दोघीजणी

Primary tabs

स्पंदना's picture
स्पंदना in विशेष
8 Mar 2015 - 1:36 am
महिला दिन

"यु? अपन्ना?"
"युअर हसबंड?"
"आ, आ"
"हिज फ्रेन्ड सेंट मी"
"सॉरी आ माय इंग्लिश नो गुड"
दारात मिनी आणि गुड्घ्यापर्यंत पोहोचणारा याच्या मधला स्कर्ट घालून एक गोर्यातपान म्हणता येइल अशा वर्णाची बाई उभी होती. जमेल तसं इंग्लिश फाडत होती.
"मी क्लिनींग, आय.. आय क्लिन फॉर यु"
ही माझी अन ‘मीमी’ची पहिली ओळख. दीड वर्षाचा मुलगा अन सहा वर्षाची मुलगी घेउन मी नुकतीच सिंगापूरला गेले होते. आजवरच्या आयुष्यात धुणीभांडी अन केर कचरा या गोष्टी अगदीच नाईलाज झाला तर केलेल्या. त्यात लहान मूल घेउन हे सगळं करणं हा विचारच असह्य होत होता. मुंबईच्या सुखासीन आठवणी सिंगापूरला अगदीच भिकार ठरवत होत्या. त्यात मेड ठेवण म्हणजे २४ तास घरात कोणी रहाणं, हा विचार मनाला पटत नव्हता. त्या सगळ्यामधुन निघालेला मध्यम मार्ग म्हणजे मीमी !!
नवर्यामला ऑफीस मध्ये कोणीतरी, अशा मदतनीस मिळतात, ज्या तासा तासा वरुन पैसे लावतात असं सांगितलं. अन मग दुसर्याा कोणीतरी मीमी बद्द्ल सांगून तिला माझ्या सुटकेकरता माझा पत्ता देऊन पाठवली होती. मी तिला घरात बोलावलं. "क्लिनींग" हा शब्द ऐकूनच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिल्याने फारसा विचार करण्याचे कारणच नव्हते.
घरात शिरल्या क्षणी मीमीने झटक्यात बाथरुम गाठली, स्वतःच्या बॅगेतून आणलेले कपडे बदलले, आणि बाईसाहेब अगदी सराईता सारख्या कामाला लागल्या. तासावर मोल घेताना, त्या तासाचा एक क्षणही ही बाई वाया घालवत नव्हती. झटझट तिने कपडा घेतला, त्याच सराईतपणे क्लिनर शोधला. भराभर शेगडी ओटा पुसायला सुरवात केली.
...मी अवाक होउन पहातच राह्यले.
"अग बाई, आलीस तशी जरा टेक, जरा पैशाचं बोल. कुठची काय सांग."
काही नाही. हीचं आपल यंत्रासारख खस खस पुसणं, झाडणं सुरु. त्यातच तिला बाथरुम मध्ये पडलेले कपडे दिसले. घेतली बास्केट, केले कपडे सॉर्ट अन लावलं मशीन. तिच्याकडे पाहूनच मला दम लागला. मग एकदम काहीतरी आठवल्यासारखी ती माझ्याकडे वळली,
" मी वर्कींग टु अवर्स"
"????" हे अस्मादिक.
आधीच माझी जीभ टाळ्याला चिकटलेली त्यात हीच म्हणन ही दोन तास काम करते आहे. म्या पामरान तर घड्याळ बी बगितलं नव्हत. पण साधारण १५-२० मिनीट झाली असतील हिच्या येण्याला. आता मी ज्या कामाकडे पहातच दिवस घालवायचे ते सगळं हिचं आवरत आलं होतं हे ठीक, तरीपण लग्गेच दोन तास झाले म्हणणं म्हणजे जरा जास्तच झालं ना?
मग माझी मीच चुळबुळले. हातातोंडाशी आलेला सुखाचा घास असा "टायमावरनं" घालवायला मी तयार नव्हते. पण तिच्या सराईत नजरेने माझा झालेला गोंधळ लग्गेच टिपला.
"सॉरी आं!! माय इंग्लीश नो गुड"
संभाषण जर जुळत नसेल तर लागलीच त्याचा दोष स्वतःवर घेत ही अतिशय हसरी बाई पुढे बोलायला लागायची. तर तीच म्हणणं होतं मी एका तासासाठी नाही तर दोन तास काम करेन. एका तासासाठी एवढा प्रवास करुन येणं तिला परवडणार नव्हतं. तोवर मी नवर्यााला फोन लावून हिचं नाव अन देशाची माहिती मिळवली होती. तिचं 'बर्मीज' असणं मला जरा सुखावून गेलं. नाही म्हंटलंतरी आपल्या भू_भागाला जुळलेला देश !! खरंच माणसं काडीचा आधार कशी शोधतात याचंच हे उदाहरण म्हटलं पाहिजे.
मग ही 'मीमी' बघता बघता माझ्या घराचा एक भाग होउन गेली. अगदी संध्याकाळी ५ वाजता जरी फोन केला तरी ही ७ वाजेपर्यंत यायची. ९ वाजता जाताना स्वच्छ आंघोळ करुन परत घरी जायची. एव्हाना डस्टींग करता करता मला तिची बरीच माहिती कळली होती. ही अशी तरतरीत दिसणारी मीमी चार मुलांची आई होती. सगळ्यात धाकटी एक मुलगी, अन बाकीचे तीन मुलगे !! सगळे शाळेत जात होते तिकडे बर्मामध्ये. मुलगी काहीतरी १२ वर्षाची होती, अन मीमीला तिची काळजी लागली होती. सगळ्यात मोठ्ठं प्रकरण होतं नवरा.
एक दिवस आली तीच धुसफुसत !!
"आय, आय वर्क हिअर!!" तिनं सुरवात केली.
" अँड ही सेल्स माय बॉइज बायसिकल्स फॉर ड्रिंक्स!!" डोळे पाण्याने भरले होते, ते तसेच कसे बसे पुसत ही खसा खसा मॉपींग करत होती.
" लास्ट टाइम आय गो, आय बाय दोज बायसिकल्स, सो बॉइज कुड गो स्कूल. नाऊ माय मा सेज ही हॅज सोल्ड देम."
इकडे काम करुन करुन मीमी पैसे तिकडे बर्माला पाठवत होती. लिटल इंडीयात असणार्याज एजंटमार्फत हिचा पैसा तिकडे पोहोचत होता. तिथे जगायला "नथिंग" होतं. कुठल्याश्या मातेच्या उर्मीने, मुलांना चांगलं आयुष्य द्यायच्या इच्छेने 'मीमी" झुंजत होती. अन तिच्या पोटी ही चार पोरं देणारा मात्र दारुच्या नशेत झिंगण्यातच रात्रंदिवस घालवत होता. कधी इथे, कधी तिथे असे चार पैसे तो मिळवायचा म्हणे पण हळु हळु सगळं गणितच बिघडत् गेलं असावं. त्याच्याबद्दल मीमी कधी फारशी बोलायचीच नाही. "हूं!!" असा एक तुच्छतादर्शक हुंकार भरायची ती त्याचं नाव घेतलं तरी. मुली बद्द्ल मात्र बरंच बोलायची. शेवटी एकदा न राहवून मी तिला विचारलं, नाहीतरी १२ वर्षाची म्हणजे मुलगी तशी बरीचशी मोठी होती. आजीकडे राहून शाळेत जाणार्याच त्या पोरीची मला मनातल्या मनात काळजी वाटू लागली होती.
"मीमी! मुलीला काही त्रास नाही ना देणार तुझा नवरा?"
"व्हाट ट्रबल?"
"शी इज ग्रोइंग ओल्डर मीमी"
"शी ग्रोज???"
अजूनही मीमीला कसं सांगावं मला कळत नव्हत. असं कसं बोलायचं ना दुसर्याथच्या मुलीबद्द्ल? पण मग दारुसाठी सायकली विकणारा तो बाप मला चैन पडू देत नव्हता.
" ग्रोज अँड लुक्स लाइक अ वुमन मीमी." मी सगळा धीर एकवटून बोलले.
मीमीचा चेहरा बदलला. ती आणखीच खसा खसा काम निपटू लागली. कुठुन बोलले असं झालं मला. माझी मलाच शरम वाटू लागली. मुलांपासून एव्हढ्या दूर रहात असलेल्या त्या जीवाला मी आणखी एक काळजी लावून दिली!!
एक दोन महिने गेले अन एका सकाळी मीमी एका तरतरीत पोरीला घेउन माझ्या घरी आली.
"माय डॉटर"
अग बाई ग! कुठली १२ वर्षाची? ती पोर चांगली वाढीला लागली होती. सडसडीत बांध्याची, गोरीपान, तरतरीत अक्षरशः १५-१६ ची दिसत होती ती पोरं.
"नाऊ स्कूल हीयर. आय डोन्ट..माय इंग्लीश नो गुड. यु टीच"
हातातली पुस्तक घेउन तिची मुलगी माझ्या जवळ बसली अन जमेल तसं वाचून दाखवू लागली.
मी मीमीकडे प्रश्नार्थक नजरेने पाह्यलं. ते समजून ती हसली, "माय एजंट व्हेरीगुड. आय टोल्ड ही अॅ रेंज्ड. नाऊ शी स्टेइंग विथ मी. आय डोन्ट वॉन्ट हर टु स्टे विथ माय हजबंड. नो गुड."
एकूण माझ्या बोलण्याचा तिला बरोबर अर्थ लागला होता. मी मनातल्या मनात त्या कुठल्याश्या एजंटचे आभार मानले. बाबा एक पोरगी वाचवलीस अस मनातल्या मनात म्हणत मी माझ्या आयुष्यात पुन्हा गुंतून गेले.
मीमीची मुलगी जेंव्हा जेंव्हा मीमी माझ्या घरी यायची तेंव्हा तेंव्हा शाळा सुटली की माझ्या घरी यायची. जमेल तेव्हढ मॅथ्स, इंग्लीश मी तिला माझ्याजवळ बसून करायला लावायचे. पोरगी हुशार होती. सुरवातीला गप्प असणारी ती आता बरंच इंग्लीश बोलायला लागली होती. मूळची सुरेख तर होतीच, पण त्याला जुळ्णारे सॉफिस्टेकेटेड असे वागणे तिने झटक्यात उचलले. माझ्या पांढरपेशा मनाला, सिंगापूर हे अतिशय "सेफ" होतं. अन त्या सिंगापुरात मीमी अन तिची मुलगी त्याहूनही सेफ होत्या.
असेच काही महिने गेले अन एक दिवस मीमी तिच्याबरोबर आणखी एक बाई घेउन आली. "सीसी" नाव तिचं. एखादी कापसानं भरलेली उशी कशी गुबगुबीत असते ना? तशी होती ही सीसी !! या सगळ्या बर्मीज बायांची नावे अशीच होती. माझ्या एका मैत्रीणीकडे तर चक्क "ए ए" नावाची बाई होती. फार विचीत्र वाटायचं तिला हाक मारताना.
तर ही 'सीसी' मीमीची धाकटी बहीण. मीमी मिळवत असलेला पैसा बघून हिला सुद्धा आपण असे पैसे मिळवू शकू अस वाटल्याने तिने सिंगापूर गाठलं होतं. मीमीच्या मते तिचा नवरा फार चांगला होता. तो सीसीवर फार प्रेम करायचा. तिची काळजी घ्यायचा. सीसीला दोन अडीच वर्षाचा मुलगा होता, अन तो तिने, इथे यायचं म्हणून आईकडे ठेवला होता. घरात आल्या आल्या माझ्या बाळाची बाळपावलं हातात घेउन सीसीने त्यांचे पापे घेतले. माझ्या मुलाच टपटप धावण पाहून ती नुसती त्याच्याच मागे फिरत होती. हा ही पठ्ठ्या आरामात तिच्याकडे गेला.
आता मीमीने मुळ विषय काढला. तिच्या सराईत नजरेने आतापावेतो माझा मऊपणा ओळखला होता. तिने माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला. मीमी स्वतः सिंगापूरात काम करू शकत होती, ती अशाच एका कनवाळू बाईमुळे. मीमीला काम करायला जे लायसन्स लागत होते, त्याची पूर्तता करायला तिला एका बाईने मदत केली होती. कागदोपत्री मीमी या बाईकडे काम करण्यासाठी आली होती, आणि त्या बाईंच्या नो-ऑबजेक्शन सहीने ती इतरत्र कामे करुन सिंगापुरात राहू शकत होती. आता सीसीला जर मी स्पॉन्सर केलं तर तीसुद्धा तशीच तिच्या नवर्या बरोबर सिंगापुरात राहून अवरली बेसीसवर कमवू शकत होती. दर आठवड्याला स्वतःचा स्वतः वर्कींग व्हिसा भरू शकणार होती. अन हे सगळ करायला तिला मीमीचा व्हेरी गुड एजंट मदत करणार होता.
अर्थात मी जरी लाख तयार असले; तरी माझ्या नवर्या ला अशी कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. सिंगापूर हे अगदी छोटस शहर वजा राष्ट्र असल्याने येथले कायदे कानून अतिशय कडकरित्या तपासले जातात. आम्ही नुकतेच तर आलो होतो तेथे. अर्थात गोष्टी इतक्या थराला पोहचल्याच नाहीत ही गोष्ट वेगळी......
मीमीने, ‘सीसी थोड हळू हळू काम करेल, ठरलेलं काम करेल, पण जरा जास्त वेळ घेईल.. त्याचे पैसे मी द्यायचे नाहीत’ असा करार करुन सीसीला ट्रेनींग करता माझ्या घरी कामाला पाठवायच ठरलं. मीमीच्या जवळ जवळ दुप्पट आकाराची सीसी, कामे करताना गोंधळून जायची, हातात घेतलेला मॉप टाकून ही भांड्यांना सुरवात करायची, अन कपडे तर लावायची तिला जाताना आठवण यायची. पहिल्या दिवशीचा तिचा गोंधळ पाहून मी मीमीकडून शिकलेला माझा शहाणपणा तिच्याशी वाटून घ्यायचं ठरवलं. असा एक आठवडा गेला. माझी स्वतःची तारांबळ अजून कमी झालेली नव्हती, अन एक दिवस दुसर्याचच आठवड्यात सीसी गायब! आलीच नाही ! गेली कुठे ही बया? मी फोन लावते आहे, तर तोही ती उचलत नव्हती. बर मला तशी कल्पनासुद्धा दिली नव्हती? एक दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. आतापावेतो, मी भडकून जाउन मीमीला फोन लावला होता, अन मीमी "माय इंग्लीश नो गूड" करत, सीसीशी बोलायला तयार झाली होती. मी अशी धुसफुसत असतानाच चौथ्या दिवशी सीसी घरात शिरली. आली ती तशीच कपडे न बदलता ओट्याशी उभी राहून भांडी आवरू लागली. तिला घरात शिरलेली पाहून, " आली एकदाची ही बया", असा नि:श्वास टाकत, पण जराश्या घुश्शातच मी बाहेर हॉलमध्ये बसून राह्यले. पण काहीतरी चुकलं होतं. सीसीची ती अवजड काया कशीनुशी उभी राह्यल्यासारखी दिसत होती. एखादा झाडावर डोलणारा हिरवागार झावळा, पालापाचोळा होउन जमिनीवर लोळावा तशी काहीशी रया गेल्यासारखी सीसी दिसत होती. मी तिला काही मदत हवी का पहायला ओट्याशी गेले. माझ्या तिच्याकडे येण्यावर अजिबात न पहाता ही बाई खाली मान घालून भांडी आवरण्याचा प्रयत्न करत होती. मला काहीतरी चुकल्यासारख भासत होतं. शेवटी न राहवुन मी तिला हाक मारली, "सीसी!? व्हेअर वेअर यू? व्हाय वेअरन्ट यु आन्सरींग माय फोन? "
" आय, आय....." काहीतरी बोलण्यासाठी सीसीने तोंड उघडलं खरं, पण त्या तोंडातून शब्द फुटण्या ऐवजी तिच्या डोळ्यातुन मोठ मोठाले पाण्याचे थेंब कोसळू लागले. मी अवाक! "अग काय झालं काय?" "सीसी?"
आणि मोडक्या तोडक्या इंग्लीशमध्ये सीसी कोसळू लागली.
"देट एजंट, लॉक्ड मी थ्री डेज, नॉट गिव्हींग मी माय फोन, अँड..अँड...."
शब्दांची काही गरज होती का? तीन दिवस त्या गुड हेल्पींग एजंटने सीसीला स्वतःच्या घरात डांबून घातली होती. तिचं बोदग दिसणार शरीर त्याच्या अत्याचारांनी केर कचरा होउन गेलं होतें. सिंगापुरात अशी अशिक्षित, कायद्याला घाबरणारी एक आई, स्वतःचं मूल हजारो किलोमीटर दूर ठेवुन, काम करुन कमवावं या अपेक्षेने आलेली...
सीसीला उभं रहाणं मुश्किल होतं, पण बस म्हणून मी धरलेला तिचा हात झटकून ती काम करायचा प्रयत्न करत होती. पैसा कमवायचा आहे ना? पैसा कमवायचा आहे ना? असा काहीसा एक अविर्भाव तिच्या ती आणू पहात होती. गुबगुबीत गोरीपान सीसी एखाद पोतेरं दिसाव तशी दिसत होती.
"माय चाईल्ड देअर...आय केम हीअर..."
मी बाळ तेथे ठेवून इकडे आले ते असलं करायला? माझा संसार चालावा, कुटुंबाला चांगले दिवस यावेत, चार पैसे कमवावेत म्हणून मी आलेली ! अन हा माणूस माझ्या अंगावर तुटून पडतो?
मायेत, प्रेमात राह्यलेली सीसी कोसळून पडली होती. अगं ! तुझा नवरा?
"ही वॉज कॉलींग...कॉलींग!!"
“अँड मीमी? युअर सिस्टर?”
माझ्या या वाक्याबरोबर सीसी गरकन वळली, त्या नजरेत इतका तिरस्कार होता, काय सांगू? मला माझी मला शरम वाटली.
“सीसी यु गोटू पोलीस”
“नो गूड. माय हसबंड सेज नो गूड.”
“युअर हसबंड?”
“स्टँडींग डाउन. ही वीज कॉलींग, कॉलींग! दॅट पर्सन, लाफींग..नॉट गिव्हींग मी माय फोन. आय क्राय क्राय...डर्टी.”
देहबोली काय काय सांगून जाते, जे शब्दांना सुद्धा हरवून जातं
कसबसं काम करुन सीसी पैसे घेउन निघून गेली.
त्या गुड हेल्पिंग एजंटने; हेल्प करण्यापूर्वी सीसीच्या शरीराचा घास घेतला होता. नुसत्या शरीराची भूक नव्हती ती. ती भूक होती जिवंतपणी लचके तोडताना वेदनांनी व्याकुळ होणार्यास दुसर्या जिवाला पाहण्याची, दुसर्यािवर गुलामगिरी लादण्याची, स्वतःच वर्चस्व सिद्ध करण्याची.
माझा मेंदू, नुसतं हे ऐकूनच फुटतो की काय असा झालेला ! एका आठवड्यापूर्वी मला भेटलेली, माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली, धांदरट पण हसरी सीसी. समोर आली की तिचा गुबगुबीतपणा पाहून हसू फुटणारी, जाड हा शब्द वापरावासा न वाटावा अशी सीसी, तिच्या शरीराचा कणन कण आक्रोशत होता. बलात्कार हा शब्द पेपरात वाचणं वेगळं, अन तो शब्द असा देहांकित होउन तुमच्या समोर उभा ठाकणं वेगळं. एक स्त्री म्हणून तिला काही मदत करावी अस काहीही नव्हतं माझ्याकडे. माझ्या कोणत्याच शब्दाला तेथे सांत्वन जमलं नव्हतं. शक्यच नव्हतं. तीन दिवस? दिवस रात्र? हाकेच्या अंतरावर नवरा जो दार वाजवायची धमक दाखवू नव्हता शकला? हजारो मैल दूर छोट बाळ, जे आत्ता इकडे यायच म्हणुन छातीपासून तोडलं होतं !
जगात दारीद्र्य आहे, हे नुसत वाचण्ं वेगळं हो !
"तिला जायच असेल तर ती जाइल पोलीसात. तू काही करु नको, आपल्याला यात अडकायची गरज नाही." नवर्यासने कडक शब्दात सुनावलं. आता काय?
"त्यांचं त्यांना हे सगळ माहीत असतं. चालतं त्यांना असलं. तू त्यात पडू नको. तिची बहीण आहे, तिचा नवरा आहे. असं इललीगल रहायच असेल तर हे सगळ होणारच." नवर्यायच्या तोंडून व्यवहाराची भगवद्गीता प्रसवत होती. माझ्या नजरेसमोरुन सीसीच हताश, अपमानीत शरीर हलत नव्हत.
मी आता सीसी येइल तेंव्हा काय या प्रश्नाने हैराण! तिच्यासाठी मी काहीच करायच नाही? अस भ्याड व्हायचं?
पण ती वेळच आली नाही. तिसर्यान दिवशी कामाच्या वेळेवर दारात मीमी उभी.
"आय वर्क अगेन. सीसी गो बॅक."
"??????"
थोड्यावेळाने मी धीर करुन विचारलं "यू नो दॅट एजंट डीड राँग???"
मीमीने कीव करावी तशी माझ्याकडे नजर फिरवली, " नॉटी हं"
एखादा पहाड कोसळावा तसा तो "नॉटी" शब्द माझ्या डोक्यात पडला. आणि त्या बरोबरच बराच सगळा प्रकाशसुद्धा ! चार मुलं असलेली मीमी, हे सगळ चांगलीच जाणून, पचवून होती. घरात कवडीही कमवून न आणणारा, नुसता रात्री पुरुष होणारा नवरा बरा, की अधीमधी किंमत वसूल करणारा एजंट बरा? तिच्या नजरेतून पहा? मीमीही तशी फार वयाची नव्हती? स्वतःला टापटिप ठेवणारी, चटचट हलणारी, दिसायला सुंदर अशी मीमी !!
मी नक्की काय विचार करतेय? कोणत्या दिशेने विचार करतेय हेच मला समजेना. तिथुन पुढे जवळ जवळ सहा वर्ष मीमी माझ्याकड येतं राह्यली. परत कधीच सीसी हा विषय आमच्यात आला नाही.
काळाच्या एखाद्या अदृश्य भोवर्यायत आम्ही तिघी अडकलो होतो. गरगर फिरणार्या पाण्यावर श्वासासाठी धडपडत एकमेकीकडे अगतिक नजरेने पहाण्याशिवाय...की एकमेकाच्या नजरा चुकवण्याशिवाय?....हातात काहीही नसलेल्या आम्ही. त्या भोवर्याात आणखी एक भोवरा अधेमधे उठायचा मीमीच्या कोवळ्या पोरीचा !! शिकायला, आईबरोबर रहायला म्हणून आलेली ती बारा तेरा वर्षाची पोर...गुड हेल्पिंग एजंट...बर्मातला नवरा..!!!
पाण्यावरचे भोवरे आपल्या अखत्यारीत नसतात. त्यांच उठणं, अन विरुन जाणं, काहीच आपल्या हातात नसतं.
नक्की कोण सही, कोण चुकीचं काहीही ठरवायचा अधिकार कोणालाच नसतो याची आणखी एक जळजळीत जाणीव ! दोन आठवडे येउन शरीरा मनाने पराभूत अपमानित होऊन परत जाणारी सीसी, "नॉटी"पणा पचवून त्यावर उभी राहून आयुष्य रेखणारी मीमी, अन पांढरपेशा समाजात राहून समाजाला असणार्यान किडीकडे डोळेझाक करणारी मी !! तिघीही स्त्रियाच !!

प्रतिक्रिया

साती's picture

8 Mar 2015 - 3:07 pm | साती

वेगळाच आहे हा अनुभव!

एक एकटा एकटाच's picture

8 Mar 2015 - 3:09 pm | एक एकटा एकटाच

लेख छान होता.

शेवटचा पेरेग्राफ
खरच विचार करायला लावणारा

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 3:36 pm | सविता००१

खतरनाक अनुभव आहे हा.
वरती अमोल यांनी म्हटल्याप्रमाणे शेवटचा पॅरॅग्राफ खरच विचारात पाडणारा आहे

पियुशा's picture

8 Mar 2015 - 5:05 pm | पियुशा

ट्ची !
काय लिहु तेच समजत नाहिये !

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 5:28 pm | मधुरा देशपांडे

भयंकर आहे हे. अस्वस्थ करणारे लिखाण.

बोका-ए-आझम's picture

8 Mar 2015 - 6:18 pm | बोका-ए-आझम

भयावह आहे हे!The more the things change, the more they are the same!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2015 - 7:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुन्न करणारा अनुभव ! कितीही वेळा असं काही ऐकलं, पाहीलं तरी सुन्न व्हायला होतंच !

प्राची अश्विनी's picture

8 Mar 2015 - 8:53 pm | प्राची अश्विनी

खरंड, सुन्न झाले.

शेवट खुप विचारात टाकनारा.

प्रियाजी's picture

8 Mar 2015 - 11:05 pm | प्रियाजी

शब्द संपले. काहीही सुचत नाही.

काय बोलायला उरलं नाही गं! माझ्याकडं कामाला येणारी मईझा (बरेच दिवस मी तिला मरिसा म्हणायचे) आठवली. आईला भेटायला म्हणून तिच्या देशी गेली आणि पुन्हा व्हिजा मिळाला नाही आणि नवर्‍याने अमेरिकेतून परत जाणे नाकारले म्हणून हे वेगळे झाले. पुढे काय झाले असेल असे कधीमधी वाटत राहते. खूप गोड होती.

पाण्यावरचे भोवरे आपल्या अखत्यारीत नसतात. त्यांच उठणं, अन विरुन जाणं, काहीच आपल्या हातात नसतं.
नक्की कोण सही, कोण चुकीचं काहीही ठरवायचा अधिकार कोणालाच नसतो याची आणखी एक जळजळीत जाणीव ! दोन आठवडे येउन शरीरा मनाने पराभूत अपमानित होऊन परत जाणारी सीसी, "नॉटी"पणा पचवून त्यावर उभी राहून आयुष्य रेखणारी मीमी, अन पांढरपेशा समाजात राहून समाजाला असणार्यान किडीकडे डोळेझाक करणारी मी !! तिघीही स्त्रियाच !!

अप्रतिम लिहिलं आहेस.
अस्वस्थ,सुन्न.

स्रुजा's picture

11 Mar 2015 - 12:09 am | स्रुजा

ह्म्म ! खरं तर हाच लेख पहिल्यांदा वाचला पण अजून ही मी काय प्रतिसाद देऊ कळत नाहीये इतका तो हलवून गेलाय. तुझ्या लिखाणाबद्दल वेगळं काय लिहू. वेळोवेळी पावती दिलीच आहे. सुन्न हाच शब्द योग्य आहे.

स्मिता श्रीपाद's picture

9 Mar 2015 - 11:22 am | स्मिता श्रीपाद

खुप छान असं तरी कसं म्हणु...
पण तरी.. अप्रतिम लिहिलं आहेस.
भयानक अनुभव...

स्नेहल महेश's picture

9 Mar 2015 - 11:23 am | स्नेहल महेश

बापरे
हे वाचून इतका त्रास झाला …… तुम्हाला प्रत्येक्ष तिच्याशी बोलताना काय वाटले असेल याची कल्पनाच करू शकत नाही

इथले भय कधीच संपणार नाही का ?
अस्वस्थ व्हायला होतंय …….

खूपच विदारक परिस्थिती ....काय बोलू सुचतच नाहीये ..सुन्न करणारे लेखन !!

गिरकी's picture

9 Mar 2015 - 1:04 pm | गिरकी

:(

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 3:51 pm | सस्नेह

समाज कुठलाही असो, शोषण संपत नाही !

भावना कल्लोळ's picture

9 Mar 2015 - 6:56 pm | भावना कल्लोळ

+१

मितान's picture

9 Mar 2015 - 4:36 pm | मितान

अस्वस्थ करणारे लेखन !

सामान्य वाचक's picture

9 Mar 2015 - 4:53 pm | सामान्य वाचक

एकंदरीत काय, जगात कुठेही जा, बळी तो कान पिळी हेच सत्य आहे
गरजू व्यक्ती वर अन्याय होताच राहणार

सुचेता's picture

9 Mar 2015 - 7:32 pm | सुचेता

बोलायला शब्द उरले नाहीत.

खुप चांगला लिहला आहेस लेख. शेवटचा पॅरा नक्कीच विचार करायला लावतो.

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 9:53 pm | स्वाती दिनेश

काय लिहू ग? सुन्न झाले आहे वाचताना..
स्वाती

कौशी's picture

9 Mar 2015 - 11:22 pm | कौशी

काय लिहु काही शब्द सुचत नाही.

स्वाती२'s picture

9 Mar 2015 - 11:51 pm | स्वाती२

सुन्न!

सुन्न करणारा अनुभव.अस्वस्थ करणार लेखन.

उमा @ मिपा's picture

10 Mar 2015 - 10:33 am | उमा @ मिपा

डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं, म्हणून म्हणते, तुम्ही लिहिलंय खूप छान!
पण हे प्रत्यक्ष घडलंय आणि अजूनही घडत असेल हे अस्वस्थ करणारं आहे.
सरणार कधी रण?

सुप्रिया's picture

10 Mar 2015 - 1:57 pm | सुप्रिया

सुन्न झाले वाचून. पण अप्रतिम लिहिलं आहे त्याची ही पोचपावती.

सानिकास्वप्निल's picture

10 Mar 2015 - 2:30 pm | सानिकास्वप्निल

लेख वाचून अस्वस्थ झालेय :(

पिशी अबोली's picture

10 Mar 2015 - 3:03 pm | पिशी अबोली

डोळ्यांत पाणी आलं... :(

स्पा's picture

10 Mar 2015 - 4:24 pm | स्पा

चायला....

वर्णनशैलीसाठी शाब्बास !!
हे कटुसत्य जगात असं जेव्हाजेव्हा नव्याने पुढे येतं तेव्हा उरते ती फक्त अस्वस्थता !!!

कविता१९७८'s picture

10 Mar 2015 - 8:30 pm | कविता१९७८

वाचुन सुन्न झाले पण सगळीकडे हेच आहे भारतात ही ज्या बायका २४तास काम करतात त्या सगळ्याच सेफ वातावरणात नसतात.

खरंच खूपच सुन्न करून केला हा लेख..

पण खूप छन लिहिलं आहे. सुरुवातीला वाचताना मजा येत होती. नंतर हा लेख असं वळण घेइल अशी कल्पनाच आली नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी कुणाला किती अपेष्टांमधून जावं लागतं हे कळून खरंच डोळ्यांत पाणी आलं.

भाग्यश्री's picture

11 Mar 2015 - 4:31 am | भाग्यश्री

फार अंगावर आला हा लेख! आधी काहीतरी खुसखुशीत असेल म्हणून वाचायला घेतला ..
शेवटचा परीच्छेद समर्पक.. :(

कन्यारत्न's picture

11 Mar 2015 - 5:34 pm | कन्यारत्न

जिवन जगताना आपला द्रुष्तिकोन महात्वचा ....

आनन्दिता's picture

12 Mar 2015 - 7:30 am | आनन्दिता

तुझं लिखाण नेहमीच काळजाचा ठोका चुकवतं !

एकाच वळणावरच्या तीन वेगवेगळ्या स्त्रिया पण वृत्तींचे पदर कितीतरी वेगळे.

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2015 - 1:11 pm | पिलीयन रायडर

मला काही कळत नाही काय लिहावं...

मनुराणी's picture

13 Mar 2015 - 5:24 pm | मनुराणी

सुन्न झाले वाचून. बर्याच मेडस् जास्त पॆसे कमावण्यासाठी स्वेच्छेने असे उद्योग करतात असे ऎकुन आहे.

विशाखा राऊत's picture

13 Mar 2015 - 7:41 pm | विशाखा राऊत

ह्म्म्म्म सुन्न झाले... :(

भिंगरी's picture

13 Mar 2015 - 10:20 pm | भिंगरी

स्त्री जन्मा हीच का तुझी कहाणी?

निवेदिता-ताई's picture

15 Mar 2015 - 11:28 pm | निवेदिता-ताई

सुन्न करून केला हा लेख..

श्रीरंग_जोशी's picture

16 Mar 2015 - 3:31 am | श्रीरंग_जोशी

लेख वाचायला सुरुवात केली अन रोचक व्यक्तीचित्रण वाचायला मिळत आहे म्हणून खूप छान वाटत होतं.

तेवढ्यात कथानकानं एकदम वास्तव वळण घेतलं अन छानपणाची जागा, चीड, संताप अन अंतिमतः उद्वेगानं घेतली. अजुनही शब्द सुचत नाहीयेत भावना व्यक्त करायला.

एजंट आहे म्हंटल्यावर माणसाने पैशासाठी काम करावे. आपल्या कमाईतला हिस्सा देण्याचे सीसीने नक्कीच मान्य केले असेल. सिंगापूरमध्ये ड्रग तस्करांच्या डावामुळे अजाणतेपणी ड्रग्ज बाळगण्याच्या दोषासाठी थेट मृत्यूदंड दिले गेल्याचे ऐकले आहे तिथे हा एजंट एवढा निर्ढावलेपणाने इतके नीच कृत्य करू शकतो...

भारतासारख्या देशात तर अशी माणसे याहून अधिक निर्ढावलेपणाने शोषण करत असतील अन आपण जालावरील प्रतिक्रियांमध्ये संताप व्यक्त करण्याखेरीज काहीच करू शकत नाही...

विशाखा पाटील's picture

16 Mar 2015 - 11:38 am | विशाखा पाटील

हं! सिंगापूर असो, भारत असो की आखाती देश... आजच्याच पेपरातली ही बातमी -
http://www.gulf-daily-news.com/source/XXXVII/361/pdf/page04.pdf
http://www.gulf-daily-news.com/source/XXXVII/361/pdf/page05.pdf

लिहिण्याची शैली आणि त्यात मांडलेले विचार आवडले.

त्रिवेणी's picture

16 Mar 2015 - 12:56 pm | त्रिवेणी

तुझा प्रत्येक लेख नव्याने विचार करायला लावतो.

पैसा's picture

16 Mar 2015 - 5:08 pm | पैसा

:(

तुझं लेखन नेहमीच भिडणारं असतं. हा सगळा अनुभव तर अगदी अंगावर आला. अस्वस्थ झालेय. सीसीच्या जागी मिमीने आणखी नव्या बाईला आणून उभं केलं असेल? त्या एजंटचं विकृत वागणं तिला नाॅटीनेस वाटावा हेच सगळ्यात जास्त बोचलं.

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2015 - 5:42 pm | पिलीयन रायडर

आख्या लेखातला "नॉटी हं" फार फार त्रास देऊन गेला...

नगरीनिरंजन's picture

22 Mar 2015 - 11:07 am | नगरीनिरंजन

अस्वस्थ करणारा लेख! तथाकथित प्रगतीच्या देवाला असे किती बळी रोजच्या रोज चढवले जात असतील कोण जाणे? अब्जावधी लोकांच्या या जगात दर आठवड्याला लक्षावधींची भर पडते. त्यातले काही टक्के सुखवस्तु लोक सोडले तर बाकीच्यांचं जगणं म्हणजे नरक आहे; पण तो नरक सुखवस्तु लोकांच्या प्रगतीच्या जल्लोषात झाकला जातो.

'व्यवहाराची भगवद्गीता' जास्त अस्वस्थ करून गेली.