ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
11 Jan 2015 - 5:59 pm

आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली.

दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्‍यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले.

२.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्‍या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले.

आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते"
म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट.

एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला.

बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड.

मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.

राहणीप्रतिक्रियाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

परिंदा's picture

11 Jan 2015 - 6:25 pm | परिंदा

zomato, burrp या साईटस वर हा रिव्यु टाका, म्हणजे कळेल लोकांना. जनरली रेस्टॉरंट निवडताना लोक अश्या साईटस वरचा रिव्यु वाचुन निर्णय घेतात, त्यामुळे तुमचा मॅसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा

@zomato, burrp या साईटस वर हा रिव्यु टाका, म्हणजे कळेल लोकांना. जनरली रेस्टॉरंट निवडताना लोक अश्या साईटस वरचा रिव्यु वाचुन निर्णय घेतात, त्यामुळे तुमचा मॅसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.>>> +++++++++१११११११११११११११११ हे कराच!

मंदार दिलीप जोशी's picture

13 Jan 2015 - 10:58 am | मंदार दिलीप जोशी

नक्की कराच हे

सामान्यनागरिक's picture

19 Jan 2015 - 5:17 pm | सामान्यनागरिक

हा अनुभव जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. फेसबुकवरही टाका.
जर काही मनाची शिल्लक असेल तर ते तुमच्याशशिसंपर्क करतील, नाहीतर सोडुन द्या.
पण प्रसिद्धी मात्र जरुर द्या. त्या मुळे किमान काही जण तरी अश्या दिव्यातुन वाचतील.

त्रिवेणी's picture

11 Jan 2015 - 6:30 pm | त्रिवेणी

आज साऊथ इंडिजला आरक्शन न करताच गेलो. खुप गर्दि होती पण २० मि. टेबल दिले. जातांना त्यानीच दिलगीरी व्य क्त केली. लगेच टेबल नाही देवु शकले म्हणुन.

रघुपती.राज's picture

11 Jan 2015 - 7:08 pm | रघुपती.राज

यान्चे म्हणणे ऐका. zomato, burrp या साईटस वर हा रिव्यु टाकाच.
सुतासारखे सरळ येतील.

आमच्या परिसरात एक चायनीज हाटेल चालु झाले होते. त्यानी सुरुवातीला चान्गली सेवा दिली. नन्तर मात्र एकुण्च माजोरडेपणा दिसुन येउ लागला. सर्वत्र योग्य प्रसिद्धि मिलुन ते सहा महिन्यात बन्द पड्ले.

आप्ल्या लेखाबद्द्ल धन्यवाद. जायचा विचार रहित केला आहे.

यान्चे म्हणणे ऐका. zomato, burrp या साईटस वर हा रिव्यु टाकाच.
सुतासारखे सरळ येतील.

हो कदाचित. काही सेन्सिबल आणि प्रोफेशनल रेस्टॉरंटमालकांनी अशा फोरम्सवर तक्रार करणार्‍या ग्राहकाची लेखी माफी मागून त्यांना सन्मानाने वेळ देऊन "ऑन हाऊस" मेजवानीला आमंत्रण दिल्याच्या केसेसही तिथेच वाचण्यात आल्या आहेत.

एखाद्या रेस्टॉरंटला "गुर्मी" हाच आपला यूएसपी ठेवायचा असू शकतो. तीही एक वेगळी स्ट्रॅटेजी म्हणून काही कंडिशन्स पूर्ण होत असल्यास काम करुन जातेही.

पण त्यासाठी पंचवीस पन्नास वर्षे आपल्या क्वालिटी अन चवीने तेवढी हुकूमत कमवावी लागते. मग लोक रुमाल टाकून पहाटेपासून रांगा लावूनही उभे राहतात. आणि त्यांच्यावर ओरडून क्यू मॅनेजमेंट केली तरी गप ऐकतात. (ते चांगलं आहे असं नव्हे, पण समटाईम्स इट वर्क्स. तीच कदाचित दुकानाची / हाटेलाची खासियतही बनते आणि यांचा प्रसिद्ध पदार्थ मी आज रांगेत नंबर लावून संपण्याच्या आत मिळवला अश्या आनंदात लोक दुपारी पिशवी नाचवत आपापल्या घरी येतात त्यात त्या दुकानदाराचं अफाट यश आहे.) यू डोंट बाय इट, यू अचिव्ह इट. ;)

पण... उद्घाटनाच्या पहिल्याच आठवड्यात अथवा महिन्यात अथवा वर्षात असं काही म्हणजे टू मच.

भुमन्यु's picture

12 Jan 2015 - 1:53 pm | भुमन्यु

नक्कीच रिव्ह्यु टाका...
अश्याच पद्धतीने तक्रार करुन नाशिक मधील यु. एस. पिझ्झा बंद करण्याचा उपदव्याप केलाआहे..फरक इतकाच की यु. एस. पिझ्झा च्या साईट वर रितसर फिडबॅक फॉर्म भरला होता.

सविता००१'s picture

11 Jan 2015 - 7:11 pm | सविता००१

बरं झालं सांगितलंत. आम्हीपण हे वेळीच वाचलं आणि बचावलोच की. धन्यवाद.

धर्मराजमुटके's picture

11 Jan 2015 - 7:23 pm | धर्मराजमुटके

माझे मत थोडेसे वेगळे आहे.
आपल्याला त्रास झाला ही निश्चितच चांगली गोष्ट नाही. पण थोडा हॉटेल चालकांच्या बाजूनेही विचार करा. एकूण लेखावरुन असे वाटते आहे की हे हॉटेल नवीनच सुरु झाले आहे. कदाचित हॉटेल चालविणार्‍या मंडळींना कस्टमर म्यानेजमेंटचा पुरेसा अनुभव नसेल. त्यांना थोडा वेळ द्यावा. शिवाय आज रविवार असल्या कारणाने एकंदरीत सर्वच हॉटेलात प्रचंड गर्दी असते. गर्दीचे म्यानेजमेंट हा भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणणारा विषय आहे. अनुभवातून शहाणपण येता येता वेळ लागतोच माणसाला.

रागाच्या भरात लिहिलेला आपला एक रिव्ह्यू त्यांचे कदाचित फार मोठे नुकसान करु शकतो व ती व्यक्ती व्यवसायात जम बसण्याअगोदरच व्यवसायातून उखडली जाऊ शकते. त्यामुळे त्यांना थोडा वेळ द्यावा असे मला व्यक्तीशः वाटते. जर अजून काही दिवस गेले आणि तरीही असे अनुभव वारंवार येऊ लागले तर निश्चितच इतर वाचक म्हणतात तसे खराब रिव्ह्यू लिहिण्याचे पाऊल उचलले जाऊ शकते. त्या अधिकारापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे हॉटेल एका मराठी माणसाचे आहे असे आपल्या लेखावरुन वाटते. मराठी माणूस हा पिढ्यानपिढ्या व्यावसायिक नाहिये. त्याला ती स्कील शिकण्यासाठी निश्चितच थोडा वेळ लागेल. मराठी माणूस हा गोड बोलण्यात नेहमीच मार खातो असे माझे आजपर्यंतचे निरिक्षण आहे. जसजसा वेळ जाईल तसतसा यात नक्कीच बदल होईल अशी आशा बाळगुया. संयमाचे फळ गोड असते असे लक्षात ठेवा.

आदूबाळ's picture

11 Jan 2015 - 8:13 pm | आदूबाळ

अजिबात सहमत नाही.

एक तर जमत नसेल तर हॉटेल टाकू नको ना भौ. बरं, गैरसोय झाली तर किमान मग्रुरी दाखवू नकोस, अशी अपेक्षा करण्यात काहीच गैर नाही.

पेठकरकाकांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे.

सामान्यनागरिक's picture

19 Jan 2015 - 5:20 pm | सामान्यनागरिक

सेवा देतांना वेळ लागला किंवा पाहिजे ते देता आलं नाही तर चेहेर्यावर क्षमेच भाव तरी असले पाहिजेत हो ! मराठी म्हणून काहीही खपवुन घ्यायचे का? त्यांना सुद्धा कळले पाहिजे की चुक झाली म्हणुन!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Jan 2015 - 9:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१००% असहमत.

अडचणींमुळे सेवा देऊ नं शकणं एक वेळ समजु शकतो. पण कमीत कमी गिर्‍हाईकाची माफी तर मागीतली असती? उर्मटपणा सहन करुन घ्यायला श्री.सर्वसाक्षी फुकट जेवायला गेलेले नव्हते. गिर्‍हाईकांशी नीट वागता येत नसेल तर तो माणुस व्यवसायाला नालायकचं की. इथे मराठी-अमराठीचा मुद्दा येतो कुठे? आमच्या मित्रवर्यांनाही वाईट अनुभव आलाय तिथे. ४-५ वेळा पाणी मागुनसुद्धा साधं पाणी दिलं गेलं नाही त्याच्या सासुबाईंना. जो कोण नमुना कौंटर वर होता त्याला सांगीतल्यावर त्यानी वसकुन पाणी आणुन द्यायला सांगीतलं. तेही लगेचं नं देता थोड्या वेळानी दिलं गेलं.

झोमॅटो वर रिव्ह्यु द्या टाकुन, ४ दिवसात सुतासारखे सरळ येतील.

नाखु's picture

12 Jan 2015 - 9:20 am | नाखु

खरेच जर आपल्या आवाक्याबाहेची परेस्थिती असेल तरी ग्राहकाशी नीट आणि विनयशीलच रहावे हे या व्यव्सायात उतरतानाच माहीती असणार्.आगावू आरक्षण असलेल्यांची ही कथा तर ऐनवेळी आलेल्यांना काय हाकलून लावणार काय?
काटा किर्र सुद्धा आपली नवलाई आणी ऐट घालवून बसले अश्या माजोरडेपणामुळे!!

मृत्युन्जय's picture

12 Jan 2015 - 11:18 am | मृत्युन्जय

पूर्णतः असहमत.

पहिली गोष्ट म्हणजे एक टेबल किमान ४५ मिनिटे सिकामे होत नाही याचा अंदाज हॉटेल चालवणार्‍या माणसाला यायलाच पाहिजे. वाटल्यास सुरुवातीचे ३ -४ दिवस मॉक करुन बघा.

दुसरी गोष्ट म्हणजे टेबल बुकिंग मध्ये गोंधळ झाला आहे हे मालकांना २ वाजता कळले असणे अपेक्षितच आहे. ते स्पष्टपणे ग्राहकाला सांगणे अपेक्षित आहे. मुळात गोंधळ झाला तर त्याबद्दल मनापासून दिलगिरी अपेक्षित आहे. वॉक इन ग्राहकांना टेबळ मिळण्यास उशीर होतो हे ठिक आहे पण आधीच आरक्षित केलेले असताना असे घडणेच अपेक्षित नाही.

शिवाय पोचल्यावर जे टेबल देतो सांगितले आहे ते सांगुन ते न देणे, एक्त्र आलेल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी बसायला लावणे (सोय करणे शक्य असताना) आणि ऐन जेवण्याच्या वेळेस ३० -४० मिनिटे उशीर करणे हे अक्षम्य आहे.

जेवण तयार आहे हे सांगुनही ऐनवेळेस संपले असे सांगणे तर मुर्खपणा आहे. दारावर उभा असलेला वॉचमन असेल तर ठीक आहे. अन्यथा हॉटेल सांभाळणार्‍या इतर कोणालाही जेवण तयार आहे की नाही हे माहिती असणे अपेक्षित आहे.

मुख्य म्हणजे झाल्या प्रकाराबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली असती, नंबर लिहुन घेतला असता, परत असे होणार नाही असे सांगितले असते तर झाल्या प्रकाराची एवढी चीड आली नसती.

सर्वसाक्षी's picture

12 Jan 2015 - 12:41 pm | सर्वसाक्षी

धर्मराजसाहेब
मला कुणाचेही नुकसान करण्यात स्वारस्य नाही, मराठी माणसाचे तर नाहीच नाही. गर्दी, उशीर हे मी समजु शकतो, जिथे उत्पादन वा सेवा आहेत तिथे त्रुटी या असणारच. पण समस्या कशा प्रकारे हाताळली जाते हे महत्त्वाचे.
आरक्षण असताही विना तक्रार एक तास वाट पाहणारा ग्राहक, ज्याने काही वेळापूर्वी 'उशीर झाला आहे, जेवण संपणार नाही ना?' अशी विचारणा केली होती; ते ग्राहक न जेवता बाहेर पडते व व्यवस्थापनाला त्याचे काही सोयर सुतक नसते हे वाईट आहे. असे लोक 'आतिथ्य' या व्यवसायात राहण्यास अपात्र आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.

झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करुन (माफीची अपेक्षा नाही) जर पर्यायी पदार्थ सुचविले गेले असते तर ही वेळ आली नसती. वर 'आ ला कार्टे मागवा' असा शिष्ठ शेरा. हे कुणाला आवडेल?

या क्षणी विठ्ठल कामतांचे इडली.... आठवले. त्यांचे वडील जर भरलेली बशी ग्राहकाने न खाता परत आली तर त्यातला पदार्थ चाखुन बघत असत. ग्राहकाला भूक नसेल वा नकोसे झाले अस तर गोष्ट वेगळी पण पदार्थ खराब झाल्यामुळे खाल्ला गेला नसेल तर ते होता कामा नये असा त्यांचा कटाक्ष होता.

मराठी माणुस गोड बोलत नाही असे अजिबात नाही. त्यापलिकडे म्हणजे आतिथ्य या व्यवसायात येणार्‍याने आपला प्रांत,जात, भाषा हे सगळं विसरुन आपण एक सेवादाता आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. नामांकित संस्था पदरमोड करुनही ग्राहकाला विन्मुख जाऊ देण्यापासून परावृत्त करतात. गेल्या आठवड्यात हैद्राबाद येथे माझे विवांता येथे आरक्षण होते व मी रात्री ११.३० - १२.०० च्या सुमारास पोचणार होतो. काही कारणाने त्यांना मला हमी देउनही सामावणे शक्य झाले नाही. मला रात्री १०.०० ला दिलगीरी व्यक्त करणारा दूरध्वनी आला. त्या व्यक्तिने प्रथम दिलगिरी व्यक्त केली व मग माझी पर्यायी व्यवस्था त्याहुन महागड्या ताज डेक्क्न मध्ये ठरलेल्या दरातच केली असल्याचे सांगितले.

कारण काहीही असो, ग्राहका कडे दुर्लक्ष करणे आज कुणालाही परवडणारे नाही. तंत्रज्ञानातील तफावत हा मुद्दाच उरलेला नाही. जे एक बनवु शकतो ते इतरही बनवु शकतात. मग आपले वेगळेपण व अस्तित्व टिकविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तत्पर सेवा, पारदर्शी व्यवहार, पाळता येईल असाच शब्द देणे व तो पाळणे, ग्राहकाच्या अपेक्षा व आनंद समजुन घेणे व त्यानुसार वर्तन करणे.

कपिलमुनी's picture

12 Jan 2015 - 9:30 pm | कपिलमुनी

विठ्ठल कामत ह एक शेप्रेट इशय आहे. त्यांचा किति खर किति खोटा हे तेच जाणे

आजानुकर्ण's picture

12 Jan 2015 - 9:33 pm | आजानुकर्ण

+१. माझ्या अनुभवात आजपर्यंत सर्वाधिक उर्मट सेवा व महागडे खाणे कामत मध्येच खाल्ले आहे

vikramaditya's picture

12 Jan 2015 - 11:02 pm | vikramaditya

हाका मारुन बोलवण्या-या ग्राहकांकडे दुर्लक्ष करुन जाणारे वेटर्स इथेच बघितले.

नुसत्या ब्रँडींग च्या जोरावर धूळफेक आहे.

बाय द वे, ह्यांच्याद्वारे फसवणुक झालेल्या एका व्यक्तीचा लेख मिपावर वाचला होता. आता सापडत नाही आहे.

टाईम्स मध्ये परत ह्या ग्रुप च्या बिसिनेस हेड साठी अ‍ॅडस बघुन आठवण झाली. नवे 'स्केपगोट' शोधले जात असावेत बहुधा.

vikramaditya's picture

12 Jan 2015 - 11:06 pm | vikramaditya

तेथील ईडली हा देखील शेप्रेट इशय आहे. एका ठिकाणीची ईडली चक्क पेपरवेट म्हणुन वापरता येइल अशी होती... झX मारली आणि खायला गेलो असे झाले.

पैसा's picture

13 Jan 2015 - 9:42 am | पैसा

कुडाळला अशीच दगडी इडली आणि थंडगार सांबार अर्धा तास वाट बघून घ्या एकदाचे म्हणून निर्विकारपणे दिले होते. त्यानंतरच्या चहात किमान चार चमचे साखर घालून उकळला होता. पिऊन बघा म्हटलं तर बहुधा तोच चहा परत पाणी घालून आणून दिला होता.

विट्ठल कामत यांची खरी हॉतेल्स किती आहेत आणि फ्रँचाईसी किती आहेत देवजाणे. कदाचित हे असले खाणे फ्रँचाईसींमधे मिळत असावे.

योगी९००'s picture

14 Jan 2015 - 10:07 am | योगी९००

विठ्ठल कामत हा वेगळाच विषय आहे. मायबोलीवर एक लेख वाचला होता त्यांच्यावर..

बाकी झ नंतर X कशाला टाकले आहे? झक मारणे ही काय वाईट शिवी नाही.

भाराभर शाखा / फ्रँचायजी काढून चवढव, रेसिपी कंट्रोल, प्रोसेस कंट्रोल, घटकपदार्थांचे स्टँडर्डायझेशन यातले काही म्हणता काही न केले गेल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कामत रेस्टॉरंट्स.

आवर्जून टाळावे असं इम्प्रेशन करणारी. तरीही बहुधा नावामुळे आणि स्वच्छ मिळण्याच्या एका खर्‍याखोट्या कल्पनेने जिथे इतर काहीच ऑप्शन नाही अश्या हायवेजवर टपर्‍या वगैरे टाळून लोक इथे जाताना दिसतात.

घट्ट इडल्या, बेचव चोथट चटणी, कळाहीन सांबार, मृतदेहाप्रमाणे अंग टाकलेला डोसा, जाड कव्हरचे री-हीटेड बटाटेवडे आणि काय काय बोलावं.

थर्डक्लास.

सविता००१'s picture

14 Jan 2015 - 2:43 pm | सविता००१

माझ्यासारखंच इतकं सेम कुणाचं मत असेल असं वाटलं नाही.

भुमन्यु's picture

27 Jan 2015 - 3:24 pm | भुमन्यु

अतिशय भयानक... नाशिकला महामार्ग बस स्थानका बाहेर असलेल्या कामत मध्ये एक्दा जाऊन पश्चाताप ओढऊन घेतलाय.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jan 2015 - 2:50 am | प्रभाकर पेठकर

सर्वसाक्षी,
'मेतकुट'ची जाहीरात माझ्याकडेही वॉट्सअ‍ॅपवर आली होती.
तुम्हाला आलेला अनुभव अत्यंत वाईट आणि स्वतःच्याच व्यवसायावर कुर्‍हाड चालविणारा आहे.
उपहारगृह व्यवसाय हा 'सेवा' व्यवसाय आहे. ज्याला दुसर्‍याची सेवा करण्यात कमीपणा वाटतो त्याने उपहारगृहच काय कुठल्याही 'सेवा' व्यवसायात पदार्पण करू नये.
नव्याने सुरु केलेल्या व्यवसायास अप्रतिम यश येत असताना श्री सनी पावसकर उपहारगृहाच्या बाहेर उभे होते हे मला जरा खटकले. आत मध्ये गिर्‍हाईकांची झिम्मड उडाली असताना, आपल्या कर्मचार्‍यांना परिस्थिती हाताळणे कठीण जात असताना, पदार्थ संपत असताना आणि बैठक व्यवस्था कोसळली असताना मालकाने त्या 'रणात' स्वतः उडी घेतली पाहिजे. टेबलवर जेवण पोहोचविण्यापासून, टेबल साफ करणे, गिर्‍हाईकांची सोय पाहणे, त्यांचा राग शांत करणे, प्रसंगी कांही महत्त्वाचे पदार्थ पदरमोड करून (ऑन द हाऊस) पुरवून लोकांचा राग शांत करणे, परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे, दिलगिरी व्यक्त करणे, गैरसोय झालेल्यांकडे व्यक्तिशः लक्ष पुरविणे आदी अनेक अनेक कामे असतात.
मराठीतील 'अतिथी देवो भवः' आणि इंग्रजीतील 'Customer is always right' ही तत्वे विसरता कामा नये. एव्हढेच राहून आज गैरसोय झालेले गिर्‍हाईक जेंव्हा पुन्हा तुमच्या उपहारगृहाला भेट देते तेंव्हा पुन्हा त्यांना व्यक्तीगत सेवा देवून त्यांच्या मागच्या भेटीतील राग कमी करण्यास त्यांना मदत करावी.
कधी कधी हाताखालच्या कर्मचार्‍यांमुळे, त्यांच्या मग्रूर वागण्यामुळे मालकावर नामुष्कीचा प्रसंग येतो. पण तिथेही त्या कर्मचार्‍याच्या गैरवर्तुणीकीची नैतिक जबाबदारी मालकालाच उचलावी लागते. गिर्‍हाईकाजवळ दिलगीरी व्यक्त करून गिर्‍हाईक 'धरून ठेवावे' लागते.

एकाच प्रसंगावरून, एखाद्या सोशल साईटवर बदनामी करण्याची कठोर शिक्षा देण्याचे मात्र मी समर्थन करणार नाही. पहिलाच प्रसंग असल्याकारणाने मालकाचा ईमेल पत्ता घेऊन किंवा उपहारगृहाची स्वतःची वेबसाईट असेल तर त्यावर तपशिलवार तक्रार नोंदवावी. असे वारंवार अनुभव आल्यास सोशल साईटवर तपशिल देण्याची ताकीद द्यावी आणि परिस्थितीत बदल होण्याची अपेक्षा ठेवावी. न झाल्यास, पुन्हा पुन्हा तसेच किंवा इतर गंभीर तक्रारीचे प्रसंग आले तर जरुर सोशल साईटवर तपशिल द्यावेत.

वाक्या-वाक्याशी सहमत...

नगरीनिरंजन's picture

14 Jan 2015 - 7:49 am | नगरीनिरंजन

पेठकर काकांचा प्रतिसाद आवडला. सेवा चांगली न मिळाल्यास मालकाकडे तक्रार करणे व पुन्हा न जायचे ठरवणे इतपत ठीक आहे. सूडबुद्धी म्हणून सोशल साईट्सवर बदनामी करणे हे क्रौर्य आहे. सोशल साईट्स हे हत्यार आहे ते जपून वापरावे.

फारएन्ड's picture

19 Jan 2015 - 3:52 am | फारएन्ड

सूडबुद्धी ने नव्हे, पण एक अनुभव म्हणून तुम्हाला जो आला तो तसाच्या तसा लिहीण्यात काहीही चूक नाही - विशेषतः ट्रिपअ‍ॅड्वायझर सारख्या स्थळावर, जेथे विक्रेत्यालाही तितकीच संधी असते खुलासा करण्याची. मी अनेक हॉटेल्स बद्दल लिहीलेले आहेत. जेथे विक्रेत्याला उत्तर देण्याची संधी मिळत नाही तेथे टाकणे अनफेअर आहे याच्याशी सहमत - कारण ज्याला खराच अनुभव आला असेल त्याने टाकणे बरोबर वाटले तरी वाचकांना कधीच कळणार नाही कोणता खरा आहे वा नाही.

मात्र भारतातील अनेक "फॅमिली रन" रेस्टॉ च्या बाबतीत प्रोफेशनल पेक्षा पर्सनल टच जास्त लागू पडतो. तुम्हाला अशा रेस्टॉ मधे पुन्हा जायचे असेल तर कधीतरी बिनगर्दीच्या वेळेत तेथे जाउन आधीचा अनुभव मालकाला सांगा, ते ही जरा सकारात्मक रीत्या व थोडी पर्सनल ओळख करा. पुढे आपोआप चांगली ट्रीटमेण्ट मिळण्याची जास्त शक्यता आहे.

बॅटमॅन's picture

20 Jan 2015 - 3:58 pm | बॅटमॅन

सोशल साईट हे एकतर्फी हत्यार नाही. असा अनुभव टाकला म्हणजे सगळे संपले असे कधीच होत नाही. मालकालाही खुलासा करण्याचा पूर्ण चान्स असतो.

नगरीनिरंजन's picture

20 Jan 2015 - 5:08 pm | नगरीनिरंजन

व्हॉट्सअ‍ॅपसारख्या ठिकाणी असतोच असे नाही. शिवाय फेसबुक वा अन्यठिकाणी जिथे झटपट विषय बदलत असतात तिथे खुलासा करायची संधी मिळणे आणि केला तरी तोवर लोकांचा रस संपलेला असू शकतो.
ट्रिपअ‍ॅडवायजरसारख्या ठिकाणी संतुलित रिव्ह्यू लिहायला हरकत नाही याच्याशी सहमत आहे.

नगरीनिरंजन's picture

20 Jan 2015 - 5:09 pm | नगरीनिरंजन

संतुलितऐवजी वस्तुनिष्ठ वाचावे.

पैसा's picture

14 Jan 2015 - 10:01 am | पैसा

प्रतिसाद आवडला.

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 10:12 am | टवाळ कार्टा

दोन ध टोक

मी भावनातिरेकाने एकच बाजू पाहिली होती.पण "रणांगणातील यशस्वी" योद्ध्याने सांगीतलेली बाजू-निवेदन पुर्णतः पटले. मागच्याच एका धग्य्वार कुणी मिपाकराने लिहिलेले वाक्य पुन्हा लिहावसे वाटते "सार्थ अभिमान" आणि "माज" यांतला नेमका फरक कळलाच पाहिजे.

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 12:29 pm | टवाळ कार्टा

"सार्थ अभिमान" आणि "माज" यांतला नेमका फरक कळलाच पाहिजे.

चितळ्यांना कशात बसवायचे :)

नगरीनिरंजन's picture

14 Jan 2015 - 12:35 pm | नगरीनिरंजन

सार्थ माज. ;-)

नाखु's picture

14 Jan 2015 - 12:40 pm | नाखु

"दु"कानात**"!!!!! ;-) ;) ^_~ :wink:

"दु" कान = दोन कानांच्या मधला संवेदनशील विचारप्रवर्तक भाग.
सगा लिखीत बॅट्या संपादित सुलभ/सोपे/सोयीस्कर मराठी शब्दार्थ या पुस्तकातून साभार.

"चकली संपली, परत येणार नाही", "१ ते ४ बंद" वगैरे लेखी अगावपणा सोडल्यास चितळ्यानी कधी तोंडी दुरुत्तरे केल्याचं ऐकिवात नाही.

कपिलमुनी's picture

14 Jan 2015 - 3:31 pm | कपिलमुनी

तोंडी बोलून शब्द वाया घलवत नाहीत. फक्त पाटीकडे बोट दाखवतात

मी चितळ्यांची फ्यान नाही पण मागील एका धाग्यात प्रतिसाद लिहिल्याप्रमाणे त्यांनी खराब पदार्थ बदलून देण्याची तयारी दाखवली आणि यावेळी घरगुती फराळवाल्याकडून फसवणूक झाल्याचे कळव्ताच त्याने त्याचे निर्ढावलेपण दुरुत्तरे करून सिद्ध केले. दरवेळी चितळेच सगळ्या गोष्टी करतील असे नाही.

भिंगरी's picture

14 Jan 2015 - 12:26 pm | भिंगरी

पेठकरकाकांच्या मताशी १००% सहमत.

धर्मराजमुटके's picture

14 Jan 2015 - 12:29 pm | धर्मराजमुटके

चला. एका तरी माणसाला माझी बाजू अंशतः तरी पटली !

सुबोध खरे's picture

14 Jan 2015 - 12:32 pm | सुबोध खरे

पेठकर साहेब
मी आपल्याशी किंचित असहमत आहे
जर श्री पावसकर तेथे उभे होते आणि त्यांनी राखीव असून वेळेत त्यांना टेबल दिले नाही. अन्न पदार्थ संपले आणि "आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले" असे असताना याला सार्थ अभिमान म्हणणे कठीण आहे हा सरळ सरळ माज आहे
"नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते"
म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट. एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला." अशी वृत्ती असेल तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे या मताचा मी आहे. सार्वजनीक न्यासावर हि गोष्ट टाकलीच पाहिजे.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jan 2015 - 1:44 pm | प्रभाकर पेठकर

खरेसाहेब,

याला सार्थ अभिमान म्हणणे कठीण आहे हा सरळ सरळ माज आहे.

ह्याला 'सार्थ अभिमान' असे मी कुठे म्हंटले आहे?

माझा प्रतिसाद तपशिलात वाचलात तर लक्षात येईल की, ''मेतकूट' मालकांचे सर्वस्वी चुकलेच आहे' अस्साच माझा सूर आहे.
सोशल नेटवर्क वर तपशिलवार तक्रार/कैफियत मांडण्यासही माझी काहीच हरकत नाही. फक्त पहिल्याच प्रसंगात एकदम मालकाची/उपहारगृहाची बदनामी करण्यापेक्षा थेट मालकाला कानपिचक्या देऊन व्यवस्थेत बदल अपेक्षावा असे मी म्हंटले आहे. आणि (६ महिन्यांनंतरही) बदल दिसून न आल्यास जरूर सोशल साईटवर आपले मन मोकळे करावे.
आमच्या इथे जवळच 'मोती महल' नांवाचे एक उपहारगृह आहे. तिथे पदार्थ आणि सेवा दोन्ही गोष्टी निकृष्ट दर्जाच्या आहेत. उपहारगृह सुरु होऊन वर्ष होऊन गेलं. मी मित्रांसमवेत ३ वेळा जाऊन आलो. आणि निकृष्ट पदार्थ आणि सेवेचा अनुभव घेतला. दरवेळी मॅनेजरला (मालक तिथे नसतो) तक्रार केली पण फरक पडला नाही. शेवटी त्या उपहारगृहाचे नांव टाकले. इथल्या 'राजधानी' उपहारगृहाचीही 'माऊथ टू माऊथ' बदनामी ऐकून कधी तिथे पाय ठेवण्याचे धाडस झाले नाही.

चुक करणार्‍या प्रत्येकास एक - दोन वेळा तरी सुधारायची संधी द्यावी, असं मला वाटतं.

सर्वसाक्षी's picture

14 Jan 2015 - 7:52 pm | सर्वसाक्षी

मला आपल्या प्रतिसादाची प्रतिक्षा होती.

मी मिपावर अनुभव टाकला. बदनामी केली नाही वा शिव्याशाप दिले नाहीत. पण ग्राहकाला दुर्लक्षिणे बरोबर नाही. जे आपल्याला खटकलं तेच मलाही खटकलं. जबाबदार व्यक्तिनं पर्याय सुचवावा की जाता? जा! असा पवित्रा घ्यावा? माझा राग एक तास उभे राहुन उपाशी बाहेर पडावं लागलं, एका कार्यक्रमाच विचका झाला याचा नाही. राग आला तो बेजबाबदार वर्तनाचा. मालकांनी गोड बोलुन काय अडचण आहे ते सांगितलं असतं तर आम्ही सहकार्य केलं असतं.

बदनामीच करायची असती तर एव्हाना हे वृत्तपत्रात छापुन आलेलं दिसलं असतं. आम्हा जेवायला गेलेल्या ८ पैकी एक एका मोठ्या वृत्तपत्राचा संपादक व लोकप्रिय स्तंभलेखक आहे.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jan 2015 - 9:08 pm | प्रभाकर पेठकर

तुमच्या भावनांशी नक्कीच सहमत आहे.
तुमचा उद्देश बदनामी करण्याचा नाही ह्याचीही मला जाणीव आहे. कांही प्रतिसादकांनी सोशल नेटवर्कचा मुद्दा फारच लावून धरल्याने माझ्या प्रतिसादात मी त्यावर भाष्य केले आहे.
पण तुम्ही त्या 'मेतकुटा'च्या मालकाला झाला प्रकार आणि त्यांच्या वर्तनाबद्दलची तक्रार नक्की नक्की करा.

परत जाणारच नाही तर वारंवार अनुभव कसा येईल?

पूर्ण असहमत... त्यांनी २.४५ पर्यंत वाट पाहूनही रिजर्वेशन असूनही वेगवेगळी टेबलं देउन वर जेवण संपलं असंच ऐकायचं असेल तर असं हॉटेल फक्त ते 'मराठी माणसाचं' आहे म्हणून 'जाउ द्या हो' करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा त्या मराठी माणसाला लवकर अक्कल येण्यासाठीच रिव्ह्यु लिहायला पाहिजे. आपण त्या मालकाला हॉटेल कसं चालवायचं ह्याचं शिक्षण मिळेपर्यंत वाट बघायची की काय?

काळा पहाड's picture

11 Jan 2015 - 8:17 pm | काळा पहाड

मराठी माणसाने हॉटेल सारख्या इंडस्ट्री मध्ये जावंच कशाला? बरेच इतर उद्योग करता येवू शकतात की. दादा आणि भाई लोकांच्या मागे मागे फिरणे, गळ्यात साखळ्या घालून नगरसेवक किंवा तत्सम काहीतरी बनणे, तोडफोड करणे, काँट्रॅक्टर बनून खराब क्वालिटीचे रस्ते बनवणे, फोर्ड एंडेव्हर घेवून रहदारीच्या रस्त्यावर उभी करणे, हप्ता गोळा करणे, दुसर्‍याचे प्लॉट्स ढापणे आणखी असेच काही. बाकी सनी पावसकर (पुण्यात याच नावाचे व वेगळ्या आडणावाचे एक गुंड नगरसेवक आहेत) या नावावरूनच एकूण व्यक्तीमत्वाची कल्पना येते. बाकी संयमाचे फळ गोड असते म्हणजे काय हे कळले नाही. स्वतःचे पैसे घालून स्वतः भुकेजले राहून्न असल्या माजोरड्या व्यक्तीमत्वांमध्ये परिवर्तन होण्याची आशा लावणे हा एखाद्या प्रकारचा छंद असल्यास कल्पना नाही.

सुबोध खरे's picture

11 Jan 2015 - 8:22 pm | सुबोध खरे

धर्मराज साहेब
आपले म्हणणे मान्य नाही
उलट हाटेल नवीन असेल तर मालकाने जास्त अगत्यशील असायला हवे. सुरुवातीलाच असा माज असेल तर त्यांना का सहानुभूती दाखवावी?जेवण संपले हेही समजू शकतो त्याऐवजी आत्ता काही तरी सुरुवातीचे मागवा. वीस मिनिटात तयार करून देतो असे नम्रपणे सांगता आले असते. असे सांगितले तर समजू शकतो
आम्ही सुद्धा व्यवसाय करतो. वीज गेली असेल तर इंव्हर्टर असूनही त्यावर लेसर प्रिंटर(थर्मल असल्याने) चालत नाही म्हणून मी रुग्णांची किती तरी वेळेस माफी मागितली आहे.( जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्याबद्दलही)
\माज दाखविणे हे अजिबात चालवून घेऊ नये. जर तुम्ही मराठी म्हणून तुम्हाला माज असेल तर आम्ही काय उपरे आहोत?
@सर्व साक्षी-- नक्कीच अभिप्राय लिहा. आठ जणांची दुपारीची वाट लावली याबद्दल काहीही वाईट न वाटणाऱ्या हाटेलात मी तरी नक्की जाणार नाही.
धन्यवाद

भाते's picture

11 Jan 2015 - 8:28 pm | भाते

मला गेल्या महिन्यात आला होता. शनिवारी रात्री ९ वाजता ८ जणांसाठी टेबल (थंडीत आणि एसीमध्ये) आगाऊ आरक्षित करून ठेवले असताना अर्धा तास वाट पाहायला लागली. हॉटेलमध्ये खुप गर्दी होती. नंतर आमच्यावर उपकार केल्यासारखे दोन टेबले जोडुन आम्हाला बसायला जागा मिळाली. मागवलेले जेवण यायला (चक्क) अर्धा तास ऊशिर (!) झाला. जेवण आल्यावर आधीच्या अनुभवावरून लगेच पुढच्या जेवणाची ऑर्डर केली. तरीही, रोटया आणि राईस यायला (आधीचे खाऊन संपल्यावर) २० मिनिटे लागली. शेवटी बिल आल्यावर सर्वानुमते टिप द्यायची नाही आणि पुन्हा इकडे कधीही यायचे नाही हे ठरवुन आम्ही बाहेर पडलो.

फारच वाईट अनुभव आणि ते एका आपल्या माणसाने केल्यामुळे चीड येते.

अत्रन्गि पाउस's picture

11 Jan 2015 - 9:43 pm | अत्रन्गि पाउस

एका दिवसात २ वाईट रिव्ह्यूज ?? तिकडे चे पु वर पण एक आलाय (हा पण टाकलाय आणि अजून एक आहे )
खरेतर आत्ता रात्री जायचे ठरवले होते घंटाळी रोड वर वळलो आणि हे वाचले ... बेत बदलला पण जाता जाता बघितले कि बाहेर लोकस थांबलेले होते...
आता आधी एकदा पार्सल आणून मग पुढे ठरविन जायचे कि नै ते ...
पण उर्मटपणा / टगेगिरी असेल तर मग कठीण आहे ...
तिकडे स्वाद / गोखले बघा म्हणावे...दादरला जिप्सी वगैरे मध्ये मराठी असून हे असले वाईट अनुभव नाहीत...

वेल्लाभट's picture

12 Jan 2015 - 1:05 pm | वेल्लाभट

गोखलेंचा वडापाव पूर्वापार गोखले रोड वरील सगळ्या वडापाव विक्रेत्यांपेक्षा एक दोन रुपये महाग आहे. आता गोखले मंगल आहार बघा. इथे तुम्ही नुसती पोळी / नुसती भाजी घेऊ शकत नाही. तुम्हाला पोळीबरोबर भाजी अथवा भाजीबरोबर पोळी पार्सल घ्यावीच लागते. याला म्हणतात .....

तळटीप : हे संबंधित व्यक्तीला दर्शवून झालेलं आहे. परंतु ते यापलिकडचे दिसतात. तेंव्हा आता इतर उपाय करावे लागतील. तूर्तास तरी पर्यायी हॉटेलांना/पोळीभाजी केंद्रांना प्राधान्य दिलं जातं.

गवि's picture

12 Jan 2015 - 1:19 pm | गवि

..गोखले..हॅ हॅ हॅ..

..किती वाढवल्यात हो किंमती?.. असा प्रश्न करताच "मराठी माणसानेच दर वाढवलेले बरे खुपतात तुम्हाला"इ.इ.मुद्दे काढून विचारणार्‍याचेच बौद्धिक घेतले.

..

हे कसले मेतकूट हे तर रद्दडकूट !
एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला.
कोणाचाही फुकटचा माज कधीच सहन करु नये... ग्राहकांना सेवा देत नसेल तर हॉटल बंद करुन टाका अशी तंबी द्यायला हवी होती त्या माजुरड्या हॉटेल चालकाला !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydney

चित्रगुप्त's picture

11 Jan 2015 - 10:55 pm | चित्रगुप्त

घरीच मऊ भात करून त्यावर तूप-मेतकूट टाकून खाणे खाणे काय वाईट ?

मुक्त विहारि's picture

12 Jan 2015 - 1:40 am | मुक्त विहारि

सहमत...

स्वगत : सध्यातरी ज्या हॉटेलात बियर मिळते तिथेच जातो.

hitesh's picture

12 Jan 2015 - 3:32 am | hitesh

सहमत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Jan 2015 - 2:34 am | निनाद मुक्काम प...

अश्या माजोरड्या लोकांना धडा शिकवायचा मार्ग म्हणजे वोट्स अप वर तुमच्या अनुभवाची पोस्ट टाका , लोकांना नकारात्मक पोस्ट खात्री न करता पुढे ढकलण्यात लय मजा येते , तेव्हा आपोआप तुमचा अनुभवातून अनेकांना तेथे जाण्याची दुर्बुद्धी सुचणार नाही ,
मराठी असो वा मराठी हॉटेल लाईन मध्ये माजोरडे पणां करून चालत नाही आणि शेफारून चालत नाही

त्यापेक्षा संबंधित व्यक्तीला जाऊन स्पष्ट शब्दात सांगा. नाही समजली ती भाषा तर तमाशा करा तिथेच. चार असलेली गि-हाईकं पण जातील.

तुमचा अनुभव वाचून आठवले. गेल्या महिन्यात पुण्यात (आता मध्यवर्ती राहिलय कुठे!) एका हाटेलात दोसा मागवला. हा काही जगावेगळा दिव्य पदार्थ नव्हे. त्याने आणायला २० मिनिटे लावली व थंडगार दोसा पुढ्यात आला. आधी वेटरला तसे सांगितले, त्याने तिथल्या व्यवस्थापकाला बोलावले, त्याने त्याच्या साहेबाला बोलावले. थंडीचे दिवस आहेत, आम्ही काय मुद्दाम होवून गार नाही केला, त्यात काय एवढं हो म्याडम. मग प्लेट पुढे सरकवली व सांगितले की मी खाणार नाही. तुमच्या ग्राहकाने गरम पदार्थ खावेत असे तुम्हाला वाटते की गार? एव्हाना आजूबाजूची दोन टेबले बघायला लागली. काय राव तुमीपण असे म्हणत त्याने दुसरा आणाय्ला सांगितला. तोही कोमट आला पण थंड नव्हता एवढेच. पण एकंदरीतच कोणाला काही पडलेली नसते. एक गेला तर आणखी दहा ग्राहक असणारेत हे पक्के ठाऊक असते. हा हाटेल मालक शेट्टी प्रकारातला असावा असा दिसत होता. मराठी तर नक्कीच नव्हता.

काळा पहाड's picture

12 Jan 2015 - 10:17 am | काळा पहाड

हॉटेलचं नाव द्या हो. निदान आम्ही तरी पुढच्या वेळी जाणार नाही. गेलाबाजार रस्त्याचं तर नाव द्या.

पुणे सातारा रस्त्यावरील बासुरी हे उपहारगृह आहे. येथे मी आधी तीन चार वेळा गेलीये (सत आठ वर्षात). यावेळी सर्व्हीस जामच वाईट होती. पदार्थांची क्वालीटीही बरी नव्हती. अर्थात, हे नेहमीचे असेल तर माहित नाही. फारशी ओळख नसलेल्या हाटेलात मी इडली, दोसा असं मागवते म्हणजे फार वेळ लावत नाहीत, फार फसवता येत नाही असे वाटायचे.

काळा पहाड's picture

12 Jan 2015 - 4:41 pm | काळा पहाड

जेव्हा हॉटेल उघडलं (साधारण चौदा पंधरा वर्षापूर्वी) त्यावेळी त्याचा अँबियन्स, चव वगैरे फार छान होतं. सीट्स भरपूर जागा सोडून वगैरे होत्या. त्यानंतर मागच्या वर्षी तिथे गेलो होतो. हर हर. कशीही टेबलं टाकली होती. स्पेस नावाचा कॉन्सेप्टच नाहीसा केला होता.

रेवती's picture

12 Jan 2015 - 9:28 pm | रेवती

हां, तेच म्हणते, शिवाय स्वच्छताही बेताची होती.

कपिलमुनी's picture

12 Jan 2015 - 9:32 pm | कपिलमुनी

बासुरी लैच टुकार आहे रेटस च्या मानाने सर्विस आणि चव नाही !

अहो आधी बरं होतं म्हणून तिकडे कामे करायला गेलं की भूक लागल्यास जायला सोपं वाटायचं. आता यावेळी मी ३ वर्षांनी गेले तर जामच वैट! बरं, तिथे आजूबाजूला आणखी खाण्याची सोय आहे का याची कल्पना नाही. आजकाल कितीतरी हाटेलं सुरु झाली म्हणेपरेंत बंद पडतात. नैतर दुसरा पर्याय सांगा. आता पंचमीपर्यंत जायला सांगू नका. तिथे जाऊन साताठ वर्षे झाली.

सविता००१'s picture

14 Jan 2015 - 2:54 pm | सविता००१

मागच्या वर्षी कोल्हापूर हून बर्‍याच उशीरा - वाहन नादुरुस्त झाल्याने -पुण्यात पोहोचलो होतो. (११:४५ वाजून गेले होते). बरोबर वयस्क व्यक्तीही होत्या. पण त्या बासुरी वाल्यांनी आम्हाला अर्ध्या तासात सगळं करून वाढलं. सेवा उत्तम, जेवण पण. रात्री १ वाजला तरी आठी नव्हती कुणाच्या कपाळावर.

त्या उ. गृहात पूर्वी दिवसभर अशी सर्व्हिस मिळत असे. ते फार सोयीचे पडायचे. माझी कामाची ठिकाणे तिथे आजूबाजूला असल्याने जरा जाणे झाले होते. अजूनही मला हे माहितीये की येत्या दोन तीन वर्षात दुसरे उ. गृह तिथे उघडले नाही तर बास्रीवाल्यांशिवाय मला इलाज नाही.

जयंत कुलकर्णी's picture

17 Jan 2015 - 4:21 pm | जयंत कुलकर्णी

बिबवेवाडे चौकात "नवरत्न" नावाचे एक हॉटेल आहे. खाण्यासाठी उत्तम.....

रेवती's picture

17 Jan 2015 - 5:22 pm | रेवती

ओके, धन्यवाद जयंतकाका.

एस.योगी's picture

24 Sep 2015 - 12:08 pm | एस.योगी

पुणेकरांच्या डेक्कन भागात 'मथुरा' आहे. काही पदार्थ शुद्ध (गावठी) तुपातले असतात.
२-३ वेळा जेवण घेतलेय. अनुभव एकूणच छान आहे.

थंडगार दोसा पुढ्यात आला.

कोणत्याही हॉटेलात वाफाळता "गरम डोसा" पुढ्यात आल्याचं आजवरच्या हयातीत आठवत नाही. त्यासाठी रस्त्याकडेचा एखाद्या अण्णाचा गाडा किंवा दावणगिरी लोणी स्पंज डोश्याची गाडी गाठावी लागते.

ग्रेटथिंकर's picture

12 Jan 2015 - 12:43 pm | ग्रेटथिंकर

सवाई गंधर्व महोत्सवात जे खाण्याचे स्टॉल लागतात तिथे वाफाळता डोसा मिळतो ,बहुतेक जण त्यासाठीच सवाईला आल्याचे जाणवत होते. *ROFL*

रेवती's picture

12 Jan 2015 - 4:35 pm | रेवती

गवि, विनोदी आहात. अत्यंत कुरकुरीत दोसा खाण्याने जसे समाधान होत नाही तसेच दोसा हा फारवेळ गरम राहू शकत नाही तर त्यातील गरम भाजी, सांबार यांच्या साथीने त्याचे तापमान, लज्जत वाढते हे आपल्याला माहित आहेच. तुम्ही माझी चेष्टा करताय.

..उलट मीही तेच म्हणतोय.
..चेष्टेचा अजिबातच उद्देश नाही हो.

..सर्वच गार दिलं असेल हे लक्षात आलं नाही...ते तर फारच बेकार.

..दोसाही गरम मिळू शकतो पण हॉटेलात नाही इतकाच मर्यादित मुद्दा होता.

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2015 - 1:39 pm | बोका-ए-आझम

कॅफे मद्रास - माटुंगा. गरमगरम तव्यावरुन येतो - नीर डोसा आणि सेट डोसा तर अप्रतिम असतात.

बॅटमॅन's picture

20 Jan 2015 - 4:05 pm | बॅटमॅन

तिथली रसम इडली तर वाह!!!!!!!!!!!! गरमागरम आणि मस्त आंबटशार चवीचा नादच नाय करायचा. कार्टूनमध्ये दाखवतात तसे तोंडातील सगळे दात तोंडाला सुटलेल्या पाण्याबरोबर वाहत जातील असे वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jan 2015 - 2:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा अक्षय का हो?

अक्षय वाल्यानी एकदा आंबलेली बटाट्याची भाजी घालुन डोसा दिलेला. त्यावर तक्रार केली असता खालच्या मालकानी सॉरी बिरी नं म्हणता अनुनासिक स्वरामधे "जंराँशीं तंरं लांगंलेंलीं दिंसंतेंयं" किंवा "झांलीं अंसेंलं खंरांबं" अश्या टायपाचं उत्तर दिलं होतं. बरं असं उत्तर ऐकुन आईनी तिथे चामुंडा अवतार धारण केला होता. परत कै त्या हाटेलात गेलो नाही कधी.

अगत्य वाला मात्र चांगला आहे. कधे मधे गार देतो, पण ते सोडुन क्वालिटी चांगली आहे.

सुनील's picture

12 Jan 2015 - 2:58 pm | सुनील

नाव बदल म्हणावं! अ-क्षय म्हणे!! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jan 2015 - 3:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या आईनी त्याला बरचं काही बदलायला आणि उरलेलं जाळुनं टाकयला सांगीतलं सो =))

रेवती's picture

12 Jan 2015 - 4:36 pm | रेवती

नाही नाही. वर नाव दिलय. यावेळी तुळशीबागेत मी हरवले होते. लगेच स्वत:ला सापडले. ;) काय ती गर्दी!

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Jan 2015 - 4:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकही चांगले फॅमिली हॉटेल नाहिये. दुनियाभरचे लोक्स तिथे ख्ररेदीला येतात, शिवाय गणपतीमध्ये लांबलांबुन लोक येतात त्यामुळे इथे कायम हमखास गिर्‍हाईक असते.पण मला वाटत नाही त्यातले कोणी रिपीट कस्टमर असतील.

अरे!! माझा थायी हॉटेलवाला वेळ असेल तर माझ्या टेबलवर खुर्ची घेउन हमखास बसतो. मस्त नवर्‍या मुलांबरोबर टीपी करतो. एकदा त्यांनी सुपचा बेसच खारट करुन ठेवला होता, तीनदा सूप (चार माणसांच) बदललं तेंव्हा कुठे लक्षात आलं त्यांच्या काय झालय ते. त्या बद्दल कितीदा सॉरी म्हणावं. ( थायी हॉटेलचा मालक ऑस्सी आहे. आणि ऑस्सी लय म्हणजे लय बोलतात. अक्षरशः अरे बाबा आता बास बॉस म्हणावं लागत)
भारतात मात्र डोसा थंड आहे, याला आचारी म्हणतात का? ( गणपा भाऊंची कृपा ;) ) अश्या अनेक खोडी काढुन आम्ही निवांत डीशेश

हुप्प्या's picture

12 Jan 2015 - 10:06 am | हुप्प्या

मिपावरील हा धागा प्रिंट करुन त्याच्या काप्या हॉटेलच्या मालकाला वा म्यानेजराला द्या.

वाईट अनुभव. भलताच माजोरडेपणा.

नित्य नुतन's picture

12 Jan 2015 - 11:53 am | नित्य नुतन

इथे एवढी गर्दी आहे म्हणजे जेवणाची चव चांगलीच असावी ... कोणी ट्राय केलंय का ...

वेल्लाभट's picture

12 Jan 2015 - 12:09 pm | वेल्लाभट

लोक वेडे म्हणून नाही ना गर्दी करत. (हे मी उपहासाने म्हणतोय बरं का. तुम्हाला नव्हे.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2015 - 4:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फेब्रुवारी-मार्चमध्ये मी सलग दोन आठवड्यांत तीनदा 'मेतकूट'मध्ये गेले होते. गर्दी होती तेव्हा व्यवस्थापन, अन्नाची चव सगळ्या बाबतीत जेवढं जमेल तेवढं सगळं गंडलेलं होतं. पदार्थ संपलेला वेटरांना माहित नव्हता. ते सांगायलाही चिकार वेळ लावला. मोदकासारखा पदार्थ "तीनच देणार, एक किंवा दोन नाही मिळणार" छाप नियम का बनवतात कोण जाणे!

पण ती जागा म्हणजे खुराडं आहे. चकचकीत फरश्या आणि आरसे लावून क्षीण प्रयत्न केला आहे. पण तिथे बसून मला कोंदटल्यासारखं होत होतं. फार गर्दी नसूनही. बाकी चकचकीत असूनही हात धुवायची सोय भीषण आहे.

गर्दी नव्हती तेव्हा तिथल्या वेटरांची विनम्रता अंगावर येणारी होती. गर्दी नसताना पदार्थांची चव मात्र चांगली होती. कष्ट न करता सणासुदीचं जेवण ... नॉट बॅड.

गर्दी नसताना मी एकटी गेले होते, तेव्हा मालक आणि वेटर लोकांनाही पुरेशा विचित्र नजरांनी बघितलं. एकटी बाई कशी काय हाटेलात येऊन खाते असा भाव होता. थोड्या वेळाने मैत्रीण आली, हे नशीब. नाहीतर बहुदा जेवायला वाढलंच नसतं अशी शंका आली. पुढे आमचं पाच-कोर्सचं जेवण, दोन बायकांनी वारेमाप खाणं हे सुद्धा तिथल्या मंडळींना फार पचलं नसावं असं त्यांच्या चेहेऱ्यावरून दिसत होतं. बाहेर लोक ताटकळत उभेही नव्हते. त्यामुळे आम्ही त्या नजरांकडे दुर्लक्ष करत दोन तास गप्पा मारत जेवलो.

'मेतकूट'च्या समोरच 'श्रद्धा' आहे. तिथे वडे मिळतात, "पाव मिळणार नाही" अशी पाटी सुरुवातीपासून आहे. तिथेही चिक्कार गर्दी असते. अनेक वर्षं तिथले वडे, समोसे, मूगभजी खाऊन वजन चिक्कार वाढवलं आहे. तिथे कधीही असा माजोर्डेपणा दिसत नाही. "पाव मिळत नाही" हे पण प्रेमाने सांगतात. 'श्रद्धा' ही टपरीवजा जागा आहे. हे वडेवाले आणि तिथे काम करणारे लोक जितके प्रेमळ आहेत त्यांतला अर्धा भाग जरी 'मेतकूट'वाल्यांनी उचलला तरी अनुभव बराच सुधारेल.