आदिकैलास ॐ पर्वत दर्शन यात्रा, पार्वतीसरोवर परिक्रमा भाग - १२

खुशि's picture
खुशि in भटकंती
8 Sep 2014 - 3:22 pm

चौदावा दिवस. जड अंतःकरणाने पुन्हा येऊ अशी आशा पालवत परतीचा प्रवास सुरू केला. आपल्या सैनिक बंधूंना विचारले, घर कब आओगे? आणि आमच्या व त्यांच्या डोळ्यांना अश्रूधारा कधी लागल्या ते समजलेच नाही. आदिकैलासनाथाचे पुन्हा एकवार दर्शन घेऊन निघालो. निसर्गसौंदर्य डोळे भरुन अंतःकरणात साठवत यथावकाश कुट्टीच्या मुक्कामी परतलो.

आज इथेच मुक्काम असल्याने भरपूर वेळ होता. मग भोजन झाल्यावर कुट्टी गाव बघायला बाहेर पडलो. प्रथम पांडवांचा वाडा बघायला गेलो. तिथे तसे काहीच नव्हते, पण जाणवले की भिंती बांधण्यासाठी वापरलेल्या विटा वेगळ्या होत्या. आकाराने खूप रुंद आणि रंगही लालभडक. वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना मोडकळीस आलेला होता, त्यामुळे वर गेलो नाही. वाड्याबाहेर उत्खननात सापडलेल्या वस्तू ठेवलेल्या होत्या. काही पसरट आकाराची मातीची भांडी आणि काही मजकूर कोरलेले दगडाचे तुकडे वगैरे होते. नंतर गावात गेलो. हे गाव फार पुरातन आहे हे तेथील घरांवर केलेले कोरीव काम पाहून लक्षात येत होते. दरवाजे बारीक वेलबुट्टी, फुले, पाने, स्वस्तिक, कमल वगैरे शुभचिन्हे कोरून सुशोभित केलेले होते. घरे चांगली प्रशस्त आहेत. इतकी प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल हवामान असूनही सर्व लोक हसतमुख, अतिथी देवो भव! असे मानणारे. तिथे शांतीकाकी नावाच्या बुजूर्ग महिला आहेत, नारायणस्वामींनी उघडलेल्या पहिल्या शाळेच्या विद्यार्थिनी. जेव्हा महिलांनी शिकणे म्हणजे महापाप असे मानणार्‍या काळात मॅट्रीक झालेल्या, आणि सर्व गावाला सुशिक्षित करणार्‍या. या वयातही त्यांची समाजसेवा चालूच आहे. काकींनी प्रेमाने आम्हांला बसवून घेतले, कोदूचे घावन खायला दिले. डॉक्टर शर्मा (जयपूर) यांच्याशी त्या इंग्रजीतून बोलल्या. या गावात वर्तमानपत्र येण्यास कधीकधी आठ दिवस लागतात पण तो शांतीकाकींकडे येतो. मिलिट्रीच्या सामानाबरोबर त्या पुस्तकेही मागवतात. त्या गावात शाळा चालवतात. मुलींनी शिकावे यावर त्यांचा जास्त भर असतो. शांतीकाकींना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.

शांतीकाकींचा निरोप घेऊन सैंधव मिठाची खाण बघायला गेलो. डोंगर पोखरून त्यातून खडे काढतात. आम्ही चव घेऊन बघितली, ते सैंधव मीठच होते. हिमालय भूगर्भीय हालचालींमुळे समुद्रातून उठल्यामुळे तयार झालेला आहे हे सिद्ध करणारा आणखी कोणता पुरावा हवा? याच डोंगरात कुट्टीमैय्याचा उगम आहे, मागल्या बाजूला कुठेतरी. संध्याकाळ झाली. आसमानी रंगत मन मोहवून टाकणारी. गर्द निळ्या आकाशाने लालपिवळ्या सोनेरी रंगाची शाल पृथ्वीमातेला जणू पांघरली होती. थंडीचा कडाका वाढला होता, गरमागरम भोजनप्रसाद ग्रहण करून तंबूत गेलो आणि दुलईत गुडूप झालो.

पंधरावा दिवस. गुंजीला मुक्काम. सैनिक, गावकरी, शांतीकाकी या सर्वांचा भावपूर्ण निरोप घेऊन निघालो. पुन्हा लाकडी ओंडक्यावरुन डगमगत पार झालो. डॉगर चढत उतरत आलो. देवीसिंग वाटच पाहात होते. नाश्ता तयार होताच. आज त्यांनी त्यांच्या घरी केलेले नूडल्स बनवले होते आणि पहाडी चहा केला होता, काश्मीरला कावा मिळतो ना तसला चहा. देवीसिंगनी प्रत्येकाला भूर्जपत्रे दिली. त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला.

मोठ्याच हिंमतीने सारी ग्लेशियर पार केली. वादळाने उद्ध्वस्त केलेला मार्ग पार केला. एका ठिकाणी एक मोठा धोंडा होता पिवळ्या रंगाचा. त्यावर वाघाच्या अंगावर असतात पट्टे होते. लांबून बघता एखादा भलामोठा वाघच बसला असावा असे वाटत होते. त्याच्या शेजारी बसून माझा फोटो काढला. म्हटले, बघा मी किती शूर आहे! गुलाबाची फुले पाहून तोडण्याचा मोह होत होता. पण पांडेजींनी सांगितले होते, कुठल्याही झुडुपाला, फुलाला, फळाला हात लावायचा नाही. कोणते काय विषारी असेल, गुंगी आणणारे असेल हे सांगता येत नाही. इकडे काही झाडे म्हणे अशी असतात की त्यांच्या जवळ पशुपक्षी, किडामुंगी, माणूस कुणीही गेले तर ते झाड आपल्या फांद्या खाली आणून त्याला कवटाळते आणि सारा जीवनरस शोषल्याशिवाय सोडत नाही. बाप रे! लांबूनच सुंदर दिसतात फुले, मग तोडायची कशाला? मनाची समजूत घातली (कोल्ह्याला द्राक्षे आंबट) चढाईवरचा घाट रस्ता सुरू झाला. डाव्या बाजूला डोंगर आणि उजव्या बाजूला खोल दरीत जोशात धावत कालीला भेटायला कुट्टीमैया चालली होती.

हवा बदलली, मौसम बदलला. नभ मेघांनी आक्रमिले. आता पावले उचलायला हवीत. नाभि, रौंकॉम्ग मागे टाकून गुंजी आले. गावातून कँपकडे आलो. तिथे काहीतरी गडबड असावी असे दिसले. काय झाले असावे? सैनिकांची कसली धावपळ चालली आहे? विचार करतच आवारात शिरलो. सॅक तंबूत ठेवून काय झाले ते बघायला गेलो. मोठ्या कैलास यात्रेच्या पाचव्या बॅचमधील एक महिला पहाटे लिपुलेक खिंडीतून घोड्यावरून जात असताना हार्टअ‍ॅटॅकने गेली होती. फक्त ४२ वर्षांची अहमदाबाद - गुजरातची राहणारी होती. बरोबर तिची २० वर्षांची भाची आणि मेहुणे होते. मौसम खराब असल्याने त्यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर उतरू शकत नव्हते. त्यामुळे बॉडी ठेवण्यासाठी आजूबाजूला असलेला बर्फ गोळा करण्याचे काम चालले होते. एका खाटेवर प्लास्टिक टाकून त्यावर बर्फ, पुन्हा प्लास्टिक, मग बॉडी, त्यावर पुन्हा प्लास्टिक, पुन्हा बर्फ असे ठेवले होते. उद्या आठ लोक तिला घेऊन बुधीला जातील. मौसम बदलला तर बुधीला हेलिकॉप्टर येईल.

भाची अनिताला आमच्या जवळ आणि मेहुणे पुरुषांच्या तंबूत अशी व्यवस्था केली. पोरीने सकाळपासून अन्नाचा कण घेतला नव्हता की पाण्याचा घोट प्यायली नव्हती म्हणून तिला बळेबळे सूप प्यायला लावले. आम्हीही प्यायले. आज कुणालाही भोजन करणे शक्यच नव्हते. रात्री जोरदार पाऊस सुरू झाला. झोप येणार नाही; पण पडलो दुलई पांघरुन.

-----------------------

क्रमशः

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

8 Sep 2014 - 4:09 pm | कवितानागेश

वाचतेय..

अजया's picture

8 Sep 2014 - 4:17 pm | अजया

किती वेगवेगळे अनुभव! निसर्गाच्या लीला,माणसांच्या त-हा !तुमच्या लिखाणातुन सगळं पोचतंय.पुभाप्र.

स्पंदना's picture

11 Sep 2014 - 5:27 am | स्पंदना

असच म्हणेन.
खुप काही डोळ्यांना दिसू लागल खुषी ताई.