पुढच्यास ठेच मागचा शहाणा

उल्का's picture
उल्का in पाककृती
24 Mar 2016 - 3:45 pm

(इथे कोणतीही पाककृती दिलेली नाही. स्वयंपाक करताना आपले काहीना काही चुकते आणि त्यातून आपण शिकत जातो. अशाच माझ्या चुकांविषयी हा लेख आहे. दुसऱ्यांकडून त्या कधीही होऊ नयेत म्हणून लिहिलेला! खास नवशिक्यांसाठी! जाणकारांना मात्र बाराखडी वाटेल यात शंका नाही.)

लहानपणापसून आईच्या मागे मागे करीत स्वयंपाक घरात लुडबुड करणे हा माझा आवडता छंद होता. त्यामुळे मोठी होता होता मी जरा लौकरच स्वत:ला स्वयंपाकात कुशल (गैर)समजू लागले. तर अशी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली मी फजितीला कशी सामोरी गेले त्याचीच ही थोडक्यात हकीकत.

तेव्हा मी २० वर्षांची असेन. एकदा ‘आली लहर’ ह्या धर्तीवर मी पातळ पोह्यांचा चिवडा करायचा ठरवला. दिवाळीचा फराळ करताना मी नेमकी काही ना काही कारणाने (अगदी जाणून बुजून) तो करणे टाळायची. त्यामुळे चिवडा बनवताना कधीच बघितला नव्हता. आत्मविश्वासाला तर हा मोठ्ठा पूर आलेला! आईला सांगितले की मला माहित आहे, मी बनवेन, तू मस्त आराम कर. पाककृतींची पुस्तके पण आईकडे फारशी नव्हती आणि जरी असती तरी त्यादिवशी ती पुरात वाहून गेली असती हे नक्की.

महत्वाची सर्व तयारी केली. पोहे चाळून घेतले. डाळे, शेंगदाणे भाजून घेतले. भरपूर तेलात फोडणी केली. त्यात डाळे, शेंगदाणे घातले. पोहे घातले.
आणि लगेचच आssईss
माझी हाक (की किंचाळी?) ऐकून आई बिचारी धावत आली. तिला वाटले मलाच भाजले की काय? मी ठीक होते. पण पोहे मात्र अगदी रुसले होते. ‘रुसुबाई रुसू आणि तेलात बसू’ झाले होते. पूर्णत: आक्रसले होते.
आईने फक्त एकच प्रश्न विचारला, “पोहे भाजून नाही ना घेतलेस?”

तर अशी ही माझी (अजूनही लक्षात राहिलेली) पहिली फजिती.

तात्पर्य : पोहे आधी मंद विस्तवावर कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्यावेत. अशाने चिवडा अगदी हलका, खुसखुशीत होतो.

लग्न झाल्यावर नवी नवरी म्हणून कौतुकाचे चार दिवस सरल्यावर रोजचीच परीक्षा असे. कारण माझ्या सासूबाई एकदम सुगरण असल्यामुळे पसंतीची पावती मिळणे अतिशय अवघड काम होते. पण मी नापास होत नव्हते हेही नसे थोडके म्हणायचे.

एकदा भाकरी करायचा बेत ठरला. ‘मेरे मनमें लड्डू फुटें।’ कारण मला भाकरी मस्त करता यायची. अगदी पातळ, गोलाकार आणि तीही थापून बर्र का लाटून नव्हे काही. मी, मी करत नाचून झाले. सासूबाईनी पण मनात भांगडा केला असावा. कारण त्यांना फारशी जमत नसे. (हे खरे कारण माझ्या मनात फुटलेल्या लाडवाचे).

लागले तयारीला. परात घेतली. पातेल्यात पाणी घेतले. अगदी एका मनाने पीठ कालवले. भाकरी थापली. तवा तापला तशी भाकरी उचलायला गेले तर तिची चक्क फाळणी झाली. त्या तुकड्यांना असहाय्यपणे गोळा केले आणि परत नव्या जोमाने आणि काळजीपूर्वक भाकरी थापली. उचलायला गेले तर पुन्हा फाळणी. आता मात्र मी रडकुंडीला आले. मनात लाडवांचा कधीचाच चुरा झाला होता. पूर्ण शरणागती पत्करली. अखेरीस सासूबाईनी कुशलतेने सर्व निस्तरले.

आईला माझी फटफजिती सांगितली आणि तिने फक्त इतकेच विचारले, “पाणी गरम घेतले होतेस?”

तर अशी ही माझी (अजूनही लक्षात राहिलेली) दुसरी फजिती.

तात्पर्य : भाकरी करताना पीठ ताजे असेल तर काळजी नाही पण जुने झाले असेल तर ते गरम पाण्याने कालवावे. भाकरीची मोडायची काय बिशाद!

‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ह्या धर्तीवर इतरांना फायदा व्हावा हा प्रांजळ हेतू!

तुमच्याकडूनही जर काही चुका झाल्या असतील तर जरूर सांगा म्हणजे मी पण शिकेन.

– उल्का कडले

प्रतिक्रिया

धाग्याची कल्पना चांगली आहे..

चाणक्य's picture

24 Mar 2016 - 4:07 pm | चाणक्य

असेच म्हणतो.

फर्स्टमॉन्क's picture

24 Mar 2016 - 4:52 pm | फर्स्टमॉन्क

विनोदीरीत्या, खुषखूषीत पद्धतीने लिहिले आहे

उगा काहितरीच's picture

24 Mar 2016 - 6:58 pm | उगा काहितरीच

मस्त खुसखुसीत लेख...पण स्वतःच्या पाककलेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे वरील पदार्थ कधीच करून पाहणार नाही. ;-)

बहुगुणी's picture

24 Mar 2016 - 7:26 pm | बहुगुणी

या धाग्यातून बरंच काही शिकायला मिळेल म्हणून लक्ष ठेवणार.

माझ्याकडेही पाककलेतील भरपूर चुका जमा आहेत, एकीचं वर्णन इथे केलं होतं. त्यावरील प्रतिक्रियांमधून बरंच काही शिकायला मिळालं होतं. आणि हो, छोटा डॉन रावांची ही पाककृतीही हाती लागली होती :-)

बहुगुणी's picture

24 Mar 2016 - 7:31 pm | बहुगुणी

साबुदाण्यावरून ऋषिकेश यांचा हा लेख आठवला (तुम्ही नुकतीच तिकडे प्रतिक्रिया लिहिलेली दिसते आहे).

रुपी's picture

25 Mar 2016 - 12:18 am | रुपी

मस्त! खुसखुशीत लेख!

माझ्या आणि बाकीच्यांच्या नशीबाने आईने माझ्यावर दिवाळीचा चिवडा एकटीने करण्याइतका विश्वास कधीच दाखवला नाही. लग्न झाल्यावर काही महिन्यांतच वर्षभरासाठी फक्त दोघांचा संसार थाटावा लागला तोही साता समुद्रापार - जिथे ना आईचा धाक ना साबांची भीती. त्यामुळे बरेच प्रयोग न घाबरता करता आले ;)

पण तरी एक आठवण आहे अशा फजितीची. एकदा काकूकडे इडली-सांबारचा बेत होता. मी, चुलतबहिणी, काकू आतल्या खोलीत टिव्ही बघत खात होतो. आमचे होत आले तसे काका येतील म्हणून आणखी इडल्या लावायला काकू जाणार तर मोठी चुलतबहीण "मी लावते" म्हणून आनंदाने आणि आत्मविश्वासाने गेली आणि इडल्या लावून पुन्हा टिव्ही पाहयला येऊन बसली. थोड्या वेळाने काही जळल्याचा वास आतल्या खोलीपर्यंत! काकूनेही तिला एकच प्रश्न विचारला, "इडल्या लावताना कुकरमध्ये खाली पाणी नाही घातलंस?" काकांना त्या दिवशी सांबार-पोळी खावी लागली :)

रातराणी's picture

25 Mar 2016 - 12:26 am | रातराणी

+१
मी भात लावताना कुकर मध्ये पाणी घालायला विसरलेले. :)
@उल्का
धागा आवडला. छान लिहिता तुम्ही.

सही रे सई's picture

29 Mar 2016 - 11:09 pm | सही रे सई

खिकक.. मी तर यापुढची कडी केली होती. एकदा मी आणि माझा भाउ दोघच घरात असताना त्याला भूक लागली म्हणून मी तांदूळ धुतले. कुकर मधे पाणी पण टाकल. कुकर लावला. २० मिनिटात भात झाला आहे का ते मोठ्या हौसेन बघायला गेले तर कुकर मधे भाताच भान्डच ठेवायला विसरले होते. तो पर्यंत आई बाबा घरी आले होते आणि सगळे माझ्या वेन्धळेपणावर हसत होते

रेवती's picture

25 Mar 2016 - 12:49 am | रेवती

धाग्याची कल्पना आवडली.
यत्ता नववीत असताना पेप्रात आलेली रुमाली वडीची पाकृ करायला घेतली. ती बरोबर होणार नाही व मी नंतर रडून गोंधळ घालणार हे आईने ओळखल्याने ती आधीच स्वयंपाकघरातून बाहेर जाऊन बसली. त्यातील कृती कशीबशी केली. सर्व मिश्रण रुमालावर थापून नंतर गुंडाळी करत यायचे असे काहीसे आठवते. ते करताना प्रत्येक गुंडाळीबरोबर रुमाल सोडवून फक्त मिश्रणाचा रोल करायचा होता. तो मी रुमालासकट केला. आता कापायचे कसे? शेवटी सगळे पुन्हा उलगडले, पाटवड्यांसारखे थापून शॅलो फ्राय केले व नंतर हा पदार्थ सुधारायचा कसा हेही पहायचे नाही असे ठरवले.
माझे लग्न झाले त्या दरम्यान शेजारी आणखी दोन नव्या सुना आल्या होत्या. सर्वत्र होत असलेली कुकरात पाणी न घालण्याची चूक करून व्हॉल्व बदलायला मी जवळील दुकानात गेले असता तेथील दुरुस्तीवाला, जो माझ्या साबांना ओळखत होता तो आधी डोळे मोठे करून पहात राहिला मग हसायला लागला. कारण माझ्याआधी शेजारीण नव्या सुना अर्धा तासाच्या अंतराने असेच व्हॉल्व बदलायला येऊन गेल्या होत्या. त्याने विचारले की आज तुमच्या बिल्डिंगमध्ये काही स्पेशल आहे का?
अनुमान- रुमाली वडी करताना रोल करताना एकीकेडे रुमाल सोडवून घ्यावा.
कुकरमध्ये अन्न शिजवण्यापूर्वी त्यात पाणी घालावे असे दोन धडे आज आपण शिकलो. ;)

मस्त लिहिलेय. पहिल्यांदाच जेव्हा शिरा करायला घेतला होता, तेव्हा शिर्‍याची खीर बनवून ठेवली होती!

स्पा's picture

26 Mar 2016 - 5:38 pm | स्पा

तुला सॆपाक जमतो?

यशोधरा's picture

28 Mar 2016 - 9:26 pm | यशोधरा

हो, जमतो की.

स्वाती दिनेश's picture

25 Mar 2016 - 1:46 pm | स्वाती दिनेश

धागा आवडला, अनेक प्रयोग आठवून गेले आणि अनेक किस्सेही.. :) त्यातलाच हा एक किस्सा-
एकदा मे महिन्याच्या सुटीत हातात पुस्तक घेऊन लोळत वाचत होते. आईने सांगितले टेबलावर आईसक्रिम साठी डब्यात मिश्रण तयार करून ठेवले आहे. ते जरा गार झाले की फ्रिजर मध्ये टाक. (त्या काळी असं आइसक्रिम वगैरे घरी करत असत. ते खाण्याआधी मिक्सरमधून किंचित चर्न करून काढायला लागे नाहीतर बर्फयुक्त आइसक्रिम होत असे पण ते बर्फयुक्त आंबा आइसक्रिमही भयंकर आवडीने खात असू कारण चर्निंग होईपर्यंत धीर नसे आणि पॉट भाड्याने आणून पॉट आइसक्रिम करायचा एक मोठ्ठा कार्यक्रमही असेच.) तर ती कामाला निघून गेली. मी ह्म्म म्हणून परत पुस्तकात गुंग.. दोन तीन तासांनी मध्येच कधीतरी आठवण झाली.. मग टेबलावरचा डबा फ्रिजर मध्ये टाकला. पण रात्री जेवायच्या वेळी पोळ्यांचा डबा सापडेना.. तेव्हा असा शोध लागला की पोळ्यांचा डबा फ्रिजरमध्ये आणि आइसक्रिम साठीचा डबा तसाच टेबलावर..

इरसाल's picture

25 Mar 2016 - 4:52 pm | इरसाल

खानदेशी प्रत्येकाच्या घरी दोन प्रकारच्या वड्या (भावनगरी शेवेसारखं जाड एक्स्ट्रूजन) एक मठ-मुगाच्या आणी दुसर्‍या बाजरीच्या असतातच असतात.
पैकी माझ्या चुकीमुळे लागलेला एक चवदार शोध.
गावी असताना वड्यांची कोरडी भाजी बनवताना आधी त्यांना भिजत घालावे लागते हे माहित होते पण कुठल्या ते लक्षात नव्हते. एकदा भाजी बनविण्या अगोदर मी मठ-मुगाच्या वड्या १०/१५ मि. भिजत घातल्या म्हटलं १५ मि. बनवु भाजी, बघितले तर काय त्या वड्या पाण्यात विरघळल्या होत्या आणी त्यांचा लगदा झाला होता. म्हटल करायच काय, कांदा बारीक कापुन, लसुण ठेचुन आणी मसाले टाकुन तशीच पाणी आटेपर्यंत कोरडी भाजी बनविली, काय लागली भाताबरोबर पण आणी चपातीबरोबर पण. मग हे काम नंतर नंतर मुद्दामच करायला लागलो.
बाजरीच्या वड्या भिजत घालायच्या असतात, मठ-मुगाच्या नाही ;) . दोन्ही वड्या कोरड्या असताना तळुन सुद्धा यम्मी लागतात.

उगा काहितरीच's picture

25 Mar 2016 - 5:16 pm | उगा काहितरीच

बाजरीच्या वड्या म्हणजेच खारोड्या ना ?

इरसाल's picture

26 Mar 2016 - 1:54 pm | इरसाल

तांदळाच्या त्या खारोड्या...थोड्याश्या खारट असतात.

उल्का's picture

28 Mar 2016 - 2:17 pm | उल्का

सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार!
इतरांच्या गमती जमती वाचून मजा आली.
बहुगुणी, तुम्ही दिलेल्या लिंक्स पण वाचल्या.
मी किती उशिरा मिपाची सदस्य झाले आहे ते जाणवते आणि खंतही वाटते आहे.
खूप वाचायचे आहे अजून आणि हो जमल्यास लिहायचे सुद्धा!

मस्त धागा!किती जिव्हाळ्याचा विषय ;)
शाळेत असताना, आई नसताना पोहे करायला घेतले.ते भिजवतात हे माहितच नव्हते. फोडणी करुन त्यात कच्चे पोहे घालुन काहीतरी कडक पदार्थ बनवला होता.आईने आल्यावर डोक्याला हात मारुन घेतलेला आठवतो !

पैसा's picture

28 Mar 2016 - 9:23 pm | पैसा

मस्त खुसखुशीत! यात मिपावर पडीक राहिल्यामुळे बिघडलेले पदार्थ लिहीत गेले तर बरेच काही लिहावे लागेल! ते पुन्हा कधीतरी.

गौतमी's picture

28 Apr 2016 - 1:25 pm | गौतमी

शाळेत असताना एकदा कांदेपोह्यांचा प्रयत्न केला होता. त्या दिवशी संध्याकाळी खूप भूक लागली होती आणि आई पण घरी नव्हती. काय करू…. काय करू… विचार करून मग शेवटी पोह्यांवर प्रयोग करायचं ठरवलं. सगळ व्यवस्थित केलं. पोहे धुऊन घेतले, फोडणी केली, सगळ छान केल. पण कांदेपोह्यांचा लगदा झाला होता अगदी उप्पीट म्हणव असं काहीतरी. नंतर लक्षात आलं पोहे धुतले कि ते पिळून घ्यायचे असतात आणि मी ते तसेच न पिळता घेतले होते. मग काय माझ्या फजितीचा सुगावा घरातल्यांना लागू नये म्हणून 'सारे सबुत मिटा दिये मैने' ……(आणि मग नंतर कधीतरी आई एकटीच असताना तिला सांगून टाकल… आणि तिने घरातल्या बाकी सगळ्यांना)

उल्का's picture

28 Apr 2016 - 11:22 pm | उल्का

बहुतेक जणींची (मला धरुन) पोह्याने फजिती केलेली दिसतेय. :)