परीकथा भाग ६ - (फेसबूक स्टेटस पावणेदोन ते दोन वर्षे)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
5 Mar 2016 - 9:45 pm

२१ डिसेंबर २०१५

खाली डोके वर पाय, शीर्षासन करणे..
पाठीच्या कण्याला हाडच नसल्यासारखे शरीराची उलटी कमान करणे..
हाताच्या अंगठ्या ऐवजी पायाचा अंगठा चोखणे..
पटापटा श्वास घेत पोटाची पिशवी आतबाहेर करणे..
आत्ताच ही लक्षणे आहेत, तर मोठी होत पतंजली नूडल्स खायला लागेल तेव्हा तर विचारायलाच नको :)

.
.

२३ डिसेंबर २०१५

प्रत्येक देशाची जशी एक खाद्य संस्कृती असते तशी प्रत्येक मुलाचीही एक असते. एक आमचीही आहे.

अन्न हे फक्त खाण्यासाठी असते आणि ते खाण्यासाठी देवाने एक तोंडच काय ते दिले आहे, या खुळचट कल्पनांवर आमचा जराही विश्वास नाही.
आईसक्रीम आम्हाला नाकानेही खाता येते. केक आमच्या गालालाही छान दिसतो.
सॉसचा वापर बॉडीलोशन म्हणून करता येतो. भाताला हातावर थापत आम्ही भाकर्‍या भाजतो.
क्रिमची बिस्किटे आमचा जीव की प्राण!
फक्त क्रिम खाल्लेले बिस्किट खपवायला एक गिर्हाईक लागतो :)

चमच्याचा वापर खाण्यापेक्षा ढवळण्यासाठी करायला जास्त आवडतो. सर्वांना भात वाढायचे काम आम्हीच करतो.
पडलेले अन्न खायचे नसते एवढी अक्कल आम्हाला आली आहे. पण ते अन्न मुद्दाम पाडून खाण्यातली गंमत आम्हाला कळली आहे.
आवडीचे असल्यास आम्ही एका मिनिटात दहा घास खातो. नाहीतर एकेक घास खाण्यासाठी मम्मीपप्पांचा श्वास काढतो.
थोडक्यात आम्ही नुसते जेवणच नाही तर मम्मीपप्पांचा जीवही खातो :)

पण आम्ही अगदीच काही वाया गेलेलो नाही आहोत.
शेजारच्यांची चपाती मन लाऊन खातो. अगदी घरच्या पराठ्यापेक्षाही आवडीने खातो :)

.
.

५ जानेवारी २०१६

पापा, मम्मी, आजी, भाऊ, दादा, दीदी, मामा, माऊ, ताई, काका, काकी.....
सर्वांना हाक मारायला शिकल्यानंतर आज फयानली आम्ही स्वत:चे नाव "परी" बोलायला सुरुवात केली :)

फॅमिली फर्स्ट यालाच बोलत असावेत :)

.
.

१३ जानेवारी २०१६

बाबड्या बोलायला लागल्यावर त्रास कमी होईल असे वाटले होते. पण ती एकेक शब्दही आम्हाला त्रास द्यायलाच शिकतेय..

आईसक्रीम, बिस्किट, किंवा चॉकलेटसारखा शब्द एकदा का तोंडातून बाहेर निघाला, तर ती वस्तू तिच्या तोंडात जाईपर्यंत तो शब्द निघतच राहतो.
कुठलीही गोष्ट तिला स्वत: करायची असेल तर ‘मा’ किंवा ‘मी’ .. बोल दिया ना! बस्स बोल दिया..मग ते तिलाच करू द्यावे लागते.
‘उभी’ हा एक तिच्या आवडीचा शब्द.
"उभी, उभी" बोलत ती उभी राहिली की मग तुम्ही तिला बसवू शकत नाही. जे काय करायचे ते उभ्यानेच करावे लागते.
‘बाजू बाजू’ म्हटले की तिला रस्ता द्यावाच लागतो,
‘अजून अजून’ म्हटले की तिचे समाधान होईपर्यंत ते करावेच लागते.
सर्वात बेक्कार म्हणजे ‘नाही’ बोलायला शिकलीय.
आणि जे बोलू त्याचा एको निर्माण व्हायलाच पाहिजे या नियमाने आपण दम दिल्यास आपल्याला उलटा दम द्यायला शिकलीय.
थोडक्यात काय, तर आधी फक्त तिला झेलत होतो. आता तिच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द झेलावा लागतोय.

पण या सर्वात ‘ए पापा’ नाहीतर ‘ए पापाय’ बोलत गळ्यात तेवढी गोड पडते, बस्स म्हणूनच आमचे नाते टिकून आहे :)

.
.

३ फेब्रुवारी २०१६

फिंगर बाऊलचा शोध नक्कीच एखाद्या लहान मुलाने लावला असावा..
आणि नसता लागला आजवर, तर आम्ही नक्कीच लावला असता :)

कारण आधी आम्ही भात खातो, मग पप्पांचा ग्लास खेचून त्यातले पाणी पितो. आणि नंतर उरलेल्या पाण्यातच हात बुचकळून फिंगर बाऊल फिंगर बाऊल खेळतो.
खेळ ईथेच संपत नाही. त्याच पाण्याने मग आपले तोंडही धुतले जाते. अंगावरचे बनियान वापरून स्वत:च पुसलेही जाते.
ईथवर सारे ठिक असते. पण पुन्हा तेच पाणी पिण्याचा मोह काही आवरत नाही. आणि नेहमीसारखाच पप्पांचा धपाटा खात, रडत, चिडत, हा खेळही तसाच संपतो :)

.
.

९ फेब्रुवारी २०१६

पप्पा

पप्पाss

ए पप्पाsss

अभीsssssss

संस्कारांची ऐशीतैशी..
पण ऐकायला गोड वाटत असेल तर काय हरकत आहे :)

.
.

१३ फेब्रुवारी २०१६

दोन वर्षे व्हायच्या आतच आम्ही एक ते वीस आकडे मोजायला शिकलो आहोत..
मराठी तर मराठीत, ईंग्लिश तर ईंग्लिशमध्ये..
एबीसीडी देखील तोंडपाठ झाली आहे.
"W" ला देखील आम्ही आता डब्बू न बोलता डबल्यू च बोलू लागलो आहोत.
आता पुढचा मोर्चा कवितांकडे..

एकंदरीत सर्व काही शिकून बालवाडीत आम्ही नुसत्या मस्त्या करायला जाणार आहोत :)

.
.

१९ फेब्रुवारी २०१६

Gems च्या गोळ्या पंचवीस वर्षांपूर्वीही फेव्हरेट होत्या..
Gems च्या गोळ्या आजही फेव्हरेट आहेत..

फक्त आता त्या काऊच्या गोळ्या म्हणून ओळखल्या जातात :)

.
.

२३ फेब्रुवारी २०१६

एवढी वर्षे मुंबईत राहिलो,
पण एक गोष्ट मला परीमुळे समजली..

रिक्षा, टॅक्सी आणि एसी कॅब पेक्षाही,
फास्ट मीटर घोडागाडीचे धावते :)

.
.

२५ फेब्रुवारी २०१६

हल्ली आमचा अभ्यास खूप जोरात चालू आहे.

येता जाता आपल्याच तंद्रीत एबी सीडी, ईएफ जीएच चालू असते.
रस्त्याने चालताना लेवन टॉवेल, थट्टीन फोट्टीन.. पावले मोजतच आम्ही चालतो.
रात्री झोपेतही एच आय जेके, एलेम एनोपी.. तोंडाचा पट्टा चालूच असतो.
पण परवा तर तिने कहर केला, कसल्याश्या कारणावरून माझ्यावर रागावली, चिडली. ओरडायचे होते तिला माझ्यावर. पण नेमके शब्द सापडत नव्हते. तर तेवढ्याच रागाच्या भरात माझ्यावर बोट रोखत म्हणाली.......... चौदा पंधरा सोळा सतरा :P

.
.

२८ फेब्रुवारी २०१६

तुम्हारा नाम क्या है बसंती ..
हा अगदीच निरर्थक प्रश्न नाहीये.
बसंती आपले पुर्ण नाव सुद्धा सांगू शकली असती :)

जसं की "तुझे नाव काय आहे परी"
विचारले की चटकन उत्तर येते..

परी
अभी
नाईक :)

.
.

१ मार्च २०१६

आज आमचा प्लेस्कूलचा पहिला दिवस !

आज पासून पप्पांचे शाळेतील मस्तीचे रेकॉर्ड तुटायला सुरुवात होणार :)

फिलिंग नॉस्टेल्जिक .. ;)

.
.

१ मार्च २०१६
संध्याकाळचे स्टेटस

पोपट झाला !

शाळेचा पहिला दिवस, पहिला खाडा ..
सकाळी आम्ही उठलोच नाही :P

शेवटी मुलगी कोणाची आहे
बापाचा वारसा पुढे चालू :)

- तुमचा अभिषेक

बालकथालेख

प्रतिक्रिया

एस's picture

5 Mar 2016 - 10:44 pm | एस

:-)

प्रमोद देर्देकर's picture

5 Mar 2016 - 10:47 pm | प्रमोद देर्देकर

वा अभ्या या बाकिच्या लेखामध्ये तुझा लेख सुखावुन गेला. मस्तंय परिचं विश्व.

तुमचा अभिषेक's picture

6 Mar 2016 - 11:07 am | तुमचा अभिषेक

:)

उगा काहितरीच's picture

6 Mar 2016 - 11:28 am | उगा काहितरीच

छान छान !

भाते's picture

6 Mar 2016 - 1:33 pm | भाते

मस्त लिहिलंय.

तुमचा अभिषेक's picture

7 Mar 2016 - 8:20 am | तुमचा अभिषेक

प्रतिसादांसाठी धन्यवाद :)

अजया's picture

7 Mar 2016 - 8:25 am | अजया

:)मस्त.
पण
ए पप्पा वगैरे म्हंटलं की संस्क्रुती बुडते हे संस्क्रुती बुडण्याच्या कारणांच्या लिस्टित गेलं.काॅलिंग हेलाकाका.
ह घ्या!

तुमचा अभिषेक's picture

7 Mar 2016 - 9:31 am | तुमचा अभिषेक

नुसते ए पप्पा नाही तर अभी ही आले की.. बापाचे नाव, एकेरी आणि ते देखील शॉर्टमध्ये :)

अजून एक कारण संस्क्रुती बुडण्याचे ;)
संस्क्रुती रक्षकांनो कुठे आहात ?

दहावीत असताना एकदा एक म्याडम अशाच कारणावरून वर्गात रँटत होत्या ते आठवलं. काय तर म्हणे त्यांच्या सोसायटीतील एका बायकोने नवर्‍याला सगळ्यांसमोर अरेतुरे केलं. या आंट्या म्हणजे, असोच. =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Mar 2016 - 9:31 am | कैलासवासी सोन्याबापु

लैच गोड अन जोरदार!!

शित्रेउमेश's picture

7 Mar 2016 - 10:14 am | शित्रेउमेश

शाळेचा पहिला दिवस, पहिला खाडा ..
सकाळी आम्ही उठलोच नाही :P

खरंच भारी एकदम.... ;)

जगप्रवासी's picture

7 Mar 2016 - 2:37 pm | जगप्रवासी

बऱ्याच दिवसांनी परी आली, मजा आली वाचायला.

बाय द वे तुमच्या माझगावच्या गार्डन मध्ये गेलो होतो काल, खुप छान आहे जागा. मस्त वाटलं.

तुमचा अभिषेक's picture

7 Mar 2016 - 10:33 pm | तुमचा अभिषेक

हो मस्त जागा आहे. उंचावर असणे तिची स्पेशालिटी. मी तेथील मॉर्निंग वॉकबद्दल एक साधासाच लेखही लिहिलेला.. डोंगर आणि राणीबाग ही दोन जवळची उद्याने बरी पडतात पोरांना फिरवायला..

मोहनराव's picture

7 Mar 2016 - 3:00 pm | मोहनराव

जाम आवडेश!!
आमची परी (१.४ वर्षे) 'बाय बाय टाटा' हे शब्द पहिल्यांचा शिकली. कारण तिचा छोटा एबीसीडीचा लॅपटॉप बंद केला असता 'बाय बाय' म्हणतो :)
आमची छोकरी: खाताना आईबापाचे हाल हाल करण्याची मज्जा येते. आम्हाला सकाळी सकाळी झाडु घेउन घर लोटायला आवडते. घरभर पसारा करणे आवडते काम! बाबा बाहेर चाल्ला की स्वतःचे बुट मागे घेऊन पळायचे. पाण्यात खेळ्णे रोज पाहिजेच. बदकाला आम्ही क्वॅक क्वॅक नाव ठेवले आहे. कपडे घालताना आईबापाचा जास्तीत जास्त व्यायाम होईल याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष घालतो. अजुन बरेच उद्योगधंदे आहेत पण जाऊदे बाबा तरी किती टाईपत बसणार?

तुमचा अभिषेक's picture

7 Mar 2016 - 10:41 pm | तुमचा अभिषेक

एक बाय बाय लॅपी आमच्याकडेही आहे. पण खरा लॅपटॉप आणि मोबाईलवर रमणारी जनता त्याला कशाला जास्त दाद देतेय..
बाकी घरात पसारा आणि रंगलेल्या भिंती हे खेळकर जिवंतपणाचे लक्षण आहे.. पोरगी झोपली आणि घर शांत झाले की तो पसारा आवरतानाही आज खूप दंगा घातल्याचे समाधान मिळते :)

एक एकटा एकटाच's picture

7 Mar 2016 - 3:57 pm | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलय

परिला खुप खुप शुभेच्छा

नीलमोहर's picture

7 Mar 2016 - 3:59 pm | नीलमोहर

छान !!

रिफ्रेशिंग आहेत परिचे सगळे लेख :) खुप खुप धन्यवाद परिचे बाबा ह्या लेखमालेसाठी :)