महापुरुषांच्या जयंती निमित्त सोरा गावाने घालून दिला नवा आदर्श.(महापुरुषांची एकत्र जयंती)

विशाल चंदाले's picture
विशाल चंदाले in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 8:00 pm

सध्या दुष्काळावर बरीच चर्चा चालू आहे आणि सगळीकडेच त्याच्या उपाययोजनांवर चर्चा आणि कामे सुद्धा चालू आहेत. असंच एक काम हाती घेतलं होतं सोरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) गावातील तरुणांनी. ह्या कामाचं विशेष म्हणजे निमित्त होतं ते महापुरुषांच्या जयंतीचं. गावातील तरुणांनी महाराणा प्रताप सिंह, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या जयंती वेगवेगळ्या साजऱ्या न करता एकत्र साजऱ्या करायचा संकल्प केला होता. तो या वर्षी त्यांनी पूर्णत्वास नेला आणि दिनांक २४ मे रोजी एकत्रित जयंती साजरी झाली.

जयंती निमित्त केवळ वैचारिक देवाण घेवाण करून चालणार नाही हे ओळखून एक पाऊल पुढे टाकून या एकत्रित जयंती निमित्त गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी, ग्राम स्वराज फाउंडेशन, परभणी आणि ओंजळ प्रतिष्ठान, पुणे यांच्या मदतीने गावाजवळील ओढा खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले आणि तडीस नेले.

ग्राम स्वराज फाउंडेशन आणि ओंजळ प्रतिष्ठान यांनी मदत करण्याची तयारी दाखवली होती पण त्यांची अट होती कि गावातूनही निधी जमा व्हायला पाहिजे. हे काम करायचं म्हटल्यावर विरोध होणार हे सगळे ओळखूनच होते. एक तर सततची नापिकी, पाण्याची बोंब त्यात अजून एक दुखणं वाढवून घायचं बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात नव्हतं. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून एकही पैसा न घेता मागच्या वर्ष्याच्या जयंतीच्या वर्गणीतले पैसे वापरायचे ठरवले आणि गावातील नौकरदार वर्गाकडून ठराविक रक्कम प्रत्येकी उभा केली गेली. पण अजूनही सर्व शेतकरी ऐकत नव्हतेच त्यांना भीती होती कि आपण हो म्हणल्यावर पैसे द्यावे लागतील कि काय?
मग मार्ग काढला गेला कि ज्यांची तयारी आहे त्यांच्याच रानाशेजारच्या ओढ्यात काम करायचं आणि कामाला सुरुवात झाली.

काम बघून जवळपास सगळ्यांचा विरोध मावळला पण एका म्हातारीचा विरोध अजूनही होताच. तिला कोणी सांगायला गेलं कि त्यालाच शिव्या द्यायची आणि काहीबाही बोलायची. "माझी एक्करभर जमीन आणि त्यात खंदल्यावर मला काय राहील? " म्हणायची. तिला हर तऱ्हेने समजावून सांगितले तरीही ऐकेना तेंव्हा तिचा नाद सगळ्यांनी सोडला.
अर्धा किलोमीटर काम झाल्यावर त्या म्हातारीचं रान लागलं आणि पुन्हा एकदा प्रयत्न करू म्हणून चार जन पहाटे पाचलाच तिच्या दारी येउन बसले. आणि या वेळेला मात्र नाही, हो करत बाईनं मंजुरी दिली.
तिच्या रानात काम सुरु झालं, म्हातारी काम बघायला आली आणि काम बघून घरी जाऊन सगळ्यांसाठी चहा पाठवला व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी देखील दर्शवली.

ऑपरेटर लोकांची चांगली बडदास्त ठेऊन तरुणांनी तीन दिवसात जवळ पास एक किलोमीटर काम अपेक्षेपेक्ष्या अर्ध्या निधी मध्ये करून घेतले.
आता येत्या जुन महिन्यात गावातील पाचवी पर्यंतच्या शाळेमध्ये ई लर्निंग करायचा गावातील तरुणांचा निर्धार आहे.

जाती पाती मध्ये गुरफटलेले आजचं राजकारण आणि तरुण पाहता या गावाने एक नवीन पायवाट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या समाजाला या वाटेवरून चालण्याची खरी गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

photo
photo
photo
photo
photo

समाज

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

31 May 2016 - 8:35 pm | आनन्दा

+१

चांदणे संदीप's picture

1 Jun 2016 - 5:32 am | चांदणे संदीप

या गावाला शुभेच्छा व तुम्हाला धन्यवाद!!

Sandy

नाखु's picture

1 Jun 2016 - 8:27 am | नाखु

बांधावरची माती/राडारोडा लांब/किमान पात्रात परत येणार नाही इतक्या दूर टाकला का?

मुंबई मनपा ठेकेदार गाळ काढल्यावर नाल्याच्या शेजारीच टाकतात पुढील पावसाळ्यात त्यात येऊन पुन्हा ठेका मिळण्यसाठी म्हणून म्ह्टले.

पुढील कार्यास शुभेच्छा !!

शहरी अकृषीक नाखु

ता.क. सन्माननीय साहेब आणि त्यांचे मिपा पाठीराखे या धग्यावर फिरकतील काय? एक छोटी शंका.

परिंदा's picture

1 Jun 2016 - 1:21 pm | परिंदा

गाळ अगदीच काठावर काढुन ठेवलाय. पहिल्या पावसातच तो ओढा पुन्हा सपाट व्हायचा चान्स आहे.

स्तुत्य उपक्रम. अभिनंदन आणि शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2016 - 9:55 am | डॉ सुहास म्हात्रे

स्पृहणिय काम ! सर्व गावकर्‍यांचे अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा !!

स्तुत्य आणि अनुकरणीय

विशाल चंदाले's picture

1 Jun 2016 - 1:54 pm | विशाल चंदाले

धन्यवाद मंडळी.
गावातील जमीन हि सामिस्र प्रकारची आहे. कुठे कुठे ३,४ फुट मुरूम आणि लगेच खडक लागतो. आणि कुठे ८,१० फुट मुरूम आहे.
हे खरं आहे कि मुरूम/माती थोडी लांब टाकायला पाहिजे होती. पण बऱ्याच शेतकऱ्यांचा यावरूनच विरोध होता कि मुरूम रानात येतो त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी शक्य झाले नाही आणि मातीचं प्रमाण एकंदरच जास्त नाही आहे, तेव्हा मुरूम पहिल्या एक दोन पावसा मध्ये पक्का होईल आणि खाली येणार नाही.

नेहमी येणाऱ्या दुष्काळावर मात करून गावे आदर्ष्य आणि स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. धन्यवाद.

रेवती's picture

1 Jun 2016 - 5:19 pm | रेवती

चांगला उपक्रम.

जगप्रवासी's picture

1 Jun 2016 - 6:37 pm | जगप्रवासी

चांगला उपक्रम.

उगा काहितरीच's picture

1 Jun 2016 - 7:19 pm | उगा काहितरीच

चांगली सुरूवात ..

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

1 Jun 2016 - 9:13 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

चांगला उपक्रम,शुभेच्छा.

अर्धवटराव's picture

1 Jun 2016 - 10:05 pm | अर्धवटराव

मला शहारुखचा स्वदेस अज्जीबात आवडला नव्हता तो याच कारणाने. गावातले तरुणच त्या त्या गावच्या समस्या निपटुन काढायला समर्थ आहेत. शाब्बास रे पट्ठे.