जर्मनीमध्ये एम.एस - माहिती

टुंड्रा's picture
टुंड्रा in जनातलं, मनातलं
31 Mar 2016 - 11:17 pm

जर्मनी हा देश अनेक गोष्टींमध्ये अत्यंत प्रगत देश समजला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तर जर्मनी म्हणजे पंढरीच! म्हणुनच मी इथे उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. जर्मनीमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षण मोफत आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांशिवाय जर्मनी हा ही एक उत्तम पर्याय आहे.

मेकॅनिकल इंजिनिरिंग मध्ये बी.ई केल्यानंतर अजुन थोड्याफार तयारीने मी जर्मनीतल्या डॉर्टमुंड ह्या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवु शकले. सध्या मला जर्मनीमध्ये एम.एस कसे करावे ह्याची चौकशी करणारे फोन सतत येत आहेत. सर्वांना साधारण सारखेच प्रश्न असल्याने हा एक लेख लिहुन जास्तीत जास्त माहिती सर्वांना द्यावी म्हणुन हा प्रपंच!

मी पुणे विद्यापीठातुन B.E Mechanical केले आहे. साधारणतः सर्व सेमिस्टर मध्ये फर्स्टक्लास आणि अ‍ॅग्रिगेट ७०% असे मार्क्स मला आहेत. तुमचे डिग्रीचे मार्क हा एक मुद्दा महत्वाचा असला तरी माझ्यापेक्षा बरेच कमी मार्क असलेल्या मुलांनाही प्रवेश मिळाला आहे. अनेकांनी माझे विविध परीक्षांमधले मार्क विचारल्याने प्रत्येक ठिकाणी माझा स्कोअर सांगत आहे म्हणजे अंदाज यायला मदत होईल.

डिग्री नंतर नोकरी करता करता मी जर्मन भाषा शिकायला घेतली. पुण्याच्या मॅक्सम्युलर मधुन १ लेव्हल केल्यानंतर मला जाणवले की जर मला खरंच उत्तम युनिव्हर्सिटी हवी असेल तर त्यासाठी १००% वेळ द्यावा लागेल. म्हणुन मी नोकरी सोडुन पुर्णपणे एम.एसच्या तयारीला वेळ दिला. नोकरी सोडताना माझा अनुभव साधारण २ वर्षांचा होता.

१. जर्मन भाषा

जर्मनीमध्ये जर्मन आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये शिक्षण आहे. पण अर्थातच जास्तीत जास्त कोर्सेस जर्मन भाषेत असतात. तुम्हाला इंग्रजी भाषेतील कोर्स करायचा असेल तर जर्मन येणे आवश्यक नाही. पण अर्थात काही युनिव्हर्सिटी त्याला अपवाद आहेत. तुम्हाला किती चांगली भाषा येते ह्याला महत्व दिले जातेच. पण तुम्हाला अजिबात जर्मन भाषा येत नसली तरी तुमचा नोकरीतील अनुभव, तुमचे मार्क्स, प्रोजेक्ट्स इ. अनेक मुद्द्यांनाही महत्व दिले जात असल्याने तुम्हाला प्रवेश मिळु शकतो. पण तिथे नोकरी करण्यासाठी आणि एकंदरितच जर्मनीत रहाण्यासाठी जर्मन भाषा अत्यंत आवश्यक आहे.

भारतात गोथे (मॅक्सम्युलर) चे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. प्रवेशअर्ज करताना माझ्या जर्मनच्या तीन लेव्हल्स झाल्या होत्या (A1, A2 and B1).

२. GRE

काही ठिकाणी GRE आवश्यक आहे. काही युनिव्हर्सिटी मध्ये आवश्यक नसला तरी GRE Score सुद्धा लक्षात घेतला जातो. पण कुठेही गणित (Quant) विषयातले मार्क जास्त महत्वाचे असतात. आणि तेच गृहीत धरले जातात. माझा हा स्कोअर १६२ होता.

३. IELTS \ TOEFL

इंग्रजीसाठी ह्याच दोन परीक्षांचा स्कोअर पाहिला जातो. तुमची डिग्री इंग्रजीतुन असेल तर खरं तर युनिव्हर्सिटी इंग्रजी भाषेसाठी अजुन कोणतेही प्रुफ मागत नाही. पण व्हिजासाठी ह्या परीक्षा आवश्यक आहेत. व्हिजासाठी इंग्रजीचे प्रुफ म्हणुन ह्यंचा स्कोअर पहिला जातो. तो नसल्यास परीक्षा द्यायला वेळ दिला जाऊन परत बोलावले जाते. माझा IELTS स्कोअर ८ होता.

४. डिग्रीचे मार्क्स

प्रत्येक वर्षाचे आणि महत्वाच्या विषयांचे मार्क्स बघितले जातात. बॅकलॉग असतील तर तो मुद्दा निगेटीव्ह मध्ये धरलो जातो. अगदी व्हिजा इंटरव्ह्यु मध्येही बॅकलॉग बघितले गेल्याची उदाहरणे आहेत.

ही तयारी झाल्यावर आता मुख्य प्रवेश अर्ज करायला सुरवात होते. अर्ज दोन वेळा करता येतो :- समर आणि विंटर अशा दोन "इनटेक" साठी. समरला तुलनेने कमी कोर्स असतात. समरचे अर्ज साधारण ऑगस्ट ते जानेवारी पर्यंत चालु असतात. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या तारखा वेगवेगळ्या असतात. एप्रिल मे मध्ये कोर्सेस सुरु होतात.

मी विंटरसाठी अर्ज केला होता. अर्ज करायला सुरवात फेब - मार्च पासुन झाली. १५ जुलै पर्यंत काही युनिव्हरसिटी अर्ज घेत होत्या. जुन पासुन प्रवेश मिळाला की नाही ते कळायला सुरवात झाली. एकदा प्रवेश निश्चित झाला की व्हिजासाठी तारीख घेतली. ऑक्टॉबरच्या सुरवातीला मी जर्मनीला निघाले होते.

अर्ज करताना खालील गोष्टी लागतातः-

१. Statement of Purpose

साधारण वर्डमधले १-१.५ पान (किंवा युनिव्हर्सिटीने सांगितल्या प्रमाणे) भरुन तुम्हाला ह्या कोर्सला प्रवेश का हवा आहे हे सांगावे लागते. ह्या क्षेत्रात तुम्ही कसे आलात, तुम्ही डिग्रीमध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी केल्यात, नोकरीतील अनुभव, प्रोजेक्ट्स इ बद्दल, तुमचा कोर्स आणि युनि. मधला इंटरेस्ट... ह्या विषयावर लिहावे लागते. काही वेळा जर्मनीची निवड का केली हे ही सांगावे लागते.

२. Letter of Recommendation

तुमचे शिक्षक, नोकरीतील अधिकारी ह्यांच्याकडून शिफारसपत्र घ्यावे लागते. दोन ते तीन जणांकडुन हे पत्र लागते.

३. Transcripts

तुमच्या डिग्रीच्या कॉलेज / विद्यापीठातुन तुम्हाला Transcripts मागवाव्या लागतात.

४. ह्या व्यतिरिक्त जर्मन भाषा / GRE / TOEFL / IELTS इ चे स्कोअर कार्ड्स

५. जर स्कॉलरशिपची सोय असेल तर त्याचे लेटर

६. रिझ्युम - जर्मन फॉर्मॅट प्रमाणे हा रिझ्युम लिहावा. काही वेळा युनि. हा फॉर्मॅट देते.

वरील सर्व कागदपत्रे जर्मनीला कुरिअर करावी लागतात. काही युनि. फक्त ऑनलाईन प्रवेश अर्ज घेतात त्यांना हे कुरिअर करण्याची आवश्यकता नाही. कुरिअरसाठी DHL चांगली कंपनी आहे.

हा अर्ज केल्यानंतर १-२ महिन्यात तुम्हाला प्रवेश मिळाला की नाही हे कळवणारा इमेल येतो. कोणत्याही युनि. कडुन प्रवेश मिळाला की व्हिजासाठी तारीख घेता येते.

ह्याव्यतिरिक्त "डॉइच बँके"मध्ये ब्लॉक अकाऊंट काढावे लागते. ह्या खात्यात ८०४० युरो (साधारण ६ लाख) टाकावे लागतात. हे पैसे जर्मनीमध्ये वापरायला काढता येतात. दर महिन्याला ठराविक रक्कमच काढता येते. हे खाते सुरु व्हायला साधारण १५-२१ दिवस लागतात. आणि पैसे ट्रान्सफरला ३-४ दिवस लागु शकतात. म्हणुन प्रवेश अर्ज केल्यानंतर लगेच हे खाते काढुन ठेवावे. प्रवेश निश्चित झाला की पैसे टाकता येतात. व्हिजासाठी ह्या खात्यात पैसे दाखवणे आवश्यक आहे.

बँकेत खाते काढायला आणि व्हिजासाठी मुंबईला जावे लागते.

व्हिजा मिळायला साधारणपणे एक ते दिड महिना लागतो.

___________________________________________________________

DAAD - https://www.daad.de/en/

ही जर्मनीमध्ये शिक्षणाला मदत करणारी संस्था आहे. ह्यांच्या मार्फत कोर्सेसची माहिती दिली जाते. त्यांच्या वेबसाईटवर किंवा ऑफिसमध्ये ही माहिती मिळु शकते. DAAD स्कॉलरशिपही देते. जर्मनीला जाणार्‍यांसाठी Pre Departure Meet आयोजित केली जाते. त्यासाठी मी नाव नोंदवले होते. पुण्यात ह्या कार्यक्रमात जर्मनीमध्ये शिकणार्‍या मुलांकडून बरीच माहिती मिळते. तुमच्या युनि. मधले अजुन विद्यार्थी भेटतात.

फेसबुकवरही असे अनेक ग्रुप्स आहेत जिथुन तुम्हाला त्या त्या वर्षी प्रवेशअर्ज करणार्‍या मुलांसोबत चर्चा करता येते. आपल्या युनि/ कोर्सचे विद्यार्थी शोधुन एकत्र तयारी करता येते.

_________________________________________________________________

जर्मनीतले आयुष्यः-

हॉस्टेल - हॉस्टेल मिळायला ६ महिने ते एक वर्षही लागु शकते. लगेच मिळाल्यास प्रश्नच नाही पण न मिळाल्यास जवळपास अपार्टमेंट शोधावे लागते. महिन्याला रहण्याचा खर्च २५०-३०० युरो आहे. घर शोधताना जर्मन भाषा उत्तम बोलता येणे हा प्लस पॉईंट आहे.

जेवण - कँटिनमध्ये चांगले जेवण मिळते पण रोज बाहेर खाणे तब्येत आणि खिशाला परवडणारे नसल्याने घरीच करुन खाणे उत्तम. इंडियन स्टोअर्स असल्याने सर्व आवश्यक गोष्टी मिळतात.

वातावरण - मी थंडीच्या दिवसात गेल्याने अगदी -२० पर्यंतही तापमान आतापर्यंत पाहिले आहे. अवकाळी पाऊस अगदी नित्याची गोष्ट आहे. उन्हाळ्याचा अजुन अनुभव नाही.

स्टुडंट जॉब्स - युनिव्हर्सिटी, रेस्टॉरंट्स मध्ये काम करु शकता. सगळीकडे जर्मन येणे आवश्यक आहे. साधारणपणे ८-१० युरो ताशी मिळु शकतात.

जर्मन लोक - मला तरी आजवर खुप चांगले आणि मदत करणारे लोक भेटले आहेत. जर्मन भाषेबद्दल अत्यंत आग्रही असल्याने आपण त्यांच्या भाषेत बोललो की ते अजुन आपुलकीने मदत करतात.

काही महत्वाच्या वेबसाईट्स -

१. http://www.mastersportal.eu/countries/11/germany.html

२. काही युनि मध्ये अ‍ॅप्लिकेशन करायला ही वेबसाईट वापरावी लागते - http://www.uni-assist.de/index_en.html
ह्यासाठी युनि असिस्टला पैसे द्यावे लागतात. पहिल्या अर्जाला ७५ युरो आणि पुढच्या प्रत्येक अर्जाला १५ युरो द्यावे लागतात.

३. अपार्टमेंट शोधायला - http://www.wg-gesucht.de/

_________________________________________________________________

* ह्या लेखातली सर्व माहिती मी २०१५ साली अर्ज करताना मला आलेल्या अनुभवांवरुन दिलेली आहे. ह्यातुन केवळ अंदाज मांडायला मदत होउ शकते. प्रत्यक्ष अर्ज करताना त्या त्या वेळचे नियम, तुम्ही जात असलेल्या युनिव्हर्सिटीचे नियम इ बघुनच जावे.*

_________________________________________________________________

शिक्षणअनुभवमाहितीमदत

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

1 Apr 2016 - 12:25 am | मधुरा देशपांडे

उत्तम संकलन. यात अजून काही मुद्दे -
राहण्याचा खर्च शहरावर पण अवलंबून आहे. जसं की म्युनिक मध्ये जास्त तर ब्रेमेन सारख्या ठिकाणी कमी. स्टुडंट जॉब चे मिळणारे पैसे देखील त्याप्रमाणे बदलतात.
आणि व्हिसा, बँकेत जमा करावे लागणारे पैसे या बाबी केव्हाही बदलू शकतात. त्यासाठी इम्बसी ची वेबसाईट रेफर करणे जास्त योग्य.
बाकी यापुढे कुणी विचारल्यास हा धागा रेफर करायला सांगेन. सगळी महत्वाची माहिती आली आहे यात.

रहाण्याचा खर्च शहराप्रमाणे बदलेल. मी डॉर्ट्मुंड मध्ये सध्या मला येत असलेला खर्च दिलेला आहे. पण तुमचे बरोबर आहे की दुसर्‍या शहरात हा कमी जास्त होईल.

हा मुद्दा लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद!

* ह्या लेखातली सर्व माहिती मी २०१५ साली अर्ज करताना मला आलेल्या अनुभवांवरुन दिलेली आहे. ह्यातुन केवळ अंदाज मांडायला मदत होउ शकते. प्रत्यक्ष अर्ज करताना त्या त्या वेळचे नियम, तुम्ही जात असलेल्या युनिव्हर्सिटीचे नियम इ बघुनच जावे.*

हे वाक्य लेखाच्या शेवटी टाकता येईल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2016 - 12:46 am | डॉ सुहास म्हात्रे

उपयुक्त आणि मुद्देसूद माहिती !

जर्मनीमधे शिक्षणासाठी जाऊ इच्छिणार्‍यांसाठी ही माहिती खूपच उपयोगी ठरेल.

खूपच सुन्दर माहिती दिलीत आपण .

खूप उत्तम माहिती. वाखु साठवली आहे.

मन१'s picture

1 Apr 2016 - 8:26 am | मन१

चांगली माहिती. वाचनखूण साठवली आहे.

जर्मनीतील पदवीला जगभर मान्यता किंवा स्वीकारार्हता( नोकरीच्या दृष्टीने) किती आहे?
आणि तेथील अभ्यासक्रम भारतीय साधारण विद्यापीठाच्या मानाने किती अत्याधुनिक/ प्रगत आहे.

टुंड्रा's picture

1 Apr 2016 - 1:46 pm | टुंड्रा

१. कोणत्याही देशातल्या चांगल्या युनि. मधल्या पदवीला जेवढी मान्यता असते तेवढीच जर्मनीतल्या पदवीलाही आहे. मेकॅनिकल मध्ये तर ह्या पदवीला विशेष महत्व आहे.

२. अर्थातच अभ्यासक्रम जास्त प्रगत आहे. जर्मनीतले तंत्रज्ञान हे भारतातल्या तंत्रज्ञानाच्या पुढे आहे आणि अभ्यासक्रमातही तेच शिकवले जाते. शिवाय प्रत्येक युनि. मध्ये जे रिसर्च चालु असतात त्याबद्दलही माहिती दिली जाते. विषयही खोलात जाऊन शिकवले जातात. पण जर्मनीत सगळीकडेच "Hands On" or "Practical Knowledge" ला जास्त महत्व आहे. मार्कांपेक्षाही जास्त तुमच्या अनुभवाला महत्व दिले जाते. माझा कोर्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. तर मला १ वर्ष थिअरी नंतर ६ महिन्याचा एक प्रोजेक्स्ट (जो फक्त आमच्या युनि मध्ये आहे) आणि ६ महिन्याचा मास्टर थेसिस (जो सगळीकडे असतो) करावा लागेल. ह्याव्यतिरिक्त ६ महिने इंटर्नशिपही करता येते (जी काही युनि मध्ये आवश्यक आहे.) ह्या सर्वात आम्ही सर्व मशिन्सवर काम करणे अपेक्षित आहे.

एकंदरीत भारतापेक्षा जर्मनीची शिक्षणपद्धती बरीच वेगळी आहे.

मोहनराव's picture

1 Apr 2016 - 1:52 pm | मोहनराव

जर्मनीत टेक्नीकल युनी व सामान्य कॉलेजेस असाही प्रकार आहे. TU मध्ये जे अभ्यासक्रम आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत व तेथे रिसर्च खुप चालतात. TU चे अभ्यासक्रम अवघड व अद्ययावत आहेत. www.tu9.de/en

टुंड्रा's picture

1 Apr 2016 - 1:55 pm | टुंड्रा

हो, जर्मनीत TU (Technical University) and FH (Fachhochschule) असे दोन प्रकार आहेत. पैकी TUला जास्त महत्व आहे. त्यामुळेच प्रवेश मिळणेही अवघड असते.

मोहनराव's picture

1 Apr 2016 - 2:03 pm | मोहनराव

मी सध्या TU Braunschweig मध्ये शिकत आहे

टुंड्रा's picture

1 Apr 2016 - 2:55 pm | टुंड्रा

अरे वा! मी फारच वर वर माहिती लिहीलेली आहे. तुम्ही अजुन भर घाला.

तुम्ही माहिती चांगलीच दिली आहे.
मी पार्ट टाईम शिकत आहे व जॉबही करत आहे. त्यामुळे जरा अवघड जाते आहे. पण प्रयत्न चालु आहेत.

मधुरा देशपांडे's picture

1 Apr 2016 - 2:06 pm | मधुरा देशपांडे

TU (Technical University) सोबतच फक्त युनिव्हर्सिटी देखील आहेत. TU चा अभ्यासक्रम सगळ्यात अवघड, नंतर युनि आणि मग FH असे ढोबळमानाने म्हणता येऊ शकते. शिवाय प्रत्येक कोर्स प्रमाणे हे बदलू शकतंच.

टुंड्रा's picture

1 Apr 2016 - 2:55 pm | टुंड्रा

अगदी बरोबर!

गॅरी ट्रुमन's picture

1 Apr 2016 - 5:51 pm | गॅरी ट्रुमन

छान लेख.

मार्कांपेक्षाही जास्त तुमच्या अनुभवाला महत्व दिले जाते.

हा आपल्याकडच्या आणि प्रगत देशांमधील शिक्षणपध्दतीतला एक महत्वाचा फरक आहे.

अगदी प्रवेश देतानाही स्टेटमेन्ट ऑफ परपज आणि शिफारसपत्रे यांना खूपच महत्व असते.आपल्याला एखादा विषय शिकायचा असेल तर तो विषय नक्की का शिकायचा आहे--त्या विषयात नक्की कशामुळे आवड उत्पन्न झाली, तो विषय शिकून भविष्यात नक्की काय करायचे आहे (किंबहुना भविष्यात जे काही करायचे आहे त्यासाठी या विषयाचा अभ्यास कसा उपयोगी पडेल--म्हणजे अमुकतमुक डिग्री आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला कशी उपयोगी ठरेल) अशा स्वरूपाच्या गोष्टी या स्टेटमेन्ट ऑफ परपजमध्ये असणे अपेक्षित असते. तसेच नुसती आवड किंवा इंटरेस्ट असून उपयोग नाही तर त्या विषयात अधिक कष्ट घ्यायची विद्यार्थ्याची पात्रता आहे यासाठी यापूर्वी शिकविलेल्या शिक्षकांकडून शिफारसपत्रे घेतली जातात.आपल्याकडे मार्कांना सगळ्याच गोष्टीत अतोनात महत्व आहे तशी परिस्थिती विकसित देशांमध्ये नाही. मार्क चांगले असूनही स्टेटमेन्ट ऑफ परपज गंडलेले असेल तरी प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

सुबोध खरे's picture

1 Apr 2016 - 7:07 pm | सुबोध खरे

धन्यवाद
मला हेच हवं होतं. भारतात बहुसंख्य अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक जे "शिकवू शकतील" ते शिकवले जाते, उद्योगाला जे हवे ते किंवा बाजारात जे आवश्यक आहे ते नाही असे एका विख्यात अभियांत्रिकी शिक्षण तज्ञाच्या मुलाखतीत बाचले होते. मुलाला व्यवसायाभिमुख करणारे शिक्षण हवे यासाठी हा प्रश्न होता.

बरेच पर्याय आहेत. नन्तर अनुभव हवा असेल तर अमेरिका उत्तम.

बोका-ए-आझम's picture

1 Apr 2016 - 9:49 am | बोका-ए-आझम

वाखुसाआ.

अत्रन्गि पाउस's picture

1 Apr 2016 - 10:01 am | अत्रन्गि पाउस

अतिशय मुद्देसूद मांडणी ...
वाखुसाआ

साधा मुलगा's picture

1 Apr 2016 - 11:51 am | साधा मुलगा

जर्मनीला जाणार्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त!

अजया's picture

1 Apr 2016 - 12:24 pm | अजया

छान माहिती.

एस's picture

1 Apr 2016 - 1:53 pm | एस

उत्तम माहिती आहे. वाखु साठवतो म्हणजे कुणाला हवी असेल तर हा लेखच फॉरवर्ड करता येईल.

वात्रट's picture

1 Apr 2016 - 3:06 pm | वात्रट

उत्तम माहिती आहे..

मॅक्सम्युलर मधून त्से त्स्वाय केल्यानंतर जर्मनॅटिक्स साठी तिथल्या युनिव्हर्सिटीज मध्ये अ‍ॅडमिशन्स घेता येतं असं एक मित्र मागल्या आठवड्यात म्हणत होता. त्यात किती तथ्य आहे? तथ्य असेल तर युनिव्हर्सिटीज की Fachhochschule काय पर्याय असतो?

सूड's picture

1 Apr 2016 - 7:22 pm | सूड

अ‍ॅडमिशन*

मुक्त विहारि's picture

1 Apr 2016 - 10:00 pm | मुक्त विहारि

फार उपयुक्त माहिती...

अर्धवटराव's picture

2 Apr 2016 - 6:09 am | अर्धवटराव

आपल्याकडे आय. आय. टी. ला प्रवेश मिळावा म्हणुन प्रचंड धडपड सुरु असते. आता तर ८-९ वर्गातल्या मुलांपासुन सुरुवात होते म्हणतात. त्यात मुलांची आवड, एकंदर कुवत वगैरे गोष्टी ध्यानात घेणाचं प्रमाण नगण्यच असणार. प्रतिष्ठा आणि पैसा देणारी मिळवुन देणारी आय.आय.टी. नामक माळ गळ्यात पडावी (खरं तर आपल्या पाल्याच्या गळ्यात पडावी) अशीच मानसीकता त्यामागे असणार.

इतक्या लहान वयापासुन भारतीय शिक्षण पद्धतीने केलेला अभ्यास, पुढे आय.आय.टी (किंवा इतर नावाजलेल्या) कॉलेजमधे शिक्षण आणि त्यातुन आकारलं जाणारं करिअर हि एक बाजु. योग्यवेळी (१०-१२ वर्गात असताना) आवड म्हणुन अभियांत्रीकीची तयारी करुन, आय.आय.टी वगैरे अ‍ॅडमिशन न मिळाल्यास शक्य तितक्या चांगल्या कॉलेजमधे अभ्यास करुन पुढे जर्मन देशी एम.एस. करणे हि दुसरी बाजु.
यापैकी जास्त योग्य काय असावं ? भारतात नामांकीत विद्यापीठातुन पदवी न घेतल्यास विदेशात चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळत नाहि का? आय.आय.टी. करता झोकुन देऊन मेहेनत करणं किंवा विदेशी विद्यापीठातुन डीग्री घेणं यात अ‍ॅव्ह्ररेज मुलांकरता प्रॅक्टीकली काय योग्य असावं?

आणि हो... धागा उत्तमच झाला आहे. आताशी फार वाटतं नोकरीधंद्यातुन एक ब्रेक घेऊन उच्चशिक्षणाला वेळ द्यावा म्हणुन.

टुंड्रा's picture

4 Apr 2016 - 11:26 am | टुंड्रा

माझा ह्या विषयावर काही फार अभ्यास नाही पण तरीही...

आय.आय.टी मध्ये पदवी घेणं (B.Tech) हे साधारण मुलासाठी अजिबात सोप्पं नाही. पण त्यामानाने पदव्युत्तर शिक्षण (M.Tech) घेणे सोपे आहे. GATE चा चांगला स्कोअर असेल तर प्रवेश मिळणे अवघड नाही. पण पुढे जाऊन तिथे अभ्यासक्रम कसा असतो, अद्ययावत असतो का? परदेशांशी तुलना करता कसा असतो? अभ्यासक्रमात प्रत्यक्ष काम करण्याला किती महत्व असते? हे मलाही नक्की माहित नाही. पण आय.आय.टी चे ही जर्मन युनि सोबत टायअप्स आहेत असं ऐकलय.

जर्मनीत शिक्षण घेण्यासाठी मला पदवीनंतर अभियांत्रिकीच्या विषयांचा काही फार अभ्यास करावा लागला नाही. पण वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागल्या. त्यानिमित्ताने एक भाषा शिकले. इंग्रजीचा अभ्यास केला. गणिताचा अभ्यास केला. SOP, LOR इ लिहीण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. दुसर्‍या देशाची खुप माहिती काढावी लागली. त्यांच्या वेबसाईट्स सुद्धा जर्मन भाषेत असल्याने ते समजुन घेताना पुष्कळ त्रास झाला. कागदपत्रे कुरिअर करणे, बँकेच्या खात्याची माहिती काढणे, व्हिजाची तारिख मिळवणे, मुंबईला जाऊन हे सगळं करणे इ भरपुर तयारी करावी लागली. प्रवेश मिळाल्यावरही नव्या देशात नवे लोक जोडावे लागले, इकडुन फोन करताना काही कळायचे नाही की काय बोलत आहेत, पण भारतातुन जाण्याआधी रहाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. आमच्या युनि. ने येण्याच्या १-२ महिने आधी ऑनलाईन काही सेमिनार घेतले. त्यात माझ्या कोर्सचे सर्व लोक होते. तेव्हा माझ्या अनेक देशांमधल्या लोकांशी ओळखी झाल्या. जेव्हा मी जर्मनीला निघाले त्याक्षणी माझी रहाण्याची कोणतीही सोय नव्हती, मी एकटीच जात होते, कुणीही सोबत नव्हतं. एवढं सामान घेऊन मी २ फ्लाईट आणि एक ट्रेन कशी पकडणार हे मला माहित नव्हतं. हिथ्रोला माझा लॅपटॉप / मोबाईल कुठेच वायफाय मिळेना. घरी कसं बोलायचं ते कळेना. तासभर रडत बसले. त्यात तिथे माझ्या बॅगेत मोरावळ्याची बाटली राहिल्याने तिथे सगळी बॅग उचकटुन चेक केली गेली. ती लावत बसले. जर्मनीला पोहचल्यावर सिनिअर घ्यायला आले होते. त्यांनी खुप मदत केली. २ महिने रुम दिली रहायला. अपार्टमेंट शोधत फिरायचो. १० किमी चालावं लागायचं अनेकदा. हॉस्टेल केवळ नियम नीट माहित नसल्याने हातातुन गेलं तर खुप यातायात करुन, २ तास एका मॅडमना भेटायला दाराबाहेर वाट बघुन मिळवलं... हे सगळं करताना स्वतः स्वयंपाक करावा लागायचा. घरची भयानक आठवण यायची. त्यात जन्मात पाहिली नाही अशी थंडी.. अजुनच उदास वाटायचं.. आईला पत्र लिहीलं तर मला ४ दिवस लागले रडत रडत २ पानी पत्र लिहायला...असे किस्से खुप आहेत..

जाताना पाय ओढत गेलेली मी येताना हॉस्टेल खालुन पहाटे ४.४५ ची बस पकडुन एकटी विमानतळावर गेले..विमानतळावर आधीच जाऊन चौकशी करुन आले होते की एकच तास आधी पोहचलं तर चालेल का.. म्युनिकला चार तास असाईनमेंट करत बसले..अगदी छान मुंबईला पोहचले.

ड्रेस कोणता घालु ह्यासाठी माझ्या बहीणीवर अवलंबुन असणारी.. हातात दुधाचा कपही आई आणुन देईल म्हणुन सोफ्यावर लोळणारी.. खर्च करताना पैशाचा फारसा विचार न करणारी मी... आज ठराविक पैशात महिना भागवते, १० किमी चालुन आले तरी स्वयंपाक करुन खाते, भांडे घासते. नोकरी शोधते. मुलाखती देते. मला आता किमान १० वेगवेगळ्या देशातले मित्र मैत्रिणी आहेत. वेगवेगळ्या देशातले, संस्कॄतीमधले लोक कसे वागतात, बोलतात हे मला बघायला मिळतय. शिकायला मिळतय.

मला वाटतं अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञान, नोकरी, पैसा इ कशाही पेक्षा हे जे काही मी शिकले ते फार जास्त महत्वाचं आहे.

तुमचा प्रश्न वेगळाच होता... मी वेगळंच लिहीत बसले. पण परदेशी शिक्षणाचा विचार करताना स्वयंपाक, भांडे घासणे, किराणा आणणे इ अनेक बाबींचाही विचार करावा लागतो. आपण फक्त भारी डिग्री आणि भारी पगार इथवरच विचार करत रहातो. पण ते तितकेसे सोपे नाही.

मला तरी व्यक्तिशः ह्या सर्व कारणांसाठी परदेशी शिक्षण जास्त प्रकारे तुमचे आयुष्य समृद्ध करते असं वाटतं.

तुमचा प्रश्न वेगळाच होता... मी वेगळंच लिहीत बसले. पण परदेशी शिक्षणाचा विचार करताना स्वयंपाक, भांडे घासणे, किराणा आणणे इ अनेक बाबींचाही विचार करावा लागतो. आपण फक्त भारी डिग्री आणि भारी पगार इथवरच विचार करत रहातो. पण ते तितकेसे सोपे नाही.
मला तरी व्यक्तिशः ह्या सर्व कारणांसाठी परदेशी शिक्षण जास्त प्रकारे तुमचे आयुष्य समृद्ध करते असं वाटतं.

हे वेगळं तर नाहीच, पण परदेशात शिक्षण/नोकरी करण्यासाठी हेच सर्वात जास्त महत्वाचं आहे !

हे जमलं तर मग शिक्षण/नोकरी ठीक होऊ शकते... नाही जमलं तर तेथे राहणे तर दुष्कर होतेच पण शिक्षण्/नोकरीतल्या कामगिरीवर वाईट परिणाम होतो व ज्यासाठी आपण तेथे गेलो तो उद्देश असफल होतो.

परदेशात जाणार्‍याला शिक्षण/नोकरीत काय करायचे हे कमी-जास्त प्रमाणात माहीत असतेच... ते करण्यात फक्त स्थानिक पद्धत आत्मसात करणे हीच एक वेगळी गोष्ट असते. त्याविरुद्ध, कामाची जागा आणि शिक्षणसंस्था सोडून इतर सर्व जागा/माणसे/वागण्या-बोलण्याच्या पद्धती मात्र आपल्याला पूर्ण परक्या असतात. त्यांच्याशी जमवून घेऊ शकलो, किंबहुना त्यांचा भाग होऊ शकलो तर ती गोष्ट शिक्षण/काम सुकर होते आणि यश मिळवणे शक्य होते. नवीन परिस्थितीची घरच्या परिस्थितीशी सतत तुलना करत राहून स्वतःचेच जीवन दु:खी (आणि म्हणून अपयशी) बनवणार्‍या मंडळींनी घरीच राहीलेले (त्यांच्यासाठी व इतरांसाठी) बरे.

परदेशात कोणत्याही कारणासाठी जाताना "आता मी स्वयंभू आहे, माझी सर्व कामे कशी करावी / करवून घ्यावी हे माझे मलाच साधायचे आहे. त्यात कोणाची मदत झाली तर तो अनपेक्षित बोनस असेल." अशीच मनाची घट्ट तयारी करून (आणि ते शक्य व्हावे यासाठी निघण्याअगोदर शक्य ती सर्व माहिती मिळवून) मगच घरातून बाहेर पडावे; पण तरीही नवीन जागेत अनेक अनपेक्षित घटनांना तोड द्यायची तयारीही ठेवावी.

परदेशात, आपल्याला भेटणारे आपल्या देशातले/परदेशातले अनेक अनोळखी लोक (कदाचित ते मनानेच उदार असल्याने अथवा ते अश्या एकाकी स्थितीतून अगोदर गेले असल्याने) अपेक्षेपेक्षा जास्त मदत करतात असा स्वानुभव आहे. मात्र, "Hope for the best, but prepare for the worst" या उक्तीवर आधारून राहील्यास स्वतःला मस्त मजेत सांभाळून घेत आपले उद्दिश्ट्य साध्य करता येते. मुख्य म्हणजे या सर्व प्रवासात सोसलेल्या व मात केलेल्या अडचणी भविष्यकाळातील सुखद आठवणी तर बनतातच, पण आपण जगाच्या कोणत्याही कोपार्‍यात यशस्वी होऊ शकतो असा एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातात... जो जन्मभर बर्‍यावाईट काळात साथ देतो.

अस्वस्थामा's picture

4 Apr 2016 - 3:29 pm | अस्वस्थामा

दोन्ही प्रतिसाद अतिशय उत्तम.

टुंड्रा, एमेस करताना तुमच्यासारख्याच अनुभवांतून चार पाच वर्षांपूर्वी गेलोय त्यामुळे लेख वाचताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. keep it up.. :)

मुख्य म्हणजे या सर्व प्रवासात सोसलेल्या व मात केलेल्या अडचणी भविष्यकाळातील सुखद आठवणी तर बनतातच, पण आपण जगाच्या कोणत्याही कोपार्‍यात यशस्वी होऊ शकतो असा एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातात..

+१११

अर्धवटराव's picture

5 Apr 2016 - 12:54 am | अर्धवटराव

माझा प्रश्न वेगळा होता तरिही हे सगळं मनोगत सुद्धा आवष्यकच आहे मॅडम. अनेक धन्यवाद. शेवटी प्रश्न आयुष्य समृद्ध करण्याचाच आहे... त्याचं उत्तर मिळालं :)

यशोधरा's picture

5 Apr 2016 - 7:35 am | यशोधरा

सुरेख लिहिलंय. खूप आवडला प्रतिसाद.

जुइ's picture

2 Apr 2016 - 7:48 am | जुइ

उत्तम माहिती.

आय.आय.टी. करता झोकुन देऊन मेहेनत करणं किंवा विदेशी विद्यापीठातुन डीग्री घेणं यात अ‍ॅव्ह्ररेज मुलांकरता प्रॅक्टीकली काय योग्य असावं?

अ‍ॅव्हरेज मुले आय आयटीला जाण्याच्या स्पर्धेत आपोआपच मागे पडतात. पण प्रयत्न करावाच्,तिथे जाउन त्याच्यावर पैलू पाडले जातात. न मिळाल्यास पुढच्या क्रमाने बर्यापैकी संस्थेत जाऊन अभियांत्रिकी पदवी घेऊन एखादे वर्ष स्वतःच्या शाखेसंबंधी अनुभव घ्यावा. (म्हणजे आय टी कंपनीतला नव्हे!) अशा कंपन्या खूप कमी असतात, त्याचे आधी नियोजन करावे. मग जर्मनी/ अमेरिकेला पदव्युत्तर करायला जावे.हे आपलं माझे वैयक्तिक मत..
मला पदव्युत्तर शिक्षणाची प्रेरणा पहिल्याच नोकरीत जर्मनीत काम करताना मिळाली. त्या लोकांबरोबर दोन तीन वर्षे काम करणे हेही एक क्वालिफिकेशन आहे असं वाटतं. पाच वर्षे काम करून मग गेट वगैरे देऊन पुढे शिकलो. पण थोडं आधी करायला पाहिजे होतं असं वाटलं..!

भाऊंचे भाऊ's picture

2 Apr 2016 - 10:29 am | भाऊंचे भाऊ

वाखुसा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Apr 2016 - 6:24 pm | अनिरुद्ध.वैद्य

अमेरिकन युनिव्हर्सिटीत असतात तसे इथे टीचिंग किंवा रीसर्च सहायक पदे असतात का? किंवा स्कॉलरशिप्स वगैरे?
तिकडचे शिक्षण घेतलेकी पैसा तेवढाच मोजावा लागणार, तर जर्मनीत शिकलेल्या परदेशी मुलांना नोकरी करण्याची अनुमती असते का तिकडे?

टुंड्रा's picture

4 Apr 2016 - 11:30 am | टुंड्रा

१. हो, सहायक पदे असतात. तसा जॉब करता येतो. जर्मन लोकांना जरा प्राधान्य मिळते. पण तुम्ही असा जॉब नक्कीच शोधु शकता.

२. स्कॉलरशिप्स असतात. वर मी लिहील्याप्रमाणे युनि. व्यतिरिक्त DAAD सुद्धा स्कॉलरशिप देते. आमची युनि सुद्धा भरपुर स्कॉलरशिप देते. पण प्रवेशअर्ज करतानाच हा ही अर्ज करावा. नंतरची वाट पाहु नये.

३. जर्मनीमध्ये शिक्षणानंतर १.५ वर्ष तुम्ही स्टुडंट व्हिजावर राहुन जॉब शोधु शकता. अमेरिकेत मला वाटतं फक्त ६ च महिने असं रहाता येतं. (अजुन माहिती अकढावी लागेल. ही ऐकीव माहिती आहे.) पण एकंदरीत जर्मनीच्या पॉलीसीज चांगल्या आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2016 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

विशिष्ट STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग व मॅथेमॅटिक्स) विषयांत युसएमध्ये एम एस करणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या विषयातला अनुभव घेण्यासाठी २९ महिन्यांपर्यंत अमेरिकेत नोकरी करता येते.

F-1 Optional Practical Training

The vast majority of international students in the United States have an F-1 student visa.
The F-1 entitles you to apply for Optional Practical Training (OPT) at the end of your studies. This allows you to stay in the US for up to a year to apply the knowledge you have learned through work related to your major field of study.

If you have a degree from the government's designated list of STEM subjects you will probably be eligible to extend your OPT by another 17 months, meaning you can stay in the US for up to 29 months after graduation.

The extension is designed to give you time to gain a permanent job offer and sponsorship from an US employer, which allows you to apply for the H1-B, a more long-term visa.

Things to Remember
• You must work in your field of study
• You have to complete an OPT application. Talk to your international office for details.
• Apply early. You don’t need to wait for a job offer. You may apply as early a 90 days before your program end date and must apply no later than 60 days after your program end date.
• STEM subject graduates can apply for a 17-month extension once they are within 3 months of the end of their OPT.

STEM विषयांची यादी:

https://www.ice.gov/sites/default/files/documents/Document/2014/stem-lis...

नीट चौकशी करून मगच युनिव्हर्सिटीत दाखल होण्यामुळे हे शक्य होईल. हा २९ महिन्यांचा कालावधी संपण्याच्या बरेच आधी चांगल्या प्रतिच्या उमेदवारास H1B व्हिसा मिळणे शक्य आहे.

टुंड्रा's picture

4 Apr 2016 - 11:39 am | टुंड्रा

अजुन एक राहीलंच..

जर्मनीत ट्युशन फिस नसतेच. मी माझ्या युनि मध्ये फक्त १५ हजार भरले आहेत. सर्व शिक्षण मोफत आहे. काही कोर्सेस पेडसुद्धा आहेत.

पण रहाण्याचा खर्च मात्र बराच आहे. तरीही जॉब न करता आणि कोणत्याही स्कॉलरशिपशिवाय माझा वर्षाचा खर्च सुरवातीला जे ६ लाख भरले होते त्यातुनच आरामात भागेल आणि थोडेसे पैसे राहतीलही. आता मी जॉबही शोधत आहे. तो मिळाल्यास अजुनच बचत होईल. सुट्ट्यांमध्ये मुलं अनेक प्रकारची कामे करतात. जसे की वेटर, हेल्पर. ह्यांना ताशी ६-८ युरि मिळतात. (शहर आणि कामाप्रमाणे रेट बदलेल) ट्रान्सलेशन सारख्या कामांना तर ताशी १५-२५ युरोसुद्धा मिळतात. त्यात कमी काम करुन जास्त पैसे मिळतात.

ह्यामानाने अमेरिकेत एम.एस करणे बरेच जास्त खर्चिक आहे. मी तरी ऐकलेला आकडा पन्नास लाखाच्या घरात आहे.

खेडूत's picture

4 Apr 2016 - 11:52 am | खेडूत

बरोबर.
शिक्षण शुल्क नाही
डाड शिष्यव्रुत्ती चा पर्याय
तांत्रिक शिक्षण इंग्रजीतून
शिक्षण सुरू असताना काम करायला परवानगी
झाल्यावर नोकरीला परवानगी
नव्या पिढीकडून इंग्रजीचा स्वीकार
भारतात येण्या जाण्याचा वेळ आणि पैसा कमी लागतो
वगैरे बरेच फायदे आहेत.
अमेरिकेत किमान पन्नास लाख, शिष्यव्रुत्ती कमी किंवा 'आता नाही' हे परवडत असेल तर तेही वाईट नाही.

पण...
जर्मनीत येणार्या काळात रहाणे कितपत योग्य / सुरक्षित आहे?
नव्या झुंडी आणि निर्माण होणारे नवे प्रश्न यांमुळे तो देश पूर्वीप्रमाणे सुंदर आणि सुरक्षित राहील का?
असे प्रश्न सतावतात.

जर्मनीत येणार्या काळात रहाणे कितपत योग्य / सुरक्षित आहे?
नव्या झुंडी आणि निर्माण होणारे नवे प्रश्न यांमुळे तो देश पूर्वीप्रमाणे सुंदर आणि सुरक्षित राहील का?

खरंय... :(

मधुरा देशपांडे's picture

4 Apr 2016 - 1:12 pm | मधुरा देशपांडे

याशिवाय अजून एक फायदा म्हणजे शिक्षण घेत असताना मिळणार्‍या सवलती बर्‍याच आहेत. उदा. या फी मधूनच युनिव्हर्सिटीकडून स्थानिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं तिकिट मिळतं. थोडक्यात जवळचा येण्या जाण्याचा खर्च कमी होतो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

4 Apr 2016 - 1:41 pm | अनिरुद्ध.वैद्य

काय सांगता? म्हणजे अमेरिकेपेक्षा खुपच स्वस्त. अन नोकरीसाठी स्टुडंट व्हिजावर दीड वर्ष! खुपच दिलदार वाटतंय जर्मनी :)

माहितीसाठी धन्यवाद!

अस्वस्थामा's picture

4 Apr 2016 - 3:30 pm | अस्वस्थामा

खुपच दिलदार वाटतंय जर्मनी :)

हो तर, कुठल्याही सिरियन रेफ्युजींना विचारा सध्या.. ;)

अर्धवटराव's picture

5 Apr 2016 - 1:03 am | अर्धवटराव

हे असं कौतुक भारतातल्या शिक्षणाबद्द्ल कधि ऐकायला मिळणार :(

श्रीरंग_जोशी's picture

5 Apr 2016 - 8:04 am | श्रीरंग_जोशी

मिपावरच्या तुमच्या पहिल्याच लेखात उपयुक्त माहितीने युक्त लेख लिहिला आहे. हा लेख जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार्‍यांसाठी खूपच कामाचा आहे. तुमचे प्रतिसादही वाचनीय आहेत.

माझ्या नोकरीमुळे मी बर्‍याच वर्षांपासून अमेरिकेत राहतोय. परंतु इथे उच्च शिक्षणासाठी येऊन मग नोकरी करणार्‍यांना ज्या सांस्कृतिक गोष्टी अन स्थानिक बोलण्यातले बारकावे पटकन कळतात ते कळायसाठी मला बराच काळ लागला अन अजुनही लागतोय :-) .