कुठे नेऊन ठेवला खो-खो

पी महेश००७'s picture
पी महेश००७ in काथ्याकूट
24 Jul 2016 - 5:19 pm
गाभा: 

बघता बघता प्रो-कबड्डीचा चौथा सिझन आला... भारतीय खेळांमध्ये कबड्डीला प्रचंड चाहता वर्ग लाभला. तसा तो आधीही होताच, त्यात आता आणखी भर पडली आहे (क्रिकेटच्या मुस्काटात मारावी इतकी ही लोकप्रियता बरं). अर्थात, भारतीय खेळ आहेच मुळी गर्दी खेचणारे! कबड्डीपाठोपाठ माझ्या आवडीचा खेळ म्हणजे खो-खो. काय अप्रतिम कौशल्य या खेळाचं!

कधी काळी पुणे, मुंबईकरांची दादागिरी होती या खेळात. आता या दिग्गजांना धक्का देत सांगलीने वर्चस्व राखले आहे. खो-खो अस्सल भारतीय खेळ असला तरी या खेळाच्या भाषेत क्रिकेटचा पगडा स्पष्टपणे जाणवतो. आक्रमण असेल तर फिल्डिंग आणि संरक्षण असेल तर बॅटिंग. उन्हाळी-पाणकाळी (टॉस किंवा नाणेफेक) करताना जो जिंकला त्या संघाचा कर्णधार लगेच म्हणतो बॅटिंग! असो. पण हा खेळ जपला तो ग्रामीण भागातील खेळाडूंनी. वेग आणि कौशल्याचा मिलाफ असलेल्या या खेळाला आता उभारीची गरज आहे.

खरं तर या खेळाची लीग स्पर्धा व्हायला हवी होती. मला वाटलं होतं, कबड्डीच्याही आधी खो-खोचीच प्रो लीग स्पर्धा येईल. पण भारतीय खो-खो महासंघाचे पदाधिकारी इतके निष्क्रिय आणि अपयशी निघाले, की प्रो-लीगचे चार सिझन आल्यानंतरही त्यांना खो-खोची लीग स्पर्धा घेता आलेली नाही. दुर्दैव म्हणजे, खो-खोची समृद्ध भूमी असलेल्या महाराष्ट्रालाही राज्य स्तरावर ती घेता आलेली नाही.

कुस्ती, कबड्डीच्या लीग स्पर्धांनी खेळाडूंना मालामाल केले, तसलं ऐश्वर्य खो-खोच्या वाट्याला कधी येईल देव जाणो...!

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Jul 2016 - 11:19 pm | माम्लेदारचा पन्खा

ह्याची चर्चा व्हायला हवी !

बाबा योगिराज's picture

24 Jul 2016 - 11:24 pm | बाबा योगिराज

खो खो कमीत कमी पाच वर्ष फार जवळून बघितलंय. काय मजा, काय तो थरार, काय तो आरडा ओरडा. निस्ता धिंगाणा.

खो खो ची वाट बघणारा
बाबा.
:-(

गामा पैलवान's picture

25 Jul 2016 - 1:18 am | गामा पैलवान

पी महेश००७,

जिव्हाळ्याच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद. यानिमित्ते आमच्या लहानपणीचे दिवस आठवले. पारले, सरस्वती, ईगल, नवमहाराष्ट्र वगैरे कसले कसलेले संघ होते त्याकाळी. तेव्हा कुठलेसे साखळी सामने चालंत. इंदूर आणि बडोद्याचेही संघ येत. बडोद्याच्या मध्यस्त रमत म्हणून तगडा संघ असे. महाराष्ट्र आणि कर्नाटक हे खोखोतले पारंपरिक प्रतिस्पर्धी. बाकीच्या राज्यांत खोखो फारसा बहरला नाही. कारण काय असावे लक्षात येत नाही. खरंतर हा अस्सल देशी खेळ आहे.

अवांतर : खोखो प्रचंड दमछाक करणारा आहे. बचाव करतांना अक्षरश: घामटा निघतो. पूर्वी एक डाव सहा मिनिटे असायचा. हल्ली नऊ मिनिटे झालाय. दोन मिनिटे बचावात पळणे म्हणजे काय प्रचंड कामगिरी असायची. हल्ली माहीत नाही. :-(

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 8:15 am | कैलासवासी सोन्याबापु

एकदम मैदानाला नमन करून 3-3-2 किंवा 1-1-4 ची position घेतल्यागत वाटले बघा (सगळ्यात कठीण चेन बहुदा 5-1-1 वाटत असे तेव्हा), मी लहानपणी जरासा गोलमटोल होतो, तरीही मी कायम फिल्डिंगला 2 नंबर पाटीला बसत असे, अतिशय ढिलेपणाने उठून डी मध्ये पोल जवळ दम गोळा करत उभा असलेला बॅटिंग करता प्रतिस्पर्धी झाप्पकन उलटा पोल मारून उचलण्यासारखी मजा नाही दुसरी महेश सर!!, आपला खोखो हा जगातला 3रा सर्वाधिक वेगवान खेळ आहे बरंका, प्रथम आहे आइस हॉकी अन दुसरा बास्केटबॉल (हे आमच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीचे ज्ञान, खरे खोटे देव जाणे), 3 नंबर वरून डॅश मारून विरुद्ध दिशेला प्रतिस्पर्धी डाईव्ह मारून उचलण्यासारखी मजा खरी बलस्थान ह्या खेळाची,

मुंबई-पुणे येथील खेळाडू जबर असत त्याचे कारण म्हणजे ग्राउंड वर एकदम कमी कल्ला असे त्यांचा, करपल्लवीच्या खुणा ठरवून त्यातूनच communication चाले त्यांचे, पार्ले टिळकची पोरे झकास असत , प्रवरानगर क्लब ट्रायल ला गेलो होतो मी 1997 ला ज्युनिअरविंगच्या तेव्हा पाहिले होते ह्या पोरांचा स्पोर्ट, सांगली कोल्हापूरला पण मस्त मजा आहे खोखोची, अन अर्थात आमचे HVPM म्हणजे आमच्यासाठी पंढरी आहेच :), त्या एका संस्थेमुळे आमच्या गावाला विलक्षण फायटिंग-सपोर्टींग स्पिरिट मिळाले आहे बघा!

अवांतर - हल्लीच डीडी स्पोर्ट्स वर राजस्थान (अजमेर) खोखो लीग चे सामने पाहिल्याचे आठवते, चमचमते ड्रेस फ्लड लाईट्स अन व्हॉलीबॉल नेट ने प्रेमाने झाडलेले मैदान पाणी मारलेले, इतपत तरी उत्तम सोय दिसली, एकदम साली आमची प्रॅक्टिस आठवली, वऱ्हाडी उन्हात पाटीच्या चुन्याची काच होऊन जायची अन पायावर तळव्याला कट्स पडत भयानक, अश्यावेळी पडलेला चरा धुवायचा घातले बनियन फाडून त्याची पट्टी पायाच्या अंगठ्याला बांधायची अन परत प्रॅक्टिसला भिडायचे हे सगळे रुटीन आठवले बघा

(आज 87 किलोचा) बाप्या

वेगवान खेळांबाबत माहिती बरोबर असेल तर मी पहिल्या तीनमधले दोन खेळ भरपूर खेळले. पाचवी-दहावी ही सहा वर्षे आंतर-वर्गीय सामन्यात खो-खो आणि शाळेच्या टीमसाठी बास्केटबॉल खेळायचे.

बास्केटबॉल विभागिय पातळीपर्यंत खेळलो, तरी तो आंतरवर्गीय सामन्यातला जोष, जल्लोश वेगळाच. काही आठवडे पूर्ण शाळा खोखो-कबड्डीमय होऊन जायची. स्वतःच्या वर्गाला जिंकवून देण्यासाठी आम्ही काय जीव ओतून खेळायचो. खरे तर खेळातले बारिक्सारिक डावपेच माहीत नव्हते. पण जागा आणि वेळ मिळेल तिथे आणि तेव्हा आमचा सराव चालायचा. बुजरेपणा सोडून मुले-मुली एकमेकांच्या स्पर्धेसाठी प्रोत्साहन द्यायचो तेव्हा मजा वाटायची. वर्गशिक्षकांनी हजेरी लावली तर मग तर काय हुरुप यायचा! सहाही वर्षे आमच्या वर्गाच्या मुलींच्या संघाला विजेतेपदाची ढाल मिळाली. मग ते स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढणं, ती प्रमाणपत्रे जपून ठेवणं - काय त्या रम्य आठवणी!

कबड्डीला आलेत तसेच खोखोलाही चांगले दिवस लवकर येवोत.

गामा पैलवान's picture

25 Jul 2016 - 11:54 am | गामा पैलवान

बापूसाहेब,

तुम्ही पण खुंटा येक्सपर्ट होय! वाचून ज्याम आनंद झाला. २ नंबर वरून आरामात उठून खुंट्यावर मात्र स्वत:स झपकन लपेटणारी तुमची तुंदिलतनु मूर्ती अगदी डोळ्यासमोर आली. :-)

कोणे एके काळी अस्मादिक लांबवरून धावत येऊन खुंटा मारण्यात पटाईत होते. आक्रमक दूरवरून धावत येतोय आणि आठव्या गड्याचं तोंड त्याच्याकडे आहे हे पाहून खुंट्यावरचा बचावपटू थोडा निश्चिंत म्हणजे ढिला पडायचा. नेमका तेव्हाच डाव साधून ऐन वेळेस वेग नियंत्रणात आणून अचूक स्टेपिंगच्या सहाय्याने त्याला खुंट्यावर गारद करण्यात एक काय मजा यायची! भरवेगात कोणी मध्यरेषेच्या जवळ येत नसतं या समजाचं क्षणार्धात गैरसमजात रुपांतर व्हायचं.

आ.न.,
-गा.पै.

अनुप ढेरे's picture

25 Jul 2016 - 11:59 am | अनुप ढेरे

एक कारण खो-खो नुस्ता बघून समजत नाही. फाऊलचे नियम बरेच क्लिष्ट असतात जे पहिल्यांदाच बघणार्‍याला समजत नाहीत. कबड्डी नुस्तं बघून अंदाज नक्की येतो की नक्की काय चाललय.

खो-खो/ आट्यापाट्या लहानपणी गावातल्या शाळेत खेळले तेच.
पुढे फक्त दूरदर्शनवर पाहिले. पहायलाही दमणूक होते.
लहानपणी पुण्यात आल्यावर एक नातलग ईगल्समधे खेळायचा म्हणून शिवाजी मंदिरात पहायला जात असे. काय खेळत असत!
त्यांना राष्ट्रीय पातळीवर खेळायला शाळेतून सूट मिळे याचं कौतुक वाटे. आजही तो फिट्ट आहे आणि मॅरेथॉन वगैरे पळतो.

(ते पाहून हल्ली जाणीवपूर्वक चिरंजीवांना खो-खो ला पाठवले आहे. यंदा जिल्हापातळीवर खेळेल.)

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 12:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

ते पाहून हल्ली जाणीवपूर्वक चिरंजीवांना खो-खो ला पाठवले आहे. यंदा जिल्हापातळीवर खेळेल

खूप खूप उत्तम निर्णय अन पालक म्हणून आपणाला शुभेच्छा बरंका खेडूत साहेब

ह्याचे फायदे लॉंगटर्म मध्ये पाहायला मिळतील तुम्हाला ह्याबद्दल आश्वस्त राहाल!! :)

खो-खो कधी खेळलो नाही पण बघायला खूप मजा यायची.
खो-खो च्या लीग ची वाट बघतोय.

पेशवा भट's picture

27 Jul 2016 - 3:48 pm | पेशवा भट

पण पहिले एक कळत नाही की प्रो-लिग म्हणजे काय असते? आणि सगळ्या महाराष्ट्रिय खेळांनाच का प्रो-लीग म्हणुन सादर केले जाते की ज्यामुळे तो खेळ एकदम भारतभर उत्साह निर्माण करतो आणि या खेळांना सिनेतारे / तारका पण हजेरी लावतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jul 2016 - 5:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

महाराष्ट्रीय खेळ? !

अद्द्या's picture

28 Jul 2016 - 3:09 pm | अद्द्या

IPL म्हणजे काय ?
तेच .. खेळाडूंना पैसे मिळतेत , खेळाला प्रसिद्धी मिळती. आपलं मनोरंजन होतं .

बाकी "महाराष्ट्रीय खेळ ? "
असो . मिपा प्रथे प्रमाणे सांगायचं झालं तर . "अभ्यास वाढवा"

मग तुमचा अभ्यास झाला असला तर तुम्ही मुळ प्रश्नाचे उत्तर द्याना राव. फक्त महराष्ट्रीय शब्दावर गाडी अडलीये तर ठिक आहे भारतीय खेळा म्हणु या हाकानाका.

आता द्या बघु उत्तर की प्रो-लीग काय असतं.

अद्द्या's picture

28 Jul 2016 - 3:59 pm | अद्द्या

वरच्या दोन ओली वाचायच्या राहिल्या का बुवा ?

विवेकपटाईत's picture

28 Jul 2016 - 7:38 pm | विवेकपटाईत

येतील येतील येतील , खो खो ला हि चांगले दिवस येतील. चष्मा बदलून बघा तसा खो खो आपल्यादेशात आधीच लोकप्रिय आहे.