मनोगत

Primary tabs

इनिगोय's picture
इनिगोय in विशेष
8 Mar 2015 - 1:32 am
महिला दिन

नमस्कार.

मिपावर फक्त स्त्रियांचं असं एक दालन असावं हा विचार प्रत्यक्षात आला, या गोष्टीला या पाडव्याला दोन वर्षं पूर्ण होत आहेत. या काळात असं दालन हवंच कशाला या टीकेपासून, ते असं दालन जरूर असावं या पाठिंब्यापर्यंत सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मुख्य बोर्डावर येत राहिल्या. ही कल्पना नवी नसूनही अनेक संमिश्र मतांनी मिपा गजबजलं. त्याचवेळी बहुतेक सगळ्या स्त्री सभासद या कल्पनेला भरभरून प्रतिसाद देत होत्या, अगदी सुरुवातीला अनाहिता हे नाव नक्की करण्यापासून ते तिथे नेमाने लेख, प्रतिसाद देण्याच्या उत्साहात सातत्याने वाढच होतेय. नीलकांतनेही आम्ही सुचवलेल्या सगळ्या कल्पनांना उचलून धरत हा विभाग सुरू करून दिला, अपार तसदी घेऊन अनाहिताच्या संपादिकांनी सभासदत्व देण्याची प्रक्रिया हातात घेतली.. आणि अनाहिता सुरू झालं.

जवळजवळ २५००० सभासदांचा वावर असलेल्या संकेतस्थळावर असा स्वतंत्र कोपरा हवा कशाला? काय चालतं इथे? हे कुतूहल अनेकांच्या मनात होतं, आजही आहे. पहिल्या "अनाहिता महिला दिन विशेषांक २०१५"च्या निमित्ताने आज याचं उत्तर इथे मांडावंसं वाटतंय.

मिपा हे आंजावरचं एक धमाल, मोकळं वातावरण असलेलं संकेतस्थळ म्हणून ओळखलं जातं. इथे लिखाणाचं असलेलं स्वातंत्र्य क्वचितच अन्य कोणत्या स्थळावर दिसून येईल. सहसदस्यांपासून ते संपादकांपर्यंत कोणालाही कोपरखळ्यांपासून ते गुद्दागुद्दीपर्यंत कशाचं वावडं नाही :). सर्व प्रकारच्या वृत्ती इथे गुण्यागोविंदाने नांदतात, कधी आनंददायी ठरतात, तर कधी उपद्रवी ठरून अखेर नामशेषही होतात. मिपावर धमाल, टवाळी आणि हुल्लडबाजी असे हेतू घेऊन मंडळी येतात आणि त्यामुळेच इथलं वातावरण जिवंत आहे हे खरं.. मात्र याची सवय व्हायला नव्या मंडळींना, स्त्री सदस्यांना जरा वेळ लागतो. अनेकींना लिहायला मनापासून आवडतं.. आपले अनुभव, त्याबाबतचा आपला दृष्टिकोन, आपल्या भावना, विचार शब्दबद्ध करावेत, ते इतरांनी वाचावं, त्यांना ते आवडावं, त्यावर चर्चाही व्हावी, अशी अनेकींची इच्छा असते, मात्र त्यासाठी हव्या असलेल्या आत्मविश्वासाचा अभाव, आपण लिहिलेलं इतरांना आवडेल का ही शंका, अशा अनेक बाबी आड येत असतात. मिपावरच्या वातावरणात तर इथे लिहिणं नवख्या स्त्रियांना आणखीच अवघड वाटू शकतं.

हे लक्षात आल्यावर या सर्वांना इथे मोकळेपणी लिहावंसं वाटेल असं काहीतरी करावं, या विचारातून ही कल्पना सुचली. संपादिकांशी, आणि इतर मिपाकरणींशी बोलता बोलता तिला आकार येत गेला. केवळ स्त्रियांचा वावर, आणि पडताळणीनंतरच प्रवेश ही या दालनाची वैशिष्ट्यं नक्की झाली. आभासी जगात माणसं वावरतात तेव्हा चेहऱ्यावर आयडीचा मुखवटा असतो. त्या मुखवट्याआडून नेमकं कोण बोलतंय हे समजून घेण्याचा फारसा खात्रीशीर मार्ग कोणताच नाही. आपोआपच मोकळेपणाला मर्यादा येतात. मात्र या दालनात सदस्यत्वाची पडताळणी करून मगच प्रवेश करता येणार असल्याने ही धास्तीही उरली नाही. अनेकजणींनी या कल्पनेचं स्वागत केलं.

काय आहे अनाहिता? हे विचारलं तर तिथल्या प्रत्येकीचं उत्तर कदाचित एकच असेल... अनाहिता आमची जीवाभावाची, जिव्हाळ्याची मैत्रीण आहे. अगदी सख्खी. या ग्लोबल मैत्रीचा उत्सव तिथे धागे लिहून, प्रतिसाद देऊन, गप्पा मारून, गंभीर चर्चा करून, प्रसंगी हळवं होऊन आणि निव्वळ व्हर्च्युअल न राहता वेळोवेळी मस्त, धमाल असे (आभासी नव्हे, खरेखुरे…) कट्टे करून अखंड साजरा होत असतो. मुंबई, ठाणे, पुणे इथे होणाऱ्या या कट्ट्यांना प्रत्यक्षच नव्हे, तर अगदी स्काईप, व्हायबरवरूनही टाइम झोनची पर्वा न करता हजेरी लावणाऱ्या मिपाकरणींचा अनाहितावर खरोखरीच जीव जडलाय!

या उत्सवाची लागण एरवी अबोल असणाऱ्या, फारसं न लिहिणाऱ्या मिपाकरणींनाही झाली आहे आणि अनेकजणी वाचनमात्र न राहता भिडस्तपणा सोडून पहिल्यांदाच लिहित्याही झाल्या आहेत, मोकळ्याही झाल्या आहेत. प्रतिसाद देता देता हळूहळू लहानमोठे लेख लिहू लागल्या आहेत. प्रत्येकीलाच स्वतःची नवी ओळख पटू लागली आहे. एकमेकींना प्रोत्साहन देत नवनवे कल्पक विषय तिथे मांडले जात आहेत. अनेक जणींत लिहिण्याची ऊर्मी होती, ऊर्जा होती, अनाहिताने ती जोपासण्याचं काम चोख बजावलं आहे. आकडाच सांगायचा तर आज किमान ४० ते ५० जणी तिथे नियमित लिहितायत आणि असंख्यजणी ते वाचताहेत, त्यावर शतकी प्रतिसादांच्या चर्चा... खरंतर गप्पा करताहेत. हे अनाहिताचं सगळ्यात मोठं यश आहे, हे आता या टप्प्यावर नक्कीच म्हणता येईल. याच उत्साहातून मग वाचलेल्या पुस्तकांवरचे धागे असोत, की सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे पूर्ण केलेली दिवाळीअंकात आलेली कथा असो.. असे अनेक उपक्रम अनाहिताने पूर्ण केलेत.

संस्कृतात अनाहिता ह्याचा अर्थ समृद्धीचे रक्षण करणारी, समूहाचे पालनपोषण करणारी असा आहे. हीच भूमिका वैचारिक समृद्धीच्या आणि मनमोकळ्या वावराच्या बाबतीत हे दालन निभावते आहे, असे म्हटले तर गैर ठरणार नाही. "लिहित्या व्हा, लिहीत राहा" हा इथला जागर अनेक तऱ्हांनी सुरूच आहे.

आज तुमच्यासमोर सादर होत असलेला महिला दिन विशेषांक हे अनाहितेने कमावलेल्या आत्मविश्वासाचंच व्यक्त रूप आहे. दोन वर्षं पडद्याआड राहिलेली अनाहिता आज तिच्या साहित्यकृती घेऊन समोर आली आहे. सांगायला प्रचंड अभिमान वाटतो की या अंकाच्या प्रत्येक विभागात, मग ती संकल्पना असो, लेखन असो, अंकातली चित्रं असोत की अतिशय अप्रतिम असं अर्थपूर्ण मुखपृष्ठ असो... या प्रत्येकात केवळ स्त्रीसदस्यांचाच सहभाग आहे! अशा प्रकारचा अंक आंतरजालावर प्रथमच प्रकाशित होतोय!

अशा या व्हर्च्युअल ग्लोबल कुटुंबात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत!

- इनिगोय.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

11 Mar 2015 - 11:07 pm | कविता१९७८

मस्त

कौशी's picture

12 Mar 2015 - 3:15 am | कौशी

मस्त लिहिलयं इनि, आवड्ले.

स्पंदना's picture

12 Mar 2015 - 4:00 am | स्पंदना

खरं ग इनिबाय!!
अगदी बरोब्बर लिहीलंस न काय!

आनन्दिता's picture

12 Mar 2015 - 7:36 am | आनन्दिता

शब्दाशब्दाला टाळ्या!!! प्रत्येक अनाहितेच्या मनातलं लिहिलंस. :)

प्रीत-मोहर's picture

12 Mar 2015 - 9:41 am | प्रीत-मोहर

असच म्हणते. इने सबके मुह की बात चुराली तुने.

सविता००१'s picture

12 Mar 2015 - 9:40 am | सविता००१

लिहिलंयस

अतिशय योग्य शब्दात आलेलं उत्तम मनोगत.

इशा१२३'s picture

12 Mar 2015 - 1:11 pm | इशा१२३

मितानशी सहमत.उत्तम मनोगत.

सुयोग्य आणि चपखल शब्दातले मनोगत.

श्रीरंग_जोशी's picture

13 Mar 2015 - 5:23 am | श्रीरंग_जोशी

केवळ स्त्रियांसाठीच्या विशेष दालनासाठी जेव्हा सर्वप्रथम घोषणा झाली होती तेव्हा त्या रुपाने मिपावर खूप मोठे गंडांतर येत आहे असा बागुलबुवा अनेकांनी उभा केला होता. मुळात नव्या दालनामुळे विरोध करणार्‍यांचे काहीही बिघडणार नव्हते. मराठी आंतरजालावर काही कुप्रवृत्ती असतील तर त्या प्रथमपासूनच आहेत अन नेहमीच राहतील. या दालनाच्या निर्मितीमुळे त्यामध्ये कोणताही बदल होणार नव्हता.

शाळेमध्ये मुलींसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू होत आहेत म्हणून शाळाच सोडून जायचे इशारे देण्यासारखे इशारेही काहींनी दिले.

गेल्या दोन वर्षांत अनेक स्त्री सदस्या बुजरेपणा सोडून मोकळेपणाने लिहू लागल्या चर्चेमध्ये भाग घेऊ लागल्या हे मराठी आंतरजालाची चळवळ जोमाने पुढे नेण्यासाठी सुचिन्ह आहे. तेव्हा झालेल्या विरोधाबद्दल कुठलीही कटुता न बाळगता यशस्वीपणे मार्गक्रमण केल्याबद्दल सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन.

या अंकाद्वारे दर्जेदार लेखन वाचण्यास मिळत आहे त्याबद्दल अनेक आभार.

एका शुद्ध हेतूला मिळालेले सुयश पाहून समाधान वाटत आहे.

दिल अगर सच्चा हो तो रब कर दे सब सैटिंग!!

पुढील वाटचालीसाठी अनाहिता सदस्यांना हार्दिक शुभेच्छा.

सविता००१'s picture

13 Mar 2015 - 12:29 pm | सविता००१

प्रतिसाद आहे हा.

अनाहिता सुरु करण्याचा खरा हेतू तुमच्यासारख्या थोड्याच मिपाकरांना कळला असं मात्र नक्की नमूद करेन इथे.
तुमच्या या प्रतिसादामुळे सगळ्याच अनाहितांना खूप छान वाटेल आणि आतापर्यंत लिहित्या न झालेल्या काही अनाहिताही नि:संकोच पणे आणि जोमाने मुख्य पृष्ठावर नियमित लिखाण करू लागतील अशी एक सुखद आशा वाटते.

बाकी आंतरजालीय कुप्रवृत्तींबद्दल सहमतच आहे.

तुमच्या प्रतिसादाबद्दल सगळ्याच अनाहितांच्या वतीने अनेकानेक धन्यवाद.

यथोचित प्रतिसाद श्रीरंग, आभार. :-)

श्रीरंग जोशी यांचा प्रतिसाद मनापासून आवडला ...वाचून छान वाटले ..
इनि मस्त झालेय ग मनोगत !! अगदी प्रत्येकीच्या मनातले लिहिले आहेस ..

उमा @ मिपा's picture

14 Mar 2015 - 11:54 pm | उमा @ मिपा

+ १०० सहमत.
श्रीरंग जोशी धन्यवाद.

भिंगरी's picture

13 Mar 2015 - 10:10 pm | भिंगरी

खुप छान वाटले आपला प्रतिसद वाचून.

कवितानागेश's picture

13 Mar 2015 - 12:52 pm | कवितानागेश

परफेक्ट!

विभावरी's picture

13 Mar 2015 - 3:17 pm | विभावरी

खूप छान मनोगत आहे .

मधुरा देशपांडे's picture

13 Mar 2015 - 9:25 pm | मधुरा देशपांडे

सगळ्या अनाहितांच्या मनातले असे उत्तम मनोगत. श्रीरंग जोशी यांचा प्रतिसाद खूप आवडला.

पैसा's picture

13 Mar 2015 - 9:48 pm | पैसा

सगळ्यांचं मनोगत आहे हे! खासच उतरलंय. श्रीरंगाचा प्रतिसाद खूप आवडला.

जुइ's picture

14 Mar 2015 - 12:48 am | जुइ

अगदी मनातले लिहिले आहेस :-)

अनाहिता चा अर्थ माहित नव्हता. जाणून घ्यायचा राहिला होता. तो आज अगदी नेमका कळला. आवडला. :)
आपल्या लेखणीतून अनाहितांचे मनोगत शत-प्रतिशत सच्चे आणि सुरेख उतरले आहे. आधिकाधिक अनाहिता लिहित्या होत आहेत. न घाबरता व्यक्त होत आहेत. सुसंवाद साधून, चर्चा करून मार्ग काढीत आहेत. हे या पावलाचे मला जाणवलेले यश. :)

स्वप्नांची राणी's picture

14 Mar 2015 - 3:34 pm | स्वप्नांची राणी

अभीनंदन अनाहिता, तुझे आणि माझे पण!! कारण तु म्हणजे मीच ना! माझ्यातली तुच पण मला परत परत गवसत जाणारी...दर क्षणी एका नविन रुपात! आणि प्रत्येक वेळी पहिल्या पेक्षा अधिक आत्मविश्वासानी झळाळणारी!

अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद ग!!!

कौशिकी०२५'s picture

15 Mar 2015 - 1:42 pm | कौशिकी०२५

मस्तच...

निवेदिता-ताई's picture

15 Mar 2015 - 11:03 pm | निवेदिता-ताई

खूप छान मनोगत आहे .

पिशी अबोली's picture

16 Mar 2015 - 3:22 pm | पिशी अबोली

आवडेश!

मनोगत खुपच छान लिहिलेस ग..

मीता's picture

18 Mar 2015 - 5:07 pm | मीता

मस्त लिहिलेस ग इनि

अतिशय छान मनोगत. वर श्रीरंग जोशींनी म्हटलेलेच उद्धृत करतो.

एका शुद्ध हेतूला मिळालेले सुयश पाहून समाधान वाटत आहे.

एक मात्र सांगावेसे वाटते -
'मन सुद्ध तुजं गोस्ट हाये प्रिथवीमोलाची
तू चाल फुडं तुला गड्या भीती कुनाची, पर्वाबी कुनाची!'

अनन्न्या's picture

26 Mar 2015 - 11:41 am | अनन्न्या

मलाही सुरवातीला मिपावर वावरताना मोकळेपणा वाटत नसे. त्यात नवीन सदस्याच्या एकातरी लेखाला अशा काही प्रतिक्रिया यायच्या की परत काही लिहायची हिंमतच होऊ नये. अनाहितात आत्मविश्वास हळूवार फुलवला गेला. त्यामुळे आपले मत जमेल तसे मांडून माझ्यासारख्या अनेकजणी वाचनमात्र न राहता चर्चेत भाग घेऊ लागल्या. एक अनोखं नातं निर्माण झालय सर्व अनाहितांमध्ये!

प्रश्नलंका's picture

26 Mar 2015 - 10:23 pm | प्रश्नलंका

खूप छान मनोगत आहे. अगदी मनातले लिहिले आहे. :)

सुर's picture

30 Mar 2015 - 4:55 pm | सुर

अगदी मनातल मनोगत, मनाला भावणार.

सुर's picture

30 Mar 2015 - 5:14 pm | सुर

अगदी मनातल मनोगत, मनाला भावणार.