सायकल राईड - तापोळा - भाग १

मोदक's picture
मोदक in भटकंती
5 Jan 2016 - 1:56 pm

नववर्षाची सुरूवात शुक्रवारी होत असल्याने मोठ्ठा वीकांत रिकामा होता त्यामुळे वीकांताला कुठे जायचे याचे वेगवेगळे बेत ठरू लागले. कांही महिन्यांपूर्वी अमितने तापोळा सहल केली होती आणि तो रूट एकदा सायकलने करण्याचे सर्वांच्याच मनात होते त्यामुळे तापोळा हे ठिकाण पक्के ठरवले व फोनाफोनी करून बुकींग केले.

मी, किरण आणि अमित या राईडला जाणार हेही नक्की झाले. महाबळेश्वर आणि महाडच्या घाटवाटांच्या राईडनंतर सायकल खूप कमी चालवली होती. सराव नव्हताच आणि एकंदर मोठ्ठा गॅप पडला होता त्यामुळे या राईडच्या एक आठवडा आधी रोज ५० किमी सायकलींग केले.

दरवेळी राईडला राजगिरा वडी, राजगिरा लाडू खाऊन कंटाळा आल्याने निघण्याआधी एक दिवस आम्ही अग्रज फूड्स मधून सीताफळ वडी, तीळवडी, गुलकंद वडी, वेगवेगळे लाडू वगैरे वस्तू जमा केल्या.

३१ ला झोपण्यापूर्वी ठरल्याप्रमाणे सर्वांनी बॅगा व दिवे अडकवून सायकल तयार केली - यामुळे दुसर्‍या दिवशी भरपूर वेळ वाचणार होता.

आमच्या ग्रूपमधील नवीन अ‍ॅडीशन - किरण ने घेतलेली "ऑथर" कंपनीची अप्रतीम सायकल..

.

एक तारखेला सकाळी ६ ला भेटायचे ठरले होते. त्याप्रमाणे सकाळी उठून फोनाफोनी सुरू झाली. तसा थोडा उशीरच झाला होता. वडगांव पुलावर पोहोचलो तर कोणीच आले नव्हते. मात्र ग्रूपवर बर्‍याच वेळापूर्वी किरणचा, "मी घरातून निघालो रे.. असा अपडेट होता" मी सायकल बाजुला घेतली व शेजारीच टेम्पो / ट्रक ड्रायव्हर शेकोटी करून शेकत बसले होते तेथे जावून शेकत बसलो. थोड्या वेळाने अमितचा फोन आला की "तो अजून ५ मिनीटांनी निघेल आणि किरण सध्या कात्रज घाट चढवत आहे" किरणला फोनवून बोगद्यापाशी थांबायला सांगीतले व मीही निघालो.

सकाळच्या थंड हवेत सायकल चालवताना नेहमी मजा येते. आजचा रूट पुणे-महाबळेश्वर-तापोळा असा होता. यातला पुणे-महाबळेश्वर रस्ता अनेकदा पार केल्याने फारसे नवीन असे काहीच नव्हते.
कात्रज घाटापाशी बर्‍यापैकी चढ, नंतर सलग ४० किमी संथपणे उतरणारा रस्ता, थोडासा अवघड खंबाटकी घाट, त्यानंतर आमच्या सर्वांच्याच आवडीचा सुरूर फाटा ते वाई हा रस्ता, दरवेळी परिक्षा बघणारा पसरणी घाट आणि त्यानंतर हिरव्या डोंगरदर्‍यांजवळून जाणारा पाचगणी ते महाबळेश्वर रस्ता. हे सगळे असेच असेल अशी अपेक्षा करत मी कात्रज घाट चढवत होतो.

आमचे कांही मित्र पुणे-पांचगणी-पुणे करणार होते त्यांचाही पत्ता नव्हता.

यथावकाश कात्रज बोगद्यापाशी पोहोचलो.

“.”

अमितची वाट बघत थोडावेळ विश्रांती घेतली, त्याला फोन करून सतवण्यात थोडा वेळ घालवला. दहा पंधरा मिनीटांनी तोही येवून पोहोचला.

आंम्ही लगेचच बोगद्याकडे कूच केले व खेड शिवापूर, टोलनाका, कापूरहोळ वगैरे ठिकाणे वेगात पार केली. अमितला भूक लागल्याने कापूरहोळ नंतर एके ठिकाणी सायकली बाजुला घेतल्या, तेथे थोडा क्लिक्क्लिकाट केला.

.

सवयीच्या रस्त्यावर नेहमीच्या अडचणी येतच होत्या. गाड्या खूप जवळून जाणे, एखाद्या कारने विनाकारण जवळून हॉर्न वाजवत वेगाने जाणे वगैरे वगैरे..

.

खंबाटकी घाटाच्या आधी व्यवस्थीत नाष्टा करण्याचे ठरले होते. तेथे सर्वजण पोहोचलो. नाष्टा केला.

.

.

सकाळपासून ५० किमी अंतर पार केले होते परंतु थोडाही थकवा आला नव्हता, नाष्टा झाल्यानंतर खंबाटकी घाट चढायला सुरूवात केली तोच मागून अमितच्या हाका ऐकू यायला लागल्या. बुलेट गँगमधला मित्र रोहित रानडे कारने महाबळेश्वरला चालला होता तो आम्हाला बघून थांबला. त्याच्याशी गप्पा मारताना त्याने एक सुवार्ता दिली. "अरे खंबाटकी तर जाम आहे, तुम्ही कसे जाणार?" अक्षरशः खंबाटकीच्या पायथ्याला पोहोचून आणि थोडा घाट चढवूनही आम्ही वर पाहिले नव्हते. वरती घाटामध्ये वाहने एका जागी स्थिर दिसत होती आणि घाटमाथ्यापासून आम्ही थांबलो होतो तेथून केवळ दोन किमी अंतरावर वाहनांची रांग लागली होती. "बघू.. काहीतरी करू.." असे म्हणून आम्ही खंबाटकी घाट चढायला सुरूवात केली. खंबाटकी घाटाचे चौपदरीकरण + घाटमाथ्यावर बंद पडलेला ट्रक यांमुळे सगळे ट्रॅफिक जाम झाले होते.

.

मुंगीच्या गतीने पुढे जाणार्‍या अजस्त्र ट्रकच्या जवळून सायकल चालवत, डोंगर फोडलेल्या दगडांच्या रस्त्यांवरून तर कधी गुळगुळीत डांबरी रस्त्यावरून जात खंबाटकी घाट चढवला.

घाटमाथ्यावर पोहोचलो तर पुन्हा रोहित आणि त्याचा एक मित्र अमित सोबत गप्पा मारत बसले होते. थोड्या वेळात किरण आला. खंबाटकी घाटावरून सावधपणे उतरून आंम्ही सुरूर फाट्याकडे कूच केले.

सुरूर फाटा ते वाई हा आवडता रस्ता चालू झाला. येथे एका ठिकाणी थांबून ऊसाचा रस प्यायला व पुन्हा वाईकडे कूच केले.

.

.

वाईला पोहोचलो. नातू फार्म्स मध्ये आमटी-भात-ताक वगैरे खाणे आवरले व पसरणी घाट चढायला सुरूवात केली. दरवेळी कितीही प्रयत्न केला तरी पसरणी घाटाची सुरूवाट टळटळीत उन्हातच होते. पसरणी घाटाचे ठरलेले पॉईंट्स, पाणी संपत येणे, पायात क्रॅंप्स येणे वगैरे गोष्टी यथासांग पार पडल्या व हॅरीसन्स फॉलीला पोहोचलो. येथून पांचगणी मार्केट व महाबळेश्वर असा रूट होता. हा रूटही थोडाफार सावलीतून जातो आणि खंबाटकी व पसरणी घाटांमुळे चढ-उतारांचे काही वाटेनासे होते. त्यामुळे थोडाफार टीपी करत, स्ट्रॉबेरी खात खात महाबळेश्वरी पोहोचलो.

.

महाबळेश्वर शून्य किमी.

.

येथे एके ठिकाणी चहा प्यायला व पुन्हा लगेचच तापोळ्याकडे कूच केले. तापोळ्याला जाताना उताराचा रस्ता आहे इतके माहिती होते परंतु रस्ता कितपत खराब आहे ते माहिती नव्हते.

आता रस्ता आणि निसर्ग तुम्हीच बघून घ्या.. :)

.

.

.

.

.

.

.

तापोळा १० किमी शिल्लक असताना कोयनेच्या बॅकवॉटरने आमचे स्वागत केले..

.

:D

.

तापोळ्याच्या थोडे अलिकडे आंम्ही मुख्य रस्ता सोडला व रिसॉर्टकडे सायकली वळवल्या. अंधार पडत आल्याने सर्वांनी लाईट जोडणी केली.

.

यानंतरचे १० किमी म्हणजे अत्यंत कठीण रस्ता होता. म्हणजे रस्ता लाईटमध्ये दिसेल तितकाच आणि प्रचंड खराब रस्ता होता. त्यात आंम्हाला नक्की किती जायचे आहे हे माहिती नव्हते. कसेबसे चाचपडत किर्र अंधारात आणि थंडीत रिसॉर्टवर पोहोचलो. हे अ‍ॅग्रो टूरिझमचे रिसॉर्ट म्हणजे एक मोठे घर होते आणि त्याच्या अंगणात पुणे-मुंबईहून आलेले टूरिस्ट खुर्च्या टाकून बसले होते. आम्ही सायकलसह तेथे एंट्री घेताच दोन मिनीटे शांतता पसरली. आंम्हीही विचित्र नजरांचा सामना करत बॅगा उतरवल्या. :) (नंतर थोड्यावेळाने सर्वांनी सायकल व एकंदर राईडबद्दल चौकशी सुरू केली)

आंम्ही टेंटमध्ये सामान टाकले, आवरले व तेथे एका बार्बेक्यूजवळ जावून बसलो.

.

नंतर एका शेकोटीजवळ शेकत शेकत जेवण आवरले व रात्री तिथल्या सगळ्या टूरिस्ट सोबत १२ वाजेपर्यंत अंताक्षरी खेळत दिवस संपला

राईडचे स्टॅट्स. (माझ्या सेलफोन बॅटरीने रिसॉर्टच्या ५ / ६ किमी आधी मान टाकली.. हे तोपर्यंतचे आकडे आहेत.)

.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

5 Jan 2016 - 2:09 pm | पिलीयन रायडर

महाबळेश्वर-तापोळा न्यु इयरच्या पहिल्या लाँग वींकेडला... इथपर्यंत बरोब्बर आहे..
पण सायकलने मित्रांसोबत???!!!

(विचारात पडलेली) पिरा

मोदक's picture

5 Jan 2016 - 2:22 pm | मोदक

ह्या ह्या ह्या...!!! :D

पिलीयन रायडर's picture

5 Jan 2016 - 2:27 pm | पिलीयन रायडर

आयला!! मला वाटलं होतं की एव्हाना तुझे दात पाडले गेले असतील.. काढायला शिल्लक आहेत तर!!

नशिब काढलस लेका!!

मोदक's picture

5 Jan 2016 - 2:30 pm | मोदक

थ्यांक्यू हां..!!! :)

जिन्क्स's picture

5 Jan 2016 - 2:35 pm | जिन्क्स

फोटू दिसत नाहित :(

बोका-ए-आझम's picture

5 Jan 2016 - 2:46 pm | बोका-ए-आझम

ती अप्रतिम सायकल बघू की. आॅथर कंपनीची.

बोका-ए-आझम's picture

5 Jan 2016 - 2:46 pm | बोका-ए-आझम

मी ही प्रतिक्रिया टाकली आणि फोटो दिसायला लागले. मस्तच आहे सायकल.

पद्मावति's picture

5 Jan 2016 - 2:59 pm | पद्मावति

सुपर्ब!

स्पा's picture

5 Jan 2016 - 3:02 pm | स्पा

६३ टोप स्पीड , बाब्बो

४५३७ क्यालरीज बर्न

__/\__

प्रसाद गोडबोले's picture

5 Jan 2016 - 3:05 pm | प्रसाद गोडबोले

निव्वळ अप्रतिम ट्रिप मित्रा ! अ‍ॅव्हरेज १७ चे स्पीड , तेही खंबाटकी आणि पसरणीचा घाट करुन म्हणजे भारीच राव !

आमच्या सातार्‍यातील एक ग्रुपही ३१ च्या वीकेन्डला तापोळ्याला जाणार होता सायकलवर पण माझी सायकल पुण्यात होती ह्यावेळेला घरी घेवुन गेलो नव्हतो म्हणून राहुन गेले !

असो . नेक्स्ट टाईम :)

मित्रहो's picture

5 Jan 2016 - 3:08 pm | मित्रहो

नवीन वर्षाची झकास सुरवात

अवांतर
ऑथरची बाइक कशी आहे. इथे हैद्राबादला मी बाइक अफेअर्स च्या दुकानात गेलो असताना त्याने मला ऑथर कॉम्पॅक्ट सुचवली होती. टेस्ट राइड घेतली जाम आवडली. त्याचे पार्टस वगेरे मिळेल की नाही म्हणून लांबणीवर टाकले.

ऑथरची बाईक जबरदस्त आहे.. त्यातही किरणने कमी रूंदीचे पंक्चर रेझिस्टंट टायर टाकले आहेत त्यामुळे झकास पळते. आणि कमी रूंदीचे टायर असूनही रस्त्यावर मजबूत ग्रिप मिळते.

मस्त सायकल आहे. (किंमत अंदाजे ४६ हजार रूपये)

मस्त सायकल आहे. (किंमत अंदाजे ४६ हजार रूपये)

बाब्बौ!

रच्याकने, एक सात-आठ हजारांपर्यंत कुठली एमटीबी येईल का? वजनाने हलकी हवी. अधूनमधून दहा-बारा किमीचे सायकलिंग करायला.

मित्रहो's picture

5 Jan 2016 - 10:43 pm | मित्रहो

हिरो, अटलस, हरक्युलस सायकल चांगल्या. लहाणपणी बहुतेकांनी त्याच वापरल्या. जड असतात. मी फँटमची एक सायकल बघितली तो नऊ हजारापर्यंत द्यायला तयार होता. सेकंड हँड फायरफॉक्स किंवा मॉट्रा सुद्धा मिळू शकेल.
सायकलचे बजेट मानसिक असते. फारच कमी वेळा घेऊ शकनार नाही असे असते जास्त वेळा सायकलसाठी एवढे द्यायचे का हाच विचार जास्त असतो. बाकी मी स्वतः महाग सायकल वापरली नाही त्यामुळे ते चांगलेच असते हे सांगू शकत नाही.

sagarpdy's picture

5 Jan 2016 - 3:09 pm | sagarpdy

लय भारी मोदकशेठ!

मॅक्स स्पीड प्रतितास ६४ किमी? बाबौ!

मॅक्स स्पीड प्रतितास ६४ किमी

अहो.. तो स्पीड उतारावरचा आहे.. कात्रज बोगदा ते शिरवळ दरम्यान कुठेतरी उतारावर या स्पीडने सायकल पळवता येते. ;)

मित्रहो's picture

5 Jan 2016 - 6:46 pm | मित्रहो

मी बघितलेली हायब्रीड बाइक किंमत ३१ हजार

एस's picture

5 Jan 2016 - 4:41 pm | एस

अप्रतिम!

प्रचेतस's picture

5 Jan 2016 - 4:52 pm | प्रचेतस

लै भारी मोदकशेठ.

लॉरी टांगटूंगकर's picture

5 Jan 2016 - 6:27 pm | लॉरी टांगटूंगकर

+१

सस्नेह's picture

5 Jan 2016 - 5:08 pm | सस्नेह

पुणे ते तापोळा एका दिवसात म्हणजे लैच्च !
नवविवाहितांनी सांभाळावे ! :)

लय भारी. सध्या सायकल राईडचा आनंद घेताच येत नाहीये..

दिपक.कुवेत's picture

5 Jan 2016 - 6:51 pm | दिपक.कुवेत

आनंद घेत आहेस का??

दिपक.कुवेत's picture

5 Jan 2016 - 6:52 pm | दिपक.कुवेत

मी फक्त फोटो बघून समाधान मानल्या गेल्या आहे. आपल्यात नाय ब्वॉ एवढे पेशन्स!! तूझ्या चीकाटीला सलाम.

साहस आवडलं.आणि काय लिहिणार.
सायकल 'चालवता' येते का याचं उत्तर हो.

पैसा's picture

5 Jan 2016 - 10:06 pm | पैसा

जबरदस्त!

बाबा योगिराज's picture

5 Jan 2016 - 10:39 pm | बाबा योगिराज

४५३७.३ क्यालऱ्या जळल्या.....

कुणी ईणो देता का ईणो

मार्गी's picture

6 Jan 2016 - 10:23 am | मार्गी

जोरदार!! मस्त! पु. भा. प्र. :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Jan 2016 - 2:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त चाललय! असेच फिरत राहा आणि वर्णने टाकत राहा.

अमृत's picture

6 Jan 2016 - 2:32 pm | अमृत

एकदम खतरनाक राईड असतात तुम्हा भौ तुझ्या!

प्रशांत's picture

6 Jan 2016 - 3:21 pm | प्रशांत

लै भारी
बाकि तुमच्या ग्रूपमधील नवीन अ‍ॅडीशन घेण्यासाठि काय कारावे लागेल?

कवितानागेश's picture

7 Jan 2016 - 12:42 am | कवितानागेश

हे पोरगं काय सुधरत नाय!! :)

इडली डोसा's picture

7 Jan 2016 - 2:33 am | इडली डोसा

बाकी येव्हढ्या कॅलरीज जळाल्यानंतर मोदक हे नाव बदलुन पेढा नाव घ्यायला हरकत नाही ;-)
( कृ.ह. घ्या. )
पुभाप्र.

प्रीत-मोहर's picture

7 Jan 2016 - 11:15 pm | प्रीत-मोहर

__/\__

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद..!! :)

रात्रीचे फोटो टाकले असते तर खूप चांगले झाले असते
उदा अंताक्षरी चे

अंताक्षरीमध्ये बाकीचे लोक सहभागी होते त्यातले बरेचसे लोक अनोळखी होते. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय फोटो कसे काढणार? अंतर्जालावर कसे टाकणार?

..आणि कांही तासांच्या ओळखीवर "तुमचे फोटो काढू का?" किंवा "अंतर्जालावर टाकू का?" असे विचारणे योग्य वाटत नाही.

त्यामुळे निसर्ग + आपले मित्रमंडळ इतकेच फोटो टाकले आहेत.

श्रीधर's picture

25 Jan 2016 - 4:15 pm | श्रीधर

ते पण खर आहे.
वाचून अस वाटल कि मी हि तुमच्या समवेत आहे

Rahul D's picture

25 Jan 2016 - 7:31 pm | Rahul D

वाह मोदकराव....great

शेवटच्या फोटोतले अ‍ॅप कोणते आहे? तुम्ही, मार्गी इत्यादी लोक असे अ‍ॅप वापरून सगळा विदा गोळा करता त्याची कमाल वाटते. हे अ‍ॅप हे सर्व स्टॅट्स कसे काढत असेल! भारी आहे बुवा! :-)

उशीराबद्दल क्षमस्व. थोडे विस्ताराने लिहावे लागेल त्यामुळे वेळ लागत आहे. :(

अमितसांगली's picture

8 Feb 2016 - 9:29 am | अमितसांगली

आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी.....

छायाचित्रे दिसत नाहित :(

खटपट्या's picture

4 Jan 2017 - 6:49 am | खटपट्या

फोटो दीसत नाहीत

प्रान्जल केलकर's picture

4 Jan 2017 - 9:34 am | प्रान्जल केलकर

फोतु खै????

मोदक's picture

4 Jan 2017 - 12:47 pm | मोदक

आज अपडेट करतो. :)