पथ्थ्याच्या पाककृती

Primary tabs

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 6:02 pm

‘पडू आजारी मौज हीच वाटे भारी’ ही कविता लहानपणी अभ्यासाला होती. तेव्हा शाळा बुडवायला आवडत नसले तरी आजारपणाचा आहार ऐकून तरी आजारी पडावे असे वाटे. पण मोठे झाल्यावर आणि त्यातूनही लग्न झाल्यावर कोणाचे आजारपण म्हटलं की, धडकीच भरे. कारण आता कुटुंबियांचा आहार स्वत: सांभाळायची वेळ येत असे. शक्यतो घरातल्या सगळ्यांनीच तेव्हा आजाऱ्याला चालणारे पदार्थ खाल्ले तर काही हरकत नसते. पण कडक पथ्य असलेल्या आजारात असे शक्य मोठेच प्रश्न असतात. अशावेळी सुगरणीची कसोटी लागते. आजारी व्यक्तीची सहनशीलता पुढे येणारे अन्न आनंदाने खाण्यासाठी टिकून रहावी यासाठी तिला नाना प्रयोग करावे लागतात.

मधुमेह, स्थूलता, कोलेस्टोरॉल, हार्टअॅटॅक, पॅरलिसीस, कावीळ, कॅन्सर, क्षय, ताप, सांधेदूखी, पोट बिघडणे, मूतखडा, मूळव्याध, एक न दोन. शिवाय त्यातून उद्भवणाऱ्या शस्त्रक्रिया आणि अगदीच काही नाही तर अपघात असतातच. त्याचे प्रकार आणि वेगळेच. शिवाय बाळंतपण आणि गर्भपात हेही पथ्याचे विषय आहेतच. या सगळ्या आजारात औषध आणि आरामाच्या जोडीला पथ्याचया पोषक आहाराची आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामाची योग्य जोड दिली तर ताकद भरून येऊन आजारपण पाळायला वेळ लागत नाही.

माझ्या घरात आलेल्या आजारपणात केलेले रुग्णाची उमेद टिकवून धरणारे प्रयोगच तुम्हाला सांगते आता. प्रत्येक आजारात सिद्ध केलेले पाणी प्यायला द्यावे.पाणी सिद्ध करण्यासाठी काय करायचे ते सांगते. एका तांब्याच्याच्या भांड्यात पाणी साठवायचे. पण साठवण्याआधी पाच लिटर पाण्यात शुद्ध सोन्याचे वळे १०ग्रॅम्सचे किंवा बांगडी,चांदीचे जोडवे १० ग्रॅम्सचे, किंवा चांदीची वाटी, तांब्याचे फुलपात्र आणि एखादे पितळी वाटी किंवा छोटे पातेले घालून २० मिनिटे झाकण ठेऊन उकळावे. नंतर हे पाणी गाळून वापरावे. हे नेहमी करायलाही हरकत नाही. पाण्यात घालायचे धातू इतर कशाला वापरू नयेत. संध्याकाळपर्यंत हे पाणी संपवावे. चार माणसांच्या कुटुंबाला हे पाणी संध्याकाळपर्यंत पुरते.संध्याकाळी दुसरे पातेले गॅसवर चढवावे.

माझ्या नवऱ्याच्या कुटुंबात वंशंपरंपरेने चालत आलेला आजार म्हणजे कोलेस्टेरॉल. सगळ्यांची पातळी उच्च. त्याच्याशी कायम झगडावे लागते. त्यांच्यासाठी कायम असे उकळलेले पाणी वापरते. सगळयांच्या आहारात दररोज वाटीभर तरी डाळिंबाचे दाणे येतील असे पाहते. हल्ली जवळजवळ वर्षभर डाळिंबे मिळतातच. नाहीतर जेव्हा भरपूर असतात तेव्हा दाणे काढून छोट्या पिशव्यांमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवले की काही अडचण येत नाही. प्रत्येक तीन महिन्यांनी रक्तचाचणी करून घ्यायची, पातळी वाढलेली असेल तर दाण्याचे प्रमाण दोन वाट्या करायचे.

बाकी सगळी फळे ऋतुमानानुसार वापरते.

.

.

नाश्त्याला कॉर्नफ्लेक्स, ओट्स पॉरिज, भाज्या घालून उपमा, दलिया, नाचणीचे डोसे, आंबोळ्या, पोहे, मूगडाळीची भाज्या घालून खिचडी, असे पिष्टमय पदार्थ करते. पालेभाज्या घालून थालीपीठे, पराठे करते. दुधीची भाजी घालून वाफवलेले मुटकेही वरून अर्धा चमचा तेलाची फोडणी करून वापरते. बाजरी, गहू यांना मोड काढून, त्यांच्या कांदा घालून, उसळीही पोटभरीच्या आणि ताकद टिकवणाऱ्या असल्याने त्याही आवर्जून करते.

दररोजच्या जेवणामध्ये कोशिंबिरी, रायती यांचे प्रमाण भरपूर ठेवते.तेलातूपाचे प्रमाण अगदीच कमी. तेलही बदलून वापरते. तीळ, शेंगदाणे, करडई यांचे घाण्यावरचे तेल वापरते. चपातीऐवजी भाकरी करते, नाचणी किंवा मिश्र पिठाच्या. नाचणीला मोड काढून वाळवायचे, मग थोडी गरम करून गार झाल्यावर दळून घ्यायची. नाचणी थंडीच्या दिवसात नाही वापरत, तेव्हा बाजरी, ज्वारी. त्यातही सोयाबीनचे पीठ घालून. एका किलोला १०० ग्रॅम सोयाबीन वापरते. पडवळ, दोडके दुधीभोपळा, लाल भोपळा, अळंबी, कच्ची पपई, कच्ची केळी, सुरण, घोसाळी, शेवग्याच्या शेंगा, कोबी, या फळभाज्या. शिवाय, पोक चॉय, अॅप्सगॅरस, सेलेरी, ब्रोकोली या परदेशी भाज्या आणि सर्व प्रकारच्या पालेभाज्या. चंदनबटवा, चाकवत, मेथी, अळू, अंबाडी, आंबट चुका, घोळ, मायाळू, चवळी, माठ, करडई, पालक, शेवगा, कांदापात, शेपू, मुळा. याशिवाय बीट, नवलकोल, हरभरा, गाजर यांचा पालाही भाजीसारखा व सूपमध्ये वापरते. अगस्ती, केळफूल, भोपळ्याची फुले, कांचनाची फुले, शेवगा या फुलभाज्याही वापरते.

.

मूग, मटकी, कुळीथ, मसूर, कडवे वाल, चवळी ( लाल आणि सफेद दोन्ही ) शिवाय मुग, तूर, चणा, वाल मसूर, मटकी. वेगवेगळया डाळी, शिवाय लोणी. साय काढलेल्या दुधाचे सकाळी दही लावून त्याचं ताजं ताक दररोज दुपारच्या जेवणात द्याचे. दुपारच्या जेवणात पालेभाजी घालून वरण, आमटी, कोशिम्बीर अथवा रायते, भात थोडया प्रमाणात, चपाती किंवा भाकरी आणि रात्री पालेभाजी आणि भाकरी-चटणी. शिवाय आम्ही मासे, चिकन खातो. अर्थातच चिकन गावठी आणि अंडीही गावठीच वापरतो. अंड्याचे फक्त पांढरे वापरते. मासेही शक्यतो भाजून आणि विना खोबऱ्याचे. पालक ग्रेव्हीत पापलेट, कोलंबी, रावस, घोळ इ.इ.साधारण कृती सांगते.

एक-दोन वाट्या प्युरी होईल इतका पालक ६/८ हिरव्या मिरच्या घालून एका उकळी काढून घेते, एक कांदा, एक टोमॅटो बारीक कापून तेलावर दोन/तीन लसुणपाकळ्या सोलून, ठेचून, फोडणीवर घालते. त्यावर कांदा परतून घेते, आता त्यावर टोमॅटो परतून घेते. एक चहाचा चमचा आले लसूण, कोथिंबीर, मिरचीचे वाटण घालते. या वाटणाचे प्रमाण – वाटीभर लसूण सोलून; अर्धी वाटी आले सोलून चकत्या करून; कोथिंबीर दीड ते दोन वाट्या, आणि दोन हिरव्या मिरच्या. सगळे एकत्र करून पाणी न घालता मिक्सरमधून दळून घ्यायचे. आठवडाभरासाठी इतके वाटण पुरे असते न् फ्रीजमध्ये टिकतेही. आले लसणाचा कच्चा वास गेला की, त्यात आकारमानानुसार माशाचे ४ ते ६ तुकडे किंवा वाटीभर कोलंबी टाकून हलक्या हाताने परतून त्यात पालक प्युरी, लागेल तसे गरम पाणी, मीठ घालून उकळून घेते.

२. कोलंबीची मॉली.(मिपावर दिलेली पाककृती)

.

३. हिरव्या मसाल्यात तळलेली कोलंबी. (मिपावर दिलेली पाककृती)

.

४. फिश टिक्का:-सुरमई,रावस, घोळ किंवा पापलेटचे तुकडे धुऊन, निथळून घेते.अर्धी वाटी दही कपाड्यावर किंवा बारीक गाळणीवर घालून निथळून घेते,त्यात एक चहाचा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ,एक चहाचा चमचा मिरचीपूड, अर्धा चहाचा चमचा काश्मिरी मिरचीपूड, एक चहाचा चमचा धणेपूड,पाव चहाचा चमचा जिरेपूड घालून फेटते. आकारमानानुसार माशाचे ४ ते ६ तुकडे त्यात घालून दोन तास मॅरीनेट करते. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १० मिनिटे २०० डिग्रीवर भाजते.

.

५. कोलंबी टिक्का:-वरच्यासारखाच करते.

.

६. चिकन टिक्का(प्रकार एक):-फिशटिक्क्याप्रमाणेच करते. पण एकदा परतवून आणि दहा मिनिटे भाजते.

.

७. . हिरव्या मसाल्यात तळलेली चिकन:- अनुक्रमांक तीन मध्ये दिल्याप्रमाणेच करते, पण कोलंबी ऐवजी चिकनचे तुकडे वापरते.

.

लोणचे फक्त ओल्या हळदीचे. रोजच्यासाठीची कृती आणि प्रमाण असे,:- ओली हळद धुऊन,कोरडी करुन, किसून घ्यायची. वाटीभर झाली तर तितकेच आलेही धुऊन ,कोरडे करून, किसून घ्यायचे,तितक्याच किंवा हव्या तेवढ्या आपापल्या चवीनुसार कमी जास्त हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या.हे सर्व एकत्र करून त्यात अर्धी वाटी किंवा चवीनुसार मीठ घालायचे, मीठ घालून सगळे एकत्र करून एका मोठ्या काचेच्या बाटलीत भरावे.अर्ध्यापेक्षा थोडेसेच जास्त भरावे. आता हे सर्व पूर्ण बुडेपर्यंत लिंबाचा रस घालावा.दुसऱ्या दिवशी चव पाहून हवे असल्यासच मीठ घालावे.लोणचे खायला तयार आहे.

चटण्या पुढील प्रमाणे वापरते.

१. पुदिना चटणीसाठी वाटीभर पुदिनापाने, अर्धी वाटीचिरलेला कांदा, ३/४ हिरव्या मिरच्या. १०/१२ लसूणपाकळ्या, एक चहाचा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून बारीक वाटून घ्यायची. कधी चवबदल म्हणून दह्यात कालवून देते. दही कसे वापरते ते वर दिलेच आहे.

.

२. कोथिंबीर चटणीसाठी वाटीभर कोथिंबीर घेऊन, एक चहाचा चमचा लिंबाचा रस, ३ हिरव्या मिरच्या, लसूणपाकळ्या १०,१२ चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून बारीक वाटून घ्यायची. कधी चवबदल म्हणून दह्यात कालवून देते. दही कसे वापरते ते वर दिलेच आहे. पण थोडे पाणी निथळून घ्यायचे.

.

३. गाजराची चटणीही करू शकता. वाटीभर गाजराचा कीस घेउन त्यात ३/४ लाल मिरच्या किंवा लाल तिखट वापरून,२०/२५ लसूणपाकाल्याली थोड्या तव्यावर गरम करून घालायच्या. अगदी छोटा दालचिनी तुकडाही तव्यावर गरम करून घायचा आणि एक चहाचा चमचा लिंबाचा रस घालून अगदी गुळगुळीत वाटायची. जाडसर ठेवली तरी छानच लागते.

.

४. याशिवाय जवसाची नेहमीची चटणी.

५ कांदापातीच्या चटणीसाठी वाटीभर कांदापात धुऊन, चिरूनत्यात २ मिरच्या, चवीनुसार मीठ व साखर आणि एक चहाचा चमचा लिंबाचा रस घालून आयत्या वेळी वाटायची. लगेच संपवायची.

.

६. कढीपत्त्याची चटणी करताना एक वाटीभर कढीपत्त्याची पाने धुऊन वळवून पुसत तेलाचा हात लावून एक मिनिट मायक्रोवेव्हमध्ये ठेवावीत. त्यात अर्धी वाटी पंढरपुरी डाळे, पाव चहाचा चमचा हिंग, आणि आवडीनुसार तिखट आणि मीठ घालून वाटावी.

.

पहा, दिवसाला एक केली तरी आठवडा आरामात जातो.

आता कोशिंबिरी आणि रायती पाहू.

१. मेथीची पचडी करताना एक वाटी समुद्रमेथी चिरून थोडावेळ पाण्यात ठेवते.त्याची रेती खाली बसली कि अलगद वरची भाजी काढून तीन पाण्यातून धुवून घ्याची आता चाळणीत ठेवून वाहत्या पाण्याखाली धरायची.आता कपड्यावर पसरून सुकली,की एक छोटी काकडी, एक कांदा,एक टोमॅटो,दोन हिरव्या मिरच्या,थोडी कोथिंबीर असे बारीक चिरून घ्यायचे. चवीनुसार मीठ,साखर,लिम्बुरस घालून कालवून वाढते.चवबदलासाठी कधी दही वापरते.

२. अशीच कोबीची करायची,त्यात सॅलडची/पालकची पाने चिरून घालते.प्रमाणासाठी काही नियम नाही.जी भाजी जास्त असेल ती जास्त घेतली तरी चालते.मीठ,साखर अर्थातच चवीनुसार.

.

३. टोमॅटोची कोशिंबीर नेहमीच्या पद्धतीने पण दाण्याचे कूट,खोबरे वगळून.दोन चमचे चणाडाळ भिजवून जाडसर दळून वापरावी त्याऐवजी.यातही दही वापरून चव बदल होतो.

४. काकडीचीही तशीच.

५. गाजर किंवा कोबी वेगवेगळे किंवा एकत्र वाफवून त्यात चवीप्रमाणे, तिखट,मीठ,साखर घालून कच्चा कांदा घालून किंवा वगळून,दही घालून किंवा वगळून वापरते.

६. बीट वाफवून नुसत्या फोडी करून वाढते. अगर किसून किंवा बारीक चौकोनी चिरून त्यात दही घालून चवीप्रमाणे, तिखट, मीठ, साखर घालून कच्चा कांदा, कोथिबीर घालून वरून अर्धा चमचा तेलाची फोडणी घालून वापरते.

.

७. कोणतीही फळभाजी अशाप्रकारे कच्ची किंवा वाफवून वापरते.

भाज्या आणि कडधान्ये वर दिलेल्या सगळ्या, अर्धा चमचा तेलाच्या फोडणीवर कांदा घालून किंवा वगळूनही घालते. कांदा परतताना त्यावर पाण्याचा शिपका देऊन शिजवून मग भाज्या घालून चवीनुसार हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ, साखर गोडा मसाला घालून शिजवते. पालेभाज्या शक्यते पातळच डाळी घालून किंवा ताकातल्या करते म्हणजे थोडे तेल पुरते. अर्धा चमचा तेलात लसूण ठेचून, फोडणी करून, वर घालते.

वर दिलेला सर्व आहार हार्ट अॅटक आलेल्या आणि हार्ट अॅटकमुळे बायपास करावी लागलेल्या व्यक्तीसाठी आदर्श आहार असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांकडून मिळवले आहे.

मला स्वत:ला मधुमेह असल्याने मीही वरील आहार घेते पण साखर वगळून. भाज्या घालून किंवा कोलंबी घालून कधी मक्याचा तर कधी गव्हाचा दलिया बनवते आणि पाच मैल चालते.

स्थूलतेसाठीही वरील आहार घेऊन योग्य तो व्यायाम केला तर वर्षभरात आश्चर्यजनक निकाल पाहायला मिळतो.

पॅरालिसीससाठीही वरील आहार उत्तम. या रुणांच्या आहात उडदाची डाळ, कुळथाचे कढण, कुळथाची मोड काढून उसळ, कुळथाची पिठी जास्त ठेवावी. लसूणही जास्त प्रमाणात वापरावा.

काविळीसाठीही वरील प्रकारचा आहार चांगला गुण देतो. मात्र त्यासाठी तेलातुपाचा उपयोग शून्य मात्रेत करायचा. नॉनस्टिक पॅन वापरते. पालक, मूग, मूगडाळ यांचा वापर जास्त करायचा. वेगवेगळी सूप्स भरपूर द्यायची. पडवळ,दु धी लालभोपळा अशा भाज्या आहारात ठेवायच्या. नॉनव्हेजज शक्यतो बंदच करावे. सहा महिने पथ्य व्यवस्थित पाळावे लागते.

कॅन्सरसाठी रुग्णाला इतर काही आजार नसले तर नेहमीचा आहार घेता येतो. पण केमोथेरपीनंतर मात्र आहार शरीरातली उष्णता कमी करणारा असावा लागतो. दूध, दही, ताक याचे प्रमाण वाढवावे लागते, सफेद कांदेही रोज तीन/चार पोटात जाऊ द्यावे. वाळ्याचे सरबत, पुदिना, कोथिंबीरीचा एकत्रित रस अशावेळी आराम देतो. समाप्रमाणात दोन्ही पाने घेऊन त्यात थोडी तुळशीची पाने घालावीत.

चावळी, माठ, पालक अशा पालेभाज्या आणि दुधी,पडवळ, शेवग्याच्या शेंगा, अॅस्पॅरॅगस मश्रुम, ब्रोकोली या प्रकारच्या भाज्या, मुगडाळ भरपूर वापरावी. उडदाची डाळ प्रमाणात वापरावी. पोटात आग होणे थांबले की, कमी झालेले वजन भरून काढण्यासाठी वेगवेगळी सूप्स आणि खिरी द्यायच्या, हे रुग्ण एकावेळी जास्त खाऊ शकत नाहीत, त्याच्यासाठी थोडे थोडे दिवसातून सहासात वेळा द्यायचे. आता सूप्स कशी करायची ते पाहू.

कोणतीही भाजी मग ती पालेभाजी असो ,फळभाजी असो कि मोडाची कडधान्ये असोत. वाटीभर घेऊन, धुऊन निथळून घेते.यात मिश्र सूपही बनवते. अर्धा चहाचा चमचा साजूक तुपावर एक तमालपत्र टाकून थोडा कांदा परतून त्यवर भाजी टाकून परतून घ्एते. दोन वाट्या गरम पाणी घालून झाकणी ठेऊन शिजवून घेते. नंतर थोडे गार झाल्यावत मिक्सरमधून दळून घेते. पुन्हा एकच उकळी देऊन ताजी मिरपूड, मीठ, साखर घालून प्यायला देते. माझ्या मैत्रिणींनो, त्यातलंच वाटीभर तुम्हीही प्या, कारण रुग्णाची काळजी घेणाऱ्याला जास्त ताकदीची गरज असते. रुग्णाकडे लक्ष ठेवताना स्वत:ही धडधाकट आणि ताजेतवाने असणे गरजेचे आहे, रुग्णाच्या वेळा सांभाळताना आपल्या वेळाही शक्यतो चुकू द्यायच्या नाहीत, हे एक पथ्य तुम्हीही पाळले पाहिजे.

.

१.दुधीभोपळा; २. लाल भोपळा. ३.मश्रूम; ४.बटाटा; ५. अॅस्पागॅरस; ६.ब्रोकोली; ७.मटार ८. गाजर; ९.कोबी;१०. पालक याप्रकारे कोणत्याही भाजीचे सूप करते. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला ताण देऊन त्यात अजून प्रकार करू शकता.

सर्दीच्या बाबतीत असे म्हटले जाते ,कि ती औषध घेतले तर सात दिवसात जाते आणि न घेतले तर आठवड्यात जाते. पण सर्दीच्या दिवसात तुळशीचा काढा सर्वात छान.चार/पाच. मिरे, गवती चहाच्या दोन पाती तुकडे करून, थोडे आले आणि ज्येष्ठीमधाचा तुकडा ठेचून, एखादी लवंग, तुळशीच्या दहा/बारा पानासोबत दोन कप पाण्यात उकळते. पाणी अर्धे झाले की त्यात चमचाभर मध किंवा पत्री खडीसाखर घालून अर्धा कप सकाळी आणि अर्धा संध्याकाळी गरमागरम प्यायला देते.

.

सर्दीतही सूप्सचा चांगला उपयोग होतो. पण विशेषता: काबुली चण्याचे सूप यावर अप्रतिम आहे. ते मी करते. चणे भिजवून कुकरमध्ये एक वाटी चण्याला सहा वाट्या पाणी घालते. चाचाभर मिरे, सहा लवंग आणि तमालपत्र घालून मंदाग्नीवर तीन तास शिजवते.रात्री झोपताना नुसते वरचे वाटीभर पाणी चवीपुरते मीठ. घालून गरमागरम प्यायला देऊन पांघरूण घेऊन रुग्णाला झोपवते.दुसऱ्या दिवशी फरक दिसतोच. माझी आई आम्ही भावंडे लहान असताना थंडीच्या दिवसात त्रास होऊन नये म्हणून दररोज रात्री हे सूप देऊन झोपवत असे. दात घासून अंथरुणावर पडताना हे द्यायचे त्यानंतर चूळ भरायची नाही.

खोकल्यासाठी वरील सर्व आहार उपयोगी पडतोच, फक्त मधुमेह असेल तर साखर वगळते. चण्याचे सूप इतर सुपासह द्यावे, तुळशीचा काढा देते. दिवसातून दोन/तीन वेळा काळे चणे मूठभर देते. ज्येष्ठीमध व आले यांचा छोटा तुकडा मधून मधून चघळायला देते. त्याने खोकल्याला आराम पडतोच.तळलेले पदार्थ वर्ज्य करते.

सांधेदुखीसाठी चपात्यांचे पीठ मळताना त्यात एरंडीचे तेल आणि कढीपत्ताही चिरून घालते. बाकी सगळे वरच्यासारखे. आंबटपणासाठी चिंच न वापरता कोकमच वापरते. या लोकांच्या जेवणात कढीपत्ता भरपूर ठेवते. कढीपत्त्याची चटणी नेहमीच पानात वाढते. भाजी आमटीतही कोथिंबिरीसारखा कढीपत्ता चिरून घालते.

रस्ते अपघातातील अथवा घातील अपघातातील रुग्णांना सुरुवातीला वरीलप्रमाणेच आहार ठेऊन मग हळूहळू शक्तीदायक आहार सुरु करते. औषधे वेळच्यावेळी द्यायची आणि पौष्टिक सकस आहार द्यायच्या. त्यात दररोज साजूक तुपातला शिरा, लापशी, दूध, केळी, उकडलेली अंडी, चिकनसूप, मटणसूप असा आहार दिला कि झाले, या लोकांच्या जेवणात इतर आजार नसतील तर ओल्या खोबऱ्याचा, त्याच्या दुधाचा, सुक्यामेव्याचा, आणि मोसमी फळांचा वापर भरपूर करते. तीनच महिन्यात हाडेबिडे जोडली जाऊन, जखमा भरून येऊन, रुग्ण लवकर बरा होतो. चिकनसूपसाठी मात्र गावठी कोंबडी वापरायची. अंडीही गावठी मिळाल्यास उत्तम. जखमा असतील तर चणाडाळ, बटाटा, चवळी(कडधान्यातली), काजू वर्ज्य करते. नॉनवेजमध्ये शेल-फिश पूर्ण वर्ज्य करते.

.

पोट बिघडले की, प्रथम पातळ पदार्थ देते. त्यात कॉफी(जायफळ घातलेली), तांदुळाची, नाचणीची मीठ घालून पेज, नारळपाणी, ताजे ताक, केळी असा असा आहार ठेवते. सोबत औषधे ठेऊन तोडे तळ्यावर आले की, वैद्यकीय सल्ल्यानुसार सेमिसॉलीड फूड म्हणजे मुगडाळीचे प्रमाण जास्त ठेऊन खिचडी, ताक, केळी, सफरचंद देते. टोमॅटो सूप, सोलकढी, किंवा कोकमसार अरुची घालवायला उपयोगात आणते.

ताप वेगवेगळ्या प्रकारचे असतात.तोंडाला रुची नसलेली, त्यामुळे वरीलप्रमाणे पातळ आहार आधी सुरु करते. रुग्णाची इच्छा या आजारातही काही खावेसे वाटत नाहीये अशी असते. शक्यतो सेमिसॉलीड फूडच देते.वेगवेगळी सूप्स आणि टोमॅटो सूप,सोलकढी,किंवा कोकमसार इथेही उपयोगात आणते.

मूतखडा निघून गेला तरी नंतरच पथ्य सांभाळावे लागते.माझा कॅल्शियम ऑक्झलेट प्रकारातील असल्याने, कुळीथ आणि शेवग्याचे सर्व प्रकार वापरते. कुळीथ भाजून कढण, पिठी, मोड काढून किंवा नुसते भिजवून उसळ, कधी पिठीत शेवग्याच्या शेंगा चालून पिठले, शेवग्याची पालेभाजी, पुलाची कुळथाची पिठी पेरुन भाजी, फुले घालून तुरीची आमटी, शेंगा घालून वरण, नुसत्या शेवग्याच्या शेंगाची भाजी माझ्या आहारात जास्त असते.

मूळव्याधाच्या रुग्ण माझ्या सासूबाई होत्या. त्यांच्यासाठी भात, ताक आणि सुरणाची भाजी. चवबदल म्हणून मूगडाळीचे वरण. सुरण हा मूळव्याधाच्या मोडाचा शत्रू आहे. या मोडाना संस्कृतमध्ये अर्श म्हणतात; शत्रूला अरि म्हणतात आणि सुरणाला अर्शारि असे म्हटले जाते.

.

.

क्षय, बाळंतपण आणि गर्भपात हे मात्र भरपूर आणि पौष्टिक खाण्याचे आहार आहेत, पथ्य असले तरी तरी फार डोकेदुखी नाही. क्षयाचे रुग्ण प्रत्यक्ष हाताळावे लागले नाहीत पण काही ओळखीत पहिले आहे. त्याची औषधे वेळच्यावेळी द्यायची मध्येच आता बरे वाटते म्हणून औषधे बंद करायची नाहीत. हे पथ्य पाळले की झाले. वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधेबंद झाली तर पुढे फार कठीण जाते. ही औषधे वेळच्यावेळी देऊन पौष्टिक सकस आहार द्यायच्या. त्यात दररोज साजूक तुपातला शिरा, लापशी, गव्हाची खीर, दूध, केळी, उकडलेली अंडी, चिकनसूप, मटणसूप असा आहार दिला की, सहा महिन्यात रुग्ण टुणटुणीत. चिकनसूपसाठी मात्र गावठी कोंबडी वापरायची. अंडीही गावठी मिळाल्यास उत्तम.

बाळंतपणात स्त्रीच्या शरीराची झालेली झीज भरून निघण्यासाठी तसे आणखी एक जीव पोसण्यासाठी लागणारा आहार एकाच व्यक्तीला घ्यायचा असतो. अंगावर दूध भरपूर येण्यासाठी बाळंतिणीला चून बनवले जाते. ओले खोबरे, गूळ एकत्र करून मोदकाचे सारण शिजवतो तसे शिजवायचे. त्यात चिमुटभर मीठ चवीला घालून, काळेमिरे जाडसर भरडून घालायचे. हे सारण तिला सकाळ संध्याकाळ खायला द्यायचे, शिवाय दुधी हलवा, दुधीची खीर द्यावा. सकाळी बदाम, बाळंतशोपा, अळीव, खरी खसखस व नारळ अशा वेगवेगळ्या खिरी द्याव्या. नारळ वगळून बाकी सगळे पदार्थ वेगवेगळे भाजून त्याची पूड करावी. एक वाटी रव्याला एक चमाचा मेथीदाणे या प्रमाणात भाजून मिक्सरवर दळून त्याची खीर करावी. एकावेळी दोन मोठे चमचे रवा पुरेसा असतो. थोडया साजूक तुपावर परतून आधी थोडे पाणी घालून शिजवावे. कोणतीतरी एक पूड चमचाभर घालून नंतर नारळाचे दूध व गूळ घालून प्यायला द्यावे.(ही खीर हृदयरोग्यांसाठीही उपयुक्त आहे.) .

न्याहारीला काय देता येईल ते पाहू.

१. भाजणी किंवा कणकेचे उप्पीट, यात हिरवी मिरची बिलकुल नाही, लसूण, खोबरे, कोथिंबीर यांचा वापर भरपूर करावा.

२..कणकेचा गोड शिरा, गूळघालून, पूर्ण दुधात शिजवून, त्यात मोड आलेल्या मेथीदाण्यांचे पीठ घालावे

३. लापशी गूळ घालून पूर्ण दुधात शिजवून, त्यात मोड आलेल्या मेथीदाण्यांचे पीठ घालावे.

४. तांदळाच्या पिठात मेथीदाण्यांचे पीठ किंवा ताजी पाने लसूण + मिरे जाडसर भाडून, मीठ घालून त्याची धिरडी करावीत.

५. गूळपापडी, दूध आणि सोबर ४ खजुरबिया द्याव्यात.

६. मऊभात, मेतकूट.

७. इडली चटणी .पण या चटणीत हिरवी मिरची न वापरता आले वापरावे.

८ मेथीचे ठेपले, बाजरी व मूगडाळीचे पीठ वापरून करवेत,ताज्या लोण्याबरोबर द्यावेत.

दुपारच्या जेवणात वरण,भात, आमटी, लाल किंवा हिरवी मिरची न घालता केलेली लसूण चटणी, कोशिंबीर चपाती किंवा भाकरी. शिवाय मेथीची भाजी वेगवेगळ्या प्रकाराने करायची. कारण एकाच प्रकारची खाऊन कंटाळा य्रतो.पण दोन्हीवेळच्या जेवणात मेथी निदान पंधरा दिवस तरी तिच्या पोटात जाणे गरजेचे आहे. मोड आलेल्या मेथी वाळवून त्यांचे पीठ करून तिच्या चपातीच्या पिठात मिसळावे. एक बाळंतिणीसाठी स्वयंपाक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तिच्या जेवणात तिखटाचे प्रमाण एकदम कमी ठेवायचे.मिरे, आले, लसूण यांचा वापर जास्त करायचा.

रात्रीच्या जेवणात मेथीची किंवा शेपूची भाजी हवीच.लसणाचा वापर मुक्तहस्ते करायचा.

पहिल्या महिन्यात कच्च्या डिंकाचे,दुसर्‍या महिन्यात मेथीचे, तिसऱ्या महिन्यात तळलेल्या डिंकाचे आणि नंतर मूग+ उडीदाचे लाडू दुपारच्या वेळी द्यावेत. तसेच साजूक तुपातला शिरा, लापशी, डिंकाचे लाडू, बदाम/खारकेची खीर, या गोष्टीही कमरेचे दुखणे जडू नयेत म्हणून दिल्या पाहिजेत. त्यासोबत तिला वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायाम करणेही गरजेचे आहे.

.

.

नॉनवेज खाणाऱ्यानी अंडी, चिकन गावठीच वापरावी, मासे धन्याच्या मसाल्यात करावेत. पापलेट, बोंबील(ओले व सुके), रावस, मुडदूशा असे सात्विक मासे द्यावेत, कोलंबसारखे कवचयुक्त इतर मासे तीन महिने देऊ नयेत. बांगडे बिलकुल नाही. बाळंतिणीच्या बाबतीत रुग्ण सहकार्य करत नाही असे नसते; असलेच तर “बाळासाठी खायला हवं”,हा एक मंत्र जपला की झाले.

गर्भपातातही स्त्रीची वरीलप्रमाणेच आहार देऊन काळजी घ्यावी, उलट जास्तच काळजी घ्यावी कारण मानसिकदृष्ट्याही ती खचलेली असते. तिला नुसते जेवण देऊन भागात नाही तर ती ते जेवण नीट जेवतेय याकडे लक्ष द्यावे.

माझ्या प्रयोगातून तुम्हाला काही मदत होईल असे वाटल्याने हा लेख लिहिला आहे. शक्यतो घरात आजार येऊच नयेत असे वाटते, पण आलेच तर तुम्ही त्याच्याशी या लेखाच्या मदतीने यशस्वीपणे लढा देऊ शकाल,याची खात्री आहे. निरोगी राहा आणि कुटुंबालाही निरोगी करा, अशा शुभेच्छा देऊन हा लेख संपवते.

नोटः कोलंबीची मॉली आणि हिरव्या मसाल्यात तळलेली कोलंबीचे फोटो सोडल्यास बाकी सर्व फोटो आंतरजालावरुन साभार.

फोटो संकलन - सानिकास्वप्निल

प्रतिक्रिया

अजया's picture

16 Oct 2015 - 11:44 am | अजया

माहितीपूर्ण लेख.

गिरकी's picture

16 Oct 2015 - 3:17 pm | गिरकी

खूप उपयुक्त माहिती.

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 5:02 pm | प्रीत-मोहर

माहिपूर्ण !!! आमच्या घरात सुरु करते आता यातल बरच काही.

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 7:28 pm | सानिकास्वप्निल

उत्तम माहितीपूर्ण लेख.
छान माहिती दिली आहे सुरन्गीताई, बर्‍याच गोष्टी यातल्या फॉलो करता येणार आहे.

के.पी.'s picture

16 Oct 2015 - 8:57 pm | के.पी.

पथ्थ्याच्या पाककृती आहेत म्हणून जरासा कंटाळा करत होते धागा उघडायला, आत्ताच पूर्ण वाचला तर काय... सुंदर खजिनाच दिलाय तुम्ही!

खूपच उपयोगी लेख आहे. वेगवेगळी सूप्स करण्यात मी कमी पडते. लेख वाचून उत्साह आलाय व थंडीही सुरु झालीये. आजच सूप करते.

हॅट्स ऑफ सुरंगी ताई, केवढी उपयुकत माहिती एकत्र दिलीस ! खरंच उत्साह आला एकदम सगळं करायचा.

छान संकलन ,सर्वासाठी उपयुक्त :)

भिंगरी's picture

17 Oct 2015 - 11:37 pm | भिंगरी

बापरे!
सुरंगी मी तर वाचूनच दमले.
खुप छान आणि उपयुक्त माहिती.

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 4:12 am | मधुरा देशपांडे

फोटो पाहुन तोंपासु. सगळी माहिती एकत्र छान जमा झालीये.

प्यारे१'s picture

18 Oct 2015 - 2:35 pm | प्यारे१

सर्वांसाठी उपयुक्त धागा.

'सात्विक' मासे वाचून अम्मळ मौज वाटली. ;)

हिरव्या मसाल्यात तळलेली चिकन अगदी झकास दिसतेय!

पैसा's picture

18 Oct 2015 - 7:54 pm | पैसा

खूप उपयुक्त माहिती आहे! कढीपत्त्याच्या चटणीची कृती हवीच होती.

फारच उपयुक्त माहिती! हॅट्स ऑफ!

पिलीयन रायडर's picture

19 Oct 2015 - 2:51 pm | पिलीयन रायडर

बापरे.. इतका विचारही मी कधी केलेला नाही जेवढी माहिती तुम्ही जाता येता देता..
फारच उपयुक्त लेख.

एक शंका.. चण्याचे सुप "तीन तास" उकळायचे आहे?

अत्यंत उपयुक्त लेख ताइ.भरपुर माहिती अन पुरक फोटो त्यामुळे पथ्याच्या पाकृ.आसुनहि आवडला लेख.

खुप छान माहिती आहेस. सगळ्या पाकृ पण मस्त.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2015 - 1:28 pm | बोका-ए-आझम

_/\_

कविताचा न तुझा हा धागा एकत्र करणारे! चविष्ट डाएट प्लान तयार होईल!

अनन्न्या's picture

26 Oct 2015 - 4:53 pm | अनन्न्या

तुझे लेख म्हणजे खजिनाच आहे ताई! एवढे प्रकार आणि तेही पथ्याचे... भारीच!

स्वाती दिनेश's picture

26 Oct 2015 - 5:45 pm | स्वाती दिनेश

खूप छान माहिती आहे ,
स्वाती

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:02 pm | कविता१९७८

उत्तम माहितीपूर्ण लेख.

विशाखा राऊत's picture

30 Oct 2015 - 3:41 am | विशाखा राऊत

खुप मस्त माहिती