प्रतिक्षा......

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जनातलं, मनातलं
6 Aug 2016 - 10:47 pm

********************************************************************************************
नमस्कार मित्रहो.....

मी माझी नवीन कथा तुमच्यासमोर सादर करतोय.
माझ्या इतर कथेप्रमाणेच ही कथा ही एकसलग आहे त्यामुळे कथेची लांबी जास्त आहे.
निवांत वाचा................

धन्यवाद
एक एकटा एकटाच
********************************************************************************************

आकाश ऑफीसमधे आपल्या टेबलावर हातातलं पेपरवेटशी चाळा करीत विचार करीत बसला होता. ऑफिसनी दिलेल्या ऑफरने त्याला एका संकटात टाकलं होतं. ह्या परीस्थीतीत नेमकं काय करावं, हेच त्याला सुचत नव्हत.

आकाश एक पस्तिशीचा सर्वसामान्य घरातला तरुण होता. त्याला एक रेणु नावाची मुलगी होती 9-10 वर्षाची. दोघेच एकामेंकासाठी. रेणुची आई तिला जन्म देताच देवाघरी गेली होती. सिंगल पेरेंटिंग करत असलेला आकाश एका प्राईव्हेट बेंकेत कामाला होता. ऑफिसमधे एक हुशार आणि कर्तबगार म्हणून ओळखला जाणाऱ्या आकाशचं बालपण अतिशय हालाखीत गेल होतं. सुरुवातीला क्लार्क म्हणुन बेंकेत कामाला लागलेला आकाश फार कमी वेळात स्वकष्टाने वरती पोहचला होता. त्याच्या मेहनतीच आणि हुशारीच फळ म्हणुन, त्याला बेंकेने त्यांच्या विश्रामपुर येथील नवीन ब्रांच मध्ये मेनेजर पोस्ट्ची ऑफर दिली होती आणि इथेच सगळी गोची झाली होती. खरतर इतरांसाठी ही lifetime opportunity होती, पण आकाशसाठी मात्र हा त्याच्या लाईफ़चा प्रश्न झाला होता.

ही जबाबदारी घ्यायची की नाही ह्याबद्दल आकाशच दुमत होतं. त्याला दोन कारणं होती. एक म्हणजे त्या आडगावात रेणुच्या शिक्षणाचा प्रश्न होता आणि दुसरं म्हणजे आकाशला ही संधी जाहिर झाल्यापासून त्याच्या मृत बायकोने त्याला स्वप्नात येउन ही संधी घेउ नको असा एकदा नाही तर तीनदा इशारा दिला होता. खरतर ह्या दुसऱ्या कारणामुळेच आकाश ज़रा जास्त गोंधळला होता. कारण आजवर असं कधीच झालं नव्हतं.

आज आकाशला बेंकेला त्याचा निर्णय कळवायचा शेवटचा दिवस होता. म्हणुनच आकाशची आज सकाळपासुन नुसती घालमेल सुरु होती. विचार करून करून त्याच डोकं दुखायला लागलं होत. अचानक त्याने स्वत:शी काहीतरी ठरवलं आणि तडक वरिष्ठांना आपला होकार कळवून टाकला. सगळ्यांनी आकाशच्या ह्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. सगळ्याच्या शुभेच्छा स्विकारताना आकाश अजुनही त्याने घेतलेल्या ह्या निर्णयाचा पुनर्विचार करत होता. आपल्या आणि पर्यायाने रेणुच्या भविष्याचा विचार करून, आकाशने द्विधा मनस्थितित का होईना पण आपला होकार पुन्हा एकदा कायम केला.

आकाशला लगोलग नवीन कामावर रुजु होणे गरजेचे होते. त्याने निर्णय घेण्यात अगोदरच फार दिवस घेतल्याने त्याच्याकडे आता वेळ कमी होता.

नवीन गावाचा अंदाज नसल्याने, सुरुवातीला आपण स्वत: पुढे जाउन सगळी व्यवस्था करायची आणि मग रेणुला तिथे घेउन जायचे हे आकाशचं नक्की झालं होतं. पण हयात एक अडचण होती. एकही नातलग नसलेल्या आकाशला रेणुची फार काळजी वाटत होती. पण आकाशचा शाळेतला एक जुना मित्र अगदी देवासारखा धावून आला. त्याने रेणुला थोडे दिवस स्वत:कडे सांभाळायची तयारी दाखवली. रेणुदेखील शहाण्या मुलीसारखी तिच्या पप्पाने सांगितल्याप्रमाणे चुपचाप त्याच्या मित्राकडे रहायला तयार झाली. रेणुला दुसऱ्याच्या जीवावर असं सोडुन जाताना आकाशला कससंचच होतं होत.

इकडे आकाश लगेचच विश्रामपुरला रवाना झाला. मुंबई ते विश्रामपुर प्रवास चांगलाच थकवणारा होता. मुंबई ते नाशिकपर्यंत बसने, तिथून मग दूसरी एस.टी पकडून विश्रामपुर असं मजल दरमजल करीत पोहचावं लागणार होतं. नाशिक आणि अहमदनगर ह्यांच्या बॉर्डर कुठेतरी हे गाव होतं. नाशिक ते विश्रामपुरामधील रस्त्याची हालत बघता, बर झालं रेणुला आत्ताच सोबत नाही आणलं हां विचार सारखा आकाशच्या डोक्यात येत होता. तब्बल चार तासानंतर नाशिकहुन निघालेली गाड़ी विश्रामपुर एस टी स्थानकात शिरली. एस टी स्टेंडवर त्याला घ्यायला बेंकेचा एक कर्मचारी येणार होता. एस.टी स्टेंडच्या गेटवर आकाश त्याचीच वाट पहात उभा होता.

"नमस्कार साहेब, आपणच आकाश नाडकर्णी ना?" पाठीमागून अचानक आलेल्या आवाजाने आकाश दचकला. आकाशने होकारार्थी मान हलवताच.

"मी सुहास शेजवळकर. आपल्या RSP बेंकेचा इथल्या ब्रांचचा आपला assistant manager" त्या व्यक्तीने शेकहेंडसाठी हात पुढे करून आपली ओळख करून दिली.

सुहास शेजवळकर हां साधारण त्याच्याच वयाचा एक तरुण होता. हसतमुख आणि बराचसा बडबडा. पहिल्या भेटीतच सुहास आकाशला आपलासा वाटुन गेला. सुहासने आकाशला एसटी स्टेंडवरुन घेउन जायला त्याची मोपेड आणली होती. तसही आकाशकडे त्याच्या एकुलत्या एका हेंडबेगशिवाय बाकी काहीच सामान नव्हतं. तो पटकन टांग टाकुन सुहासच्या गाडीवर बसला. सुहासची मोपेड त्या मातीच्या रस्त्यावरून आपल्या ठरलेल्या ठिकाणी निघाली.

विश्रामपुर गाव तस आकाशला वाटत होतं तितकं काही मोठं नव्हतं, पण मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने बेंकेने इथे आपली ब्रेंच टाकली होती. कारण तालुक्याला जाताना आजुबाजुच्या चारपाच गावांचा रस्ता ह्याच गावातून जात होता.

सुहास रस्त्याने जाताना आकाशला विश्रामपुर गावाची जुजबी माहीती पुरवत होता. म्हणजेच गावात असलेली शाळा, दवाखाना, बाजार, गावदेवीच मंदिर, गावदेवीची जत्रा ज्या नदीकाठी भरते ती नदी. विश्रामपुर तसं एका टिपिकल गावासारखं गाव होतं, पण आकाशला का कुणास ठावुक, पण ह्या गावात आल्यापासून अस जाणवत होतं की इथल्या बऱ्याचश्या गोष्टी, जागा त्याने ह्या अगोदर कुठेतरी पाहिल्या आहेत. पण नक्की कुठे हे मात्र आठवतं नव्हतं. गाव् मागासलेल नसलं तरी अद्यावतही नव्हतं. आपण मिळालेल्या संधीसाठी मुंबई सोडुन इथे ह्या आडगावात यायचा घेतलेला निर्णय खरच चुकला तर नाही ना असाच काहीसा विचार आकाशच्या डोक्यात सुरु होता.

"हे पहा आला तुमचा राजवाडा..?" सुहासची गाडी थांबली तसा आकाश तंद्रीतुन बाहेर आला.

त्याने समोर पाहिलं. तर एक दुमजली वास्तु आकाशच्या स्वागताला उभी होती. गावाच्या वेशीवर आकाशच्या बेकेंने एक गेस्ट हाउस बांधले होते. सुहासने आकाशला गेस्टहाउसचं टाळं उघडून त्याच्या हातात चावी दिली. आकाशने गेस्ट हाउसचा ताबा घेतला. गावाच्या मानाने गेस्ट हाउस तस बरच अद्यावत होत. चांगल तीन बेडरुम, हॉल, किचन असलेला G+1 बंगलो होता तो. गेस्टहाउसच्या मागेपुढे दोन्ही बाजुला मोठं अंगण होतं. समोरच्या बाजुच्या अंगणात एक झोपाळा होता. त्या झोपाळयाला पाहून, हा झोपाळा रेणुला नक्कीच खुप आवडेल हा विचार आकाशच्या मनात आला. त्याच अनुषंगाने रेणुची आठवण आकाशच्या मनात पुन्हा उचंबळुन आली आणि त्याला पुन्हा कससंच झालं. त्या झोपाळ्यावरची आपली नजर हटवुन तो लगेचच दार उघडून गेस्ट हाउसमधे शिरला.

आकाशला काही हवं नको विचारून सुहास त्याच्या घरी जाण्यास निघाला. पण जाताना आकाशला आज रात्री त्याच्या घरी जेवायला येण्याच निमंत्रण द्यायला मात्र तो विसरला नाही.

रात्री सुहासकडे आकाशचा चांगला पाहुणचार झाला. एकंदरीत आकाशला सुहासच्या रुपात ह्या गावातला त्याचा मित्र सापडला होता.

त्या रात्री घरी आल्यावर आकाश बेडवर पडल्या पडल्या झोपला.

********************************************************************************************

सकाळी उठल्या उठल्या आकाश साफसफाईला लागला. सुहास आकाशला "मदतीला येउ का?" असं विचारलं होतं, पण आकाशने त्याला मुद्दामून नाही म्हणुन सांगितलं. जोवर माणसाचा पुर्ण अंदाज येत नाही तोवर त्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही ह्या तत्त्वाचा आकाश होता.

गेस्ट हाउस तस व्यवस्थीत होतं, पण बरेच दिवस बंद असल्यामुळे घरातल्या प्रत्येक गोष्टीवर एक धुळीचा थर साचला होता. सुरुवातीला दोन तासात आटपेल असं वाटणाऱ्या साफ़सफ़ाईच्या ह्या कामाने आता आकाशची दुपारही वापरायची ठरवली होती. सकाळपासुन ह्या साफ़सफ़ाईच्या कामाने आकाश आता प्रचंड दमला होता.

"आपणं उगाचच सुहासला नाही म्हणालो" असा तिथल्या सोफ्यावर आपलं अंग टाकत आकाश विचार करू लागला.

अचानक आकाशचं लक्ष समोरच्या खिडकीवर गेलं आणि तो दचकलाच.

खिडकीवर एक मळकी कापडी बाहुली उभी होती. थेट आकाशकडे पहात. त्या बाहुलीचे डोळे आकाशवरच खिळलेले होते.

सुरुवातीला त्या बाहुलीला पाहून दचकलेला आकाश आता थोड सावरल्यावर विचार करू लागला की, सकाळपासुन तो या घरात वावरतोय पण ही बाहुली त्याला इथे ह्यापुर्वी कुठे दिसली नाही. इथेच काय तर पुर्ण घरात कुठेही नव्हती. मग ही आत्ताच कुठुन ह्या इथे खिडकीत आली. आकाशला त्या बाहुलीबद्दल काहीच आठवेना.

आकाश जागेवरून उठला आणि त्याने त्या बाहुलीला उचलून घराबाहेरच्या कचऱ्याच्या डब्यात नेउन टाकली.

*********************************************************************************************

दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश ऑफिसला जायची तयारी करत होता की घराबाहेरून त्याला गाडीचा हॉर्न ऐकू आला. त्याने खिडकीतून पाहिलं तर सुहास त्याची मोपेड सोबत त्याचा हसरा चेहरा घेउन गेटवर उभा होता.

आकाश सुहाससोंबत ऑफिसला आला. सुहासने त्याची सगळ्या स्टाफ़सोबत ओळख करुन दिली. बेंकेत मोजकाच स्टाफ़ होता. प्रथमदर्शनी आकाशच त्याच्या सहकाऱ्यांबद्दल मत चांगल झालं होतं. सुहास आणि बाकीच्या सहकारयांच्या त्यांच्या कामाबाबतीत उत्साह पाहून आकाशचा आत्मविश्वास वाढला होता. आपण आपली मिळालेली ही नविन जबाबदारी ह्या स्टाफच्या जोरावर समर्थपणे पेलवु शकू ह्याची आकाशला आता खात्री वाटु लागली.

*********************************************************************************************

आजच्या रात्रीही आकाश सुहासच्या घरी जेवायला होता. खरतर आकाशने हे आमंत्रण टाळायचा खुप प्रयत्न केला पण सुहासच्या आग्रहापुढे त्याला नमत घ्यावच लागलं. जेवणानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना आकाशला सुहासकडुन बेंकेबद्दल, येथील लोकांबद्दल आणि पर्यायाने गावाबद्दल बरीच माहिती कळत होती. आकाशला सुहासच बोलणं फार आवडत होतं. साधासा किस्साही सुहास फार रंगवून सांगायचा. आकाशची हसता हसता पुरेवाट होत होती.

"कोकणातल्या इतर गावांसारखी ह्या गावात कसलीच भीती नाही. दिवसा रात्री कधीही कुठेही बिनधास्त फिरा फ़क्त एक जागा सोडुन......" सांगता सांगता सुहास थांबला आणि आकाशाकडे पाहू लागला.

आकाशही सुहासकडे हा असा अचानक हे काय बोलायला लागला म्हणुन गंभीरपणे पाहू लागला.

"गावाबाहेरच्या पारकरांच्या वाड्याकडे चुकुनसुध्दा जायच नाही"

"का??" आकाशने न रहावुन विचारलं.

"मला जास्त माहिती नाही पण गावात पारकरांच्या वाड्याबद्दल बऱ्याच अफ़वा आहेत. गावात पारकरांच्या वाड्याबद्दल चांगल बोललं जात नाही. खासकरून तिन्हीसांजेनंतर तर कुणीच तिथे फिरत नाही. असं म्हणतात की, कुणी चुकुन संध्याकाळी त्या वाड्याच्या बाजूने जरी गेलं तरी तो आजारी पडतो. तुम्हीदेखील त्या पारकरांच्या वाड्यापासुन ज़रा लांबच रहा. नाही तुम्ही गावात नवीन आहात म्हणुन तुम्हाला ही गोष्ट सांगितली बाक़ी काही नाही....."

सुहासने असं सांगताच आकाश विचारात पडला. अचानक त्याला काल त्याच्या घरात दिसलेली ती बाहुली आठवली.

"बरं ते सोडा, तुम्हाला ऑफिसमधल्या गोडबोले बाईंचा एक सॉल्लिड किस्सा सांगतो......" आकाशला असं शांत झालेला पाहून सुहासने विषय बदलला.

*********************************************************************************************

आता आकाशने बेंकेच्या कामाचा पूरा चार्ज घेतला होता. सगळं त्याच्या अपेक्षेनुसार सुरळीत चाललं होतं. स्टाफ़बद्दलचा त्याचा अंदाज बरोबर ठरला होता आणि सुहासमुळे आकाशचा बराचसा कामाचा ताण हलका होत होता. दिवसभर बेंकेचे काम उरकून संध्याकाळी सुहाससोबत थोडा टाईमपास करायचा मग घरी जाताना बाजारातून सामान घेउन जायच. रात्री जेवण बनवुन झोपायच हा निवांत दिनक्रम होता. तसा सुहास त्याला दररोज रात्री जेवायला बोलवायचा पण आता आकाश त्याच्या आग्रहच्या निमंत्रणाला नम्रपणे नकार द्यायला शिकला होता.

एकेदिवशी सुहासच्या घरी पाहुणे आले होते. त्यासाठी सुहास लवकर घरी गेला होता. आकाश गावात एकटाच फिरत होता. डोक्यात रेणुचेच विचार चालु होते. तिला आता ह्या गावात घेउन येण्यासंदर्भातच तो विचार करत होता. फिरता फिरता आकाश आज फार दूर निघून आला. आपण कुठे आलोय ह्याचा अंदाज घेईपर्यंत आकाश एका पडिक वास्तु समोर येउन उभा राहिला होता. ती वास्तु म्हणजे एक चांगला दुमजली वाडा होता. इंग्रजांच्या धाटणीच बांधकाम पण आता कुणी रहात नसल्याने त्याची सगळी रया गेली होती. ती जागा थोडं मनावर दडपण आणत होती तरीही आकाश एका अनामीक ओढीने त्या वास्तु जवळ ओढला जात होता.

लोखंडी गेटवरच्या नेमप्लेटवरची धुळ हाताने झटकत त्यावरती कोरलेली नाव आकाश वाचु लागला.

"पारकर"

त्यासरशी त्याच्या डोक्यावरून एक टिटवी जोरात ओरडत गेली. आकाश त्या आवाजासरशी एकदम शहारला. त्याला सुहास ह्या वाड्याबद्दल दिलेली ताकीद आठवली. पण आकाशला त्यामुळेच की काय आकाशला ह्या वाडयाबद्दल उत्सुकता वाटत होती.

आकाशने पुन्हा एकदा त्या गेटवरच्या नावावरून हात फिरवला आणि लोखंडी गेटच्या कडीला हात घातला. आकाश तो लोखंडी दरवाजा उघडणारच होता की त्याच लक्ष अचानक त्याच्या उजव्या बाजुला गेलं आणि तो चरकला. त्याच्या अगदी जवळ एक म्हातारी बाई त्याच्या टक लावून पहात होती. त्या बाईला आपल्या इतक्या जवळ उभं असलेल पाहून तो केव्हढ्यानं तरी दचकला. रापलेला चेहरा, डोक्यावर अस्त्यावस्त पसलेले सफ़ेद केस, डोळ्यात वेडसर झाक आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत ती आकाशकडे पहात होती. आकाश आणि तिची नजरानजर होताच, ती आकाशकडे पाहून दात विचकुन हसली. त्या एकांतात त्या वेड्या बाईला आपल्याकडे पाहात अस विचित्र हसताना पाहून आकाश खरच खुप घाबरला. थोडं सावरताच त्याने तडक तिथून निघायचा पर्याय निवडला. थोडं पुढे गेल्यावर त्याने मागे वळुन पाहिलं तर पाठीमागे ती बाई अजुनही त्याच्याकडेच पहात होती.

'एकटक…………….'

*********************************************************************************************

आकाशला विश्रामपुरला येउन आता आठवडा झाला होता. इथे त्याचा जम आता पुरता बसला होता. आता रेणुला इथे घेउन यायला त्याची काही हरकत नव्हती.

ठरवल्याप्रमाणे आकाश रेणुला घेउन विश्रामपुरला आला. नवीन ठिकाणी आल्यावर रेणु थोडीशी बुजली होती. मुंबईची सवय असलेल्या रेणुला विश्रामपुर बोअर वाटत होतं. ती इथल्या निवांतपणाला लवकरच कंटाळली. भरीसभर म्हणुन इथल्या गावातली शाळेतली पोरं तिला मुंबईची मुलगी म्हणुन हरएक गोष्टीत चिडवायची. त्यामुळे तर रेणु अजुनच वैतागली होती. ह्याचाच परिणाम म्हणुन रेणु आकाशच्या मागे पुन्हा मुंबईला परत जायची भुणभुण करू लागली. हळुहळु तिला होईल ह्या सगळ्याची सवय असा विचार करून आकाश तीचा मुंबईला परत जायचा हट्ट काहीबाही कारणं सांगुन पुढे ढकलत होता. दिवस असेच चालले होते. आकाश आणि रेणुचं आयुष्य त्या विश्रामपुर गावात संथ गतीने एकएक दिवस पुढे सरकत होतं. आता कुठे सगळं लाईनीवर येतय अस वाटत असतानाच..........

त्या रात्री अचानक कश्यानेतरी आकाशची झोप चाळवली. त्याचे डोळे खटकन उघडले. प्रथमदर्शनी आपण आपल्याच घरात आहोत हे आकाशला जाणवलं, पण तरीही त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं. घरातले सगळे लाईट गेले होते. खिडकीतुन चंद्राचा प्रकाश खोलीत डोकावत होता. आकाशचे डोळे खोलीतल्या त्या निळ्या अंधाराला हळुहळु सरावले. त्याने बाजुला पाहिलं आणि त्याला धक्काच बसला.

मगाशी शेजारी झोपलेली रेणु आता त्याच्या बाजुला नव्हती. त्याने घाबरून आजुबाजुला पाहिले पण खोलीत तो एकटाच होता. खिडकी आणि समोरच्या सताड उघड्या दरवाजा खेरीज आकाशला काहीच दिसत नव्हतं. खोलीतली खिडकी चंद्र प्रकाशाने भरलेली असली तरी दरवाज्याचा ताबा मात्र मिट्ट काळोखाने घेतला होता. आकाशने रेणुला एक दोन वेळा हाकदेखिल मारली, पण काही उपयोग झाला नाही. असेच एक दोन क्षण गेले असतील. घरात भयाण शांतता पसरली होती. हे सगळ स्वप्न आहे की खरच घडतय ह्या विचारात आकाश असतानाच एका आवाजाने त्याच लक्ष वेधून घेतलं. त्याने नीट लक्ष देऊन ऐकलं असता त्याला जाणवलं की त्या अंधाऱ्या दारामागे कुणितरी मुसमुसत होत. पुढच्याच क्षणाला त्याच्या मनाने त्याच्या अंदाजाला दुजोरा दिला. त्या काळोख्या दारामागुन येणारा आवाज खरच कुणितरी दबक्या आवाजात रडत असल्याचा होता. आकाश बेडवरुन खाली उतरला आणि हिम्मत करून दरवाजाच्या जवळ जाऊ लागला. जस जस आकाश आणि त्या दरवाज्याच्या मधलं अंतर कमी होत होतं, तस तसा तो मुसमुसण्याचा आवाज आता बऱ्यापैकी स्पष्ट ऐकू येत होता.

"रेणु......." आकाशने पुन्हा एकदा हाक मारली.

पण आकाशने दिलेल्या हाकेला रेणुची ओ आली नाही. उलट उत्तरादाखल आता बाहेरच मुसमुसणं अजुन वाढलं होतं. आकाश आता त्या अंधाऱ्या दारासमोर उभा होता. खरतर आकाशला त्या दारा पलिकडे जायला मनातून नकोस वाटत होतं, पण बाहेर कदाचीत रेणु असेल तर...हा विचार मनात येताच, तो मनाचा हिय्या करून त्या अंधाऱ्या बोळात शिरला. उजव्या हाताने भिंत चाचपडत तो त्या आवाजाच्या दिशेने चालला होता. त्या पेसेज मधल्या मिट्ट काळोखाने आकाशला पुर्ण वेढुन टाकलं होतं. अजुनही हां भास आहे की हे सगळं खरच आपल्यासोबत घडतय हे आकाशला कळत नव्हतं. दर ठरावीक अंतराने तो रेणुला हाका मारत होता. मनात रेणुच्या काळजीने त्याची हालत खराब झाली होती. दहा बारा पावलं चालल्यावर डाव्या बाजुला जिना आहे हे त्याला आज वरच्या सवयीने माहीती होते. अन तोही त्याच तयारीत होता, पण अचानक.........

त्याच्या उजव्या बाजूची भिंत संपली. हा प्रकार आकाशसाठी नवीनच होता. हे अस कसं झालं ह्याचा विचार करत असतानाच आकाश त्याच्या उजव्या हाताला नव्याने गवसलेल्या त्या खोलीत आला. ती खोलीतही अंधाराच साम्राज्य पसरलं होतं. त्या काळोखाच्या काळ्या रंगाने त्या खोलीचा बराचसा भाग व्यापला होता. त्या खोलीच्या एका कोपरयात एक खिड़की होती. इतके दिवस झाले आपण ह्या घरात रहातोय पण ही खोली आजवर आपल्या नजरेस कशी पडली नाही ह्याचेच आकाशला राहून राहून आश्चर्य वाटत होते. तो त्या खिडकीतुन झिरपणाऱ्या निळ्या प्रकाशाकडे निरखून पाहू लागला.

तेव्हा त्याला जाणवलं की, त्या निळ्या प्रकाशात, खिडकीच्या खाली एक सावली उभी होती. त्याने निरखून पाहिलं तर तिथे एक 9-10 वर्षाची मुलगी उभी होती... अगदी रेणुसारखी. पण तिचा फ़्रॉक जागोजागी फाटला होता आणि ती मुलगी तब्येतीने बरीचशी कृश वाटत होती. जणू काही ती नुकतीच कुठल्यातरी मोठ्या आजारपणांतुन उठली आहे. तिच्या हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. हातात एक कापडाची बाहुली होती, तिच्या फ़्रॉकसारखीच मळलेली. जी तिने तिच्या छातीशी घट्ट धरून ठेवली होती. तिने तिचे कमरेपर्यंत वाढलेले केस, मागुन पुढे तिच्या चेहरयावर घेतलेले असल्याने समोरून तिचा चेहरा दिसत नव्हता. पण असं असुनही तीने तिची नजर मात्र आपल्यावरच रोखलेली आहे, हे तिच्या चेहरयावर पसरलेल्या त्या केसांआडही आकाशला जाणवतं होतं. ती त्या कोपऱ्यात उभी राहून मुसमुसत होती. ती हमसून रडत असल्याने तिचं सगळं अंग गदगदत होतं. मगासपासुन येणारा तो रडण्याचा दबका आवाज इथून येत होता ह्याची आकाशला आता खात्री झाली होती. न रहावुन आकाशने पुन्हा एकदा रेणुला हाक मारली.

"रेणु......."

त्यासरशी त्या मुलीचं मुसमुसणं थांबलं.

आकाशला हे सगळं विचित्र वाटत होतं. तरी तो त्या मुलीजवळ गेला. ती मुलगी अजुनही आपले केस समोर घेउन, त्या बाहुलीला स्वत:शी घट्ट धरून उभी होती. आकाश तिच्यासमोर बसला. त्या मुलीचा चेहरा हाताच्या अंतरावर असुनही तिच्या चेहऱ्यावरच्या केसांमुळे त्याला काहीच दिसत नव्हतं. आपल्या थरथरत्या हाताने तो त्या मुलीचे केस बाजुला करून तिचा चेहरा पहाणार, इतक्यात त्या मुलीने अचानक आकाशचा तो हात धरून त्याला स्वत:कडे ओढला. त्यासरशी आकाश खडबडून जागा झाला.

त्याने दचकून बाजुला पाहिलं तर रेणु त्याचा हात पकडून त्याला हलवून जाग करीत होती. तो सावरून बसला. त्याला उठलेला पाहून रेणु लगेच त्याला बिलगली. ती खुप घाबरलेली वाटत होती.

"पप्पा मला ना खुप भीती वाटतेय" रेणुने आकाशला सांगितलं.

मगाशी घडलेल्या त्या सगळ्या गोष्टी हे एक स्वप्नं होतं हे जाणवल्यावर आकाशही आता सावरला होता. रेणुला असं आपल्याला घाबरून बिलगलेलं पहाताच आकाशने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि हळुवार थोपटलं.

"काय झालं बेटा???" तिला असं घाबरलेलं बघून आकाशने रेणुला काळजीने विचारलं.

"काही नाही, मला स्वप्नं पडलेलं की तू मला सोडुन चालला आहेस.." रेणु आता रडवेली होत आकाशला म्हणाली.

रेणुने असं सांगताच आकाशला त्याचं मगासचं स्वप्न आठवलं आणि तो पुन्हा अंगभर शहारला. त्याने रेणु भवतीची आपली मिठी अजुन घट्ट केली. आकाशने तिला समजावलं की घाबरू नकोस, असं काही होणार नाही. मी तुला सोडुन कुठेही जाणार नाही. आकाशच्या अश्या आश्वासक शब्दांनी रेणु शांत झाली. थोड्याच वेळात रेणु आपल्या पप्पाच्या कुशीत झोपून गेली, पण आकाश मात्र पूर्ण रात्र जागा होता. त्याला पडलेल्या त्या विचित्र स्वप्नाने आणि त्यानंतर रेणुच्या वागण्याने तो गडबडला होता. पहाटे कधीतरी मग त्याचा डोळा लागला.

*********************************************************************************************

काल रात्रीच्या प्रसंगाने सकाळी आकाशला उठायला उशीर झाला होता. कसाबसा रेणुला शाळेत पोहचवुन तो त्याच्या ऑफिसला पोहचला. उशीर झालेला असुनही तो ऑफिसच्या दारातच थांबला. कारण आज ऑफिसच्या दारात त्याला वेगळी गोष्ट जाणवली. एक भिकारी बाई त्याच्याकडे टक लावून पहात होती. त्याला तिच असं त्याच्याकडे पाहणं थोडं विचित्र वाटलं. जाउदे असेल कोणतरी वेडी असं स्वत:ला समजावून त्याने ती गोष्ट नज़रेआड केली आणि लगबगीने तो आत बेंकेत शिरला. ऑफ़िसमधे आकाश त्याच्या केबीनमधे बसला असताना, सहज म्हणुन त्याने खिडकीबाहेरच्या रस्त्यावर नजर टाकली तर ती बाई आता रस्त्याच्या समोरच्या बाजुला उभी असलेली त्याला दिसली. आताही ती आकाशकडे एकटक पहात होती. आकाश त्या बाईच्या अश्या नजरेने अवघडला होता. तिथे बघायच नाही असं ठरवूनसुध्दा त्याच लक्ष तिच्याकडे जात होतं, कारण त्याला सारखं असं वाटत होतं की ह्या बाईला ह्याअगोदर त्याने कुठेतरी पाहिलंय, पण नेमकं कुठे हे मात्र त्याला आठवतं नव्हतं. तो त्याच्या स्मरणशक्तीला जोर देऊ लागला आणि अचानक त्याला आठवलं की त्या संध्याकाळी पारकरांच्या वाड्याजवळ त्याला जी बाई भेटली होती ती हीच होती. त्याने लगेच खिडकीत पाहिलं तर ती बाई आता तिथे नव्हती. तो उठून खिडकीत आला. त्याची नजर रस्त्यावर त्या बाईला शोधत होती. पण इतक्या वेळेपासुन त्याच्यावर नजर ठेवणारी ती बाई आता अचानक गायब झाली होती.

*********************************************************************************************

रात्रीची जेवणं आटपुन, सगळं आवरुन आकाश आपल्या खोलीत आला. त्याने समोर बेडवर पाहिलं तर रेणु त्याची वाट पाहून झोपून गेली होती. तिला असं शांत झोपलेलं पाहून आकाश मनोमन सुखावला. तिच्या बाजुला पडून आकाश दिवसभराच्या घडामोडीचा विचार करत होता आणि त्याला रस्त्यावरून त्याच्यावर नजर ठेवणारी ती म्हातारी बाई आठवली. तिचा विचार मनात येताच आकाशचं विचारचक्र पुन्हा सुरु झालं "कोण असेल ती? आणि आपल्याकडे ती अशी का बघत होती? त्या संध्याकाळी पण तीने त्या वाड्याजवळ किती घाबरवलं आपल्याला?

वाडा?? पारकरांचा वाडा....

पण सुहास सांगतो तितका भीतीदायक नाही वाटत तो वाडा. उलट फार छान बांधलाय ज्याने कुणी बांधलाय. एकदा चान्स मिळाला तर आत जाउन पहायला पाहिजे. त्यादिवशीच जायला मिळालं असतं पण नेमकी तेव्हा ती म्हातारी मध्येच तडमडली. कधीतरी नक्की बघायला पाहिजे तो आतून.

त्या बाईचा आणि पारकरांच्या वाड्याचा विचार करता करता आकाशला झोप कधी लागली हे त्याला कळलंच नाही.

*********************************************************************************************

त्या रात्री आकाश पुन्हा झोपेतून खडबडून जागा झाला. त्याला पुन्हा तेच स्वप्न पडलं होतं. तोच निळा अंधार, तीच गुढ खोली, तीच मुलगी, पुन्हा तिने त्याचा हात पकडणं आणि ह्याही वेळेस त्या मुलीने त्याचा हात पकडताच आकाश दचकून उठला होता. डोक्याला आलेला घाम पुसून त्याने बाजुला पाहिलं तर तो आणखीन चक्रावला. कारण त्याने पाहिलं की रेणु तिच्या जागेवर नव्हती. तो पटकन बेडवरुन उठला आणि आजुबाजुला रेणु कुठे दिसतेय का ते पाहू लागला. तेव्हढ्यात त्याच लक्ष समोरच्या खिडकीत गेलं आणि तो चरकला.

त्याने समोर पाहिलं की रेणु खिडकीत उभी होती. एकटक खिडकीबाहेर बघत, डोळ्याची पापणीही न लवता.

तिला असं खिडकीत एकटं उभं पाहून आकाश गोंधळला, त्याने दबक्या आवाजात रेणुला हाक मारली. पण रेणुला ती बहुतेक ऐकुच गेली नाही. ती अजुनही बाहेरच पहात होती. आकाश आता उठून तिच्याजवळ गेला. तिच्याकडे पोहचल्यावर त्याने तिला जवळून हाक मारली. पण रेणुला जणु आकाशच अस्तित्वच जाणवत नव्हतं. ती अजुनही एकटक खिडकीच्या बाहेर पहात होती. आकाशने रेणुला खांद्याला धरून आपल्याकडे वळवली. रेणुचा चेहरा पहाताच आकाश शहारला. ती शुन्य नजरेने त्याच्याकडे पहात होती.

तिच्या त्या निर्जीव नजरेने आकाश घाबरला. त्याने तिच्या खांद्याला धरून तिला जोरात हलवलं आणि तिला मोठ्याने हाक मारली.

"रेणु........."

तसं रेणुने दचकून आकाशकडे पाहिलं. तिच्या शून्य नजरेत आता जीव आला होता. तिने घाबरून आकाशला विचारलं.

"काय झालं पप्पा? तू असा काय बघतोयस माझ्याकडे?"

आकाशने तिला जवळ घेतलं. तिला आता काही बोलण्यात अर्थ नाही हे उमजुन त्याने तिला हलकेच थोपटलं आणि म्हणाला.

"काही नाही बाळा, चल झोपू...."

एव्हढं बोलून आकाशने तिला उचललं आणि तो तिला घेउन बेडच्या दिशेने वळतच होता की त्याला खिडकीबाहेर काहीतरी हालचाल जाणवली. त्याला गेटवर कुणितरी उभ असल्यासारख वाटलं. त्याने हडबडुन पुन्हा गेटकडे पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं. आपल्याला भास् झाला की आपण खरच तिथे कुणालातरी पाहिलं ह्या विचारात आकाश रेणुला घेउन बेडच्या दिशेने चालु लागला. रेणु आकाशच्या खांद्यावर झोपायच्या तयारीत होती, पण आकाश मात्र बहुतेक आजची रात्रदेखिल जागाच रहाणार होता.

*********************************************************************************************

दुसऱ्या दिवशी आकाश ऑफिसला पोहचला. आपल्या केबीनमधे बसून काम करत होता की पुन्हा त्याला ती म्हातारी बाई त्याच्या ऑफिसच्या समोरच्या रस्त्यावर उभी असलेली दिसली. आज तो तिला विचारायला बाहेर जातच होता की तेव्हढ्यात सुहास काही कागदपत्र घेउन त्याच्या केबीनमधे शिरला. त्याच काम आवरून तो गेल्यावर आकाशने खिडकीत पाहिलं तर समोरचा रस्ता आता रिकामी होता.

आज ऑफिसमधे नेमकं निघताना एक तातडीच काम आल्याने आकाशला शाळेत पोहचायला थोडा उशीर झाला. तिकडे चौकशी करता रेणु आकाशची वाट पाहून कधीचीच शाळेतून घरी निघून गेली असं कळलं. रेणुच्या काळजीने आकाश लगबगीने घराकडे निघाला.

थोड्याच वेळात आकाश घरी पोहचला पण घराला टाळं होतं. त्याने आजुबाजुला पाहिलं पण रेणुचा कुठेच पत्ता नव्हता. आकाश तसाच रेणुला शोधत शोधत मागच्या अंगणात आला. तिथे त्याला रेणु घराच्या मागे एका बाकड्यावर बसलेली दिसली. रेणुला तिथे पाहून आकाशचा जीव भांड्यात पडला. तो तिच्याकडे निघाला. तो जसजसा तिच्याजवळ पोहचत होता तस त्याला जाणवलं की रेणु नुसतीच बसली नव्हती तर तिच्या हावभावावरून ती कुणाशी तरी गप्पा मारत असल्यासारखी वाटत होती. पण आकाशला नवल वाटत होतं की तिथे तर रेणुखेरीज दुसरं कुणीच दिसत नव्हतं. मग रेणु इतका वेळ कुणाशी बोलत होती.

आकाशने न रहावुन रेणुला हाक मारली. आपल्या पप्पाची हाक ऐकून रेणुने आकाशकडे पाहिलं आणि खुश झाली. पप्पाला आपल्याकडे येताना पाहून रेणु धावतच आकाशकडे आली. पण येताना तिने त्या रिकाम्या बाकड्याकडे पाहून कुणालातरी टाटा केल्याचं आकाशच्या नजरेतुन सुटलं नाही. आकाश रेणुच्या अश्या विक्षिप्त वागण्याने थोडा गोंधळला होता, पण आज त्याला रेणु बऱ्याच दिवसांनी फार खुश दिसत होती. ती आकाशकडे धावत येता येता सांगायला लागली

"पप्पा ऐकना...... आज ना एक गंमत झाली. मी आज एकटीच घरी आली माझ्या मैत्रिणीबरोबर....."

"कोण....कुठली मैत्रीण" आकाशने आश्चर्याने रेणुला विचारले.

"वीणा........ती काय तिथे बसलीय" एव्हढं बोलून रेणुने बाकड्याकडे बोट दाखवलं.

"अरेच्या कुठे गेली....आतातर इथेच होती." बाकडा रिकामी बघताच रेणु आकाशला म्हणाली.

"चल बघुया कुठे गेली ती" असं बोलून रेणु आकाशच्या हाताला धरून त्याला ओढतच त्या बाकड्याकडे घेउन गेली.

रेणुचं असं बोलणं ऐकून आकाश गडबडला. म्हणजे मघासची आकाशची रेणुबाबतची शंका खरी होती तर. रेणु नक्कीच कुणाशीतरी एकटीच बडबडत होती. रेणु मात्र तिला नवीन मैत्रीण भेटल्यामुळे खुष दिसत होती. रेणु आकाशला काहीतरी सांगत होती, पण आकाशच तिच्याकडे लक्षच नव्हतं त्याची नजर बाकड्यावर पडलेल्या एकाच गोष्टीकडे खिळली होती.

त्या रिकाम्या बाकड्यावर एक बाहुली पडली होती....

ती बाहुली पाहून आकाश जागच्याजागी गार झाला. कारण बाकड्यावर पडलेली ती बाहुली तीच होती, जी त्याला दरवेळेस स्वप्नात त्या मुलीच्या हातात दिसत होती. आकाश त्या बाहुलीबद्दल विचार करत असतानाच त्याला एक गोष्ट लक्ष्यात आली आणि त्या गोष्टीमुळे भितीची एक थंड लहर त्याच्या मणक्यातुन शिरशिरत पार त्याच्या डोक्यापर्यंत गेली. त्या बाहुलीकडे बारकाईने पाहिल्यावर आकाशला अजुन एक गोष्ट आठवली की गेस्टहाउसच्या साफसफाई वेळेस खिडकीवर जी बाहुली सापडली होती तीही अगदी सेम टू सेम अशीच बाहुली होती.

ओह शीट म्हणजे त्या दोन्ही बाहुल्या एकच होत्या.

हा विचार मनात येताच त्याची नजर पुन्हा त्या बाहुलीकडे गेली. त्याने पाहिलं की, तिचे डोळे त्याच्यावरच रोखलेले होते. आकाशला हे जाणवताच त्याने ती बाहुली लगेच बाकड्यावरुन झटकली आणि तो तड़क रेणुला घेउन घरात आला.

*********************************************************************************************

रात्री आकाशला कश्यानेतरी जाग आली. त्याने सवयीने बाजुला झोपलेल्या रेणुला कुशीत घेण्यासाठी आपला हात टाकला तर त्याची झोपच उडाली. कारण बाजुला रेणु नव्हती. त्याने समोर खिडकीजवळ पाहिलं जिथे गेल्यावेळेस त्याला रेणु उभी दिसलेली तर ती खिडकीही रिकामी होती. तो लगेच बेडवरुन उठला आणि रेणुला घरात शोधू लागला. पण रेणु त्याला कुठेच सापडली नाही. आकाश आता वेडा व्हायचाच बाक़ी होता. तेव्हढ्यात एका आवाजाने त्याच लक्ष वेधलं. काहीतरी करकरण्याचा आवाज येत होता. त्याने खिडकीतुन बाहेर पहिलं आणि तो जागीच गारठला.

समोर रेणु बागेतल्या झोपाळ्यावर बसून एकटक आकाश उभा असलेल्या खिडकीकडे नजर लावून झोके घेत होती. आकाश धावत खाली आला. एक दोन क्षणातच तो झोपाळ्याजवळ पोहचला. आकाश अविश्वासाने तिच्याकडे पहात होता. पण रेणुच बाजुला उभ्या असलेल्या आकाशकडे लक्षच नव्हतं. रेणु अजुनही एकटक समोर गेस्टहाउसच्या खिडकीकडे पहात झोके घेत होती आणि त्या झोपाळ्याची करकर आजूबाजूची शांतता एका लयीत चिरत होती. हे सगळं नक्की काय चालू आहे, आकाशला काहीच कळत नव्हतं. इतक्यात त्याच लक्ष झोपाळ्यावर झोके घेणाऱ्या रेणुच्या बाजुला एका गोष्टीवर गेलं आणि तो नखशिंखात शहारला.

एक बाहुली रेणुच्या बाजुला झोपाळ्यावर बसली होती.

तीच जी त्याने आज सकाळी बाकड्यावर पाहिली होती. आकाश आता फार घाबरला. त्याने रेणुला लगेच झोपाळ्यावरुन उचलली आणि तिला घेऊन तो तडक गेस्ट हाउसमधे आला. ह्या सगळ्या धावपळीमधे मगाशी झोपाळ्यावर टक्क जागी असलेली रेणु आता मात्र आकाशच्या खांद्यावर गाढ झोपी गेली होती.

*********************************************************************************************

एव्हाना सकाळचे नऊ वाजले होते. आकाश काल रात्रीपासून जागाच होता. गाढ झोपलेल्या रेणुकडे पाहताना त्याला राहुनराहुन काल रात्रीचा प्रसंग आठवत होता. तीच ते रात्रीच अचानक गायब होणं, ते झोपाळ्यावर बसून एकटक घराकडे पहाणं, तिची ती नजर आताही त्याच्या अंगावर शहारा आणीत होती. विचार करून करून त्याच डोकं गरगरत होतं. आकाशला हा सगळा प्रकार कुणालातरी सांगावासा वाटत होती.

"आकाश साहेब....." घराखालून आकाशला कुणीतरी हाक मारली.

आकाशने खिडकीतुन खाली पाहिले तर खाली सुहास उभा होता. नेहमीप्रमाणे तो आकाशला घ्यायला आला होता. आकाशने त्याला वर बोलावलं. सुहास घरात आला तोच नेहमीप्रमाणे काहीतरी बडबडत, पण आकाशच सुहासच्या बडबडीकडे लक्ष नव्हतं. आकाशला असं शांत पाहून सुहासला थोडा अंदाज आला की आकाशच काहीतरी बिनसलय. पण आकाशने स्वत:हुन काही सांगेपर्यंत त्याने गप्प रहायच ठरवलं. इकडे आकाशची चलबिचल वाढत होती. अखेर न रहावुन त्याने सुहासला सगळा प्रकार सांगितला. गेल्या काही रात्रींचे रेणुचे आलेले अनुभव, त्याला पडणारी स्वप्नं, त्या बाहुलीचे सगळीकडे दिसणं हे सारं काही. सुहासला हे सांगताना आकाश खुप घाबरला होता. सुहासला हे सगळं ऐकून थोडं विचित्र वाटत होतं. त्याचा चेहरा पाहूनच कळत होतं की त्याला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून एक धक्का बसला आहे. सुहासचा गोंधळलेला चेहरा पाहून आकाश अजुनच घाबरला. थोडं सावरल्यावर सुहासने आकाशला शांत व्हायला सांगितलं आणि तो विचार करू लागला. तो आकाशला काही सांगणार तेव्हढ्यात सुहासला आतल्या दारात कुणाची तरी चाहुल लागली. त्याने त्या दिशेने पाहिलं तर दारात रेणु उभी होती आणि गोंधळुन आकाश आणि सुहासकडे पहात होती. तिला अस पहाताच क्षणात स्वत:चा मुड बदलत सुहास रेणुला म्हणाला.

"अरे छोट्या मेनेजर बाई आज उशीरा उठलात....शाळेत जायच नाही का? चला चला लवकर तयारी करा. आज आपण स्कुटरवरुन शाळेत जाऊ" एव्हढ बोलून त्याने आकाशला रेणुसमोर हां विषय नको असं नजरेने खुणावलं.

आकाशलाही सुहासचा इशारा समजला तोही लगेच रेणुला शाळेत सोडायच्या तयारीला लागला.

*********************************************************************************************

रेणुला तिच्या शाळेत सोडुन आकाश आणि सुहास शाळेच्या गेटवर उभे होते. थोडा वेळ शांततेत गेल्यावर सुहास आकाशला म्हणाला.

"आकाशसाहेब तुम्ही सांगितलेला प्रकार थोडा विचित्र आहे. आजवर असा अनुभव ह्या गावात कधी कुणाला आला नाही. तरीही ही गोष्ट सहज घेउन चालणार नाही. आपण एक काम करू, जर का तुम्हाला पटत असेल तर......" एव्हढं बोलून सुहास आकाशकडे पाहू लागला. आकाश गप्पच होता. त्याला गप्प पाहून सुहास पुढे बोलू लागला.

"गावाबाहेरच्या स्मशानात एक भगत रहातो त्याच्याकडे जायच का? तो ह्यावर काहीतरी उपाय सुचवेल"

सुहास साशंकपणे आकाशकडे पाहू लागला. खरतर त्याला हे पटतं नव्हतं पण त्याच्याकडे काही पर्यायही नव्हता. थोडा विचार करून आकाशने मान डोलावली. आकाशचा होकार मिळताच सुहासने लगेच त्याच्या मोपेडला किक मारली.

त्या दिवशी ऑफीस सुटल्यावर सुहास आणि आकाश त्या भगताला भेटायला स्मशानात गेले. गावाबाहेरील स्मशानाचा परिसर एकदम सुनसान होता. त्या दोघां व्यतिरिक्त तिथे दुसरं कुणीच दिसत नव्हतं. त्या एकाकी परिसरात सुहासच्या स्कुटरशिवाय इतर कसलाच आवाज नव्हता. एका मोठ्या लोखंडी गेटसमोर सुहासने आपली स्कूटर थांबवली आणि आकाशाला त्या गेटकडे जाण्याचा इशारा केला. आकाश एका तंद्रीतच त्या गेटकडे काही न बोलता चालायला लागला. काही पावलं चालल्यावर त्याला जाणवलं की सुहास त्याच्या सोबत नाहीय. त्याने मागे वळुन पाहिलं तर सुहास त्याच्या स्कुटरकडेच थांबला होता. त्याला असं बाहेर रेंगाळताना पाहून आकाश गेटवर थांबला आणि त्याने सुहासकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

"त्या भगताने तुम्हाला एकट्यालाच बोलावलय" सुहासने आकाशच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

सुहासला बाहेर सोडुन आकाश आत स्मशानात गेला. भयाण शांतता म्हणजे काय ह्याचा अनुभव आकाशला त्या स्मशानात पावलोपावली येत होता. दिवसाढवळ्या देखिल त्या स्मशानात सावल्यांचं साम्राज्य पसरलं होतं. त्या स्मशानात बर्यापैकी आत येउन सुध्दा आकाशला सुहासने सांगीतलेल्या त्या भगताचा काही मागामुस लागत नव्हता. थोडावेळ अजुन चालल्यावर डाव्या हाताला आतल्या बाजुला एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली एक सडपातळ देहयष्टीचा पण उग्र चेहर्याचा माणुस बसलेला आकाशला दिसला. हाच बहुतेक तो भगत असणार असा अंदाज बांधुन आकाश त्या माणसाकडे गेला.

"ये.....मला वाटलेलच की तू येणार म्हणुन .....पण अपेक्षेपेक्षा उशीरा आलास. पण आलास हे बरं केलस.....देर आए पर दुरुस्त आये" तो भगत डोळे बंद करुनच आकाशकडे पाहून बोलत होता. भगताच्या अश्या बोलण्याने आकाशला नवल वाटलं तो बावरुन इकडे तिकडे पाहू लागला.

"तूच......तुझ्याशीच बोलतोय मी....आपल्या मुलीबद्दल बोलायला आला आहेस ना.....मग असा बावळटा सारखा इथे तिथे काय पहातोयस" भगत आपले बंद डोळे आकाशावर रोखून त्याच्यावर गरजला.आकाश आता त्या भगताच्या समोर येउन बसला आणि हात जोडून म्हणाला.

"बाबा आपण सर्वज्ञानी आहात. हल्ली काय चालु आहे ते माझ्या आकलनाच्या पलिकडलं आहे. मला आणि माझ्या मुलीला काही अपाय तर होणार नाही हीच काळजी वाटते...."

"ह्म्म्म्म........मला जाणवतय की तुझ्यासोबत काय घडतय ते. पण काळ वाईट आहे सध्या तुझ्यासाठी आणि खासकरून तुझ्या मुलीसाठी. येत्या अमावस्येपर्यंत फार जपावं लागेल तिला. घात होण्याची शक्यता आहे." हे बोलताना त्या भगताच्या बंद पापण्याआडची बुबुळं आपल्यावरच रोखलेली आहेत हे आकाशला जाणवलं.

"ह्यावर काही उपाय...." आकाशने भीत भीतच भगताला विचारलं

"येत्या शनिवारी रात्री स्मशानात ये.... एकटा .......मग सांगतो. तोवर हा धागा तुझ्या मुलीच्या दंडाला बांध.... जा....आणि लक्ष्यात ठेव ह्या अमावस्येपर्यंतचा काळ तिच्यासाठी फार कठीण आहे. डोळ्यात तेल टाकुन जपावं लागेल पोरीला. जा निघ लवकर....." एव्हढं बोलून भगताने आकाशला बाहेरचा रस्ता दाखवला आणि पुन्हा आपली ध्यान साधना करू लागला.

भगताने दिलेला तो धागा घेउन आकाश तडक तिथून निघाला. स्मशानाबाहेर सुहास त्याची वाट पहात होता.

*********************************************************************************************

आज त्या भगताच्या गडबडीत आकाश रेणुला शाळेतुन आणायला पुन्हा उशीरा पोहचला. आकाशची वाट पाहून रेणु निघून गेली होती. तिला लगेच गाठायला हवं, ह्या विचाराने आकाश धावतच घरी आला. पण रेणु घरी नव्हती. त्याने अख्ख घर शोधलं. शेजारीपाजारी, अंगणात, आजुबाजुला, सगळीकडे शोधलं पण रेणुचा कुठेच पत्ता नव्हता. तो पुन्हा शाळेत गेला, पण उत्तर तेच.

"रेणु इथे नाही."

आकाश आता सरबरला. हळुहळु रेणु गायब झाल्याची गोष्ट गावभर सगळीकडे पसरली. सगळेजण आपापल्या परीने रेणुचा शोध घेउ लागले. विश्रामपुरमधे एखादं मूल हरवायची आजवरची ही पहीलीच घटना होती. अख्खा दिवस लोटला तरी रेणुचा गावात कुठेच पत्ता नव्हता. आतातर रात्र होत आली होती, तरी रेणु अजुन सापडली नव्हती. रेणु गायब झाल्याचा आकाशला फार मोठा धक्का बसला होता. आपण रेणुच्या आईने दिलेला इशारा मानायला हवा होता अस आकाशला राहून राहून वाटत होतं. साला आपण ही संधी घ्यायलाच नको हवी होती. आपल्या मुर्खपणामुळेच झालयं हे सगळं. आकाश स्वत:लाच दोष देत होता.

सुहास गावच्या पोलीस पाटलांना भेटुन गेस्टहाउसवर आला. पोलीस पाटलांनाही काही कळत नव्हतं. एव्हढ्याश्या गावात अख्खा दिवस उलटुनही रेणु सापडत नाही ह्याच टेंशन आता त्यांनाही आलं होतं. रेणुला शोधण्यासाठी त्यांनी त्यांचे सगळे पर्याय कामाला लावले होते. लवकरच ते रेणुला शोधून काढतील असा पोलीस पाटलांनी दिलेला निरोप सुहासने आकाशला दिला आणि रेणु लवकरच सापडेल असा विश्वासही व्यक्त केला. आकाशला सध्य परिस्थितित सुहासचा मोठा आधार वाटत होता. आकाशने सुहासला एकदम मिठी मारली आणि त्याला भडभडुन आलं. इतका वेळ अडवून ठेवलेल्या त्याच्या भावनांला त्याने वाट मोकळी करून दिली.

"आकाशसाहेब काळजी नका करू आपली रेणु लवकरच आपल्या घरी परत येईल" सुहासने आकाशला त्याचा भावनावेग ओसरल्यावर त्याला समजावत म्हणाला.

सुहासने आकाशला थोडी विश्रांती घ्यायला सांगितली. आकाश तयार नव्हता तरी सुहासने त्याला बळेबळेच सोफ्यावर झोपवले. रेणुच्या काळजीने आकाशला झोपच येत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर सारखा रेणुचा चेहरा येत होता.

रेणुच्या विचारात जसजशी रात्र चढु लागली तसे आकाशचे डोळे जड होउ लागले आणि दिवसभराच्या दमलेला आकाशवर हळुहळु निद्रेची ग्लानी चढु लागली.

रात्री अचानक आकाशची झोप चाळवली. त्याला रेणुचा आवाज ऐकू येत होता. ती त्याला हाका मारत होती. रेणुच्या आवाज ऐकताच आकाश पटकन उठला आणि रेणुचा आवाज कुठुन येतोय त्याचा अंदाज घेउ लागला. तेव्हढ्यात.....

"पप्पा........"

त्याला पुन्हा रेणुची हाक ऐकू आली.

त्याने आवाजाच्या दिशेने चमकून पाहिलं, तर तो आवाज घराबाहेरून येत होता. आकाश धावत खिडकीकडे आला. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. समोर रेणु गेटवर उभी होती. आकाश धावतच घराबाहेर आला. रेणु अजुनही गेटवर रडत उभी होती. बहुतेक खुप घाबरली होती. आकाश दुप्पट वेगाने रेणुजवळ पोहचला. त्याने रेणुला लगेच मिठीत घेतली. रेणु अजुनही रडतच होती.

"पप्पा मला तू तिच्यापासून सोडव. मला तुझ्याकडे यायचय. ती नाही सोडणार मला." रेणु अजुनही रडतच होती. आकाश तिला सर्वतोपरी शांत करायचा प्रयत्न करत होता. पण रेणु अजुनही सारख "ती मला सोडणार नाही मला तुझ्याजवळ परत यायचय" असच काहीतरी बडबडत होती.

आकाशला वाटले की झाल्याप्रकाराने ती बहुतेक घाबरून बावरली असेल. तो तिला घरी घेउन जाऊ लागला. तो तिचा हात धरून घराच्या दिशेने वळलाच होता की त्याला त्याचा हात एकदम हलका वाटला. त्याने चमकून आपल्या हाताकडे पाहिलं तर तो आता जागेवर कोसळायचाच बाक़ी होता. कारण मगाशी ज्या रेणुचा हात धरून तो घरी जायला वळला होता, ती रेणु आता गायब झाली होती आणि तिच्या जागी आकाशच्या हातात त्या दळभद्री बाहुलीचा हात होता जी त्याला ह्या विश्रामपुरमधे आल्यापासून छळत होती.

आकाशने आपल्या हातातली ती बाहुली जमीनीवर टाकली आणि तो रेणुला हाक मारू लागला. उत्तरादाखल रेणुचा आवाज फार दुरून येत होता. ती अजुनही आकाशला तिला कुणापासुन तरी सोडवायला सांगत होती. आकाश त्या आवाजाच्या मागुन पळत गेला, पण रेणुचा आवाज दरवेळेस वेगवेगळ्या दिशेने येत होता. त्यामुळे आकाशचा गोंधळ उडत होता. तो तिला वेड्यासारखा हाका मारत अंगणात इकडून तिकडे पळत होता. आता रेणुचा आवाज चारीबाजुने येत होता. आकाशचं डोकं आता गरगरायला लागलं होतं. तो डोकं धरून खाली कोसळला. अचानक त्याला कुणितरी गदागदा हलवायला लागल.

त्याने डोळे उघडले तर सुहास त्याला गदागदा हलवत होता. आकाशने डोळे उघडलेले पाहून त्याच्या जीवात जीव आला.

"काय झालं साहेब. असे काय करताय?" सुहासने काळजीने विचारलं.

"रेणु कुठेय?" आकाशने सुहासला विचारलं आणि तो उठून रेणुला घरभर शोधू लागला.

"तुम्हाला स्वप्न पडलं असेल बहुतेक. रेणु नाहीए इथे, पण लवकरच सापडेल. तुम्ही काळजी नका करू" सुहास आकाशला समजावत म्हणाला. आकाशच्या अवस्थेने त्याला कससंच होत होतं.

वास्तवाचे भान आल्यावर आकाशला जाणवलं की सुहासच्या सांगण्यानुसार त्याला खरच स्वप्नच पडलं होतं. पण इतकं खरं ? कस काय? तो डोक्याला हात लावून तिथेच मटकन खाली बसला. सुहास लगेच आकाशकडे गेला आणि त्याच सांत्वन करू लागला.

आकाशने सुहासला त्याला पडलेलं रेणुचं स्वप्न सांगितलं. आकाशच्या सांगण्यावर सुहास विचार करू लागला आणि त्याने आकाशला ताबडतोब भगताकडे जाण्याचा पर्याय सुचवला. आकाशलाही सुहासच्या म्हणण्यात तत्थ्य वाटु लागलं. ते दोघेही भगताकडे निघाले. ते गेस्ट हाउसच्या गेटवरच पोहचले असतील की आकाशला गेटवर कुणितरी उभं असल्याचं दिसलं. आकाशने नीट निरखून पाहिलं तर ती तीच म्हातारी बाई होती जी त्याला रोज ऑफ़िसच्या बाहेर त्याच्यावर नजर ठेवून उभी असायची.

आकाश धावतच तिच्याकडे पोहचला. जसा आकाश तिला काही विचारणार इतक्यात तिनेच आकाशला विचारलं

"तुमची मुलगी हरवली आहे ना? मला माहीतीय ती कुठे आहे ते" तिच्या अश्या बोलण्याने आकाश गांगरला.

तेव्हढ्यात पाठिमागुन सुहासही धावत तिथे पोहचला. त्याने बिचकुन सुहासकडे पाहिलं. येता येता सुहासने त्या बाईच वाक्य ऐकलं होतं.

"ही बाई वेडी आहे साहेब, हिच्या नादी नका लागू" तो आकाशच्या खांद्यावर हात ठेवत त्याला समजावत म्हणाला, पण ती बाई आकाश समोरून हटली नाही. तीने पुढे होउन आकाशची वाट अडवली.

"पारकरांच्या वाड्यात आहे तुमची मुलगी. वीणा घेउन गेलीय तुमच्या मुलीला तिथे" वीणा नाव ऐकताच आकाश थांबला आणि अविश्वासाने तिच्याकडे पाहू लागला.

"अस नका करू ऐका माझं आपल्याकडे वेळ कमी आहे" सुहास जवळ जवळ ओढतच आकाशला तिथून घेउन गेला.

*********************************************************************************************

ते दोघे भगताकड़े पोहचले. भगत डोळे मिटुन तोंडाने काहीतरी पुट्पुटत होता. सुहास भगताला काही सांगणार इतक्यात तो भगत गरजला.

"मला कळलाय सगळा प्रकार. मी सांगितलं होत तुला तिच्यावर लक्ष ठेव म्हणुन"

तो पुन्हा तोडांने पुटपुटत कामाला लागला. रात्र चढायला लागली होती. त्या भगताने यज्ञ पेटवला होता . बरचसं सामान आजुबाजुला पडलं होतं. गंध,अबीर,बिब्बा,बरेचशे कुठल्या कुठल्या प्राण्यांचे अवयव होते. वेगवेगळ्या रंगाचे अंगारे आणि एका पातेल्यात लाल रंगाच कसलं तरी पाणी होतं नीट पाहिल्यावर कळलं की ते रक्त होतं. मनासारखी तयारी झाल्यावर त्या भगताने आकाशाला जवळ बोलावलं आणि म्हणाला.

"काळजी करू नकोस, मी सोडवतो तुझ्या मुलीला. बघुया ती कशी नाही सोडत तिला ते"

एव्हढं बोलुन भगताने हवेत राख सोडली आणि तो मंत्र पुटपुटायला लागला. हळुहळु मंत्राचा जप वाढायला लागला. आवर्तने वाढायला लागली. भगत आता घुमायला लागला. स्मशानाच्या त्या भयाण शांततेत भगताचा त्या घुमण्याचा आवाज अंगावर शहारे उठवत होता. एक दोन क्षण गेले असतील की एकाएकी तो भगत घुमायचा थांबला.

अस अचानक त्या भगताला काय झालं म्हणुन आकाश आणि सुहास विचारात पडले की तेव्हढ्यात त्या स्मशानाचा लोखंडी गेट करकरला. दोघेजण तिकडे पाहू लागले.

तो गेट धुक्याने भरला होता. हळुहळु गेटवरच धुकं विरायला लागल आणि तिथे एका मुलीची सावली दिसायला लागली. तिच्या हातात बाहुली होती. ती बाहुली पाहून आकाश जागीच सटपटला.

ती मुलगी हळुहळु आकाश आणि भगताच्या दिशेने येउ लागली. भगत आता परत घुमायला लागला होता. त्याच्या मंत्राची आवर्तने पुन्हा सुरु झाली होती. ती मुलगी आता भगताच्या समोर उभी होती. भगत तिच्याकडे एकटक पहात होता. एकदोन क्षण गेले असतील की भगताने आपल्या हातातील एक वस्तु समोरच्या आगीत टाकली त्यासरशी त्या मुलीच्या भवती आगीच एक रिंगण तयार झालं. समोर चाललेला हां सगळा प्रकार बघून आकाश आणि सुहास दोघेही फार घाबरले होते. भगत मात्र एकटक तिच्याकडे पहात होता आणि तोंडाने अगम्य भाषेत काहीतरी पुटपुटत होता. त्या आगीच्या रिंगणाने आकाशला त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. तेव्हढ्यात समोरच्या आगीत भगताने काहीतरी मंत्र म्हणुन आहुती सोडली. त्यासरशी समोरची आग जास्तच भडकली आणि मोठा जाळ झाला. त्याचा प्रकाश त्या मुलीच्या चेहरयावर पडला. त्या मुलीचा चेहरा पाहून आकाश बिथरला आणि जोरात ओरडला.

"रेणु.........."

आकाशच्या अश्या प्रतिक्रियेने सुहाससोबत भगतही गडबडला. ती मुलगी रेणु आहे हे पाहून भगताची खात्री पटली की त्या दुसरया मुलीने आपला डाव साधलाय. त्याने लगेच सुहासला आकाशाला सावरायला खुणावलं.

"समोर दिसते ती तुझी मुलगी नाही" भगताने आकाशला दरडावलं.

"कोण आहेस तू आणि का ह्या मुलीला त्रास देतेयस?" भगताने रिंगणात बसलेल्या रेणुला विचारलं. उत्तरादाखल रिंगणातली रेणु काही बोलली नाही. रेणु उत्तर देत नाही हे पहाता त्या भगताने पुन्हा तिच्यावर अंगारा मारला. तशी रेणु गुरगुरली.

"मी नाही सोडणार हिला.....नाही सोडणार......"

"का?" भगताने आवाज चढवुन विचारलं.

उत्तरादाखल रेणु फ़क्त बसल्या जागी फ़क्त गुरगुरत होती. ती उत्तर देत नाही हे पहाता भगत तिच्या चेहरयावर अंगारा मारला. त्यासरशी रेणु चवताळली. भगताच्या अंगार्याने तिच्या चेहरयावर वार झाल्यासारखं काहीतरी उमटलं. रेणु भगताच्या त्या अंगार्यामुळे विव्हळायला लागली होती. रेणुला असं ओक्साबोक्सी रडताना पाहून आकाश बिथरला. तो सुहासच्या हाताला हिसडा देऊन रेणुकडे पळाला. त्याला अस रेणुकडे जाताना पाहून भगत भडकला. त्याच लक्ष विचलीत झालं. नेमकं ह्याच गडबडीचा फायदा उचलून रेणुने पलटवार केला. बहुतेक ती ह्याच संधीची वाट पहात होती. तिच्या नजरेत आता आग उतरली होती. अचानक काही कळायच्या आत भगतासमोरच्या पेटलेल्या आगीचा भडका उडला आणि तो सरळ भगताच्या अंगावर आला. ह्याअगोदर की भगत स्वत:ला सावरू शकेल त्या आगीने भगताचा ताबा घेतला. भगत पेटला हे पाहून सुहास आणि आकाश आता भगताकडे धावले. रिंगणाची आग विझली होती. रेणु आता विचित्र हसायला लागली. पूर्ण स्मशानात रेणुच्या खदखदून हसण्याचा आवाज भरुन राहिला होता. तिने एकवार जळणार्या भगताकडे पाहिलं आणि स्मशानातुन पळुन गेली. सुहास आणि आकाशने फार मेहनतीने भगताची आग विझवली. पण आता फार उशीर झाला होता. भगत आपल्या शेवटच्या घटका मोजत होता. जाताजाता त्याने आकाशला फ़क्त एकच गोष्ट सांगितली.

"तुझ्या मुलीला वाचव.........."

*********************************************************************************************

आकाश आणि सुहास दोघेही धावत स्मशानाबाहेर आले आणि बाहेर रस्त्यावर येउन मगाशी स्मशानातुन पळालेली रेणु कुठे दिसतेय का ते पाहू लागले. तेव्हढ्यात सुहासने एका दिशेला बोट दाखवून आकाशच लक्ष तिथे वेधलं. आकाशने त्या दिशेला पाहिलं असता रस्त्याच्या त्या टोकाला ती म्हातारी उभी होती. ते दोघेही धावत तिच्याजवळ पोहचले. तिला पाहून आकाश काकुळतीला येउन विचारलं की रेणु कुठे आहे. तिने आकाशकडे पाहून त्याला समजावत म्हणाली

"ती वाईट नाय आहे. ती तुझ्या मुलीला काही करणार नाय. तिला फ़क्त तूम्ही हवे आहात. ती तुमची वाट बघतेय....."

त्या म्हातारीने अस सांगताच आकाश गडबडला. त्याला काहीच कळतच नव्हतं की हि अशी काय बोलतेय. त्याने गोंधळुन त्या म्हातारीला विचारलं.

"तुम्ही कोणाबद्दल बोलताय?????"

"वीणा......." म्हातारीच्या तोडुंन पुन्हा वीणाच नाव ऐकताच आकाश चवताळला. त्याने वैतागुन त्या म्हातारीला विचारलं.

"कोण आहे ही वीणा????"

"तुम्हाला वीणा माहीती नाही...." म्हातारीने अविश्वासाने आकाशकडे पाहिलं, पण एक क्षण थांबुन एक दिर्घ सुस्कारा टाकत ती म्हणाली.

"तुमचीपण काय चुक म्हणा...देवच एव्हढी मोठी खेळी खेळला की, काही विचारता सोय नाही."

थोड थांबुन ती म्हातारी पुढे सांगायला लागली.

"फार गोड होती आमची वीणा. आईवीना पोर पण तिच्या बापानं कधी तिला तस जाणवुन दिला नाय. तिचापण तिच्या बापावर फार जीव.

‘विश्वास पारकर’ त्याच नाव

दोघेच होते फ़क्त एकमेकांसाठी. ह्या गावात नवीनच आलेले. गोऱ्या सायबांनी पाठवलेले पारकरांना ह्या गावात कारकुनी करायला. फार मोठा माणुस होता पारकर. पैश्यानेही आणि दिलानेही. त्यांनीच ह्या गावात वाडा बांधला होता वीणासाठी. मी त्यांच्याकडे वीणाला सांभाळायला होते. मला माझ्या मुलांनी वाऱ्यावर सोडलेली, पण छोट्या वीणानं मला तिच्या घरात आसरा दिला. फार गोड पोरगी होती बघा वीणा. कुणाचं वाईट बघितलं जायचं नाय तिच्याकडना. पण तिच्याबाबतीत मात्र काय चांगलं झालं नाय"

"काय झालं वीणाला?" आकाशने विचारलं.

"काय नाय ओ. एकदा खुप आजारी पडली वीणा. साधं पडसाचा निमित्त झाल आणि जाम झाली पोरगी. विश्वासरावांनी सगळं केलं, काय करायचं बाक़ी ठेवल नाय. पण वीणाला कशानं पण गुण येईना. गावचे वैद्यबुवा पण दमले. शेवटी त्यांनी विश्वासरावांना शहराच्या वैद्याचा पत्ता दिला आणि त्यांना वीणाला दाखवायला सांगितलं. विश्वासराव त्या रात्रीच लगेचच टांगा घेउन निघाले. खरतर ते वीणालाच तिथे घेउन जायचे पण वैद्यांनी वीणाला ह्या पावसात एव्हढा मोठा प्रवास झेपणार नाय अस सांगितलं. मग विश्वासराव एकटेच टांगा घेउन शहराकडे निघाले त्या वैदयाला आणायला निघाले. त्यारात्री पाउस खुपच पडत होता जणुकाही ढगफ़ुटीच झाली होती. विश्वासराव कसेबसे गावाच्या वेशीबाहेर पडले. त्या पावसात मजल दरमजल करत हळुहळु पुढे जात होते. ते अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहचले असतील नसतील की घात झाला. वाटेतल्या भगवती नदीला त्यारात्री पुर आला होता. नदिवरचा पुल चांगला फ़ुटभर पाण्याखाली गेला होता. ह्या अश्या वक्ताला पुर पार करणं म्हणजे जीवाशी खेळणं हाय हे माहीत असूनसुध्दा विश्वासरावांनी पुलावर आपली घोडागाडी घातली. गाडीवाल्याने जिकरीने गाडी अर्ध्या पुलापर्यंत ओढली, पण पाण्याचा जोर फारच जास्त होता. अचानक टांगा पलटला आणि पाण्यात पडला.

इकडे वाड्यात वीणाच जास्त झालं. तिची प्रकृती खालावत चालली होती. वैद्यबुआ शर्तीचे प्रयत्न करत होते. अखेर सकाळी वीणाने तिच्या बाबाची वाट पाहून प्राण सोडला. मरताना तिचे डोळे दारावरच लागले होते. दिवसभर विश्वासरावांची वाट पाहून शेवटी गाववाल्यांनीच तिचे अंत्यसंस्कार केले. विश्वासरावाच्या मागावर गेलेल्या गावकऱ्यांना विश्वासराव पुरात वाहून गेल्याची खबर मिळाली. ही खबर ऐकून सगळा गाव सुन झाला होता. आठवड्याभरानी विश्वासरावांच प्रेत दुसऱ्या गावात सापडलं. एका रात्रीत पारकरांचं होत्याच नव्हतं झालं होतं. अख्खा गाव विश्वासराव आणि वीणाच्या अश्या जाण्याने हळहळलं. पण हळुहळु लोक विश्वासराव, वीणा आणि पारकरांच्या वाड्याला विसरले.

पण बहुतेक वीणा विसरली नव्हती........"

"म्हणजे??????" त्या म्हातारीला सुहासने विचारलं.

सुहासच्या प्रश्नांने ती म्हातारी तंद्रीतुन बाहेर आली आणि पुढे सांगु लागली.

"विश्वासराव गेल्यावर पारकरांचा वाडा रिकामीच होता. वीणा आणि विश्वासराव ह्यांना एकामेकांशिवाय अजुन कुणीच नातलग नव्हते. त्यामुळे हां वाडा आता बेवारस झाला होता. अश्यातच एके रात्री ह्या वाड्यात चोरीच्या इरादयाने गावातली काही पोरं घुसली. पण काही वेळातच ती बोंबलत गावात परत आली. त्यांचे चेहरे पांढरे फ़ट्टक पडले होते."

"पण का????" आकाशने इतक्या वेळात आता पहिल्यांदाच तोंड उघडलं होतं.

"त्यांना म्हणे वीणा दिसली होती वाड्यात एका हातात तिची बाहुली सांभाळत." त्या म्हातारीने असं सांगताच आकाश आणि सुहासने एकाचवेळी एकामेकांकडे पाहिलं.

"नंतरही गावातल्या लोकांना कधीकधी तिन्हीसांजेला पारकरांच्या वाड्याच्या खिडकीत तर कधी गेटवर ती दिसत राहीली." एव्हढं सांगुन ती म्हातारी गप्प झाली आणि अचानक आकाशकड़े वळुन त्याचे हात हातात घेउन त्याला म्हणाली

"ती तुमची वाट बघतेय विश्वासराव .......फ़क्त तुमची" त्या म्हातारीने असं सांगताच आकाश नखशिंखांत शहारला. तिच्या हातातून आपले हात सोडवून घेत आकाश तिला म्हणाला,

"कायतरीच काय बोलताय तुम्ही, आणि मीच तो विश्वासराव कश्यावरून?"

"कारण विणाने तुम्हाला ओळखलय. आजवर वीणाने गावात कुणालाच समोर जाऊन त्रास किंवा आपलं अस्तित्व दाखवलं नाही. ती फ़क्त तुमच्याशीच संपर्क करतेय. कारण तिला माहीतीय की तुम्हीच तिचे बाबा आहात आणि तिने आपल्या बाबाला ओळखलय." ती म्हातारी आता आकाशच्या नजरेला नजर देऊन उत्तरली.

ह्या गावात आल्यापासून त्याला येत असलेल्या अनुभवावरून आकाशला त्याच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडतेय हे जाणवतं होतं. त्यात ह्या म्हातारीच्या सांगितलेल्या गोष्टीवरुन त्याच्या गोंधळात अजुन भर पडली होती.

"पण मग ती माझ्या रेणुला का त्रास देतेय????" आकाशने वैतागुन त्या म्हातारीला विचारलं

"कारण वीणाला असं वाटतय की रेणु तुम्हाला....म्हणजे तिच्या बाबाला तिच्यापासून दूर घेउन चाललीय" त्या म्हातारीने आकाशच्या वैतागाचं शांतपणे उत्तर दिलं.

"लहान आहे हो ती. ह्या जगातून जाताना फ़क्त तुमच नाव तोडांत होतं तिच्या. तुम्हाला एक नजर पहायला लाकाळली होती बिच्चारी. फ़क्त मी येईपर्यंत थांब.....मी आल्याशिवाय कुठेही जायच नाही ह्या तुमच्या एका शब्दावर इतकी वर्ष थांबलीय ओ ती पोरं आणि तुम्ही इथे येऊन तिला साधं आठवतही नाही कसं वाटत असेल त्या जीवाला आणि म्हणुन ति रेणुला घेउन गेली. जेणेकरून निदान त्यामुळे तरी तुम्ही तिला भेटायला याल"

हे सगळं ऐकून आकाश डोक बधीर झालं होतं. तो सुन्न झाला होता. त्या म्हातारीने तिचा कापरा हात त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"नका काळजी करू विश्वासराव, वीणा फार चांगली पोर आहे. तुम्ही जा तिच्याकडे आणि फ़क्त तिच्यासाठी म्हणुन जा. तीही तुमचीच मुलगी आहे. रेणुसारखी........"

त्या म्हातारीकडे आणि सुहासकडे एक नजर टाकुन आकाश पारकरांच्या वाड्याकडे धावत निघाला. सुहासही मागुन निघालाच होता की त्या म्हातारीने त्याला अडवलं.

"आज त्यांना एकट्यालाच जाऊ दे......"

*********************************************************************************************

आकाश पारकरांच्या वाड्याकडे पोहचला. वाड्याचा तो लोंखडी गेट उघडताना जोराचा करकरला. रात्री तो वाडा आता भयाण वाटत होता. पण आपली रेणु ह्या वाड्यातच आतमधे कुठेतरी एकटी आहे. हे ओळखुन आकाश तो मिट्ट काळोख चिरत पारकरांच्या वाड्यात शिरला.

वाड्याचा मुख्य दरवाजा उघडाच होता. वाड्याच्या वरच्या झडपांमधुन उतरणार्या चंद्रप्रकाशाने वाड्याच्या आत निळा अंधार साचला होता. हळुहळु आकाशचे डोळे त्या निळ्या अंधाराला सरावले. वाड्याच्या मध्यभागी आल्यावर वाड्याची आतली ठेवण दिसू लागली. आत्ताची त्याची दुर्दर्शा बघवत नव्हती. वाड्याच्या आतला अंदाज घेताना आकाशची नजर वाड्याच्या एका भिंतीवर खिळली. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कारण समोरच्या भिंतीवर एका मोठ्या चित्रात तो स्वत: उभा होता त्याच्या सोबत एक मुलगी उभी होती. हातात एक बाहुली घेउन. ती बाहुली बघता आकाशला त्या म्हातारीची गोष्ट पटायला लागली. म्हणजेच त्या म्हातारीने सांगितलेली विणाची गोष्टही खरी होती. ते चित्र बघताना आकाशची नजर हळुहळु धूसर होउ लागली. आकाशने आपले डोळे पुसले आणि तो आजुबाजुला पाहू लागला.

"बाबा........"

अचानक वरच्या मजल्यावरून हाक ऐकू आली. आकाश धावतच वर गेला. तो वर पोहचलाच होता की खालच्या खोलीतून पुन्हा एका मुलीचा आवाज आला. ती तिच्या बाबांना हाक मारत होती. आकाशला समजुन चुकले की ही वीणाच आहे.

"वीणा......." आकाशने वीणाला हाक मारली.

पण आकाशची वीणाला मारलेली हाक वाड्याच्या रिकाम्या भिंतीना आपटुन वांझोटी परत आली. न रहावुन आकाशने वीणाला पुन्हा हाक मारली.

"वीणा अग बघ....तुझा बाबा आलाय...तुला भेटायला."

काही क्षण शांततेत गेले असतील की आकाशला पुन्हा एक आवाज ऐकू आला.

"बाबा........."

आकाशने झटकन त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर वाड्याच्या खालच्या बाजुच्या एका खोलीच्या दारात एक मुलगी उभी होती. तिची बाहुली तिच्या छातीशी कवटाळुन. तिला पाहून आकाश शहारला कारण ती तीच बाहुली होती जी आजवर त्याच्या स्वप्नांत येत होती आणि ती मुलगी नक्कीच वीणा होती कारण आत्ताच आकाशने जो फ़ोटो पाहिला होता त्यात त्याच्यासोबत उभी असलेली मुलगी तीच होती. आकाशला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिने आकाशला पुन्हा हाक मारली.

"बाबा......."

तिचा आवाज फार बारीक येत होता. ती एक एक पाउल पुढे टाकीत आकाशकडे येत होती. तिला चालताना फार कष्ट होत होते, हे आकाशला जाणवलं. तो धावत खाली आला. ती अजुन एक दोनच पावलं चालली असेल की तिचा तोल गेला. आकाशने पुढे होऊन ती जमीनीवर पडायच्या अगोदर तिला आपल्या कुशीत झेलली.

खरच वीणा त्या म्हातारया आजीने सांगितल्याप्रमाणे गोड होती. तिच्या सुकलेल्या चेहरयावर आकाशला पाहून एक क्षीण हास्य उमटलं.

"बाबा किती उशीर केलास रे...मी किती वाट बघत होती तुझी." वीणा आकाशला पाहून बोलली.

तीच हे वाक्य ऐकून आकाशला गलबलून आलं. त्याने तिला आपल्या छातीशी कवटाळली.

"हो ग बच्चा, मला खरच खुप उशीर झाला तुझ्याकडे यायला." आकाश विणाच्या कपाळाचं एक चुंबन घेत म्हणाला.

"आता नाही ना मला एकटीला सोडुन जाणार" वीणाने आकाशच्या गालाला हात लावत विचारलं.

"नाही ग बेटा. मी आता माझ्या वीणाला सोडुन कुठेच नाही जाणार." आकाशने वीणा भवतीची आपली मिठी अजुन घट्ट केली.

"बाबा मी ना खुप दमलीय. मला थोडावेळ झोपू तुझ्याकडे" एव्हढं बोलून वीणा आकाशला बिलगली.

आकाशने वीणाला अलगद आपल्या कुशीत घेतले. दोघेही बापलेक इतक्या वर्षाची आपली कसर भरुन काढत होते. आकाशला त्या म्हातारीचे सगळे बोलणे आठवत होते. खरच वीणाने खुप सोसले होते. बिच्चारी माझी वीणा......पण आता आपण तिला आपल्यापासून अजिबात दूर करणार नाही. आजपासून माझ्या दोन मुली आहेत. एक रेणु आणि दूसरी वीणा.....

आकाश वीणाला आपल्या कुशीत घेउन निजवतं होता की, अचानक आकाशला त्याची कुस हलकी हलकी वाटु लागली. आकाशने पाहिलं तर त्याच्या कुशीत वीणाच्या जागी फ़क्त तिची बाहुली होती. इतकी वर्ष फ़क्त "मी आल्याशिवाय कुठेही जायच नाही" ह्या शब्दाला वीणा जागली होती. तीने आपला शब्द आज पूर्ण केला होता. तिचा बाबा परत आल्यावरच ती तिच्या पुढच्या प्रवासाला निघून गेली होती. आकाश वीणाची ती बाहुली आपल्या छातीशी कवटाळून हमसाहमशी रडायला लागला.

तेव्हढ्यात वाड्याच्या वरच्या भागातून आकाशला रेणुचा आवाज ऐकू आला. रेणुची आठवण होउन आकाश धावतच त्या आवाजाच्या दिशेने वर धावत गेला. वर पोहचल्यावर आकाश समोरच्या उघड्या असलेल्या खोलीत घुसला. आत पाहिलं तर रेणु त्या खोलीत एका कोपरयात बसून रडत होती. आकाशला आलेला पाहून ती धावतच त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला रडता रडता सांगायला लागली.

"पप्पा ती वीणा ना……फार वाईट आहे. ती मला तीच घर बघायला चल असं सांगुन इथे घेउन आली आणि तिने मला इथे कोंडुन ठेवलं."

रेणुने आकाशकडे वीणाची तक्रार करताच आकाशला भरुन आलं. त्याने रेणुला आपल्या छातीशी कवटाळलं आणि तोही रडू लागला. कारण वीणा असं का वागली हे त्याला आता पुरेपुर ठावुक होतं आणि हयात रेणुची काहीच चुक नसताना तिला त्रास भोगावा लागला होता हे ही त्याला पटत होतं. पण काही गोष्टींना आयुष्यात खरच काही पर्याय नसतो हे आज त्याला पुरेपुर उमगलं होतं. कुशीत हमसून हमसून रडणाऱ्या रेणुला शांत करताना आकाशची नजर समोरच्या भिंतीवर गेली. त्या भिंतीवर धुळीने माखलेला वीणाचा फ़ोटो होता. वीणाचा तो हसरा चेहरा पाहून त्याला मगासचा आपल्या कुशीतला वीणाचा चेहरा आठवला आणि त्याचबरोबर वीणा आता आपल्याला ह्यापुढे कधीच भेटणार नाही हे जाणवुन आकाशला फार भरुन आलं. ह्या सगळ्यात खरच तिचा काय दोष होता, जे तिला इतकं भोगावं लागलं. आज रेणु दोन दिवस आपल्या पप्पा शिवाय एकटी राहिली तर तिची ही अवस्था झाली, मग वीणा तर गेले कित्येक वर्ष आपल्या बाबाला शोधत एकटी ह्या वाड्यात फिरत होती. तेव्हा काय हालत झाली असतील त्या जीवाची. आकाश ह्या विचारानेच हडबडला.

आकाश आज स्वत:ला जगातला सगळ्यात अभागी बाप समजत होता, ज्याची एक मुलगी त्याला भेटताना, त्याची दूसरी मुलगी मात्र त्याच्यापासून कायमची दुरावली होती.

"परत ये वीणा.....प्लीज मला भेट.. मी नाही तुझ्या इतकी वाट पाहू शकत. प्लीज एकदातरी भेटुन जा......फ़क्त एकदाच भेटुन जा." आकाश रेणुला घट्ट धरून वीणाच्या त्या फ़ोटोकडे पाहून मोठमोठ्याने रडू लागला. कारण, आकाशची वीणासाठीची "प्रतीक्षा" आता कधी संपणार होती कुणास ठावुक.

समाप्त

कथा

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

7 Aug 2016 - 12:16 am | अमितदादा

छान.. आवडली कथा..

एस's picture

7 Aug 2016 - 12:30 am | एस

कथा फार आवडली.

स्पा's picture

7 Aug 2016 - 5:32 pm | स्पा

मस्तच, फ्लो जबरदस्त

ज्योति अळवणी's picture

8 Aug 2016 - 1:11 am | ज्योति अळवणी

छान आहे गोष्ट... आवडली.

मस्त गोष्ट. स्पीड मस्त ठेवला आहे.

टप्प्याटप्प्यात वाचली पण आवडली.
मस्त रे भावा.

कविता१९७८'s picture

8 Aug 2016 - 7:16 pm | कविता१९७८

मस्त गोष्ट

मी-सौरभ's picture

8 Aug 2016 - 7:29 pm | मी-सौरभ

अतिरंजित नसल्याने जास्त आवडेश

रातराणी's picture

9 Aug 2016 - 6:51 am | रातराणी

सहमत! कथा आवडली.

विप्लव's picture

8 Aug 2016 - 9:06 pm | विप्लव

अंगावर शहारे आले अक्षरशः मस्तच

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Aug 2016 - 2:02 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खूप मस्त लिहिलंय. डोळ्यासमोर चित्र उभे राहिले .

नीलमोहर's picture

9 Aug 2016 - 2:26 pm | नीलमोहर

वातावरणनिर्मिती मस्तच!!

पैसा's picture

9 Aug 2016 - 2:41 pm | पैसा

कथा आवडली.

सिरुसेरि's picture

9 Aug 2016 - 4:04 pm | सिरुसेरि

थरारक कथा

अभिजीत अवलिया's picture

9 Aug 2016 - 9:51 pm | अभिजीत अवलिया

चांगला भयपट होईल...

खटपट्या's picture

10 Aug 2016 - 1:20 am | खटपट्या

आवडली

एक एकटा एकटाच's picture

14 Aug 2016 - 2:28 pm | एक एकटा एकटाच

सगळ्यांचे मनपुर्वक आभार

प्रभास's picture

14 Aug 2016 - 3:37 pm | प्रभास

भारीच कथा आहे... आवडली...