(कथा लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. कुठेतरी वास्तवाशी मिळताजुळता प्रसंग. सहअनुभूतीतून सुचलेली काल्पनिक कथा आणि काल्पनिक पात्रे.)
भर दुपारी रस्त्याच्या कडेकडेने इकडे तिकडे बघत, वाटेत येणाऱ्या छोट्या छोट्या दगडांबरोबर फुटबॉल खेळत, हातातल्या काठीने चालता चालता मातीवर रेघोट्या ओढत चालणारा सुम्या (सुमीत) अचानक थबकला.
त्याच्यापुढे काही अंतरावर चालणाऱ्या काकांच्या खिशातून रुमाल काढताना पाकीट पडलेले त्याने पाहिले. धावत जाऊन त्याने ते उचलले आणि काकांना हाक मारली.
"ओ काका, पाकीट पडलं बघा."
काकांच्या डोक्यात कामाची घाई होती. त्यामुळे असेल कदाचित त्यांच्या कानातून मेंदूत हे वाक्य झिरपले नसावे. ते झपाझप चालत आपल्या जीपकडे पोहोचले. सुम्याने मग सुसाट धावत त्यांना गाठले आणि पाकीट परत केले.
सावळासा तरतरीत उन्हामुळे थकलेला सुम्या काकांना खूप आवडला. त्यानी पाकीट उघडून ५० रु ची एक नोट काढून त्याला दिली.
"हे तुला खाऊ साठी." आणि प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत मनोमन त्याला आशीर्वाद दिला.
सुम्या "नको नको" म्हणेपर्यंत काका निघून गेले.
सुम्याने ती नोट घट्ट पकडली आणि जवळच्याच थोरात यांच्या दुकानात गेला.
थोरात काका दुकान बंद करायच्या बेतात होते. त्यांनी घडलेला प्रसंग पाहिला होता.
"काका, मला एक द्या." सुम्याने एका बाटली कडे बोट दाखवून सांगितले आणि ५०रु ची नोट दिली.
थोरातांनी त्याला बाटली दिली. सुम्याने क्षणाचाही विलंब न करता ती अधाश्यासारखी उघडली. घट घट घट करत एका दमात संपवली.
थोरात काका त्याच्याकडे प्रेमाने बघत होते. त्यांच्या हातात सुट्टे पैसे होते. सुम्याने खुणेनेच "नको" असे सांगितले.
"अशा दोन मोठ्या बाटल्या अजून द्या. येतील ह्या पैशात? आई, बाबा आणि चिंगीसाठी पण पाहिजे."
थोरात काकानी त्याला हव्या त्या बाटल्या दिल्या. काकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
सुम्याने दोन्ही हातात एक एक बाटली पकडली. अत्यानंदाने डोळे भरून त्या बाटल्यांकडे पाहिले आणि घराकडे धूम ठोकली.
आज कितीतरी दिवसांनी त्याच्या घरचे मनसोक्त 'पाणी' पिणार होते.
- उल्का कडले
प्रतिक्रिया
13 Apr 2016 - 8:54 pm | मानसी१
छान तरी कसे म्हणु. पण आवडली.
13 Apr 2016 - 9:02 pm | उल्का
समजु शकते. भावना पोचली. :)
13 Apr 2016 - 9:20 pm | जेपी
कथानायक मंद दिसतो.
50रु. 20 लि.चे दोन जार येतील.त्यात चार दिवस भागतील.
बाकी कथा अतिरंजित