देशी पद्धतीचा मसाला पास्ता

विद्यार्थी's picture
विद्यार्थी in पाककृती
23 May 2016 - 6:19 am

देशी पद्धतीचा मसाला पास्ता

मुलांना सुट्ट्या लागून बरेच दिवस झाले असल्यामुळे ही पाककृती मिपावर टाकायला अंमळ उशीरच झाला आहे. रोज संध्याकाळी खायला मुलांना वेगवेगळे पदार्थ करून देऊन आया खरंच थकून जातात. हा देशी पद्धतीचा मसाला पास्ता अजून एक पर्याय म्हणून नक्की उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. बहुतेक सर्व मुलांना पास्ता आवडतो त्यामुळे इतरवेळी भाज्या न खाणाऱ्या मुलांना पास्त्याच्या निमित्ताने थोड्या भाज्या खाऊ घालण्याची सुद्धा ही नामी संधी ठरू शकते.

सूचना: सध्या अमेरिकेत असल्याने इथे उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा मी उपयोग केला आहे. आपल्याला आणि आपल्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही या पाककृतीमध्ये वापरू शकता. (वांगी, दोडके इत्यादी वापरले तर चालेल का असे खट्याळ प्रश्न प्रतिक्रियांमध्ये विचारू नयेत)

खालील साहित्य साधारणपणे दोन वाट्या पास्त्यासाठीचे आहे. पण आपल्या अंदाजानुसार कमी अधिक प्रमाण केले तरी चालेल.

पाककृतीसाठीचे साहित्य

  1. २ वाट्या पास्ता (बाजारात निरनिराळ्या आकाराचा पास्ता मिळतो. आपल्या आवडीच्या आकाराचा पास्ता निवडावा)
  2. २ लसूण पाकळ्या - अगदी बारीक चिरून
  3. आल्याचा छोटा तुकडा - अगदी बारीक चिरून
  4. २ मध्यम आकाराचे कांदे - अगदी बारीक चिरून
  5. २-३ टोमॅटो - गरम पाण्यात उकडून साल काढून बारीक चिरलेले (ब्लांच केलेले)
  6. छोट्या गाजराचे बारीक काप
  7. ब्रोकोलीची फुले
  8. २ मध्यम मश्रूमचे तुकडे
  9. ढोबळी मिरचीचे काप
  10. मक्याचे दाणे
  11. कांद्याची पात (सजावटीसाठी)
  12. फोडणीसाठी ओलिव्ह ओइल आणि जिरे (घरातील कुठलेही तेल किंवा बटर घातले तरी चालेल)
  13. १ ते दीड चमचा गरम मसाला
  14. चवीनुसार मीठ
  15. २ चमचे मध (नसल्यास साखर चालेल)
  16. २-३ चमचे टोमॅटो केचप

कृती

पास्ता शिजवण्याची कृती
पास्ता मध्यम आचेवर भरपूर पाण्यात शिजण्यास ठेवावा. पास्त्याच्या जाडीनुसार तो १५-२० मिनिटांत शिजून तयार होतो. हाताने दाबून शिजल्याची खात्री करता येते. गरम पास्त्यावर गार पाणी ओतल्यास पास्त्याचे तुकडे एकमेकांना चिकटत नाहीत. पास्ता बाहेर काढून चाळणीमध्ये पूर्णपणे निथळून घ्यावा. पास्त्यातील सर्व पाणी निघेल याची खात्री करावी.

पास्ता सॉसची कृती

  • पसरट भांडे मध्यम आचेवर ठेवावे. फोडणीसाठी ओलिव्ह ओइल / तेल किंवा बटर घालावे. फोडणीमध्ये जिरे घालून ते तडतडल्यावर बारीक चिरलेले लसूण आणि आले घालून लालसर करून घ्यावे.
  • बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंग येईपर्यंत शिजवावा.
  • कांदा शिजल्यावर ब्लांच केलेले टोमॅटो घालून २-३ मिनिटे शिजवावे.
  • इतर भाज्या घालून २-३ मिनिटे शिजवावे. (भाज्या फार शिजवू नये. अर्ध्या कच्च्या भाज्या पास्त्यामध्ये छान लागतात)
  • गरम मसाला, मीठ, मध (किंवा साखर), टोमॅटो केचप घालून पास्ता सॉस मिळून येईपर्यंत (३-४ मिनिटे) मिश्रण सतत ढवळत राहावे.

आता शिजवून बाजूला ठेवलेला पास्ता भांड्यात घालून व्यवस्थित हलवून सॉस पास्त्याला नीट लागेल याची खात्री करावी. १-२ मिनिटांत अतिशय रुचकर मसाला पास्ता तयार होईल.

बाउलमध्ये पास्ता घालून कांद्याच्या पातीचे बारीक तुकडे त्यावर घालावे आणि गरम गरम पास्ता खाण्यास द्यावा.

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 May 2016 - 10:04 pm | पैसा

प्रकार आवडला. झटपट आणि माईल्ड खाणे.

विद्यार्थी's picture

25 May 2016 - 1:15 am | विद्यार्थी

आभारी आहे. मुख्य म्हणजे या पास्त्यामध्ये चीज वैगेरे सारखे काहीही "Junk" नसल्यामुळे मला तो विशेष आवडतो. आणि गरम मसाल्यामुळे तो भारतीय चटपटीत चवीचा होतो.

चीज जंक असते असे कोणी सांगितले हो ? ते तर जास्त उष्मांक देणारे खाद्य आहे . लोकांना खातच सुटायची सवय असते त्या मुळे त्याचा वाईट परिणाम होतो. पण म्हणून चीज वाईट ठरवायचे का ?

विचार करायला हवा . कसे?

विद्यार्थी's picture

25 May 2016 - 9:19 am | विद्यार्थी

तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे विदेशी वचाळ. परंतु माझ्या लेखाच्या सुरवातीलाच मी सूचना लिहिली आहे आणि त्यात मी लिहिले आहे कि मी सध्या अमेरिकेत राहतो. अमेरिकेमध्ये बहुतेक सर्व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ग्रोथ हार्मोन आणि तत्सम भेसळ सर्रास केलेली आढळते, त्यामुळे बहुदा सर्व दुग्धजन्य पदार्थ "न खाल्लेले बरे" प्रकारातच मोडतात. भारतातही हे लोळ हळूहळू पसरायला लागलेच आहे. प्रतिक्रियेतील "Junk" चा अगदी शब्दशः अर्थ येथे प्रतीत नाही.

पिलीयन रायडर's picture

25 May 2016 - 11:39 am | पिलीयन रायडर

अमेरिकेमध्ये बहुतेक सर्व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ग्रोथ हार्मोन आणि तत्सम भेसळ सर्रास केलेली आढळते

खरंच??? अमेरिकेत पण भेसळ होते?? म्हणजे असं काही मिसळलं आहे हे वर लिहीलेलं नसतं?? तिथे तर नियम कडक आहेत ना??

माझ्या अमेरिकेबद्दलच्या कल्पना आजकाल खळाखळ फुटत आहेत...

स्रुजा's picture

25 May 2016 - 10:36 pm | स्रुजा

अगं भेसळ म्हणजे इतर हार्मोन्स वरुन ओढुन ताणुन वाढवण्याच्या प्रक्रियेबद्दल शब्द वापरलेला दिसतोय. बाकी जेनेटिकली एंजिनीअर्ड अनेक गोष्टी आहेत इथे. त्याचा त्रास कालांतराने होऊ शकतो जसं लॅक्टोस इन्टॉलरन्स डेव्हलप करणे , ग्लुटेन अ‍ॅलर्जीज वगैरे..

रमेश भिडे's picture

25 May 2016 - 11:38 pm | रमेश भिडे

या आकार वाढवलेल्या अन्नाचे काही दुष्परिणाम होत असतील च की! एखादं नैसर्गिक रित्या 2 3 इंच व्यासाचे वांगे जेनेटिकली 5 इंच व्यास असलेलं बनवलं गेलं तर ते पोषण काय देणार???

पिलीयन रायडर's picture

25 May 2016 - 11:40 am | पिलीयन रायडर

छान आहे कृती.. मी साधारण असाच करते!

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 May 2016 - 1:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

<<<साधारण असाच करते!>>

असाधारण करायचा असल्यास कसा करावा?

विद्यार्थी's picture

25 May 2016 - 6:37 pm | विद्यार्थी

खिक्क

सुखी's picture

25 May 2016 - 7:36 pm | सुखी

मध शिजवायचा नसतो ना?

विवेकपटाईत's picture

25 May 2016 - 7:46 pm | विवेकपटाईत

छान कृति आहे. माझा मुलगा पण पास्ता मस्त बनवितो. भरपूर भाज्या आणि कांदा टमाटरची (भरपूर टमाटर) पेस्ट तेलावर परतून मग इतर भाज्या आणि पास्ता टाकतो. टमाटर प्यूरी किंवा साँस टाकायची गरज पडत नाही.

रुस्तम's picture

25 May 2016 - 8:10 pm | रुस्तम

येऊ द्या पाककृती लवकर

यशोधरा's picture

25 May 2016 - 10:48 pm | यशोधरा

पास्ता शिजवताना त्यात १-२ टीस्पून्स तेल घालावे. पास्ता चिकटत नाही.
पाकृ आवडली.

आनंदयात्री's picture

26 May 2016 - 12:24 am | आनंदयात्री

छान पाककृती आणि उत्तम सादरीकरण.