खिद्रापूरच्या कोप्पेश्वरालयाची यात्रा

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:25 pm

खिद्रापूरच्या कोप्पेश्वरालयाची यात्रा
मित्रांनो,

खिद्रापूरचे कोप्पेश्वर शिवमंदिर आपल्याला नवे नाही. अनेकांनी तेथे जाऊन त्या शिल्पांचा विविधांगानी आस्वाद घेतला आहे. अभ्यासपूर्ण माहितीतून त्या मंदिराचा पूर्वेइतिहास सुंदर सुंदर छायाचित्रातून रसग्रहणासह सादर केला आहे.
त्याच्या लिंक्स नवीन वाचकांना इथे मिळतील.

जयंत कुलकर्णी एप्रिल 2013
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदिर भाग 1
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदिर भाग 2
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदिर भाग 3

रंगासेठ डिसेंबर 2012
खिद्रापूर - कोपेश्वर मंदिर
.....

मला त्या वास्तूला भेट द्यायचा योग यायला 65 वर्षे लागली! एक उत्सुक यात्री म्हणून मी तिथे गेलो होतो. ख्यातनाम वास्तू आलयांना शोधक नजरेने न्याहाळणारा अभ्यासक म्हणून या भेट देण्याच्या उद्देश नव्हता म्हणून आधुनिक कॅमेरे व अन्य तांत्रिक व यांत्रिक फोटोग्राफीचे सामान जवळ न बाळगता माझे तिथे जाणे झाले.

मला काही काळापूर्वी मातृशोक झाला. त्याच्या निमित्ताने अस्थिविसर्जनास मी नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. त्यानंतर अनेक वर्षांपासून या वास्तुविशेषाला भेट द्यायची राहून गेली होती, त्याची हुरहुर कमी व्हावी म्हणून मी कुरूंदवाडवरून बस तात्काळ नसल्याने, एक वडाप - 6 सीटर - खास ठरवून परतीच्या बोलीवर धक्के खात खात पोहोचलो होतो.

मंदिरातील शिवलिंगापाशी पोहोचेपर्यंत चिटपाखरू नव्हते! गाभाऱ्यात बसून मी जपसाधना केली. समोरच्या शिवपिंडीची रचना, दिशा व त्या सोबत आणखी एक उभंटाकार पिंड पाहून, बेपत्ता नंदी यामुळे गोंधळून गेलो होतो! 15 मिनिटात मंदिरातून परतताना 4-5 फोटो काढून खट्टू होऊन निघालो. मंदिराच्या बाहेरील चहा टपरीपाशी आलो. वडापवाल्याला हाताने ‘चला’ म्हणून बोलावले. अन तोवर चहावाल्याला ऑर्डर दिली. ‘बनवून देतो, थांबावे लागेल’ म्हणून तो कामाला लागला. इतक्यात एक व्यक्ती, ‘काहो तुम्ही मंदिर पाहिलेत काय?’ असे आपणहून मला विचारत पुढे आला. बुशकोट-पँट मधील त्याचा एक हात प्लॅस्टरमधे बांधल्याने गळ्यातील पटट्यात अडकवलेला होता.

‘नाही. निराशा झाली. इथे तर कोणीच नाही. आल्यासरशी 4-5 फोटो काढले इतकेच.’ म्हणून मी मन मोकळे केले.

‘या, मी दाखवतो’ म्हणत त्यांने मला परत मंदिरात नेले! कोण हा माणूस? एकदम कुठून आला? असा विचार करे पर्यंत आम्ही मंदिराच्या मुख्य परिसरात परतलो होतो. पुढील दीड तास त्याच्या समावेत कसा गेला मला कळले नाही!!

वडापवाला मला, ‘चला, चला माझी गिऱ्हाईकं जातायत’ म्हणून मागे लागला. तर त्याला ‘उगीच टिवटिव करू नकोस. गप बसून सोड’ असे कानडी हेलात मराठीतून व नंतर वेळोवेळी कानडीतून काही बोलून असे गप्पगार केलेन की तो शेवटपर्यंत गुमान झाला. माझा ताबा घेत तो मंदिराच्या कानाकोपऱ्यातील मूर्तींची व त्यातील बारकाव्यांची माहिती देताना रंगून जात होता. ‘मला तुमच्या सारखे लोक आवडतात. उगीच आटपा लवकर, लवकर म्हणणाऱ्यांच्या मी नादी लागत नाही! म्हणून त्यांनी आपली आवड सुनावली. मी सैन्यात होतो असे साभिमान सांगत वर डॉ. गो. बं. देगलूरकर कोण माहित तरी आहेत का?’ असा खडा सवाल करून माझी कसोटी घेतली. ‘नाही बुवा’ म्हटल्यावर त्याला त्यांच्या बाबत सांगायला हुरूप आला. ‘ते सर आले की संजय जोशीच्या घरात राहातात’ म्हणत आपली खास ओळख करून दिली.

‘आपण कोण? नाव काय?’ वगैरे मला विचारले तेंव्हा तुम्हाला ते शेवटी सांगेन म्हटल्याने त्याची उत्सुकता ताणली गेली. अगदी निघायच्या वेळी मी माझे ओळखपत्र त्याच्या हाती दिले. मी हवाईदलातून निवृत्त झालो हे कळताच त्यांना विशेष आनंद वाटला.

‘मी काही गाईड नाही, आपला मंदिर शास्त्राचा अभ्यास जाणकारांना सांगावा म्हणून मी अशा लोकांशी संपर्क करतो. मला पैसे वगैरे नकोत’ म्हटल्यावर मी त्यांना सहज म्हणालो, ‘अहो, या मंदिर निर्मितीला ज्या हजारो लोकांचे हातभार लागले. छिन्नी हातोड्यांचे, सुंदर कलाकारांचे, तज्ज्ञ वास्तुशास्त्रींचे, राजे-महाराजांचे त्यांना आता भेटणे शक्य नाही परंतु, तुम्ही या वास्तूचा आस्वाद करून दिलात त्यामुळे तुम्ही त्या कलाकारांपैकीच झालात. त्यांच्या महत्प्रयासांची आठवण म्हणून आदराची भेट आपल्याला दिल्याने मला ती त्यांना दिल्याचे समाधान मिळेल.’ म्हणून ही छोटीशी भेट नाकारू नये म्हणत हजाराच्या नोटा खिशात सरकवल्या व निघालो. असो.

तर अशा संजय जोशींच्या समवेत मिळालेल्या माहितीचा व छायाचित्रातून धावता आढावा सादर करत आहे. आधी पूर्वसुरींनी जी छायाचित्रे सादर केली आहेत, त्यांच्या कलाकौशल्याची व साधनसामुग्रीची माझ्या सारख्या सामान्य वकूबाच्या व मोबाईल कॅमेऱ्यातील चित्रांची बरोबरी करता येणार नाही. मला ज्या काही बाबी भावल्या व आधीच्या लेखातून पुसटशा उल्लेखिल्या गेल्या किंवा दिसण्यात आल्या नाहीत त्यांना सादर करायचे धाडस करत आहे. त्यातील तपशीलाची माहिती ही जोशींनी सांगितलेली आहे. इतक्या देवी-देवतांच्या, यक्ष-किन्नरांच्या व अन्य जनांच्या मूर्तीं, डिझाईन्स ऐकून लक्षात ठेवणे शक्य नाही म्हणून मी सादर केलेल्या तपशीलात चुका आढळल्यास ती माझ्या आठवणींची गफलत मानावे ही विनंती.

काही खुलासे -
1. मंदिरात नंदी का दिसत नाही? दक्ष कन्या सती बरोबर तो तिच्या माहेरी गेल्याने इथे नाही.
2. शिव कोपल्याने त्यांचे मुख दक्षिणेला झाले आहे. त्या कोपेश्वर पिंडीच्या शेजारी आणखी दिसणारी पिंडवजा मूर्ती धोपेश्वराची म्हणजे श्री विष्णूंची आहे. आडवे व उभे गंध यामुळे ते स्पष्ट होते.
3. मंदिरातील पूजेच्या पाण्याचा निचरा करणारे द्वार गोमुख नसून मकर मुख आहे. ते जिथे साठते त्या कुंडाचा आकार अष्टकोनी आहे. हे येथील खास वैशिष्ठ्य.
4. जोशींच्या मते हे मंदिर 13-14 शे वर्षांपुर्वीपासून आहे. देवनागरी शिलालेखातील ओळ अन ओळ त्यांनी पाठ म्हटल्याप्रमाणे वाचून दाखवली. कदाचित ती वास्तू त्या आधीही अस्तित्वात असावी, असे मला वाटले.
5. डॉ. गो. बं. देगलूरकरांच्या निर्देशनाखाली या वास्तूवर एक डॉक्यूमेंटरी 2005 च्या सुमारास बनवली गेल्याचे त्यांच्या कथनातून आले.
6. एका जाळीदार कलाकुसरीच्या शिळेतून बोट घालून त्यांनी त्याच्या कारागिरीतील बारकावे दाखवले.
7. मान वाकडी करून करून 15-20 फूट उंचीवरील मूर्तीतील सौदर्य न्याहाळताना-पाहताना ते नीट न पाहिल्याचे जाणवते. त्यासाठी उंच मचाणांची सोय करून मग एच डी कॅमेऱ्यातून दिवसाच्या विविध वेळी व रात्री फोकस टाकून त्यावर माहितीपट तयार केला जावा असे प्रकर्षाने वाटले.
8. श्री स्वामी नारायण संस्थेतर्फे अक्षरधाम या मंदिर रचनाकारांच्या मदतीने आधुनिक भारतीय इतिहासात मंदिर निर्माणाचा नवा अध्याय रचला गेला आहे. अशा संस्थांनी यात पुढाकार घेतला तर अशा अनेक दुर्लक्षित मंदिर वास्तूंचे मूळ सौदर्य निखरायला सुरवात होईल.
9. स्वर्गमंडपातील गोलाकार मोकळ्या शिरो भागाचे वैशिष्ठ्य दर्शवताना संजय जोशींनी माझी फिरकी घेतली. म्हणाले, ‘आपल्या मोबाईलला जमिनीवर ठेऊन सेल्फी क्लिक करा. पहा कसा पूर्णाकार चंद्रात तुम्ही दिसाल!’ मी तसे केले पण वरील अवकाशाचा फोटो येण्याऐवजी माझे शिर त्यात दिसले, ते पाहून तुमचे ते डोस्केचे फोटो पहायचे नाही हो, आणा मी दाखिवतो बघा... मग त्या फोटोत पूर्णचंद्राकार पांढऱ्या गोलावर माझ्या डोस्क्याचे सावट टिपले!!
10. मंदिराच्या कलशाच्यापर्यंतचा भागाचे छायाचित्र सहसा काढलेले दिसत नाही.

...

आपल्याला यंदाची दीपावली सुखा समाधानाची व मंगलमय जावो...
...

छायाचित्र पट

1
Figure 1 हत्तींच्या विविध आभूषण विलसित 92 मूर्तींचा दगडी चौथरा
2
Figure 2 मंदिर कळसावर फारच कमी कलाकुसर दिसते
3
Figure 3 मंदिर परिसर
4
Figure 4 पंचतंत्रातील कथा -गतीमंद कासवाला भुलवून सिहाला खाऊ घालणारे धूर्त बगळे
3
Figure 5 चलाख मर्कट- दुष्ट सुसर संवाद कथा
6
Figure 6 हत्तीवर आरूढ ध्यानस्थ बुद्ध
6
Figure 7 चुकून काढला गेलेला स्वर्गमंटपाकाशाचा फोटो
7
Figure 8 जो असा काढला पाहिजे होता !
1
Figure 9मूर्ती भंजकांच्या तावडीतून सुटलेला पूर्णसोंडेचा हत्ती
पोकळ खोबणीतील सुबकता
Figure 10 पोकळ करून केलेल्या खोबणीतील सुबकता
दातेरी यंत्राकार मांडणीचे कातळ
Figure 11 दातेरी यंत्राकार मांडणीचे कातळ
मैथुन आकृती
Figure 12 मैथुन आकृती
12
Figure 13 दक्षिण मुखीशिवांचे आडवे व विष्णूंचे उभे गंध अर्चित दोन लिंग समान आकृतीबंध
12
Figure 14 जोडवी अन पैंजण पावलाचे सांगाती
15
Figure 15 अंब्याच्या डहाळ्या व कैऱ्या चैत्र महिना दर्शवतात
16
Figure 16 संदर्भ न आठवणारे शिल्प कदाचित चोरून भेटणारे तरुण जोडपे?
17
Figure 17 गाल फुगवलेला वादक शिवगण
18
Figure 18 अष्ट कोनी कुंड त्याला जोडून असलेले सांड पाण्यासाठीचे मकरमुख
19
Figure 19 अस्थिपंजर कलिका
20
Figure 20 डाव्या बाजूचा अरबी व उजव्या बाजूचा बसक्या नाकाच्या वंशाचा

शिवाय अनेक फोटो आहेत पण त्याचे संदर्भ आठवत नाहीत...

--- Wing Commander Shashikant Oak. Pune. India.
: 09881901049

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

त्यावेळचे अरबी व चीनी पर्यटकही देवळावर कोरलेले पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
सुंदर फोटो आणि माहितीपूर्ण लेख!

प्रचेतस's picture

21 Oct 2014 - 3:17 pm | प्रचेतस

ते संजय जोशी आम्हाला पण खिद्रापूरच्या मंदिरांत भेटले होतेच. अगदी चिटकूनच बसले होते म्हणाना. शेवटी आत्मूबुवांनी त्यांना कोपच्यात घेतले आणि माझी सुटका केली.

1. मंदिरात नंदी का दिसत नाही? दक्ष कन्या सती बरोबर तो तिच्या माहेरी गेल्याने इथे नाही.

ही दंतकथा मला पटत नाही. इथे नंदीमंडप नाही ही गोष्ट खरी. पण मूळात मंदिराचे बांधकाम अर्धवट झाले आहे. अर्धवट म्हणजे त्याचा कळस बांधून पूर्ण झाला नाही. सध्या जो कळस दिसतो तो अलीकडचा. भोजराजा दुसरा ह्याचा पराभव करून सिंघणाने कोल्हापूर शिलाहार राजवट संपवली व त्याच धामधुमीत हे काम अर्धवट राहिलेले असावे.
नंदीमंडपाच्या जागी नुसता नंदी असावाही पण इस्लामी हल्ल्यांत तो पूर्णपणे भग्न झालेला असावा.

3. मंदिरातील पूजेच्या पाण्याचा निचरा करणारे द्वार गोमुख नसून मकर मुख आहे. ते जिथे साठते त्या कुंडाचा आकार अष्टकोनी आहे. हे येथील खास वैशिष्ठ्य.

तशी मकरमुखं अशा प्रकारच्या भूमिज मंदिरांत इतरत्रही आढळतात. मकराला पूर्वीपासूनच दैवी मानले गेले आहे. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातही गाभार्‍यातील पाण्याचा निचरा होण्याची वाट मकरमुखातूनच जाते.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2014 - 1:11 am | अत्रुप्त आत्मा

@आत्मूबुवांनी त्यांना कोपच्यात घेतले आणि माझी सुटका केली.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif अठ्वलं...अगदी पूर्ण अठवलं! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

शशिकांत ओक's picture

23 Oct 2014 - 12:45 am | शशिकांत ओक

किस्सा आठवला म्हणता तर सांगाना...

लेख आवडला. या खिद्रापुराला कसे जायचे ह्याबद्दल काही सांगू शकाल का? शक्यतो सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी.

शशिकांत ओक's picture

23 Oct 2014 - 12:43 am | शशिकांत ओक

मित्रांनो,
कुरुंदवाड पासून २० किमी दूर हे मंदिर आहे. बसेस आहेत पण नेमक्या वेळी पोहोचवता येतील अशा नाहीत. मला २-३ तासात परतायचे होते म्हणून मी ६ सीटरने परतीच्या बोलीवर २०० रु देऊन खास केली होती. रस्त्यावर खाचखळगे भरपूर. टपाला डोक धडकून झिंजिण्या आल्या... जेवण खाणाची सोय बेताची. पण गैरसोईमुळे तिथे जायची मजा और असते...

शशिकांत ओक's picture

29 Oct 2014 - 11:11 pm | शशिकांत ओक

वल्ली,

ही दंतकथा मला पटत नाही. इथे नंदीमंडप नाही ही गोष्ट खरी.

दंत कथा असेल असे वाटत नाही कारण सर्व मंदिराची रचना व नाव सुचवते की काही असामान्य घटना घडल्याने शिव कोपून दक्षिणेला तोंड करून बसलेत. शिवाय विष्णू त्यांची समजूत घालायला मुद्दाम या मंदिरात शिवांच्या शेजारी उभे आहेत. नुसताच नंदी गायब नाही...
जसा संत चोखा मेळांना बडव्यांच्या धाकामुळे पंढरीच्या विठोबाचे दर्शन दुर्लभ झाले होते तसेच तिरूपंगूरला एका दाक्षिणात्य भक्ताने, 'हे शिवा, आपल्या मंदिरात आमच्या सारख्यांना प्रवेश अशक्य आहे. बरं रस्त्यावर उभे राहून दर्शन घ्यावे तर तो तुमचा अगडबंब नंदी आड येतोय आता आम्ही काय करावे?' अशी आर्त आळवणी केली व शिवांना त्या नंदीला बाजूला सारून त्या भक्ताची इच्छा पुरवली... सध्या तो नंदी शिवांच्या समोर सरळ रेषेत न येता बाजूला दिसतो व कोणालाही रस्त्यावरून नंदीचा अडथळा येता ह्या शिवांचे दर्शन आपल्याला घेता येते...
त्यामुळे नंदींना सौ. शिवां बरोबर रक्षक म्हणून जावे लागले असेल तर.... ?

दंतकथाच आहे कारण मूळात ह्या गृहितकाला कसलाच लिखित पुरावा उपलब्ध नाही. नंदी नसलेली अजूनही काही शिवमंदिरे मी पाहिली आहेत.

पैसा's picture

2 Nov 2014 - 1:55 pm | पैसा

हे देऊळ पाहिले आहे. सुंदर आहे. फोटोही छान!

स्पंदना's picture

7 Nov 2014 - 5:48 am | स्पंदना

अतिशय सुंदर कोरीव काम.
छान आहेत फोटो.
लेख आवडला.

psajid's picture

7 Nov 2014 - 12:31 pm | psajid

चार महिन्यापूर्वी जाण्याचा योग आला होता. छान आहे कोरीवकाम ! आसपास खूप वर्षापूर्वीची मोठाली झाडे आणि शेजारी शांत प्रवास करणारी नदी (इथे या तीरापासून त्या तीरापर्यंत बोटीतून प्रवास करण्याची मौज काही औरच !)

शशिकांत ओक's picture

8 Nov 2014 - 5:40 pm | शशिकांत ओक

दंतकथा मानावी किंवा नाही याचा पुरावा मंदिरांमध्ये असलेल्या मुर्ती व त्यांच्या दिशा व मंदिराचे कोपेश्वर हे नाव यावरून वाचकांनी व भेट देणाऱ्यांनी ठरवावी.

हे आमचं सासर .

...

नंदी का नाही याला कथा आहे.

दक्षयज्ञ झाला तो परिसर सध्या शिरगुप्पी मांजरी वगैरे कर्नाटकात आहे. सती दक्षयज्ञाला नंदीवर बसुन तिथे गेली. तिथे बाहेर तिने नंदी 'पार्क' केला आणि ती यज्ञस्थळी गेली.

पण दक्षाने शंकराचा अपमान केल्याने तिने यज्ञात उडी मारली.

नंदी बिचारा तिथेच बाहेर तिची वाट पहात राहिला.

नंतर शंकर तांडव करत कोपेश्वर मंदिराच्या परिसरात गेले. त्यानी नंदी नेला नव्हता.

त्यामुळे तो नंदी आजही येडुर की शिरगुप्पी गावात एकटाच उभा आहे.

hitesh's picture

15 Nov 2014 - 5:39 pm | hitesh

दिवाळी अंक फार चाललेला दिसत नाही आहे.

नको त्या धाग्यावर १०० प्रतिसाद असतात.

पण दिवाळीच्या सर्व लेखाना १० . २० च प्रतिसाद आहेत

शशिकांत ओक's picture

15 Nov 2014 - 7:29 pm | शशिकांत ओक

धाग्यावरील विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली असती तर आवडले असते.
दिवाळी अंकातील लेखांवर प्रतिसाद कमी असल्याने पुढील लेख लिहायला उत्साहित वाटणार नाही.

hitesh's picture

16 Nov 2014 - 9:20 am | hitesh

मी विषयाला अनुसरुन प्रतिसादही लिहिला आहे.