`नावा'त काय आहे?

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
9 Aug 2008 - 8:48 pm

राजधानीतील महाराष्ट्र सदनातल्या दालनात नारायण राणे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांना आज त्यांचे हे नेहमीचे दालन मिळण्यास उशीर झाल्याने ते वैतागले होते. त्यातून तिथल्या कर्मचाऱ्यानं "साहेब, परवाच तर येऊन गेलात ना? मग आत्ता परत कसे? काम झालं नाही का?' असा उद्धट प्रश्‍न विचारल्यानं राणे आणखी अस्वस्थ झाले होते. गेल्या सहा महिन्यांसाठी आणि पुढच्या सहा महिन्यांसाठी हे दालन बुकच करून ठेवलं असतं, तर बरं झालं असतं, असा विचार त्यांच्या डोक्‍यात चमकून गेला. "मुख्यमंत्री झाल्यावर दाखवेन तुला बेटा!' असं म्हणून मनातल्या मनात ते चरफडलेही; पण चेहऱ्यावर तो संताप त्यांनी आणू दिला नाही. कुठल्या तरी 24 तासांच्या न्यूज चॅनेलचे कॅमेराधारी त्यांचा प्रत्येक "मूड' टिपण्यात मग्न होते.
राणेंना सारखा कुणाचा तरी फोन येत होता.
"अजून झाला नाहीये निर्णय!' असं मोघम उत्तर जराशा वैतागलेल्या आवाजात राणे देत होते. बहुधा एखाद्या खंद्या कार्यकर्त्याचा किंवा राजकीय वर्तुळातल्या एखाद्या बड्या समर्थकाचा फोन असावा, असंच तिथे जमलेल्या पत्रकारांना वाटत होतं.
फिरून फिरून दमल्यावर राणे सोफ्यावर बसले. पुन्हा खिशातला मोबाईल खणखणला.
"मघाशी एकदा सांगितलं ना? पुन्हा पुन्हा कशाला सतावतेस?'' राणे बरसले.
फोनवर नीलिमावहिनी होत्या.
"अजून किती वेळ लागेल?' त्यांनी भाबडेपणानं प्रश्‍न विचारला.
""सांगता येत नाही. कदाचित, अजून काही दिवस थांबावं लागेल.'' राणे पुन्हा वैतागून बोलले.
""शी बाई! आता काय करायचं? मी चांगली तयारी करून ठेवली होती. अहो, एक मंगळागौर अशीच फुकट गेली. आता दुसऱ्या मंगळवारी तरी मला नाव घेता येणार आहे की नाही?''
""नाव घेण्याचा आणि माझ्या निर्णयाचा काय संबंध?''
""नाही कसा? त्या दिवशी नाही का वैशालीताईंनी मोठ्या ठसक्‍यात नाव घेतलं, "महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, विलासरावांचे नाव घेते आपला मान राखून!''
""मग?''
""मग काय? मलाही तसं नाव घ्यायचंय; पण तुमचं पद तर कळलं पाहिजे ना? आधी तुम्ही मुख्यमंत्री होण्याची चर्चा होती. म्हणून थांबले. मग प्रदेशाध्यक्ष होणार होतात. म्हणून थांबले. आता तर तुम्ही राजीनामाच द्यायला निघाला आहात. बरं, तेही देणार की नाही, हे नक्की नाही. आम्ही उखाणा तरी कसा रचायचा?''
""उखाण्याची काळजी नको. मी "प्रहार'च्या संपादकीय विभागाला लावलंय कामाला. ते देतील रचून तुला काहीतरी.''
""नको. मी बाकीचं रचलंय. पण तुमचं नेमकं पद कळलं म्हणजे तेवढं टाकून मी आणखी टेचात नाव घ्यायला मोकळी!''
""काय लिहिलंयंस तरी काय?''
""कुणकेश्‍वराच्या पिंडीवर अभिषेक करते वाकून, अन्‌ नारायणरावांचे नाव घेते ****पदाचा मान राखून!''
""चांगला आहे की उखाणा!''
""चांगला आहे हो, पण त्या गाळलेल्या जागी कुठलं पद टाकायचं ? मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्री, बिनखात्याचे मंत्री, की नुसतेच आमदारपद?''
""कळेल, कळेल. दोन दिवसांत काय तो सोक्षमोक्ष लागेल. तोपर्यंत तू उखाणा पाठ कर! जल्ली बाजारात तुरी नि भट भटणीला मारी, अशीच गत म्हणायची ही!'' राणेंनी मोबाईल "स्विच ऑफ' करून टाकला आणि ते पुढच्या पत्रकार परिषदेच्या तयारीला लागले...
----------

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2008 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नावात काय आहे च्या ऐवजी पदात काय आहे असे हवे होते. :)
राणे साहेबांच्या राजकीय घडामोडीवर नाव घ्यायच्या निमित्ताने खुसखुशीत केलेले लेखन आवडले.
(विषय पाहता लेखात अजून भर घालण्याची बरीच संधी होती, लेख थोडा मोठा असता तर अजून वाचायला मजा आली असती.)

-दिलीप बिरुटे
(नारायण राणेंचा फॅन )

विसोबा खेचर's picture

10 Aug 2008 - 12:04 pm | विसोबा खेचर

राणे साहेबांच्या राजकीय घडामोडीवर नाव घ्यायच्या निमित्ताने खुसखुशीत केलेले लेखन आवडले.

अगदी हेच म्हणतो रे अभिजिता. छान लिहिलंय.... :)

तात्या.

आपला अभिजित's picture

11 Aug 2008 - 10:07 am | आपला अभिजित

पण शीर्षक माझ्या मते योग्य आहे.
`नावा'त याचा अर्थ `नाव' (उखाणा).
त्यामुळे मला तरी ते योग्य वाटते. विचार करून दिले आहे. अनेकदा मला शीर्षक आधी सुचतं आणि मग लेख. किंबहुना, काही वेळा तर चक्क शीर्षकाच्या प्रेमात पडून मी लेख लिहितो.
असो.
मुकेश माचकरनं `अचानक' च्या परीक्षणाला `अचानक कसला! भयानकच!' असं हेडिंग दिलं होतं. किंवा `प्रेमअगन'ला त्यानं `त्यांची आग, आपली होरपळ' म्हटलं होतं. कमलाकर नाडकर्णींनी `माहेरची साडी'चं परीक्षण `आपटून धोपटून पीळ पीळ पिळलेली माहेरची साडी' अशा शीर्षकानं दिलं होतं. आइशप्पथ! गडबडा लोळलो होतो मी! असं पाहिजे शीर्षक!

असो.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

विश्वजीत's picture

9 Aug 2008 - 10:29 pm | विश्वजीत

मस्त!

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2008 - 8:25 am | प्रकाश घाटपांडे

मार्मिक! असच टाकत जा अभिजित!
प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश's picture

10 Aug 2008 - 11:58 am | ऋषिकेश

:)
मस्त राव.. मजा आली वाचून :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 12:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सही जमलंय. अजून जास्त विषयांवर, घडामोडींवर वाचायलाही आवडेल. येऊ द्या!

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2008 - 12:42 pm | बिपिन कार्यकर्ते

घणाघाती... छोटाच लेख पण काय हाणलाय.... मस्तच आहे...

बिपिन.

प्रगती's picture

10 Aug 2008 - 1:21 pm | प्रगती

मजा आली लेख वाचुन.

चतुरंग's picture

10 Aug 2008 - 5:33 pm | चतुरंग

जल्ला, आवडला तुझा लेखन! ;)

चतुरंग