कृष्णबन- १

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in भटकंती
26 Jun 2015 - 12:15 am

.

ब्लॅकफॉरेस्ट! नुसतं नावं घेतलं तरी डोळ्यासमोर येतो तो पांढर्‍याशुभ्र आयसिंगवर चॉकलेटचा चुरा आणि टप्पोरी चेरी लावलेला केक! ह्या केकचे बारसे जर्मनीतल्या प्रसिध्द श्वार्झवाल्ड अर्थात ब्लॅक फॉरेस्ट वरुन झाले.
उजव्या बाजूला र्‍हाइनचं खोरं आणि बोडनसे तर डाव्या बाजूला फ्रान्सची सीमा, पायथ्याशी स्वीस तर उशाला उरलेलं बाडेन व्युटेनबर्ग घेऊन १६० किमी लांब आणि ६० किमी रुंद असं साधारण आयताकृतीत अनेक टेकड्या आणि डोंगरांवर गर्द हिरवे पाइन्,थुजा,चिनारचे वृक्ष लेवून एन्झ, एल्झ, किन्झिग, डॅन्युब आणि अशा कितीतरी नद्यांना आपल्या अंगावर खेळवत ऐसपैस पसरलं आहे हे कृष्णवन! निसर्गाचा अगदी वरदहस्तच लाभलेल्या ह्या कृष्णवनात पाहण्याराहण्यासारखी अनेक ठिकाणं आणि गोष्टी आहेत. टिटिसे,श्लुकसे सारखी तिथली सुंदर सरोवरं, जर्मनीला सर्वात उंच धबधबा आणि जगातलं मोठ्ठं कुकु क्लॉक ही त्यातली अगदी न टाळता येण्यासारखीच!

शोनाख नावाचं अगदी लहानसं छोटुलं गाव ट्रिबेर्गला अगदी खेटून आहे तिथेच जगातलं पहिलं मोठ्ठं कुकुक्लॉक आहे आणि ट्रिबेर्गमध्येच जर्मनीतला सर्वात उंच धबधबा आहे. शोनाखबाखही तिथून लांब नाही.त्यामुळे ह्या वेळी आम्ही शोनाखच्या रिटाआजीच्या हॉटेलात रहायचे ठरवले. आम्ही तिकडे जायला निघणार त्याच्या आदल्या दिवशी रिटाआजीचा फोन,"तुम्ही किती वाजेपर्यंत याल साधारण? मला नेमके त्याच दिवशी दुपारी आजोबांना घेऊन दवाखान्यात जायचे आहे चेक अपसाठी.. तीन साडेतीनपर्यंत आम्ही येऊच परत पण आम्ही तिथे नसताना तुम्ही नेमके पोहोचलात तर गोंधळ होईल ना.. म्हणून विचारतेय."आम्ही संध्याकाळी पाच नंतरच पोहोचू म्हटल्यावर हुश्श झाले तिला.

.

फ्रांकफुर्ट हून ट्रिबेर्गला जायचं म्हणजे ए ५ वरून साधारण तीन साडेतीन तासात पोहोचतो आपण.एखादा कॉफीब्रेक घेतला तर अजून अर्धा तास जास्तीचा, आणि दुपारी ट्रॅफिकही नसतो फार, असा विचार करुन जेवणं झाल्यावर निघायचे ठरले. ऑटोबानवर आल्यावर गाडीने वेग घेतला आणि गाण्यांच्या ठेक्यानेही. बिडी जलायले पासून पांडेजींची सिटी वाजवून झाली, फेविकॉलने फोटो चिकटवून झाले आणि ओ वुमनिया पण वासेपूराहून आली. बाजूच्या लेनमधूनही भरधाव गाड्या जात होत्याच. हवा छान असल्याने मोटारबाइक्स वालेही ५/६ च्या गटाने स्वारीवर निघालेले दिसत होते.

.

कार्ल्सरुह सोडलं आणि दूरवर डोंगरमाळा दिसू लागल्या. ऑफेनबुर्गला पोहोचता पोहोचताच हिरवाई गडद झालेली जाणवू लागली. डोंगर जवळ आले. आपोआप हात सिडीप्लेअर कडे गेला आणि प्लेअरवरची गाणी बंद झाली. पण मनात मात्र वेगळं गाणं सुरू झालं होतं.किंझिग नदीच्या पुलावर असताना पुढे गाड्यांची रांगच लागलेली दिसली.गाडीचा वेग कमी केला तर पुढे मोटारसायकलच्या एका ग्रुपमधल्या कोणाला खूप लागलेलं होतं. अँब्युलन्स येऊन त्याला घेऊन जायच्या बेतात होती. त्याची बाकीची मित्रमंडळी आणि पोलिस यांची प्रश्नोत्तरं चालू होती. रस्ता अगदीच अरुंद होता त्यामुळे थांबण्याशिवाय पर्याय नव्हताच. खिडकीतून बाहेर पाहिलं की डोंगराच्या कुशीतली लाकडी घरं आणि माथ्यावरची दाट बनं.. दोन्ही साद घालू लागले. साधारण अर्ध्यापाऊण तासातच आपल्याला तिथेच पोहोचायचं आहे ह्या नादात तो ट्रॅफिकजामवरचा वैतागही किंझिग मध्ये बुडून गेला.

.

१०-१५ मिनिटात रस्ता परत सुरू झाला. गाडी ट्रिबेर्गकडे धावू लागली. 'शोनाखबाख'.. गावाच्या नावाची पाटी लागली आणि कुकु ओरडली इथेच आहे मी.. आणि ते भले मोठे घड्याळ जाताना अगदी रस्त्यातच उभ्या उभ्या भेटले. अगदी हात हलवून म्हणाले, सावकाश या उद्या गप्पा मारायला, आत्ता जा, त्या रिटाकडे जाऊन आराम करा.. अच्छा,बाय होईपर्यंत आमची गाडी बोगद्यात शिरली. पुढच्या १० मिनिटात आम्ही रिटाज् हॉटेलसमोर होतो. गाडी कुठे पार्क करुया ह्या विचारात असतानाच एक मध्यम उंचीची, जाडगेलीशी टुणटुणीत आज्जी बाहेर आली. हॉटेलच्या नावावरुन त्या आजीचं नाव आम्ही आपलं रिटाआजी ठरवून टाकलं होतं. तुमचीच वाट पाहत होते असं म्हणत, हसर्‍या चेहर्‍याने आमचं स्वागत करुन गाडी कुठे पार्क करायची हे दाखवून रुमच्या किल्ल्या घेऊन उत्साहात आमची खोली दाखवायला पुढे, जिना चढतानाही अखंड बडबडत होती ती. आजोबांचं चेक अप कसं वेळेत झालं. आम्ही कसे ४ वाजताच घरी परतलो. आता तुम्हाला किल्ल्या दिल्या की मी थोडावेळ व्यायाम करुन सोनाबाथ कसा आणि किती वेळ घेणार आहे. एक ना दोन..

आम्हाला थकवा असा नव्हताच. सहाच वाजले होते आणि उन्हाळ्यात नऊ वाजेपर्यंत लख्ख उजेड असतो त्यामुळे फ्रेश होऊन गावात एखादी चक्कर मारावी आणि जेऊन मग सावकाश हॉटेलला परत यायचं असं ठरवून आजीला इथल्या रेस्टॉरंटची माहिती विचारली तर त्यावरही एवढुश्या छोट्या गावात कशी ३/४ चांगली रेस्तराँ आहेत ह्या बद्दल प्रवचन देऊन मग तिने तिथे कसं जायचं हे ही सांगितले. खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि अहाहा.. एवढेच शब्द आले तोंडातून. जास्ती काही न बोलता थोड्याच वेळात आवरुन आम्ही गावचा फेरफटका मारायला बाहेर पडलो.

.

अगदी चिमुकलं गाव. टेकडीवर वसलेलं असल्यामुळे चढ उताराचेच रस्ते. चिमण्यातून निघणारा धूर आणि नवं तंत्रज्ञान अगदी सहज अंगावर खेळवणारी सोलार पॅनेल्स असलेली टुमदार घरं, घरासभोवतालची छोटीशी बाग, समोरच्या अंगणातलं शिस्तीत वाढवलेलं हिरवं लॉन, दाराशी सुबकपणे मांडून ठेवलेल्या कुंड्या, कुठे लाकडी ओंडक्याचाच लहानसा वाफा करुन त्यात लावलेली फुलं, तिथल्या झाडा, पानावर पसरलेली, कुंडीतल्या फुलांशी, अंगणातल्या गवताशी लडिवाळपणे खेळणारी संध्याकाळची उबदार सोनेरी उन्हं.. मन एव्हाना मोरपिस झालं होतं.

.

अशाच भारलेल्या अवस्थेत चालत असताना समोर एक लहानसे चर्च दिसले. आत शिरलो. बाहेरच्या वातावरणातली प्रसन्न शांतता आणि चर्चमधली स्पिरिच्युअल शांतता.. दोन्हीकडे तशीच समाधी लागली. दूरवर कोणाच्या तरी घड्याळातली कुकू ओरडली आणि आमच्या पोटातल्या कुकूंचेही कोरस साँग सुरू झाले. समोरच एक कॉफी शॉप होतं . तिथे लावलेली प्लमकेक आणि ब्लॅकफॉरेस्ट केकची लाळ गाळायला लावणारी चित्रे पाहून आधी कॉफी आणि केक खायचा बेत केला पण जर्मन वेळेने तो अगदीच हाणून पाडला. कॉफी शॉप सहालाच बंद झालं होतं. थोडं पुढे गेल्यावर एक पिझ्झेरिया दिसला. अजून काही शोधाशोध न करता तिथेच आम्ही आमच्या पोटातल्या कावळ्याकोकिळांना न्याय द्यायला आत शिरलो.
इतालिअन रोझ वाइनच्या संगतीने स्वादिष्ट पिझ्झा,पास्ता खाल्ल्यावर बेलीज् काफेची चव घोळवत, चांदणं अंगावर पांघरून घेत त्या निर्जन रस्त्यावरुन रमत गमत रिटाज् वर परतलो.

प्रतिक्रिया

शलभ's picture

26 Jun 2015 - 12:40 am | शलभ

एक नंबर..

पद्मावति's picture

26 Jun 2015 - 2:25 am | पद्मावति

आहा...अतिशय सुंदर....
वर्णन आणि फोटो दोन्हिहि.

यशोधरा's picture

26 Jun 2015 - 5:34 am | यशोधरा

वा! मस्त लिहिलं आहेस!

सविता००१'s picture

26 Jun 2015 - 5:45 am | सविता००१

मस्त लिहिलं आहेस गं स्वातीताई. छानच

अजया's picture

26 Jun 2015 - 7:17 am | अजया

अहाहा!मस्त!
ब्लॅक फाॅरेस्ट हे नाव का पडले आहे?

मधुरा देशपांडे's picture

26 Jun 2015 - 3:23 pm | मधुरा देशपांडे

या परिसराचे नाव ब्लॅकफॉरेस्ट असण्यामागे डोंगराळ भाग, तिथे सगळीकडे असणारी उंच झाडी आणि यामुळे सदैव असणारा अंधार हे मुख्य कारण. याच भागात केला जाणारा म्हणुन त्या केकचे नावही ब्लॅकफॉरेस्ट.
शिवाय केकबद्दल असेही ऐकले आहे की तो केक म्हणजे या कृष्णबनाचे एक रुप, ज्यात चॉकलेटकेकचा बेस म्हणजे जमीन, बर्फाने आच्छादलेली धरणी म्हणजे फ्रेश क्रीम आणि त्या स्नोवर पडलेली झाडांची पाने म्हणजे वरुन पुन्हा सजवलेले चॉकलेट.

स्वाती दिनेश's picture

26 Jun 2015 - 3:34 pm | स्वाती दिनेश

पुढच्या भागात सांगणार आहेच हे सगळे.. :)
स्वाती

चुकलामाकला's picture

26 Jun 2015 - 7:45 am | चुकलामाकला

वाह! " कृष्णबन " ! काय सुंदर नाव दिलेय!

प्रचेतस's picture

26 Jun 2015 - 9:03 am | प्रचेतस

सुंदर.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2015 - 9:12 am | श्रीरंग_जोशी

ब्लॅक फॉरेस्ट हा केकमधील मला सर्वाधिक आवडणारा प्रकार आहे. दुर्दैवाने तो अमेरिकेत पाहायलाही मिळत नाही.

ब्लॅक फॉरेस्टचे मराठी नामकरण आवडले. वर्णनशैली फारच सुंदर.

पुभाप्र.

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 9:26 am | विशाल कुलकर्णी

सुंदर...

एस's picture

26 Jun 2015 - 11:29 am | एस

कृष्णबन हे नाव वाचून उत्सुकतेने धागा उघडला.

छान वर्णन आणि फोटोही.

मधुरा देशपांडे's picture

26 Jun 2015 - 12:49 pm | मधुरा देशपांडे

वाह! कृष्णबनात कित्त्येकदा गेलोय, बरंच काही पाहिलंय आणि अजुन खूप काही बघायचं राहिलंय. पण तिथे कधीच कंटाळा येत नाही. ट्रिबेर्गला जाऊन आलोय, पण शोनाखचा योग अजुन यायचाय.
ममेलसे आम्हाला खूप आवडलेला, तिथला ब्लॅ़क फॉरेस्ट केक, कॉफी आणि बाहेर पडणारा बर्फ, अशक्य भारी वाटतं. श्लुकसे, टिटिसे, ट्रेन्स, डोंगरावर पसरलेली घरं आणि शेती सगळंच मस्त आहे. आता तुझ्या धाग्यातच काही फोटो डकवेन.
बादवे, ते क्रमशः लिहायचं राहिलंय का?

स्मिता श्रीपाद's picture

26 Jun 2015 - 1:28 pm | स्मिता श्रीपाद

स्वाती ताई खुप मस्त लिहिलय्स ग....
आणि नाव तर आहाहा.."कृष्णबन"..अगदी अगदी चपखल....

तुषार काळभोर's picture

26 Jun 2015 - 1:53 pm | तुषार काळभोर

+१ टू कृष्णबन!

कृष्णबन म्हणजे काय बघायला धागा उघडला आणि केकचा फोटो बघून पुढे काय बघायला मिळणार याची कल्पना आली. अतिशय चपखल नाव!!

कवितानागेश's picture

26 Jun 2015 - 10:23 pm | कवितानागेश

अगदी. नाव वाचूनच धागा उघडला.

मोहनराव's picture

26 Jun 2015 - 2:13 pm | मोहनराव

खुप छान. एकदा जाऊन यायलाच पाहिजे.

याला म्हणतात पर्फेक्ट भाषांतर!

लेख आवडला हेवेसांनल.

तूर्त फटूबद्दल गणेशा झाल्या गेल्या आहे.

सर्वसाक्षी's picture

26 Jun 2015 - 3:08 pm | सर्वसाक्षी

स्वाती

फारच मस्त. वर्णन करायची तुझी शैली अगदी तपशिलवार आहे. गावांची, नद्यांची सगळी नावे आहेत. कलकलाटात फिरण्यपेक्षा अशी निवांत सहल उत्तम

पैसा's picture

26 Jun 2015 - 3:33 pm | पैसा

किती सुंदर! लिखाण अगदी अप्रतिम!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2015 - 10:33 pm | अत्रुप्त आत्मा

लेख आणि केक http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-a-whole-cake-smiley-emoticon.gif

जुइ's picture

26 Jun 2015 - 11:12 pm | जुइ

वर्णन शैलीही उत्तम. पुढील भाग लवकर येऊद्या.

सध्या एकाच वेळी जवळजवळ ४ युरोप भटकंतीच्या मालिका एकाच वेळी आल्या आहेत आमच्या साठी चांगली मेजवानी आहे.

सानिकास्वप्निल's picture

27 Jun 2015 - 12:25 am | सानिकास्वप्निल

ऑथेंटिक ब्लॅक फॉरेस्ट gateau खावा तर तो इथलाच, सिंपली यम्मीलिशियस !!
जायंट कुकू क्लॉक व त्यावरच्या नाचणार्‍या बाहुल्या बघायला जाम मजा वाटत असे.
मस्तं लिहिले आहेस ताई, कृष्णबन नाव आवडले हेवेसांन.
पुभाप्र.

स्वाती दिनेश's picture

27 Jun 2015 - 12:27 pm | स्वाती दिनेश

सर्वांना धन्यवाद.
पुढचा भाग लवकरच टाकते.
स्वाती

मज्जा मज्जा चाललीय सध्या! छान लिहिलंयस, कृष्णबन नाव सुरेख!
फोटो अहाहा!

मनोज श्रीनिवास जोशी's picture

27 Jun 2015 - 3:02 pm | मनोज श्रीनिवास जोशी

प्रवास वर्णन , छायाचित्रे आणि कृष्ण बन हे नाव - आवडले. जर्मनी हा एक अती श्रीमंत आणि अतिसुंदर प्रदेश आहे विशेषतः बवेरीअन जर्मनी !

विवेकपटाईत's picture

27 Jun 2015 - 3:22 pm | विवेकपटाईत

लेख आणि केक (फोटो मध्येच - खायला मिळणे शक्य नाही माहित आहे) दोन्ही आवडले.

स्वाती दिनेश's picture

28 Jun 2015 - 1:42 pm | स्वाती दिनेश

उमा, मनोज जोशी, विवेकपटाईत
धन्यवाद.
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2015 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम जागेच्या सफरीची अप्रतिम वर्णनाने सुरुवात ! "कृष्णबन" हा शब्द खास आवडला.

कृष्णबन केक तर अत्यंत आवडता आहे !

पुढच्या भागांची प्रतिक्षा आहे. ("क्रमशः" राहिले आहे, हे ओळखले आहे :) )

केदार-मिसळपाव's picture

29 Jun 2015 - 2:15 pm | केदार-मिसळपाव

पु. भा. प्र.