतो, कुणी बँडेड लावलेले तर कुणी पाय सुजलेले! कुणाला टेंगूळ आलं, कुणाचा पाय मुरगळला अश्या एक-एक कल्पना!

crazy

नोनी पोनी, बिस्कीट कुत्रा, नॅट मनी, बिली बकरा, ह्युगो ससा, गोल्डीलॉक्स नावाची मुलगी, सॅली सर्कल, सेथ स्केअर असे कित्येक मित्र आजकाल आमच्या संभाषणातून आपलेच नातेवाईक असल्यासारखे डोकावून जातात. ध्रुवीय प्राणी त्यांना तिथल्या थंड हवामानात निभाव लागण्यासाठी देवाने काय काय देणग्या दिल्यात ते सांगतात. "How kind" मध्ये कोंबडी अंडे देऊन, गाय दूध देऊन, ससा फुले देऊन कुणाला ना कुणाला आनंदीत करतात. कुठे कासवे एकमेकांत शर्यत लावतात (सश्याबरोबर शर्यत लावायला घाबरत असावेत!) कुणी नाश्त्यासाठी आल्यावर टेबल लावतो, तर कधी भूक लागल्यावर हावरटासारखे खाल्ल्यावर काय हाल होतात ते दाखवतो.

sleep

कुणी चिमुकला त्याच्या बाबांना सुतारकामात मदत करतो. "हंग्री कॅटरपिलर" सात दिवस चढत्या क्रमाने १,२,३ पदार्थ खाऊन अंक, वार, वेगवेगळे पदार्थ दाखवत सुरवंटाचे फुलपाखरू होऊन दाखवतो. कुणी बाबांच्या गाडीतून आजीकडे जातो, कुणी ससुल्या दिवसभर खेळून आईच्या कुशीत शिरतो आणि अश्याच अनेक चित्रांना आणि मित्रांना डोळ्यांत साठवून आम्हीही अंधारात गुडुप होतो.

(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)
(बालदिनाच्या निमित्ताने अनाहितामध्ये पूर्वप्रकाशित)

1

बालकथाबालगीतअनुभव

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

24 Nov 2016 - 7:24 am | प्रीत-मोहर

सुंदर लिखाण रूपी. अशी पुस्तकं भारतात मिळतात का हे बघायला लागेल. मित्रवर्तुळात एक बाळ आहे जिथे पुस्तके सोडून सगळं काही आहे:(

सुंदर माहिती, अनेक आभार्स!!

महासंग्राम's picture

24 Nov 2016 - 9:46 am | महासंग्राम

सुंदर माहिती, हि पुस्तके भेट द्यायला आवडेल.

अतिशय छान. परदेशात राहणाऱ्या बाळांचा हेवा वाटला. ;-)

अजया's picture

24 Nov 2016 - 4:17 pm | अजया

काय सुंदर पुस्तकं एकेक.

फार सुंदर लिहिलंयत!!

धन्यवाद!

मितान's picture

24 Nov 2016 - 10:52 am | मितान

उत्तम माहिती आणि बोलकी चित्रे !

आपल्याकडे पण अशी पुस्तके हळुहळू मिळू लागली आहेत ही समाधानाची बाब.

शलभ's picture

25 Nov 2016 - 4:32 pm | शलभ

मस्त लेख.

आपल्याकडे पण अशी पुस्तके हळुहळू मिळू लागली आहेत ही समाधानाची बाब.

कुठे?

पद्मावति's picture

24 Nov 2016 - 12:42 pm | पद्मावति

खूप सुंदर लेख.

jp_pankaj's picture

24 Nov 2016 - 3:26 pm | jp_pankaj

मस्त लेख. वाखुसा

सिरुसेरि's picture

24 Nov 2016 - 4:10 pm | सिरुसेरि

मस्त लेख. +१००

मारवा's picture

24 Nov 2016 - 10:22 pm | मारवा

माझ्या लेकाचे डॉक्टर त्याच्या दर वेळच्या तपासणीच्या वेळी त्या-त्या वयाला अनुकूल अशी पुस्तके भेट म्हणून द्यायचे. त्यांत वेगवेगळ्या रंगांची ओळख व्हावी असे एक पुस्तक होते. एकात मूल बसतानाचे, रांगतानाचे, उभे राहतानाचे असे फोटो असलेले. मग आम्ही मुलाला ते ते चित्र दाखवले की तो ते ते करून दाखवायचा.
तुमच्या लेकाचे डॉक्टर कित्ती गोड मी समोर असतो तर एक पुष्पगुच्छ नक्की दिला असता त्यांना !!!
लेख खुपच गोड खुप आवडला भाग्यवान आहे तुमचा मुलगा माझ्या लहानपणी अस काह्हीच नव्हतं.
तुम्हाला इथे अजुन खुप क्युट क्युट मुलांची पुस्तके डिटेल परीचयासहीत दिलेली आहेत आवडेल कदाचित
https://www.brainpickings.org/tag/childrens-books

मुलगा मोठा झाल्यावर
http://www.aisiakshare.com/node/2024

अरे वा. दुव्यासाठी धन्यवाद :)

पाटीलभाऊ's picture

25 Nov 2016 - 5:42 pm | पाटीलभाऊ

वाचनखूण साठवली आहे.

पैसा's picture

29 Nov 2016 - 12:48 am | पैसा

किती छान!