रविवार हा सुखाचा.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 7:33 am

'अगं ए! जरा मस्त पैकी चहा टाक की एक'
'आधीच सकाळपासून दोन वेळा झाला आहे.' - स्वयंपाकघरातून नको त्या वेळी सत्यकथन.
'पण मला अजून एक हवा आहे.' मी चिवट.
'आंघोळ करा आधी. नाहीतर जेवणही मिळणार नाही.' - स्वयंपाकघर निर्वाणीवर.

निदान रविवार सारख्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी तरी आंघोळ अनिवार्य नसावी असं माझं प्रांजळ मत आहे. पण अधिक वाद घालून रविवार सारख्या सुट्टीचे सकाळी सकाळीच विसर्जन करावे असे कुठल्याही अनुभवी नवर्‍याला वाटत नाही. नाईलाजाने उठलो. तेव्हढ्यात पेपर आला आहे का पहावा ह्या उद्देशाने दार उघडले तर येऊन पडलेला पेपर दिसला तो उचलतो आहे तेवढ्यात शेजारच्या गोगटे काकू हातात रिकामी वाटी घेऊन येताना दिसल्या. बहुतेक साखर किंवा विरजण हवे असेल.
'अरे व्वा! काकू, बर्‍याच दिवसांनी येताय.'
'इश्श्य! अहो रोज तर माझी फेरी असते.'
'अग ए! काकू आल्यात बघ. चहा टाक त्यांच्यासाठी.' माझी आपली एक बुद्धीबळातली चाल.
'या या काकू. बसा नं. आत्ता होईल चहा.' - सौ.
'अग! चहा बिहा काही नको.' माझ्या जीवाचं पाणी पाणी.
'अहो! लगेच होईल. ह्यांचाही व्हायचाय, तिसरा.' सौने तेव्हढ्यात सूड उगवलाच.
मी पेपरातून डो़के बाहेर काढले नाही. गोगटे काकू तिथेच स्टुलावर टेकल्या ह्याची नोंद मी तिरप्या डोळ्यांनी घेतली आणि आता चहा घेतल्याशिवाय त्या हलत नाहीत ह्या निश्चिंतीने, सोफ्यावर सुखात पसरलो.
पारोसे राहण्याचा आपल्यालाच कंटाळा येई पर्यंत, निदान सुट्टीच्या दिवशी तरी, आंघोळीला उठायचे नाही हा माझा शौक. रोज असतेच लवकरची, मागे वाघ लागल्यासारखी, कावळ्याची आंघोळ. समोरच्या टी-पॉयवर सौने चहाचा कप आणून ठेवला हे, पेपरातून डोके बाहेर न काढताच, मला समजलं. अर्थात, ते समजावे अशा पद्धतीनेच तो ठेवला गेला होता.
'अगं! तोंडात टाकायला नाही का काही? बिस्किटं, चिवडा वगैरे?'
'आंघोळ करून घ्या. तो पर्यंत ऑम्लेट करतेच आहे.'
च्यायला, सानिध्यात राहून सौ सुद्धा बुद्धीबळाच्या चाली शिकली म्हणायची. गरमागरम ऑम्लेट, गरमागरम पोळ्या (साजूक तूप लावून) हा माझा अत्यंत आवडता नाश्ता आणि ऑम्लेटचे नांव काढले की गोगटे काकू काढता पाय घेणार. म्हणजे बुद्धीबळातील घोड्याने राजाला शह देऊन वजीराचा बळी घेण्यासारखा 'फोर्क' टाकला होता सौने. काकूंचे आणि नॉनव्हेजचे जन्मजन्मांतरीचे वैर. मागे एकदा टिव्हीवर दाखवित असलेली नॉन-व्हेज पाककृती मी अगदी रसभरीत नजरेने पाहण्यात गुंग असताना काकूंनी 'हे काय? तुम्ही नॉनव्हेज खाता?' असा रसभंग करणारा प्रश्न केला होता. त्यावर 'होssss! मी सग्ळं-सग्ळं खातो' असं म्हंटल्यावर १० दिवस मला ओळखही दाखवत नव्हत्या. पण सकाळी चालायला गेल्यावर गोगटे काका इराण्याकडे ऑम्लेट-पाव खातात अशी त्यांना बातमी लागली (मीच पुरविली होती चिंगी मार्फत) तेंव्हा त्यांना भारी ओशाळल्यासारखं झालं होतं. नंतर राग निवळला पण नॉनव्हेजचा विषय निघाला की त्या काढता पाय घेतात हे सौला माहित होते. त्याप्रमाणे त्या गेल्याच.
चहा झाला होता आणि आता कांही व्हॅलीड कारण नसल्याने (आणि ऑम्लेटचा मोह होताच) नाईलाजाने आंघोळीसाठी उठलो. मुलगा सकाळीच क्लासला गेला होता. घरात आम्ही दोघेच होतो. तेव्हढ्यात घरचे वातावरण जरा निवळावे म्हणून हिला म्हणालो, 'काय करते आहेस?'
'स्वयंपाक.'
'ते दिसतंय गं! पण जरा वेळ आहे का?'
'काय काम आहे?' ही बेसावध.
'जरा पाठीला मस्तपैकी साबण लावून दे नं.'
'चहाटळपणा करू नका. आमच्या भिशीच्या बायका यायच्यात साडेअकराला.' लटका राग दाखवीत आणि हसू दाबीत ही म्हणाली. वातावरण निवळले होते.
'तरीपण... कित्ती कित्ती महिने झाले.' मी लगट करायचा प्रयत्न करीत.
टिंग-टाँग.
'घ्या, चिरंजीव आले, क्लासवरून. आता भूक-भूक करेल. जा लवकर आंघोळ करून घ्या.'
कुत्र्याला आंघोळीला काढावं अशा उत्साहाने, टॉवेल घेऊन, पाय ओढत बाथरूमकडे वळलो. पण पुन्हा कांही रोमँटिक विचाराने टॉवेल तिथेच बेड वर टाकून आंघोळीला गेलो. 'आज आपल्या प्रथम प्रितीचा संगम हा झाला....... नसतेस घरी तू जेंव्हा जीव तुटका तुटका होतो.......'वगैरे वगैरे दोन-चार रोमँटिक गाण्यातच माझी आंघोळ आटोपली.
आतूनच आवाज दिला. 'अगं टॉवेल राहीला बाहेरच. जरा दे तर...!'
फार रोमँटीक स्वप्नरंजनात गुंग होत पुन्हा एकदा आठवण करून दिली. 'देतेस नं?'
दारावर टकटक. 'हा घ्या, बाबा. मला ओरडता आणि तुम्ही पण टॉवेल विसरताच नं?' आमचे चिरंजीव. बाजी सौंनी मारली होती.

ऑम्लेट आणि पोळ्यांवर ताव मारून भरल्यापोटाने आणि तृप्त मनाने हात धूत असतानाच. भ्रमणध्वनीने हाक मारली. कोण असेल बरं! ही माझी उत्सुकता तर सौच्या कपाळावर आठ्या. मिल्या होता. सदान् कदा गावभर भटकण्याच्या सवयी मुळे आमच्या घरी बदनाम. आता 'हं बोल मिल्या' असं म्हंटलं असतं तर हिला कळलं असतं मिल्या आहे. त्यामुळे कुठे जायचा वांधा झाला असता.
'बोला, साहेब, आज कुठे पुजा आहे?' हि रिलॅक्स. हिला वाटलं आपला अतृप्त आत्मा असेल. त्याची प्रतिमा बरी आहे आमच्या घरी.
'हो..हो.. जाऊया की. येतोच मी.'
मिल्या, शर्‍या, गडबोल्या ह्यांचा तृष्णाशांती केंद्रास भेट द्यायचा विचार होता. म्हणजे आपली बिअर हो. माझा उत्साह पाहून शंकीत मनाने हिने विचारलंच, 'कोण होतं आणि कुठे निघालीय स्वारी आता?'
'अगं आपला अतृप्त आत्मा.' म्हणजे बर्‍याच दिवसांत बिअर न हाणल्यामुले माझा अतृप्त असलेला आत्मा, हे मी मनातल्या मनात.
'हं, त्याच काय काम आहे?' आयला, ही पोलीसातच जायला हवी होती.
'काही नाही तो नवीन फ्लॅट बुक करतोय त्या बिल्डरला भेटायला जायचंय.'
'मग, तुम्हाला काय कळतं त्यातलं?' आमच्या फ्लॅटच्या वेळेला ३ लाखाला बिल्डरने मला गंडा घातला तेंव्हापासून त्या क्षेत्रातलं मला कांही म्हणता कांही कळत नाही असा हीनेच सगळीकडे बभ्रा करून ठेवला होता.
'अग, असं काय करतेस?' मी शर्टाची बटणं लावत म्हणालो, 'एकास एक माणूस असलं म्हणजे बरं असतं.'
'हम्म्म!' ह्या 'हम्म्म' मध्ये बराच गहन अर्थ भरला होता.
'शर्टाची बटणं नीट लावा. वरखाली झालीएत आनंदाच्या भरात.' हिला संशय आलाच असावा ह्या शंकेने मी कसंनुसं हसून निघालो.
'लवकर या, नाहीतर बायको, संसार विसरून चार वाजेपर्यंत तिथेच रमाल.'
'आलोच लवकर' मी सटकलो बाहेर.
अशी तशी उगीचच परवानगी मिळाली नव्हती. आज भिशीच्या मैत्रीणी येणार होत्या नं. तेंव्हा मी शक्यतो घरात नसलेलाच बरा, अशा विचाराने परवानगी मिळाली होती.
'अक्षय बिअर बार' च्या प्रवेशद्वाराजवळच तिघेही भेटले.
'आयला, परत इथेच? गेल्यावेळी राडा झाला होता नं त्या वेटरशी?'
'अरे तो सुन्यामुळे. साल्याला २ बिअर पण चढतात' मिल्या ३ बिअर नंतर राडे करतो, फरक काही नाही.
'तो वेटर नाही रे आता, गेला सोडून.'
'सोडून नाही गेला मीच हाकलला मालकाला सांगून' मी उगीच मालकाबरोबर असलेली आपली जवळीक हायलाईट केली.
'चला, चला शुभस्य शिघ्रम.' गडबोल्या बिअर प्यायच्या आधी संस्कृत आणि दोन बिअर नंतर इंग्रजी भाषेला जवळ करतो. मस्तं थंड एसीत अर्धवट प्रकाशात बार अर्ध्याहून कमी भरलेला दिसत होता. आमचा नेहमीचा कोपरा रिकामाच होता. मालकाने माझं (आणि नंतर इतरांचं) स्वागत केलं, वेटर्सनीही हसून, कमरेत वाकून आमच्या टेबलाकडे निर्देश केला. इथे आपली वट होतीच तशी. मीही सुखावलो होतोच. पण उगीच बसल्याबसल्या म्हणालो, 'आयला इथे काय आवडतं तुम्हाला? मस्तंपैकी 'इंद्रपुरी बार' मध्ये गेलो असतो. बार बाला असतात नाचायला, सर्विसलाही सुंदर सुंदर दाक्षिणात्य ललना आहेत.' 'अरे हो! पण कापू आहे साला. इथे बरय बिअर बरोबर मसाला शेंगदाण्यच्या दोन राऊंड फ्रि आहेत.' इति. शर्‍या. मसाला शेंगदाणे कोणी फ्रि देतो म्हणाला तर शर्‍या मेल्यावरही ताटीवर उठून बसेल.
मागच्या सुन्याने घातलेल्या गोंधळानंतर (आणि मी त्याला आणि इतरांना आवरल्यामुळे) आमची तैनात उत्तम ठेवली होती. शर्‍याला आवडणारे मसाला शेंगदाणे, मला आवडते म्हणून पापलेट फ्रायची तुकडी, चिकन कबाब, मलई कबाब, रेशमी कबाब वगैरे वगैरेचा मारा टेबलावर अविरत होत होता. चिल्ड बिअरचा अमर्याद पुरवठा मैफिलीची रंगत वाढवित होता. हास्यविनोदाला उत आला होता. सर्वार्थाने रविवार फुलत गेला. दुपारचे अडीच वाजले आणि घराची आठवण झाली. नाईलाजाने मैफिल आवरती घ्यावी लागली.
घरी आलो तर वातावरण अगदी तंग नसलं तरी जेवणासाठी ताटकळलेलं होतं.
'काय म्हणाला बिल्डर?' वेगाने आलेल्या बॉल अचानक उसळी मारून चेहर्‍यापर्यंत उडाला तर फलंदाजाची उडते तशी तारांबळ उडाली.
'बिल्डर? कोण बिल्डर?' मी घरी काय कारण सांगितलं होतं ते त्या रंगलेल्या मैफिलीत पाssssर विसरून गेलो होतो.
'आँ? अहो त्या सदा अतृप्त असलेल्या आत्म्याबरोबर गेला होतात नं? की आणखीन कुठे बसला होतात?' माझ्या गृहप्रवेशातच बिअरचा वास दरवळलेला होता बहुतेक. तरी मी ती शेवटची बाटली घेणारच नव्हतो. पण आग्रहाला बळी पडलो.
'अगं! त्याचं काम लगेचच झालं. बिल्डर एकदम चांगला निघाला. सर्व अटी मान्य केल्या. लगेच निघालो होतो तर बार मध्ये घेऊन गेला. मी नको नकोच म्हणत होतो पण म्हंटलं आत्म्याचं डिल बिघडायला नको.'
'म्हणजे आत्मा भावजी, 'घेतात'? माझ्या पायाखालची जमीन सरकली.
'छे: ..छे! तो भडजी बुवा आहे ग अगदी.'
'मग मिल्यावगैरे पण आले होते वाटतं बरोबर.'
'तुला कसं कळलं?' श्शीट. विचारून चुकलो...म्हणजे काय, पार चुकलो.
'हम्म्म! आत्मा भाऊजींचं नांव आणि मिल्या आणि ती तुमची इतर चांडाळ चौकडी जमवून बसला असाल त्या 'अक्षय बार' मध्ये. तो मसाला शेंगदाणे देतो नं फुकटात.' मागेच केंव्हातरी बेसावध क्षणी ही मसाला शेंगदाण्याची माहिती प्रसवलो होतो मीच. आयला! पण अशी बोलतेय की जशी ही स्वतः तिथे हजरच होती.
'अग जास्त काही घेतली नाही. उगीच एक बिअर घेतली बस. चल लवकर जेवायला वाढ. जाम भूक लागली आहे.' खरं पाहता पोट तुडुंब भरलेलं होतं.
'का तिथे नाही का हादडलं कांही?'
'छे: ग! तुझ्या हातची चव आहे का हॉटेलच्या फुडला.'
'मला कळते ही लाडीगोडी.'
'ते जाऊदे. चिरंजीव कुठे आहेत?'
'तो बसलाय त्याच्या रुममध्ये फेसबुक उघडून. १० हाका मारल्यापण हलेल तर शपथ.'
'नाही नाही, हे वाईट हं. एव्हढं काय गाडलेलं असतं ह्याचं त्या फेसबुकात कोणास ठाऊक?'
'हो, तो फेसबुकात आणि तुम्ही मिसळपावात. मी मेली आहेच घरकामाला ठेवलेली बाई.'
बापरे! गाडी अतिशय चुकीच्या ट्रॅकवर निघाली आहे. कान पकडून आणला लेकाला जेवायला.
'चल बस जेवायला. जरा घरातल्यांशी चार शब्द बोल्लास तर बिघडतं काय तुझं कांही. आई एव्हढी राबराबून घरकाम करते तुला काही आहे का त्याचं. आयतं गिळायला मिळतं, किंमत नाही त्याची तुला.'
'अहो किती बोलाल, माझ्या लेकाला? जेव रे माझ्या सोन्या. तुला आवडतात म्हणून मुद्दाम डाळ ढोकळी केली आहेत, पोटभर जेव हो.'
झालं? मारली पलटी? दोघं एक झाले मी पडलो वेगळा. आणि त्याला आवडतात म्हणून डाळ ढोकळी केली की मी बिअर प्यायला गेलो म्हणून, मला न आवडणारी डाळ ढोकळी मुद्दामहून केली?
जेवता जेवता आमचं लेकरू, 'बाबा आज संध्याकाळी पिक्चरला जाऊ या? शाहरुख खानचा च्चनै एक्स्प्रेस लागलाय.'
मी हिच्याकडे पाहिले. आपण कांही ऐकलेच नाही अशा अविर्भावात जरी ती खाली मान घालून जेवत असली तरी शाहरुख तिचा आवडता नट आहे आणि मी बिअर ढोसत असताना ह्या दोघांमध्ये संगनमत झालेलं आहे हे मला जाणवलं. म्हणजे शाहरुखच्या पिक्चरला जायची इच्छा हिचीच पण लेकाला पुढे करून मला गळाला लावायचा प्रयत्न दिसतो आहे. मला शाहरुख अजिबात आवडत नाही.
उद्या दांडी मारायचा विचार होता. कांही तरी बुद्धीबळी चाल खेळावी लागणार.
'जाऊया नं.' हिने वर पाहिले. 'पण संध्याकाळी नको. रात्री शेवटच्या शो ला जाऊया'
'हो चालेल. उद्या माझं कॉलेज १२चं आहे.' लेकरू.
शत्रूसैन्याची मुख्य युद्धनौका बुडविली होती. पण सेनापतीने निकराचा हल्ला चढविला.
'काही नको. उद्या काय तुम्हाला सुटी आहे? ऑफिस नाही?'
'अगं उद्या ऑफिसला दांडी मारीन म्हणतोय. उद्या तुला साडी घ्यायला 'सजनी' मध्ये जाऊ तिथून तुझ्या आईकडे जाऊ. हा काय, कॉलेज संपल्यावर येईल डायरेक्ट तिकडे. कायरे येशील नं! नंदीबैलाने मान डोलविली. मस्त जेवून वगैरे संध्याकाळी घरी परतू.' हिची कळी खुलली. एव्हढी चांगली ऑफर वरचेवर येत नसते. ती संपूर्ण प्लान वर अ‍ॅप्रूव्हलचा शिक्का मारते. रात्री शाहरूखला भेटायचं म्हणून दोघेही खुश आणि रविवार दुपारी जागरण होणार नाही म्हणून मीही खुश.

रात्री शाहरुख खानचे माकडचाळे पाहून उशीराने घरी परतलो. बायको खुशीत होती. मुलगा त्याच्या बेडरुम मध्ये गेल्यावर अजून मुड बनवायला मी म्हणालो, 'उद्या किती वाजता निघायचं?'
'सकाळी १० ला निघू. 'सजनी'त दोन-तीन साड्या घेऊन बारा-साडेबारापर्यंत पोहोचूच आईकडे. मी फोन करून ठेवते. उकडीचे मोदक करायला सांगते. तुम्हाला आवडतात नं?' हं! उद्या सोमवार नं? व्हेज डे.
खरं पाहता मी एकच साडी घेऊया म्हणालो होतो. म्हंटलं जाऊदे. तीन काय उद्या हिला ३, हिच्या धाकट्या बहिणीला ड्रेस मटेरियल आणि आईला एक साडी अशी जंगी खरेदी होईल. क्रेडीटकार्ड बरोबर ठेवले पाहिजे. पण आत्ता ह्या क्षणाच्या तिच्या खुशी पुढे सर्व तुच्छ आहे.

रविवार सर्वार्थाने चांगला गेला.

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

21 Oct 2014 - 12:53 pm | विजुभाऊ

पेठकर काका..हा लेख लिहिण्यासाठी नक्की कोणाकोणाच्या घरी सर्व्हे करुन लिहीलाय ?
बर्‍याच ठिकाणी बरोब्बर नेम धरुन हाणलय तुम्ही

आयुर्हित's picture

21 Oct 2014 - 1:16 pm | आयुर्हित

व्वा! सगळेे काही डोळ्यासमोर घडत आहे असे मस्त लिखाण!
एखाद्या चित्रपटाच्या पटकथा लेखकालाही लाजवेल असे......

आपल्या वजनदार व्यक्तिमत्वाचे छुपे राज कळले हो!

स्पा's picture

21 Oct 2014 - 2:10 pm | स्पा

हाहा भारी लिहिलंय

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Oct 2014 - 2:17 pm | माम्लेदारचा पन्खा

मान गये उस्ताद !!

नाखु's picture

21 Oct 2014 - 3:15 pm | नाखु

टॉम अँड जेरीकथा
मस्त रवीवार व्रत कथा

सौंदाळा's picture

21 Oct 2014 - 3:54 pm | सौंदाळा

क्लास.
रविवारी दुपारी झोपायला मिळावे म्हणुन मीसुद्धा काहीही करायला तयार असतो.
बाकी बायकोच्या असल्या गेमांमध्ये मी अजुन खुपच सहजपणे अडकतो, अडकताना कळतपण नाही आणि नंतर एकदम रेफरन्स लागतो. तुमच्या लेखातुन यावर मात करायचे थोडे धागे-दोरे, उपयुक्त शिकवणी मिळाली आहे त्यामुळे आभार.
हॉटेलमधुन चापुन घरी काही न सांगता नेहमीसारखे जेवणे म्हणजे लई डेरिंगचे काम पण ते आता जमते
असो. तुमचे प्रतिसाद आणि पाकृ नेहमी बघतो आणि आवडीने वाचतो. पण या लेखाच्या निमित्ताने तुम्ही असे लेख वरचेवर लिहावे अशी विनंती करतो.

एस's picture

21 Oct 2014 - 4:09 pm | एस

रविवार सर्वार्थाने चांगला गेला.

सोमवार कसा गेला? ;-)

मस्त आणि खुसखुशीत लेख. पण तुम्ही फारच पत्ते उघड केले आहेत राव. आता आमच्यासारख्यांचं काय व्हायचं? हाहाहाहा!

बहुगुणी's picture

21 Oct 2014 - 4:54 pm | बहुगुणी

मस्त खुसखुषीत लेख! मजा आली. बर्‍याच वाचकांना खूप डावपेच (आणि तोंडघशी पडणं) ओळखीचे वाटले असणार!

गेल्याच रविवारी पाहुण्यांच्या सोबतीने 'वार्‍यावरच्या वराती'चं शंभरावं पारायण झालं होतं, त्यामुळे रविवारचं वर्णन आधिक भावलं. (ओ शेठ, आंगोली करताव ना!)

रेवती's picture

21 Oct 2014 - 7:54 pm | रेवती

खुसखुशीत झाले आहे लेखन.

सस्नेह's picture

21 Oct 2014 - 9:14 pm | सस्नेह

खु खु खुळ्या रविवारची खु खुसखुशीत कहाणी

सुहास झेले's picture

22 Oct 2014 - 1:36 am | सुहास झेले

मस्तच... एकदम खुमासदार लेख :) :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Oct 2014 - 2:03 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त खुमासदार लिखाण ! तुमचा हा पैलूही खूप आवडला ! और आने देव.

खटपट्या's picture

22 Oct 2014 - 4:02 am | खटपट्या

वा !!

जेपी's picture

22 Oct 2014 - 9:53 am | जेपी

मस्त.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2014 - 12:57 pm | मुक्त विहारि

मला शाहरुख अजिबात आवडत नाही.

मला पण..

सविता००१'s picture

22 Oct 2014 - 3:03 pm | सविता००१

खुसखुशीत

तुमचं निरीक्षण+लेखन शैली =ढासू.
बाहेर मित्रांबरोबर जाऊन काही मौजमजा करण्यासाठी कुणाला इतक्या बुध्दिबळाच्या चाली रचाव्या लागत असतील तर त्यांच्याविषयी सहानुभूती वाटतेय. काही संवाद वाचतांना रेडिओवरच्या पुन्हा प्रपंच श्रुतिका, त्यातली मिनीटली टेकाडे, पंत, आणि रविंद्र पिंगे शंना, बाळ कुडतरकर या सर्वाँची आठवण झाली.
माझ्या भटकंतीला माझी सौ नेहमीच प्रोत्साहन देतेच परंतू कधी "बऱ्याच दिवसांत कुठे गेला नाहीत ?"अशी सुरवात तिने केली की मी लगेच ओळखतो मैत्रिणींचा अड्डा जमणार आहे. नऊ दहा वाजले असतील तर मी लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन सैक भरायला घेतो. तिकडे फोनवरचे बोलणे ऐकू येते "अगं आजच ग्रहण सुटतंय उद्या संध्याकाळी येतील."

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2014 - 4:10 pm | प्रभाकर पेठकर

अगं आजच ग्रहण सुटतंय उद्या संध्याकाळी येतील.

हा: हा: हा: घरोघरी गॅसच्या चुली..

हे ललित लेखन आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Oct 2014 - 7:30 pm | लॉरी टांगटूंगकर

पाकृ विभागाबाहेर पण नियमीत लेखन करा.
लै झक्कास लिहीलय.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2014 - 8:47 pm | अत्रुप्त आत्मा

@पाकृ विभागाबाहेर पण नियमीत लेखन करा.
लै झक्कास लिहीलय.>>>> +++++१११११

मेघवेडा's picture

22 Oct 2014 - 10:46 pm | मेघवेडा

आह्हा! अभ्यंगस्नान नि फराळासोबत असल्या खुसखुशीत लेखांशिवाय दिवाळी पूर्ण होतच नाही. उत्तम खुमासदार लेखनशैली. मजा आ गया! :)

पैसा's picture

22 Oct 2014 - 10:57 pm | पैसा

खुसखुशीत लेख!

प्रभाकर पेठकर's picture

23 Oct 2014 - 5:40 pm | प्रभाकर पेठकर

विजुभाऊ, आयुर्हित, स्पा, माम्लेदारचा पन्खा, नाद खुळा, सौंदाळा, स्वॅप्स, बहुगुणी, रेवती, स्नेहांकिता, सुहास झेले, इस्पीकचा एक्का, खटपट्या, जेपी, मुक्त विहारि, सविता००१, कंजूस, अत्रुप्त आत्मा, मेघवेडा आणि पैसा....सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

पाकृ विभागाबाहेर पण नियमीत लेखन करा.

श्री. मन्द्या, पाकृविभागा बाहेर माझ्या अनेक आवडत्या विषयांवर (आणि ज्यात 'आपल्याला काही कळतं' असं मला वाटतं) मी प्रतिक्रिया देत असतोच. बाकी, वेळेची गणितं जमत नसल्याने, जास्त लेखन होत नाही. पण पुन्हा प्रयत्न करेनच. धन्यवाद.

आवडलाच! :)

-रंगा

मित्रहो's picture

23 Oct 2014 - 10:37 pm | मित्रहो

मस्त लेख
महागाइ फार वाढत चालली असे दिसते. त्यातल्या त्याक बीयरची किंमत तर जरा जास्तीच. एक दोन बीयरसाठी चक्क शाहरुखला झेलायच म्हणजे काय? जरा जास्तच होते.

जुइ's picture

25 Oct 2014 - 4:01 am | जुइ

आवडला!!

एस's picture

25 Oct 2014 - 10:07 am | एस

ते 'अक्षय बिअर बार' हे नाव फारच आवडल्या गेल्या आहे हे सांगायचं राहिलंच! ;-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Oct 2014 - 11:37 pm | निनाद मुक्काम प...

मस्त खुसखुशीत लेखन
काकांनी मनापासून लिहिले आहे.

बिचारा आत्मुस!! फुकटात त्याला फ्लॅट घ्यायला लागला असेल!!
काय काय कलट्या मारता हो!

ऋषिकेश's picture

27 Oct 2014 - 11:53 am | ऋषिकेश

मस्त :)

सानिकास्वप्निल's picture

27 Oct 2014 - 12:58 pm | सानिकास्वप्निल

लेखन आवडले काका

खुसखुशीत :)

पिवळा डांबिस's picture

28 Oct 2014 - 3:37 am | पिवळा डांबिस

लेख आवडला, पेठकरकाका!

दिपक.कुवेत's picture

28 Oct 2014 - 7:35 pm | दिपक.कुवेत

मस्तच लिहिलं आहे...और आने दो.

वैशाली हसमनीस's picture

28 Oct 2014 - 10:34 pm | वैशाली हसमनीस

मस्त.

मोहनराव's picture

29 Oct 2014 - 5:35 pm | मोहनराव

लेख आवडला

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2014 - 2:19 am | प्रभाकर पेठकर

चतुरंग, मित्रहो, जुइ, निनाद मुक्काम प... , aparna akshay, ऋषिकेश, सानिकास्वप्निल, पिवळा डांबिस, दिपक.कुवेत, वैशाली हसमनीस आणि मोहनराव आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल अनेकानेक धन्यवाद.

स्वॅप्स - ५ सेकंदात सुचलेलं नांव आहे ते. ह्यालाच 'आंतरीक उर्मी' म्हणत असावेत. *smile*

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2014 - 8:16 am | श्रीरंग_जोशी

रविवारवरचा हा लेख रविवारी संध्याकाळी निवांतपणे वाचला. खूप आवडला.

Maharani's picture

6 Nov 2014 - 11:43 am | Maharani

मस्त खुसखुशीत लेखन..

प्रभाकर पेठकर's picture

10 Nov 2014 - 2:26 am | प्रभाकर पेठकर

श्रीरंग_जोशी आणि Maharani धन्यवाद.