दिवाळीतले जी टीव्ही कार्यक्रम

Primary tabs

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:07 am

दिवाळीतले "जी" टीव्हीवरचे खास कार्यक्रम ( मिपा मेम्ब्रांसाठी जनहितार्थ प्रसारित )

(सूचना - आपल्या जबाबदारीवर सदर साहित्य वाचावे. उल्लेखित व्यवसायांबद्दल कोणतेही साम्य आढळल्यास योगायोग समजावा....(चला मी सुटलो !!) )

१) "बोम मिनिष्टर"- भावजी रोज संध्याकाळी वेगवेगळ्या वहिनींना भेटायला त्यांच्या घरात जातात ऑफिशियली.....घरातले सगळे घरीच असतात.... शिवाय सगळ्या गावाला बोलावून ठेवलेलं असतं घरी....शूटिंगचा क्यामेरामन रोज एक डिस्प्रिन खातो सगळ्यांची एकमेकांशी असलेली नाती ऐकून. भावजिंशी सगळ्या गावाची ओळख ,नमस्कार, चमत्कार झाल्यावर अर्धा एपिसोड संपतो. वेळ उरल्यास भावजी घरातल्या फाटक्यात पाय घालायचा यथेच्छ प्रयत्न करतात ( मार कसा बसला नाही अजून बुवा? तो एपिसोड दाखवत नसावेत बहुधा) घरोघरच्या गुटगुटीत वाहिनी जुने गेलेले दिवस आठवत त्या घरातून घुशीसारख्या इतस्ततः वस्तू शोधत फिरत असतात. वस्तू शोधल्यास एक चांदीचे नाणे देतात आणि मग पैठणीची मारामारी... जिंकलेल्या वहिनींच्या नवर्‍याला त्यांना उचलावे लागते (दुसर्‍या दिवशी पाठीत उसण भरल्यामुळे "शिक लिव"घ्यावी लागते) भाव्जींमुळे अनेक नवर्‍यांच्या खिशाला पैठणीची चाट बसत असल्यामुळे समस्त नवरे वर्गाचा त्यांच्यावर दात आहे( त्यामुळेच भावजी " आवाज कुणाचा" असा आवाज काढूच शकले नसतील कदाचित ! कोणाचे शिव्याशाप नाही घेऊ )...बोम मिनिष्टरचा साडी सेल्समनचा जुना धंदा पुन्हा सुरु...नव्या बाटलीत जुनी दारू !!

२) "होणार सून मी पुन्हा घरची" - (कितवा एपिसोड माहित नाही)
सुनेच्या वडिलांनी सगळ्या डॉक्टरांना उपाशी मारायच ठरवलेल असल्यामुळे ते फक्त ऑपरेशन करायचं अस म्हणत पडक्या घरात बसलेले असतात. सुनेची आई वखवखलेल्या हडळीसारखी सतत पैसा पैसा करत असते. घरच्या सुनेची स्मृती डोंबिवलीच्या लाईटप्रमाणे बऱ्याच वेळा येत जात असल्यामुळे आता तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला आणि नवर्‍याच्या घरच्यांना (नवर्‍यासकट) कुठल्यातरी नर्सिंग होम मध्ये दाखल केले जाते. सून तिथे डबा घेऊन जात असताना अचानक रस्त्यात तिची स्मृती जाते. गजनी मधल्या आमिर खानसारखी ती तो डबा हातात घेऊन भटकत असताना तिच्यासमोर एक भुकेलेला भिकारी येतो. सून त्या भिकार्‍यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकेल? पहा जमलं तर.... (तुम्हाला पण कुठेतरी मनोरुग्ण म्हणून दाखल करून घ्यायचं असलं तर नक्कीच !!)

३) "गुंतून जाती सगळ्या गाठी" -
बायकोपेक्षा नवराच तिच्या पूर्वाश्रमीच्या मित्राच्या प्रेमात पडल्याने घरातले सगळेच (शंकेच्या नजरेने !!) अस्वस्थ आहेत. घरातली मुलगी तिच्या मुलापेक्षाही जास्त पोरकटपणा करत फिरत असली तरी तिला कोणीही "न्यानामृत" पाजत नाही. घरातली धाकटी सून सदानकदा तोंडावर आताच कोणालातरी पोचवून आल्याचे भाव दाखवत घरभर फिरत असते. ती हसत असतानाचा एपिसोड नंबर सांगितल्यास प्रेक्षकाला एक महिना वर्ल्ड टूर झाईर करण्यात आलेली आहे. सतत चहा कोफी पिणे हा इतर घरच्यांचा प्रमुख उद्योग...जसं काही आसामातल्या चहाच्या आणि कुर्गमधल्या कोफिच्या बागा ह्यांच्याच पिढीला आंदण दिल्या असाव्यात ! तिकडे बाबाजी त्यांचे नवनवीन प्रताप दाखवत फिरत आहेत. तो मित्र भणंग अवस्थेत गावभर दाढी वाढवून फिरतोय. नेमका तोच मित्र बाबाजींना दिसतो आणि त्यालाच बाबा समजून ते घरी उचलून आणतात. पुढे काय होतं ते नक्की पहा आणि "जी" टीव्हीच्या ह्या स्लॉटवर लक्ष असू द्या !!

४) जय प्रेम त्रिकोण -
ह्या शिरियल मधला "द्येव", द्येव कमी आणि नाईलाजाने देवघेव करणारा नवरा जास्त वाटतो. अत्यंत मेटाकुटीला येउन बायको आणि "ती" यांना आळीपाळीने सांभाळता सांभाळता तो "यायाम" कधी करतो ते देवच जाणे ! बायको मात्र काकाक्षाने नवर्‍यावर लक्ष ठेवून आहे. ह्यातला संदेश केव्हाच प्रेक्षकांना कळलेला आहे तो म्हणजे माणूस असो नाहीतर देव असो, त्याला बायकोच्या तावडीतून कोणीच वाचवू शकत नाही. लग्नापूर्वी ते ट्याबवर "३जी" गप्पा मारायचे. लग्न झाल्यावर द्येव सतत डोक्याला हात लावून बसलेला असतो. त्याला मदत करायला "मुनी" असतातच (झाल....भीक नको पण कुत्रं आवर ) इथून पुढचे कथानक साधारण अनिल कपूर यांच्या 'घरवाली बाहरवाली'च्या वाटेवर जाइल असा अंदाज आहे (चुकूही शकतो). तरी अगत्य पाहण्याची कृपा करावी !

५) मी एकटाच खवैय्या
ह्या शिरियलची निर्मिती आणि संकल्पना काही खास उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली होती असं पदोपदी जाणवतं (आणि ती कोणी केली असेल तेही आपसूकच कळत). वेगवेगळ्या स्त्रीवर्गाला शूटिंग मध्ये बोलावून त्यांच्या शिक्रेट रेशिपी समजावून आणि बनवून घेऊन एपिसोड संपल्यानंतर एका कोपर्यात शांतपणे बसून खाणे ह्या आपल्या "एवेरग्रीन गुटगुटीत" बाळाच्या केवळ एका उद्देशासाठी कितीतरी लोकांना पोटापाण्यापासून तासंतास वंचित ठेवलं गेलं होतं. क्यामेरामनने चिडून नंतरचं पण स्टिंग ऑपरेशन केलं असतं तर लोकांना एक आगळीच गम्मत वाटली असती. पण असो...सध्या आपला "सीडी बम्बावाला", पूर्वी पोटाची आग विझवायचा.... आता घराची आग विझवतोय. काळाचा महिमा.... दुसरं काय ? कोणी तरी बाळाला परत बोलावून खवैया परत सुरु करा रे !!

६) चला कोणीही सेटवर येऊ द्या -
नवीन सुरु झालेली ही शिरियल कधी कधी बरी वाटत होती पण नेहमीच्याच लोकांचे तेच तेच चाळे पाहून सतत गतकाळातल्या जनानखान्याची आठवण येते. त्यातले खोजे, खुशमस्करे आणि इतर गोतावळा पाहून त्यात येणाऱ्या पाहुण्यांची मनापासून दया येते. आपला सिनेमा, नाटक किंवा जे काही असेल ते धो धो चालावं ह्या सुप्त इच्छेचा पदर पकडून जीव मुठीत धरून सेटवर आलेल्या पाहुण्यांचे यथेच्छ वस्त्रहरण करून त्यांना नंतर नवीन कापडं चढवून मग घरी पाठवलं जातं. पाहुण्यांनाही मनात शिव्या घालत समोर चाललेला तमाशा उघड्या डोळ्यांनी बघावाच लागतो (काय करतील बिचारे!) बर्‍याच ज्येष्ठ कलाकारांना इथे बोलावले की ते त्यांच्यावर कोणताही हिणकस विनोद केला जाऊ नये ह्यासाठी पहिल्यांदा मारुती मंदिरात नारळ आणि बत्तासे वाटत असावेत. डॉक्टरकीचा व्यवस्थित खिसे भरून टाकणारा व्यवसाय सोडून (मुळात तो डॉक्टर वाटतच नाही ....एकदा सेटवर डिग्री दाखवायला आणायला सांगितले पाहिजे !) ह्या गोंधळात सामील व्हायला खरच सिंहाच काळीज लागतं !! बघा आणि टाइमपास करा जमलं तर .....

७) महिला गुप्तहेर (कोणती अस्मिता?) :
"रजनी" सारख्या सर्वांगसुंदर मालिकेनंतर ही मालिका प्रेक्षकांना बघायला लावणे म्हणजे सुर्व्यासमोर काजव्याने चमकण्यासारखे आहे. अत्यंत थुक्रट रहस्य ( शेंबडे पोर पण सोडवू शकेल असले प्रश्न ) असलेल्या कथा हे ह्या मालिकेचे वैशिष्ट्य ! मुळात ह्या बाईला पोटापाण्याचा काय उद्योग आहे हेच कळत नाही. अत्यंत भंपक निष्कर्ष काढत काढत एका टोकापर्यंत जाउन पोचणे ह्याला गुप्तहेर म्हणत असतील तर ही शिरियल एकदम ब्येस्ट ! एक एक शक्यता गाळत शेवटी जे उरते त्याला जर रहस्याचा उलगडा म्हणत असतील तर खरच देश बौद्धिक दिवाळखोरीच्या मांडीवर बसलाय असंच म्हणावं लागेल. बरोबरचे लोक कोणताही मोबदला न घेत कशी कामे करतात ह्याचे रहस्य पोलिसांना सांगितले तर त्यांना बरीच मदत होऊ शकेल !!

८) छेद भविष्याचा -
दररोज आणि विशेषतः रविवारी वेगवेगळे शब्द वापरून तेच तेच भविष्य सांगण्याचा आटापिटा करणाऱ्या मनुष्याला पाहून आपल्याचाच त्याच्या भविष्याची काळजी वाटायला लागते. हे केलंत तर ते होईल आणि ते केलंत तर हे होईल हे सांगायला ज्योतिषी कशाला हवा ....(त्याला ट्राफिक हवालदार सुद्धा बास झाला). सगळ्या वर्गांचे भविष्य एका एका ओळीत ठोकणार्या त्याच्या कसबाला त्रिवार सलाम ! मात्र हे भविष्य सकाळी सकाळी ऐकणे टाळावे कारण चुकून चांगले सांगितलेले खरे होत नाहीच पण जर वाईट सांगितले तर मात्र हमखास तसेच घडते त्यामुळे डोक्याला त्रास करून घेऊ नका. आपले भविष्य आपल्या हाती ( त्यातूनही टीव्हीवर काहीच बघायला नसले तर बघा हे केव्हातरी....तुम्हालाही आत्मविश्वास येईल की अगदीच काही नाही तर भविष्य सांगण्याचा व्यवसाय करून तुम्ही तुमचे पोट नक्की भरू शकाल !! )

९) जय हनुमान ज्ञानगुणसागर-
ही कोणतीही शिरियल नाही पण येण्टर्टेन्मेण्ट त्यापेक्षा तसूभर कमीही नाही. पहिल्यांदा आतमध्ये भिंगात हनुमानचालीसा लिहिलेले हनुमानाचे लोकेट...त्यानंतर तेराव्याला बसलेल्या मनोजकुमारचा चेहरा....मग अर्थार्जनाचे सगळे मार्ग बंद झाल्यामुळे नाईलाजाने त्यात काम करणारे कलाकार आळीपाळीने दिसतात.लोकेट घालून कोणाची कशी ताबडतोब प्रगती झाली हे सांगणाऱ्या तद्दन सुरस (आणि खोट्या आहेत हे कळणाऱ्या) कहाण्या... मेने लोकेट पेहेन लिया और आज मेरे भैयोसे १० गुना ज्यादा कमा राहा हू !! (कोणता सिग्नल शोधलास बाबा ???) त्यानंतर निवेदक "मनोजकुमारका चेहरा देखकेही लोकेट खरीदना" असं परत सांगतो ! मनोजकुमारचे तोंड काय ट्रेडमार्क आहे का? मुळात मारुतीचा आणि मनोजकुमारचा संबंधच काय? अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित होऊन आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून बिनदिक्कत सकाळ संध्याकाळ ही झैरात अव्याहत चालू असते ( ह्याने लोकांचे कष्ट दूर होतील की नाही ते नाही माहित पण "जी" चे नक्कीच वाढणार लवकरच ! भीमरूपी महारुद्र त्यांना सुबुद्धी देवो !!)

१०) बातम्या -
वरीलपैकी काहीही न पटल्यास आपला सगळ्यात मोठा लोकशाहीचा मनोरंजक सर्कशीचा खेळ आणि त्याच्याशी संबंधित कोणत्याही बातम्या पहाव्यात आणि आपले शाळेचे दिवस आठवावेत....आपण नाही का लहानपणी तक्रार करायचो....बाई तो बघा माझी शीसपेन्सिल चोरतोय ....बाई ही बघा माझे केस ओढतेय वगैरे वगैरे .... तसेच काही शरीराने मोठे झालेले (दिसतंच नै ते लवकर !) पण मनाने अजूनही पहिली दुसरीत असणारे आपले नेते आणि त्यांचे आरोप प्रत्यारोप ह्यासारखा दुसरा मनोरंजक प्रकार नाही. त्यातल्या त्यात बौद्धिक आरोप करणारा मनुष्य आपला नेता होतो( आपण सगळी खरंतर मेंढरं म्हणूनच जन्माला यायचो पण चुकून माणूस झालोय पण आपला कळप हाकायला कोणीतरी लागतोच !!)

जर वर लिहिलेल्या कोणत्याही शिरियल मधून आपले मनोरंजन झालेच तर तोही एखादा योगायोग समजावा !!
दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा ( माझ्याकडून आणि "जी" कडूनही)

जय हिंद जय महाराष्ट्र !

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Oct 2014 - 8:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बातम्यांचं वर्णन सगळ्यात जास्त आवडलं ...

"बाई तो बघा माझी शीसपेन्सिल चोरतोय"
खत्तरनाक.

जेपी's picture

21 Oct 2014 - 12:05 pm | जेपी

मस्त

मित्रहो's picture

21 Oct 2014 - 7:26 pm | मित्रहो

सतत चहा कोफी पिणे हा इतर घरच्यांचा प्रमुख उद्योग.
मी सिरीयल बघत नाही पण बायको बघत असताना सहज लक्ष गेले तर मला आठवतेय ते चहाच पित असतात. टाटा, लिप्टन वाल्यांनी त्याकडे लक्ष द्यायला हवे. जाहीरातीचे ब्रेक घ्यायची गरज नाही.

हे असं लॉजिक आम्ही कुटुंबाला सांगायला गेलो की एक फणकार्‍याने भरलेला जळजळीत कटाक्ष आमच्या वाट्याला येतो. त्यामुळे हतबल! काय करणार?

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2014 - 9:16 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर निरिक्षण आणि शब्दांकन.

आमच्या घरी ह्या 'सिरियल किलर्स' बद्दल बोलल्यावर 'शी बाई! मी नाही पाहात ह्या त्या न त्याच सिरियल्स.' असं झुरळ झटकल्यासारखं म्हंटलं जातं. एखादी सिरियल पाहत बसली असताना मी म्हंटलं की, ' बघ! सिरियल्स तर बघतेच, मग नाही कशाला म्हणतेस?' तर 'छे:! एव्हढी एकच बघते कधीतरी. ते पण मुद्दाम नाहीच. सहज टिव्ही लावला आणि चालू असेल तर पाहते जरा.' (हे प्रत्येक सिरियलच्या बाबतीत ऐकलं आहे.)
लेकरू आमचं त्याच्या रुम मध्ये यू-ट्यूबवरच्या क्लिप्स आणि टोरँटवरून उतरवलेले इंग्रजी चित्रपट दार आतून बंद करून पाहात असतं. त्याचे इंटरेस्ट बदललेत.

मी पाककृत्या पाहात असतो. किंवा डिस्कव्हरी वगैरे. मधे जरा कपिल शोने भूरळ पाडली होती पण आता तेव्हढे आकर्षण राहिले नाही.

राजेश घासकडवी's picture

22 Oct 2014 - 1:19 am | राजेश घासकडवी

खुमासदार लेखन. इतक्या सुंदर आणि करमणुकप्रधान मालिका असल्यामुळे प्रेक्षकांना (सॉरी सॉरी... दर्शकांना) जी टीव्ही लावल्या लावल्या करमणुक कर भरावा लागला पायजेल.

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Oct 2014 - 10:37 pm | माम्लेदारचा पन्खा

आभारी आहे....

सविता००१'s picture

22 Oct 2014 - 11:07 am | सविता००१

एकदम पट्लं.
असंच आहे अगदी.

तुम्ही या सगळ्या मालिका रोज बघता का?
हो असेल तर…
तुमच्यापध्दल सहानुभुती :(
आणि...
तुमच्या जिद्दीला सलाम! :)

हापिसातुन घरी आल्यावर ते चेटकिणीच्या आवाजातले बेसूर हसत 'काहिही हं श्री' ऐकलं कि पायातला बुट फेकुन टिव्ही फोडावासा वाटायचा मला!
माझ्या नशिबाने ती मालिका घरच्यांनी बघायची थांबवली. :)

बाकी, लेख मस्त आहे!

माम्लेदारचा पन्खा's picture

22 Oct 2014 - 9:12 pm | माम्लेदारचा पन्खा

पण माझ्या सक्तमजुरीत ते समाविष्ट आहेच...

"काहीही हं श्री" च्या बाबतीत -
+१११११११११११११११११११११११११११११

सरकलेली वाटते ही बाई तिच्या चेहर्याचे हावभाव बघून....

हापिसातुन घरी आल्यावर ते चेटकिणीच्या आवाजातले बेसूर हसत 'काहिही हं श्री' ऐकलं कि पायातला बुट फेकुन टिव्ही फोडावासा वाटायचा मला! Laughing Hysterically

पैसा's picture

22 Oct 2014 - 9:42 pm | पैसा

सॉलिड लिहिलंय!

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2014 - 10:34 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत, खमंग!
स्वाती

खटपट्या's picture

23 Oct 2014 - 3:30 am | खटपट्या

मस्त !!

अंतरा आनंद's picture

24 Oct 2014 - 7:21 pm | अंतरा आनंद

हा हा हा !! सही.

स्वप्नज's picture

24 Oct 2014 - 8:10 pm | स्वप्नज

'झीट यावी' या च्यानैलचेच वस्त्रहरण केलेत की हो...! बादवे, प्रत्येक सिरीयलमध्ये त्रिशतकी धाग्यांचे पोटेन्शियल आहे.

बबन ताम्बे's picture

31 Oct 2014 - 5:54 pm | बबन ताम्बे

एकदम खुसखुशित लेख! फटाके, फुलबाजे, तडतडी ,,, सगळे आहे लेखात . :-)

स्पार्टाकस's picture

1 Nov 2014 - 11:56 am | स्पार्टाकस

हान् तु च्यायला SSSSSSSSSSSS...!!!!

प्रेक्षकाचं (चुकलो चुकलो दर्शकाचं) मानसिक वय आपल्यापेक्षा जास्तं आहे हे या लोकांना का समजत नाही?

जुइ's picture

2 Nov 2014 - 6:05 am | जुइ

खुप आवड्ले :)

मधुरा देशपांडे's picture

2 Nov 2014 - 2:11 pm | मधुरा देशपांडे

भारी लिहिलंय. मस्त.

सानिकास्वप्निल's picture

2 Nov 2014 - 7:24 pm | सानिकास्वप्निल

छान लिहिले आहे.