कथा

Primary tabs

अनाहिता's picture
अनाहिता in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:10 am

(अनाहिता महिला विभागातर्फे सगळ्याजणींनी मिळून कथा/लेखन करण्याच्या प्रयोगाला आलेलं हे फळ आहे. यशोधरा यांची मुख्य कथाकल्पना आणि त्याला इतर सर्वजणींची मदत. संपादकीयामधे याचा उल्लेख केला आहेच! सहभागासाठी सर्वांना धन्यवाद!)

******************

भिवाण्णा पार सटपटून गेला होता....

गेल्या एक वर्षा दीड वर्षात आक्रीतच घडत चाललं होतं जणू, पार अगदी त्याच्या आवाक्याबाहेरचं! कसं नी काय, काय उमगायलाच तयार नव्हतं त्याला. विचार करकरून डोकं फुटायची वेळ आली होती आता! हताश असा, घरासमोरल्या अंगणातल्या बाजेवर बसून, शून्यात नजर लावून, परत एकदा आयुष्याची बेरीज वजाबाकी करण्यात, आणि कुठं न् काय चुकलं याचा मागोवा घेण्यात, भिवा गुंतला होता. एवढाच एक खेळ नियतीने त्याच्या नशीबात आता ठेवला होता जणू... मनातल्या मनात, घरच्या देव्हार्‍यातल्या तसबिरीतल्या देवाला त्याने प्रश्न विचारुन झालं होतं, की बाबा रे, आता उतरत्या वयात हे भोग का रे बाबा देतोस नशीबी?? पण तसबिरीतला देवही गप्पच राहिला होता...

उगाच मागचं, पार त्याच्या लहानपणचं काहीबाही आठवत राहिलं त्याला. पुरानं सुसाटणार्‍या नदीला लोंढे यावेत तशा आठवणी, एकीतून दुसरी, दुसरीतून तिसरी... मनावर काही धरबंदच राहिला नव्हता त्याचा.

... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा नाव ठेवलेलं बानं आपल्या. बाच्या आईची -आपल्या आज्जीची आठवण म्हणून. दिसायलाही कशी चंद्रावाणी होती, गोरी गोमटी. चांगल्या घरात पडली. दाजीपण भला माणूस. बहिणीला सुखात ठेवलं आपल्या. भेटायला यायची माहेराला, तेह्वा कशी भरल्या मनानं, सुखानं तृप्त हसू ओठांवर लेवून यायची.... चंद्री पण आई बापाच्या नावाला जपून राहिली. पण कशी चिडायची लहानपणी!! आठवणीने आतापण भिवाण्णा गदगदत हसला.

चंद्रीची पोरं आजोळी यायची तेव्हा मामा मामा करत पाठी असायची. भिवाण्णाही त्यांचे सगळे हट्ट पुरवायचा. घरधनीण कधीतरी करवादायची, पण तीही त्यांचं मायेने करत असे. या सगळ्याला दृष्ट लागली, ५ वर्षांखाली दाजी अचानक अपघाती गेले तेव्हा.

आईनं सांगितलं होतं चंद्रीला कधी अंतर देऊ नकोस म्हणून. म्हणताना भिवाण्णाने चंद्रीला तिच्या तीन पोरांसकट घरी आणलं. चंद्री कधीमधी यायची तेव्हा सगळं गोडीगुलाबीनं चालत असे. पण आता हळूहळू घरात धुसफूस सुरू झाली. निमित्त झालं ते भिवाण्णाची वाढत्या वयाची भाचीचं.

भिवाण्णाची भाची चार लोकात उठून दिसणारी तिच्या आई चे रुप घेतले तिने. वागणेही अगदी सालस असे. पण अलल्ड वयाची.

भिवाण्णाला तशी रखमाची चांगली साथ होती. चंद्रीचं लगीन उरकल्यावर ह्या घरातली पोरीची उणीव त्याच्या रखमान उंबरा ओलांडून भरुन काढ व्हती. भिवाण्णाच्या चंद्रीला माहेरी आणायच्या योजनेला रखमान अगदी पापणीवर झेलाव तस झेलल व्हत. तश्याबी दोघी नणंद भावजया एकाच वारगीच्या. त्यात रखमाची कूस कदी उजवली नव्हती. चंद्रीच्या पोरांना भिवाण्णा अन रखमान कायमच आपली पोरं असल्यागत वागवलेलं.

उघडं कपाळ अन तीन पोरकी पोर हातावरल्या पोटासकट घेउन चंद्रा भावाभावजयीच्या आसर्‍याला आली खरं, पण नशिबान काय येगळेच भोग गोंदुन ठेवले व्हते तिच्या भाळावर. आन तिच्या भोगापायी फरफटली व्हती ती चार भाबडी मन!

भिवण्णाची लाडकी चंद्री कसल्याशा आजारानं गेलं दीड वर्षं अंथरुणाला खिळली होती. नवरा गेल्याचं दुःख कमी म्हणून का काय हे वाट्याला आलं होतं. पार तालुक्याच्या दवाखान्यापर्यंत नेऊन आणलं, पण काय गुण येईना.
आता घराची सगळी खेच रखमाच्या जीवाला बसू लागली. घरादाराचं, पोराबाळांचं, सैंपाकपाण्याचं, आजारी नणंदेचं सारंच तिच्यावर पडलं. त्यात चंद्रीच्या थोरलीचं, आनशीचं मामीसंगं जमेना. आनशी, अनसुया तशी गुणाची. पण आईची चाललेली परवड पाहता पाहता तिच्या मनानं कोणता इचार घट्ट धरला कोण जाणे, ती घरात फटकूनच वागू लागली.

चंद्रीवर चांगले उपचार व्हावे म्हणून आनशी भिवण्णाच्या मागं लागली होती आयेला म्हमईला घेऊन जाऊ म्हणून, पण भिवण्णा इतका खर्च कसा काय करु शकणार होता? खाणारी तोंडं सहा आणी कमवणारा फक्त भिवण्णाच होता. सगळी सोंगं आणता येतात पण पैशांचे नाही हे त्याला पक्कं माहित झालं होतं. त्यात चंद्रीला तालुक्याला उपचारांकरता दोन दिवस दवाखान्यात भरती करावं लागलं त्यासाठी सावकराकडून काही पैसे कर्ज म्हणून घेतले होते, ते कसे फेडायचे हा विचार त्याच्या डोक्यात सतत चक्राप्रमाणे सुरुच असायचा आणी इथे मामा आयेला म्हमईला नेत नाय म्हणून आनशी सतत कदरायची, फटकळपणे बोलायची, ध्यानी-मनी एकच विचार असायचा तिच्या, खूप पैकं मिळवलं पाहिजे त्याशिवाय म्हमई गाठता नाही यायची.

आता या असल्या वावटळात भिवाण्णा गरगरत असताना ही तरणीताठी आनशी "मामा मला शिवायच मशीन आन" म्हणुन माग लागली व्हती. अशी नुसती पाठ धरली व्हती तिनं भिवाण्णाची.

आताच तर चंद्रीपायी सावकाराच कर्ज काढुन बसला व्हता तेच सुगीत कसबस फिटल अस गणित हुत भिवाण्णाच, त्यात आणी हे मशीनच लडतर गळ्यात अडकवुन काय करायच हुत्त भिवाण्णान? खर सांगायच तर चंद्रीवरच गेलेली आनशी त्याला कुट्लीबी गोष्ट सांगायला लागली की भिवाण्णा नाग डुलल्यागत डुलायचा तिच्या तालावर, खर ही गोष्ट त्याच्या आवाक्या भायेरची व्हती.

आईच्या आजारपणान काळवंडलेली आनशी, रखमाच्या हाताखाली जेवानपाणी शिकत व्हती. सकाळच्या पारी लवकर उठुन भाकरी थापून रोजगारासाठनं शेतावर जात हुती. रखमा तिला अशी घडीभर सुद्धा नजर आड होवू देत नव्हती.
आनशीला तिचा बाबा आठवला. ती लहान असताना गुबदुल आनशीला वर आभाळात उडवुन त्यो हसत हसत तिला झेलायचा," माझ साकरच पोतं" म्हणून दोन्ही गालांच पटापटा मुकं घ्याचा. आजबी बाबा असता तर त्याने ह्ये दुक वरच्यावर तोलल असत; आनशीच्या मनाला वाटल. बा च्या आठवणीन तिच डोळं भरुन आलं. काल परवा पत्तोर घरट्याच्या उबेला असणारी, आईच्या पदराला झटणारी आनशी आज अशी जणु उघड्या माळरानावर वार्‍यावादळात उभी व्हती. आई असुनबी अशी अंथरुणाला खिळलेली. मामाच हातावरच पोट, तिच्या खालची दोन ल्हान भावंडं.
विचाराच्या नादात हातातलं खुरप चालत व्हत अन पायाच्या अंगठातन एक कळ तिच्या मस्तकात घुसली. भरल्या डोळ्यांनी तिचा घात केला व्हता. हातातल खुरप सरळ अंगठ्यावर उतरल होत. आनशीला हुंदका फोडायला जणु कारण मिळाल. तिच्या भरल्या डोळ्यांनी पापणीचा काठ सोडला अन गालावरन भर पावसातली नदी निघावी तसा आसवांचा पूर वाहू लागला.

****************************

फोनच्या रिंगनी ती दचकली आणि तिची लिहिण्याची तंद्री तुटली. तिनी पेन खाली ठेवलं, जरा रागारागानीच तिनी त्या फोनकडे बघितलं... यावेळी फोन म्हणजे फक्त दोनच शक्यता !!!

नवरेबुवांनी ऑफिस सोडलं असेल, किंवा आई मंदिरातून घरी परतली असेल आणि लेकीची आठवण आली असेल. विचारांतच तिने फोन घेतला. आईचाच होता. ख्याली खुशाली विचारून तिने बोलणं संपवलं.

'आजकाल आई दर दोन दिवसांआड फोन करत असते. शेवटी तीच समजू शकते आईपणाचं महत्त्व, आणि आईपणाच्या हुलकावणीने दिलेलं दु:ख. मिसकॅरेज होऊन आज २ महिने १७ दिवस झाले, माझ्या आजूबाजूचं वातावरण कसं नॉर्मल झालं आहे, पण माझ्या आत होत असलेलं वादळ अजून शमलंच नाहीये. एक विचित्र पोकळी निर्माण झाली आहे.' डोक्यात विचारांचं काहूर घेऊन ती स्वयंपाकघरात आली.

मनात खरं तर राग खदखदतच होता. एक ग्लास पाणी प्यायली, तेवढ्या आठवण झाली, साहेब येतील जरा वेळात. कामाला लागायला हवं. दणादणा गॅसवर कूकर चढवला. एक तर पोटात एक अंकूरही आपल्याला सांभाळता आला नाही हे मनातून काहीकेल्या जात नव्हतं आणि त्याचवेळी चंद्री-आनशी-भिवण्णाला पण आपण न्याय देऊ शकत नाही म्हणून मन आक्रंदत होतं. आपल्या हातून मनासारखी निर्मिती कधीच नाही का होणार?

गावात, घरी पाहिलेलं किती किती कागदावर येण्यासाठी मनात ओरड करत होतं आणि त्याचवेळी ते मनात तसंच कोंडून घालून ती इकडे कूकर लावत होती, नवर्‍याबरोबर बाहेर जात होती आणि आई वगळून इतर सार्‍यांना प्रचंड सुखात असल्याचं दाखवत होती.

आई फोन करुन मनाला फुंकर घालत होतीच. पण तरी अस्वस्थपणा कमी होत नव्हता. कथा आणि पोटातील न वाढलेला अंकुर दोन्ही मनाच्या वेदना वाढवत होते.

हात यंत्रासारखे काम करत होते, पण तिचं मन कशातच नव्हतं. थोड्या वेळात नवरा आला. "चहा?" त्याने हातानेच नको ची खूण केली. घरात येतानाही तो फोनवर बोलतच होता. ते बोलणं संपल्यावर त्यांचं जरा वेळ इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि तिने टेबलावर पानं घेतली. जेवण झालं आणि उठता उठता त्याने अचानक विचारलं, "अग, औषधं घेतलीस की नाही?" तिच्या दुखर्‍या मनाला तेवढीही आपुलकी थंड वार्‍याच्या झुळकी सारखी सुखावून गेली. आजकाल तोही ऑफिसात सतत बिझी असायचा आणि असं अगदी मनातलं बोलणं फार कमी झालेलं.

किचनमधलं काम संपवून ती बेडरूममधे आली, तेव्हा तो डोळ्यावर चष्मा तसाच ठेवून गाढ झोपलेला होता. कामाची फाईल बाजूला पडली होती. तिनं फाईल आणि चष्मा हलकेच उचलून ठेवले आणि ती अंथरुणावर पडली. मात्र झोप कुठे पळाली होती देवजाणे! असंच तळमळत काही वेळ गेला. बाहेर एकचा टोला पडलेला तिने ऐकला.

कथेची ओढ तिला जाणवत होती. आणि क्षणात तिला जाणवले हे अपूर्णत्व पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर नवनिर्मिती व्हायलाच हवी. चोरपावलांनी ती उठली आणि स्टडीमधे येऊन पुन्हा टेबलावरच्या नीट एका बाजूला ठेवलेल्या कागदांकडे बघू लागली. चंद्री-आनशी-भिवण्णा यांनी परत तिचा ताबा घेतला आणि तिने टेबलावरचे कागद पुढे ओढून लिहायला सुरुवात केली.

**************************

आनशीला चांगलीच खोलवर जखम झाली होती. आनशीच्या रडण्याने शेजारीच काम करणाऱ्या सरू बाईचं तिकडे लक्ष गेलं. अगं पोरी, ध्यान कुठं हाय तुझं? दे बघू हात इकडं. आपल्या पदरानेच तिने रक्त टिपायचा प्रयत्न केला. कोपर्यावर झाडाखालच्या हंड्यातून पाणी घेऊन हात धुतला आणि एका फडक्याने बांधून दिला. आन्शीच्या वेदना काही कमी होत नव्हत्या. सांजच्याला घरी आली ती हाताला फडकी बांधून. जखम अंगठ्याला होती पण हात जड पडला होता तिचा. आता ही पोरगी पण घरच्या कामाला येणार नाय नि शेतावर पण काम करू शकणार नाय म्हणून रखमा अजूनच धुसफुसत होती. धड कामात लक्ष द्यायचे न्हाई आणि मग बसायचे नुसते. पैशे लागतातच झाडाला. भिवाण्णा च्या डोळ्यासमोर अजून एक संकट उभं होतं. यासाठी सरकारी डाक्टर ला दाखवायला लागेल. पण गावी जायला एवढे पैसे कुठून आणणार. आणि रखमाला कसे समजावणार? तेवढ्यात आनशीने त्याला सांगितले, मामा, काळजी करू नगं. त्या शेतावारल्या बाय म्हणत व्हत्या की परवा आपल्या गावात कुणीतरी मंत्री येणार हायेत, अजून काही लोक येणारेत. आणि कुठला तपासणी क्याम्प का काय म्हनतेत, तर शहरातून डाक्टर पण येणार. दोन दिवस काढीन कळ. सगळ्या आठवणी अश्रूंच्या रुपात वाहून गेल्या म्हणून की काय, आन्शीला थोडी हिम्मत आली होती. एका हाताने जसे जमेल तसे, ती आपल्या मामीला मदत करू लागली. तेवढाच मामीचा राग पण कमी होईन असे वाटत होते. स्वतःच्या दु:खापेक्षा आपल्या आईच्या आजारावर काही औषध पाणी मिळेल असे तिला वाटत होते. आपली माय बरी झाली की आपच सगळं ठीक होईल अशा विचारातच तिला झोप लागली.

सकाळी वरच्या वाडीतली चंपी आल्ती. ती म्हमईला कुठे काम करते आसं ऐकलं होतं. ती आली तीच रखमाला म्हणू लागली, वहिने, आनशीला मज्यासोबत म्हमईला पाटवतीस का? कुटंतरी कामाला लावीन तिला. रखमा बोलली, ह्येस्नी इच्यारते आनि मंग सांगते तुला. सांच्याला भिवाण्णा घरी आला आणि रखमाने विषय काढला मात्र, भिवाण्णा पेटून उठला. "त्या चवचाल कार्टीचं नाव या घरात कुनी घ्याचं न्हाय. म्हमईला दारूच्या गुत्त्यावर नाचकाम करून पोट जाळती म्हनं. आनि काय काय करती ते त्या देवालाच ठावं." ऐकून रखमा आन आनशीची पार दातखीळ बसली.

दोन दिवस कशे तरी गेले. तिसर्‍या दिवशी गावात मंत्री, पंचायत समिती सभापती, पोलीस सायब असे कोण कोण मोठमोठे साहेब लोक सकाळीच जीपगाड्या भरून आले. त्यांच्याबरोबर सरकारी डॉक्टर अन दवाखान्याचे लोक आले. सगळ्यांच्या तपासण्या आटोपल्या. कोण कोण आप्रेशनं करून घेणार होते त्यांची नावं लिहून घेतली. डोळ्याच्या दाताच्या तपासण्या झाल्या. हेल्थ चेकप क्यांप म्हनं त्यो. त्याच धामधुमीत आनशीच्या हातला बी दवापाणी झालं. एक इंजेक्शन घ्यावं लागलं आणि गोळ्या न चुकता घ्ये. म्हणत डॉक्टरानं दिल्या.

सांजच्याला सगळ्या गावकर्‍यांची सभा झाली. मंत्री साहेबाचं भाषण झालं. आता कोण गरीब रहायचा न्हाय. सगळ्यांना काम देणार म्हणला तो. मग तालुक्याच्या गावच्या बँकेचा साहेबानं बी भाषण केलं. कोणाकोणाला पीक कर्ज देता यील, कोणाकोणाला धंद्यासाठी कर्ज देता यील याबद्दल कायबाय बोल्ला तो. मास्तरांची धिटुकली पोरगी तालुक्याला राहून पार पंधरावी पर्यंत शिकली होती. तिनं साहेबांना विचारलं की आम्हाला कोन कर्ज देणार? साहेबांनी सांगितलं, तुम्ही बायांनी बचत गट स्थापन करा आणि माणशी थोडी थोडी बचत करा. मग बँक तुम्हाला सगळ्यांना मिळून कर्ज देईल. कोणाला गरज असेल तसं तुम्ही ते आपसात वाटा आणि मग पैसं मिळवून जमेल तसं थोडं थोडं भरून टाका. यापुढे कोणीही सावकाराचं कर्ज काढायचं नाय. मग मंत्री म्हणाले, तुमच्या गटाला तालुक्याला एस्टी स्टँडवर गाळा देतो. बाप्या लोकाना बचतगट यशस्वी करून दाखवाच!

झालं. सगळ्या बाया जिद्दीला पेटल्या. दुसर्‍याच दिवशी बचतगट स्थापन झाला. पाटलीणकाकूंना अध्यक्ष केलं. मास्तरांची कुसूम सचिव झाली. अन मग सगळी कागदं घेऊन दोघी चौघी तालुक्याला बँकेत गेल्या. बँक साहेबाने आणखी कायबाय कागद दिले, ते नीट लिहून आणा म्हटलं आन सगळ्यांचे फोटो काढून खाती तयार करायची म्हणाला. सगळ्याजणी खुसुखुसू हसत फोटो काढायला धावल्या. सगळं झालं आन मग कर्जवाटप करायचा दिवस आला. आनशीचा आनंद गगनात मावेना, "अग मामे, तू काय करशील ग? झुणका भाकर्‍या का करून दीनास? आपण तालुक्याला गाळ्यात विकायला ठेवू. तिकडे खूप लोक जेवण विकत घेतेत म्हनं!" रखमा पण खूश झाली.

सगळ्या बाया झडझडून कामाला लागल्या. शेतीच्या कामातून राहिलेल्या वेळात कोण रजया, वाकळ शिवतेय, कोण झुणका भाकर तर कोण धपाटे चटणी, चपाती भाजी करून प्लॅस्टिकच्या पिशव्यात घालून कुसूमकडे पोचवून देतेय. कुसूम सकाळीच सगळं गोळा करून तालुक्याला गाळ्यावर जायची अन सान्च्याला सगळं बैजवार आवरून पैशे नीट वेवस्थित घेऊन परत यायची. सगळ्याचा नीट हिशेब लिहून ठिवायची. अन दुसर्‍या दिवशी सकाळी पैशे बँकेत नेऊन भरायची. आणखी दोघी तिघी जरा शिकल्या सवरलेल्या तिला दुकानावं मदत करायच्या.

बचतगटातूनच आनशीला शिवणाचं मशीन मिळालं त्या दिवशी तिनं आख्ख्या गावाला घरोघरी जाऊन पेढे वाटले. मग वाघिणीसारखी थेट कामाला भिडलीच की ती! मध्यंतरी तिनं तालुक्याला शिवणाचा कोर्स केल्ता. शिवणाची आवड असल्याकारणान सगळं नीटनेटकं शिवायची ती. गावातल्या बायांचे ब्लाऊज, पोरींचे झगे आता तिला शिवायला मिळायचे. उरलेल्या वेळात दुपटी झबली असं कायबाय शिवून बचतगटाच्या गाळ्यात विकायला ठेवायची ती. हळूहळू सगळं कर्ज फिटलं.

दरम्यान रखमा पण झुणका भाकर करून विकायला पाठवत होती. तिच्याही हातात चार पैशे खुळखुळू लागले. सावकाराचं कर्ज बँकेतून पीककर्ज घेऊन फेडून टाकलं. शेत पण झ्याक पिकलं. बँकेचे पीक कर्जही फिटून गेलं. भिवण्णाने चंद्रीला तालुक्याला दाखवून औषधपानी केलं. पण गुण येईना. मग मुंबईला न्यायची तयारी केली. आता घरात बखेड्याचं कारणच उरलं न्हवतं. रखमा परत आपली पोरांवरची पातळ झालेली माया भरभरून खर्च करत व्हती.

धाकट्या दोघांना बरे कपडे, रखमाला झुळझुळीत लुगडं, आनशीला चांदीच्या साखळ्या, आन हो, भिवण्णा आन आनशीला एकेक मोबाईल पण घ्येतला! आता भिवण्णाला घरनं कुनीबी फोन करायचं, मामा जेवाण तयार झालंय. नीघ शेतावरनं!

अशातच मास्तरांच्या कुसूमचं म्हमईला काम निघालं. तिच्यासोबत आपण आयेला घेऊन म्हमईला जाऊन येतो असा बेत आनशीनं मामाला सांगितला. मामाला जरा काळजी वाटलीच, पण आनशी म्हणाली, सोबत कुसूम हाय नव्हं, आणि आता काय वाटलंच तर कवाबी फोन करीन की! म्या सगळं करीन वेवस्थित. मला पण आता कुसुमसारखं एकलीनं सगळं करायला शिकायचं हाय. मग भिवण्णानं नाईलाजानं परवानगी दिलीच.

रखमेनं "नीट बरी होऊन ये बाई," म्हणत नणदेच्या आन भाचीच्या हातावर साखर ठेवली आन दोघी देवापुढं साखर ठेवून पिशवी आन थोडं पैकं घेऊन कुसूमसोबत घराबाहेर पडल्या.

चंद्री पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होती. लहानग्या दोघा पोरांमधे तिचा जीव अडकला होताच. पावलं जड झाली होती. पण या आजारातून सुटका लवकरात लवकर व्हावी यासाठी जाणे भागच होते. आनशी तिला आधार देत हलकेच हाताला ओढू लागली. दोघी मायले़की कुसूमच्या भरवश्यावर वाट चालू लागल्या. बसस्टँडवर तिघिजणी येउन बसची वाट पाहु लागल्या.

थोड्याचवेळेत बस आली. कुसुमने पुढे होउन जागा मिळवली. वार्‍याच्या झुळकेन आजारी चंद्रीला चटकन झोप लागली. आनशी मात्र म्हमईचा विचार करत होती. एवढ्या मोठ्या शहरात ती पहिल्यांदाच जाणार होती. तिथे म्हणे मोठ्याला बिल्डींगा असत्यात, लय माणस आणी हि वाहनांची गर्दी. कस निभवायच. आनशी मनातून धास्तावली आणी तीने झोपलेल्या कुसुमचा हात घट्ट पकडला.

तिघीजणी कुसूमच्या मावशीकडे गिरगावच्या चाळीत पोचल्या. कुसूमची मावशी एका मोठ्या हॉस्पिटलमधे नर्स म्हणून कामाला होती. चंद्रीला पाहून आणि तिची कथा ऐकून तिच्या सगळं लक्षात आलंच. दुसर्‍या दिवशी मावशी कामाला जाताना तिघींनाही बरोबर घेऊन गेली. हॉस्पिटलमधे मावशीच्या पाहुण्या म्हणून डॉक्टरांनी चंद्रीच्या सगळ्या तपासण्या केल्या. खरं तर शरीराचा असा काही बी रोग सापडला नाहीच. शक्ती येण्यासाठी औषधं दिली खरी, पण आता काळजी सोडा आन मजेत र्‍हावा असं सांगितलं डॉक्टरांनी. मावशी म्हणाल्या, "अग, तू एवढ्या सगळ्या प्रसंगातून गेलीस ना, म्हणून तुझ्या मनानंच सगळे आजार उभे केल्ते. आता सगळं बरं हाय नव्हं, आता ते मनातले वाईट साईट इचार काढून टाक बघू. आमच्या हॉस्पिटलात शरीराचे डॉक्टर आहेत तशा एक मनाच्या डॉक्टर आहेत. आपण त्यांना भेटू आता."

त्या डॉक्टर बाईंना भेटून मनीचं सगळं दु:ख चंद्रीनं सांगितलं. डॉक्टर बाईंनी तिची बरीच समजूत घातली. आन आणखी दोन महिन्यानं भेटायला या म्हणाली. मधे औषधं घेत रहायचं आणि काय बाय वाटलं तर आपल्याला फोन करायचा. इतकं सगळं ऐकून चंद्रीला बराच धीर आला. तिनं आपणहून भिवण्णाला फोन करून ही बातमी दिली आणि कुसूमचं कालेजाचं सर्टफिकिटाचं काम झालं तशा तिघीजणी बसने परत जायला निघाल्या. मावशी म्हणाल्या, चंद्रे, कुसूमच्या आईसारखी तू बी माजी बहीण. पुन्हा अनमान न करता बिनघोर हिकडं यायचं. म्हमईला जोडलेल्या नव्या नात्याने चंद्रीचे डोळे ओलवले. एवढ्या वर्षाच्या त्रासानंतर आता तरी देवाने सुखाचे दिवस दाखवले खरे! आता मात्र पोरांच्या पाठीशी आपण हुबं रहायचं, भिवण्णाला आणि रखमाला सगळा भार एकट्यानं घ्यायला द्यायचा न्हाय. तंद्रीतच तिला बसच्या गार वार्‍यावर शांत झोप लागून गेली.

******************

लिहिता लिहिता हात भरून आला होता, पाठीला रग लागली आणि डोळेही दुखू लागले होते. तिने हात पाय ताणून जरा आळस दिला. पेन बाजूला ठेवून ती परत एकदा कथा वाचू लागली. कथा अगदी १००% मनासारखी उतरली नव्हती, काही ठिकाणी अनावर झालेल्या भावनांशी तडजोडही करावी लागली होती. मधेच आलेल्या वादळांनी कुठे कुठे थांबे घ्यावे लागले अन त्यामुळेच अधेमधे सांधे जोडल्यासारखे वाटत होते, पण तरी एक नवीन कलाकृती निर्माण झाली होती. कथेतली चंद्री, रखमा, आनशी, भिवण्णा सगळीजणं इतके दिवस त्यांच्या स्वत;च्या नशीबावर अवलंबून नव्हती, तर ती स्वतःच त्यांना आपल्या मनासारखे जगायला लावत होती! याची तिला लख्खकन जाणीव झाली. मात्र चंद्री, भिवण्णा आन आनशीच्या आयुष्याची फरपट आपण होऊ दिली नाही, आता त्यांच्यासारखंच आपल्याही कहाणीत सुख येईल या समाधानानं तिनं पेनाला टोपण लावून टेबलाच्या ड्रॉवरमधे टाकून दिलं. आपल्या आयुष्याची कथा असंच कोणीतरी लिहीत असेल अन आपल्यालाही आपल्या दु:खांचा उतारा आता मिळेल असा विचार करतच तिने कागद परत नीट जुळवून एका बाजूला ठेवले. त्यावर पेपरवेट ठेवला आणि निर्मितीच्या कळा देऊन लाभलेल्या नव्या शांततेने आणि उत्साहाने सळसळलेली ती आयुष्याला पुन्हा नव्याने सामोरी जायला सज्ज झाली.

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया


आपल्या आयुष्याची कथा असंच कोणीतरी लिहीत असेल अन आपल्यालाही आपल्या दु:खांचा उतारा आता मिळेल असा विचार करतच तिने कागद परत नीट जुळवून एका बाजूला ठेवले. त्यावर पेपरवेट ठेवला आणि निर्मितीच्या कळा देऊन लाभलेल्या नव्या शांततेने आणि उत्साहाने सळसळलेली ती आयुष्याला पुन्हा नव्याने सामोरी जायला सज्ज झाली.

शेवटचा परिच्छेद छान झालाय. कथेचा फॉरमॅट (साचा) आवडला.

अमित खोजे's picture

21 Oct 2014 - 9:34 pm | अमित खोजे

कथा वाचताना सुरुवातीला वाटले कि आता परत एखादी गरिबांवर होणार्या अत्याचाराची कहाणी वाचायला मिळणार का!
कोणतीही अशी कथा वाचायला घेतली कि ९९.९९% कथांचा शेवट दुःखदच झालेला मी वाचला आहे.
पण जेव्हा डॉक्टरांनी आनाशेचं बोट बरं केलं तेव्हा जरा कथा पुढे वाचायचा उत्साह आला.

सुखद शेवट असलेली माझ्या वाचनातील पहिली ग्रामीण कथा लिहिल्या बद्दल तुमचे शतशः आभार.
मनाला उभारी येते अशाने.

सौंदाळा's picture

22 Oct 2014 - 9:29 am | सौंदाळा

कथेचा फॉरमॅट (साचा) आवडला

+१
तळमळीने लिहिणारे, भावनावश होणारे लेखक जेव्हा एखादी कथा लिहित असतील तेव्हा त्यांच्या मनावर, आयुष्यावर कसे पडसाद उमटत असतील याची झलक दिसली.
लिखते रहो.. जागते रहो च्या चालीवर जोरात वाचा आणि खरच लिहित्या रहा ही विनंती.

पैसा's picture

22 Oct 2014 - 10:53 am | पैसा

अनाहिता असा आयडी नसल्यामुळे हा लेख माझ्या आयडीने प्रसिद्ध करावा लागला, त्याबद्दल संपादकीयामधे लिहिले आहेच. अंक प्रसिद्ध करण्याच्या गडबडीत त्या त्या कथेवर श्रेय उल्लेख करायचा राहून गेला होता, त्याबद्दल मी दिलगीर आहे. ती दुरुस्ती आता केली आहे. या कथेचे सर्व श्रेय यशोधरा आणि इतर अनाहितांचे आहे, त्यांच्यातर्फे तुम्हाला धन्यवाद!

सस्नेह's picture

24 Oct 2014 - 3:25 pm | सस्नेह

अतिशय संयत अन सहज वळणाने जाणारी ग्रामीण पार्श्वभूमीवरील ओघवती कथा.
ग्रामीण वातावरणातील असूनही कुठेच भडकपणा नाही याबद्दल अभिनंदन.
भाषेला जरतारी ग्रामीण ढंगाचा साज चढवल्याबद्दल अपर्णाताईचे विशेष आभार !

जेपी's picture

24 Oct 2014 - 5:30 pm | जेपी

कथा आवडली.

सुरेख कथा, आवडलीच. कामाच्या गडबडीत अनाहितात वाचायला, प्रतिसाद द्यायलाही तेव्हा वेळ झाला नव्हता.
कथेचा साचा, ग्रामीण साज, आणि लेखिकाच लिहीत आहे ही भावना - सगळचं उत्तम जमुन आलं आहे.

अनन्न्या's picture

1 Nov 2014 - 6:20 pm | अनन्न्या

भिवण्णा, आनशी रखमा सगळेच आपल्या जवळचे वाटतात. सुखद शेवट असला की कथा वाचून बरं वाटतं. सहभागी अनाहितांचे विशेष अभिनंदन!

मस्त झालीये कथा ..अनाहीतांचे अभिनंदन

सानिकास्वप्निल's picture

3 Nov 2014 - 1:40 pm | सानिकास्वप्निल

यशोधरा ताई आणि सर्व अनाहिता ज्यांनी अनाहिताच्या ह्या पहिल्या कथेला एकत्र बांधायचे ठरवले त्यांचे मनापासून आभार.

ग्रामीण पार्श्वभूमी, भाषा आणि शेवट सगळेच उत्तम जमले आहे.
खूप आवडली :)

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2014 - 4:47 pm | प्रभाकर पेठकर

ह्या अन त्या कारणाने मागे पडत गेलेली एक सुंदर कथा तशीच वाचल्याशिवाय राहिली असती पण आज नशिबाने आणि वेळेने साथ दिली आणि विस्मयकारी कथाकृतीने मनाची पकड घेतली. उत्सुकतापूर्ण कथानक आणि एक वेगळाच बाज, आवडला. अभिनंदन.