स्फुटः संन्यास...

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
19 Apr 2016 - 8:40 pm

गृहितक: या विषयावर विचार करतांना भगवंत आहे, सर्व चराचरांत व्याप्त आहे, आणि मनापासून ईच्छा असल्यास साधनमार्गावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकतो.. हे मी गृहित धरलेलं आहे.

बर्‍याच दिवसांपासून यावर विचार करतोय, संन्यास म्हणजे काय? तो कशाकरिता घेतात? ज्या ध्येयासाठी घेतात ते संन्यास घेतल्याविना साध्य होणार नाही काय? पण उत्तरांनी समाधान काही होत नाही. प्रत्यक्ष तेवढा प्रखर अनुभव घेतल्याशिवाय समजणारही नाही बहुदा. तरीही मला जे वाटतं ते मांडतो.

संन्यस्त होणं म्हणजे सरळ अर्थ काढला तर निवृत्त होणं.

कशापासून निवृत्त व्हायचं?
जगापासून.

का निवृत्त व्हायचं?
आत्मशोधासाठी.

पण मग त्यासाठी संन्यास घेतलाच पाहिजे का?
उदाहरणं बघीतलीत तर पद्धतशीर संन्यास न घेताही अनुभव घेतलेली बरीच संतमंडळी होऊन गेली.

मला वाटतं संन्यस्त होणं ही मनाची अवस्था असावी. जी व्यक्ती मनानं संन्यस्त झाली तिला बाहेरच्या अवडंबराची गरज असणार नाही.

कसं व्हायचं असं मनानं संन्यस्त?
प्रथम हे बघायला हवं की तशी आपली खरोखर मनापासून ईच्छा आहे का?
नसली, तर विषय संपला.
असली, तर पुढचा प्रश्न:

आपल्याला खरोखर आत्मशोधाची ईच्छा आहे का?
नसली, तर पुन्हा विषय संपवावा. [कारण जगावरच्या रोषानं वा जगतांना आलेल्या नैराश्यानं किंवा केवळ अनुभवांच्या/चमत्कारांच्या कुतुहलापोटी संन्यास घेण्याच्या मागे लागणं.. ह्यानं नुकसानच जास्त व्हायचं.
एक गोष्ट.. आवडते म्हणून करणं आणि दुसरं काहीच आवडत नाही म्हणून करणं यात शेवटी फरक आहेच ना..]
असली, तर पुन्हा तोच प्रश्न,

कसं व्हायचं असं मनानं संन्यस्त?
मुळात संन्यास म्हणजे विरक्ती. एखादी गोष्ट सोडणं कठीण असतं, ती आपोआप सुटणं त्यापेक्षा सोपं असतं. मन दुसरीकडं पूर्णपणे गुंतलं तर आधीची गोष्ट आपोआपच सुटत जाते. जोवर मनापासून तसं होत नाही, तोवर सर्व जबरदस्तीचा मामला झाला. पण जेव्हा आपल्या ध्येयप्राप्तीची मनापासून ईच्छा असते, तेव्हा बाकीच्या गोष्टींकडे आपोआपच दुर्लक्ष होतं. त्या सोडण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. यालाच वृत्ती स्थिर होणे म्हणतात. हळूहळू आपली वृत्ती स्थिर होत गेली की इतरांच्या वागणुकीचा आपल्याला त्रास कमी व्हायला लागतो. आपल्या इतर गरजा आपोआपच कमी होत जातात. थोडक्यात इतर बाबींचे महत्त्व आपोआपच गौण होत जातं. यालाच मन अंतर्मुख होण्याची पायरी म्हणतात. ज्यावेळेस हे पूर्णपणे साधतं त्यावेळेस एका भगवंताशिवाय दुसर्‍या कोणत्याही गोष्टीची आस राहत नाही. ती तळमळ साधली की आपलं काम झालं.

जाताजाता एक विचार आला,
व्यवहारातसुद्धा ध्येयासाठी झपाटून काम करतांना बाकीच्या सर्व गोष्टी आपोआपच गौण होत जातात.. तीही एकप्रकारे संन्यस्त अवस्थाच होय. त्यात सुद्धा जोवर जिवापाड तळमळ येत नाही, तोवर ध्येय मनाजोगतं साध्य होत नाही.
त्यामुळं, ते अध्यात्माच्या दृष्टीनं जाऊं देत पण व्यवहाराच्या दृष्टीनंही.. अशी कोणती मोठी ध्येय मी साध्य केलीत आजतोवर.. अन् जरा गांगरल्यासारखं झालं....

राघव

जीवनमानराहणीप्रकटन

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

19 Apr 2016 - 9:01 pm | उगा काहितरीच

थोडा लहान वाटला लेख.."संन्यास" या विषयी अजून वाचायला आवाडेल. खास करून जैन व हिंदू मतप्रवाह.

विजय पुरोहित's picture

19 Apr 2016 - 9:06 pm | विजय पुरोहित

राघव सर...
याविषयी बोलणे खूप कठीण आहे. कितीतरी बोलावे लागेल. असो.
उद्या सविस्तर प्रतिसाद देतो.

एस's picture

19 Apr 2016 - 11:19 pm | एस

मला वाटलं जेपींच्या सन्यासावर (संन्यास नव्हे) लेख असेल! ;-)

राघव's picture

20 Apr 2016 - 7:08 pm | राघव

@उका: मी हे माझं आकलन मांडायचा प्रयत्न केलाय. यात धर्माधिष्ठीत असा विचार मांडायचा काही प्रयत्न नव्हता. त्यामुळं कदाचित अपेक्षाभंग झाला असावा. :-) मलाही जाणून घायला आवडेल की.
@विपु: जरूर लिहा. काही वेगळं मत असल्यास तेही मांडावं. वाट बघतो.
@एसः नाही समजले बुवा. कदाचित मिपावर बर्‍याच दिवसांत खूप वेळ बसणं न झाल्याचं हे लक्षण असावं.. ;-)

पैसा's picture

21 Apr 2016 - 9:28 am | पैसा

आवडले. जरा थोडक्यात आहे. पण यावर उत्तम चर्चा होऊ शकते.

शाम भागवत's picture

22 Apr 2016 - 8:39 am | शाम भागवत

एखादी गोष्ट सोडणं कठीण असतं, ती आपोआप सुटणं त्यापेक्षा सोपं असतं.

तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?

आपोआप सुटणे याला मी कृपा समजतो. कृपा झाल्यावर सगळ सोप होत हे मान्य. पण त्या स्थितीपर्यंत पोहोचणेच अवघड असते असे मला वाटतेय. माझा नक्की काय गोंधळ होतोय कळत नाही.

ते प्रयत्नांबद्दल मांडायचा प्रयत्न केलाय!!
ध्येयासाठी एकदा मनापासून कार्य सुरू झालं की दुसरीकडचं लक्ष काढण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायची गरज उरत नाही.. थोडक्यात इतर बाबी गौण होत होत त्यांच्यापासून एक प्रकारचा अलिप्तपणा येत जातो आणि सर्व प्रयत्न आपसूक ध्येयावर केंद्रीत होतात.
अर्थात् सर्व कृपेमुळे होतं हा भाग मला मान्य आहे. पण त्याची पूर्ण जाणीव होईतोवर प्रयत्नांना महत्व आहे असं म्हणायचं आहे.

शाम भागवत's picture

22 Apr 2016 - 4:05 pm | शाम भागवत

ओके.

नीलमोहर's picture

22 Apr 2016 - 5:28 pm | नीलमोहर

याविषयी मलाही बरेच प्रश्न आहेत,
थोडा निवांत वेळ मिळाला की अजून लिहीन.
पुलेशु

Question: Should not a man renounce everything in order that he might get liberation?

Ramana Maharshi: Even better than the man who thinks ‘I have renounced everything’ is the one who does his duty but does not think ‘I do this’ or ‘I am the doer’. Even a sannyasi who thinks ‘I am a sannyasi’ cannot be a true sannyasi, whereas a householder who does not think ‘I am a householder’ is truly a sannyasi.

(Talks with Sri Ramana Maharshi, talk no. 530)

Question: How can my mind be still if I have to use it more than other people? I want to go into solitude and renounce my work as a headmaster.

Ramana Maharshi: No. You can stay where you are and go on with work. What is the undercurrent which gives life to the mind and enables it to do all this work? Why, the Self! So, that is the real source of your activity. Simply become aware of it during your work and do not forget it. Contemplate it in the background of your mind even while you are working. To do that, do not hurry! Take your time, keep the remembrance of your real nature alive, even while working, and avoid haste which causes you to forget. Be deliberate. Practice meditation to still the mind and cause it to become aware of its true relationship to the Self, which supports it. Do not imagine it is you who are doing the work. Think that it is the underlying current which is doing it. Identify yourself with this current. If you work unhurriedly, recollectedly, your work or service need not be a hindrance.

अनुवादः
प्रश्नः आपल्याला मुक्ती मिळणे शक्य होण्यासाठी एखाद्याने सर्वसंगपरित्याग करणे अनिवार्य नाही का?
रमण महर्षी: 'मी सर्वसंगपरित्याग केला आहे' असा विचार करणार्‍या व्यक्तीपेक्षा आपले कर्तव्यकर्म चोखपणे पार पाडत असताना 'हे कर्म मी केले आहे' किंवा 'मी कर्ता आहे' असा विचार न करणारी व्यक्ती (पारमार्थिक दृष्ट्या) उजवी ठरेल. 'मी संन्यासी आहे' असा विचार करणारा संन्यासी हा सच्चा संन्यासी असू शकत नाही, मात्र 'मी गृहस्थाश्रमी आहे' असा विचार न करणारा प्रापंचिकही खर्‍या अर्थाने संन्यस्तच असतो.

---
प्रश्न: इतरेजनांपेक्षा त्याचा (मन, बुद्धी) अधिक वापर करणे क्रमप्राप्त असल्याने मला माझे चित्त स्थिर कसे ठेवता येईल? मुख्याध्यापकाच्या नोकरीचा त्याग करून मला एकांतवास स्वीकारायचा आहे.

रमण महर्षी: नाही. आपण जिथे आहात तिथेच राहून आपले काम सुरू ठेवा. मनाला जिवंतपणा देणारा आणि हे सारे काम करण्यासाठी त्याला सक्षम करणारा अतःप्रवाह कोणता आहे? अर्थातच, तुमचे स्वरूप! त्यामुळे तुमच्या सगळ्या कार्यकलापांचे खरे उगमस्थान तेच आहे. तुम्ही फक्त कार्यरत असताना स्वरूपानुसंधान ठेवा आणि त्याचे विस्मरण होउ देउ नका. हे चिंतन मनातल्या मनात सगळी कामे करत असतानाही घडत राहू द्या. हे झटपट साध्य करण्याचा प्रयत्न करू नका! आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण निरंतर जागते ठेवा, त्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ द्या, आणि कार्यमग्न असतानाही हे सहजगत्या जमण्यासाठी स्वरूपाची विस्मृती घडवणारी घाई गडबड मात्र वर्ज्य करा. प्रत्येक कृती सजगतेने करा.

मनाला निश्चळ करण्यासाठी ध्यानाचा अभ्यास करा आणि त्याला आधारभूत असणार्‍या स्वरूपाशी या मनाचे खरेखुरे नाते काय आहे याविषयी ते सजग होईल असे पहा. तुम्ही स्वतः काम करता आहात अशी कल्पना करून घेउ नका. असे चिंतन करा की आपण ज्याचा उल्लेख केला तो अंत:प्रवाहच सारे कार्य करतो आहे. त्या प्रवाहाशी समरस होउन जा. तुम्ही जर असे घाई गडबड न करता, स्मरणपूर्वक काम कराल तर तुमची कर्तव्य कर्मे किंवा नोकरी यांचा अडसर ठरण्याची मुळीच गरज नाही.

अर्धवटराव's picture

26 Apr 2016 - 1:35 am | अर्धवटराव

.

DEADPOOL's picture

25 Apr 2016 - 9:14 pm | DEADPOOL

मस्त लेख!