पण माझीच चूक आहे असं का वाटतंय मला?
साला हा एक विचार मनातून जातच नाहीये, आजचा दहावा दिवस. घरी बसून आहे मी, उद्यापासून ऑफिस ला जावच लागणार, नाहीतर नोकरी जायची.
कितीही मन रमवायचा प्रयत्न केला तरी ती रात्र डोक्यातून जातच नाही. ट्रेन चा भयंकर गोंधळ झाला होता त्या रात्री.नाहीतर ११ :३५ ची कसारा किती रिकामी असते. पण त्या दिवशी तब्बल ३ तास ट्रेन बंद होत्या, आणि त्यानंतर सुटणारी हि पहिली ट्रेन होती.
काय भयंकर गर्दी होती.मी कसाबसा लटकत भायखळ्याहून आत चढलो. आत कसला जेमतेम दारात उभं राह्यला मिळेल इतकीच जागा होती.ट्रेन दणदणत निघाली,पुढील स्टेशन दादर. मागून लोंढा अंगावर कोसळला, पण आत जायला जागाच नव्हती. जेमतेम २,३ माणसे त्याही परिस्थितीत माझ्या मागे लोंबकळली.एक जण चायला मला दाबायलाच लागला,"अरे मै गिरने वाला हे,प्लीज अंदर जाव" "अंदर जाव, पुरा ट्रेन खाली हे" चायला याच्या.. याच्या बापाने ठेवलीये न पुरी ट्रेन रिकामी , जेमतेम एक पायावर उभा आहे मी समजत नाहीये का याला? मी चढायला सांगितलेलं का याला. अरे हे काय किती घाण शिव्या देतोय. अबे हट्ट... गाली मत दे , बाजूचे पण लोक ढिम्म ,कोणावर काहीच परिणाम नाही. घामाचा कुबट वास. त्याच्या आवाजात असहायता जाणवत होती. पण शिव्या काही थांबत नव्हत्या.सरकू का जरा पुढे? नको, लगेच काय मरणार नाहीये, हरामी. मेला तर मेला. माझ्या बा चे काय जाते.
मागून आवाज येतोच होता, "प्लीज मेर्को पकडो भाई साहब, एक हात छूट गया हे, मेरे बच्चे हे घरमे, सच बोल रहा हु, थोडा अंदर जावो, "
साला पायावर लाथा मारत होता, बघतोच त्याला, मग मागे वळून त्याला घाल घाल शिव्या घातल्या, भेदरून माझ्याकडे बघत होता, साला , बाकीचे हसतायेत, पकडे रहो म्हणतायेत. ट्रेन ठाण्याकडे सुसाट निघालीये, जरा डोळे मिटून उभा राहतो आता
पण अचानक एक झटका बसतो, आणि एकच गलका होतो, ए गया ,गया , गिर गया , चेन खिन्चो. मी घाबरून मागे बघितलं,
तो नव्हताच ... तो खरच पडला होता.मी पण मग ओरडायला लागलो, पण कोणाचाच आवाज आत बसलेल्यांपर्यंत पोचला नाही, कोणीच चेन ओढली नाही, गाडी सुसाट पुढे निघून गेली.मी डोंबिवलीला सुन्न मनाने उतरलो.
रात्रीची हल्ली झोप लागत नाही, चित्र विचित्र स्वप्न पडतात. लोकल चे रिकामे अंधारलेले डबे दिसतात, तुटलेले रूळ, भकास स्टेशन, बंद पडलेले इंडिकेटर्स. आणि आणि तो हि दिसतो, हात पाय नसलेला, उगाच खुरडत खुरडत माझ्याकडे येतो. डोक्याचा आकारच नाही , एका बाजूने चेपलेले आहे, डोळे खोबणीतून बाहेर आलेले. जौंदेत नकोच ते विचार, स्वप्नच ती , झाले आज दहा दिवस. उद्यापासून ऑफिस.
हुश बाहेर सगळे जग आहे तसे आहे, त्याच लोकल, तीच गर्दी,तीच भांडण. मी उगाच घाबरून दडून बसलो, चायला सुट्टी वाया गेली.
असो आजचा दिवस तरी मस्त गेला,पुढच्या आठवड्या पासून मोर्निंग शिफ्ट, बर झालं. मस्त शेवटची ट्रेन पकडू आता.
नशीब आज गर्दी नाहीये, तीच भीती होती. जेमतेम ५,६ माणसे आहेत डब्यात,मस्त झोप होईल एक.
अचानक कोणतरी माझ्या अंगावर कलंडल आणि जाग आली. चायला चांगला डोळा लागलेला, हि माणसे निट का झोपत नाहीत.मी बाजुच्याला जोरात ढकलल.आणि त्याकडे बघितलं, ईश्वरा ..
तो .... तो... तोच होता... लाल डोळे.. डोक्याचे आकार हरक्षणी बदलायला लागले, मी घाबरून समोर बसलेल्या माणसांना हाक मारली त्यांनी मागे पहिले, ते दोघेही तेच होते, ताडकन उठून उभा राहिलो. डब्यातले सगळे ५ ,६ लोकं एकाच चेहर्याचे, हे शक्य नाही.
सगळे उठून लडबडत माझ्याकडे यायला लागलेत. डब्यातले फ्यान करकरत फिर्तायेत, ट्यूब कधीच विझल्यात, पिवळे डीम दिवे सुरु आहेत.मी ओरडतोय पण आवाज तोंडातून बाहेर येतच नाहीये.
एक हादरा बसला आणि जाग आली, मेंदू ताळ्यावर आला .नशीब स्वप्नच होतं ते, पण... पण.... हे काय पण कोणतरी अंगावर कलंडलय .............
प्रतिक्रिया
9 Apr 2015 - 3:59 pm | कविता१९७८
छान
9 Apr 2015 - 4:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्पारायण धारप.
बाकी अंगावर कलंडणारे "ते" असणार. ;)
9 Apr 2015 - 4:01 pm | पॉइंट ब्लँक
आता खरी भिती वाटेल त्यांना ;)
9 Apr 2015 - 4:11 pm | टवाळ कार्टा
सापासकट असतील :)
9 Apr 2015 - 8:05 pm | पियुशा
9 Apr 2015 - 7:00 pm | यसवायजी
स्पारायण, आवडली कथा.
9 Apr 2015 - 4:02 pm | नाखु
स्पावडली !!!
9 Apr 2015 - 4:09 pm | प्रमोद देर्देकर
स्पा मोड ऑन
"आँ अच्च झालं तल"
स्पा मोड ऑफ
9 Apr 2015 - 4:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चायला मिपावर एक सामुदायिक काउंटर मोड ऑपरेशन करायला हवयं...संसर्गजन्य आजार आहे हा.
9 Apr 2015 - 4:16 pm | प्रचेतस
गूढकथा हा प्रकार मूळात हाताळायला अवघड, त्यात लघुकथेच्या फॉर्ममध्ये बसवणे त्याहूनही अवघड.
मनुष्याला वाटणारा अपराधगंड येथे उत्तम प्रकारे मांडला आहे. शेवटचे धक्कातंत्र अपेक्षितच होते.
9 Apr 2015 - 4:57 pm | एक एकटा एकटाच
सहमत
9 Apr 2015 - 6:43 pm | नगरीनिरंजन
सहमत आहे! स्पा लिहिते झाले याचा आनंद वाटलाच.
9 Apr 2015 - 11:52 pm | नंदन
असेच म्हणतो. उत्तम लघुगूढकथा.
9 Apr 2015 - 4:24 pm | बॅटमॅन
हाण तेजायला. स्पारायण धारपांच्या कथा म्हणजे जबराटच!
9 Apr 2015 - 4:27 pm | अत्रन्गि पाउस
अतिशय चुस्त मांडणी .... अप्रतिम ..
9 Apr 2015 - 4:28 pm | सूड
ओके..
9 Apr 2015 - 5:00 pm | एक एकटा एकटाच
कथा छान आहे.
ह्या वाक्याला खरच वाईट वाटलं
9 Apr 2015 - 5:06 pm | वेल्लाभट
चालेल...
9 Apr 2015 - 5:33 pm | अत्रुप्त आत्मा
सुटलं रे सुटलं
पांडोबाच भय(कथा-लिखान) गिह्रान सुटलं! 
आणि तें.. नै त नै, हें तरी लिवून झालं!
==========================
आता मूळ प्रतिसाद हां! ;)
ज्जे बात! आता कळलं..पांडोबा थ्री डी व्हिज्युअलायझर* का-आहे ते!
(*काय भयंकर शब्द आहे मायला! ;) म्हराटीत चटकन लिवता सुद्दा येत नै! :-/ )
समांतरः-आम्मी सदर ल्येखकास अशी इणंती करित हाओत की त्याणे अश्याच अजुन ५ कथा प्रसवाव्या..आनी त्याचे बाड काखेत मारूण राम गो पाल वर्माकडे त्वरीत कूच करावी! शिनूमाचे णावः- डरना जरूरी है इच! (पां डूब्बा के साथ!
)
12 Apr 2015 - 7:52 pm | पॉइंट ब्लँक
सहमत!
9 Apr 2015 - 6:58 pm | कंजूस
फारच आवडली.आलटुन पालटून भयकथा आणि ललित लेखन टाकणे उत्तम. भयकथा मुददामहून दोन भागात लिही.
9 Apr 2015 - 7:18 pm | खेडूत
कथा आवडली , लोकलचा अनुभव नसूनही रोचक वाटली .
9 Apr 2015 - 7:55 pm | सौंदाळा
सहीच
खुप दिवसाने स्पा ची नविन भयकथा.
अजुन येऊ दे
9 Apr 2015 - 8:05 pm | खटपट्या
बरं झालं सकाळी वाचली. रात्री वाचली असती तर झोपच लागली नसती... :(
9 Apr 2015 - 8:50 pm | आदूबाळ
छान लिहिलीय!
9 Apr 2015 - 9:12 pm | प्रसाद गोडबोले
स्पारायण धारप , कथा आवडली !
पण वल्ली म्हणतोय तस्सा शेवट अपेक्षित होता .... थोडा वेगळा शेवट सुचवतो
>>>एक हादरा बसला आणि जाग आली, मेंदू ताळ्यावर आला .नशीब स्वप्नच होतं ते, पण... पण.... हे काय ... हा शेजारचा असं भुत पाहिल्याच्या अविर्भावात का बघतोय माझ्याकडे ? बघितलं तर फक्त २-३ मिनिटच कलंडलो होतो त्याच्या अंगावर !!
9 Apr 2015 - 9:37 pm | टवाळ कार्टा
हैला जब्रा
9 Apr 2015 - 9:36 pm | सौन्दर्य
मस्त कथा. आवडली. ट्रेनमध्ये एका पायावर, दोन हाताने पुढचे हँडल धरून, दादर ते बान्द्रा, विरार फास्टने केलेला प्रवास आठवला. जेमतेम पाच-सात मिनिटाचाच प्रवास असेल पण ब्रह्मांड आठवलं. 'त्या'चे शब्द अगदी काळजाला भिडले.
9 Apr 2015 - 10:32 pm | बोका-ए-आझम
लई म्हणजे लईच छोटी वाटली. थोडा माहोल क्रिएट करते, समां बांधते, तो और अच्छा होता....
9 Apr 2015 - 10:33 pm | बोका-ए-आझम
लई म्हणजे लईच छोटी वाटली. थोडा माहोल क्रिएट करते, समां बांधते, तो और अच्छा होता....
9 Apr 2015 - 10:33 pm | बोका-ए-आझम
लई म्हणजे लईच छोटी वाटली. थोडा माहोल क्रिएट करते, समां बांधते, तो और अच्छा होता....
10 Apr 2015 - 1:08 am | सुहास झेले
मस्त... आता दीर्घ कथा पण येऊ देत. लिहिता झालास छान वाटले :)
13 Apr 2015 - 4:07 pm | सविता००१
रे स्पावड्या
मस्त
11 Apr 2015 - 2:51 pm | सभ्य माणुस
अशीच एक गोष्ट Red FM वरती सुद्धा एकलीय. "एक कहानी एसी भी" ह्या शो मधे.
कथा भारी आहे आणि चांगल्या रीतीने हाताळलीये.
11 Apr 2015 - 4:28 pm | स्पंदना
झालं!!

माझ्या इथे आता रात्र आहे. आता कसा लाईट घालवायचा?
निख्खळ अस्वस्थता भिती आणि कुतुहल या सगळ्या भावना जाग्या झाल्या. मस्त लिखाण.
12 Apr 2015 - 7:34 pm | किसन शिंदे
मस्त लघुगूढकथा!
पण काल्पनिक नक्कीच नसावी असं वाटतंय. असा एखादा तरी प्रसंग घडून गेला असेलच तुझ्या आजूबाजूला.
12 Apr 2015 - 8:56 pm | पैसा
रात्रीचे ८.५३ झालेत. आज कशाला वाचली ही कथा?
14 Apr 2015 - 10:01 am | खंडेराव
मस्तच जमलीय!