ओळख बहारिनची

विशाखा पाटील's picture
विशाखा पाटील in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:21 am

अरबी समुद्राच्या आखाताच्या किनार्‍यावर वसलेले देश म्हणजे आखाती देश. तेलसमृद्ध, इस्लामधर्मीय आणि वाळवंट अशी या देशांची ओळख. आखाती देशांमधलाच बहारीन हा एक लहानसा देश आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमेला वसलेलं हे नगरराज्य म्हणजे लहानमोठ्या ठिपक्याएवढ्या बेटांचा समूह आहे. सर्व बेटांचं एकत्रित क्षेत्रफळ मुंबईएवढंच. 706 चौरस किलोमीटर एवढाच यातल्या छत्तीस बेटांचा विस्तार.

या देशाच्या एका टोकाला खजुराच्या वाड्या; तर दुसर्‍या टोकाला वैराण रखरखीत वाळवंटाचा पसारा. मूळ बहारीनींएवढेच परदेशी नागरिक या देशात राहातात. या सर्वांची मिळून लोकसंख्या बारा लाखाच्या आसपास आहे. परदेशी लोकांमध्ये सर्वात जास्त भारतीय. जवळजवळ अडीच ते तीन लाखाच्या आसपास भारतीय इथे राहतात. म्हणजे बहारीनमधले जवळपास एक तृतियांश लोक भारतीय आहेत! त्यामुळे ‘Bahrain is an extended part of India. असं गंमतीने म्हटलं जातं. भारतीयांसोबतच पाकिस्तानी, बांग्लादेशी, फिलीपीनो, अमेरिकन, ब्रिटिश अशा नाना देशांमधल्या लोकांचं कामाच्या निमित्ताने इथे वास्तव्य आहे.

बहारीन या शब्दाचा अरबी भाषेत शब्दशः अर्थ आहे, दोन समुद्र. समुद्राच्या खार्‍या पाण्याने वेढलेल्या या रेताड बेटांवर गोड्या पाण्याचे ठिकठिकाणी झरे होते. त्यावरून पडलेलं हे नाव. गोड्या पाण्याच्या उपलब्धतेमुळेच इथे प्राचीन काळापासून संस्कृती फुलली. ब्राँझ युगात या बेटावर ‘दिलमून’ संस्कृती बहरली. त्या काळातली एका लाखापेक्षा जास्त थडगी उत्खननात सापडली आहेत. सोनपिवळ्या रेतीखाली हजारो वर्षं दडलेले मानवी सांगाडे. मृत व्यक्तीला त्याच्या अनंतातल्या प्रवासासाठी सोबत दिलेली मातीची भांडी, रांजण, तांब्याचे शिक्के असं सारं या थडग्यांमध्ये हजारो वर्षं निपचित पडलं होतं.

v1

या दफनभूमीपासून काही अंतरावर त्या काळातल्या एका देवळाचे अवशेष उभे आहेत. पडझड झालेल्या भिंती तेवढ्या काळाच्या ओघात शिल्लक राहिलेल्या आहेत. हे मंदिर एन्की या देवाचं. हा देव इराकमधल्या सुमेरियन लोकांचा. बुद्धी आणि भूजलाचा. एन्कीच्या कृपेने जमिनीखालून आपल्याला गोडं पाणी मिळतंय, अशी लोकांची श्रद्धा होती. त्या पाण्यावर पिकणारा हिरवा भाजीपाला आणि खजूर खाऊन त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. जोडीला समुद्रातले मासे होतेच. या दिलमून बेटाचा उल्लेख सुमेरियन राजा गिल्गमेशच्या महाकाव्यात येतो तो ‘ईडनचं उद्यान’ आणि ‘भूतलावरचा स्वर्ग’ अशा गौरवाने.
.

दिलमून संस्कृतीचा पूर्वेकडच्या सिंधु संस्कृतीशी आणि उत्तरेकडच्या सुमेरियन संस्कृतीशी व्यापार चालायचा. या संस्कृतीतल्या लोकांनी बनवलेल्या आणि इतर संस्कृतीतून आलेल्या अनेक वस्तू आज बहारीनच्या म्युझिअममध्ये बघायला मिळतात. पिवळ्या मातीतले सुबक घडे, दगडी भांडी, ओमानी तांब्याचे शिक्के, चित्रांनी भरलेले मातीचे शिक्के, ओबडधोबड हत्यारं, वजनमापं अशा पुरातनकालीन विविध वस्तू.

.

दिलमून संस्कृती नामशेष झाल्यावर तीनशे वर्षांनी सम्राट अलेक्झांडरच्या सरदारांनी या बेटावर पाऊल ठेवलं. ग्रीकांची दोन जहाजं या किनार्‍याला लागली. त्यांनी या बेटाला नाव दिलं ‘टायलाॅस’ असं. इस्लामपूर्व काळात इथल्या एका बेटावर ‘अवल’ या देवाला मानणारी लोकं होती. अवल हा बैलाचं मुख असलेला देव होता. त्यावरून या बेटांना अवल या नावाने सातव्या शतकापर्यंत ओळखलं जायचं. आज ‘दिलमून’, ‘अवल’, ‘टायलाॅस’ ही सर्व पुरातन नावं जिवंत आहेत ती बहारीनमधल्या दुकानं, कंपन्या यांच्या नावांमुळे. पुढे सातव्या शतकात अरबस्तानात इस्लाम धर्माची स्थापना झाल्यावर या बेटावरच्या बहुसंख्य प्रजेने हा नवा धर्म स्विकारला.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज दर्यावर्दी या बेटावर आले. इथली भूमी रेताड असली तरी आखातात लकाकणार्‍या मोत्यांची संपत्ती दडलेली होती. शिवाय भारताकडे जाणार्‍या मार्गावरचं हे ठिकाण. पोर्तुगीजांनी इथल्या एका जुन्या किल्ल्यावर जम बसवला. तो किल्ला आजही उभा आहे. विश्वठेव्यात सामील झालेल्या या किल्ल्याचे नाव ‘कल्लत अल बहारिन’ किंवा ‘कल्लत अल बुर्तुगल’. अरबी भाषेत ‘प’ हे मूळाक्षर नसल्यामुळे प्रत्येकवेळी ‘प’ चा ‘ब’ होतो. त्याप्रमाणे पोर्तुगालचं बुर्तुगल झालं. छोट्या बेटावरचा हा छोटासा किल्ला. निळ्या समुद्राच्या तटावर एखाद्या गढीएवढा.

पोर्तुगीजांनी इथे पाय रोवल्यावर ऐंशी वर्षांनी इथल्या मोत्याच्या व्यापार्‍यांनी त्यांच्याविरुद्ध उठाव केला. व्यापार्‍यांनी आखाताच्या पलीकडच्या शक्तीशाली पर्षियन शहाकडे मदत मागितली. इराणी शहाने पोर्तुगिजांना इथून हुसकावलं आणि या बेटावर ताबा बसवला. तेव्हापासून अधूनमधून बहारीनवर आपला हक्क असल्याचं इराण आठवण करून द्यायला लागलं. तो वाद अगदी आजतागायत अधूनमधून चिघळणारा. इराण हा शिया पंथीय. त्यामुळे त्याची सत्ता आल्यावर बहारीनमधल्या अनेक लोकांनी हा पंथ स्विकारला. बहारीन हा अरब देशांमधला एकमेव शियाबहुल देश.

अठराव्या शतकाच्या मध्यावर उत्तरेकडच्या कुवेतमधल्या वाळवंटातून एक बलवान कबिला दक्षिण दिशेला निघाला. अल खलीफा कबिल्याने आधी कतारवर कब्जा केला. त्यानंतर त्यांनी बहारीनमधून पर्शियनांना हाकललं. हा होता एका नवीन इतिहासाचा आरंभ. अल खलीफांचं बहारीनमध्ये आगमन झालं त्याच सुमारास भारतात पाय रोवणार्‍या ब्रिटिशांचं लक्ष या बेटाकडे वळलं. ईस्ट इंडिया कंपनीची मालाने लदलेली जहाजं आखातातून जायची, तेव्हा ब्रिटिशांना समुद्री चाचे सतवायचे. त्यांचा हा कारभार रोखण्यासाठी ब्रिटिशांनी आखातातल्या शेखांशी संधान साधलं. त्यातलेच एक बहारीनचे शेख. बहारीनच्या शेखांनाही उत्तरेकडच्या आॅटोमन तुर्कांचं आणि आखाताच्या पलिकडच्या पर्शियनांचं भय वाटायचं, त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांचा मदतीचा हात स्वीकारला.

1869 मध्ये ब्रिटिशांनी आखातातल्या सर्व राजांशी करार केला. त्या राज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिशांनी घेतली. तेव्हापासून बहारीन आणि ब्रिटिशांचं मैत्रीपर्व सुरू झालं. ब्रिटिशांनी बहारीनला भारतीय रुपया हेच चलन दिलं. 1960 च्या दशकापर्यंत इथे चलनात रुपयाचाच वापर होत होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर रिझर्व बँकेने आखाती देशांसाठी वेगळ्या नोटा छापणे सुरू केले. आजही अनेकदा बहारीनमध्ये ‘फील्स’ या सुट्या नाण्याचा उल्लेख रुपया असा केला जातो.

प्राचीन काळापासून हे बेट मोत्यांसाठी प्रसिद्ध होतं. या नैसर्गिक मोत्यांमुळे त्याचे भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. बेटावरचे हजारो लोक होड्या वल्हवत उथळ समुद्राकडे धाव घ्यायचे. आखाताच्या तळाशी जाऊन शिंपले गोळा करायचे आणि त्यातून मोती काढायचे. हे काम वर्षातून चार महिने चालायचं. मोती काढण्याचे चार महिने संपले की खडतर जीवनापासून सुटका व्हायची. त्यानंतरचा काळ हा थोडा आरामाचा. मोती काढण्याचं साहसी काम करणारे लोक संध्याकाळी समुद्रकिनारी बसून गाणी गात. गाण्यांमधून कधी खडतर जीवनाचं दुःख व्यक्त होई; तर कधी सुखरूप घरी आल्याचा आनंदही व्यक्त होई. जोडीला ऊद, पखवाज, डफ ही वाद्ये असत.

v3

उन्हाळा आणि हिवाळा हे इथले दोन ऋतु. जून ते सप्टेंबर हा कडक उन्हाळ्याचा काळ. भर उन्हाळ्यात तापमान पंचेचाळीस अंशांपर्यंत चढतं. याच काळात मोत्यांचा व्यवसाय चालायचा. उन्हाळ्यातच खजुरांना गोडी यायची. नोव्हेंबरपासून उत्तरेकडून थंड वारे वाहू लागतात. हा आल्हाददायक काळ. थंडीच्या साथीला गारठवून टाकणारे वारे वाहतात. याच काळात अधूनमधून आकाश काळवंडतं. तृषार्त भूमीवर पावसाचा शिडकावा करतं. हिवाळ्यातली थंड हवा आणि अधूनमधून भुरभुरणारा पाऊस हिरवा भाजीपाला पिकवणारा. हिवाळा संपल्याची बातमी देणारी धुळीची वादळं उठू लागली की पुन्हा उन्हाचा तडाखा सुरू होतो. असं हवामान आणि जोडीला रेताड भूमी त्यामुळे बेटावरच्या लोकांची उपजीविकेची साधने मर्यादित होती.

मासेमारी करणं, होड्या बनवणं, मातीची भांडी घडवणं, व्यापार करणं हे या बेटावरच्या लोकांचे इतर व्यवसाय होते. स्त्रिया खजुराच्या झावळ्यांपासून टोपल्या, चटया विणत. जरीचं काम करत. बेटावरच्या लोकांचा उदरनिर्वाह शेळ्या, मेंढ्या, हिरवा भाजीपाला यावर चालायचा. धान्य मात्र बाहेरून आणावं लागायचं. मोती विकून इतर गरजेच्या वस्तू इराण आणि भारतातून मिळवल्या जात.

पूर्वी उपलब्ध साधनांमधून या बेटावरची घरं बांधली जात. दगड आणि चुन्याच्या ओबडधोबड भिंती, त्यावर खजुराच्या झावळ्यांचं छप्पर. सूर्याच्या कोपापासून बचाव करण्यासाठी चौकोनी आकाराच्या छोट्या खिडक्या. सावलीसाठी आसुसत एकमेकांना बिलगून लहानलहान गल्ल्यांमध्ये उभी राहणारी घरं. उन्हामुळे भिंतींचा रंग पांढरा. आजही पांढरा आणि फिकट पिवळ्या रंगातल्या छटांशिवाय दुसरा कुठलाही रंग घरांना दिसत नाही. त्यामुळे एकरंगी दिसणारं शहर आणि गावांचं चित्र. वैविध्य दिसतं ते फक्त आधुनिक इमारतींच्या हिरव्यानिळ्या काचांमुळे.

बहारीनमधले मोत्याचे व्यापारी श्रीमंत होते. त्यांची घरे ही इतर सामान्य लोकांच्या घरांपेक्षा प्रशस्त. आज त्यातली एकदोन घरे जतन केलेली आहेत. दुमजली घरात हवा खेळती ठेवण्यासाठी उंच छत. त्यातलं लाकूडकाम भारतातून आणलेल्या सागवानी लाकडाचं. तळमजल्यावरच्या खिडक्या छोट्या. प्रकाश येण्यासाठी त्यांना वरच्या बाजूला रंगीबेरंगी काचांची अर्धवर्तुळाकार कमान. या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्य खोलीतून निघालेला उंच मनोरा. हा ‘बाॅदगीर’ म्हणजे वायुवहनाचा मनोरा. वाळवंटातल्या उन्हाचा तडाखा जोरदार. उष्णतेपासून बचाव करणारं हे नैसर्गिक एयरकंडिशनर. या उंच मनोर्‍यावरून जाणारी थंड हवा या पोकळ मनोर्‍यात शिरायची. खाली जाताना अजून गार व्हायची आणि खोलीत शिरून थंडावा द्यायची. हिवाळ्यात या मनोर्‍यांचं तोंड बंद करून उत्तरेकडून वाहणार्‍या बोचर्‍या वार्‍यांना अटकाव केला जायचा.

.

1930 पर्यंत बहारीनींचं जीवन लयबद्ध होतं. बेटांवर छोटीछोटी गावे होती. प्रत्येक गावात एक विहीर, मशिदीचा एक घुमट आणि बांग देण्यासाठी मिनार. गावातच भरणारा भाजीबाजार आणि मासळीबाजार. थोड्याफार भाज्या, उन्हाळ्यात साठवलेले खजूर, हिरवा पाला खाऊन सशक्त झालेल्या बकर्‍या, दूध, मासे हा लोकांचा आहार. जोडीला भात किंवा ‘खबुज’. प्रत्येक गावातल्या बेकरीत भिंतीत गोल तोंडाची भट्टी. त्यात भाजला जाणारा ‘खबुज’ ही यीस्ट घालून बनवलेली गव्हाची पोळी.

बेट लहानसं. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळी आसपास राहणारी. सतत गाठीभेटी घेणं, एकत्र येऊन हास्यविनोद करत गप्पा मारणं, शिशा (हुक्का) फुंकत रात्री उशीरापर्यंत गप्पांची बैठक भरवणं ही बहारिनींची पूर्वीपासूनची परंपरा. रात्री उशीरापर्यंत लाकडी बाकांवर बसून काचेच्या छोट्या ग्लासांमधून कुणी दुधाविना ‘शाय’ (चहा) पितंय, कुणी तपकिरी रंगाचा क्वाहा (कॉफी) पितंय, कुणी शिशाची नळी तोंडात घालून धुराचे वलय बाहेर काढतंय. कधी मंडळी पत्त्यांचा डाव रंगवतायत, कधी बुद्धीबळाच्या चाली रचतायत किंवा द्यूतासारख्या खेळाचे फासे टाकतायत. हे आजही या देशात ठराविक ठिकाणी दिसणारं दृष्य.

1930 पासून बहारीनींच्या या परंपरागत जीवनाचा ताल बदलला. जपानमध्ये कृत्रिम मोत्यांचा शोध लागला आणि इथल्या मोत्यांची मागणी घटली. हजारो वर्षांपासूनचा या बेटांवरचा व्यवसाय झटक्यात ठप्प झाला. या धक्क्यातून सावरणं तसं कठीणच होतं, पण तेवढ्यात इथल्या लोकांचं नशीब फळफळलं. बहारिनच्या दक्षिणेकडे ऐसपैस पसरलेलं वाळवंट. हिरवाईचा एक ठिपकाही नाही. याच वाळंवटात एक बाभळीचं झाड झुकलेल्या फांद्यांनीशी वर्षानुवर्षं तग धरून उभं आहे. कबर्‍या पाटीवर हिरव्या रंगाचा एक फटकारा दिसावा तसं. या एकट्या जीवाचं इथे मोठं कौतुक, Tree of Life असं. या झाडापासून काही अंतरावर एक टेकडी उभी आहे. चारशेचाळीस फूट उंचीची ही ओबडधोबड टेकडी. त्याचं नाव ‘जबल अल दुखान’ म्हणजे ‘धुराचा पर्वत’.

जबल अल दुखानच्या अवतीभवतीच्या परिसरात वाळू आणि दगडधोंड्यांचं साम्राज्य आहे. या वाळूखाली दडलेल्या काळ्या धनाचा शोध 1932 मध्ये लागला. ही आखाती देशांमधली पहिली तेलविहीर. या तेलविहिरीने आखाती देशांच्या लखलखाटाचा प्रारंभ झाला. या तेलविहिरीजवळ आज एक छोटे तेलाचं म्युझिअम उभं आहे. यात जुने फोटो आणि तेल काढण्यासाठी सुरुवातीला वापरलेलं साहित्य बघायला मिळतं.

1

तेल सापडल्यानंतर दोन वर्षांनी तेलाची निर्यात सुरू झाली आणि या बेटांचं रूप पालटू लागलं. तेलाचा शुद्धीकरण प्रकल्प उभा राहिला. त्यात काम करण्यासाठी पाश्चात्य देशांमधले कुशल कामगार आले. रस्ते आणि पूल बांधले गेले. मुख्य बेट असलेल्या मनामाच्या किनार्‍यावर शेकडो बोटी विसावा घ्यायच्या. तिथे ब्रिटिश अधिकार्‍यांनी ‘गेट वे ऑफ इंडिया’सारखंच मनामाचं द्वार उभारलं. आजही उभी असलेली ही पांढर्‍या रंगातली दुमजली इमारत म्हणजे ‘बाब अल बहारिन’. बाब म्हणजे द्वार. एकेकाळी समुद्राचं शांत पाणी या प्रवेशद्वाराला स्पर्श करायचं. आज या प्रवेशद्वारापासून समुद्र पार लांब पोहोचलाय. उथळ समुद्र बुजवून जमीन तयार करणं आणि त्यावर चकचकीत उत्तुंग इमारती उभ्या करणं हे काम जोरात सुरू आहे.

vi2

‘बाब अल बहारीन’च्या मागच्या बाजूला ‘मनामा सूक’ उभं आहे. ‘सूक’ म्हणजे बाजार. चकचकीत मॉल संस्कृती उदयाला येण्यापूर्वी हाच या छोट्या बेटावरचा मॉल. अनेक वस्तूंनी खच्चून भरलेला. गल्लीबोळात वसलेल्या या सूकला मुंबईच्या उपनगरातला बाजार किंवा पुण्याच्या तुळशीबागेच्या बाजाराचं रूप. विक्रेतेही भारतीय, पाकिस्तानी, बांग्लादेशी.
कापडाचे तागे, काळे झुळझुळीत अबया, पुरुशांचे पांढरे शुभ्र डगले, डोक्यावरचे रुमाल विकणारी कपड्यांची दुकानं. एक गल्ली किराणामालाच्या दुकानांची. त्यात भारतातून आणि इराणमधून आलेलं सामान. कुठे विविध आकाराच्या अत्तराच्या आकर्षक बाटल्यांचा थाट. कुठे शीशा फुंकण्यासाठी लागणारं तंबाखूसह सर्व साहित्य गिर्‍हाइकांच्या प्रतीक्षेत. एखादं दुकान फरसाण आणि मिठाईचं. सामोशांचं लघुरूप धारण केलेले त्रिकोणी ‘सम्बूसा’, अरबांचं वडापाव म्हणजे ‘फलाफल’ हे न्याहारीचे पदार्थ विकणारे जवळपास. जोडीला बहारिनांचा आवडता बदामी ‘शूवैतर हलवा’. सढळ हस्ते सुकामेवा घातलेला हा हलवा चकचकीत, तरल आणि चिकट.

.

याच सूकमधून पुढे गेल्यावर सोन्याची दुकानं लागतात. हा डोळे दिपवणारा बाजार. या बाजारावर भारतीयांची मक्तेदारी आहे. विकास होऊ लागला तशी भारतीयांची संख्या वाढू लागली. सुरुवातीला मोत्याच्या व्यापारानिमित्ताने सिंध आणि गुजराथ प्रांतातून लोक आले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सोनं, कपडे, धनधान्य यांचा व्यापार करण्यासाठी गुजराथी व्यापारी आले.

आखातातल्या देशांमध्ये सर्वात प्रथम बहारीनमधलं तेल बाहेर आलं, तरी इथल्या तेलाचा जोर इतर शेजार्‍यांच्या तुलनेत फार नव्हता. त्यामुळे बदल टप्प्याटप्प्याने घडत होते. 1971 मध्ये बहारीनवरची ब्रिटिशांची सत्ता संपली आणि हा देश स्वतंत्र झाला. 1970 च्या दशकात याच्या प्रगतीने पुन्हा वेग घेतला. या दशकात अरब-इस्त्रायल युद्धामुळे तेलाच्या किंमती भडकल्या. त्याचा या देशाला फायदा झालाच. शिवाय त्याच काळात लेबनॉन अशांततेच्या दुष्टचक्रात सापडलं, तेही पथ्यावर पडलं. लेबनॉनमध्ये अरब बँकक्षेत्राने उत्तम मूळ धरलं होतं. यादवीमुळे तिथून बाहेर पडायला आसुसलेल्या या व्यवसायाचं बहारीनने स्वागत केलं. या बँकांच्या मागोमाग बांधकाम, हॉटेल, रेस्टॉरंट अशी अनेक क्षेत्र उभी राहिली. अनेक देशांमधली लोकं इथल्या छोट्या विमानतळावर उतरत होती. बहारीनचा कायापालट झाला. समृद्धीने बेट झळाळू लागलं. देशोदेशीच्या वस्तू इथे सहज उपलब्ध होऊ लागल्या.

इथलं वातावरण परदेशी लोकांना सामावून घेणारं. स्त्रियांवर बंधनं नाहीत, स्त्रीशिक्षणाचा आरंभ 1928 मध्ये झालेला, इतर धर्मियांवर धार्मिक बंधनं नाहीत अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला हा देश. इथे सुरुवातीपासून इतर धर्मीयांबाबतीत सहिष्णुतेचं धोरण ठेवलं गेलं. त्यामुळे ख्रिश्चन धर्मातल्या विविध पंथांचे चर्च, हिंदूंची मंदिरे, शीखांचे गुरुद्वारा उभे राहिले. मुस्लिम देशांमध्ये हे अभावानेच दिसणारं चित्र. शिवाय स्थानिक लोक सुशिक्षित आहेत. हास्यविनोद करत जीवनाचा आनंद घेत जगणारे, समोरच्याशी अदबीने वागणारे. त्यामुळे विसाव्या शतकाच्या मध्यापासून तर आजतागायत बहारीन हा परदेशी लोकांचा नोकरीव्यवसायानिमित्त राहाण्यासाठीचा आवडता देश आहे.

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

20 Oct 2014 - 10:04 pm | आयुर्हित

आपल्या ओघवत्या शैलीतून नवनविन माहितीचा खजिनाच उघडलाय आपण.
सुंदर माहितीपूर्ण लेख!

विलासराव's picture

21 Oct 2014 - 3:47 pm | विलासराव

उत्तम माहीतीपुर्ण लेख. एक मित्र तिकडे आहे खरा पण संपर्क नसल्याने बहारीन बद्दल अज्ञानच होतं.

एस's picture

21 Oct 2014 - 8:17 pm | एस

बहारीन हा खरंच बहारदार देश असला पाहिजे. तिथल्या मुक्त वातावरणाबद्दल माहिती नव्हती. लेख उत्तम!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Oct 2014 - 1:11 am | डॉ सुहास म्हात्रे

अरबी जगतातल्या एका छान मोकळ्याढाकळ्या देशावरचा सुंदर लेख !

सौदी अरेबियात चित्रपट्गृहे नाहीत, त्यामुळे चित्रपट बघायची सुरसुरी आली की दम्मामहून ४५ किलोमीटरवरच्या बहरेनला चक्कर मारली जायची त्याची आठवण आली.

सुरेख लेख.सध्या बाहरिनमध्येच आहे.सर्वाना आपलासा करणारा देश आहेच बाहरिन.

सानिकास्वप्निल's picture

25 Oct 2014 - 1:08 pm | सानिकास्वप्निल

माहितीपूर्ण लेख.
बाहरिनची ओळख आवडली :)

प्रभाकर पेठकर's picture

25 Oct 2014 - 9:17 pm | प्रभाकर पेठकर

बाहरेनला दोनवेळा धावती भेट (मार्गे बाहरेन प्रवासात) दिली आहे. विमान, बाहरेनच्या धावपट्टीच्या दिशेने खालीखाली येऊ लागते तसे कित्येक मैल उथळ आणि नितळ समुद्र आपल्याला आश्चर्य चकित करतो. तसेच पहिले दर्शन होते ते त्या उथळ समुद्रात पोहणारे डोल्फिन्सचे. मस्त वाटते वरून पाहताना. बाहरेनचे मोती दूरुनच पाहिलेले आहेत आता पुन्हा कधी योग आला तर, ह्या धाग्याच्या अनुषंगाने, पुन्हा एकवार निवांतपणे, बाहरेन पाहण्याचा प्रयत्न करेन.

पद्मश्री चित्रे's picture

26 Oct 2014 - 1:29 pm | पद्मश्री चित्रे

नेटकं आणि सहज वर्णन आवडलं ...

श्रीरंग_जोशी's picture

29 Oct 2014 - 11:34 pm | श्रीरंग_जोशी

बहारिनबद्दल मराठी आंतरजालावर प्रथमच वाचले.

या लेखनासाठी धन्यवाद.

मधुरा देशपांडे's picture

2 Nov 2014 - 2:16 pm | मधुरा देशपांडे

बहारीनची ओळख आवडली.

पैसा's picture

2 Nov 2014 - 3:12 pm | पैसा

एका नव्या देशाची छान ओळख!

सस्नेह's picture

2 Nov 2014 - 10:54 pm | सस्नेह

एका टुमदार छोट्याशा देशाची रंगतदार ओळख !

सुहास झेले's picture

2 Nov 2014 - 11:02 pm | सुहास झेले

ओळख आवडली... :)

सविता००१'s picture

3 Nov 2014 - 12:44 am | सविता००१

छान ओळ्ख. :)

आरोही's picture

3 Nov 2014 - 12:53 pm | आरोही

बाहरीन ची ओळख आवडली .

hitesh's picture

4 Nov 2014 - 8:11 pm | hitesh

छान

विशाखा अतिशय सुंदर लेखनशैली लाभली आहे तुम्हाला. लिहीत रहा.
कोणत्याही दुशाच इतक रसाळ वर्णन....
बाभ़ळीच झाड पहायला आवडल असत.

क्लिंटन's picture

10 Nov 2014 - 10:42 am | क्लिंटन

अरे हा चांगला लेख इतके दिवस कसा काय वाचला नव्हता हेच कळत नाही.

बाहरीनला मी अगदी धावती (३ दिवसांची) भेट २००५ मध्ये दिली होती त्याची आठवण झाली.ट्री ऑफ लाईफ, अल अरीन पार्क, पहिली तेलविहीर, सौदी कॉजवे या जागा बघितल्या होत्या. अल अरीन पार्कमध्ये दोन मदारींचा उंट पहिल्यांदाच बघितला.सौदी कॉजवेजवळ सौदी अरेबिया-बहारीन सीमेजवळ सौदीमध्ये "बिन लादेन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज" ही पाटी वाचल्याचे आठवते. बहुदा ओसामा पण त्याच कुटुंबातला.माझे भारतात यायचे विमान २ तास लेट झाले म्हणून अगदी परत येताना आणखी एका त्यामानाने फार परिचित नसलेल्या ठिकाणीही जायला मिळाले. हे ठिकाण म्हणजे पर्यटकांसाठीचे डेस्टिनेशन नक्कीच नसणार. या ठिकाणाचे नाव आहे गलाली. विमानतळाच्या अगदी बाजूला हे ठिकाण आहे आणि लँडिंगला येणारी विमाने त्या दिशेने येतात.विमाने अक्षरशः आपल्या डोक्यावरून लँड होतात. फार नाही पण तीनच विमाने बघायला मिळाली.पहिले विमान लँड होताना बघताना पहिल्यांदा विमान आपल्याच अंगावर येत आहे असे वाटून खरे सांगायचे तर भिती वाटली होती. (त्यानंतर युट्यूबवर सेंट मार्टेन बेटांवर विमाने लॅन्ड होतानाचे व्हिडिओ अनेकवेळा बघितले आहेत. एकदातरी त्या ठिकाणी जायला मिळावे ही इच्छा नक्कीच आहे :) )

लेखामुळे त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. त्याबद्दल आभारी आहे.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2014 - 9:17 pm | चौथा कोनाडा

व्वा, क्या बात हैं ! नितांत सुंदर लेख ! हा अभ्यासपुर्ण ओघवता लेख वाचताना बहारिन मध्येच आहे की काय असे वाटत होते. तिथल्या मोती व्यवसाया बद्दलची माहिती रोचक आहे. सोबतच्या प्रकाशचित्रांमुळे लेख आणखीन बहारदार झालाय !

ओघवत्या भाषेतली एका नव्या देशाची (म्हणजे माझ्यासाठी नव्या) ओळख आवडली.