एक तर तो कधेमधेच कॉलेजला येतो आणि दुसरं म्हणजे वर्गात आल्यावर तो एखाद्या राजकीय पक्ष्याच्या कार्यालयात आल्यासारखा वागतो.
म्हणजे त्याची एंट्रीच कशी जबरदस्त असते पहा;
वर्ग चालु होऊन चांगला अर्धा तास झालेला असणार, एखादा पॉइंट घेऊन शिक्षक रंगात आलेले असणार, आणि तेवढ्यात हा उपटतो;
"आत येऊ, सर"
खरं तर त्याचे विचारणे कधी प्रश्नार्थक नसतेच कारण हे वाक्य संपेपर्यंत त्याचा संबंध देह वर्गात घुसलेला असतो. आणि शिक्षकांना
"या! या! या!" म्हनुस्तव्हर याने पहिल्या बेंचवरच्या पोराच्या हातात हात देऊन, कोपऱ्यात बसलेल्या पोराला डावा हात उंचावून 'सलाम' करत, पहिला बेंच मागे टाकलेला असतो.
पुढे सरांची भंगलेली तंद्रि आणि सरकलेली शीर 'उलटे दहा अंक मोजून' जागेवर येऊस्तवर हा शेवटच्या बेंचवर दाटीवाटी करुन स्थिरावलेला असतो.
म्हणजे शिक्षकगण काही करत नाहीत अश्यातला भाग नाही तर ते सर्वगण सर्व प्रकारचे प्रयोग करुन थकलेत.
आता तर त्यांनी आपल्या डिगऱ्या सोबत चिकटुन आलेल्या उरल्या सुरल्या अहंकाराला झटकुन त्याच्यापुढे सपशेल हात टेकलेत.
गळ्यात पावकिलोची सोन्याची चैन, हातात सोन्याचे जाड्जुड़ ब्रेसलेट, काळ्याखप अंगावर भड़क रंगाचा सदरा, निळी किंवा पांढरी जीन्स घातलेला मन्या कुठेही दिसला की मास्तर लोकांना धड़कीच् भरते. एकतर तो नेहमी बिनधास्त आणि वरतून निर्लज्ज. सभ्यता, सुसंस्कार, आदर या सगळ्या भेकड लोकांच्या निरुपयोगी गोष्टी असतात असा त्याने पक्का समज करुन घेतलेला.
मास्तर लोकांना कसे अपमाणीत करायचे यात तो एकदम प्रवीण झालेला. उदाहरणार्थ एखादे सर तास चालु असताना मधेच काहीतरी विसरले किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर त्यांना आले नाहीतर त्यांची पंचाईत होते, घाम फुटतो, धांदल उड़ते, पोरं तोंडावर हात ठेवुन बारीक हसतात तेव्हा हा मोठ्याने म्हणतो;
"सांभाळून घ्या रे! मास्तर आपलेच हेत!"
पण अश्याने होते काय की त्याच्या अश्या वागण्या मुळे सगळा वर्गच् बिथरतो आणि शिक्षकाचा वर्गावरचा ताबा सुटतो. मग बिचाऱ्या सरांना वर्ग सोडुन बाहेर येण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि परत प्राचार्यांकडे जावे तर काय सांगणार?
मी वर्गात अमुक अमुक पॉइंट विसरलो? किंवा
मला या या प्रश्नाचे उत्तर आले नाही?
बिचाऱ्या सरांची अनखिनच पंचाईत होते.
एकदा मिस कोमटेकर मॅडमचा तास चालु होता. हा ठरल्याप्रमाणे वर्गात घुसला तसाच बाईंच्या तळपायांतून मस्तकात शिरला.
बाईं रागाच्या भरात मुर्ख, नालायक, बेअक्कल इ.इ. म्हणत राहिल्या आणि निर्ढावलेला तो खाली मान घालुन ऐकत राहिला.
पण बाई जेव्हा, "मंद आहेस का रे तु?" म्हणाल्या तेव्हा त्याचे डोळे रागाने गरागरा फिरले. तो टेकुन बसला आणि एक सारखे मॅडम कड़े पाहु लागला. त्यांना जानवले. त्या चपापल्या व फळयाकड़े तोंड करुन शिकवायाचा प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यात तो हात फैलावुन अनखिनच रेलुन बसला आणि खर्जातल्या आवाजात, एखादा रांगडा गड़ी तमाशातल्या बाईला 'होउद्या अजुन एकदा' म्हणतो तसे,
"बाई, परत पैल्या पास्न तास सुरु करा. आपल्याला काय बी समजलं नाय!" म्हणाला.
बाईंनी न ऐकल्या सारखे करुन फळयावर लिहायला सुरुवात केली.
मन्याचं डोकं सरकलं. त्यानं बाकड्यावर जोरानं हात आदळला.
"बाई, आपुण अख्खी फि भरलिया अण वरतून डोनेशन बी दिलाय. बाई,आता हितच् शिकिता का...?"
पुढं बोलायची गरज नव्हती. तो वाक्य अर्धवट सोडतच वर्गातल्या पोरायकडे पाहत मोठ्याने हसु लागला.
बाई सुन्न झाल्या. त्या तश्याच भरल्या डोळ्यांनी प्राचार्यांच्या कार्यालयात घुसल्या.
घडला प्रकार ऐकल्यावर त्यांनी त्यावर्गावर शिकवणाऱ्या इतर शिक्षकांना ही बोलावून घेतले.
सगळ्यांनीच् एक एक करत त्याची कुंडली मांडली. त्याच्या एकटयामुळे संपूर्ण वर्गावरचे नियंत्रण सुटते आणि आताच असा तर पुढच्यावर्षी अणखी डाम्बरट होईल या दोन प्रमुख गोष्टींचा विचार करुन प्राचार्यांनी मन्याच्या वडिलांना (मन्याच्या भाषेत फादरला) ताबडतोब कॉलेजमधे येण्यासाठी फोन केला.
दुसऱ्या दिवशी मन्याचे फादर आले ते सरळ डायरेक्टर सरांच्या ऑफिसमधे घुसले.
थोडावेळाने प्राचार्य सरांना आणि बाकी स्टाफला बोलावने आले.
सर्वजन आत येऊन उभा राहिले. डायरेक्टर सरांसमोर येण्याची हिम्मत होत नसली तरी आज इथे एकजुटीने त्यांना मन्याचा बंदोबस्त करायचा होता.
"नमस्कार मास्तर, आपुण मनोज चा फादर" प्राचार्य सरांकडे पाहुन बोलू लागले "काल मुबाइलवर तुमचा फोन आला म्हणलं चला डायरेक्ट भेटूनच येऊ अण लगीच आज आलू बघा"
"त्याचं काय आहे साहेब... की काल आमच्या मॅडम... हे...आपला मनोज..." थोडं घाबरत थोडं डायरेक्टर सर कड़े पाहत प्राचार्य बोलायचा प्रयत्न करत होते तेवढ्यात मनोज चे फादरच बोलले;
"त्याचं काहेना मास्तर, आजकालची पिढीच् लै डाम्बरट. नाव कुणाला आवरत नाय. म्हणून म्या म्हणतू.." सगळ्या मास्तरांकडे पाहत "आपुनच थोडं समजून घ्याया पायजी. आता तुमचंच बघाना. तुमाला सगळ्याला थोडच् नीट शिकिता येत असणार? तुमच्यात बी असलच ना एखादं हुकलेलं पर डायरेक्टर साहेब घेतातच ना समजून. तवा तुमीच थोडं लवतं घ्या.."
कोमटेकरबाईंना रडण्याचा आवेग अवरेना. त्या तिथेच फुस फुस करू लागल्या.
त्यांच्या फुसफुस कड़े सपशेल दुर्लक्ष करत मनोजचे फादर पुढे बोलू लागले;
"त्याचं काहे ना मास्तर, आपल्याला हुती पन्नास एक्कर जमीन त्यातली एका कंपनीला धा एक्कर इकली अण बाकीच्यात दिलं पलाटं पाडून. लै दाबून पैसा यितुया. तेला ह्या असल्या शाळा- कोलेजं शिकायची बी गरज नै पर आपले डायरक्टर साहेब बोलले घ्या अडमिशन तवा मनलं जाउद्या इल एकाधं सर्टिफिकट बैठकीत लावाय अण धाडलं पोराला इकडं" मनोजच्या फादरने थोड़ा स्टॉप घेतल्यावर बराचवेळ शांत बसलेल्या डायरेक्टर साहेबांनी तोंड उघडले;
"बघा ज़रा! करा कईतरी, एक त् अडमिशनं येत नैत अण वरुन तुमी पोरायला तरासं देता. कश्या करायच्या तुमच्या पगारी?... अं?"
डायरेक्टरचे बोलणे ऐकून मनोजच्या फादरला आणखी जोर चढला;
"आपला तेव एकुलता एक छोकरा हे, तेला आपुन तळहाताच्या फोडागत जपतु. तवा तुमीबी प्रेमानं चलु दया.." पुन्हा मॅडमकड़े पाहत; "काय मैडम?"
मॅडमची थांबलेली फुसफुस पुन्हा चालु झाली.
डायरेक्टर साहेबांनी जायला सांगितल्यावर सगळे मास्तर प्राचार्य सरांसोबत खाली मान घालून बाहेर पडले तेव्हा पायऱ्याजवळ उभा असलेला मन्या सोबतच्या शिव्याला मोठ्यांनं म्हणाला;
"याहेच्या महिन्याच्या पगारी येवढी त् आपल्या फादरची दारुची उधारी हाई"
प्रतिक्रिया
4 Jun 2016 - 9:23 am | अनिरुद्ध प्रभू
थोडी खुलवता आली असती नाही का?
4 Jun 2016 - 3:26 pm | नाखु
पात्र आता इतरा पात्रांची पत्रिका मांडा जरा !!!
आनंदा चे डोही आनंद तरंग नाखु
4 Jun 2016 - 5:37 pm | आनंद कांबीकर
सैराट ची 'आर्ची' आमच्या चंद्री वरुन उचलली असे नै का वाटले नाखु भौ?
5 Jun 2016 - 11:20 am | भरत्_पलुसकर
नागराज मंजुले लिवतात का काय आनंद नावानं! लयच घोळ हाये मोठा!
4 Jun 2016 - 6:59 pm | पैसा
राग आला
4 Jun 2016 - 7:20 pm | जव्हेरगंज
मस्त रंगवलाय मन्याला
येऊंद्या अजून
4 Jun 2016 - 9:27 pm | सिरुसेरि
एकच वादा प्रिन्सदादा मन्यादादा