कहाणी एका पाण्याची !

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
17 Apr 2015 - 10:40 pm

एकोणीसशे नव्वदच्या सुमाराची गोष्ट आहे. नविन लुथरा आणि त्यांचे मित्र दीपक मोहन लोणावळयाच्या डोंगराळ घनदाट वनपरिसरातून लुथरा यांच्या मारुती जिप्सी मधून मुळशीकडे निघाले होते. नविन लुथरा म्हणजे कस्टम क्लियरन्स मधले एक उभरते यशस्वी व्यावसायिक. वय जेमतेम तिशीच्या आसपास. अन दीपक मोहन म्हणजे एका तेल-जहाजाचे मालक. धनाढ्य असामी !

Green_One

नविन लुथरा स्वत:ची कहाणी सांगत होते.
“हा प्रवास माझ्या साठी बहुधा अतिशय महत्वाचा ठरायचा होता “
कॅप्टन दीपक मोहन यांनी तेल-वाहतुकीच्या धंद्यात बक्कळ पैसा कमावला होता अन तो पैसा त्यांना इथे भारतामध्ये जमीनीत गुंतवायचा होता.

मुळशीला पोहोचल्यावर दोघांनी जमीन खरेदी साठी जमीनमालक शेतकरयांशी बोलणी सुरु केली.
कॅप्टन साहेबांना जमीन खूपच महाग वाटली. खरेदीचा विचार सोडून देवून ते परत त्यांच्या तेल-वाहतुक धंद्यात व्यग्र झाले. दुर्दैवाने दोनच वर्षात त्यांचे निधन झाले. मला मात्र त्या जमीन खरेदीचा विचार स्वस्थ बसु देईना. मला जागाही छान वाटली होती. रिटायरमेंट नंतर स्थायिक व्हायला बरी म्हणुन मग मी ती १०० एकर जागा विकत घेवून टाकली.

1
नंतर पाच-सात वर्षांनी लुथरांनी एका पावसाळ्यात परत मुळशीला चक्कर मारली अन तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडून पुढील काही वर्षात आणखी जमीन विकत घेण्याचा सपाटा लावला.
“ सध्या माझ्या मालकीची १५०० एकर पेक्षाही जास्त जमीन आहे. सुरुवातीला रू. ५०० एकर या दराने मी जागा घेतली. नंतर या आणखी खरेदीच्या काळात त्याचा सरसरी दर रू. १०००० (दहा हजार) प्रति एकर इतका होता. त्यावेळच्या मानाने महागच की !
इथे आता पर्यटन व्यवसायतले काही तरी करावे ही कल्पना माझ्या डोक्यात मूळ धरु लागली अन मी भन्नाट असा "केव्ह हॉटेल" प्रकल्प करायला घेतला. स्वतःसाठी बंगलाही बांधायला घेतला. आता या साठी पाणी कुठून आणायचं याचा काही विचारच मी केला नव्हता.
मला जाणवलं की याला, विशेषतः हॉटेल प्रकल्पाला भरपूर पाणी लागणार. मी पाण्यासाठी धावाधाव सुरू केली. अगदी टाटांकडे सुद्धा गेलो. टाटा ग्रुप त्यावेळी मुळशी धरण-जलाशय लीझ वर चालवत होते व पाण्याचे वितरण-व्यवस्थापन करत होते. त्यांनी माझ्या पाणी-विनंतीला नकार दिला ! बोअर खणणं माझ्यासाठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरला असता कारण मला रोज तीन लाख लिटर पाण्याची गरज होती.
अश्या किती बोअर-विहरी खणणार होतो मी ? खुप अस्वथ झालो होतो मी !
1
असाच एके दिवशी बसलो असताना, जवळच राहणारा एक परिचत गावकरी माझ्याकडे आला. बोलता बोलता म्हणाला" इथे या जमीनीत जिवंत झरे आहेत, तुमची पाण्याची चिंता मिटून जाईल" हे ऐकून उत्साहित झालेले लुथरा लगेचच कामाला लागले. साधारण किती पाणी मिळेल याचा अंदाज घेण्यासाठी दोन पंप बसवून घेतले.
"तो मे महिना होता, अन या ऐन उन्हाळ्यात या झरयातून मुबलक, म्हणजे ३-४ लाख लिटर पाणी आम्ही उपसत होतो, पाण्याची पातळी खाली जायचे नाव घेइना. आमची पुरेपुर खात्री पटली की इथं भरपूर पाणी आहे. मग आम्ही हे पाणी पिण्यायोग्य आहे का याची चाचणी घेतली. एका कडून नाहीतर चार्-चार जणां कडून चाचणी करुन घेतली. हो पाणी नि:संशय पिण्यायोग्य होते. आम्ही खुष झालो. एका मित्राला या पाण्याचे रिपोर्ट दाखवले. हा मित्र पाणी-शुद्धिकरण क्षेत्रात काम करायचा. एक्सपर्ट होता तो त्यातला. म्हणाला " पाणी" बेस्ट आहे, उच्च दर्जाचं आहे. आणि विशेष म्हणजे हे पाणी पेस्टीसाईड-मुक्त होतं !

1

म्हणजे लुथरांनी जिथं खणलं होतं तो "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” होता ! "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” म्हणजे "जैविक दृष्ट्या संपन्न अन अतिशय “दुर्मिळ” असं ठिकाण होतं !
ब्रिटीश पर्यावरण शास्त्रज्ञ नॉरमन मायर्स यांनी ही हॉटस्पॉटची संकल्पना रुजवली. त्यांच्या अभ्यासानुसार ज्या ठिकाणी ०.५ टक्के किंवा १५०० विविध प्रकारच्या व्हेस्कुलर वनस्पती आहेत व "पर्यावरण-स्त्रोत" च्या इतर अनेक चाचण्यांत जे ठिकाण उत्तिर्ण होते, तो बायो-हॉटस्पॉट ! भारतात अशी दोनच ठिकाणे आहेत, एक मुळशी व दुसरे गुजरातमधील आवा !
• * * * * * *
लुथरांनी मग पुढील चार वर्षे हे अति-शुद्ध पाणी, त्याचा नैसर्गिकक दर्जा न बिघडवता जसंच्या-तसं बाटलीत कसं भरता येईल यावर बरेच प्रयोग केले अन यात पुर्णपणे यशस्वी झाल्यावर सन २००९ मध्ये "मुळशी स्प्रिंग वॉटर" या नावाने बाजारात आणलं.
लगोलग हे पाणी लुथरा यांचे मित्र ओबेरॉय हॉटेल्सचे चेअरमन बिकी ओबेरॉय यांच्या कडे पोहोचवण्यात आले. हे पाणी त्यांच्या पसंतीस उतरले, जेंव्हा त्यांना समजले की याचा स्त्रोत बायो-हॉटस्पॉट आहे, ते आणखी चकित झाले. उत्सुकते पोटी मुळशीला येऊन बायो-हॉटस्पॉट व बॉटलिंग प्लान्ट बघून गेले. मग काही दिवसातच मुळशी स्प्रिंग वॉटरला ओबेरॉय हॉटेल अन ओ-क्वीला ट्रायडंट हॉटेलची मोठी ऑर्डर मिळाली.

1
सद्ध्या ओबेरॉय ग्रुप रोज १७,००० "मुळशी स्प्रिंग वॉटर" च्या बाटल्या विकत घेतो आहे. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे पॅरीस इथे "कॉलेट" नावाच्या जगातल्या नामांकित "वॉटर बार" जो अति-दर्जेदार पिण्याच्या पाण्या साठी प्रसिद्ध आहे तिथेही "मुळशी स्प्रिंग वॉटर" विकले जाते.
"आम्ही अतिशय जाणीवपुर्वक "कॉलेट वॉटर बार" कडे ऍप्रोच झालो कारण आम्हाला माहित होतं "कॉलेट"नं शिक्कामोर्तब केलं की "मुळशी” जागितक पातळीवर मान्यता पावणार होतं" लुथरा अभिमानाने सांगत होते.
मग "कॉलेट" कडून ऑर्डर मिळायला फारसा प्रयास करावा लागला नाही. अर्ध्या तासातच बोलणी आटोपली, हे पाणी चक्क भारता मधलं आहे या वर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हे पटवायलाच त्यातला निम्म्याच्या वर वेळ गेला, कारण भारतातल्या स्वच्छते बाबत जगात काय प्रतिमा आहे हे आपणा सर्वांना माहित आहे. आता हा भारतीय ब्रॅण्ड "कॉलेट" मेनू कार्ड वरचा एक नंबरचा आयटम आहे.

ओबेरॉय व्यतिरिक्त लीला ग्रुप हॉटेल व आयटीसीच्या हॉटेल्स मध्येही "मुळशी" उपलब्ध आहे. तुम्हाला जर मुंबईत मुळशी हवं असेल तर बिग सिनेमाज, "हक्कासन, याऊक्ताचा" या अंतरराष्ट्रीय रेस्टॉरंटस इथे ही उपलब्ध आहे. स्पेन्सर रीटेल हेच पाणी वेगळ्या नावने त्यांच्या स्टोअर्स मध्ये उपलब्ध करुन देणार आहे.
आता लुथरा यांनी बॉटलिंग प्लान्ट ची क्षमता भरपूर वाढवलीय.
७५० मिली. ची "मुळशी स्प्रिंग वॉटर" ची बाटली महाराष्ट्रात रु. ५० ला व राज्याबाहेर रु. ५५ ला आहे.
५२ वर्षीय नविन लुथरा खुप खुष आहेत. रु. १०००० (दहा हजार) प्रति एकर दराने घेतलेली जागेत आज रोज रु. ३० लाख इतकी उलाढाल होतेय. इतक्या कमी पैश्यात इतकं भरघोस उत्पन्न, अजून काय पाहिजे ?
ही आहे कहाणी एका पाण्याची, पाणीथेंबातुन खुळखुळणारया नाण्यांची !
* * * * * * * * * * * * * * * * * * * * *
तीनचार वर्षांपुर्वी डी.एन.ए. हे इंग्रजी वृत्तपत्र वाचता वाचता आशिष तिवारी यांनी लिहिलेली एक मुलाखत कम रिपोर्ताज माझ्या वाचनात आला. ही “पाण्याची कहाणी” मला विलक्षण वाटली. आता ही असली सुरस कहाणी वाचल्यावर, मिपाकर मित्रांना सांगितल्या शिवाय थोडंच राहवेल ? मग या कहाणीचे मराठीत रुपांतर केले. कसा वाटला हा माझा हा अल्पसा प्रयत्न
- चौथा कोनाडा

भूगोललेख

प्रतिक्रिया

रेवती's picture

17 Apr 2015 - 10:55 pm | रेवती

लेखन आवडले.

अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP the biological hotspot..

यशोधरा's picture

18 Apr 2015 - 12:11 am | यशोधरा

हेच म्हणते..

रामपुरी's picture

18 Apr 2015 - 1:07 am | रामपुरी

"उभरते यशस्वी व्यावसायिक" मधील 'उभरते' हा हिंदी शब्द आहे, मराठी नव्हे.

चौथा कोनाडा's picture

16 May 2015 - 10:58 am | चौथा कोनाडा

धन्यवाद रामपुरी, निदर्शनास आणुन दिल्या बद्द्ल ! उभरते ऐवजी उद्योन्मुख हा शब्द हवा होता.
कित्येक परभाषेतल्या शब्दांनी मराठीत असा काही जम बसवलाय की ते मराठी नाहीत हे लक्षातच येत नाही. उभरते हा शब्द सर्रास पणे मराठीत वापरला जातो, उदा. उभरते कलाकार, उभरते नेतृत्व इ.

रिप का म्हंटलं आहे कळलं नाही खरंच? झरा असेल तर कायमचं पाणी असतं ना? का बाॅटलिंगने भूजल पातळी खाली जाते? सांगेल का कोणी?याचा उपद्रव नक्की कसा? आमच्या भागात अशा दोन बाॅटलिंग कंपन्या आहेत.म्हणून जास्त इंटरेस्ट.

एस's picture

18 Apr 2015 - 10:20 am | एस

भूजल हे कायमस्वरूपी नसते. मग तो जिवंत झरा असला तरीही. भूगर्भातील पाण्याचा स्रोत हा जमिनीत झिरपणारे पावसाचे पाणी हाच असतो. आणि हे पाणी जिरण्याचे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असते. एक तर पावसाचे पाणी ज्या वेगाने आणि जितक्या प्रमाणात जमिनीवर पोहोचते आणि वरून वाहते त्या तुलनेत ते जमिनीत झिरपण्याचा वेग फारच कमी असतो. त्यामुळेच पावसाचे बरेचसे पाणी हे वाहून जाते आणि नद्यांच्या रूपाने समुद्रास मिळते.

म्हणजे भूजलपुनर्भरणाची प्रक्रिया किती संथ असते हे आपल्याला दिसते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे.

याचा परिणाम म्हणजे भूजलाचे आज जे साठे आपल्याला सापडतात ते निर्माण व्हायला फार मोठा काळ गेलेला आहे. आणि त्या प्रक्रियेत जंगलांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. एक तर पावसाच्या जोरात कोसळणार्‍या थेंबांचा थेट जमिनीच्या सर्वात वरील अतिमहत्त्वाच्या अशा मृदेच्या थराशी संपर्क येऊ न देता मातीची धूप रोखण्याचे काम झाडे करतातच. त्याचबरोबर, पावसाचे पाणी वाहून जाण्याचा वेग नियंत्रित करून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवण्याचे कामही त्यांची मुळे करतात. एवढेच नाही, तर प्रत्येक झाड हे स्वतःत अतिरिक्त पाणीही साठवते आणि असे पाणी नंतर हळूहळू मुळांच्या सहाय्याने जमिनीत पुन्हा सोडले जाते.

एवढे सगळे घटक एकत्र येऊन कार्य करतात तेव्हा कुठे भूजलात थोडीशी वाढ होते. म्हणूनच एखादा बायोलॉजिकल हॉटस्पॉट ही तेथील अतिशय विकसित आणि नाजुक परिसंस्था असते.

भूजल पातळी ही जमिनीखाली बरीच लांबवर पसरलेली असू शकते. म्हणजे एखाद्या ठिकाणचे भूजल इतक्या मोठ्या प्रमाणावर उपसले गेल्यास तिथे आजूबाजूच्या लांबवरच्या प्रदेशातले भूजल येण्याचा प्रय्त्न करते. परिणामी आजूबाजूचे जलस्रोत, विहिरी, तलावांचे पाणी आटू लागते. आणि भूजलावर अवलंबून असलेली वृक्षराजी कमी होऊ लागते. आधीच बेसुमार जंगलतोड, जंगले ज्यांच्यावर बीजप्रसारासाठी अवलंबून असतात त्या वन्यप्राणी-पक्ष्यांची शिकारामुळे घटत चाललेली संख्या, जमिनीची धूप, वीटभट्ट्यांसाठी मातीची चोरी, शहरीकरण यामुळे संपूर्ण अधिवासच धोक्यात येत आहेत.

बरे, अशा बॉटलिंग कंपन्या हे थांबवण्यासाठी काही उपाययोजना करताहेत का? तर नाही. भूजल हे आपोआप भरपाई होणारे संसाधन नाही. आणि बहुतेक कंपन्या आपण भूजलपुनर्भरणाचे कसे प्रयत्न करतोय हे जे काही सांगत असतात ती धूळफेक असते. पाणी एखाद्या झर्‍यातून उपसले जात असले तरी त्यातून प्रत्यक्षात आजूबाजूच्या विस्तृत प्रदेशातील भूजल कमी होते आणि परिसरातील शेती, जलस्रोत धोक्यात येऊन एकेकाळी समृद्ध, स्वयंपूर्ण असलेला समाज उजाड होतो. हे फक्त माणसांचे झाले. पर्यावरणाचे तर अपरिमित नुकसान होते.

भूजल, आणि एकूणच पर्यावरणातील इतरही साधनसंपत्ती, उदा. पाणी, नद्या, समुद्र, माती, वाळू, वृक्षराजी ही सामुदायिक संपत्ती आहे. ती अशी वैयक्तिक फायद्यासाठी, नफ्यासाठी का दिली जावी? नफाकेंद्रित अर्थव्यवस्थेत नफा वैयक्तिक आणि परिणामांची जबाबदारी मात्र सामुदायिक अशी निव्वळ स्वार्थी विभागणी केली जाते याची मला मनस्वी अत्यंत चीड येते.

मुळशी एकेकाळी बायॉलॉजिकल हॉटस्पॉट होते असे म्हणायची वेळ फार दूर नाही. केरळमध्ये कोकाकोलाने जशी भूगर्भपातळीची वाट लावली तशीच परिस्थिती इथेही उद्भवणार याबद्दल दुर्दैवाने कोणतीही शंका उरलेली नाही...

RIP...

संदीप डांगे's picture

18 Apr 2015 - 10:57 am | संदीप डांगे

आपल्या क्षुल्लक फायद्यासाठी हे असं ओरबाडणे आपल्याला खरेच मंजूर नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात उपसा करायच्या एवजी रोज फक्त १०० लिटर पाणी काढावे आणि विकावे १ लाख रुपये लिटर प्रमाणे. इतकेच जर ते मौल्यवान आहे तर ते अजून दुर्मिळ करून शो-ऑफ करणार्‍यांना त्याची भरमसाठ किंमत मोजू दे ना? एवढे ३-४ लाख लिटर पाणी काढणे म्हणजे बलात्कार आहे धरतीवर.

याविरूद्ध कुणी आंदोलन नाही का करत?

धन्यवाद स्वॅप्स.मी जिथे राहाते तो भाग सुजलाम् सुफलाम् आहे.इथे दोन कारखाने आहेत बाॅटल्ड वाॅटरचे तसंच शीतपेय तयार करणार्या कंपनीदेखिल आहेत.वरचे वाचुन त्यातले गांभिर्य लक्षात आलं.किती मोठ्या प्रमाणात हा अत्याचार दररोज चालु आहे हे वाचुन वाईट वाटतंच आहे पण या सर्वांशी आपण लढु शकत नाही ही हतबलताही त्रासदायक आहे.

एस's picture

18 Apr 2015 - 6:05 pm | एस

www.change.org किंवा www.avaaz.org येथे ऑनलाइन पेटिशन सुरू करू शकता. (लिंक गूगल करून तपासून पहा.. )

पेटिशन प्रकाशित झाली की इथे धागा काढून लिंक द्या. आम्ही साइन करू.

नगरीनिरंजन's picture

19 Apr 2015 - 5:36 am | नगरीनिरंजन

आणि मग ऑनलाईन पीटिशन पाहून सरकार लुथरासाहेबांना सांगेल की कंपनी बंद करा. ते ऐकून लुथरासाहेब आपल्या गुंतवणुकीवर मुळशी स्प्रिंगवॉटर सोडून हरीहरी करत स्वस्थ बसतील. =))

'हम होंगे कामयाब एक दिन...'

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2015 - 11:46 am | चौथा कोनाडा

स्वॅप्स खुप महत्वाची व तपशिलवार माहिती ! भूगर्भातील पाण्याचा स्रोत व भूजलपुनर्भरणाची प्रक्रिया या विषयी तुम्ही सुरेख तपशिल दिलेत. इथे बायो-हॉटस्पॉट अन नेहमीचा बॉटलिंग प्लान्ट पाणी-उपसा हे मुद्दे आले. बायो-हॉटस्पॉट जतनाच्या विषयी आणखी काही तपशिल असतील तर जरूर इथे टाका. बाय-द-वे बायो-हॉटस्पॉट मधले हे पेशल पाणी संपले तर फार मोठा प्रॉब्लेम होईल का ?

आणी लेख हा बायो-हॉटस्पॉट वर आहे. हे पाणी म्हंजे अगदी पेशल क्याट्यागिरितले (संदर्भः बुहुगुणी यांनी संदर्भलेला व्हिडीयो ) झाले, म्हंजे औषध म्हणा ना ! आता औषध म्हंजे महागडे अन लिमिटेड लोकांसाठीच ! आपणा सामान्यांसाठी नाहीच (मी रुद्राक्षाचे उदाहरण घेतो, माझ्या सारख्या सामान्याला रुद्राक्षाचे काही देणे घेणे नसते, मात्र ज्यांना हौस आहे ते लोक वाट्टेल तेवढे पैसे देवुन रुद्राक्ष अंगावर "मिरवतात" मुळशी स्प्रिंवॉ पिणारे याच प्रकारात मोडतात !

एस's picture

23 Apr 2015 - 2:04 pm | एस

बायोलॉजिकल हॉटस्पॉटची तुम्ही दिलेली खालील माहिती थोडीशी अपूर्ण आहे.

म्हणजे लुथरांनी जिथं खणलं होतं तो "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” होता ! "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” म्हणजे "जैविक दृष्ट्या संपन्न अन अतिशय “दुर्मिळ” असं ठिकाण होतं !
ब्रिटीश पर्यावरण शास्त्रज्ञ नॉरमन मायर्स यांनी ही हॉटस्पॉटची संकल्पना रुजवली. त्यांच्या अभ्यासानुसार ज्या ठिकाणी ०.५ टक्के किंवा १५०० विविध प्रकारच्या व्हेस्कुलर वनस्पती आहेत व "पर्यावरण-स्त्रोत" च्या इतर अनेक चाचण्यांत जे ठिकाण उत्तिर्ण होते, तो बायो-हॉटस्पॉट ! भारतात अशी दोनच ठिकाणे आहेत, एक मुळशी व दुसरे गुजरातमधील आवा !

नॉर्मन मायर्स ह्यांनी जी संकल्पना मांडली तिला 'बायोलॉजिकल हॉटस्पॉट' असे नाव नाही, तर ती 'बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट' अशी आहे. त्यांनी दिलेली या संज्ञेची व्याख्या खालीलप्रमाणे आहे -

"To qualify as a biodiversity hotspot on Myers 2000 edition of the hotspot-map, a region must meet two strict criteria: it must contain at least 0.5% or 1,500 species of vascular plants as endemics, and it has to have lost at least 70% of its primary vegetation."

म्हणजेच, एखाद्या ठिकाणाला जैववैविध्य-संवेदनशील ठिकाण म्हणून मान्यता मिळण्यासाठी मुख्य दोन निकष असे, की एक म्हणजे तिथे त्याच परिसरातील स्थानिक असलेल्या संवाहक झाडांच्या किमान ०.५% किंवा १५०० प्रजाती असाव्यात, आणि त्या परिसरातील किमान सत्तर टक्क्यांहून अधिक वृक्षराजीचा र्‍हास झालेला असावा. संवाहक झाडांची उदाहरणे म्हणजे मोठाले वृक्ष, उदा. वड, पिंपळ, आंबा, उंबर इत्यादी.

अजून सोप्या शब्दांत- 'A biodiversity hotspot is a region of the Earth that is extremely biologically diverse and also under severe threat due to habitat loss, climate change, or extensive species loss. '

(खरंतर जैववैविध्य-संवेदनशील ठिकाण ह्या संकल्पनेवर अनेक आक्षेप आहेत, पण त्यामुळे तेथील पर्यावरणाच्या जतनाच्या निकडीचे महत्त्व कमी होत नाही.) भारतात पश्चिम घाट आणि म्यानमारच्या सीमेवरील ईशान्येकडील वनराई हे दोन प्रदेश अशा जगभरातल्या ३४ ठिकाणांमध्ये मोडतात (केवळ मुळशी वा आवा नव्हे.) ह्या प्रदेशांत संपूर्ण जगातील सुमारे ६०% वनस्पती, पक्षी, प्राणी इत्यादींच्या प्रजाती आढळतात. आणि त्यातही, अनेक प्रजाती ह्या तिथल्या स्थानिक असतात. त्या जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. उदा. चीनमध्ये सापडणारा एक प्रकारचा व्हायपर साप हा केवळ १०० चौरस किलोमीटर इतक्या छोट्या प्रदेशातच आढळतो. त्यामुळे अशा ठिकाणांचे जतन व संवर्धन करणे हे एकूणच उरल्यासुरल्या जैववैविध्याच्या संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचे असते.

म्हणजेच, जैववैविध्य-संवेदनशील ठिकाणाच्या व्याख्येतील दोन निकषांपैकी दुसरा निकष (अधिवास-विध्वंस) हा फार महत्त्वाचा आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की अशी ठिकाणे आधीच धोक्यात आहेत. त्यात तेथील अद्याप तग धरून असलेल्या वनराईमुळे जे फायदे (बायप्रॉडक्ट) मिळतात त्यापैकी एक म्हणजे हे स्प्रिंग वॉटर. पण हे स्प्रिंग वॉटर म्हणजे तेथील अधिकचे पाणी नाहीये. ते पाणी अजूनही शुद्ध आहे ते तिथल्या जैववैविध्यामुळे. पण त्याच जैववैविध्यालाही जिवंत रहायला याच पाण्याची गरज असते. हे पाणी आणि हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हे एकमेकांवर संपूर्णांशाने अवलंबून आहेत. ह्या पाण्याच्या साठ्याचा जर इतक्या मोठ्या प्रमाणावर बेबंद उपसा झाला तर हा हॉटस्पॉट आणखी किती वर्षे टिकू शकेल? हे प्रश्न मला पडले आहेत.

आणि आपलं सरकारही GDP दर वाढवण्याच्या नादात उद्योगांपुढे पायघड्या पसरतंय खरं, पण त्यासाठी किंमत दिली जातेय ती आपल्या पर्यावरणाची. त्यामुळे सरकारकडून पर्यावरणासाठी काही होऊ शकेल ही आशा आता तर पारच धुळीला मिळाली आहे.

समजा, तरीपण कोणाला हे 'स्प्रिंग वॉटर' काढून जर विकायचेच असेल तर वर डांगेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ते दुर्मिळ ठेऊनही त्यापासून चांगला परतावा मिळवता येईल.

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2015 - 11:32 am | चौथा कोनाडा

आजच्या म.टा. मधले वृत्त :

Water-Kola

दक्षिणेकडील लोकांनी अश्या प्रकल्पाना विरोध करून थांबवण्यात यश मिळवले आहे.

आजूबाजूच्या परिसराची वाट लागणार असेल, सामन्य माणसांचे जीणे हराम होणार असेल तर अश्या लढाया करणे याला पर्याय उरणार नाही !

यापुढे कार्पोरेटस आणि आम जनता (अर्थात "आहे-रे" अन "नाही-रे" मधला) संघर्ष अटळ असेल.

अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP the biological hotspot.. > +१०००

चुकलामाकला's picture

18 Apr 2015 - 8:32 am | चुकलामाकला

सहमत!

चैदजा's picture

18 Apr 2015 - 8:09 pm | चैदजा

+१००० सहमत !!!!!

hitesh's picture

18 Apr 2015 - 6:04 am | hitesh

छान

भुमन्यु's picture

18 Apr 2015 - 7:11 am | भुमन्यु

निसर्गावर अत्याचार...

उपसा अजून पाणी, भरा बाटल्यात, करा चॆन, चाबकाने फोडायला हवे लुथराला

असो लेखन मात्र आवडले

+२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२

नाव चुकलय वाटतं

बहुगुणी's picture

18 Apr 2015 - 7:35 am | बहुगुणी

धन्यवाद!

आधिक माहिती घ्यावीशी वाटली म्हणून शोध घेतला. लुथरा यांच्या कंपनीची "No Frills" website मिळाली, तसंच या प्रकल्पाची माहिती देणारा हा व्हिडिओ:

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2015 - 10:38 am | चौथा कोनाडा

धन्यवाद बहुगुणी, व्हिडिओ शेअर केल्याबद्दल !
मुळ इंग्रजी लेख वाचल्यानंतर मी ही अचंबित झालो होतो. म्हटलं आंतरजालावर शोधावे याचे तपशिल, पण असेच वर्ष-दीड वर्ष निघुन गेले ! हेच शोधायला हवे होते !

व्हिडिओ स्टनिंग आहे, प्लाण्ट डिटेल्स पाहुन थक्क व्हायला होते ! आपल्या जवळपास असलं उच्चभ्रु चालुय हे बघुन विचारात पडायला होते.

शुद्ध पाणी, स्प्रिंग पाणी, आमचे मुळशी ओरिजनल शुद्ध स्प्रिंग वॉटर असा गजरच केलाय.
लहानग्या बाळासाठी मस्ट वैगरे, वैगरे ! पण आपल्यातर असलं पाणी असतं याचा पत्ताच नव्हता. लहानपणा पासुन साध्यापाण्यावर म्हंजे, कार्पोरेशनचं पाणी पिवुनच वाढलोय !

एखाद्या नशिबवान उद्योगी माणसाला हॉटस्पॉट्ची लॉटरी लागलीय अन तो या संधीचा पुरेपुर वापर करुन, अभ्यास करुन जागतिक पातळीवर उतरुन पाण्यासारखा पैसा निर्माण करतोय ही मोठीच यशोगाथा म्हणायची !

विशाखा पाटील's picture

18 Apr 2015 - 7:52 am | विशाखा पाटील

१५०० एकर पेक्षा जास्त जमीन आणि तेही असं पाणी असलेली - ते मूळ मालक आता काय बरे करत असतील ?
लेखनशैली मात्र आवडली.

चुकलामाकला's picture

18 Apr 2015 - 8:40 am | चुकलामाकला

लेख आवडला.

तुषार काळभोर's picture

18 Apr 2015 - 8:56 am | तुषार काळभोर

म्हणा हवं तर..

पण वाचताना, वाचून झाल्यावर, काही तरी बोचत होतं आतमध्ये.

चलत मुसाफिर's picture

18 Apr 2015 - 9:12 am | चलत मुसाफिर

1. सदर लेखावरील काही संतप्त प्रतिक्रिया या वरवर पाहता साहजिक आणि न्याय्य वाटल्या तरी प्रत्यक्षात आपल्या दांभिकतेचा परिचयच करून देतात.

2. मुळशीच नव्हे तर एकेकाळी संपूर्ण पश्चिम घाट (बहुधा पुणे व मुंबईसुद्धा) जैवविविधतेचा खजिना होता. त्यानंतर जे काही घडले त्याला आपण आणि आपल्या सुसंस्कृत पूर्वजच जबाबदार आहोत.

3. बाटलीबंद पाण्याचे कारखाने आसेतुहिमाचल भारतभर चालतात. ते पाणी विकत घेऊन तिथल्या पर्यावरण-विनाशाला हातभार लावणारे आपणच असतो. भूजल उपसून बनवलेला कोकाकोला पिणारे व मुलांना पाजणारे (आणि नंतर त्या प्लास्टिक बाटल्या फेकून देणारे) आपणच असतो.

4. मुळशी कंपनीचे पाणी बहुधा आपल्याला परवडत नसावे. त्यामुळे आपण त्यांच्याविरुद्ध शुद्ध मनाने आगपाखड करू शकतो.

लोभ असावा ही विनंती.

मुद्दा १ व खास करुन २ शी सहमत. ४ सुद्धा सहमत.
३- बाटलीबंद पाणी, खास करुन कोकाकोला वा तत्सम पेये पीत नाही.

संदीप डांगे's picture

18 Apr 2015 - 1:01 pm | संदीप डांगे

मुसाफिरभौ,

गेल्या सहा वर्षापासून मी एकही पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेतली नाही. बाहेर जातांना घरून पाणी घेऊन जातो. नसेल तर उपलब्ध असलेल्या कुठल्याही नळाचे पाणी पितो. इतके की घरामधेही कुठलाही फिल्टर नाही. पावसाचे पाणी जमीनीत रिचवण्याचा प्रयत्न करतो. माझ्यापद्धतीने मी होईल तेवढं करतो त्यामुळे माझ्या प्रतिसादात कुठलाही दांभिकपणा नाही हे सांगू इच्छितो. तसेच हे स्प्रिंग वॉटर प्रकार अतिश्रीमंतांचे नसते चोचले आहेत. लुई वित्तोंच्या लाखो रुपयांच्या बॅग्ससारखे. त्यात परवडण्यासारखे नसणारच. त्यामुळे असूयेचा प्रश्नच उद्भवत नाही.

चलत मुसाफिर's picture

19 Apr 2015 - 8:34 am | चलत मुसाफिर

डांगेभाऊ,

आपले उदाहरण अनुकरणीय आहे.

संदीप डांगे's picture

19 Apr 2015 - 9:57 am | संदीप डांगे

सतत फिल्टर्ड पाणीच वापरणारे आजारांना सतत बळी पडतात असे पाहिले आहे. त्यामुळे होईल तोवर बिन्दास, उपलब्ध असलेले पाणी प्यावे.

अविनाश पांढरकर's picture

21 Apr 2015 - 11:50 am | अविनाश पांढरकर

+१०००

सतत फिल्टर्ड पाणीच वापरणारे आजारांना सतत बळी पडतात असे पाहिले आहे. त्यामुळे होईल तोवर बिन्दास, उपलब्ध असलेले पाणी प्यावे.

म्हंजी जर्मनीतले लोकं सतत आजारीच असतील नै? त्यांच्या तर नळालाच फिल्टरचं पाणी येतं म्हणे. :)
धट्टी-कट्टी गरिबी वगैरे म्हनतेत ते असलंच कै तरी.
पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे ही किमान मान्य होण्याजोगी तरी गोष्ट असावी.

संदीप डांगे's picture

23 Apr 2015 - 4:40 pm | संदीप डांगे

अर्र..... ऐसा नाही बंधो...

पिण्याच्या पाण्याची शुद्धतेचे निकष व्यक्तिगणिक वेगळे आहेत. शुद्धतेच्या वेडापायी काही अचाट बुद्धीमान लोक आरओ केलेलं पाणीसुद्धा उकळून पितात असं पाहिलंय. तेच लोक सतत आजारी पडतांना पाहिलेत. आरओ फिल्टरमधून येणारं पाणी मातीच्या माठात साठवणारेसुद्धा बघितले आहेत. आपल्या सरकारी व्यवस्थेच्या गलथान कारभाराबद्दल प्रचंड विश्वास असल्याने सरकारी नळातून गटाराचंच पाणी येतं असं लोकांना ठाम वाटतं. मी माझ्या घरात आत्तापर्यंत कुठलेही फिल्टर कधीच लावले नाही. ४ ते ५ वेगवेगळ्या शहरात वास्तव्य केलं. नेहमी सरकारी पाणी प्रत्यक्ष नळाला ग्लास लावून प्यायलं आहे. अजूनही तेच करतो. कामानिमित्त रेल-वेने प्रवास करतांना नेहमी स्टेशनवरचं पाणी पितो, बाटलीत भरून घेतो. खूप लोक असं करतात. माझी रोगप्रतिकारशक्ती फारच उत्तम आहे असेही नाही. असंच आपलं चारचौघांसारखं. मी फार खतरोंके खिलाडी टाईप आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. कारण यात काही खतरा आहे हेच कधी जाणवलं नाही.

आता जर्मनीतले लोक काय पाणी पितात याच्याशी मला काय कर्तव्य. पण माझं सरकारी पाणी गटारातून येत नाही. त्यावरही तितक्याच शुद्धीकरणाच्या प्रक्रिया होतात. पण 'तिकडे बघा, कसं चांगलंय सगळं' करणार्‍या पब्लिकला आपल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचाच नाही तर त्याला कोण काय करणार? खणखण पैसे वाजवून बाटलीबंद पाणी घेऊन त्याला स्टेट्स सिम्बल, हेल्थ कॉन्शसनेस सिम्बल करणार्‍यांना ते पाणी तरी किती शुद्ध असतं याची काही खात्री? शेकडो किलोमीटर उन्हातून प्लास्टीक बॉटलमधून वाहून येतांना त्या पाण्यावर प्लास्टीकचे परिणाम होऊन काहीच धोकादायक होत नसेल असे मानणे भाबडेपणा आहे.

सरकारतर्फे आपल्याकडे एकतर पाणी मिळतं किंवा नाही मिळत. पण मिळतं तेव्हा ते पिण्यायोग्य असतं याची अनुभवाने खात्री देऊ शकतो. बाकी शुद्धतेची व्याख्या कितीही ताणता येते.

संदिप भौ, कधी कधी तुम्ही इतका नीटनेटका तार्किक प्रतिसाद लिहिता की हे असे प्रतिसाद वाचल्यावर ते इतर प्रतिसाद नक्की तुमचेच का? असा प्रश्न पडावा.
आता इथेच पहा,

पिण्याच्या पाण्याची शुद्धतेचे निकष व्यक्तिगणिक वेगळे आहेत.

असे कसे असेल ? किमान शुद्धतेचे निकष हे संशोधनाने ठरवलेले असावेत आणि ते व्यक्ति-निरपेक्ष असावेत.

कारण यात काही खतरा आहे हेच कधी जाणवलं नाही.

तुम्हाला जाणवले नाही म्हंजे काय हो ? ई-कोलाय चा जंतू काय उड्या मारताना दिसणारे का ?

आता जर्मनीतले लोक काय पाणी पितात याच्याशी मला काय कर्तव्य.

तसे कर्तव्य मला पण नैच हो पण तुम्ही मुद्दा स्वच्छ पाण्याचा घेतला होतात म्हणून मी एक उदा. म्हणून त्यांना मध्ये आणले (तुम्ही फ्रान्स, युके , स्वीडन अथवा जिथे खात्रीलायकरित्या "सर्वत्र" स्वच्छ पाणी नळातून मिळते असे ठिकाण निवडा).
आपल्या देशात तुम्ही म्हणाला तसे "तितक्याच" शुध्दीकरणाच्या प्रक्रिया सर्वत्र होतात याची खात्री सरकार देखील देऊ शकत नाही म्हणून तर पाणी उकळून प्या असे अधिकृत पणे सरकारच सांगते. याला कोणताही विदा नाही पण फक्त इतरांना नावे ठेवायची म्हणून काहीही दावे कशाला करायचे ?

बाटलीबंद पाणी घेऊन त्याला स्टेट्स सिम्बल, हेल्थ कॉन्शसनेस सिम्बल करणार्‍यांना ते पाणी तरी किती शुद्ध असतं याची काही खात्री? शेकडो किलोमीटर उन्हातून प्लास्टीक बॉटलमधून वाहून येतांना त्या पाण्यावर प्लास्टीकचे परिणाम होऊन काहीच धोकादायक होत नसेल असे मानणे भाबडेपणा आहे

हे मान्य. पण तो पहिल्या प्रतिसादातला तुमचा मुद्दा नव्हता त्यामुळे हे अवांतर.

सरकारतर्फे आपल्याकडे एकतर पाणी मिळतं किंवा नाही मिळत. पण मिळतं तेव्हा ते पिण्यायोग्य असतं याची अनुभवाने खात्री देऊ शकतो. बाकी शुद्धतेची व्याख्या कितीही ताणता येते.

अनुभवाने खात्री तर बुवा-मांत्रिकाची देतात हो, पाण्याचे परिक्षणच याची खात्री करण्यासाठी वापरावे, एका व्यक्तीचा अनुभव नव्हे (ते ही तो सांगतोय म्हणून, तुमच्या शरिराची चाचणी करुन नव्हे) आणि तशी परिक्षणे आपल्या नळातून येणार्‍या पाण्यासाठी अनेक पातळ्यांवर फेल जातायत.
"बाकी शुद्धतेची व्याख्या कितीही ताणता येते." यासाठी मी किमान शुध्दतेचे निकष असा शब्दप्रयोग केलाय.

असो.

संदीप डांगे's picture

24 Apr 2015 - 5:30 pm | संदीप डांगे

सरजी,

तुम्ही आणि मी दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर मत मांडतोय असं वाटतंय, त्यामुळे तर्कविरोध होतोय का?

१. किमान शुद्धतेचे निकष सर्वत्र समान व शास्त्रीय असावे हा तुमचा मुद्दा सर्वस्वी मान्य.

२. भारतातली सरकारी व्यवस्था पुरवत असलेले पाणी पिण्यायोग्य नाही असा समज चुकीचा आहे हा माझा मुद्दा.

माझ्या मते आपल्या शरिराला नेहमी कोणतं पाणी मिळतं त्यानुसार शरिराची रोगप्रतिकारशक्ती त्याबाबतीत सक्षम होत असावी. आयुष्यभर एकाच प्रकारचे (शुद्ध, अशुद्ध, निर्मळ, गढूळ) पाणी पिणारे त्यापाण्याबद्दल एक विशिष्ट टॉलरन्स (सवय?) बाळगून असतात. त्याशिवाय दुसरे पाणी प्यायले की शरिर विपरीत प्रतिक्रिया देते असा अनुभव सगळ्यांना येतो. सतत फिल्टर्ड पाण्याची सवय असणारे प्रवासात बाटलीबंद पाण्याशिवाय (तेही विशिष्ट ब्रँडचे) दुसरे पाणी पिऊ शकत नाहीत. तसे झाल्यास त्यांना त्रास होतो. त्याचे खापर ते दुसर्‍या पाण्यावर (ते शुद्ध किंवा चांगले नव्हते असे म्हणून) फोडतात.

मी इथे भारतीय विचारसरणीबद्दल टिप्पणी केली होती. पाण्याच्या शुद्धतेच्या निकषांबद्दल नाही. त्यामुळे शास्त्रीय बाबतीत गैरसमज नसावा.

इथे माझ्या हॉस्टेल वास्तव्याचा एक अनुभव सांगतो. आम्ही सुमारे ७० ते ८० जण हॉस्टेलचे सरकारी पाणी प्यायचो. एक दिल्लीवाला अतिश्रीमंत मुलगा कायम बिस्लेरीचेच पाणी प्यायचा. त्याने शोधून एका कुटूंबाला दहापट पैसे जास्त मोजून रोजचा डबा लावला होता. अट होती पुर्ण स्वच्छता आणि चांगले धान्य, भाजीपाला वापरायची. पहिले सहा महिने त्याचा हा उद्योग सुरु होता. या काळात तो सतत आजारी पडायचा. आम्ही त्याला वातावरणाशी जुळवून घे, आजारी पडणार नाहीस असा सल्ला दिला. तो हळू हळू अमलात आणून पुढे त्याने २ वर्षे नॉर्मल काढली.

दुसरा अनुभव एका कलीगच्या मुलीचा. ती प्लेस्कूल मधे जायला लागली तशी सतत आजारी असायची. तिच्यामुळे हिला सतत सुट्या घ्याव्या लागत. ती मलाच रिपोर्टींग असल्याने मी जरा खोलात चौकशी केली तर कळले ती आरओ केलेलं पाणी परत उकळून गाळून मुलीला देते. तिच्या अतिकाळजीने मुलीची प्रतिकारक्षमता विकसीत झाली नाही. आता शाळेत इतर मुलांसोबत खातांना-पितांना दुसर्‍या पाण्याचा तीला त्रास होऊ लागला होता. तिने साधे पाणी द्यायला सुरुवात केल्यावर बर्‍याच काळाने तो प्रश्न थांबला.

पाणी अतिशुद्ध करण्याच्या नादात त्यातल्या आवश्यक जीवाणुंचाही संहार होतो असे मला वाटते. पण म्हणून कुठलेही पाणी प्या असेही मी म्हणत नाही. माझ्यामते फिल्टर्ड वॉटर सतत बदल्या, दौरे असणार्‍या लोकांसाठी ठीक आहे. सरकारी पाणी फिल्टर करून न वापरल्याने आजारी पडणार्‍यांची आकडेवारी माझ्याकडे नाही. माझ्या एकट्याच्या अनुभवावरून कुठलाही सिद्धांत होऊ शकत नाही.

एखाद्या दिवशी सरकारी नळातून गढूळ पाणी येते आणि लगेच दुसर्‍या दिवशी अ‍ॅक्वागार्डचा सेल्समन दारात उभा असतो. हा योगायोग आहे असे मला तरी वाटत नाही. असे दोनदा - एकदा ठाण्यात, दुसर्‍यांदा नाशिकमधे- झाले आहे. आमचेकडे कुठलेही फिल्टर नसून नवे घ्यायची आवश्यकता नाही असे त्याला उत्तर देतांना त्याच्या चेहर्‍यावरचे आश्चर्य बरेच काही सांगून गेले.

अशाच योगायोगाने उच्चभ्रु, श्रीमंत अथवा पैसे मोजू शकणारे यांच्या मनात सरकारी पाण्याविषयी अढी निर्माण करून खाजगी पाण्यावाल्यांचा धंदा वाढवला गेला असेल काय असा संशय येतो. बाटलीबंद पाणी विकत घ्यायला लागणे हे एक नागरिक म्हणून शरमेची बाब आहे असे भारतीय जनतेला वाटत नाही. प्यायला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, आम्ही फिल्टर लावणार नाही असा पवित्रा आपण लोक घेतच नाही. मग जर्मनी, न्युझीलंडची उदाहरणे देतो. त्यांच्या नागरिकांनी या व्यवस्था करून घेतल्या. जर्मनीच्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करून ते केले असे मी कुठेसं वाचलं होतं. त्यांनी तो अस्मितेचा प्रश्न बनवला होता असं काहीसं. आपण काय करतो त्याबाबतीत? जिथे पाण्याची काहीच व्यवस्था होऊ शकणार नाही तिथे सोय म्हणून बाटली सोबत बाळगणे वेगळे आणि सरकारी पाण्याबद्दल अविश्वास दाखवून ती विकत घेणे वेगळे. आपण आपल्याच देशाला पाश्चात्त्यांच्या नजरेने पाहू लागलो आहोत, हे काही लोकांना फार अभिमानास्पद वाटते. कित्येक लोकांनी लहान असतांना शेतातून वाहणार्‍या पाटाचे पाणी प्यायले असेल. तेच त्या पाण्याला डर्टी वॉटर म्हणायला लागले आहेत. यात धट्टी-कट्टी गरिबीचा संबंध नाही.

फिल्टर वापरणारे व न वापरणारे यांचा एक पारदर्शी तुलनात्मक अभ्यास शास्त्रीय कसोटीवर करता आला तरच सत्य काय बाहेर येईल.

बाकी माझे कोणतेही मुद्दे अतार्किक वाटत असतील तर अवश्य सांगा. व्यवस्थित अभ्यास करून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

बाकी सगळे बाजूस ठेवून तुमचीच एक तार्किक विसंगती दर्शवतो.

तुम्ही सुरुवातीस म्हणताय,

भारतातली सरकारी व्यवस्था पुरवत असलेले पाणी पिण्यायोग्य नाही असा समज चुकीचा आहे हा माझा मुद्दा.

आणि मग म्हणताय,

प्यायला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, आम्ही फिल्टर लावणार नाही असा पवित्रा आपण लोक घेतच नाही. मग जर्मनी, न्युझीलंडची उदाहरणे देतो. त्यांच्या नागरिकांनी या व्यवस्था करून घेतल्या. जर्मनीच्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करून ते केले असे मी कुठेसं वाचलं होतं. त्यांनी तो अस्मितेचा प्रश्न बनवला होता असं काहीसं.

ते जर्मन न्युझीलंड बाजूस ठेवू पळभर.
तुम्ही "प्यायला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, आम्ही फिल्टर लावणार नाही असा पवित्रा आपण लोक घेतच नाही." हे तर मान्य करताय पण त्याच वेळी "भारतातली सरकारी व्यवस्था पुरवत असलेले पाणी पिण्यायोग्य नाही असा समज चुकीचा आहे हा माझा मुद्दा" असे पण म्हणताय. जर दुसरा मुद्दा हाच बहुसंख्य जनतेचा मुद्दा असेल तर पहिला चूकच ठरेल ना?
म्हणजे बहुसंख्य जनता भारतातली सरकारी व्यवस्था पिण्यायोग्य पाणी पुरवतेय अस्सेच मानत असेल तर ते पहिला पवित्रा कशाला घेतील ??
मग इतर जण जे बाटलीतले पाणी पितात ते लहानपणापासूनच पितात आणि म्हणून त्रास झालाय असे नेहमीच कसे म्हणता येईल? (मी सहसा बाटलीतले पाणी पित नाही पण दुसरे कोणी पित असेल तर त्याला माझी ना नाही. भूजल्संपदा वगैरे मुद्दे मान्यच पण त्याचा तिथे संबंध नाही.)

जिथे पाण्याची काहीच व्यवस्था होऊ शकणार नाही तिथे सोय म्हणून बाटली सोबत बाळगणे वेगळे आणि सरकारी पाण्याबद्दल अविश्वास दाखवून ती विकत घेणे वेगळे.

मी सरकारच स्वतः पाणी उकळून प्या वगैरे सांगत असते, त्यामुळे लोकांनी अविश्वास दाखवण्यासारखे काही वाटत नाही. सरकारने पाणी उकळू नका, ते खात्रीलायक शुद्ध आहे असा प्रचार केल्याचे ऐकिवात नाही.
(बाटलीबंद पाणी शुद्धच असते असे काही नै त्यामुळे तो ही तसा गैरसमजच पण ते इथे अवांतर)

आपण आपल्याच देशाला पाश्चात्त्यांच्या नजरेने पाहू लागलो आहोत, हे काही लोकांना फार अभिमानास्पद वाटते.

हे माझ्या उदाहरणात आलेल्या जर्मनीच्या उल्लेखाने उपरोधिक नसावे असे मानतो.

असो, मी माझी भुमिका मागच्या प्रतिसादात स्पष्ट केली आहेच. इथे फक्त तुमच्या या प्रतिसादातली तार्कित विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केलाय इतकंच.

संदीप डांगे's picture

26 Apr 2015 - 6:16 am | संदीप डांगे

बहुसंख्य जनता भारतातली सरकारी व्यवस्था पिण्यायोग्य पाणी पुरवतेय अस्सेच मानत असेल तर ते पहिला पवित्रा कशाला घेतील ?

सरकारी व्यवस्था पिण्यायोग्य पाणी पुरवतेय असं माझं मत आहे. जनतेचं नाही. तसे जनता मानत नाही म्हणून ती फिल्टर्ड पाणी वापरते असे मी म्हटले आहे. जनतेचं असं मानणं चूक आहे असं मला वाटतं. जनतेनं 'सरकारकडे शुद्ध पाण्याचा आग्रह' धरला पाहिजे असं मला वाटतं. त्याऐवजी ती 'फिल्टर व बाटली' वापरते. यात विसंगती कुठे आहे?

मी हेच परत एकदा वेगळ्या पद्धतीने लिहून बघतो. माझा काही गोंधळ झाला असेल तर अवश्य सांगा.

१. बहुसंख्य जनता सद्यस्थितीत घरी फिल्टर व बाहेर बाटलीबंद पाणी वापरते.
कारणः सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही असं जनतेला वाटतं

२. सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही हे वाटतं म्हणून जनता हे करते > घरी फिल्टर व बाहेर बाटलीबंद पाणी वापरते.

३. सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही हे वाटतं तर जनतेने हे करावे असे मला वाटते > आम्ही फिल्टर लावणार नाही, प्यायला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, असा सरकारकडे आग्रह करणे.

४. 'मिळतंय तेच पाणी नशिबाने मिळतंय' असं मानून जनता गप घरी फिल्टर व बाहेर बाटलीबंद पाणी वापरते.

आता दुसरा भागः
सरकार 'पाणी उकळून प्या' असं का सांगते यामागे बरीच कारणं आहेत. आज आपल्याकडे सर्वत्र शंभर टक्के सरकारी शुद्धीकरण केलेले पाणी पोचत नाही. जनतेला वेगवेगळ्या ठिकाणांवरून, स्त्रोतांमधून पाणी मिळवावे लागते, पुरवल्या जाते. झरे, नद्या, विहीरी, हातपंप, तलाव, टँकर इथून जमेल तसा पुरवठा होतो. साथीच्या रोगांच्या दिवसात, पावसाळ्यात यातले अनेक स्त्रोत दूषीत होण्याच्या शक्यता असतात. बरेचदा अवैध नळजोडणीमुळे, फुटक्या पाईपांमुळे नको ते पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळू शकते. त्यामुळे 'पाणी उकळून प्या' असा प्रचार करणे भाग आहे. तो सरकारी प्रचार असल्याने सार्वत्रिक आहे. त्यामुळे तो सरसकट सरकारी पाण्यालाही लागू होतो असा समज झाला आहे. त्याचा 'सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही असं सरकार स्वतःच म्हणतंय' असा अर्थ काढू शकत नाही.

सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था आपल्याकडे अजून ही गर्भावस्थेतच आहे हे खरे आहेच. पण जिथे सरकारी नळातून कुठेही गळती न होता पाणीपुरवठा होतो तिथे तो पिण्यायोग्य पाण्याचाच होतो असं माझं मत आहे. बाकी यावर सरकारी समित्या किंवा परदेशी धनपोषित येन-जीओ यांचे दावे व परिक्षणे कितपत ग्राह्य धरावी हा एक मुद्दा आहे. म्हणून निष्पक्ष परिक्षण झाल्यास सत्य कळेल असे म्हटले होते. फिल्टर कंपन्या आणि खाजगी पाणी कंपन्या यांनी व्यवस्थित प्रचार करून नळाचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबद्दल जनतेच्या मनात गोंधळ निर्माण केला. त्यावर सवयीप्रमाणे किंवा जीभेवर विशिष्ट वजन पडल्यामुळे सरकारी पाण्याच्या शुद्धतेबाबत सरकार जाणून बूजून खुलासा करत नसावे. या व्यवस्थित प्रचारतंत्राबद्दल सविस्तर कधीतरी लिहिनच, फारच मनोरंजक आणि प्रबोधनपर असेल.

इतर जण जे बाटलीतले पाणी पितात ते लहानपणापासूनच पितात आणि म्हणून त्रास झालाय असे नेहमीच कसे म्हणता येईल?

एका प्रकारच्या पाण्याबद्दल आलेला टॉलरन्स दुसर्‍या पाण्याबाबत तोकडा पडतो. सतत शुद्ध पाणी पित राहल्याने काही विषाणूंविरोधात प्रतिकारशक्ती तयार होत नाही. मग अचानक त्या विषाणूमय पाण्याचे सेवन केले तर त्रास होतो. कुणी काय प्यावे काय पिऊ नये हा माझाही मुद्दा नाहीच. फक्त अभ्यास व पुराव्याशिवाय सरकारी पाण्यावर अविश्वास दाखवून बाटलीबंद पाणी किंवा फिल्टर चे पाणी पिऊ नये असे माझे मत आहे.

तुम्ही ई-कोलायचं नाव घेतलं म्हणून सतत शुद्ध पाणी पिणार्‍या जर्मनीत काय झाले होते ते आठवले.

जर्मनीच्या उल्लेखाने उपरोधिक नसावे >> नाही ते अजिबात उपरोधिक किंवा तुम्हाला उद्देशून नाही. ते रोजच्या जीवनात भेटणार्‍या काही लोकांचं निरिक्षण आहे. तुम्ही जर्मनीचं उदाहरण दिलं तेव्हा "तिकडे बघा"वाली लोकं आठवली... तुमचं जर्मनीचं उदाहरण नेहमी स्वच्छ, शुद्ध पाणी पिणार्‍या लोकांचं होतं, देशाचं नाही हे मला कळलं.

आपल्या देशात बर्‍याच समस्या आहेत. त्यांना आपल्यालाच सामोरे जायला लागेल आणि दूर करायला लागेल. अशा समस्यांवर बाटलीबंद पाण्यासारखे उपाय काढून काही उपयोग नाही.

हिवरेबाजार पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाले. पण समोर एवढे धडधडीत उदाहरण असून सुद्धा त्याच्याच आजुबाजूची गावे अजूनही पाण्यासाठी वणवण करतात. पोपटरावांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की कितीही सरकारी योजना असल्या, माझी मोफत मार्गदर्शन करायची तयारी असली तरी त्या लोकांकडे स्वत:ला बदलण्याची इच्छाशक्ती नाही.

माझा काही गोंधळ झाला असेल तर अवश्य सांगा.

१. बहुसंख्य जनता सद्यस्थितीत घरी फिल्टर व बाहेर बाटलीबंद पाणी वापरते.
कारणः सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही असं जनतेला वाटतं

बहुसंख्य ? नक्की ??

की तुम्ही तुमच्या आसपासच्या (जे पुरेसे मध्यमवर्गीय अथवा उच्चभ्रू असावे असा आपला अंदाज) लोकांवरुन ठरवलेत हे.. (आमच्या गावच्या पंचक्रोशीत कोणी असले बाटलीतून पाणी पिणारे नैत ओ..) मी भारतातल्या बहुसंख्यांबद्दल बोलत होतो. तुम्ही नाशकातल्या अथवा मुंबईतल्या बहुसंख्यांबद्दल बोलत असाल तर गोष्ट वेगळी. :)

तुम्ही "प्यायला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, आम्ही फिल्टर लावणार नाही असा पवित्रा आपण लोक घेतच नाही." हे तर मान्य करताय पण त्याच वेळी "भारतातली सरकारी व्यवस्था पुरवत असलेले पाणी पिण्यायोग्य नाही असा समज चुकीचा आहे हा माझा मुद्दा" असे पण म्हणताय.
यातील पहिल्या वाक्याचा सरळ अर्थ आपल्याकडे अजूनही किमान शुध्दतेचे निकष पाळू शकेल असे पाणी बहुतेक ठिकाणी उपलब्ध नाही असाच होतो ना. तेव्हाच दुसरे वाक्य काय म्हणते की तरीही ते पाणी पिण्यायोग्य आहे . का ? (तर तसे तुम्हाला वाटते म्हणून)

एका प्रकारच्या पाण्याबद्दल आलेला टॉलरन्स दुसर्‍या पाण्याबाबत तोकडा पडतो. सतत शुद्ध पाणी पित राहल्याने काही विषाणूंविरोधात प्रतिकारशक्ती तयार होत नाही. मग अचानक त्या विषाणूमय पाण्याचे सेवन केले तर त्रास होतो..

याबद्दल थोडेफार बोलू शकेन अथवा दाखले देऊ शकेन पण इथल्या डॉक्टर्सना विचारलेत तर सोप्या शब्दात योग्य उत्तर मिळू शकेल तुम्हाला. पण या थिअरीने आजवर आपल्या देशातले लोक कॉलरा आणि काविळीसाठी अगदी प्रतिकारक्षम बनलेले असावेत नै का ?

डांगेसाहेब, तुमचे या बाबतीतले मत हे अशास्त्रीय आहे व चूक आहे असे माझे स्पष्ट मत आहे ( तुम्हाला "हे माझे मत आहे" असे म्हणायचे असल्यास माझी ना नाही पण ते चूक आहे हे ध्यानात घ्याल अशी अपेक्षा.) आणि इथे परत पहिल्या प्रतिसादातले माझे संशोधनाने ठरवलेले किमान शुद्धतेचे निकष यावर सिद्ध होणारे पाणी हेच पिण्यायोग्य पाणी असे म्हणणे उधृत करतो.

आपल्या देशात बर्‍याच समस्या आहेत. त्यांना आपल्यालाच सामोरे जायला लागेल आणि दूर करायला लागेल. अशा समस्यांवर बाटलीबंद पाण्यासारखे उपाय काढून काही उपयोग नाही.

हिवरेबाजार पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाले. पण समोर एवढे धडधडीत उदाहरण असून सुद्धा त्याच्याच आजुबाजूची गावे अजूनही पाण्यासाठी वणवण करतात. पोपटरावांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की कितीही सरकारी योजना असल्या, माझी मोफत मार्गदर्शन करायची तयारी असली तरी त्या लोकांकडे स्वत:ला बदलण्याची इच्छाशक्ती नाही.

बाकी मोघम अवांतराबद्दल तशी असहमती असण्याचे काहीच कारण नाही.
बादवे, २०११ च्या या लिंकनुसार पोपटराव पवार हे आदर्श ग्राम योजनेचे Executive Director आहेत, तेव्हा सरकार त्यांचे ऐकतेय आणि त्यामार्फत बरेचसे लोकपण ऐकतील अशी आशा करुयात.
असो, या धाग्यावरचे हे अवांतर इथेच थांबवू. अजून चर्चेसाठी याचा वेगळा धागा करण्यास हरकत नै (गरज असेल तर).

संदीप डांगे's picture

26 Apr 2015 - 4:42 pm | संदीप डांगे

आपल्याकडे अजूनही किमान शुध्दतेचे निकष पाळू शकेल असे पाणी बहुतेक ठिकाणी उपलब्ध नाही असाच होतो ना.

पण तुमच्या ह्या विधानाने घरपोच नळाने येणारे सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही हे कसे सिद्ध होते?

बहुसंख्य या शब्दावरून शाब्दिक धुळवडीची तशी आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्या कडे नियमीत सरकारी नळाने पाणी येते त्यापैकी बहुसंख्य लोकांकडे फिल्टर आहेत असा माझ्या विधानाचा अर्थ आहे. जनता या शब्दाचा अर्थ सर्व १२३ कोटी लोक असा सरसकट घेऊ नका.

माझा कुठेही गोंधळ झालेला नाही. माझा रो़ख ज्यांना सरकारी नळाने घरपोच पिण्यायोग्य पाणी मिळते तरी ते फिल्टर लावून असतात त्यांच्यावर आहे. ते दाखवत असलेल्या अविश्वासावर आहे. तुम्ही सर्व भारतीय जनतेला मिळणार्‍या पाण्याबद्दल बोलत आहात. हे दोन सर्वस्वी वेगळे मुद्दे आहेत. त्यानुषंगाने ही चर्चा काहीच उपयोगाची नाही.

या थिअरीने आजवर आपल्या देशातले लोक कॉलरा आणि काविळीसाठी अगदी प्रतिकारक्षम बनलेले असावेत नै का ?

वादच घालायचा असेल तर कुठलेही शब्द कसेही फिरवून आपण वाद घालू शकतो. त्याला माझी हरकत नाही. पण मी जे म्हटलंय त्याचा विपर्यास होऊ नये असं मला वाटतं.

१. अतिशुद्धीकरणाने चांगले जीवाणू व काही आवश्यक खनिजे पाण्यातून नाहीशी होऊन ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही असा ड्ब्लूएचओचा दावा आहे. त्याउलट पाण्यात ऑक्सीजन + हायड्रोजन शिवाय कशाचीच गरज नाही असे शुद्ध पाणी पुरवणार्‍या खाजगी कंपन्यांचा दावा आहे. यातला कुठला खरा तो तुम्हीच ओळखा. विशेष म्हणजे दोन्ही दावे शास्त्रीय माहितीवर आधारित आहेत असे दोघांचेही म्हणणे आहे.

२. 'काही' विषाणूंचा प्रथम संसर्ग शरिरात अँटी-बॉडीज तयार करतो. त्याच प्रकारच्या विषाणूंचा संपर्क परत आयुष्यात कधीही झाल्यास त्या अँटीबॉडीज चा फॉर्मुला तयार असल्याने त्वरीत आजार थोपवल्या जातो. सर्व आधुनिक लसी याच सिद्धांतावर आधारित आहेत. त्यात मी नवीन किंवा अशास्त्रीय काहीच सांगितले नाही. मी 'काही' शब्दाचा वापर केला आहे, 'सर्व' नाही.

३. कॉलराचा संसर्ग मानवी विष्ठेचा पिण्याच्या पाण्याशी संपर्क आल्याने होतो. तो संपर्क टाळल्याने कॉलराचा धोका कमी झालाय. असा संपर्क होण्याची शक्यता जास्त असणार्‍या वस्त्यांमधे फिल्टर वापरण्याची कुवत नसते. सबब हा वर्ग माझ्या प्रतिक्रियांचा भाग नाही.

माझा मुद्दा आणि विधाने अजुनही अतार्किक वाटत असतील तर तर्कशुद्ध आणि अभ्यासपुर्ण चर्चेसाठी नवा धागा काढण्यास काहीच हरकत नाही. यानिमित्ताने काही गोष्टी माहित झाल्या आहेत, त्या नविन धाग्यात सविस्तर मांडेन. जेणेकरून घरगुती फिल्टर वापरण्यातला फोलपणा लक्षात येईल.

तसेही हा धागा मुळात शुद्धतम पाण्याच्या व्यापाराबद्दल आहे, त्यामुळे ही चर्चा अवांतर आहे असे वाटत नाही.

आदूबाळ's picture

18 Apr 2015 - 1:01 pm | आदूबाळ

सहमत आहे.

एकीकडे बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा लाभ घ्यायचा आणि मग पर्यावरण पर्यावरण म्हणून बोंबलायचं, याला काय अर्थ आहे?

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2015 - 9:49 pm | नगरीनिरंजन

सहमत आहे. सिव्हिलायझेशन नष्ट करणे हा एकमेव उपाय आहे. पण स्वतःहून तसे कोणी करणार नाही म्हणूनच पर्यावरणाच्या लढ्यात-बिढ्यात उतरणे व्यर्थ वाटते.

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2015 - 11:49 am | चौथा कोनाडा

एक हजार टक्के सहमत !

" सिव्हिलायझेशन नष्ट करणे हा एकमेव उपाय आहे " या वर एक हजार टक्के सहमत !

आधी बरं होतं टार्झन सारखं ह्या झाडावरून त्या झाडावर हो ओ ओ .. करत फिरायचं .
(आठ्वा - हेमंत बिरजे आणि किमि काटकर चा सिनुमा)

चौथा कोनाडा's picture

5 May 2015 - 10:49 pm | चौथा कोनाडा

सिव्हिलायझेशन वरुन एकदम टारझन ?
नका त्या आठवणी काढु सिनेमाच्या अन किमी काटकरच्या !
ताम्बे साहेब, धाग्याचा प्रवाह कुणी कडे नेताय ?

बबन ताम्बे's picture

6 May 2015 - 3:07 pm | बबन ताम्बे

सिव्हिलायझेशन नष्ट करा अशी चर्चा चालली म्हणून चाकावर घसरलो. तुम्ही लगेच किमी काटकर वर घसरलात. :-) आता काय करते कोण जाणे. किमी काटकर, ममता कुलकर्णी ....

कपिलमुनी's picture

4 May 2015 - 5:02 pm | कपिलमुनी

तुमचे आणि ह्याचे विचार जुळतात :) :)

ultron

चुकलामाकला's picture

19 Apr 2015 - 4:38 pm | चुकलामाकला

१ हे म्हणजे तुम्ही मांसाहार करता ना मग वाघांच्या वा जंगली प्राण्यांच्या शिकरीविरुद्ध बोलणे दांभीकपणा झाला असे म्हणण्यासारखे आहे.
२ आणि हे म्हणजे मुंबैतील झोपडपट्टी वा मोकळ्या जागेवरिल अतिक्रमण अधि़क्रूत करण्यासारखे झाले. कधीतरी केले पाहिजेच ना?
३ मुद्दा ३ मान्य.
४ पण इथे प्रश्न बाट्लीबंद पाण्याचा वा परवडण्याचा नसुन जमिनीतील झर्यांच्या पाण्याचा आहे जो वरती स्वॅप्स यांनी व्यवस्थित समजावलेला आहे .
गैरसमज नसावा ही विनंती.

सानिकास्वप्निल's picture

18 Apr 2015 - 11:31 am | सानिकास्वप्निल

लेख व लेखनशैली आवडली.
तुम्ही दिलेल्या पहिल्या फोटोशिवाय इतर फोटो दिसत नाहिये.

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2015 - 6:33 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, सा-स्व,

सॉरी फॉर इन्कन्विनियन्स ! इतर फोटो टाकण्यासाठी सं. मंडळाला विनंती केलेली आहे. लवकरच टाकतील ते.
(अर्थात लेखाच्या आशयासाठी फोटो खुप महत्वाचे आहेत असं नाहीय, जस्ट सपोर्टिव्ह! )

बाबा पाटील's picture

18 Apr 2015 - 12:45 pm | बाबा पाटील

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक आहे.

सिरुसेरि's picture

18 Apr 2015 - 3:47 pm | सिरुसेरि

'कुरहाडीचा दांडा गोतास काळ' म्हणतात , त्याप्रमाणे आपण तो 'कुरहाडीचा दांडा' बनणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी . आणी अशा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक असणारया मिनरल पाणी , शीतपेये यांच्या प्रकल्पांना आपल्या गावापासुन , घरापासुन लांबच ठेवावे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Apr 2015 - 3:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सद्ध्या कमाल भु धारणकायदा रद्द झालाय का? का फक्त पैसावाल्यांना सगळं माफ आहे?

विअर्ड विक्स's picture

18 Apr 2015 - 5:04 pm | विअर्ड विक्स

लेख आवडला.अगर पर्यावरणाच्या दृष्टीने इतका sensitive zone असेल तर तो तसा घोषित सरकारने केला पाहिजे. Bottling plant आणि spring water यात फरक आहे. दोघांना एका पारड्यात तोलू नका.
Bottling plant ला सरसकट परवाने मिळणे ही सरकारची चूक आहे पण spring water हे दुर्मिळ असते व हे व्यावसयिक जाणून असतो म्हणून तो भरघोस उपसा करत नाही… ( सोन्याची कोंबडी उद्योजक स्वतः कधीच कापणार नाही )

लेखाचा आशय हा यशस्वी नि कल्पक उद्योजकता आहे , पर्यावरण ऱ्हास नव्हे.

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2015 - 11:40 pm | नगरीनिरंजन

सोन्याची कोंबडी उद्योजक स्वतः कधीच कापणार नाही )

उद्योजक म्हणजे आजच्या काळातले प्रतिपरमेश्वर झालेत. सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ति| त्यामुळे असे होणे स्वाभाविक आहे म्हणा; पण जगात इतरत्र घडणार्‍या घटना आपल्या समजाला फारसा आधार देत नाहीत.
मुळात अशा ठिकाणचं पाणी उपसून बाहेर विकणे म्हणजेच सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीच्या मानेवर सुरी फिरवण्यासारखं आहे. प्लँटचा खर्च व इन्फ्लेशन धरुन लुथरा साहेबांना दरवर्षी गुंतवणुकीवरच्या परताव्यात दरवर्षी वाढ अपेक्षित असणार. गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणी न विकता ही वाढ कशी मिळणार हे सांगू शकाल काय? आणि जर दरवर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणी विकायचे टारगेट असेल तर त्यांच्या टारगेटसाठी वरुणदेव दरवर्षी तेवढा जास्त पाऊस पाडणार की काय? नसेल तर मग कधीना कधी हे पाणी संपेल की नाही?

विअर्ड विक्स's picture

18 Apr 2015 - 11:50 pm | विअर्ड विक्स

जसे खनिज तेल संपणार तसे भूजल साठा हा कधी न कधी संपणारच !!!!! त्यासाठी त्यांनी replenishment वा remineralisation चे future प्लान केले असतीलच… एकदा ब्रांड विकसित झाला कि खरेच ते भूगर्भातून येतंय का remineralised केले जातंय हे सोयीस्कररीत्या लपविता येते.

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2015 - 11:53 pm | नगरीनिरंजन

आणि याला तुम्ही यशस्वी व कल्पक उद्योजकता म्हणता?

यशस्वी तर आहेच. कल्पक असेल किंवा नसेल.

नगरीनिरंजन's picture

19 Apr 2015 - 7:50 pm | नगरीनिरंजन

भरपूर पैसे कमवणे म्हणजे यशस्वी ही व्याख्या मी विसरलो होतो म्हणून अशी चूक झाली. :-)

विअर्ड विक्स's picture

19 Apr 2015 - 7:48 pm | विअर्ड विक्स

स्वतःच हॉटेलचा व्यवसाय करायचे स्वप्न बाजूला ठेऊन एका कल्पनेवर विश्वास ठेऊन तो व्यवसाय यशस्वी करणे याला माझ्या दृष्टीने कल्पकताच म्हणतात... हे एक धाडसच होते , कारण हॉटेल व्यवसायासाठी केलेलेइ सर्व मेहेनत बाजूला ठेऊन पुन्हा नव्याने अभ्यास करणे सोपी गोष्ट नाही.

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2015 - 11:54 am | चौथा कोनाडा

अगदी अगदी सहमत !

चर्चा सुरु होता होता "अमर्याद पाणी उपसा व त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान" या कडे वळली!

मनिमौ's picture

18 Apr 2015 - 5:46 pm | मनिमौ

बाटलीबंद पाणी आणी शीतपेये विकत न घेणे हा एक ऊपाय होऊ शकतो

पैसा's picture

18 Apr 2015 - 8:21 pm | पैसा

तुमची लिखाणाची शैली छान आहे. मात्र शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योगपतीने सपाट्याने विकत घेणे आणि झर्‍याच्या पाण्याचा असा उपसा करणे अत्यंत भयावह वाटले. १५०० एकर्सच्या वर जमीन सगळे शेतकरी सुखासुखी विकायला तयार जाले, तेही जमिनीत जिवंत झरे असल्याचे माहीत असताना हे वाचायला प्रचंड विचित्र वाटले.

ताजा कलमः नवीन लुथ्रा हे टाईम्स ग्रुपशी तसेच रिडिफशी संबंधित आहेत. तसेच MagicBricks.com या प्रॉपर्टीच्या व्यवहारांशी संबंधित साईटचे प्रमुख आहेत असे शोध घेता समजले. हिंदी सिनेमाशीही संबंधित असावेत. आता गप्प बसते.

नगरीनिरंजन's picture

19 Apr 2015 - 5:32 am | नगरीनिरंजन

लुथरा साहेबांची नातवंडं पाण्याऐवजी ते अब्जावधी रुपयेच पिणार आहेत. :-) शेतकर्‍यांच्या नावाने ग्ळा काढणारे लोक धडाधड आपल्या जमिनी विकणार्‍यांबद्दलअवाक्षरही काढत नाहीत हे उदाहरणार्थ रोचक वगैरे आहे.
बाकी कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची स्वप्नं पाहणार्‍यांनी येत्या पाच-दहा वर्षात कॅलिफोर्नियात काय होतेय ते पाहावे म्हणजे अजून पंचवीस वर्षांनी कोकणात काय होईल ते कळेल.
http://www.wired.com/2015/03/californias-run-water-act-now/

विशेष म्हणजे नेसले कंपनी अजूनही तिथलं पाणी बाटल्यांमध्ये भरुन विकतेच आहे. द मोर थिंग्ज चेंज द मोर दे रिमेन द सेम या न्यायाने आपलं भविष्य काय आहे ते कळायला भविष्यवेत्त्यांची गरज नाही.
http://www.takepart.com/article/2015/04/14/arrowhead-spring-water-expired-permit?cmpid=tpnews-eml-2015-04-18-arrowhead

पैसा's picture

18 Apr 2015 - 9:01 pm | पैसा

शेट्टीसारखे दिसणारे ४/६ जण येऊन गळ्यात पडून प्रेमाने समजावायला लागले नसतील कशावरून?!

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2015 - 9:19 pm | नगरीनिरंजन

शक्यता आहे. तसंही असेल. पण मग "काळी आई" वगैरे म्हणू नये कारण शेट्टीसारखे दिसणारे लाखो येऊन गळ्यात पडले तरी कोणी आई विकणार नाही. :-)

प्रसाद१९७१'s picture

23 Apr 2015 - 2:16 pm | प्रसाद१९७१

ये ब्बात ननि!!!

मार्मिक गोडसे's picture

19 Apr 2015 - 5:53 pm | मार्मिक गोडसे

इंडिअन इजमेंट अ‍ॅक्ट नुसार जमिनीत मुरलेल्या पाण्यावर जमिनीच्या मालकाचा हक्क असतो. त्याच्या मालकीच्या जमिनीवरून वाहनार्‍या पाण्याचा वापर पिण्याकरता,शेतिकरता करू शकतो परंतू पाण्याचा नैसर्गिक मार्ग अडवू किंवा बदलू शकत नाही व त्या पाण्यावर संपुर्ण मालकी दाखवू शकत नाही. पाण्याच्या मार्गाच्या आजुबाजुला विहिर खोद्ल्यास झिरपलेल्या पाण्यावर त्याचा पुर्ण हक्क असतो जो वर हे झिरपलेले पाणी नैसर्गिक झर्‍याद्वारे विहिरित पडते तोवर , कृत्रिमरित्या (आडवे बोअर) मारून विहिरित झर्‍याचे पाणी ओढल्यास मालकावर कायदेशीर कारवाही होऊ शकते.

म्हणजे लुथरांनी जिथं खणलं होतं तो "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” होता !

ह्याचा अर्थ लुथरांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीत विहिर खणली व नैसर्गीक झर्‍यांद्वारे विहिरीच्या पाण्याचा व्यावसाईक वापर करत आहेत जे पूर्णपणे कायदेशीर आहे. जर इंडिअन इजमेंट अ‍ॅक्टचे उल्लंघन होत असेल तर जरूर पर्यावरणप्रेमीं किंवा जागरूक नागरिकांनी आंदोलन करावे.

बबन ताम्बे's picture

20 Apr 2015 - 12:11 pm | बबन ताम्बे

एक शंका आहे. असे वैयक्तीक पातळीवर १५०० एकर जमीन घेता येते का? कमाल जमीन धारणा कायदा आहे ना?
की पैसेवाल्यांना हा प्रॉब्लेम कधी येत नाही ?

नितिन५८८'s picture

20 Apr 2015 - 1:26 pm | नितिन५८८

बबन ताम्बे तुमच्यासाठी हा धागा http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4...

बबन ताम्बे's picture

20 Apr 2015 - 2:18 pm | बबन ताम्बे

विकिपीडीयावर फार माहीती नाहिय. पण गूगल करून एक लेख हाती लागला. :-)

http://zeenews.india.com/marathi/news/exclusive/divisional-commissioner-...

१९६१ च्या कायद्यानुसार एक व्यक्ती किंवा कुटुम्बाच्या मालकीची ५४ एकर पेक्षा जास्त जमीन असता कामा नये असे कायदा सांगतो असे त्या लेखात लिहीले आहे.

सुनिल जोग's picture

20 Apr 2015 - 3:41 pm | सुनिल जोग

उत्त्त्म कथा. आणि अनुबव ! मराठी मनाल सम्पतीचे वावडॅ आहे. तसेच एखाध्याने सम्पती मिळवली की ती अवैध्पणे कशी मिळवली आणि असे मिळ॑वणे कसे गैर आहे हे सिद्ध करण्यात सारेजण गुन्तुन जातात. आपण का असा विचार करु शकलो नाहि हा विचारच त्याण्च्या मनात येत नाहि. असो

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2015 - 11:59 am | चौथा कोनाडा

१०० % सहमत !

"आपण का असा विचार करु शकलो नाही" हे दुर्दैवी !

मराठी_माणूस's picture

23 Apr 2015 - 1:21 pm | मराठी_माणूस

मराठी मनाल सम्पतीचे वावडॅ आहे.

हे चुकीचे आहे. त्यापेक्षा "मराठी मनाला अवैध संपत्तीचे वावडे आहे" म्हणणे हे ज्यास्त योग्य आहे आणि अभिमानास्पद सुध्दा.

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2015 - 3:58 pm | चौथा कोनाडा

कोटी आवडली. या पुढे असल्या विषयावर कमेंट करताना हे लक्षात ठेवावे लागणार. :-)

आता वैध, अवैध यांच्या व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या असणार हे ओघाने आलेच.
आता मुळशी स्प्रिंग वॉटरची निर्मिती ही अवैध मार्गाने झालीय का आ अजुन एक संशोधनाचा विषय !

खरेच ? तुम्हाला राजकारणी सोडुन म्हणायचे असेल !

गुनि's picture

20 Apr 2015 - 3:48 pm | गुनि

सहमत ...... लेखन उत्तम

मार्मिक गोडसे's picture

21 Apr 2015 - 11:16 am | मार्मिक गोडसे

कमाल जमिन धारना कायद्यानुसार शहरात जमीनीचे सिलिंग शहराच्या दर्जानुसार ठरवले जाते. सिंचनाच्या प्रकारानुसार शेतिचे सिलिंग ठरवले जाते. परंतू अधीकतम ५४ एकरची मर्यादा असते.
एखादी व्यक्ती १५०० एकर जमिन कायदेशीरपणे कशी बाळगू शकतो असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. उद्योगाच्या नावाखाली अशी सवलत मिळते. ती कायद्याच्या चौकटित कशी बसवायची ह्यासाठी कायदे सल्लागारांची फौज असते. अशा गुंतागुंतिच्या विषयावर मिपावरील एखादा वकिल सदस्य अधिक प्रकाश टाकू शकेल (मोफत सल्ल्याची शक्यता कमीच). अशा व्यवहारांत कलेक्टरची भुमिका महत्वाची असते.

सतीश कुडतरकर's picture

21 Apr 2015 - 2:50 pm | सतीश कुडतरकर

अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP the biological hotspot.>>>>>++१०००००००

याचीच पुढची पायरी कोण्क्रीट जंगल. लोणावळा आणि परीसर पाहून उलटी येते. गेल्याच महिन्यात मुळशी धरणाच्या शेजारी असलेल्या भांबर्डे गावात गेलेलो. शेजारी एव्हढे मोठे धरण असूनही यांना मात्र शेतीसाठी पाणी देत नाहीत.

एस's picture

23 Apr 2015 - 11:50 am | एस

सहमत.

हे पाहून दया पवारांची 'बाई मी धरण बांधिते, माझं मरण कांडिते' ही कविता आठवते...!

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2015 - 12:01 pm | चौथा कोनाडा

हो, ना. मागच्याच आठवड्यात नाशिकमध्ये स्वतः मेधा पाटकरांना पुनरवसनासाठी उतरावे लागले ! सामान्य माणसांना सरकारी यंत्रणा वर्षानुवर्षे दादच देत नव्हती !

नगरीनिरंजन's picture

23 Apr 2015 - 7:52 pm | नगरीनिरंजन

आपण प्रत्येकाशीच सहमत होऊ शकत असल्याचे पाहून आपल्याबद्दल आदर वाढला आहे!

आदूबाळ's picture

23 Apr 2015 - 7:56 pm | आदूबाळ

=))

आनंदी गोपाळबुवांच्या एक्सेलशीटमध्ये यांच्यासाठी नवीन क्लासिफिकेशन खोलायला लागेल बहुतेक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2015 - 12:45 am | डॉ सुहास म्हात्रे

एकाच झटक्यात इतक्या लोकान्ना ओरखडे काहाडू नै ;) :) =))

स्वधर्म's picture

23 Apr 2015 - 1:17 pm | स्वधर्म

धागालेखकाने मोठ्या कौतुकाने कल्पक उद्योजकाची कहाणी सांगितली अाहे. त्यावर RIP the biological hotspot अशी प्रतिक्रीयाही अाली अाहे. काही जण संपत्ती कमावणार्यांबाबत असूया वाटणे, हा कसा मराठी दुर्गुण अाहे, असे म्हणत अाहेत. सत्य मोठं व्यामिश्र अाहे.
अशा कल्पक उद्योजकांबाबत कौतुक वाटणं, कधीच बंद झालंय. मानवाच्या क्षुद्र व्यावसायिक ध्येयापोटी निसर्गावर होणारे अत्याचार पाहून नीट प्रतिक्रीयाही सुचत नाहीए. पोटात गोळा अाला.

जसे की वाळू माफिया (नद्यांतून अमर्याद वाळु उपसणे), बिल्डर्स (डोंगर, टेकड्या फोडणे आणि त्यावर इमारती उठवणे), स्मगलर्स ( बेसुमार जंगलतोड, हस्तीदंतांसाठी हत्तींची शिकार, वाघांची, हरणांची शिकार)
निसर्गाचा प्रचंड -हास झालाय पण पर्वा कोण करतो .

एक एकटा एकटाच's picture

26 Apr 2015 - 1:26 pm | एक एकटा एकटाच

लेख आवडला

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 7:15 pm | टवाळ कार्टा

सर्कार पुरवत असलेले पाणी हे अगदीच वाईट आहे असे नाही याबाबत सहमत, मी सुध्धा शक्य असेल तेव्हा नळाचेच पाणी पितो (पण त्याच्बरोबर शक्य असेल तेव्हा उकळून व गाळूनसुध्धा घेतो)...पण सगळीकडे अशीच परिस्थिती आहे आणि ती भविष्यातही कमीतकमी वाईट नाही होणार असा सूर बघून ड्वाळे पाणावले :)