२०१५ नंतर मिपावर माहिती / मदत हवी आहे या विषयावर बरेच धागे आले. गेल्या वर्षभरात (मार्च २०१५ ते फेब्रुवारी २०१६) मिपावर असे किती धागे आले याचा सहजच शोध घेतला. त्याआधीचे धागे विचारात घेतले नाही. त्यातली काही निरीक्षणे खाली देत आहे.
• या कालावधीत एकूण ४४ माहिती / मदत हवी आहे साठी धागे आले. मार्च २०१५ ते डिसेंबर २०१५ - ३७ आणि जानेवारी २०१६ ते फेब्रुवारी २०१६ – ७
• २० पेक्षा जास्त प्रतिसाद असलेले १४ धागे होते. १०-२० प्रतिसाद असलेले १४ धागे होते. १६ धाग्यांवर १० पेक्षा कमी प्रतिसाद आले.
• १० मिपाकरांचा 'माहिती / मदत हवी आहे' हा एकमेव धागा होता.
• १० मिपाकरांचे ५ पेक्षा कमी धागे आले होते. बाकीच्या मिपाकरांचे ५ पेक्षा जास्त धागे आले होते.
• सहलीची माहिती हवी आहे यावर १५ धागे होते. वैद्यकिय मदत यावर ६ धागे होते.
• २५ धागे दोन चार ओळीत आटोपले होते. १९ धाग्यांवर सविस्तर माहिती दिली होती.
आधी असे धागे वाचल्यावर मला नवल वाटायचे, पण आता त्यांची किव येते. जर एखाद्याला काही प्रश्न पडला तर पहिले घरातले सदस्य (आई-बाबा, भाऊ-बहिण, नवरा-बायको) नंतर जवळचे / लांबचे नातेवाईक, शेजारीपाजारी, शाळेतले / कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी, नंतर ऑफिस / बस / ट्रेनमधले मित्र-मैत्रिणी, नंतर कायअप्पा / चेपूवरचे मित्र-मैत्रिणी या सगळयांकडून माहिती मिळवता येते. आंजावर गूगल / बिंग वापरून शोध घेतल्यावर बरीच माहिती मिळते.
तरीही, ज्यांना कधी प्रत्यक्षात बघितले सुध्दा नाही अश्या तिऱ्हाइकांकडून माहिती घेण्यात काय अर्थ आहे? म्हणजे एकतर तो माणूस एकलकोंडा किंवा माणूसघाणा आहे किंवा त्याला आपल्या जवळच्या लोकांवर अजिबात विश्वास नाही आहे. अश्या धाग्यांवर आत्तापर्यंत तुम्ही त्यापध्दल काय माहिती मिळवली आणि तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे हे सविस्तर लिहिले तर प्रतिसाद देणे सोपे जाते.
मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती विचारण्यासाठी सदाहरित धागा असताना आणि सदस्यांसाठी खरडफळयाची सोय असताना ५ -१० प्रतिसादांसाठी प्रत्येक वेळी नविन धागा काढण्याचा अट्टाहास का? 'मदत / माहिती हवी आहे' साठी मिपावर नविन विभाग काढुन दिल्यास किमान त्याचे सगळे धागे एकत्रित वाचता / बघता येतील.
मिपावर आलेल्या मदत / माहिती हवी आहे धाग्यांकडे पाहिल्यावर लवकरच 'प्रेशर कुकर, मिक्सर, वॉशिंग मशिन घ्यायचे आहे - मदत हवी आहे' असे धागे आले तर नवल वाटणार नाही. मिपाची अवस्था बस किंवा रेल्वे स्थानकातल्या चौकशी खिडकी सारखी झाली आहे. कोणीही उठतो आणि 'मदत / माहिती हवी आहे' चा धागा काढतो. हेच का ते दर्जेदार साहित्य देणारे आपले मिपा?
टीप - कोणत्याही सदस्याला / वाचकाला दुखवायचा माझा हेतू नाही. नव-मिपाकरापासुन ते मिपावर जेष्ठ असलेल्या सदस्यांचे धागे असल्याने मी संपुर्ण यादी इथे देत बसलो नाही. मला वाटले ते लिहुन मी मोकळा झालो. आक्षेपार्ह वाटल्यास ठराविक मजकूर अथवा संपूर्ण धागा संपादक मंडळाने अप्रकाशित करावा.
प्रतिक्रिया
15 Mar 2016 - 3:05 pm | अभ्या..
दर्जेदार साहित्य ही कन्सेप्ट जरा कळाली तर बरे होइल भाते साहेब.
मला माहीतीय तुम्हाला माहीती मागणार्यांचा खूप राग आहे पण एवढी तरी माहीती द्या ना प्लीज. ;)
15 Mar 2016 - 3:06 pm | श्रीरंग_जोशी
आशयाशी पूर्णपणे सहमत आहे.
15 Mar 2016 - 3:08 pm | स्पा
भिकार राजकारणी वांझोट्या चर्चे पेक्षा मदत धागे परवडले. २०-२५ प्रतिसादात आटपतात
तरी
15 Mar 2016 - 3:17 pm | तुषार काळभोर
सहमत
16 Mar 2016 - 12:13 pm | नाखु
मदत दिली/मिळाली नाही तर पुन्हा नवीन धाग्यात गळे काढीत नाहीत हे महत्वाचे !
मुदतीतला मदती नाखु
15 Mar 2016 - 3:38 pm | भाऊंचे भाऊ
जो प्रवाह मिपावर हाताशी मिळतो त्याला दूसरा पर्याय नाही..
.. मिपावर अनेक तज्ञ आहेतच आणि इथे जी माहिती भेटते त्यावर साधक बाधक वेरिफिकेशन आपल्या हितचिंतका सोबत प्रत्यक्ष बसून करायलाही विषय व संधि उपलब्ध होते त्यामुळे आपला मिपाकरान्वर सल्याच्या बाबतीत अनावश्यक रोष अनाठायी है
15 Mar 2016 - 3:50 pm | अत्रन्गि पाउस
त्यातली आपुलकी सुद्धा
उदा : डॉक्टर खरे ज्या आत्मीयतेने मदत करतात ते खरोखर स्तुत्य आहे ...
15 Mar 2016 - 3:45 pm | अत्रन्गि पाउस
म्हणजे ???
गुगल बाबा किंवा चेपू वगैरे इथून येणारी माहिती बऱ्याचदा "ज्यांना कधी प्रत्यक्षात बघितले सुध्दा नाही अश्या तिऱ्हाइकांकडून " येत असते ....मग मिपाने काय घोडे मारले ?
दुसरे जरका ओळख उघड नं करता चर्चात्मक माहिती मिळवली तर बिघडले कुठे ?
बाकी आपले आकडेवारीवरचे प्रभुत्व आणि हौस बघून आपण बिझिनेस analytics मधले तद्न्य असावेत असा एक नम्र अंदाज
15 Mar 2016 - 3:56 pm | स्पा
भातेंनी थोडे इनो घ्यावे
15 Mar 2016 - 4:02 pm | प्रचेतस
भातेंशी सहमत.
असे एकोळी दोनोळी धागे पाहिले तर लै चिडचिड होते.
15 Mar 2016 - 4:51 pm | एस
मला वाटलं की कसलं विश्लेषण करण्यासाठी मदत/माहिती हवी आहे. ;-)
15 Mar 2016 - 7:21 pm | शलभ
मलापण..:) म्हणून उघडत नव्हतो धागा.
15 Mar 2016 - 8:05 pm | कंजूस
माझी एक छोटीशी सुचना आहे "माहिती हवी आहे - फ्रिज/टिव्ही /डेबिट कार्ड कोणते घेऊ?" वगैरे असा उल्लेख नावात अगोदरच करा. विनाकरण धागा उघडावा लागणार नाही.
15 Mar 2016 - 8:48 pm | बोका-ए-आझम
असे धागे आले - तंत्रजगत मध्ये - तर काय हरकत आहे? या गोष्टी आयुष्याचा भाग आहेत. In fact, मिपावरचं साहित्य वाचलं नाही तर माणूस जगू शकेल पण ही माहिती एखाद्याला अत्यावश्यक असू शकते. इथे एकांनी - वृद्ध आईकडे लक्ष द्यायला कोणी नाही. काय करावे - असा धागा काढला होता. आणि तिथे काही फार माहितीपूर्ण प्रतिसाद होते. स्वाती दिनेश यांच्या एअर फ्रायरच्या धाग्यामुळे मला दुकानात प्रत्यक्ष तो विकत घ्यायला गेलो तेव्हा व्यवस्थित माहिती मिळाली होती.
याच न्यायाने भटकंती आणि कट्ट्यावरचे धागे पण बंद करा असं मी म्हणेन. लोक कुठेतरी भेटणार, खाणार, खिदळणार - जे त्यात नाहीत त्यांनी ते का बघावं? लोकांची प्रवासवर्णनं आम्ही का वाचावी? For that matter, दुस-याने लिहिलेलं काहीही मी का वाचावं? असं जर मी म्हटलं तर त्याला - मग तुम्ही ते धागे बघू नका असं उत्तर येईल, बरोबर? मग इथेही तेच उत्तर आहे. एकदा संस्थळ म्हटल्यावर असे धागे येणारच. उलट त्यातून माहिती मिळते. प्रचेतसभौंचे लेण्यांवरचे, वीरगळांवरचे लेख माझ्या Archaeology चा अभ्यास करु इच्छिणाऱ्या एका भाचीला मी नेहमी वाचायला देतो. बोलीभाषा विशेषांकामुळे मराठी भाषेचं नवीन वैभव लोकांना समजलं. प्रत्येक लेखातून काहीतरी शिकण्याची वृत्ती ठेवली तर अशी चिडचिड होणार नाही असं वाटतं. बाकी सूज्ञांना अजून काही सांगावं एवढा माझा अधिकारही नाही, वकूब तर त्याहून नाही!
15 Mar 2016 - 9:00 pm | श्रीरंग_जोशी
बोकासाहेब तुमचे मुद्दे पटतात पण संपादक मंडळाने अशा धाग्यांचा अतिरेक होत असल्यानेच सदाहरित धाग्यांचा प्रकार मिपावर सुरु केला.
सार्वजनिक ठिकाणी वावरताना जे शिस्तीचे नियम प्रत्येकाने पाळणे अपेक्षित आहे तसेच काही नियम मिपासारख्या सार्वजनिक संस्थळावर वावरताना प्रत्येक मिपाकराने पाळायला हवेत असे मला वाटते.
15 Mar 2016 - 9:21 pm | बोका-ए-आझम
पण हे असे धागे काढणारे मिपाकर बहुधा नवीन असतात असं निरीक्षण आहे. जर ज्येष्ठ मिपाकर असतील तर मग काहीतरी खास कारण असल्याशिवाय असा धागा मेन बोर्डवर कोणीही काढणार नाही. शिवाय - आपण म्हणतो सदाहरित धागा पण तो किती खाली गेलेला असतो. त्याला FB page वर जी एक pin the post ची सोय असते तशी करुन सतत वरती ठेवायची सोय करायला हवी. शिवाय असे धागे काय काढता अशी टीका आपण तेव्हाच करु शकतो जेव्हा नवीन सदस्याला या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन दिलेलं आहे आणि तरीही त्याने असा धागा काढलेला आहे. आता यावर काहीजण म्हणतील - मिसळपावच्या नियमांमध्ये आहे तसं. वाचायला काय झालं? नवीन सदस्य कुठलं technical product घेत नाहीये की तो manual वाचून वापरायला सुरुवात करेल. त्यामुळे चुका होणारच. जर संस्थळाची वाढ व्हायला हवी असेल तर सर्वसमावेशक धोरण असावं असं मागेच कुठेतरी वाचलं होतं. त्याचा माझ्यामते असाच अर्थ होतो - सांभाळून घेणे.
15 Mar 2016 - 9:25 pm | स्पा
बोकोबा असं कसं बोलवत
फरमासच धागा
16 Mar 2016 - 7:54 pm | मराठी कथालेखक
बोका
आपले मुद्दे बरोबर आहेत. जास्त धागे आल्याने कुणाला काय त्रास होतो हे समजत नाही मला. धाग्यांच्या संख्येमुळे आपला धागा वा आपल्या आवडीचा धागा फार लवकर खाली जातो म्हणून तर चिडचिड होत नसावी ना ?
मला कवितेची आवड नसल्याने मी फार क्वचितच कवितेचा एखादा धागा उघडतो, तद्वत ज्यांना माहितीच्या देवाणघेवाणीत रस नाही त्यांनी त्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे.
सदाहरित धाग्यावर अनेक विषय चालू असतात , नेमके आपल्याच प्रश्नाला उत्तर आलेय की आणखी कशाला ते शोधण्यासाठी धागा उघडायची मेहनत घ्यावी लागते. तसेच काही विषयांत माहिती देण्यास उत्सुक असणार्या मिपाकराला कसं कळणार की त्याच्या आवडीचा प्रश्न आज सदाहरितवर विचारला गेला आहे म्हणून ? उदा मला LCD टीवी बद्दल खूप माहिती आहे आणि कुणीही विचारल्यास मी देण्यास अत्यंत उत्सुक आहे. सदाहरितवर समजा दर चार दिवसानी ८-१० नवीन प्रतिसाद आहेत, पण मला कसे कळणार की त्यात कुणी LCD टीवी बद्दल विचारत आहे ते ? मग रोज इतर विषयातले प्रश्न वा उत्तरे मी का पहात राहीन ?
15 Mar 2016 - 10:03 pm | सायकलस्वार
शीर्षक वाचून लेखकाला कसलंतरी विश्लेषण करण्यासाठी माहिती हवी आहे असं वाटून उघडला, तर विनाकारण आगपाखडीशिवाय काही दिसलं नाही :(
सदाहरित धागे असले तरी ते वर आल्या आल्या दर वेळी उघडून बघणारे किती असतील? त्या धाग्यांची वाचनं पाहिल्यावर सहज कळेल. त्या उलट सेप्रेट धागा काढला की निदान तो काहीशे जणांच्या डोळ्यांसमोरून जातो. शीर्षकातच प्रश्न असल्यामुळे ज्यांना त्या विषयात माहिती/रस आहे अशांनाच तो उघडायची सोय होते. इतरांना धागा उघडून पहावा लागत नाही.
उदा. मला 'ताजिकिस्तानमध्ये बाळंतशेपा कुठे मिळतील' असा प्रश्न पडला असेल तर तुमच्या त्या 'सदाहरित' धाग्यात प्रश्न लिहिला तर किती जण वाचतील आणि त्यातले किती जण मदत करू शकतील? त्यापेक्षा एकोळी धागा काढलेला बरा नाही का? समजा कुणी ताजिकीस्तानस्थित माहितगार मिपाकर असलाच तर त्याला नुसती बोर्डावर नजर टाकल्यावरच तो पटकन दिसेल नाही का?
15 Mar 2016 - 10:09 pm | आदूबाळ
एक नंबर प्रश्न आहे. =)) उत्तर कोणाला माहीत असल्यास नक्की सांगणे.
15 Mar 2016 - 10:25 pm | सायकलस्वार
अवांतर- मी ताजिकिस्तानमध्ये नाही आणि मला नको आहेत :)
उगाच खरडवहीत संदेश यायचे च्यायला!
16 Mar 2016 - 12:16 pm | नाखु
तत्काळ खुलासा करण्याच्या प्रवृत्तीचा आम्ही निशेढ करतो, असहिष्णु कुठचे !!!
15 Mar 2016 - 11:15 pm | यशोधरा
=))
16 Mar 2016 - 7:57 pm | मराठी कथालेखक
अरे वा वा.. माझा एक मुद्दा (सदाहरित धाग्याचा) तुम्ही माझ्या आधीच मांडला होता, पण मी आधी न वाचल्याने द्विरुक्ती झाली.
15 Mar 2016 - 10:57 pm | तर्राट जोकर
सदाहरित धाग्याचा प्रयोग व त्यामागची भावना चांगलीच होती. चांगला प्रतिसादही मिळाला. पण सायकलस्वार व बोका यांनी म्हटल्याप्रमाणे एकाच विषयावर सखोल चर्चा, माहिती अपेक्षित असेल तर एकोळी धागाही चांगला आहे. फक्त विषयात तेव्हढा दम पाहिजे. अन्यथा माथेरान विषयावर दहा धागे निघत असतील तर योग्य नाहीच. नव्या सदस्याला जुन्या धाग्यांची माहिती असेलच असे नाही.
15 Mar 2016 - 11:07 pm | माहितगार
धागा लेखकाने धाग्यांची सांख्यिकी मिळवण्याचा प्रयत्न केला हे कौतुकास्पद आहे. सांंख्यिकीवरुन निष्कर्ष काढण्याची घाईत कदाचित काही बाजू निसटत नाही आहेत ना याची शंका येते.
१
मिपा मेनुबार मध्ये सर्वात वर मदत पान एवजी मदत केंद्र हे नाव देऊन विभाग बनवल्यास नविन प्रथम भेट देणारे लोक त्या विभागा कडे वळून माहिती मागतील हे खरे असले तरी 'ती विशीष्ट मदत' देण्याची क्षमता असलेल्या लोकांपर्यंत कोणत्या विषयाची मदत मागितली जात आहे हे स्पष्ट नसेल तर ते मदत वाला धागा उघडून न पाहण्याची आणि मदत विनंती सुयोग्य व्यक्ति पर्यंत न पोहोचण्याची शक्यता असते. विनंती सुयोग्य वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी धागा शीर्षक सुस्पष्ट हवे. -जसे या धाग्याच्या शीर्षकात "विश्लेषण" हा शब्द नसेल तर लोक "माहिती / मदत हवी आहे" सर्व साधारण धागा म्हणून दुर्लक्ष करतील.
अलिकडे कुणितरी व्यवसाय मार्गदर्शन हवे असा काही तरी धागा काढला मला लगेच प्रतिसाद देणे झाले नाही तरी काही दिवसांनी वेगळ्या धाग्यातून आठवणीने खेळत्या भांडवला बद्दलचा लेख टाकला, याचा अर्थ की मला लगेच प्रतिसाद देणे झाले नाही पण मदत विनंती लक्षात होती आणि मला जेव्हा जमले तेव्हा त्यास उत्तर दिले.
२
माहिती हवी आहे धागा दर्जेदार साहित्याच्या अपेक्षेने कुणि सुद्धा का उघडावा ? माहिती हवी आहे म्हटल्यामुळे दर्जेदार साहित्य लिहिणर्या लेखकाच्या लेखनाचा दर्जा कसा घसरतो ? सरळ सरळ तार्किक ऊणिव आहे. बरे इथे साहित्य संपादक दर्जेदार लेखना बाबत विवीध उपक्रम यशस्वी पणे राबवत आहेत.
वाचक कसे आणि किती टिकवायचे या बद्दलचे धोरण मिपामालकांच्या कक्षेत येते. मदत हवी साठी ५० टक्के वाचक आपल्या सांख्यिकी नुसार मिपावर लिहिते होत असतील तर संस्थळ मार्केटींगच्या दृष्टीने मला यात व्यवसाय संधी दिसते, सुवर्णसंधी न वापरता येणे हि संस्थळ मालकांची मर्यादा आहे. अर्थात ऐसिअक्षरे संस्थळा प्रमाणे मर्यादा घालायच्या असतील तर वाचकही ऐसि अक्षरे एवढेच राहतील.
त्या शिवाय अधिक अटी टाकल्या कि अधिकारांचा संपादकांकडून गैरवापराचे ऐसि अक्षरेवरील अशातले उदाहरण उधृत करतो. इथल्या प्रमाणेच फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणे हा धागा ऐसिवर (दुवा) फेब्रुवारी मध्ये काढला गेला.
त्यावर एका प्रतिसाद लेखिकेने खालील टिका प्रतिसादातून केली
फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणे या विषयावर युरोमेरीकेत बसून भरभरुन लिहिणार्यांचा उपहास करणारा प्रतिसाद त्याच धागा लेखासाठी होता, तो सहन न झालेल्या तिथल्या संपादकांनी तो प्रतिसाद मनातले छोटे मोठे प्रश्न या सदाहरीत धाग्यावर स्थानांतरीत केला !
तिथे जे झाले ते अटी कडक केल्यातर इथेही होण्यास वेळ लागणार नाही, मीसुद्धा व्यनितून आमंत्रण आले म्हणून मिपावरून जाऊन ऐसिवर जाऊन लिहू लागलो पण धागा शीर्षकाच्या स्वातंत्र्यावर मर्यादांमुळेच ऐसि कमी करुन पुन्हा मिपावर वापस आलो.
web 2 हि संकल्पनाच जनसहभागावर आधारीत आहे सर्वसाधरण जनतेचा सहभाग आला तेथे धागा लेखत वर्णन केलेल्या मर्यादा सहाजिक असाव्यात. web 2 च्या संकल्पनेवर काम करायचे आणि जनसहभागावर नियंत्रणे वाढवायची याने संकल्पनेच्या यशाला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यास मिपा व्यवस्थापन सक्षम असेलच
३
धाग्याच्या ओळींच्या संख्येवरुन धाग्याचे महत्व जोखणे हि सरळ सरळ तार्कीक उणीव आहे. 'किचन मॅनेजमेंटवर माहिती हवी' हे चारच शब्द लिहिले तरी आलेल्या प्रतिसादांचे मुल्य आणि मी 'किचन मॅनेजमेंटवर माहिती हवी' ह्या सोबत धागा लेखात दहा प्रश्न विचारले तरीही धागा प्रतिसाद आणि धागा उद्देशाचे मुल्य समानच असते किंवा कसे.
15 Mar 2016 - 11:21 pm | माहितगार
मदत हवी धाग्याची सरासरी आठवड्यातून १ पेक्षा जास्त नाही. मदत हवी धाग्यांची संख्या खूप जास्त असल्याचे कुणास वाटत असल्यास धागा लेखकाने दिलेल्या सांख्यिकी नुसार तथ्य दिसत नाही.
15 Mar 2016 - 11:26 pm | माहितगार
मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते.
मराठी विश्वकोशातील लेखक मे. पुं.रेगे ह्यांच्या मतानुसार 'विरोधकाच्या मतांचे खंडन न करता त्याच्या स्वभावावर किंवा वर्तनावर टीका करण्यात आलेली असते; विशेषतः विरोधकाचे वर्तन त्याने प्रतिपादन केलेल्या मतांविरुद्ध आहे असे दाखवून देण्यात आले असते. उदा., दारूबंदी असावी ह्या मतांवर टीका करताना दारूबंदीचे पुरस्कर्ते स्वतः दारू पीत असतात हे दाखवून देणे.
व्यक्तिगत आरोप व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ("व्यक्तिगत आरोप " अथवा "व्यक्तिगत हल्ला") सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो.
एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.[३]
उदाहरणे
" महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते."
" तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही."
"डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?"
"तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही."
"सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"
संदर्भ सौजन्य मराठी विकिपीडिया
16 Mar 2016 - 12:19 am | साधा मुलगा
नमस्कार,
तुम्ही उल्लेख केलेल्या ४४ धाग्यांपैकी २ धागे माझे होते आणि मी त्या १० मिपाकारांपैकी आहे ज्यांनी ५ पेक्षा कमी धागे काढले आहे.
एक कंदील बनवायचा धागा timepass होता हे मान्य करतो. ऐन दिवाळीत काढल्यामुळे मला लगेच मदतही मिळाली आणि मी त्याप्रमणे कंदील बनवला देखील. त्यातील एका मिपाकाराने हा धागा काढल्यामुळे मी सुद्धा कंदील बनविला म्हणून धन्यवाद दिले आहेत. (http://www.misalpav.com/comment/768000#comment-768000)
माझा दुसरा मदतीचा धागा होता तो फरश्या/लाद्या आणि रंगांसंबंधी, ज्यावर मला काय माहिती हवी आहे हे स्पष्ट लिहिले आहे. त्यावरही तज्ञ मिपाकरांनी अत्यंत सुंदर माहिती आणि मदत केली आहे. त्यामुळे ज्याला पुढे लाद्या घालायच्या आहेत त्यासाठी हा धागा उपयुक्त ठरू शकतो.
इतर धाग्यांविषयी :
त्यातील एक धागा (बहुदा) अजया ताईंचा होता जो packers & movers वर होता. त्यावर लोकांनी चांगली चर्चा करून आपले अनुभव मांडले आहेत. जे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने उपयोगी पडू शकतात. अजून एक धागा बारावी नंतरच्या शिक्षणासंबंधी होता, त्यावरही चांगली चर्चा आणि धीराचे व मोलाचे सल्ले दिलेले आहेत. त्यामुळे काही धागे निश्चितच मिपाकरांच्या उपयोगी पडणारे होते.
माझी भूमिका:
माझी 'मिपा' या संस्थाळशी ओळख हि एक मदत/माहिती हवी असताना झाली. आणि तेव्हापासून मी मिपाचा चाहता आहे आणि सदस्य हि आहे. त्यामुळे मिपा हे नेहमीच माझ्यासाठी माहिती, अनुभव, साहित्य,चर्चा यांचा खजिना आहे. त्या अनुषंगाने मदत,सल्ला असे धागेही येणे हि काही चुकीचे नाही असे वाटते.
तसेच सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही या सदरात क्र. ८ मध्ये स्पष्ट लिहिले आहे कि तुम्ही कुठल्याही विषयावर चर्चा करू शकता. तसेच आधिकारिक धोरणामध्ये पण सांगितले आहे कि एक-दोन ओळींचा धागा उडवण्यात येईल म्हणून. पण जे दोन चार ओळीचे २५ धागे उडविण्यात आले नाहीत म्हणजे त्यात काही तरी वाचण्यालायक होते. म्हणजे ठरवून दिलेल्या नियमाबाहेर काहीही झालेले नाही.
तुमच्या भूमिकेविषयी:
‘आधी असे धागे वाचल्यावर मला नवल वाटायचे, पण आता त्यांची किव येते. जर एखाद्याला काही प्रश्न पडला तर पहिले घरातले सदस्य (आई-बाबा, भाऊ-बहिण, नवरा-बायको) नंतर जवळचे / लांबचे नातेवाईक, शेजारीपाजारी, शाळेतले / कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी, नंतर ऑफिस / बस / ट्रेनमधले मित्र-मैत्रिणी, नंतर कायअप्पा / चेपूवरचे मित्र-मैत्रिणी या सगळयांकडून माहिती मिळवता येते. आंजावर गूगल / बिंग वापरून शोध घेतल्यावर बरीच माहिती मिळते.
तरीही, ज्यांना कधी प्रत्यक्षात बघितले सुध्दा नाही अश्या तिऱ्हाइकांकडून माहिती घेण्यात काय अर्थ आहे? म्हणजे एकतर तो माणूस एकलकोंडा किंवा माणूसघाणा आहे किंवा त्याला आपल्या जवळच्या लोकांवर अजिबात विश्वास नाही आहे.’>>>>>>>
आपल्या ओळखी पैकी कोणाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून मिपावर एक धागा काढला तर लगेच आम्ही एकलकोंडे,माणूसघाणे झालो? हे कोणते विश्लेषण आहे? बर ओळखीच्या लोकांकडून, नेटवर माहिती मिळते म्हणून मिपावर मदत मागायची नाही?
अनेक धागे असे असतात कि ज्यावर मिपाकरांनी स्वतः त्या विषयावर सविस्तर लिहिलेले असते.
उदा. डॉ. खरे यांचे वैद्यकीय लेख, कॅप्टन चे संगणक विषयक धागे , ज्यात अधिक माहिती साठी मिपाकर प्रश्न / मदत विचारतात. मग उद्या म्हणाल हे सुद्धा तिर्हाईत आहेत मग यांचा सल्ला का मानायचा? आणि धागाकर्त्यांना सांगाल कि असली माहिती आम्हाला न देता पहिले घरातले सदस्य (आई-बाबा, भाऊ-बहिण, नवरा-बायको) नंतर जवळचे / लांबचे नातेवाईक, शेजारीपाजारी, शाळेतले / कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी, नंतर ऑफिस / बस / ट्रेनमधले मित्र-मैत्रिणी, नंतर कायअप्पा / चेपूवरचे मित्र-मैत्रिणी या सगळयान्ना द्या उगाच मिपावर आपले ज्ञान दाखवू नका.
मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती विचारण्यासाठी सदाहरित धागा असताना आणि सदस्यांसाठी खरडफळयाची सोय असताना ५ -१० प्रतिसादांसाठी प्रत्येक वेळी नविन धागा काढण्याचा अट्टाहास का?>>>>>
वर उल्लेख केल्याप्रमाणे सदाहरित धागा हा एक चांगल्या उद्देशाने काढलेला धागा होता, पण त्यात अवांतर झाले आणि दुसर्या विषयाकडे वळल्यावर आपल्याला पाहिजे ते उत्तर शोधात बसण्यापेक्षा एक नवीन धागा काढून तो वाचन खुण म्हणून साठवते जास्त सुलभ आहे. खरडफळ्यावर पण असेच होते यापेक्षा एका विषयाची माहिती एका धाग्यात आल्यास बरी पडते.
हेच का ते दर्जेदार साहित्य देणारे आपले मिपा?>>>>>>>>
दर्जेदार साहित्याबरोबर दर्जेदार चर्चा आणि दर्जेदार माहितीची देवाण घेवाणही मिपावर होत असेल तर काय वाईट आहे?
'मदत / माहिती हवी आहे' साठी मिपावर नविन विभाग काढुन दिल्यास किमान त्याचे सगळे धागे एकत्रित वाचता / बघता येतील.>>>>>>>>
हि कल्पना नक्कीच चांगली आणि स्वागतार्ह आहे यासाठी +१.
शेवटी मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान दिल्याने वाढते आणि ते देणार्याने देत जावे आणि ते घेणरयाने घेता घेता देणार्याचे हात घ्यावे.
आपल्याला दुखावण्याचा हेतू नाही, पण बरचसे मुद्दे पटले नाहीत त्यामुळे लिहावेसे वाटले. चूकभूल द्यावी घ्यावी.
16 Mar 2016 - 12:51 am | गामा पैलवान
अवांतर :
सायकलस्वार,
ताजिकिस्तानमध्ये बाळंतशेपा निश्चित मिळतील. कृपया इथे पहा : http://tajikfood.com/
त्या पानावर डिल लीव्ह्ज (dill leaves) असा उल्लेख आहे. म्हणजे डिल सीड्स मिळायला अडचण नसावी. इराणमधून आयात होत असाव्यात. चिंता नको! ;-)
आ.न.,
-गा.पै.
16 Mar 2016 - 1:11 am | आदूबाळ
बाळंतशोपा म्हणजे शेपूच्या बिया होय! अरारारारारा...
16 Mar 2016 - 1:02 am | निनाद मुक्काम प...
गोव्या च्या पर्यतानासंबधी संबधी मी माहितीसाठी धागा काढला होता
त्यावेळी बरीच माहिती मिळाली
जिचा आम्हाला यंदाच्या गोव्याच्या वारीत खूप फायदा झाला त्यातच आमच्या कुटुंबाला
ओ सी आय कार्ड मिळाल्याने आता युरोप ला रामराम करून दरवर्षी गोव्याच्या वारीचे आम्ही वारकरी झालो
आता पुढच्या फेब मध्ये परत येणे आहे
ह्या आधी गोव्यावर माहितीसाठी धागा निघाला होता पण दरवेळी आधी न वाचलेली माहिती मिळते
कोकण ते इतर संबंधी धागे हे माहितीपर धागे भटकंती सदरात टाकले तर काही अंशी ही समस्या सुटू शकते.
16 Mar 2016 - 1:55 am | रेवती
सदाहरित धाग्यात असे प्रश्न विचारावेत याच्याशी सहमत आहे.
भरपूर माहिती असलेले सदस्य मिपावर आहेत. अगदी तजाकिस्तानात बाळंतशेपा मिळेस्तोवर मदत करतील असे! ;)
माझं म्हणणं असय की मदत मागणारे काही आयडीज हे एकदम टुणकन उडी मारून आलेले दिसतात. एरवी म्हणे वाचनमात्र असतात. इतरांच्या कौतुकाचे, मदतीचे धागे आले तर यांचा पत्ता नसतो पण एकदम "आमच्याकडील गळक्या नळाच्या दुरुस्तीला कोणाला बोलावू?" असा धागा येतो. किंवा "मी विणलेला चतकोर रुमाल" असा दोनोळी धागा येऊन त्यात फोटू एकतर दिसत नसतात किंवा दिसत असले तरी यांना कौतुक हवे असते. आपण आधी दुसर्यांना किती मदत करून दमलोय हे विचारावे, किंवा किती धाग्यांमध्ये एकाला तरी वा! छान! म्हटलोय का हे विचारावे मग मदतीची/कौतुकाची अपेक्षा ठेवावी. फक्त मला मदत/कौतुक असे सगळे हवे व दुसर्यांचे करण्याची वेळ आम्ही आणतच नाही अशी अवस्था!
16 Mar 2016 - 1:59 am | यशोधरा
सात्विक संताप आवडला.
16 Mar 2016 - 9:44 am | साधा मुलगा
ताई, आपल्याशी सहमत आहे, जशी मदत मागता तशी ती द्यायची पण तयारी ठेवा , पण वाचनमात्र असलेल्यांनी अथवा ज्यांचे फारसे लेखन न झालेल्या नवमिपाकरांनी मदत मागू नये/ असले धागे काढू नयेत असा सूर का आहे ते कळत नाही.
16 Mar 2016 - 4:05 pm | रेवती
एरवी वाचनमात्र आयडींनी जरूर मदतीचे धागे काढा, प्रतिसादांची अपेक्षा ठेवू नका. जेवढे मिळतील तेवढे ठीक, न मिळाल्यासही ओक्के, कारण आपण कुठं कोणाच्या मदतीला जातो म्हणून दुसर्यांनी धावून धावून मदत करावी?
16 Mar 2016 - 12:17 pm | पिलीयन रायडर
सहमत आहे.
साधा मुलगा.. नव्या सदस्यांनी असे धागे काढुच नयेत असे म्हणणे नाहीये. पण तुम्ही सुद्धा मान्य कराल की इथे नियमित येणार्या, प्रतिसाद देणार्या, किमान आपले अस्तित्व दाखवुन तरी देणार्या आयडीने जर मदतीचा धागा काढला तर त्याचा जास्त राग येत नाही कारण तो अगदीच अनोळखी आयडी वाटत नाही. मग आपलं माणुस असल्याप्रमाणे मदतही केली जाते.
पण मदत मागायला येणारे जर बाकी धाग्यांवर फिरकतही नसतील तर चिडचिड होऊ शकते.
मिपाचा वापर मदत मिळवण्यासाठी जरुर व्हावा... मला त्यात काही वावगे वाटत नाही.
पण मिपाचा वापर "फक्त" मदत (किंवा केवळ लेखनाला प्रतिसाद / ब्लॉगला हिट्स इ इ.) मिळवण्यासाठी होऊ नये इतकीच इच्छा!
16 Mar 2016 - 8:07 pm | मराठी कथालेखक
पिरा आणि रेवतीशी प्रचंड असहमत
जर एखाद्याला कोणत्याही साहित्यात वगैरे रस नसेल किंवा फक्त वाचायला आवडत असेल आणि प्रतिसाद काय द्यावा असा प्रश्न पडत असेल, राजकीय वादविवादात पडायची इच्छा नसेल तर त्या व्यक्तीने मदत मागू नये का ?
ती व्यक्ती मदत मागण्याकरिता फक्त धागा काढत आहे, हवे तर उघडूही नका धागा पण करताय कशाला त्रागा ?
आणि मदत म्हणजे तरि काय फक्त चार-सहा ओळी टंकायच्या आहेत ना ? प्रत्यक्ष जावून मदत तर नाही करायची..
हा.. कुणी आता व्यनी वगैरे पाठवून केवळ मदत मिळावी म्हणून संवाद साधत असेल तर त्याला/तिला ब्लॉक करा.
बाकी मदत करतानाही ओळख हवीच हे जरा विचित्र वाटले ..म्हणजे रस्ते अपघातात वा दुसर्या एखाद्या अडचणीत सापडलेल्या अनोळखी व्यक्तीला मदत करायची नाही तर !!
असो.
16 Mar 2016 - 9:42 am | सतिश गावडे
विश्लेषणाचा धागा आणि आलेख नाही? काब्रे?
16 Mar 2016 - 12:08 pm | प्रमोद देर्देकर
काय माझ्या सोसण्याची एवढी झाली प्रशंसा?
काय माझ्याहून माझा हुंदका खंबीर होता?
इती - सुरेश भट
बाकी चालु द्या.