नवस - लघुकथा

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
4 Sep 2015 - 11:23 pm

होडी तशी बारीकचं होती.
नदीसारखीच.
पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता.
हातात मटणाचा प्रसाद होता.
आभाळात घारी सावज शोधण्यात भटकत होत्या.
बारकी पोरं त्यांचाकडं बघण्यातच दंग होती.
ईवलूशी होडी पण वस्ताद कस लावुन वल्हत होता.
संथ संथ होडी काठाला लागली.
देवळात भक्तगणांची गर्दी होती.
मऊशार वाळुतनं वाट काढत नाना देवळात शिरला.
मंदाक्कापण सोबतीला होती.
आज नानानं बोकड कापलं होतं.
म्हसोबाला. कुणी त्याला खंडोबा पण म्हणायचं.
आख्खी वाडी आली होती.
दुरदूरची नातीगोतीही जमलेली.
दिगंबर सोडून.
पोरीचं लगीन जमाव म्हणुन मंदाक्कानं नवस केलता. कामाच्या व्यापात अजुन फेडला नव्हता.
ट्रेक्टरवाला दिगंबर नानाचा जावई झाला.
अंगानं जरा रोडावलेला. पण पोरगा कष्टाळू होता. चेहऱ्यावर माजुरडीशी झाक होतीच.

मंदाक्काची लेक तशी काळीकुट्ट.
मिचमिची.
हसल्यावर तर अजुन भेसूर दिसायची.
सुलक्षणा. सुली म्हणायचे सगळे तिला.
लगीन होऊन चार महिन्यातच घरी आली.
टाकलेली.
नाना हिरमुसला होता.
लेकीच्या काळजीनं दिनरात झुरत होता.
खंडोबाला प्रसाद वहाताना नाना लेकिचं सुख मागत होता.
दिवस टाळ्यावर आला.
मंदाक्काकडं बघत नाना पुन्हा होडीकडं निघाला.
वस्तादही घामेजलेला.
आभाळातल्या घारी पाण्याभोवती पिंगत होत्या.
संथ संथ होडी पुन्हा काठाला लागली.
मऊशार वाळुतनं वाट काढत नाना पाण्याबाहेर आला.
दुरूनच येणारा फटफटीवरचा जावई दिसला.
मंदाक्का पदर घेत घेतच चेहऱ्यावर नाजुक हसली.
नानाचा जिवात जीव आला. शेवटी त्याला त्याचा म्हसूबा पावला होता.
आभाळात घारी वेगानं सुर मारीत होत्या.
पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता.
फटफटी वरून उतरताच दिगुला नानानं नमस्कार घातला.
दारूचा उग्र भपकारा त्याच्या अंगावर आला.
दिग्या नानाशी भांड भांड भांडला.
काळ्याठिक्कर सुलीशी संसार नाही करायचा म्हणाला.
नाना समजुन उमजुन गयावया करत राहीला.
सूलीची सोडचिठ्ठी फेकुन दिग्या तराट निघुन गेला.
म्हसुबा आज त्याची परीक्षा बघत होता.
आभाळात घारींचा खेळ रंगात आला होता.
पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता.

समाजलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

4 Sep 2015 - 11:56 pm | पिलीयन रायडर

वेगळीच शैली आहे तुमची. आवर्जुन वाचतेच तुमचे लेख.

ह्या कथेतही गाण्यात जसं आळवुन आळवुन गातात.. तसं जे एक रिपिटेशन आहे, ते फार सुंदर आहे..

जव्हेरगंज's picture

5 Sep 2015 - 12:05 am | जव्हेरगंज

धन्यवाद पिलीयन रायडर,
प्रतिसाद आवडला.

उगा काहितरीच's picture

5 Sep 2015 - 1:08 am | उगा काहितरीच

आवडली कथा.

मांत्रिक's picture

5 Sep 2015 - 5:40 am | मांत्रिक

:(
स्टाईल आवडली.

एक एकटा एकटाच's picture

5 Sep 2015 - 7:22 pm | एक एकटा एकटाच

प्रभावी लेखन आहे.

पुढिल लिखाणास शुभेच्छा

जव्हेरगंज's picture

5 Sep 2015 - 8:02 pm | जव्हेरगंज

धन्यवाद एक एकटा एकटाच,
थोडसं अवांतर:
सध्या मोबल्यावरून टंकत आहे.
प्रस्तुत लेखन संगणकावर कसे दिसत असेल याबद्दल नीटशी कल्पना येत नाही.
परिच्छेद, लेखाची मांडणी यांसारख्या गोष्टी मोबल्यावरुन करायला जमत नाहीत.
हा लेख कदाचित कवितेसारखा दिसत असावा.
त्यामुळे लेखनाचा वाचकांवरील प्रभाव कमी होत असावा असा कयास आहे.

एक एकटा एकटाच's picture

5 Sep 2015 - 10:30 pm | एक एकटा एकटाच

अजिबात नाही

उलट फार मस्त वाटलं वाचताना

अगदी परफ़ेक्ट पॉज आहेत.

फार सुरेख लिहिलय

असेच उत्तमोत्तम तुमच लिखाण आम्हास वाचायला मिळो
हिच सदिच्छा.

मांत्रिक's picture

6 Sep 2015 - 11:28 am | मांत्रिक

अगदी परफ़ेक्ट पॉज आहेत. अगदी बरोब्बर. पॉझेस कथेच्या परिणामकारकतेत भर घालतायत.

खटपट्या's picture

5 Sep 2015 - 8:14 pm | खटपट्या

खूप छान.

एस's picture

5 Sep 2015 - 10:09 pm | एस

छान लिखाण!

नाव आडनाव's picture

5 Sep 2015 - 11:37 pm | नाव आडनाव

भारी लिहिता ना राव.
इतके दिवस का नव्हते लिहीत? ४-५ लेख आहेत तुमचे फक्त.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 12:16 am | जव्हेरगंज

धन्यवाद नाव आडनाव,
इतके दिवस इच्छा होती पण योग नव्हता.:)
वाढतील हळुहळु..

बाबा योगिराज's picture

6 Sep 2015 - 1:13 pm | बाबा योगिराज

१+

जेपी's picture

6 Sep 2015 - 1:26 pm | जेपी

+1

कोमल's picture

6 Sep 2015 - 2:13 pm | कोमल

:(

कालच वाचली आज प्रतिसाद द्यायला आले.
छान लिवलय

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 2:35 pm | जव्हेरगंज

धन्यवाद कोमल,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.