बलात्कारी मी: गरज आत्ममंथनाची

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
20 Jul 2016 - 11:41 am

सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्का-याला किंवा बलात्का-यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे बलात्कारी कोणी अज्ञात- माथेफिरू- सराईत गुन्हेगार असा आहे, हे मनातून काढायला पाहिजे. आकडेवारी सांगते की, मोठ्या प्रमाणात बलात्कार व शारीरिक शोषणाच्या घटनांमध्ये कुटुंबातले जवळचे सर्वसामान्य पुरुषच सामील असतात. आणि जरी कोणी अज्ञात माथेफिरू गुन्हेगार जरी असले तरी तेसुद्धा कोणी तरी माणूसच आहेत ना. आपल्यासारखेच माणूस म्हणून जन्माला आलेले आहेत. त्यामुळे ही समस्या जर ख-या अर्थाने समजून घ्यायची असेल तर माथेफिरू गुन्हेगार असं का करतो, हा प्रश्न विचारून चालणार नाही. त्याऐवजी असा प्रश्न पडायला हवा की, 'मी बलात्कार का करतो?' कारण आपल्याला जरी दिसताना परका माथेफिरू माणूस दिसत असला; तरी तोसुद्धा एक 'मीच' असतो. आणि कितीही माथेफिरू गुन्हेगार म्हंटले, तरी तेही शेवटी माणूसच असतात आणि म्हणून एका अर्थाने 'मीच' असतात. काही 'मी' जास्त गुन्हेगार असतात; काही 'मी' कमी गुन्हेगार असतात.

आणि जर एखादा अज्ञात इसम बलात्कार करत असेल- जो की अन्यथा अगदी सज्जन सरळमार्गी मनुष्य होता- तर स्वत:ला सरळमार्गी समजणारा मीसुद्धा कशावरून बलात्कार करणार नाही असा प्रश्न पडायला हवा. जर आपल्यासारखाच जन्म घेतलेला- आपण राहतो त्याच समाजात राहणारा एखादा माणूस अट्टल गुन्हेगार होऊ शकत असेल तर आपण स्वत:सुद्धा त्याच शक्यतेमध्ये आहोत; आपणही तसे होऊ शकतो असं मानून चालणं शहाणपणाचं असेल. रोगाच्या भाषेत बोलायचं तर जर एखाद्या रोगाची साथ पसरत असेल तर आपण स्वत:ला त्यापासून अलिप्त न मानता त्या साथीपासून वाचवण्यासाठी प्रतिबंधक उपाय सुरू करतो; आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो. हेही काहीसं तसंच आहे.

मुळात आपण जर स्वत:शी प्रामाणिक असू तर अनेकवेळा कळतं की, आपल्या मनामध्येही अपराधी वृत्ती आहे; आपल्या मनामध्येही हिंसा ठासून भरलेली आहे; आपणही अनेकदा इतरांचं अनिष्ट चिंतन करतो. इतरांचा घात करावा असं आपल्या अनेकदा मनात येतं. इतरांचा कशाला; आपण स्वत:चा घात करायचा विचारही अनेक वेळेस केलेला असतो. फळांच्या गाड्याच्या जवळून जाताना आपल्याही मनात येतं की, दोन फळं उचलली तर. . किंवा आपणही चेह-यांवर मोहित होतोच; वासना आपल्यालाही पकडतातच. त्यामुळे वरवर दिसते तशी ही समस्या काही ०.०१% माथेफिरू- अपराधी- अमानवी पुरुषांपुरती मर्यादित नाहीय. कमी जास्त प्रमाणात आणि प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष स्वरूपात ही सर्वांचीच समस्या आहे. रोगाची लागण सगळीकडेच आहे; फक्त काही ठिकाणी शरीरातली प्रतिकारशक्ती त्याला नियंत्रणात ठेवते तर काही ठिकाणी तो रोग अनियंत्रित होताना दिसतो.

ह्या समस्येच्या मुळाशी जाताना दिसतं की, आपल्या समाजात आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्या निसर्ग नियमांच्या विरोधात जातात. समाजामध्ये एक व्यवस्था टिकून राहण्यासाठी त्या आवश्यकही असतात; पण त्यामुळे निसर्गात असंतुलन होतं. आता स्त्री- पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण ही अतिशय नैसर्गिक बाब आहे. परंतु आजही आपल्या समाजात ह्या आकर्षणाच्या अभिव्यक्तीला योग्य ते स्थान दिलं जात नाही. किंबहुना स्त्री- पुरुष जितके दूर तितकं चांगलं, असंच अनेक ठिकाणी मानतात. अर्थात् त्यामध्ये ही भितीसुद्धा आहे की, स्त्री- पुरुष जर जवळ आले तर रोग अनियंत्रित होईल. त्यामुळे म्हातारा माणूसही गाडीत बसताना बाईजवळ बसत नाही किंवा तरुण मुलगी म्हाता-या माणसाच्यासुद्धा जवळ सहसा बसत नाही. इतकी भिती कशामुळे? इतकी टांगती तलवार कशामुळे आहे? आज आपण रोगाच्या एडव्हान्स्ड स्टेजमध्ये आहोत; त्यामुळे निरोगी स्थिती काय असेल, हे आपल्याला कळणं अवघड आहे.

पण अशी कल्पना करूया की, असा एखादा समाज आहे ज्यामध्ये लहान मुलं- मुली अगदी एकत्र वाढत आहेत. अगदी पाच वर्षांपासूनचे मुलं- मुली एकत्र वाढत आहेत- एकाच शाळेत शिकत आहेत; एकाच हॉस्टेलवर राहात आहेत; एकाच तलावात पोहत आहेत असे. अशा समाजामध्ये व अशा सान्निध्यामध्ये वाढलेले मुलं मुलींवर बलात्कार करतील का? बलात्कार लांबची गोष्ट; ते मुलीची छेड तरी काढतील का? आज आदिवासी समाजामध्ये मुलं- मुली काही प्रमाणात अशाच सान्निध्यामध्ये राहतात आणि तिथे अजिबात बलात्कार किंवा छेडछाड होताना दिसत नाही. कारण छेड तेव्हाच काढली जाते; धक्का तेव्हाच मारला जातो; जेव्हा दोघांमध्ये खूप जास्त अंतर असतं. जर दोघांमध्ये तितकं अंतर सुरुवातीपासूनच नसेल; तर छेड काढण्याचं किंवा धक्का देण्याचं कारणच उरणार नाही. बलात्काराचा तर प्रश्नच उद्भवणार नाही.

आपल्याला हे समजून घेताना जड जातं कारण आपण रोगाच्या एडव्हान्स्ड स्टेजला आहोत. पण जी मुलं- मुली छोटी आहेत; त्यांना आपण ह्यापासून वाचवू शकतो. जर मुला- मुलींना ५ वर्षापासून एकत्र ठेवलं तर ह्या रोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो. अर्थात् हे इतकं सोपं नाहीय. त्यामध्ये असंख्य अडचणी आहेत. समाजामध्ये स्त्रियांना किंवा मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं, त्यामुळे पहिलीपासूनच शिक्षणात मुलींची संख्या कमी होत जाते. शिवाय समाज सतत मुलींना मुलांपेक्षा वेगळी वागणूक देतो. त्यामुळे मुलं- मुली जितकी एकत्र राहायला हवीत, तितकी राहत नाहीत. मुलं बाहेर उंडारतात; मुली घरातच काम करतात. पण तरीही, बलात्कार करणा-यांचा जर एखादा अभ्यास केला गेला तर त्यामध्ये कळेल की, बलात्कार करणा-या पुरुषांपैकी फार थोड्या पुरुषांना लहानपणापासून बहिण- मैत्रीण ह्या रूपात स्त्रियांची सोबत होती. कारण बलात्कार ही अमानवी कृती असली तरी तो एका आकर्षणाचा विस्फोट आहे. उद्रेक आहे. पण जर ते आकर्षण नैसर्गिक प्रकारे सुरुवातीपासूनच संतुलित राहिलं असेल, तर तिथे स्फोट होण्यासारखी स्थितीच निर्माण होणार नाही.

ह्या प्रश्नाच्या संदर्भात काही समस्या ह्या कारणांचा भाग आहेत. उदा., ग्रामीण- निम शहरी समाजात तरुण मुलीला सुरक्षित वातावरण नसतं; म्हणून ती समाजात फार मिसळत नाही. किंवा मित्रांसोबत बोलू- भेटू शकत नाही. ही एक समस्यापण आहे आणि समस्येचं कारणसुद्धा आहे. कारण तरुण मुलांना किंवा किशोरवयीन मुलांना मुलींचा सहज सहवास- सोबत मिळत नसेल तर आपोआप तिथे तणाव निर्माण होणार आणि मग एकतर्फी प्रेम, छेडछाड, शोषण व बलात्कार असे प्रसंग होणार आणि त्यामुळे परत मग मुली मुलांपासून दूरच जाणार आणि मुलींचा सहवास मिळणं अजून कमी झाल्यामुळे हा ताणही वाढणार. असं हे दुष्टचक्र होणार. आणि मग अशा परिस्थितीत तरुण मुलीच्या पालकांवर तिचं लवकर लग्न करण्यासाठी दबाव येणार. त्यातून परत तिचं स्वतंत्र फुलणं कोमेजणार.

त्याउलट ज्या आदर्श स्थितीमध्ये लहान वयातील मुलं- मुली एकत्र असतील; तिथे किशोरवयामध्येही ताण होणार नाही आणि तारुण्यातही ताण होणार नाही. एकमेकांच्या सोबतीत वाढलेली मुलं- मुली एकतर्फी प्रेमात पडणार नाहीत; निव्वळ आकर्षणाला प्रेम समजणार नाहीत; त्यांच्यात एक समज आलेली असेल. अनेक मित्र आणि अनेक मैत्रिणी बघितल्यामुळे त्यांच्यामध्ये जीवनसाथी निवडण्यासंदर्भात एक दृष्टी आलेली असेल. अशी एकत्र वाढलेली पिढी लैंगिक दृष्टीने स्वस्थ असेल.

पण आपण रोगाच्या ज्या एडव्हान्स्ड स्टेजमध्ये आहोत, तिथून आपल्याला अशी कल्पनाही रुचत नाही. आपल्यावर समाज असंख्य प्रकारे प्रोजेक्शन्स करत असतो- आपल्या नकळत. आपण सहजपणे म्हणून जातो की, तरुण- तरुणींनी एकत्र राहणं चुकीचं आहे. किंवा आपल्याला एकमेकांच्या मिठीमध्ये असलेले तरुण- तरुणी दिसले तर आपण नकळत त्यांना नाव ठेवतो. अनैतिक समजतो. कारण आपल्या मनामध्ये ह्या स्वाभाविक नैसर्गिक ओढीचं इतकं दमन झालेलं आहे की, मिठीमध्ये असलेले तरुण- तरुणी फक्त लैंगिक आकर्षणामुळेच एकत्र आहेत, हे आपण गृहितच धरतो. किंबहुना सेक्सुअलिटीशिवायसुद्धा वेगळी सोबत असू शकते, हे आपल्याला जणू दिसतच नाही. आणि अशा इंटरप्रिटेशनमध्ये आपल्याच मनातले अर्थ प्रोजेक्ट होतात. जर आपण कधी कोणाला असं मिठीत घेतलं, तर त्याचा अर्थ मग निव्वळ सेक्सुअल असेल, हेच आपलं असं इंटरप्रिटेशन सांगत असतं. नैसर्गिक ओढीचं इतकं दमन झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीकडे एका निरोगी दृष्टीने बघणंच शक्य होत नाही.

आणि म्हणून मग आपण स्त्रियांना व्यक्ती म्हणून सन्मान देऊच शकत नाही. आपण त्यांना सन्मान देतो- ओढून ताणून सन्मान देतो पण तो कसा- माता म्हणून, बहिण म्हणून, कोणाची तरी पत्नी म्हणून. पण निव्वळ एक माणूस- एक व्यक्ती म्हणून सन्मान देऊ शकत नाही. किंवा त्या माणूस ह्या नात्याने रिलेटही होऊ शकत नाही. आईपण, बहिणपण किंवा पत्नीपण ह्यापेक्षा माणूसपण मोठं आहे; व्यापक आहे; त्या पातळीवर ते रिलेशन होत नाही. असो.

तेव्हा ह्या मूळ समस्येचेही अनेक घटक आहेत आणि त्यावरच्या उपायांचेही अनेक पैलू आहेत. किंबहुना समस्या व उपाय हे एका अर्थाने वेगवेगळे नसून दोन्ही एकमेकांचे कारण आहेत. म्हणून खरी गरज डोळसपणाची आहे. आपण कदाचित बलात्कार करणार नाही; आपण टोकाला जाणार नाही; पण वासना आपल्या मनातही आहेत. आपल्या मनातही हिंसा आहे. आणि खरं पाहिलं तर ह्या समस्यासुद्धा निसर्ग आपोआप सोडवत असतो. पण आपण निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणतो. तरुण वयात मुलं- मुली एकमेकांकडे जास्त आकर्षित होतात. मुलं मुलींकडे टक लावून बघतात. वस्तुत:‌ असं टक लावून बघणं, हेसुद्धा नैसर्गिक पातळीवर चालू असलेलं संतुलन आहे. एका अर्थाने निसर्गत: होणारं ध्यान आहे. कारण जर त्या मुलाने खरच टक लावून त्या मुलीला बघितलं; खरोखर निरखून बघितलं; तर त्याला हळुहळु कळतं की, अरे! हा चेहरा काही मोत्यांसारखा नाही; किंवा हा चेहरा काही चंद्रमुखी नाही; हा चेहराही कोमेजतो; हे डोळेही उदास होतात; थकतात; हा चेहराही रागीट होतो; हा चेहराही दुष्ट होतो. पण हे तेव्हाच कळेल जर त्या मुलाला खरोखर टक लावून बघू दिलं तर! पण आपण समाज म्हणून तिथेच अडवतो. त्यामुळे जो चेहरा आपोआप सामान्य बनला असता आणि ते आकर्षण शांत झालं असतं; ते अजून उद्दीपित होतं आणि तो चेहरा सामान्य बनण्याऐवजी अप्सरेचा बनतो; स्वर्गीय बनतो. आणि मग त्यातून एक दिवस टोकाची स्थिती निर्माण होऊ शकते.

निसर्ग आपल्या सगळ्या ताणांचं रेचन करतच असतो. राग येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्याला राग आला की, आपलं मनच नाही, तर शरीरही त्या रागाचं रेचन करत असतं. तो राग व्यक्त करून स्वत:ला हलकं करत असतं. दात ओठ आवळले जातात; शरीर लाल होतं; श्वास जलद होतो. शरीर रागाची ऊर्जा मोकळी करत असतं. पण समाज शिकवतो की, राग तर वाईट आहे. त्यामुळे मग तो राग आपण दाबून टाकतो; शरीर जी ऊर्जा सहज प्रकारे मोकळी करत असतं व मन राग व्यक्त करून हलकं होत असतं; ते अडवल्यामुळे ती ऊर्जा आतमध्येच अडकते. त्यातून ब्लॉकेज निर्माण होतात. सर्व ताणांचं हेच आहे. स्त्री- पुरुष आकर्षण तर रागाच्या वेगापेक्षाही मूलभूत आहे. त्यामुळे ह्या आकर्षणाचा जबरदस्त फोर्स असतो. पण निसर्गामध्ये त्याच्या रेचनाचेही मार्ग असतातच. निसर्गाचा मार्ग अडवला नाही, निसर्गाचा क्रम जर योग्य प्रकारे होऊ दिला, तर ह्या आकर्षणाच्या फोर्सच्या जागी परिपक्वता यायला वेळ लागत नाही. अशी परिपक्वता आज आदिवासी समाजांमध्ये दिसते जिथे महिलांवर अन्याय- अत्याचार तर होतच नाहीत; पण महिलांना बरोबरीचं स्थान आहे. बरोबरीचं आहे असं म्हणणंही चूक आहे; तिथे महिला- पुरुष हा वॉटरटाईट फरकच करता येत नाही (शहरी संपर्कातील आदिवासींमध्ये फरक असू शकतील).

स्त्री- पुरूष हेही एकाच अस्तित्वाचे दोन भाग आहेत. त्यामुळे फक्त स्त्री; फक्त पुरुष असा विचारच करता येत नाही. सुख- दु:खावर जर मात करायची असेल तर दोन्हीच्या परे जावं लागतं. 'ग़म और ख़ुशी में फ़र्क ना महसूस हो जहाँ, मै खुद को उस मक़ाम पे लाता चला गया' प्रमाणेच पुरुष- स्त्री हा फरकच राहायला नको. आज काय होताना दिसतं आहे की, स्त्रियांना ३३% किंवा ५०% आरक्षण मिळत आहे आणि स्त्रियांच्या समस्या मांडण्यासाठी स्त्रिया समोर येत आहेत. सुरुवात म्हणून ही गोष्ट चांगली आहे. पण ह्याचा दुसरा अर्थ हाच आहे ना की, पुरुषांना स्त्रियांचे प्रश्न कळतील, ह्यावर आपला विश्वास नाहीय. म्हणून स्त्रियांच्या समस्यांसाठी स्त्रियाच लागतात. आदर्श समाजामध्ये पुरुषांनाही स्त्रियांच्या समस्या कळतील आणि स्त्रियांनाही पुरुषांच्या समस्या कळतील. 'मी- तूपणाची झाली बोळवण' प्रमाणे स्त्री- पुरुष अशी तूतू- मैमै थांबून तिथे एकच सखोल सोबत असेल.

मग आत्ता आपण नक्की काय करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे स्वत:मध्ये हे सर्व बघायला पाहिजे. स्वत:चं आत्ममंथन केलं तर त्यातून हे सगळं विष आणि काही अमृत समोर येताना दिसू शकतं. आणि मग आपली अपराध्याकडे बघण्याची दृष्टीही बदलते. अपराधी हा जास्त गंभीर रुग्ण आहे; आपण अपराधी नाही; पण आपणही थोडे रुग्ण तर आहोतच, ही जाणीव होते. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मोठं झालेल्या पिढीवर काम करणं खूप अवघड आहे. किमान आपण नवीन येणा-या पिढीला चांगलं वातावरण देऊ शकतो. म्हणजे शक्य तितक्या प्रमाणात मुलं- मुली एकत्र येतील असा प्रयत्न करू शकतो. आता मुलींच्या शिक्षणाच्या समस्या वेगळ्या आहेत; त्यामुळे काही शाळा फक्त मुलींच्या असणं ही गरज आहे. पण तरीसुद्धा जमेल तितक्या प्रमाणात आपण हे अंतर कमी करू शकतो. त्यासाठी लहान मुलांना बहिण असणं हा एक भाग खूप महत्त्वाचा ठरू शकतो. रक्षा बंधनामागचा खरा उद्देश हा असावा. बहिण हे एक निमित्त- एक माध्यम. त्यातून ही सोबत मिळावी; पोषक वातावरण मिळावं, हा तो उद्देश असावा. आज कित्येक मुलं एकटी वाढत आहेत; अनेकांना भावंडंच नाहीत. त्यामुळे आपण निदान इतकं करू शकतो की, चुलत बहिण/ भाऊ- मामेबहिण/ भाऊ, मानलेला भाऊ/ बहिण ह्यांना तरी सख्ख्या- बहिण- भावासारखी स्पेस देऊ शकतो आणि द्यावीच लागेल. नाही तर पुढच्या पिढीमध्ये ह्या नात्यातला गोडवाच उरणार नाही. आणि बदलत्या समाज- जीवनामुळे ह्या गोष्टी आपोआप होतही आहेत. एकेकाळी ज्या समाजात तरुण मुलं- मुली बोलणं ही एक अतिशय दुर्मिळ घटना होती; तिथे आता मुला- मुलींमध्ये संवाद होतोय. सामाजिक चाको-या मोडत आहेत. पण ह्या बदलांसोबत अनेक विकृत घटकही समोर येत आहेत. त्यांच्यापासून सावधानसुद्धा राहावं लागेल. डोळस राहावं लागेल. . .

******

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत.

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानराहणीविचारसद्भावनाअनुभव

प्रतिक्रिया

त्यामुळे ही समस्या जर ख-या अर्थाने समजून घ्यायची असेल तर माथेफिरू गुन्हेगार असं का करतो, हा प्रश्न विचारून चालणार नाही. त्याऐवजी असा प्रश्न पडायला हवा की, 'मी बलात्कार का करतो?' कारण आपल्याला जरी दिसताना परका माथेफिरू माणूस दिसत असला; तरी तोसुद्धा एक 'मीच' असतो. आणि कितीही माथेफिरू गुन्हेगार म्हंटले, तरी तेही शेवटी माणूसच असतात आणि म्हणून एका अर्थाने 'मीच' असतात. काही 'मी' जास्त गुन्हेगार असतात; काही 'मी' कमी गुन्हेगार असतात.

आणि जर एखादा अज्ञात इसम बलात्कार करत असेल- जो की अन्यथा अगदी सज्जन सरळमार्गी मनुष्य होता- तर स्वत:ला सरळमार्गी समजणारा मीसुद्धा कशावरून बलात्कार करणार नाही असा प्रश्न पडायला हवा. जर आपल्यासारखाच जन्म घेतलेला- आपण राहतो त्याच समाजात राहणारा एखादा माणूस अट्टल गुन्हेगार होऊ शकत असेल तर आपण स्वत:सुद्धा त्याच शक्यतेमध्ये आहोत; आपणही तसे होऊ शकतो असं मानून चालणं शहाणपणाचं असेल. रोगाच्या भाषेत बोलायचं तर जर एखाद्या रोगाची साथ पसरत असेल तर आपण स्वत:ला त्यापासून अलिप्त न मानता त्या साथीपासून वाचवण्यासाठी प्रतिबंधक उपाय सुरू करतो; आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो. हेही काहीसं तसंच आहे.

आय होप तुम्हाला स्वतःला हे समजलं आणि पटलं आहे.आवश्यकता नसताना क्लिष्ट गहन मार्गाने विचार केल्याप्रमाणे भासला.

आपण जर स्वत:शी प्रामाणिक असू तर अनेकवेळा कळतं की, आपल्या मनामध्येही अपराधी वृत्ती आहे; आपल्या मनामध्येही हिंसा ठासून भरलेली आहे; आपणही अनेकदा इतरांचं अनिष्ट चिंतन करतो. इतरांचा घात करावा असं आपल्या अनेकदा मनात येतं. इतरांचा कशाला; आपण स्वत:चा घात करायचा विचारही अनेक वेळेस केलेला असतो. फळांच्या गाड्याच्या जवळून जाताना आपल्याही मनात येतं की, दोन फळं उचलली तर. . किंवा आपणही चेह-यांवर मोहित होतोच; वासना आपल्यालाही पकडतातच. त्यामुळे वरवर दिसते तशी ही समस्या काही ०.०१% माथेफिरू- अपराधी- अमानवी पुरुषांपुरती मर्यादित नाहीय. कमी जास्त प्रमाणात आणि प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष स्वरूपात ही सर्वांचीच समस्या आहे. रोगाची लागण सगळीकडेच आहे; फक्त काही ठिकाणी शरीरातली प्रतिकारशक्ती त्याला नियंत्रणात ठेवते तर काही ठिकाणी तो रोग अनियंत्रित होताना दिसतो.

सर्वांच्याच मनात आकर्षण, मोह, वासना असतात हे इतकं कॉमन आहे की त्याचा उल्लेख थेट सर्वांच्या मनात रोग आहे असा करणं हे अति अति ट्रिव्हयलायझेशन (आणि विरलीकरण) आहे. तुम्ही ज्याला प्रतिकारशक्ती म्हणताय तो (वासना, भावना आणि प्रत्यक्ष आचरण यांतला फरक ठेवणारी सिस्टीम) हीच मुख्य ठळक गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांमधेच "रोग" आहे आणि काहीजणांबाबत तो नियंत्रणाबाहेर जातो या मुद्द्याने विशेष काही अधोरेखित होत नाही.

पण अशी कल्पना करूया की, असा एखादा समाज आहे ज्यामध्ये लहान मुलं- मुली अगदी एकत्र वाढत आहेत. अगदी पाच वर्षांपासूनचे मुलं- मुली एकत्र वाढत आहेत- एकाच शाळेत शिकत आहेत; एकाच हॉस्टेलवर राहात आहेत; एकाच तलावात पोहत आहेत असे. अशा समाजामध्ये व अशा सान्निध्यामध्ये वाढलेले मुलं मुलींवर बलात्कार करतील का? बलात्कार लांबची गोष्ट; ते मुलीची छेड तरी काढतील का? आज आदिवासी समाजामध्ये मुलं- मुली काही प्रमाणात अशाच सान्निध्यामध्ये राहतात आणि तिथे अजिबात बलात्कार किंवा छेडछाड होताना दिसत नाही. कारण छेड तेव्हाच काढली जाते; धक्का तेव्हाच मारला जातो; जेव्हा दोघांमध्ये खूप जास्त अंतर असतं. जर दोघांमध्ये तितकं अंतर सुरुवातीपासूनच नसेल; तर छेड काढण्याचं किंवा धक्का देण्याचं कारणच उरणार नाही. बलात्काराचा तर प्रश्नच उद्भवणार नाही

कदाचित बरोबर. पण मग तेराचौदाव्या वर्षी त्यांच्यात नैसर्गिक संबंध येतील.. ते चालणार असलं तर फारच मोठा बदल व्हावा लागेल, आणि ते चालणार नसेल तर कानामागून फिरून पुन्हा सिलेक्टिव्ह दुष्ट "दमन" आलंच.

सांगण्याचा उद्देश हा की अतिआदर्श आतितात्विक उपाय हे तितकेच अतिनिरर्थक ठरतात.

गंम्बा's picture

20 Jul 2016 - 12:29 pm | गंम्बा

+११११

एकुणातच गुन्हे करणार्‍याला मानसिक रोगी म्हणुन गुन्हेगार पातळीवरुन रोगी ह्या पातळीवर आणणे मला तरी पटत नाही.

इथे तर गुन्हेगाराला रोगी या पातळीवर नेण्यापेक्षाही आख्ख्या सरासरी समाजालाच रोगी या पातळीवर पोचवण्याचा रोख भासतो. याने प्रश्न विरळ होऊन जातो.

सर्वांनी लहानपाणापासून एकत्र असावे, एकत्र जेवावे, एकच शिक्षण मिळूनमिसळून घ्यावे इत्यादि सगळं होण्यातलं असलं तर मग धार्मिक, जातीय, लैंगिक कसल्याच तेढी उरणार नाहीत.

पण ही कल्पना निरुपयोगी ठरेल इतकी अवास्तव आहे. आदिवासी टोळीत क्ष काळात पोरंपोरी नैसर्गिकरित्या एकत्र असतील पण तेव्हाच टोळ्याटोळ्यांत युद्धं, पळवापळवी बलात्कार असतील. एकूण मॉडेल आन्सर इज नॉट युजफुल आन्सर.

मृत्युन्जय's picture

20 Jul 2016 - 12:31 pm | मृत्युन्जय

+१०१

लेख थोडासा एकांगी वाटला. सविस्तर प्रतिसाद नंतर देइन

सामान्य वाचक's picture

20 Jul 2016 - 12:58 pm | सामान्य वाचक

सहमत

सामान्य वाचक's picture

20 Jul 2016 - 1:04 pm | सामान्य वाचक

सगळे लोक गुन्हा नाही करत
हे म्हणणे म्हणजे असे झाले, कि सगळे चोर हे गरिबीमुळे चोरी करतात
प्रत्यक्षात असे नसते। चोर आणि 'अ' चोर यात फरक असतो तो reaction चा, परिस्थिती चा नाही
मला वाटते एकंदरीत मुलांना values चे शिक्षण नसते
शाळेत सगळे विषय शिकवतात पण दुसऱ्याचा आदर, संयम, योग्य अयोग्य याचे शिक्षण देत नाहीत
अर्थात एवढे एकच कारण नाही आहे

नेत्रेश's picture

20 Jul 2016 - 4:50 pm | नेत्रेश

पाश्चात्य देशात मुले मुली यांना एकच दर्जा असतो, एकत्र शिक्षण होते, तरीही तेथे बलात्कार होतच असतात.

लैंगीक वासना शमनासाठी सोपे आणी कमी रीस्क असलेले पर्याय असताना, या कारणासाठी खुप जास्त
रीस्क असलेले बलात्कारासारखा गुन्हा सर्वसाधारणपणे कुणी करणार नाही. पण (स्त्रीचे) दमन करण्यासाठी, सत्ता - वर्चस्व गाजवण्यासाठी, कंट्रोल मध्ये ठेवण्या साठी, पायरी दाखाउन देण्यासाठी, सुड घेण्यासाठी, पराकोटीचा द्वेश, ईर्षा, विकृती, ईत्यादी कारणासाठी जास्त होत असावा. या साठी स्त्री ही सॉफ्ट टार्गेट ठरते. जर स्ती उपलब्ध नसेल तर तुलनेने नाजुक व कमजोर पुरुषांवरही बलात्कार होतील.

बलात्कार आदीवासींमध्येही होत असावेत, पण त्यांच्या शुचितेच्या कल्पना थोड्या वेगळ्या असल्यामुळे किंवा अन्य
कारणांमुळे ते पोलीसात जात नसावेत व रेकॉर्डवर येत नसावेत. (भ्रमणगाथेमध्ये गोनिदांनी दोन टोळ्यांमधल्या भांडणाचे वर्णन केले आहे ज्यात एका टोळीतील जास्त भांडखोर स्त्री वर दुसर्‍या टोळीतील पुरुष मैदानात सर्वांसमक्ष बलात्कार करतो).

अंतरा आनंद's picture

20 Jul 2016 - 4:57 pm | अंतरा आनंद

चांगला लेख. मंगला सामंत यांच्या लेखांची आठवण झाली. पण हे सर्व कोणासाठी? शिक्षीत आणि मध्यमवर्गासाठी. गुंड प्रवृतींच्या, शिक्षणाशी संबध नसलेल्यांचं काय? मुळात कायद्याचा, पोलीस यंत्रणेचा धाक हवाच. तो नाहीय हे अश्या घटनातून वारंवार समोर येत असतं.
वाढती विषमता हे ही आहेच एक कारण. एकीकडे प्रचंड संपत्ती वहात असते तर दुसरीकडे माणूस किड्यामुंग्यांपेक्षा हीन आयुष्य जगत असतो. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन जुनाटच असतो. मग अश्या वेळेस अनुभवत असलेलं सगळं वैफल्य, राग काढण्यासाठी स्त्री ही सॉफ्ट टार्गेट ठरते.

शाळेत सगळे विषय शिकवतात पण दुसऱ्याचा आदर, संयम, योग्य अयोग्य याचे शिक्षण देत नाहीत

अगदी. अगदी. पण हे शाळेत का शिकवलं जावं? घरातही येतं की शिकवता पण शिकवलं जात नाही. कारण हल्ली हे गुण सदगुणांच्या व्याख्येत बसत नाहीत. "आपल्याला हवं ते घ्या, सरळ मिळत नसेल तर ओरबाडून घ्या आणि त्याबद्द्ल कसलीही खेद खंत बाळगू नका" ही सध्याच्या व्यक्तीमत्व विकसनाची दिशा आहे. त्यामुळे लेखातला आदर्शवाद कितीही मोहक वाटला तरी प्रत्यक्षात येणं कठीणच.

कारण हल्ली हेगुण सदगुणांच्या व्याख्येत बसत नाहीत . "आपल्याला हवं ते घ्या, सरळ मिळत नसेल तर ओरबाडून घ्या आणि त्याबद्द्ल कसलीही खेद खंत बाळगू नका" ही सध्याच्या व्यक्तीमत्व विकसनाची दिशा आहे.

अत्यन्त आवडले आणि पटले ...

वरील बहुतांश प्रतिसादांशी सहमत. लेख थोडा एकांगी वाटला. अनेक कंगोरे आहेत याला. आणि स्त्री- पुरुष वेगवेगळे वाढणे हे एकमेव कारण खचित च नाही. बलात्कार्‍यांना बहिण वगैरे नसणे हे ही कारण नाही. निर्भयाच्या २ अपराध्यांचं लग्न देखील झालं होतं आणि अनेक स्त्रिया या घरुन वडील किंवा भावाकडुन च पिडित असतात अशा देखील बातम्या येतात.

प्रतिबंधक कारवाया किती कामी येतील कोण जाणे कारण एखाद्याची विकृती ना तुम्ही घालवु शकता ना अशा माणसाला "पोटेन्शियल" गुन्हेगार म्हणुन वाळीत टाकु शकता. ती घटना घडल्यावर मात्र हा अल्पवयीन आहे म्हणुन त्याला अडिच वर्षात सोडा वगैरे गोष्टी खरा परिणाम घडवुन आणतात. अशाने किती लोकांवर जरब बसणार आहे? आज काल हे प्रमाण थोडं बदलतंय पण मुली बाहेर जाऊन या बद्दल तक्रार करत नाहीत, करु शकत नाहीत असा आपला देखील सोशल स्टिग्मा आहे. तिच्यावर मानसिक, शारिरीक अत्याचार होतात ते होतात च वर समाजाच्या नजरांनी तिला तोंड दाबुन बुक्क्यांचा मार ! त्यामुळे समाज म्हणुन मला वाटतं आपली जबाबदारी आधी हा स्टिग्मा काढण्याची आहे. कुणाच्याही भानगडीत नाक न खुपसणे, लग्न झालेलं नसलं तर का नाही असं सारखं न विचारणे एवढं केलं तरी बर्‍याच गोष्टी साध्य होतील. पण आपण समाज म्हणुन त्यात कमी पडतो.

मार्गी's picture

20 Jul 2016 - 9:28 pm | मार्गी

वाचनाबद्दल आणि इतक्या भरघोस प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! मी केवळ एक बाजू/ एक एप्रोच मांडला आहे. आणि त्यावर आलेल्या विभिन्न मतांचं व विविध मुद्द्यांचं स्वागत करतो! धन्यवाद.

अर्धवटराव's picture

21 Jul 2016 - 6:39 am | अर्धवटराव

शेवटी सर्वकाहि मनाच्या, पर्यायने हार्मोन्सच्या पातळीवर चालत असेल तर प्रत्येक व्यक्ती वाल्या ते वाल्मिकीमधे दोलायमान होतच असणार. आपण अमुक एखादी गोष्ट कधिच करणार नाहि असं जेंव्हा म्हणतो तेंव्हा एका विशिष्ट परिस्थितीची चाकोरी त्याभोवती आपोआप येत असते. ज्या चौकटीबाहेरची आपण कल्पना देखील करु शकत नाहि त्याला आपलं शरीर, मन कसं रिएक्ट करेल हे कसं समजणार?
मागे एक धागा काढला होता मिपावर... गुन्हेगाराला शिक्षा देताना त्याच्या मनातुनच गुन्हेगारीचं उच्चाटन व्हावं म्हणुन काहि उपाय असतात का न्यायव्यवस्थेत असा प्रश्न होता.

आनन्दा's picture

21 Jul 2016 - 5:21 pm | आनन्दा

हेच्च म्हणतो..
काही अपवाद सोडल्यास, जसे की परवाचा कोपर्डी चा विषय किंवा निर्भया सारख्या घटना सोडल्यास बरेचसे गुन्हे हे तात्कालिक मानसिक स्थितीचा परिणाम असतात, असे माझे मत आहे, अर्थात माझ्याकडे विदा नाही, कोणाकडे असल्यास द्यावा.

थंड डोक्याने क्रूर गुन्हे करणार्‍याला देखील फाशी पेक्षा वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे पॅरोलशिवाय आजन्म कैद, आणि त्याच्या तुरुंगातून होणार्‍या कमाईतून पीडिताला नुकसानभरपाई असा न्याय असावा असे मला वाटते.

मितभाषी's picture

21 Jul 2016 - 10:30 pm | मितभाषी

बलात्कारी मी : गरज लिंग कापण्याची

शिल्पा नाईक's picture

23 Jul 2016 - 5:48 pm | शिल्पा नाईक

+११११११११११