(२०१५: बारावीनंतर मेडिकलसाठी ) उत्तरार्ध..

Primary tabs

खेडूत's picture
खेडूत in काथ्याकूट
15 Apr 2015 - 9:46 am
गाभा: 

बरोबर एक वर्षापूर्वी बारावीनंतर मेडिकलसाठी प्रवेशासंबंधी मी एक मदतधागा काढला होता . त्यातील चर्चा झालेल्या मुद्द्यांचा आणि इतर परिचितांच्या सल्ल्याचा विचार करून आमच्या पाल्याने बारावीनंतर मेडिकल (MBBS) ला जाणे नक्की केले आहे. मेडिकलला जाण्याबाबत सर्व नकारात्मक मुद्दे लक्षात घेऊनही ''रुग्णसेवेची आवड- आणि भारतातच राहायचे आहे '' या मुद्द्यावर निर्णय झाला आहे. तयारी सुरु आहे . इतर परिचित डॉक्टर्स आणि काही मिपाकरांनी छान माहिती आणि सल्ला दिला. त्यासाठी त्यांचे आभार.

तर मेडिकल प्रवेश परीक्षांची तयारी करताना वर्षभरात मिळालेली खालील माहिती संकलित करून सर्वांच्या सोयीसाठी इथे एकत्र देत आहे. अर्थात ही माहिती सध्या लागू असली तरी दरवर्षी त्यात बदल होत असतात त्यामुळे एक दोन वर्ष आधी म्हणजे मेडिकलेच्छूक पाल्य दहावीत असताना ताजी माहिती मिळवावी आणि स्वतःला अपडेटवत रहावे . पाल्याने आपला कल लवकर/ वेळ हातात असताना जाहीर केल्यास निश्चितच फायद्याचं ठरतं.

काही महत्वाच्या संस्थांचे प्रातिनिधिक दुवे (सरकारी आणि खासगी ) इथे चिकटवले आहेत .

http://www.mciindia.org/

https://www.mgims.ac.in/

http://afmc.nic.in/

http://www.aiims.edu/en.html

http://www.kleuniversity.edu.in/

http://jipmer.edu.in/

शिवाय इतरही दुवे थोडे शोधले की सापडतील.

देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांची यादी आणि प्रवेशक्षमता:

बारावीच्या परीक्षेत पन्नास टक्क्याहून अधिक गुण आणि संबंधित प्रवेश परीक्षेचे गुण अशा निकषावर देशात बहुतेक कॉलेजात MBBS ला प्रवेश मिळतात.

संपूर्ण महाराष्ट्राचं एकच आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्याने मिळेल तिथे प्राधान्याने सरकारी कॉलेजात कुठेही प्रवेश घेतला तरी चालेल. अर्थात उत्तम गुण असतील तर प्रमुख शहरातली सरकारी महाविद्यालये मिळतील. प्रमुख शहरातली अशासाठी , की नुसते MBBS करायचे दिवस पूर्वीच मागे पडलेत आणि दुसऱ्या वर्षीपासूनच उरलेली तीनचार वर्षे पदव्युत्तर मेडिकल प्रवेश परीक्षेचे क्लासेस लावले जातात. ही सोय दूरच्या सरकारी कॉलेज असलेल्या गावात मिळणार नाही, किंवा तसा पदव्युत्तर प्रवेशेछुक क्राउड जास्त नसल्याने स्पर्धेचे वातावरण मिळणार नाही. पदव्युत्तर साठी एका कॉलेजात एका स्पेशलायझेशनला साधारण दोनतीनच जागा आहेत - एक राखीव एक सर्वसाधारण. राखीव मध्ये रोटेशनने एकेका जातीला चारेक वर्षांनी संधी मिळणार ! म्हणजे हे तर अन्यायाचंच रोटेशन म्हणायचं !

इतर काही निरीक्षणे आणि माहिती अशी:

१. सरकारी नाही मिळालं तर पुढचा पर्याय खासगी मेडिकल कॉलेजचा! यातली काही आरोग्य विज्ञान विद्यापीठात सामील नाहीत आणि आपले अभ्यासक्रम चालवतात. त्यांचा सगळा जोर व्यवस्थापनाच्या जागांमधून पैसे काढण्यावर असतो. तरीही त्यांना ८५% जागा गुणवत्तेनुसार + नेहमीच्या आरक्षणानुसार भराव्या लागतात. त्यामुळे त्यांनी प्रवेश क्षमताच वाढवून गुणवत्ता पात्तळ करून ठेवली आहे. तिथे जावंच लागलं तर त्यापैकी कुठल्या कॉलेजचे रुग्णालय चांगले चालते याची चौकशी/ खात्री करावी. कुणी फार न शिकवता अभ्यास स्वतः करायची तयारी ठेवावी. जरासे बरे कॉलेज महाग असणार हे ओघानेच आले. सध्या तिथे चार ते आठ लाख दरवर्षी खर्च येतो असे समजले.

सरकारी न मिळाल्यास आणि खासगीही जमत नसेल तर काय? मग शेवटी अभिमत विद्यापीठ. महाराष्ट्रात तरी एकही चांगले नाही. सगळी गोलमाल आहेत. पण १९८३ च्या शिक्षणप्रसार लाटेअगोदर इतर राज्यांत स्थापन झालेली काही कॉलेजेस पन्नास वर्षांपूर्वीही होती त्यात जायला हरकत नाही. त्यांचा उद्देश निव्वळ कमावणे हा वाटला नाही.

२. मेडिकलला अतिशय तीव्र स्पर्धा असल्याने सर्व इच्छुक सर्व परीक्षा देतात. सगळ्यांनाच अनिश्चितता वाटते- त्यामुळे अतिहुशार आणि अतिसामान्य अन मधले प्रचंड बहुसंख्य सर्वच परीक्षांना गर्दी करतात. सव्वासात लाखातून एक्कावन्न हजार मुलांना कुठेतरी प्रवेश मिळतो. सरकारी कॉलेजात केवळ अडीच टक्के परीक्षार्थी मंडळी जातात! सरकारी सोडून इतर ठिकाणी परीक्षार्थी पन्नास हजार ते एक लाख इतके कमी होतात. स्पर्धा काहीशी सुसह्य होते. फी दहापट वाढते. म्हणूनच आपल्याला मिळण्याची सर्वाधिक शक्यता आणि सोयीस्कर अशी कॉलेजे निवडावीत.

३. मी शोधताना सुमारे तीस प्रकारच्या प्रवेश परीक्षा देशात उपलब्ध आहेत असे दिसले. कदाचित अजून काही राहून गेल्या असतील. सारख्याच तारखा आल्याने काही परीक्षा देता येत नाहीत. आम्ही आठच निवडल्या आहेत.

४. अखिल भारतीय पातळीवरच्या (AIPMT) प्रवेश परीक्षेतल्या गुणांवर देशभरातल्या कॉलेजात १५% जागा असतात हा एक चुकीचा समज आहे. म्हणजे गेल्या वर्षी माझा तरी होता . केवळ सहासातच राज्ये ही परीक्षा मानतात. उदा. कर्नाटकात तर ही मानतच नाहीत, वर शालेय जीवनात सात वर्षे तरी कर्नाटकात शिकलेले पाहिजे वगैरे अटी आहेत!

या परीक्षेचा एकच फायदा म्हणजे पुण्यातल्या AFMC च्या प्रवेशासाठी ही परीक्षा ग्राह्य धरतात.

५. अनेक परीक्षा महाराष्ट्रात फक्त मुंबईत देता येतात. त्यांची केंद्रे पश्चिम उपनगरांत दूरवर असतात. ती पनवेल-नवी मुंबईत असती तर अवघ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा दुवा मिळाला असता. पण विचार कोण करेल? झक मारत आदल्या दिवशी मुंबईत हॉटेल घेऊन रहा अन द्या परीक्षा ! उदा. अशाच गांधीवादी विचारांचे म्हणवणाऱ्या सरकारी संस्थेचा फॉर्म रु . ५००० ला अन परीक्षा मुंबईत - पार्ल्याला - सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी आहे . हे झाले एक उदाहरण - बाकी सगळ्यांची काहीतरी गम्मत जम्मत आहेच. या आठ ते दहा परीक्षा देताना साधारण एक लाखाच्या आसपास खर्च होतो.

६. या तीस पैकी कुठल्या परीक्षा द्यायच्या? एखादी परीक्षा निवडताना :

- अकरावी + बारावी दोन्ही आधारित आहे का? की फक्त बारावी?

- चुकलेल्या उत्तराला उणे गुण देतात का?

- किती अन कोणती कॉलेजेस या परीक्षेतल्या गुणांवर प्रवेश देतात?

- किती जागा आहेत ? सध्या लागू असलेले आरक्षण वगळून आपल्यासाठी किती रहातात याचा विचार जरूर करावा.

उदा: पोंडीचेरी किंवा पंजाबमध्ये एखाद्या कॉलेजात जर साताठ जागा आपल्यासाठी उरत असल्या तर सोलापूर किंवा जालन्यातून कांदिवलीला परीक्षेला जाउन फक्त मनस्ताप होईल. त्यापेक्षा ''जरा'' चांगला अभ्यास करून महाराष्ट्रातच एखाद्या बऱ्या खासगी कॉलेजला प्रवेश मिळेल. अर्थात ज्याचे त्याचे विचार वेगळे. आपण नेमके कुठे आहोत हे चाणाक्ष पाल्य ओळखून असतात! तीसमधून आठदहा सी ई टी द्याव्या लागतात पण त्या निवडताना दमछाक होते!

७. पैसे भरलेत म्हणून क्लासला शेवटपर्यंत जाऊ नये - जाण्याचा खराच उपयोग होतो का? हे पाहावे. सगळ्यांना सारखाच वेळ मिळतो आहे- तो कोण कसा वापरतो याचा कस लागतो. हे इतरत्रही लागू होते, पण इथे विशेष करून जाणवतं. एक सरधोपट नियम म्हणून: ''रोज साडेचारशे बहुपर्यायी उत्तरांचे प्रश्न ( MCQ ) सप्टेंबर पासून नियमितपणे सोडवावेत'' असं यशस्वी लोकांकडून सांगितलं जातं.

८. हुकुमी यशाचा काहीही फॉर्म्युला नाही ! त्यामुळे अगदी नाहीच जमलं तर असावी म्हणून JEE देऊन ठेवली आहे. तिथे एक गुण असेल तरीही अभियांत्रिकी कुठं नाही गेलं ! तिथे राज्यात दरसाल साठ हजार जागा मोकळ्याच पडतात ! काय शिक्षणव्यवस्था आहे! वा!

९. इतर दुर्लक्षित देश किंवा रशियाला जाण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनी या ठिकाणी अधिक माहिती घ्यावी. आपल्यापेक्षा दहाबारा लाख कमीच लागतात ! अर्थात कांही तोटा असल्यास माहीत नाही , जाणारे सर्व लोक तिथल्या कोर्सेस बद्दल चांगलेच बोलतात. गेली साताठ वर्षे , वर्षाला किमान शंभर मराठी मुलेमुली तिकडे जात आहेत असे एका वैद्यकीय प्राध्यापकाने सांगितले. त्यांचा मुलगाही त्यांनी तिकडे पाठवला आहे. हा पर्याय चौकशी शिवाय मुळीच निवडू नये! तिथून डॉक्टर झाल्यावर कुठे काम करता येईल - कुठे नाही हे स्पष्ट समजून घ्यावे. भारत सरकारची मान्यता नसल्याने कुठल्या परीक्षा द्याव्या लागतील? की शिक्षणानंतर परदेशात कामही करता येते? पदव्युत्तर साठी कुठे पात्र ठरतो? त्यासाठी काय खर्च येतो? वगैरे विचारून घ्यावे. फसवले जाण्याची शक्यता असू शकते.

१०. परदेशातील मंडळीना तिथले नागरिकत्व नसल्याने भारतात वैद्यकीय प्रवेश पाहिजे असल्यास व्यवस्थापन कोट्यातून तो मिळतो. पण बारावीला पी सी बी शिवाय इंग्रजी विषय असावाच लागतो. अन्यथा भारतात कुठेही प्रवेश मिळत नाही. तिकडे शिकताना शास्त्र शाखेत राहून इंग्रजी विषय घेता येत नाही त्यामुळे इथे परत येउन निव्वळ इंग्रजीसाठी पुन्हा बारावी करावी लागते! मग तुम्ही इंग्लंडमध्ये बारावी झालात तरीही यातून सूट नाही!

(याच नियमामुळे मी गेल्या वर्षी योग्य वेळीच भारतात परतलो होतो.)

आत्ता किंवा आधी- या प्रक्रियेतून गेलेल्यांनी माहितीत शक्यतो भर घालावी.
पुन्हा धन्यवाद!

(वि. सू. : मेडिकलचा प्रवेश हा विषय त्या कुटुंबांपुरता संवेदनशील होतो. त्यामुळे ही माहिती,आणि हे विचार धागाकर्त्याचे वैयक्तिक असून प्रत्यक्ष निर्णय घेताना स्वतः चौकशी आणि पूर्ण विचार करून आपल्या जबाबदारीवर घ्यावा !)

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

15 Apr 2015 - 3:03 pm | वेल्लाभट

छे!
धागा वाचून एकदम दडपण आलं कसलंसं. नकोच. बंद करतोय विंडो.

आनंदी गोपाळ's picture

16 Apr 2015 - 11:42 pm | आनंदी गोपाळ

तेव्हा बेसिकपासून सुरुवात करतो.

मेडिकलला जाण्याबाबत सर्व नकारात्मक मुद्दे लक्षात घेऊनही ''रुग्णसेवेची आवड- आणि भारतातच राहायचे आहे '' या मुद्द्यावर निर्णय झाला आहे.

निर्णय उत्तम आहे. नव्या डॉक्टरसाहेबांचे स्वागत.

आता या तुमच्या लेखात, "मेडिकलला जायचा जीवतोड प्रयत्न करण्याचा निर्णय झाला आहे", असे असते, तर मला अधिक आनंद झाला असता. असंख्य व्हेरिएबल्स आहेत जी ऐनवेळी परिक्षेतील/अ‍ॅडमिशनमधील यशावर परिणाम करत असतात. अगदी प्रेफरन्स फॉर्म भरताना खालीवर झाले, तरी लोचा होतो. तुमच्या पाल्याला सीईटी क्रॅक करण्यासाठी मनोमन शुभेच्छा. पास होने के बाद, मुष्किल राहोंका सफर करने जा रहा है बच्चा!

मेडीकललाच जायचं, अन मेडीकलला जायचा प्रचण्ड प्रयत्न करायचा यात माझ्या मते बेसिक फरक आहे, व तो प्रयत्नही "शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतूनच" मेडीकलला जाईन इतपत सीमीत ठेवावा असे माझे वैयक्तिक मत आहे.

एक मुद्दा हा, की स . म . जा, प्रवेशपरिक्षेत अपयश आले, तर हिरमोड होता कामा नये. मेडिसीन ही एक करियर ऑपॉर्च्युनिटी आहे. ती इतर सर्व क्षेत्रांसारखीच प्रचण्ड हार्डवर्क, व इतर अनेक क्षेत्रांपेक्षा कित्येकपट अधिक जबाबदारीची आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. मी स्वतः इंजिनियरिंग व मेडिकल दोन्ही फॉर्म भरले होते. इंजिनियरिंगला त्याकाळी इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच लै 'हिप' होती. सीओईपीत ती मिळत नव्हती म्हणून मग बीजे ची सीट घेऊन टाकली होती. अर्थात, हेच नाही मिळाले तर तेही असते, ही जाण मुलांत असणे, तयार करणे महत्वाचे. बाबा रे, तुझे उद्दीष्ट स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहून आयुष्य जगण्याचे असले पाहिजे. मी तुला माझ्याच्याने जितकी होईल तितकी मदत करीनच. पण तुझ्या प्रयत्नांवरच सगळे आहे. हा नाही जमला तर तोही प्रयत्न करता येईल हे लक्षात ठेव, हे प्लीजच मुलांना सांगा.

दुसरा मुद्दा,
पैसे फेकून अ‍ॅडमिशन घेता येत असेल, तर ४-६ करोड रुपयांत एम्बीबीएस प्लस पीजी परिक्षा (एमेस्/एम्डी)सकट पास करून देण्याचे प्याकेज मिळवून द्यायची जबाबदारी माझी. अगदीच एमसीएच/डीएम वगैरे सुपरस्पेशालिटी हवी असेल तर एकाद दोन खोकी जास्त. लै दलाल ठावकी आहेत. पण, या रस्त्यावर जायचे की नाही ती तुमची मर्जी.

आता निर्णय झालाच आहे, तर पुढचे.

तुम्ही मेडिकल अ‍ॅडमिशनचा लैच डीप स्टडी केलाय राव. मी स्वत:च्या मुलीसाठी इतका स्टडी केला नव्हता, कारण आमची एंट्रन्सची तयारी 'सरकारी कालेजात अ‍ॅडमिशन' इतकीच लिमिटेड होती. खासगी मेडिकल कॉलेजातून डॉक्टर होणारच नाही, यावर ती (व मीही) ठाम होती. अ‍ॅडमिशन बर्‍याच रिसेंटली मुंबैतल्याच सर्कारी कालेजात मिळाली आहे, इतके नोंदवून थांबतो.

पैशांचाच हिशोब केला, तर सरकारी कॉलेजांतूनही फी भरपूर आहे, प्लस रहाणे, जेवणे, लेणे व पुस्तके इ. वर अ‍ॅवरेज महिना २०-३० हजारापर्यंत खर्च जाऊ शकतो. (यात पीजी सीईटीच्या क्लासची फी देखिल गृहित धरली आहे. मुलांना पियरप्रेशरपायी हे क्लासेस लावावेच लागतात.) इतर कोणत्याही प्रोफेशनल शिक्षणासारखेच हेदेखिल खर्चिक आहेच.

***

(याच नियमामुळे मी गेल्या वर्षी योग्य वेळीच भारतात परतलो होतो.)

..
इमर्जन्सीपायी प्रतिसाद अपूर्ण आहे. कृपया बूच मारू नये. मिपाने स्वयंसंपादन दिले आहे असे ऐकतो. परत आलो की प्रतिसाद पूर्ण करीन.
..
पुढे चालू:
..
तर, या वरच्या क्वोटवरून असे दिसते, की तुम्ही तुमच्या स्वतःच्या करियरमधे मोठा बदल केवळ मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी घडवलेला आहे. हे केल्यानंतर, मी वर लिहिलेल्या दुसर्‍या शक्यतेचा तुम्ही अवलंब करणार आहात काय?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून मिळणार्‍या ज्ञानाच्या दर्जाबाबतही आजकाल प्रश्नचिह्न लागते आहे. अनेक नवी मेडिकल कॉलेजेस, रुग्णालयांच्या व प्राध्यापकसंख्येच्या आभावी मुलांना फारसे शिक्षण देऊ शकत नाहीत. तरीही, बहुसंख्य (बहुतेक सगळ्याच) खासगी वैद्यकीय महाविद्यालये व डीम्ड युनिवर्सिटीज पेक्षा चांगली आहेत. मुख्य सीईटी सोबतच काशीबाई नवले सारख्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो, जिथली वार्षिक फी साडेसहा लाख रुपये फक्त आहे. (माझ्या शेवटल्या माहिती नुसार)

अगदीच सरकारी नाही मिळाली, तर असोसिएट सीईटी मधून त्यातल्या त्यात चांगली रेप्युटेशन असलेल्या खासगी कॉलेजात मेरिटसीटवर अ‍ॅडमिशन घ्यावी.

प्रवराची डीम्ड युनिवर्सिटी झाली की नाही अजून ते ठाउक नाही, पण ते एक बरे कॉलेज आहे.

तेव्हा, चॉइसेस देताना, सर्वप्रथम मुंबई महापालिकेची कॉलेजेस, त्यानंतर मुंबईतील सरकारी म्हणजेच जेजे, नंतर पुण्याचे बीजे, मग इतर महाराष्ट्र सरकारी. मग मुंबैपुण्यातली खासगी मेरिट सीट्स, नंतर इतर असो.सीईटी मेरीट सीट्स. इतपत चॉइस ठेवा. यात रिझर्वेशने, मुलगी, रेस्ट ऑफ महाराष्ट्र वगैरे भानगडी असतात. पण त्या असोत. इतक्या कालेजांत अ‍ॅडमिशन मिळत नसेल अन डाक्टरच व्हायचे असेल, तर मग खोकी हवीत. अन हे खोके प्रकर्ण काय मी रेकमेंड करणार नाही ब्वा..

तसेच, माझ्या मुला/मुलीला ऑल इंडियात मेरिटवर जेमतेम लटकलोय म्हणून बिहारमधेही शिकायला पाठवणार नाही.

याचाच अर्थ, मॅक्झिमम महाराष्ट्र सीईटी, असोसिएट सिईटी, व एआयपीएमटी इतक्याच परिक्षा पुरेत. (या अशाच यंदा/या क्षणी असतील याची मायबाप सरकारच्या कृपेने काहीच ग्यारंटी नाही)

इतर दुर्लक्षित देश किंवा रशियाला जाण्याची ज्यांची तयारी आहे

मेडिकल काउन्सिलच्या साईटवर या प्रकारच्या लोकांना भारतात प्रॅक्टीस करण्यासाठी किती व काय कष्ट करावे लागतात त्याची माहिती आहे. सध्या लिंकदानास वेळ नाही. पण हा प्रकार मी रेकमेंड करत नाही.

तात्पर्यः
लेख वाचून इतरही मेडिकलेच्छुक लोकांना मदत व्हावी म्हणुनचा लेख आहे असे वाटले, त्यातल्यात्यात लेखकुंना उद्देशून लिहिले आहे. इतरांनी आपल्या मुलास डॉक्टर का करायचे याचा नीट विचार करावा इतके सुचवून सध्यापुरता थांबतो.

ता.क.
मेडिकल सीईटी मधूनच आयुर्वेदिक, होम्योपथिक, सिद्ध, युनानी इ. प्लस डेंटिस्ट्री, फिजिओथेरपी, स्पीच्/ऑडिओ थेरपी, नर्सिंग इ. उपशाखांनाही प्रवेश मिळतो ना?
डॉक्टरच्च्च्च बनवीन म्हणून हट्ट करू नका. डेंटल फिजिओ स्पीच्/ऑडिओथेरपी, सायकॉलॉजी या उत्कृष्ट ब्रांचेस आहेत. मधल्या 'आल्टरनेटिव्ह मेडिसिन' ब्रांचेस कृपया फाट्यावर मारा ही विनंती. कुणी हौशीखातर फाटा घेतलाच, तर ४-५ वर्षांनी आपले व आपल्या पाल्यांचे अनुभव इथे इमानदारीत लिहा, ही नम्र विनंती.

नवीन महिती दिल्या बद्धल धन्यवाद

प्रदीर्घ आणि माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद .

मूळचा धागा इथे वाचता येईल .

एकाच मोठ्या प्रतिसादाऐवजी सोयीसाठी मुद्द्यानुसार दोनतीन वेगळे प्रतिसाद देत आहे

पुढे इतरांना निश्चित उपयोग होईल.

धाग्याचा उद्देश इतरांना मदत आणि मला काही नवीन माहिती मिळावी असाच आहे. जालावर कुठेही एकत्र माहिती सापडली नाही. म्हणून संकलन करण्याचा प्रयत्न केलाय . मेडिकलचा अट्टाहास असणारे प्रत्यक्ष ओळखीचे नाहीत. परिचित काही डॉक्टरांनी मुलांना मेडिकलला जायचं नसल्याने व्यवसाय विकायची तयारी केलीय.

>> मेडीकललाच जायचं, अन मेडीकलला जायचा प्रचण्ड प्रयत्न करायचा यात माझ्या मते बेसिक फरक आहे, व तो प्रयत्नही "शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतूनच" मेडीकलला जाईन इतपत सीमीत ठेवावा असे माझे वैयक्तिक मत आहे.

सहमत. प्रयत्न तसाच आहे. पण माझ्या मुलीची इच्छाशक्ती आणि प्रयत्न भरपूर असले तरी मला यशाची पक्की खात्री नाही. एकच टक्का मुलांना सरकारी प्रवेश मिळणार तर उरलेल्या ९९% मध्ये काहींना हा खासगीचा पर्याय आहे तो बराच आहे.

>>

एक मुद्दा हा, की स . म . जा, प्रवेशपरिक्षेत अपयश आले, तर हिरमोड होता कामा नये.

ते आपण म्हणलं तरी मुलांच्या मनात आयुष्यभर राहू शकतं. माझ्या बाबतीत तीस वर्षापूर्वी हेच झालं त्याची आजही खंत वाटतेच. आठ हजार वार्षिक फी भरू शकत नसल्याने फक्त सरकारी कॉलेजात शिकत शिकत डिप्लोमा मार्गे इंजिनियरिंग - पदव्युत्तर करत बसलो. आज आपण जर कष्ट करून तीस-चाळीस लाख खर्चाची क्षमता मिळवलीय तर थोडक्यात सरकारी हुकले असेल तर खर्च करून त्यातल्या त्यात बऱ्या खासगीला जावे आणि पदव्युत्तरची तयारी चांगली करावी असं बनलंय. मात्र पुढे PG ला खोकी वगैरे मध्यमवर्गीय असल्याने शक्य नाही!

(क्रमश:)

अजया's picture

17 Apr 2015 - 11:41 am | अजया

डाॅ.साहेबांना+१००००!
शासकिय काॅलेजातुन शिकणे आणि खाजगी वैद्यकिय/दंतवैद्यकिय यात गुणात्मक फरक असतोच!! माझ्या मुलाला वैद्यकिय शिक्षण घ्यायचे नाहीये अन्यथा मी त्याला फक्त आॅल इंडिया,स्टेट सीइटी यावर लक्ष केंद्रित करायला सांगुन फक्त शासकिय काॅलेजला अॅडमिशन मिळाली असती तर पाठवले असते.बाकी सर्व खाजगी काॅलेजे जवळपास सारखीच @#$ असतात.

आनंदी गोपाळ's picture

17 Apr 2015 - 9:30 pm | आनंदी गोपाळ

नुकतेच आठवलेले काही मुद्दे.

१. शक्यतो सीबीएसई लेव्हलची पुस्तके वापरावी. एसेस्सी/एचेस्सी बोर्ड स्टुडंट असलात, तरी. ऐनवेळी सरकारी गाढवे काय करतील सांगता येत नाही. सीबीएसीची पुस्तके दिसायला मोठी असलीत तरी भरपूर चित्रं असलेली व डिस्क्रिप्टीव्ह असतात. लवकर समजतात.

२. सर्व क्रमिक पुस्तके कव्हर टू कव्हर वाचणे अत्यावश्यक. एमसीक्यूची ती बेसिक किल्ली आहे.

३. एमसीक्यू सोडवायची प्रॅक्टीस करायलाच हवी. त्यात महत्वाचे म्हणजे टाईम मॅनेजमेंट. एक प्रश्न सोडवायला किती सेकंद द्यायचे, ते गणित डोक्यात ऑटोपायलटवर पडले पाहिजे. अमुक प्रश्न सोडवायला एक्स्ट्रा सेकंद लागत असतील तर तो सोडून पुढे जा. शेवटी रिझर्व वेळ मिळाला तर हा प्रश्न परत अटेंम्प्ट करता येतो.

५. रिव्हर्स एमसीक्यू. पुस्तक कव्हर टू कव्हर वाचताना प्रत्येक ओळीवर काय एमसीक्यू तयार करता येईल, हा विचार करणे. अर्थात, स्वतःला परिक्षक बनविणे.

६. मित्र, इतर सीईटीइच्छुक लोकांशी चर्चा, त्यांना चक्क शिकविण्याचा प्रयत्न करावा. मुलं मला काय येतंय ते इतरांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या उलट करायची सवय लावावी. शिकवण्यासाठी केलेला अभ्यास सर्वोत्तम अभ्यास असतो.

७. मेडीकलला जायचंय. मग मॅथ्स सोडलं तरी चालेल, हा विचारच करायचा नाही. आजकालच्या फिजिक्समधे डिफरन्शिअल इक्वेशन्स अन कायकाय अ‍ॅडव्हान्स्ड मॅथ्स असतं. आमच्या काळी फिजिक्स फक्त अल्जिब्रावर धकून जात असे. कॅल्क्युलस अन थिअरॉटिकल जॉमेट्रीचा काय संबंध नव्हता. अन फिजिक्स नसेल तर पीसीबी ग्रूप बोंबलतो.

शेवटचा मुद्दा अवांतर आहे, म्हणजे डायरेक्ट सीईटीशी संबंधीत नाही. पण खूप महत्वाचा.

शाळेत, वर्गात आपल्याला अमुक गोष्ट समजली नाही, तर शिक्षकांना विचारायला लाजू नये. मी विचारतोय ते इतके सोपे आहे, इतर मुले मला हसतील, या भावनेतून मुलं अनेक गोष्टी विचारायला घाबरतात. तुला येत नाही, म्हणून तू शाळेत जातोस. ऑलरेडी येत असतं तर शाळेत जायची गरज पडली नसती. शिक्षक तुझ्या शंका दूर करण्यासाठी आहेत. ते तुला रागावणार नाहीत. बिनधास्त व पोलाईटली क्लास इंटरप्ट न करता शंका विचार. इतर मुलं हसलीत तर हसू देत. त्यांनाही येत नसतं, पण विचारायची लाज वाटते म्हणून हसतात. येतं म्हणून हसत नाहीत. अन शिक्षकांनी शंका दूर केली नाही, तर मला सांग, मी सोबत येईन, दोघे मिळून शंकेचे उत्तर समजवून घेऊ. हे मुलांना अगदी ५-६वीपासून सांगणे, व आपण तसे करणे गरजेचे.

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2015 - 9:53 am | श्रीरंग_जोशी

या प्रतिसादातले मार्गदर्शन सर्वच प्रकारच्या स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यास उपयुक्त आहे.

शेवटचा परिच्छेद कुठलेही शिक्षण घेणार्‍यांसाठी उपयुक्त आहे.

रुस्तम's picture

18 Apr 2015 - 1:17 pm | रुस्तम

सहमत

नाखु's picture

18 Apr 2015 - 2:08 pm | नाखु

त्यांनाही येत नसतं, पण विचारायची लाज वाटते म्हणून हसतात. येतं म्हणून हसत नाहीत.

ज्याम आवडल
शंका निरसक पालक (बिन्-भाजीचा)
नाखु

खेडूत's picture

30 Apr 2016 - 12:55 pm | खेडूत

यावर्षी काय होणार?

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आणि परीक्षार्थी मुलांचा गोंधळ यांचे अतूट नाते आहे.
यावर्षीपासूनच एक समान केंद्रीय परीक्षा घेऊन त्याआधारे सर्व वैद्यकीय प्रवेश करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने परवा दिला. त्यामुळे ''ए आय पी एम टी '' या परीक्षेचे पूर्वीप्रमाणे ‘नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) असे नामकरण करून ती १ मे आणि २४ जुलैला दोन वेळा घेण्यात येईल. यातून अभिमत विद्यापीठेही सुटणार नाहीत ही एक चांगली बाब म्हणता येईल.
ही परीक्षा घेणारे ‘सीबीएसई‘ आणि राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमात फरक असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, हा मुख्य आक्षेप आहे.

२०१२ सालीच हा निर्णय झालेला असताना आपल्या प्रवेश पद्धती आणि परिक्षांचा दर्जा सुधारण्याऐवजी १५ हून अधिक राज्यसरकारांनी लोकप्रिय निर्णय घेत ८५% जागांसाठी स्वत:ची प्रवेश परीक्षा घेणे आणि निर्णयाला आव्हान देणे सुरु ठेवले.आताचा निकाल अंतिम असल्याने चर्चेत आला इतकेच, पण हेच होणार हे माहीत होते. राष्ट्रीय पातळीवरील परिक्षांमुळे आपल्या इथल्या मुलांचा दर्जा उंचावू लागल्याचे कांही सर्वेक्षणात दिसले होते. पण तरीही अभ्यासक्रमात आवश्यक बदल केले गेले नाहीत.
असो - देर आये…

बातम्यांमध्ये एक गोष्ट स्पष्ट नसल्याने खुलासा -
''ए आय पी एम टी '' मधून १५% जागांवर इतर राज्यांतील मुलांना प्रवेश मिळतच राहतील. त्या उद्देशाने ज्यांनी दोन्ही अर्ज केले त्यांची परीक्षा उद्या १ मी रोजी होईल, आणि ५ तारखेला राज्याची आधी जाहीर झालेली परीक्षा होईलच असे सरकार म्हणते. (कदाचित पुढे जाऊन ती वैध ठरणार नाही, तरी देणे आलेच )
पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आपला युक्तिवाद चालू ठेवणार आहे म्हणे. पण अशी जवळजवळ १५ राज्ये आणि कांही वैयक्तिक अर्जदार असतील.

२४ जुलैची प्रवेश परीक्षा ज्यांनी उद्या १ मेच्या 'नीट' परीक्षेसाठी अर्ज केला नव्हता त्यांच्यासाठी असेल. आता उद्याच्या परीक्षेला बसणार्यांना हा अन्न्याय वाटत आहे कारण काही मुलांना २४ जुलैपर्यंत जास्तीचा वेळ मिळणार आहे. स्पर्धा तीव्र असताना हा विरोध असणे स्वाभाविकच आहे.

परिक्षांमधला फरक:
नीट :
११ वी आणि बारावी सी बी एस ई आणि एन सी ई आर टी असा अभ्यास नव्याने करावा लागेल,
१८० प्रश्न / ७२० गुण / उणे गुणांची भीती

राज्य सरकारची परीक्षा :
फक्त बारावीचा - HSC मंडळाचा अभ्यास
२०० प्रश्न २०० गुण - उणे गुण नाहीत

सोपी परीक्षा जास्त जणांना सोपी जाते आणि एका गुणसंख्येवर अडीच- तीनशे उमेदवार येतात. नीटच्या कठीण परीक्षेत स्पर्धा कठीण होते. मागच्या वर्षी प्रवेश न मिळाल्याने एक वर्ष थांबणाऱ्या मुलांसाठी हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण असे थांबणे समर्थनीय नसतेच!
एकाच वर्षी त्रास होईल पण पुढे देशभर सुसंगत अभ्यासक्रम येईल, त्यामुळे सर्वांनी हे स्वीकारायला हवे.
आता पुढील आठवड्यात काय होते ते पाहू.