" चिट्टा वे "

नीलमोहर's picture
नीलमोहर in काथ्याकूट
1 Jul 2016 - 3:00 pm
गाभा: 

सकाळी स्वयंपाक करत गाणी ऐकत होते, घरी आणि ऑफिसातही गाणी ऐकत कामे करायची सवय आहे, कारण त्यामुळे
आपण एका फ्लोमध्ये जातो आणि अशा फ्लो मध्ये कामे व्यवस्थित आणि लौकर होतात.

रेडिओ मिर्चीवर 'चिट्टा वे' लागलं होतं. 'उडता पंजाब' सिनेमातील या गाण्याने बरेच दिवस झाले डोक्यात घर केले आहे.
याच्या ट्रेलर्स, गाण्यांत शाहिद कपूर ओळखू न येण्याइतपत वेगळा दिसलाय, सिनेमा अजून पाहिला नाही पण चांगला आहे
म्हणतात. अमित त्रिवेदीचे संगीत असलेले हे गाणं त्यातील बीट्स, र्‍हिदममुळे आवडतं.

https://youtu.be/XhypXqLR9co

ओ चिट्टा वे
ओ चिट्टा वे
कैय्यांनु है खुश कित्ता वे
हाय मीट्ठा वे
हाय मीट्ठा वे
कुंडी नशे वाली खोल के देख..

फकीरा वे
फकीरा वे
एही तेरी सोहणी मीरा वे
लकीरा वे
लकीरा वे
बस नाक नाल खींच के देख..

गाणे बरेच विद्रोही (rebelliousness) वगैरे प्रकारचे आहे, अशा बंडखोर गोष्टींची मुळात (नुसतीच) आवड असल्याने
गाण्यातील तशा शब्दांमुळे ते मनाला भिडतं. या 'चिट्टा' शब्दाबद्दल फार कुतूहल वाटले, म्हणजे अंमली पदार्थ, ड्रग्जसाठी
चिट्टा शब्द वापरतात हे आधी माहित नव्हते, पण ही कल्पना भारी आहे हे मानलं पाहिजे.

हे चिट्टा म्हणजे नक्की काय प्रकरण आहे, आणि याविषयी अजून माहिती मिळवून कुतूहल शमवण्यासाठी हा धागा प्रपंच.

या पदार्थांमध्ये कोकेन, हेरॉइन, चरस, गांजा, हशिश, LSD, Ecstasy ही ऐकलेली नावे आहेत, अजूनही पुष्कळ प्रकार
असतील. हे सर्व प्रकार स्टीम्युलंट्स म्हणजेच उत्तेजक पदार्थांत मोडतात. असे पदार्थ थेट मेंदूतील नर्व्हस सिस्टीमवर परिणाम
करतात, सिस्टीमचा शरीराशी असलेला संपर्क हळूहळू तोडत नेतात, त्यामुळे माणसाच्या संवेदना म्हणजे दृष्टी, गंध, स्पर्श इ.
बधीर होत जातात. त्याला इतर काहीही जाणिव न होता फक्त रिलॅक्स्ड, शांत वाटू लागतं.

जितका अधिक काळ तो या मादक पदार्थांचे सेवन करत राहतो, तितके त्याच्या नर्व्हस सिस्टीम पासून त्याच्या संवेदना
तुटत जातात. त्यात हे पदार्थ थेट रक्तात जातात पण विरघळत नाहीत, तसेच तरंगत शरीरातील फॅट्सना चिकटून बसतात,
फॅट्स आणि ह्यांचं एक मिश्रण बनून त्याचे थराच्यावर थर साठत जातात, शरीराला आतून कुरतडत तसेच राहतात.
किती भयंकर गोष्ट असेल ही. अर्थात योग्य उपचारांनी हे सर्व नकारात्मक परिणाम दूर करता येतात हेही खरं.

Ecstasy बद्दल तर हे वाचलेय की त्यात अनेक प्रकारच्या पदार्थांचे घातक मिश्रण असू शकते, उदा. कोकेन, हेरॉइन,
अॅम्फेटामाइन, शिवाय उंदीर मारायचे औषध, कॅफेन इ.इतर अनेक काहीही गोष्टी. हे वापरण्यामागील मुख्य धोका
म्हणजे वापरणार्‍याला हेही माहित नसतं की तो नक्की काय घेतोय.

तर लोक अंमली पदार्थांच्या एवढे आहारी का जात असावे ? अगदी त्यातील धोके जाणूनही.

मुळात जगणे, जिवंत असणे हाच मोठा स्टीम्युलंट असूनही लोकांना इतर बाह्य पदार्थांची गरज का पडावी.
अर्थात हे म्हणणे सोपे, पण अशी नशा करणार्‍यांसाठी, त्यांच्या लेखी या गोष्टी वापरणे म्हणजेच जगणे असू शकते.
किंवा त्यांच्यापुढे जगणे हीच एक मोठी समस्या असू शकते जिचा सामना अशा गोष्टींच्या आधाराशिवाय ते करू
शकत नाहीत. त्यामुळे नशा करणार्‍या लोकांचा रागही येतो आणि त्यांच्याबद्दल सहानुभूतीही वाटते, वाईटही.

ह्याच्याच बरोबर उलट काही लोक असतात, ज्यांच्यासाठी आयुष्य, जगणे हेच सर्वात मोठे व्यसन असते त्यामुळे ते
सतत उत्साही, आनंदी, एनरजायझर बनी मोडमध्ये असतात.

अंमली पदार्थांच्या वापरानंतर माणूस साधारणतः ट्रांस मध्ये जातो, म्हणजे शुध्दी आणि बे-शुध्दी, होश आणि बे-होशी,
consciousness आणि un-consciousness च्या अध्येमध्ये कुठेतरी तरंगत राहणे.
आजूबाजूचे जग हेझी, धुरकट, धूसर वाटणे, आपण अस्तित्वात असून नसल्यासारखे वाटणे.

या अवस्थेत माणसाची विचारक्षमता कमी होऊ शकते, तो नक्की काय करतोय समजत नाही, जाणिवा मंदावतात,
आजूबाजूला काय चाललेय त्याचेही सहसा भान नसते, फक्त एक हॅपी हॅपी फिलींग सगळं जगणं व्यापून उरते.
समाधी अवस्था म्हणतात तशी कदाचित..
(अर्थात वेगळ्या अर्थाने, ज्ञानी योगी लोकांना प्राप्त होते ती समाधीवस्था वेगळी)

डीप मेडिटेशन नंतर येणारे अनुभव आणि नशा केल्यावर येणारे अनुभव समान म्हणता येतील का?
मेडिटेशनने मनाला शांतता मिळते तशीच नशेनेही मिळते. मेडिटेशनने माणसाच्या जाणीवा जागृत होतात पण
नशेने उलट होते, म्हणजेच माणूस हळूहळू आपल्या जाणिवा हरवून बसतो.

मात्र ही तरंगत, धुंदीत असण्याची अवस्था खूप सुंदर असेल. असे ट्रांस मध्ये जगणे बेकार अॅडिक्टिव्ह असेल हे नक्की.
'संसार की हर शय का इतना ही फ़साना है, एक धुँध से आना है, एक धुँध में जाना है.'

चिट्टा वे
चिट्टा वे
जिसने वी एनन्नू लित्ता वे
जित्ता वे
जित्ता वे
कुंडी नशे वाली खोल के देख..

_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

डिस्क्लेमर:

* अठरा वर्षांखालील मुले मिपा वाचत नसावेत असा अंदाज आहे, त्यामुळे लेख वाचून कोणाच्या बालमनावर वाईट
परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

* अठरा वर्षांवरील लोक सुजाण, सज्ञान मानले जातात, त्यातही मिपाचे वाचक अधिक सूज्ञ वर्गात मोडत असल्याने
त्यांच्यावर लेखाचा कुठल्याही प्रकारे परिणाम होऊन कुणालाही नशेचे व्यसन लागण्याची शक्यता दिसून येत नाही.

* धाग्यात अंमली पदार्थ, नशा करण्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन वा उदात्तीकरण नाही, तो धाग्याचा उद्देश्यही नाही,
केवळ याविषयी माहिती करून घेणे हा हेतू आहे.

**** वरीलपैकी कोणतेही पदार्थ पुण्यात, पेठेत कुठे आणि किती भावाने मिळू शकतात कोणी सांगू शकेल?
:)

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

1 Jul 2016 - 3:08 pm | किसन शिंदे

डीप मेडिटेशन नंतर येणारे अनुभव आणि नशा केल्यावर येणारे अनुभव समान म्हणता येतील का?
मेडिटेशनने मनाला शांतता मिळते तशीच नशेनेही मिळते. मेडिटेशनने माणसाच्या जाणीवा जागृत होतात

हे दोन्हीही करून पाह्यलेय काय? :)

बाकी पंजाबी भाषा फारशी कळत नसल्याने त्या भाषेतली गाणी मनाला भीडत नाहीत. अपवाद फक्त गदरमधल्या गाण्याचा..

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2016 - 5:51 pm | प्रसाद गोडबोले

हे दोन्हीही करून पाह्यलेय काय?

मिट्ट काळोख्या कातरवेळी नैऋत्येकडुन आलेले जलाने संपृक्त असलेले काळे चुकार मेघ धरित्रीला चिंब चिंब भिजवत असताना एका एकुटवाण्या राऊळात तुम्ही हे अनुभव घेतले आहेत काय हो ? ;)

अजया's picture

1 Jul 2016 - 3:19 pm | अजया

छान लिहिलंय.
गाणं पाहिलं आणि ऐकलं.अंगावर आलं.अर्धवट बघून बंद केलं.
हे गाणं माझ्या मुलाने बघु नये असं का कोण जाणे तीव्रतेने वाटलं खरं.

अनुप ढेरे's picture

1 Jul 2016 - 3:37 pm | अनुप ढेरे

पुढच्या ओळीदेखील छान आहेत. "चिट्टा विदेशी (कारण गोरा!) है पर बोले पंजाबी है!" ही गोरी पावडर तुमच्याशी पंजाबीतच बोलेल!

त्यामुळे गाण्याचा अर्थच बदलून जातो. मुंबईत ब्राऊन शुगर किंवा गर्द (भेसळ केलेलं हेराॅईन) हे नाव प्रसिद्ध आहे. गर्द शब्द असलेल्या गाण्यांबद्दल फार विचित्र वाटायला लागलं होतं. अजूनही केक वगैरेच्या रेसिपीत ब्राऊन शुगर वाचलं किंवा ऐकलं की काहीतरी विचित्र वाटतं.

अत्रन्गि पाउस's picture

1 Jul 2016 - 4:07 pm | अत्रन्गि पाउस

सायबाच्या देशात पहिल्याच दिवशी चहाशेजारी पुडीत ब्राऊन शुगर वाचून दचकायला झालेलं ....
मराठीत त्याला खांडसरी म्हणतात म्हणे (नक्की ठाऊक नाही)

महासंग्राम's picture

1 Jul 2016 - 4:12 pm | महासंग्राम

वरीलपैकी कोणतेही पदार्थ पुण्यात, पेठेत कुठे आणि किती भावाने मिळू शकतात कोणी सांगू शकेल?:)

मंडईत चिंगुमल गेलाराम शोधाआता यांच्या कडे मिळतात

तसेच

लत्करुन मरुनका (अरुणाचल वासिय) यांचे कडे.

रातराणी's picture

1 Jul 2016 - 5:19 pm | रातराणी

हम्म. काहे?

डिप मेडीटेशन मंजे काय?
समाधी लागणे का ?
-
समाधी लागण्यासाठी ना ध्यानाची गरज आहे ना नशेची.
मला एखाद पुस्तक आवडल तर सलग संपे पर्यंत वाचु शकतो. वेळेच,परिसराच ,व्यक्तींच भान राहत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2016 - 5:52 pm | प्रसाद गोडबोले

समाधी लागण्यासाठी ना ध्यानाची गरज आहे ना नशेची.

+१

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 7:44 pm | संदीप डांगे

मला एखाद पुस्तक आवडल तर सलग संपे पर्यंत वाचु शकतो. वेळेच,परिसराच ,व्यक्तींच भान राहत नाही.

ह्यास समाधी म्हणत नाहीत. तंद्री म्हणू शकतो फारतर.
नशेमुळे डीप मेडिटेशन शक्य नाही, केवळ तंद्री लागते.
डीप मेडिटेशन आणि तंद्री बरोब्बर उलट अवस्था आहेत.
एवढे बोलून खाली बसतो.

धनंजय माने's picture

1 Jul 2016 - 7:53 pm | धनंजय माने

अहो डांगे सर, इतक्यात खाली बसलात?

हे म्हणजे मोदकची लेहसाठी निघालेली गाडी लोणावल्यातून परत फिरलि असं वाटतंय. ;)
(सगळ्यांनी हलकं घ्या)

आधी डिप मेडीटेशन मंजे समाधी लागणे का ?
याच उत्तर हवय..
बाकी तंद्री तर कुठे पण लागु शकते.

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 9:07 pm | संदीप डांगे

डीप मेडिटेशन ही एक कमर्शियल कन्सेप्ट आहे. डीप मेडिटेशन म्हणजे समाधी नाही.

बोका-ए-आझम's picture

1 Jul 2016 - 9:15 pm | बोका-ए-आझम

हे समजलं नाही.

जेपी's picture

1 Jul 2016 - 9:19 pm | जेपी

+1
मला टोटल लागली नाही..

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 9:35 pm | संदीप डांगे

डीप मेडिटेशन म्हणजे काय?

डीप मेडिटेशन याचा (कथित) अर्थ 'ध्यानाची अत्युच्च अवस्था'.
ध्यान म्हणजे चालू क्षणाला जागृत असणे. ह्या जागृतीच्या अवस्थेत आजूबाजूचे सर्व ऐकू येते, दिसते, पण मन त्यावर प्रतिक्रिया करत नाही. भूतकाळाच्या आठवणी, भविष्याची आखणी हे स्तब्ध असतात. केवळ आत्ताच्या क्षणाचे अस्तित्व जाणवत असते. माझ्या कडे योग्य शब्द नाहीत म्हणून जाणवणे हे क्रियापद वापरावे लागते आहे. खरेतर अकर्मण्य अवस्था म्हणजे ध्यान. अशा अवस्थांच्या अनेक पातळ्या असतात ज्यात अत्युच्च अवस्थेच्या ध्यानस्थितीला डीप मेडिटेशन म्हणत असावेत.

मी त्याला कमर्शियल कन्सेप्ट म्हणालो कारण त्यासाठी संगित, व्हायब्रेशन्स इ इ काय निघालेले दिसतात. संगित, व्हायब्रेशन याद्वारे मनाला (बुद्धीला किंवा मानसशास्त्रिय भाषेत जागृत मनाला) 'संमोहन, तंद्री, वेगळ्या दुनियेत गेल्याची भावना होणे' ह्या अनुभूती होतात.

समाधी लागणे का ?
आपण चालताबोलता 'समाधी लागणे' हा वाक्प्रचार 'तंद्री लागणे' ह्या अर्थी सतत वापरतो. त्यामुळे बरेच गैरसमज होतात. समाधीवस्था म्हणजे प्रत्यक्ष योग. ह्याचे अनुभूतीशिवाय निरुपण शक्य नाही. सर्वसामान्यांना पटकन समजेल व ओळख पटेल म्हणून मी नेहमी ऑरगॅझमचे उदाहरण देतो. अगदी पाव सेकंदभर लाभलेली अवस्था म्हणजेच समाधीवस्था. ती 'ध्याना'द्वारे अखंड काळासाठी कायमची मिळवता येते. असे पाव, तुकडा सेकंद समाधीवस्था सर्वसामान्यपणे सर्वांना अनेक बाबतीत मिळत असते. पंचेद्रियांच्या माध्यमातून ही अवस्था मिळते पण ती टिकत नाही. फारच कमी वेळ असल्याने तीचे विश्लेषण आपण सामान्य लोक करु शकत नाही. किंवा तसे विश्लेषण करु जाणे विरोधाभास होईल.

सर्वांनाच त्या समाधीवस्थेची अंतःप्रेरणा असते. साधनेद्वारे टप्प्याटप्प्यानेच ती मिळते. 'ध्यान ते समाधी' हा प्रवास खूप मोठा आणि कष्टप्रद आहे. 'समाधी ते मोक्ष' हा मार्गही त्याचप्रमाणे फार मोठा असावा असे वाटते.

मेरे प्यारे मानेजी, इत्ता बस की और बोलू...?

धनंजय माने's picture

1 Jul 2016 - 9:39 pm | धनंजय माने

:-))

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 9:52 pm | संदीप डांगे

पुस्तक वाचणे, संगित ऐकणे, चित्रपट-नाटक बघणे, विचारांमधे गढून जाणे हे केवळ मनोरंजनाचे प्रकार आहेत. हे ध्यान वा समाधी नव्हे. ज्या क्षणी भोवतालचे खरे जग विसरून कपोलकल्पित जगामधे मन विहरु लागते तेव्हाची अवस्था कोणत्याही नशेने येणार्‍या अवस्थेपेक्षा वेगळी नसते. पण जे लोक असे कल्पनारम्यतेत जास्त रमतात त्यांचा ध्यानाकडे प्रवास सुरु झाला असे समजण्यास हरकत नाही. परत वर म्हटल्याप्रमाणे 'ध्यान ते समाधी' कष्टप्रद आहे तसेच 'मनोरंजन ते ध्यान' हा टप्पा ही कष्टप्रद आहे.