ह्या कथेचे नायक आहेत साने आजोबा.
साने आजोबा हाडाचे शिक्षक. त्याना निवृत्त होऊन जरी बरीच वर्षे लोटली असली तरी त्यांची कडक शिस्त अजूनही तशीच होती. दोन वर्षांपूर्वी घरच्यांनी उत्साहात पंच्याहत्तरी साजरी केली होती. मुले, नातवंडे आपापल्या व्यापात मग्न असल्यामुळे साने आजी-आजोबांना करमत नसे. सतत नवीन विरंगुळ्याच्या नाहीतर गप्पा मारायला माणसांच्या शोधात दोघेही असत. आजोबाना नवनवीन कल्पनाही खूप सुचत. त्यातूनच जन्माला आली ही कथा.
साने आजोबांनी वर्तमानपत्र उघडून वाचयला सुरु केले तसे एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘ प्रिय आजी-आजोबा, नमस्कार!
बाल कल्याण मंडळ ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी एक उन्हाळी शिबीर आयोजित करीत आहे. त्यासाठी आम्हाला स्वयंसेवक म्हणून चक्क तुम्ही हवे आहेत. ज्याना नातवंडांसाठी वेळ असेल आणि प्रेमाच्या चार गोष्टी शिकवता येतील असे आजी-आजोबा आम्हाला हवे आहेत. तुम्हाला जे काही नवीन शिकवता येईल ते तुम्ही मुलाना शिकवायचे. त्याना गोष्टी सांगायच्या. शिवाय बैठे खेळ खेळता येतील . सुट्टीत टी वी, मोबाइल ह्यापासून ह्या पिढीला दूर ठेवून त्याना वेगळेच आयुष्य जगायला शिकवायचे. जे त्यांना विशेष माहीतच नाही आहे आणि तेही आजी-आजोबांच्या उबदार छायेत. आहे का तुमची तयारी? चला तर मग लौकर फोन करा. आजच सुरु होतंय हे शिबीर. आम्ही आणि मुलं तुम्हाला भेटायला अगदी उत्सुक आहोत. येताय ना मग?
फोन नं – ******** ‘
साने आजोबा तीन ताड उडालेच. हे म्हणजे अगदी ‘छप्पर फाडके’ म्हणतात तसेच काहीसे वाटले त्याना. त्यांच्या अंगात उत्साह संचारला. आणि ते लगबगीने फोन करायला उठले.
टिंग टोंग, टिंग टोंग!
बेलच्या आवाजाने आजोबांची झोप उडाली. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर दुधवाला आला होता. त्यांच्या लक्षात आले की त्याना स्वप्न पडलं होत. पहाटेची स्वप्न खरी होतात असे मानले तर होईल का हे स्वप्न पुरे?
आजोबा आतुरतेने वर्तमानपत्र येण्याची वाट पाहू लागले.
(हल्ली पाहण्यात येते की काही ज्येष्ठ नागरिक खूप एकटे असतात. संवाद साधायला कोणी नसते. आर्थिक सुबत्ता असली तरी मानसिक, भावनिक दृष्ट्या ते हळवे झालेले असतात. त्यावरून सुचलेला हा एक उपाय मी कथा स्वरूपात मांडला आहे. मला अपेक्षित असलेला शेवट हा आशादायी आहे आणि निराशावादी नक्कीच नाही. असे काहीतरी त्यांना काम/छंद मिळावे असे मनापासून वाटते. 'आपली कोणालातरी गरज आहे' ही भावना त्याना जगण्यासाठी उभारी देईल.)
काल्पनिक कथा व काल्पनिक पात्रे.
– उल्का कडले
प्रतिक्रिया
14 Apr 2016 - 3:00 pm | मराठी कथालेखक
जो विचार मांडू पाहात आहात त्याबद्दल आताच काही मत देत नाही, पण कथा म्हणून जमली नाही.
कथा लिहण्यापेक्षा तुमच्या मनातील या विचारांचा काथ्याकूट करायला हवा होता असे वाटते. असो.
14 Apr 2016 - 6:43 pm | उल्का
तुमच्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
कथा म्हणजे एखादा प्रसंग आणि विचारही असू शकतो असे मला वाटले म्हणून हा प्रयत्न केला.
सध्या उन्हाळी शिबिरांचा मोसम आहे म्हणून हे सुचले आणि लिहिले.
परंतु हे सत्यात उतरेल ह्याची खात्री नाही म्हणून स्वप्न दाखविले.
ही माझी दुसरीच कथा आहे. नुकती कुठे सुरुवात केली आहे.
वाचकान्च्या प्रामाणिक सूचना मला पुढिल लेखनासाठी मार्गदर्शकच ठरतील.:)
14 Apr 2016 - 7:19 pm | मराठी कथालेखक
तुमची कल्पना नेमकी मांडा (कथेऐवजी लेख म्हणून) त्यावर मुद्देसूद चर्चा होवू शकते.
15 Apr 2016 - 12:02 am | अभ्या..
तुमच्या कल्पनेतच आगामी सुंदर कथाबीजे आहे.
आजोबा जातात अन लहान मुलांचे पॅनेल चक्क त्यांचा इंटर्व्ह्यू घेतात. त्यांच्या अपेक्षांना आजोबा उतरतात का? अपेक्षा तरी काय असतील?
अॅज अ कॅन्डीडेट म्हणून आलेल्या तीन डिफरंट आजोबांचे संभाषण.
सिलेक्ट झाल्यावर कॅम्प मध्ये मुलांनी केलेले व्हॅल्युएशन.
साने आजी अन साने अजोबांचे मुलांबद्दल चे दृष्टीकोन. अॅन्ड वाइसेवर्सा.
मुलांना नकोसा झालेला पालक अॅटीट्युड आजोबा कसा बदलवतात.
.
बघा ना. खूप सार्या शक्यता आहेत.
शुभेच्छा.
17 Apr 2016 - 9:00 pm | उल्का
आताशी कुठे सुरुवात आहे. म्हणुन छोटी उडी घेतली आहे. हळूहळू मोठ्या उडीचा प्रयत्न करेन. :)